‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ : पुरुषांचं ‘पुरुषभान’ जागृत करू पाहणारे आणि त्यांना ‘चांगला माणूस’ होण्यासाठी मार्गदर्शन करणारे दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ यांची मुखपृष्ठे
  • Fri , 08 December 2023
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank पुरुष स्पंदनं Purush Spandan पुरुष उवाच Purush Uvach

‘पुरुष स्पंदनं’ आणि ‘पुरुष उवाच’ हे दोन्ही मराठीतले आगळेवेगळे दिवाळी अंक आहेत. ‘तरुणाईच्या डोक्याला खुराक’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘पुरुष उवाच’चा हा सतरावा दिवाळी अंक. यात केवळ पुरुषांचंच लेखन वाचायला मिळतं, तर ‘पुरुष स्पंदनं’मध्ये स्त्री-पुरुष दोन्हींचं. ‘माणूसपणाच्या वाटेवरची ‘पुरुष स्पंदनं’ अशी त्याची टॅगलाईन आहे. त्याचं हे २८वं वर्ष आहे. ‘पुरुषभान’ जागृत करणारे, त्याला प्रोत्साहन देणारे आणि ते मर्दानगीऐवजी ‘माणूसपणा’कडे कसं झुकेल, यासाठी प्रयत्न करणारे हे दोन्ही अंक आहेत. त्यामुळे ते पाहणं, वाचणं आवश्यक ठरतं.

अर्थात हेही स्पष्ट करायला हवं की, ‘पुरुष उवाच’चा उद्देश प्रशंसनीय असला तरी, त्यातील लेखन मात्र विषयानुरूप नाही. म्हणजे त्याचं स्वरूप ‘होल्डॉल’सारखं आहे. याउलट ‘पुरुष स्पंदनं’मधील लेखन मात्र आशयसंपन्न, विषयानुरूप आणि घट्ट विणीचं आहे. म्हणजे त्याचं स्वरूप ‘कॅलिडोस्कोप’सारखं आहे.

‘पुरुष स्पंदनं’चा अंक ‘मावा’ म्हणजे ‘मेन् अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्यूज’ या संस्थेच्या वतीनं प्रकाशित होतो. ही संस्था गेल्या २८ वर्षांपासून पुरुषांकडून स्त्रियांवर होणारी हिंसा व शोषण या विरोधात काम करत आहे. त्याचाच एक उपक्रम म्हणून हा दिवाळी अंक प्रकाशित होतो. या अंकातल्या कविता आणि ललितलेख हा मजकूर वाचण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे उर्वरित मजकुराविषयी बोलणंच अधिक श्रेयस्कर.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या अंकातल ‘मास्टरपीस’ म्हणावा असा लेख आहे प्रगती बाणखेले यांचा. त्याचं ‘मी इथं इतिहास घडवायला आले आहे’ हे शीर्षक थोडंसं फसवं असलं, तरी लेख मात्र अतिशय खणखणीत आहे. ‘टोकाचं दु:ख आणि हेवा वाटावा असं सुख’ अनुभवणाऱ्या ‘इंटरसेक्स ट्रान्सवूमन’ डॅनियला यांचा बाणखेले यांनी शब्दबद्ध केलेला प्रवास अतिशय अदभुत, रोमांचकारी, प्रेरणादायी आणि आदर्शवत आहे. खरं तर बाणखेले यांनी डॅनियलाचा सविस्तर जीवनप्रवास तिच्याच शब्दांत एका स्वतंत्र पुस्तकाद्वारे मांडायला हवा. ते मराठीतलं केवळ उत्तम आत्मचरित्र होऊ शकेल.

त्यानंतर उल्लेख करायला हवा ‘पुरुषांचे मानसिक आरोग्य व नातेसंबंध’ या परिसंवादाचा. यातला ‘एक पायरी वर, एक पायरी खाली’ हा डॉ. अश्विनी धोंगडे यांचा लेख चांगला आहे. ‘श्यामच्या आई’ची जशी दखल घेतली जाते, तशी ‘श्यामच्या वडिलां’ची घेतली जात नाही, ते कायम दुर्लक्षितच राहतात, अशी स्तुत्य मांडणी करणारा ‘श्यामचे वडील’ हा विजय पांढरीपांडे यांचा लेख भारतीय पुरुषांचं दु:ख थोडक्यात पण चांगल्या प्रकारे उजागर करतो. मराठी साहित्यात तरी बाप आईमहतीमुळे झाकोळला, दबलेला आणि त्यामुळेच शोषित-पीडितही राहिलेला आहे. नेमकं तेच सांगण्याचं काम हा लेख करतो.

‘ ‘नेस्टर’च्या नोट्स’ हा मैत्रेयी कुलकर्णी यांचा लेखही वेगळी जाणीव, भान आणि दृष्टीकोन देतो. ‘नेस्टर’ म्हणजे ‘नॉन जजनेंटल, एम्पॉवरिंग, सेल्फ रिफ्लेक्टिव, टेक्नॉलॉजी असिस्टेड स्पेसेस’. तरुणांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून या उपक्रमाची सुरुवात झाली. त्याचा प्रवास आणि त्यातील विविध तरुणांचे प्रश्न व समस्या यांची मांडणी या लेखात वाचायला मिळते.

‘हळव्या, भावनाप्रधान आणि दिलासादायक : काही ‘वेगळ्या’ पुरुषप्रतिमांचा आढावा’ या लेखात गायत्री लेले यांनी हिंदी चित्रपटांतील काही वेगळ्या पुरुष-प्रतिमांचा संक्षिप्त स्वरूपात मागोवा घेतला आहे. त्यात ‘दिल चाहता हैं’मधला ‘सिड’ , ‘वेक अप सिड’मधला ‘सिड’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘इम्रान’ व ‘कबीर’, ‘राजी’मधला ‘इक्बाल’ ,‘मसान’मधला ‘दीपक’, ‘बाईपण भारी देवा’मधले डॉ. जयंत, ‘मेड इन हेवन’ या सिरीजमधला ‘जोहरी’. एरवी लक्षात न आलेल्या या पुरुष-पात्रांचं वेगळेपण अधोरेखित करण्याचं काम हा लेख करतो.

‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही डॉ. शिरीषा साठे या मानसोपचारतज्ज्ञाची अश्विनी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत पुरुषांकडे पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची ‘नजर’ देण्याचं काम करते.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

‘पुरुषसत्तेचे दुष्परिणाम – पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या’ हा अलका धुपकरचा लेख अभ्यासूपणे या विषयाच्या विविध बाजू उलगडून दाखवतो. तर लक्ष्मी यादव यांच्या ‘मुलाच्या भावनिक विश्वात हुंदडताना’ या लेखात मुलाला चांगला, संवेदनशील माणूस बनवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या एका आईचा अनुभव वाचायला मिळतो. या लेखातली सहजता, प्रवाहीपणा यांतून या आईची तळमळ दृग्गोचर होते आणि आपल्याही सजग करते.

‘मला व्यसन का लागलं?’ हा चैतन्य सुप्रिया यांचा लेख एका व्यसनातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचा अनुभव आहे. हाही लेख जाणीव, सजगता, दृष्टी आणि तारतम्य या अधोरेखित करतो.

‘पुरुष आणि मानसिक आरोग्य’ हा अमर राठोड यांचा लेख जेमतेम पानभर आहे. त्यामुळे त्यातून काहीही हाती लागत नाही; तर ‘नर-मन’ हा मोहन देस यांचा लेख ‘पोझ’ घेऊन लिहिल्यामुळे त्यातून केवळ शब्दांचे फुगे आणि पतंग उडवलेले दिसतात, बाकी आशय नेहमीचाच.

‘लेख’ या विभागातील ‘माणसाची पुनर्प्रस्थापना’ हा ज्येष्ठ कवी यशवंत मनोहर यांचाही लेखही ‘नर-मन’ या लेखासारखाच आहे. ‘सिनेमा-समाजमन प्रतिबिंब’ हा आशिष निनगुरकर यांचा, ‘सिनेमामधून दिसणारी पुरुषांची प्रतिमा’ हा निहार सप्रे यांचा, ‘वडीलकी अर्थात पुरुष पालकत्वाबद्दल थोडेसे’ हा हृषिकेश रांगणेकर यांचा आणि ‘पुरुषातला माणूस म्हणून घडताना – उच्च शिक्षणाच्या वाटा खुणावताना’ हा प्रवीण निकम यांचा, हे चार लेख उत्तम म्हणावे इतके चांगले आहेत.

‘आत्मकेंद्रितांच्या छळवणुकीबद्दल एक टिपण’ या लेखात स्वाती वैद्य यांनी आत्मकेंद्रित मनोवृत्ती असलेल्या माणसांमुळे त्यांच्याशी नातेसंबंधांत असलेल्या व्यक्तींना जो छळ सहन करावा लागतो, त्याविषयी लिहिलं आहे. अपरिचित विषयाची काहीशी परिचित मांडणी या प्रकारचा हा लेखही आवर्जून वाचावा असा नक्कीच आहे.

