अजूनकाही
किशोरीताई गेल्या… हे कसं शक्य आहे? मन मानायलाच तयार नाही, तरीही एक आक्रोश आतल्या आत…त्यांनी किती सांगितलं आणि किती ऐकलं, किती कळलं? एकेका गोष्टीवर अजून खूप काही विचारायचं होतं. त्या नेहमी म्हणत, ‘मी आज आहे, उद्या नाही.’ मी मनाशी म्हणे, ‘तो उद्या दहा-बारा वर्षं तरी येत नाही.’ मला कसलीच घाई वाटत नव्हती, पण त्यांना वाटत असावी. त्यांच्या सांगण्याचा मनाशी हळूहळू पडताळा घेतला जात होता, घेतला जाईल. त्यांच्याकडून ऐकलेलं उमजायला हे आयुष्य नक्कीच पुरणार नाही. खूप विरोधास होते त्यांच्या सांगण्यात. विरोधाचा आभास दूर होईल, समजुतीच्या अशा कोनावर जाऊन उभं राहावं लागतं आपल्याला. उमजून घेण्याचं हे एक सूत्र! अशी आणखी काही सूत्रं शोधायला हवीत.
कला आणि कारागिरी या मागच्या वेळच्या लेखावर चौफेर प्रतिक्रिया आल्या. हा विषय सर्वांनाच जिव्हाळ्याचा वाटला. किशोरीताईंनी या विषयाची मांडणी माध्यम आणि त्याचा उद्देश या सूत्रानं केली आहे. ‘अरे, किती अडकून पडाला त्या माध्यमात...माझ्यासारख्या अभुताचं किती प्रदर्शन मांडता?’ असं त्या म्हणत. संगीत ही सुरांची भाषा आहे. संवाद हा भाषेचा उद्देश आहे. ‘या हृदयीचे त्या हदयी’ असा भावसंवाद संगीत या भाषेइतका अन्य कोणात्याही माध्यमातून परिपूर्ण होत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. सुरांचं काम ‘सांगणं’ आहे, आपण गातो-वाजवतो त्या सुराचा स्वरार्थ काय आहे, हे न समजताच गाणं-वाजवणं करीत सुटतात कलाकार अशी त्यांची तक्रार असे.
त्यांचा हा विचार शब्दबद्ध करताना मी एक उदाहरण दिलं की, मराठी अनोळखी प्रांतात कुणी अगदी अनोळखी लिपीतली एखादी ओळ पाहिली तर त्यासाठी ती ओळी एक नक्षी मात्र असेल. अनभिज्ञपणे तो ती नक्षी कुठे तरी रेखाटेलही, पण ज्याला ती लिपी अवगत आहे त्याला ती ओळ म्हणजे एक संदेश असेल. अर्थ न कळता रेखाटलेली ती नक्षी अनर्थ घडवू शकेल?
ताईंना या उदाहरणाचं हसू आलं. त्यांना हे उदाहरणं पटलं. सुरांना अंगभूत सौंदर्य आहे. सौंदर्य (अर्थात श्रुती सुभगता) हा स्वरांचा स्थायीभाव. पण म्हणून संगीत निर्मितीत-श्रवणात, स्वर फक्त सौंदर्याची निर्हेतूक पखरण करत नाहीत. सुंदर सुरांना भावार्थ असतो आणि सूर एकमेकांच्या हातात हात घालून भावार्थ प्रतीयमान (ताईंचा लाडका शब्द) करतात.
या सगळ्या मांडणीत चकवे आहेत, निरागस जिवांना हरवून जाण्यासाठी आणि वस्तांदांना दुनियेला झुकवण्यासाठी! माध्यम आणि हेतू यांना वेगळं पाहणं ही विश्लेषणाची सोय आहे. तात्त्विक चर्चेत हा भेद मानणं जितकं सोपं आहे, तितकं व्यवहारात ते सोपं नाही. हेतू प्रधान मानला की, माध्यमाला आपोआप गौणत्व येतं आणि मग या गौणत्वाची परिणती कलासक्तीतच होणार! माध्यमाला अवाजवी महत्त्व दिलं की, तंत्रापलीकडे काही दिसू नये असा अपारदर्शीपणा येणार. सर्व कलाव्यवहार यांत्रिक बनणार. अशी तारेवरची कसरत आहे आणि मौजेची गोष्ट अशी की, ताणलेल्या तारेवर आपण चालत आहोत की, खाली गटांगळी खाल्ली आहे हेही वर्षानुवर्षं उमजत नाही. पण कधी इकडे झुकत तर कधी तिकडे झुकत, तोल सावरीत कलेची जी वाटचाल होते, ती संस्कृतीच्या अधिक उन्नत शिखराकडे आणि असे मानण्याला व्यापक मांडणीत पर्याय नाही. माध्यम आणि हेतू ही जोडगोळी शरीर-अशरीर अस्तित्व या जोडगोळीसारखी आहे.
