जी.ए. कुलकर्णी : प्रत्येक कथेतून जादुई क्षण वाचकाच्या झोळीत टाकणारा क्षितिजगामी पांथस्थ
पडघम - साहित्यिक
सागर कुलकर्णी
  • जी.ए. कुलकर्णी
  • Mon , 11 December 2023
  • पडघम साहित्यिक जी.ए. कुलकर्णी G. A. Kulkarni

मराठीतील एक श्रेष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

.................................................................................................................................................................

ज्या श्रेष्ठ मराठी कथाकाराचं नाव सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावं; ज्याने मराठी वाचकांच्या अनेकानेक पिढ्या सुखावून टाकत असताना, वाचकाला जीवनातील दाहक दुःखाचा, अगतिकतेचा, नियतीशरणतेचा, जीवनाच्या व्यामिश्रतेचा वाचनानुभव प्रदान केला; ते थोर कथाकार म्हणजे जी.ए. कुलकर्णी. त्यांनी चिरकाल दुःखाचा धांडोळा आणि मानवी मनाचा वेध घेतला, मानवी नात्यातील गुंतागुंत कथेच्या माध्यमातून व्यक्त केली आणि बहुरंगी, बहुढंगी स्वभावाच्या, फिरत्या केंद्राच्या कथा लिहिल्या. त्यांच्या प्रत्येक दीर्घकथेत कादंबरीचं ‘बळ’ आहे.

जीएंची प्रत्येक कथा जुन्या सागवानी पेटीत जतन करून ठेवलेल्या रेशमी वस्त्रासारखी सुरेख, धुंद वास असणारी आहे. मला त्यांच्या कथांचं जे आकलन झालं, जो अर्थ समजला, त्यातून त्या कथांचे अनेक सूक्ष्म, तरल, नवेनवे पदर उलगडत गेले. त्यासाठी हा लेखनप्रपंच.  

जीएंची प्रत्येक कथा मानवी जीवनाचा एक धपापता उष्ण तुकडा आहे. म्हणूनच या कथा जीवनासारख्याच आहेत, कळूनही अजून खूप काही कळायचे आहे, याची सदैव जाणीव व्यक्त करणाऱ्या. एकदा वाचल्या आणि त्या नुसत्या आवडल्या, एवढ्यावर या कथांचं आपल्याशी असलेलं नातं थांबत नाही, तर त्या आपल्याला झपाटतात, अस्वस्थ करतात, जखमी करतात आणि अचानक नवा तजेला देणारा जीवनार्थही प्रदान करतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जीएंचा जन्म बेळगाव जवळच्या एकसंबा या खेडेगावात १० जुलै १९२३ साली झाला. जीए व त्यांच्या दोन बहिणी या तिघांना सांभाळताना आई-वडिलांनी खूप कष्ट घेतले. मेहनतीतून संसार उभारला. त्यांचे वडील एका वकिलाकडे कारकुनाची नोकरी करत होते. ‘रात्र झाली गोकुळी’, ‘राधी’, ‘कैरी’, ‘तुती’ या कथांमधून जीएंच्या बालपणाचे अप्रत्यक्षपणे दर्शन घडते.

जीए शाळेत जाऊ लागतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. माय-लेकरातले जिव्हाळ्याचे नाते, ‘हिरवे रावे’ या कथासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेतून लक्षात येते. जीए आईला उद्देशून लिहितात, ‘रात्री उशिरा घरकाम करताना तुला सोबत व्हावी, म्हणून मला समोर बसवून तू पुष्कळ कथा सांगितल्यास. आता तू गेल्यावर मला त्या कथांची सोबत आहे.’

पुढे वडील, दोन्ही बहिणी एका पाठोपाठ गेल्यावर जीए पूर्णतः एकाकी झाले, जीवनातील दुःखाच्या, शोकाच्या दर्शनाने अंतर्मुख झाले. त्यानंतर मामा-मावशीकडं राहून मोठे झाले. एम.ए.नंतर अनेक नोकर्‍या बदलत अखेरीस ते बेळगावात इंग्रजीचे प्राध्यापक झाले. आई-वडिलांच्या, सख्ख्या बहिणीच्या प्रेमाला मुकलेल्या जीएंनी आपल्या पुढील जीवनात जिव्हाळा आणि प्रेमाचा झरा मावशीच्या मुली प्रभावती आणि नंदा यांच्या रूपानं कायमचा प्रवाही ठेवला. या दोन्ही बहिणींनी जीएंवर आपार माया केली.

जीएंचे वाचन व्यासंगी, अफाट होते. त्याचबरोबर अद्भुत आणि गूढरम्यतेचं जीएंना आकर्षण तर होतंच, पण मानवी जीवनातील भव्यता, उत्कटता, व्यामिश्रता, भीषणता, सुख-दुःख, वेदना, व्यर्थता, नियतीबद्धता, भोग, आनंद, ईर्ष्या यांचा शोधही ते आपल्या अनेक कथांमधून घेतात.

जीएंच्या कथेतील स्त्रियाही अविस्मरणीय आहेत. प्रत्येक स्त्री दीर्घकाळ आणि ठामपणे वाचकाच्या मनामध्ये घर करते. ‘कावेरी’, ‘शांताक्का’, ‘तानी मावशी’, ‘आई’, ‘मेरी डिसुझा’, ‘काशी’, ‘लक्ष्मी’, ‘राधी’, ‘करेव्वा’, ‘काशी’, ‘अमाशी’, ‘यमनी जोगतीन’, ‘पाणमाय’, ‘सुमी’, ‘पराभव’मधली आई, ‘नमुताई’, ‘रुक्मिणी’ इ. या व्यक्तिरेखा अनन्यसाधारण अशा आहेत. काही व्यक्तिरेखा मायाळू आहेत. त्यांनी एक विशिष्ट उंची गाठली आहे. या स्त्रियांचं दुःख आपल्या मनाला घरं पाडतं.

‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘रक्तचंदन’, ‘हिरवे रावे’, ‘सांजशकुन’, ‘पिंगळावेळ’, ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’, हे कथासंग्रह आणि अनुवादित कथांचा ‘पैलपाखरे’ हा कथासंग्रह, ही ग्रंथसंपदा जीएंच्या नावावर आहे. त्याचप्रमाणे ‘माणसे - अरभाट आणि चिल्लर’ हा छोट्या-छोट्या व्यक्तिरेखांचा संग्रह आहे. त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले ‘डोहकाळिमा’, ‘कुसुमगुंजा’ हे दोन कथासंग्रह लक्षणीय असे आहेत. वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झालेल्या व काही अप्रकाशित कथा ‘कुसुमगुंजा’मध्ये संग्रहित केल्या आहेत. जीएंनी ‘बखर बिम्मची’, ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’, ‘अमृतफळे’ ही पुस्तकं खास मुलांसाठी लिहिली आहेत. यांत फॅन्टसी, जिज्ञासा, बालमनातील कुतूहल आणि बालरंजनही आहे.

मराठी कथासाहित्यामध्ये जीएंनी विपुल अशा प्रकारचे लेखन केलेले आपल्याला जाणवतं. त्यांच्या कथांचं वेगळेपण त्यांच्या शीर्षकांपासून आणि अर्पणपत्रिकांपासूनच जाणवतं. शीर्षकांमध्ये दडलेला अर्थ ओलांडून वाचकांना पुढे जाणं शक्यच होत नाही. नाती-गोती, त्यांचं केविलवाणं रूप आणि मानवी जीवनाचं दुभंगलेपण, एकाकीपण त्यांच्या शीर्षकाच्या रूपकातून किंवा मुखपृष्ठावर असलेल्या छायाचित्रांमधून स्पष्टपणे जाणवतं.

जीए प्रतिभावंत कलावंत होते. त्यांच्या अनेक कथांत जीवनविषयक जाणिवा प्रकट होतात. हाच त्यांच्या व्यक्तित्वाचाही स्थायीभाव होता. त्यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आणि तरल, उत्कट, भावनाशील, संवेदनशील, सर्जनशील लेखन, हा त्यांच्या जीवनदृष्टीचा अविभाज्य घटक त्यांच्या अनेक कथांतूनही जाणवतो.

जीवनातील विसंगती, अर्थशून्यता, असंबद्धता, असहाय्यता, अगतिकता, वैफल्य, मृत्यू, व्यंग, उपरोध,  मानवी जीवनाच्या मुळाशी असलेली आदिम वासना, अपेक्षाभंग, दारिद्र्य, भूक, वेड इ. अनेक अटळ,  अथांग आणि अपरिहार्य असलेल्या जीवनाच्या या विविध रूपांचं दर्शन आणि माणसाच्या या आदिम प्रेरणांचा शोध जीए अनेक कथांतून घेतात. 

जीए उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या अनेक कथांतून माणसाची प्रखर जीवनेच्छा, कामवासना, सूडभावना,  मरणेच्छा, भय, हिंस्रता, प्रेम, माया, आस्था, आकर्षण या आदिम प्रेरणांचं गडद, कोरीव चित्रण पाहायला मिळतं. जीए ‘निसर्गवाचक’ही होते. त्यांच्या बर्‍याच कथामध्ये प्राणी, पक्षी, झाडं, कीटक यांचं चित्रण येतं.

जीएंनी अनेक रूपककथाही लिहिलेल्या आहेत. ‘सांजशकुन’, ‘पिंगळावेळ’, ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’ या कथासंग्रहांतील रूपककथा खरोखरीच वाचनीय अशा आहेत. या कथांमध्ये जे रूपक आहे, त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मृत्यूची, शोकाची, दुःखाची विविध रूपं आणि त्या पुढे माणसाचं असलेलं खुजेपण. माणसं चांगली, वाईट, भेकड, संकुचित, क्रूर, स्वार्थी, अप्पलपोटी असतात. ही माणसं गरीब, दुबळी, दरिद्री, परिस्थितीनं गांजून गेलेली असतात आणि त्यांच्यावर नियती सत्ता गाजवत असते.

मराठी साहित्यात चांगल्या बालसाहित्याची प्रचंड वाणवा आपल्याला पहायला मिळते. जीएंनी मात्र अस्सल बालविश्व अनेक कथांतून साकारलं आहे. हे चित्रण वास्तववादी आहे. अनुभवसंपन्न, कमालीची विविधता असलेलं आहे. गंभीर, आशयघन आणि संवेदनशीलतेनं हे लेखन केलेलं आहे. बारीक तपशिलांसह या कथा आकारल्या आहेत. हे बालविश्व केवळ सुंदर, विलोभनीयच नाही, तर निर्विकार आणि विकारीही आहे. ‘कैरी’, ‘तुती’, ‘राधी’, या तीन कथांतून जीएंचं बालपण दिसतं; तर ‘मुखवटा’, ‘जन्म’, ‘भोवरे’, ‘स्लीला’, ‘जखम’, ‘राणी’, ‘शेवटचे हिरवे पान’, ‘सोडवण’, ‘रात्र झाली गोकुळी’, ‘वीज’, ‘बाधा’, या कथांतील बालविश्व आपल्या अंतःकोषात कायमचं घर करतात.

जन्मापासून सुरू झालेली मानवी जीवनाची फरफट मृत्युपर्यंत सातत्यानं चालत असते. मृत्यू हे नियतीचं जीएंना मृत्यूचं जबरदस्त आकर्षण होतं. एक साधन असतं. तिने हलवलेल्या सूत्रांप्रमाणे नाचता नाचता थकून त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो. या मृत्यूची अनेक रूपं जीएंच्या कथांमध्ये दिसतात. काही कथांमध्ये मृत्युची ओढ जाणवते, तर काही कथा मृत्यूच्या धाकातच वावरत असल्यासारख्या वाटतात. मृत्यूबाबतचं गूढरम्य, अतर्क्य असं तत्त्वज्ञान जीए कथांमधून सातत्यानं मांडतात.

जन्म आणि मृत्यू या अटळ गोष्टी आहेत. त्या भोवती जीएंनी असंख्य कथा लिहिल्या आहेत. अनेक कथांमधले नायक-नायिका सत्य शोधायला निघतात आणि शेवटी मृत्युच्या दारापर्यंत येऊन थांबतात. जेव्हा त्या पात्रांना मृत्यू प्राप्त होतो, तेव्हा त्यांना सत्याचा साक्षात्कार होतो. अनेक कथांमध्ये विविध तर्‍हेचे, अंगावर शहारे आणणारे मृत्यू घडतात. ‘रत्न’, ‘यात्रिक’, ‘राणी’, ‘सोडवण’, ‘प्रवासी’ अशा कथा आपल्याला मृत्युपर्यंत फरफटत नेतात. क्षणभर आपल्याला सुन्न करतात. अंतर्मुख, विषण्णता, असंख्य गूढ उपप्रश्न यांचा गुंता मांडतात. या कथांमध्ये नियतीच्या विविध रूपांमुळे घायाळ झालेल्या पात्रांच्या, जीवनातल्या दुःखांच्या विविध तर्‍हा अवतरतात.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

हृदय पिळवटून टाकणारं हे दुःख माणसाच्या पदरी पडतं. अनेक पात्रं स्वतःची नियती कोणती आहे, हे शोधतात आणि त्यातच त्यांचा केविलवाणा मृत्यू होतो. अनेक पात्रं बऱ्याचदा अंतिम सत्याच्या शोधासाठी निघालेली आहेत. त्याचप्रमाणे अप्राप्य ध्येयाच्या पाठीमागे असणारी आणि त्या ध्येयासाठी वणवण हिंडणारी पात्रं अधिक प्रमाणात दिसतात. उदाहरणार्थ ‘अंजन’, ‘ठिपका’, ‘विदूषक’, ‘दूत’, ‘रत्न’, ‘वंश’, ‘लक्ष्मी’, ‘प्रदक्षिणा’ इ. मानवी जीवन आणि कर्तृत्व यांतील निरर्थकता, जीवनातील अंतिम सत्याची अप्राप्तता, हे जीएंचं तत्त्वज्ञान दिसतं. अनेक कथांमधून आपल्याला ते विलक्षण अंतर्मुख करतात.  ‘प्रवासी’, ‘स्वामी’, ‘इस्किलार’, ‘ऑर्फियस’ या श्रेष्ठ कथा आहेत. ‘प्रवासी’ कथेतील प्रवाशाला हतबलता, हताशपणा अगतिकता, शून्यता, पराजितता अनुभवावी लागते; शून्यवादातूनच नियतीची सर्वश्रेष्ठता, अटळता मान्य करावी लागते.

जीएंच्या अनेक कथा प्रचंड हादरवून टाकणारं सुख-दुःख, अनेक व्यक्तींच्या आणि घटनांच्या गुंतवळ्यातून दाखवतात. प्रत्येक व्यक्तीची व्यथा वेगळी आहे, भळभळतं दुःख वेगळं आहे. या कथातील माणसं दुःखानं कोसळतात. स्वतःचं दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात. ते स्वीकारतात आणि त्याखाली चिरडून जातात. काही दुःखांनी, आघातांनी, नियतीने इतकी गोठून गेलेली असतात की, त्या मागची संगती (लॉजिक) शोधण्याचंही भान त्यांना उरत नाही. उदा. ‘भोवरे’, ‘प्रदक्षिणा’, ‘वंश’, ‘सोडवण’, ‘वस्त्र’, ‘फुंका’, ‘तळपट’ इ. ‘राधी’, ‘तुती’, ‘कैरी’, ‘चंद्रावळ’, ‘गुंतवळ’, ‘बळी’, ‘कवठे’, ‘माणूस नावाचा बेटा’, ‘इस्किलार’, ‘स्वामी’, ‘प्रवासी’, ‘वस्त्र’, ‘ठिपका’, ‘सोयरे’, ‘विदूषक’, ‘अंजन’, ‘पुरुष’, ‘माघारा’, ‘घर’ इ. या कथा अभिजात आणि अविस्मरणीय आहेत.

जीएंनी अनेक रूपककथाही लिहिलेल्या आहेत. ‘सांजशकुन’, ‘पिंगळावेळ’, ‘रमलखुणा’, ‘काजळमाया’ या कथासंग्रहांतील रूपककथा खरोखरीच वाचनीय अशा आहेत. या कथांमध्ये जे रूपक आहे, त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मृत्यूची, शोकाची, दुःखाची विविध रूपं आणि त्या पुढे माणसाचं असलेलं खुजेपण. माणसं चांगली, वाईट, भेकड, संकुचित, क्रूर, स्वार्थी, अप्पलपोटी असतात. ही माणसं गरीब, दुबळी, दरिद्री, परिस्थितीनं गांजून गेलेली असतात आणि त्यांच्यावर नियती सत्ता गाजवत असते.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

जी.ए. म्हणजे जीवनातील, अनाकलनीय भोवऱ्यातील, संभ्रमी वादळातील आणि चपखल वीजेतील संथ अर्थ घेणारा जीवनशोधक

जी.ए. कुलकर्णी : अमूर्ताला मूर्तामध्ये ओढून आणण्याचे सामर्थ्य असणारा लेखक

जीएंची कथा सुखापेक्षा दुःखाला, आशेपेक्षा निराशेला, जिंकण्यापेक्षा हरण्याला आणि जगण्यापेक्षा मरण्याला अधिक प्राधान्य देणारी आहे…

सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : जीएंमुळे सुनीताबाईंना आपल्यासारखाच अतितीव्र संवेदना असलेला ‘खरा मित्र’ भेटल्याचे समाधान मिळाले! (लेखांक : चौथा)

..................................................................................................................................................................

या कथांमधील माणसांनी नियतीचा स्वीकार करूनही त्यांच्यात जगण्याची तीव्र इच्छा असते, जीवनावरची श्रद्धाही अढळ असते. नियतीशी झगडत झगडतच या माणसांचा जीवन प्रवास चालू असतो. आणि म्हणून हा प्रवास संपतो, तिथंच कथा संपली आहे, असं आपल्याला वाटतं, पण खरं तर तिथूनच कथेला सुरुवात केली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एखादं उदात्त स्वप्न माणसांनी पहावं आणि त्याच्या मागोमाग येणाऱ्या यातना सोसत सोसत प्रत्येक माणूस जगत राहतो, अशा आशयाच्या अनेक रूपककथा जीएंनी लिहिलेल्या आहेत.

जीए जीवनाविषयीचे अनेक प्रश्न कथांमधून हाताळताना दिसतात. आयुष्यातली निरर्थकता अनेक पात्राद्वारे दाखवतात. माणूस आणि नियती यांच्यातील संघर्ष अनेक व्यक्तिमत्त्वांद्वारे दिसतो. त्यांची कितीतरी पात्रं शापित जीवन जगताना दिसतात. आणि असं जीवन जगत जगतच मृत पावतात. त्याशिवाय त्यांना मुक्तीच नसते. जीएंची प्रत्येक कथा नियतीचा एक निष्ठुर डावपेच असतो.

जीएंच्या कथेतील स्त्रियाही अविस्मरणीय आहेत. प्रत्येक स्त्री दीर्घकाळ आणि ठामपणे वाचकाच्या मनामध्ये घर करते. ‘कावेरी’, ‘शांताक्का’, ‘तानी मावशी’, ‘आई’, ‘मेरी डिसुझा’, ‘काशी’, ‘लक्ष्मी’, ‘राधी’, ‘करेव्वा’, ‘काशी’, ‘अमाशी’, ‘यमनी जोगतीन’, ‘पाणमाय’, ‘सुमी’, ‘पराभव’मधली आई, ‘नमुताई’, ‘रुक्मिणी’ इ. या व्यक्तिरेखा अनन्यसाधारण अशा आहेत. काही व्यक्तिरेखा मायाळू आहेत. त्यांनी एक विशिष्ट उंची गाठली आहे. या स्त्रियांचं दुःख आपल्या मनाला घरं पाडतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या वेगवेगळ्या स्तरातील, वयातील, विविध स्वभावांच्या वृत्ती-प्रवृत्तींच्या स्त्रिया शांत, मायाळू, पतीशी एकनिष्ठ, सोशीक, कुटुंबवत्सल, प्रेमासाठी आसुसलेल्या आहेत; तर कुठे व्याभिचारी, चंचल, स्वार्थी, खाष्ट, कजाग, भांडखोर, परिस्थितीने गांजलेल्या अशा आहेत. कधी इतरांना फसवणाऱ्या तर कधी स्वतःच फसवल्या गेलेल्या... जीवनातलं दु:ख हेच या स्त्रियांचं भागधेय असतं.  यातील अनेक स्त्रिया परिपूर्ण स्त्रिया म्हणून आपल्या लक्षात राहतात.

जीएंकडे कुठल्याही सामान्य कथा बीजातून असामान्य कथा निर्माण करण्याची किमया होती. ‘शुक्रवारच्या कहाणी’सारखी अतिपरिचित कथाही जीएंच्या परिसस्पर्शाने झळाळून उठते आहे आणि सर्वार्थानं अद्भुत ठरते. जीएंची ही किमया अद्भुत आणि अजोड आहे. प्रचंड मेहनत, दांडगा व्यासंग आणि कठोर परिश्रम, आशयघन कथाबीज या माध्यमांतून जीए कथेचं चीज करतात.

जीएंच्या मते मानवी जीवनामध्ये आनंदापेक्षा दुःखच जास्त स्थायी, चिरंतन आहे. जीए माणूसघाणे नव्हते, तर गूढ वलय असणारे एक थोर लेखक होते, असे वाटते. प्रत्येक कथेतून जादुई क्षण वाचकाच्या झोळीत टाकणारा हा लेखक होता. जीवन रहस्याचं, मृत्यूचं कुतूहल असणारा आणि त्यासाठी निमित्तमात्र माणसांच्या कथा लिहिणारा, रेशीम कोषामध्येच राहणं पसंत करणारा हा क्षितिजगामी पांथस्थ ११ डिसेंबर १९८७ रोजी पुण्यात वयाच्या ६४व्या वर्षी क्षितिजापार निघून गेला.

.................................................................................................................................................................

लेखक डॉ.सागर शरद कुलकर्णी वाणिज्य शाखेचे प्राध्यापक असून मराठी साहित्याचे अभ्यासक आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......