‘पुरुष स्पंदनं’ : संपादक – हरीश सदानी | पाने – १८६ | मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘पुरुष उवाच’चा दिवाळी अंक केवळ सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून काढला जातो. त्यामुळे या अंकासाठी वेगवेगळ्या लेखकांना आवाहन करून त्यांच्याकडून लेखन मागवलं जातं. नफा कमवणं हा या अंकाचा उद्देश नसल्याने लेखकही विनामानधन या अंकासाठी लेखन करतात. यंदाचा अंकही तसाच आहे.

गीताली वि. मं., मुकुंद किर्दत यांनी अंकामागची भूमिका स्पष्ट करताना संपादकियात म्हटलं आहे -“आजच्या व्यवस्थेत पुरुष असण्याची कोंडी झाली आहे, कारण पुरुष असण्याच्या पारंपरिक प्रतिमेचं, मर्दानगी-पौरुषत्व- पुरुषार्थाच्या कल्पनांचं भयंकर ओझं त्याच्या डोक्यावर आहे. पुरुष स्वतः स्वतंत्र नाही, तर या सर्व पारंपरिक पुरुषत्वाच्या प्रतिमेत बंदिस्त आहे. मात्र याची पुरेशी जाणीव त्याला आजही हव्या तितक्या प्रमाणात झालेली दिसत नाही. पुरुषांची घरी-दारी काय कोंडी होते, त्यांच्यावर काय प्रकारचे दबाब आहेत, त्याची कारणं काय आहेत असं त्यांना वाटतं इ. इ. विषयांवर पुरुषांनी मोकळेपणानं लिहिलं आहे. स्त्री-पुरुष समतेचा विचार आणि आचार पुरुषांना या कोंडीतून बाहेर पडायला कशी मदत करू शकेल? त्यांचं नवं पुरुषभान जागं झालं, तर ते चांगला माणूस कसा होऊ शकतील इ. इ. बाबींचा ऊहापोह या अंकात केला आहे.” मात्र दुर्दैवानं या अंकात ‘पुरुषभान’ जागृत करणाऱ्या लेखनाचं प्रमाण कथा, कविता, कथात्म लेख यांच्या भाऊगर्दीत काहीसं झाकोळलं गेलं आहे.

हा अंक तसा भरगच्च म्हणजे तबब्ल ३२० पानांचा आहे. त्यामुळे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा वाचणं वेळेच्या मर्यादेमुळे शक्य झालं नाही. म्हणून मग या अंकातीलही कथा व कविता हे दोन विभाग वगळून इतर सर्व मजकूर वाचला.

त्यात ‘आव्वाज तरुणाईचा’, ‘स्वयंपाक घरातला मी’, ‘अडीच अक्षरी प्रेमाचं राजकारण, समाजकारण, अर्थकारण वगैरे वगैरे’, ‘लेख’, ‘पुरुषभानाची ऐशी की तैशी’, ‘हिंसा – आतली आणि बाहेरची, ‘लैंगिकतेच्या नावानं चांगभलं’ हे सात विभाग, एक मुलाखत  आणि ‘लग्न! लग्न!! लग्न!!!’ हा लेख, यांचा समावेश आहे.

‘गुलामगिरीवाद’ हा यशवंत मनोहर यांचा लेख नवीन काहीही सांगत नाही. तेच ते वर्षानुवर्षांपासूनचे तेच ते तपशील, कारणमीमांसा पुन्हा सांगतो.

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

आरजे संग्रामची ‘आव्वाज कुणाचा? ब्रह्मांडातल्या आरजे नंबर वन संग्रामचा!’ ही गीताली वि. मं. आणि विनोद पवार यांनी घेतलेली मुलाखत चांगली आहे, असंही म्हणता येत नाही आणि वाईट आहे, असंही. त्याचं कारण असं की, या मुलाखतीचं शब्दांकन नीट केलं गेलेलं नाही. सदोष वाक्यरचना, इंग्रजी शब्दांची नको तितकी भरमार आणि असंदिग्ध वाक्यं, यांमुळे ही मुलाखत समजून घेताना जरा दमछाकच होते. पण तरीही जेवढं समजतं, तेवढ्यावरून असं नक्की म्हणता येईल की, आरजे संग्राम हा अतिशय अभ्यासू, विवेकी, समतोल आणि न्याय्यबुद्धीचा तरुण आहे. त्याच्याकडे साक्षेप आहे आणि (योग्य) आक्षेपही. कुठल्याही प्रश्नाकडे तो केवळ काळ्या-पांढऱ्या रंगांतून पाहत नाही.

 ‘ ‘पुरुष असण्याची कोंडी’ हा श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा लेख वाचनीय आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पिढीतल्या लेखकानं असा – आजच्या काळातल्या एखाद्या तरुणासारखा – लेख लिहावा, याचं आश्चर्य वाटतं आणि कौतुकही. एरवी जोशींचं लेखन जरा चढा सूर लावणारं असतं, पण या लेखात मात्र त्यांनी संयतपणे ‘पुरुषकोंडी’ सांगितली आहे.

‘ ‘या’ सुखाची भीती वाटायला हवी’ हा सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे यांचा लेख मननीय, चिंतनीय आहे. त्यांची मांडणी, तर्क, युक्तिवादही बरोबर आहेत. पण त्यात अनेक संकल्पना, विषय, मुद्दे आणि विचार यांचा समावेश असल्यानं आणि त्यांना मर्यादित शब्दसंख्येत बसवावं लागल्यानं तो परिणामकारतेच्या बाबतीत काहीसा उणा पडतो. खरं तर असे विषय तब्येतीत मांडल्याशिवाय ते प्रभावी ठरत नाहीत.

‘लग्न! लग्न!! लग्न!!!’ हे दत्ता रावसाहेब लवांडे यांच्या लेखाचं शीर्षक काहीसं फसवं आहे. म्हणजे नावावरून ही कथा वाटू शकते किंवा लग्नाविषयी अनुभव\ललितलेखही. प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या तरुणांना लग्नांसाठी नेमक्या कुठल्या अडचणी येतात, याचा स्वानुभव ते या विषयावर लघुपट करण्यापर्यंतचा प्रवास लवांडे यांनी मांडला आहे. कुटुंबसंस्था, पुरुषप्रधानता, लिंग गुणोत्तर, गर्भलिंगनिदान, बालविवाह, आधुनिक जीवनशैली, जोडीदारांबाबतच्या तरुण-तरुणींच्या अपेक्षा आणि स्वत:च्या लघुपट टीममधील एका जोडप्याची प्रेमकथा, अशी औरसचौरस मांडणी हा लेख करतो.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘मिळून साऱ्याजणी’ आणि ‘उद्याचा मराठवाडा’ : ‘वाचकानुनय’ न करणारे आणि ‘सेलिब्रेटीं’ना नाकारणारे दोन उल्लेखनीय दिवाळी अंक

‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ : ‘उत्तम अंकां’च्या मांदियाळीत ‘वरच्या’ श्रेणीत उत्तीर्ण होणारे दिवाळी अंक

‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ : स्वत:चं एक स्वतंत्र असं ‘मॉडेल’ निर्माण केलेले मराठीतले मान्यताप्राप्त दर्जेदार दिवाळी अंक

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास!

दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!

.................................................................................................................................................................

‘दामले मास्तर’ हा चिंतामणी प्रभाकर मुळे यांचा लेख तसा ठीकठाक आहे. पण या लेखाच्या सुरुवातीला जे चित्र छापलंय, त्यात ‘२८ नोव्हेंबर – शिक्षक दिनाच्या निमित्ताने’ असं लिहिलंय. हा प्रकार मात्र अनाकलनीय वाटतो. ‘२८ नोव्हेंबर’ हा ‘शिक्षक दिन’ कधी झाला? कुणी केला? राज्य सरकारने? केंद्र सरकारने? संयुक्त राष्ट्रसंघाने? ‘२८ नोव्हेंबर’ हा ‘शिक्षक दिन’ असावा, अशी मागणी करणं किंवा तशी भावना असणं वेगळं आणि प्रत्यक्षात तो अधिकृतपणे जाहीर होणं वेगळं. या दोन्हींतला फरक हे चित्र छापताना संपादकांनी लक्षात घ्यायला हवा होता.

‘समता म्हणताना झेपत नसलेला आणि गोंधळलेला पुरुष’ हा सुभाष हिराबाई अंतू खंकाळ यांचा लेख चांगला आहे. ‘पुरुष असूनही…’ हा प्रा. प्रवीण घोडेस्वार यांचा लेख पुरुष असूनही शिव्या देता येत नाहीत, याची खंत नव्हे, तर आनंद व्यक्त करतो. तो आनंद प्रत्येक मराठी माणसानं अभिमानानं आपल्याही मनात, हृदयात आणि चेहऱ्यात पाझरू द्यावा, इतका निर्मळ आहे. ‘महानगरीय पुरुष’ या लेखात रमेश नागेश सावंत यांनी आपला उजवीकडून डावीकडे झालेला प्रवास ‘पुरुषभाना’च्या संदर्भात मांडून दाखवला आहे. लेखाची मांडणी फार प्रभावी नाही, पण लेखकाची तळमळ मात्र सच्ची असल्याची प्रचिती येत राहते.

‘डान्सबार डायरीमधून…’ प्रसाद रमाकांत जोशी यांचा लेख कथा आहे की, त्यांचा स्वत:चा अनुभव आहे, की काल्पनिक प्रसंग आहे, हे समजत नाही. सुरुवातीच्या इंट्रोतून तो त्यांचा प्रत्यक्ष अनुभव असावा असं वाटतं, पण लेखाची मांडणी मात्र कथेसारखी केलेली आहे. असो, काहीही असलं, तरी हा मजकूर एक वेगळा अनुभव देतो हे नक्की.

‘महिलांची पुरुषांप्रती वाढती कृतघ्नता भारतीय समाजासाठी घातक!’ हा संजय कमल अशोक देशमुख यांचा जेमतेम दीडपानी लेख हा या अंकातला एकमेव विवाद्य लेख म्हणावा लागेल. देशमुख यांचं म्हणणं आहे की, २०२१पासून म्हणजे करोनानंतर महिलांची पुरुषांप्रती कृतघ्नता वाढत चालली आहे. त्यासाठी देशमुख यांनी काही अभ्यास केलाय? अभ्यास-अहवाल पाहिलेत? कुणाच्या मुलाखती घेतल्यात? किती महिलांशी संवाद केलाय? तर असा कुठलाही तपशील या लेखात नाही. सदर लेखक स्वत:ला पत्रकार म्हणवून घेतात, पण सार्वजनिकरित्या चर्चाविषय झालेल्या दोन-चार उदाहरणांवरून थेट निष्कर्ष काढतात! आहे की नाही गंमत!!!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘हिंसा – आतली आणि बाहेरची’ हा चंद्रशेखर पुरंदरे यांचा लेख त्याच्या नावाप्रमाणे हिंसेचे दोन्ही पैलू लेखाच्या शब्दमर्यादेत व्यवस्थित मांडण्याचा चांगला प्रयत्न करतो. ‘विनोबा व अहिंसा’ हा विजय प्र. दिवाण यांचा लेखही चिंतनीय-मननीय आहे. त्याचबरोबर ‘हिंसेचे समाधान आणि अहिंसा’ हा संदिप गिरासे यांचा आणि ‘हिंसेविषयी सांगताहेत…’ हा वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांच्या हिंसेविषयीच्या मतांचं ऋता ठाकूर यांनी केलेलं संकलनही.

‘मुक्या वेदनांचा सागर’ हा काहीशा कथात्म शीर्षकाचा समीर गायकवाड यांचा लेख कुठल्याही संवेदनशील पुरुषाच्या काळजाला पीळ पाडेल. अलीकडच्या काळात प्रामुख्यानं वेश्यांच्या प्रश्न-समस्यांविषयी गायकवाड सातत्यानं लिहीत आहेत. त्यांचा हा लेख त्यांच्या या वर्षातल्या त्यांच्या लेखनातला एक ‘मास्टरपीस’ म्हणावा असा आहे.

‘लहान मुलांनी धोका – घरच्यांचा’ या आनंद करंदीकरांच्या लेखाचा विषय ज्वलंत आहे, कळीचा आहे, त्याची मांडणीही अभ्यासपूर्ण आहे, पण आकडेवारी, संदर्भ, कायदे यांच्यात तो नको तितका अडकल्यानं रुक्ष होत जातो.

‘स्वयंपाक घरातला मी’ हा विक्रम गायकवाड यांचा आणि ‘मी सुरुवात केली आहे, तुम्ही येताय ना?’ हा भूषण सुकेशनि वामनराव यांचा, हे दोन्ही लेख स्वयंपाक घरातल्या ‘पुरुषा’विषयीचे स्वानुभव सांगणारे आहेत. पहिला ‘चांगला’, तर दुसरा ‘चांगला प्रयत्न’ म्हणावा असा.

‘आव्वाज तरुणाईचा’ या विभागातील ‘आडनाव बॅडनाव’ – आकाश छाया लक्ष्मण, ‘आपल्या ओळखीतून जगणं सुंदर व्हावं’ – आशिष निनगुरकर, ‘उत्तर-आधुनिकतावादी दृष्टीकोन आणि समकालीन कळीचे मुद्दे’ – साहिल सोनटक्के, ‘कलासाधनेतली तारेवरची कसरत’ – जगदीश भोसले, हे तरुणांचे लेख वाचनीय आहेत.

‘पुरुष उवाच’ : संपादक – डॉ. गीताली वि. मं., मुकुंद किर्दत | पाने – ३२० | मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......