साहित्यात कथ्य आणि शिल्प – भाषा आणि आशय असा भेद कल्पिला जातो. जातो म्हणण्यापेक्षा जात असे. अत्याधुनिक समीक्षा किंवा साहित्यशास्त्र असा भेद मानत नाही. अस्सल आशय त्याची स्वत:ची भाषा, त्याचा स्वत:चा घाट (Form) घेऊनच अवतीर्ण होतो असं सप्रमाण सांगितलं जातं. आधुनिक साहित्याने अलंकारिक, सांकेतिक भाषेचं जोखड फेकून दिलं असं सांगितलं जातं. आता कोणी फार अलंकारिक लिहीत नाहीत, अतिशय विकसित अशी अक्षरगण आणि मात्रावृत्तांची पद्य पद्धती आता कोणी अनुसरत नाही. छंद, वृत्त गमावली तरी आधुनिक कवितेची कमाई खूप मोठी आहे हे मत सर्वमान्य आहे.
आता हेच प्रारूप (Model) असंच्या असं शास्त्रीय संगीताला लावता येईल का? शतकानुशतकांच्या संस्कारांनी जागृत केलेली, चिमटीत पकडलेली स्वर-लय संवेदना गमावण्याची गोष्ट आहे का? आज चमत्कार म्हणून गणली गेलेली जी बाल कलाकार मंडळी आहेत, त्यांची सांगीतिक संवेदना उपजतच एवढी जागृत, तीक्ष्ण आहे! अनेक कलाकार उघडपणे हे मान्य करतात की, आजकालची मुलं जास्त शार्प आहेत. हे जर खरं असेल तर निसर्गाने सांगीतिक संवेदना ही बाब उत्क्रांती मोडमध्ये टाकली आहे. तयारी, कौशल्य, माध्यमावरचं प्रभुत्व ही बाब नाकारता येण्यासारखी नाही. तांत्रिक कौशल्य नाकारलं जाऊ लागलं तर संगीतकलेची अधोगती सुरू होईल. तान घेतली नाही की (आणि तरच) भाव प्रकट होतो का हो? सूक्ष्म लयकारी केली नाही तरच तबलावादन दर्जेदार होतं का हो? कलाविष्कार दर्जेदार, भावप्रवण वाटावा म्हणून काही पथ्यं, काही संकेत पाळणं बेगडी नाही का? आधुनिक कला अभ्यासक म्हणतात की, लिहिलेल्या ओळीला – ती वाचली, वाचता आली की - एक अर्थ असतो. पण म्हणून त्या ओळीचं जे दृश्यरूप आहे, त्याला काही अर्थ नाही, असं म्हणता येत नाही. ओळीचा अर्थ (शब्दार्थ) कळो न कळो ओळीच्या दृश्यरूपाला त्याचा एक अर्थ असतो!
‘या हृदयीचे त्या हृदयी’ हे संगीतकलेच्या हेतूचं परिपूर्ण विधान होऊ शकत नाही. ‘संगीतातून भावाभिव्यक्ती’ असंच ते विधान असू शकतं. संगीताच्या माध्यमातून घडणाऱ्या भाववहनाचं महत्त्व आहे. संगीतातून भावाचं रिपोर्टिंग नको आहे. रसिक मनात भाव जागृत व्हायला हवा आहे. भाव नव्हे तर स्वरभाव हा संगीताचा आत्मा आहे.
किशोरीताई सतत हेच सांगत आल्या. स्वराच्या जितकं निकट जाता येईल तितकं निकट जा – शब्दांत, वाद्यतालात बद्ध अशा अवस्थेपेक्षा निखळ, केवल स्वरूपात स्वराला पहा. स्वर सुंदर आहे. भावमय आहे. प्रावाहिक आहे. चैतन्यमय आहे. दयाळू आहे. समर्थ आहे. वैश्विक आहे. तुमची अनुभूती सुंदर आहे. उत्कट आहे, चैतन्यमय आहे आणि नितळ पारदर्शी सूर त्या तुमच्या जाणीवेचं प्रतिबिंब होऊन आहेत.
लेखक अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.
kdparanjape@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment