‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ : स्वत:चं एक स्वतंत्र असं ‘मॉडेल’ निर्माण केलेले मराठीतले मान्यताप्राप्त दर्जेदार दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ यांची मुखपृष्ठे
  • Wed , 29 November 2023
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank अक्षर Akshar ऋतुरंग Ruturang

‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ हे दोन्ही दिवाळी अंक ‘मराठी दिवाळी अंकांची परंपरा’ समृद्ध करण्यात मोलाचा हातभार लावत आले आहेत. या दोन्ही अंकांनी स्वत:चं एक स्वतंत्र असं ‘मॉडेल’ निर्माण केलं आहे. त्यामुळे ‘अक्षर’ आणि ‘ऋतुरंग’ म्हणजे दर्जेदार दिवाळी अंक, हे समीकरण मराठी वाचकांमध्ये मान्यताप्राप्त झालेलं आहे. ‘अक्षर’चं यंदाचं ४२वं वर्षं आहे, तर ‘ऋतुरंग’चं ३१वं. याही वर्षी हे दोन्हीही अंक आपल्या परंपरेला साजेसे असेच आहेत.

‘अक्षर’मध्ये दरवर्षी एक ‘विशेष लेखमाला’ असते, पण त्याला सहसा परिसंवादाचं स्वरूप नसतं. त्यामुळे ती वाचनीय असते आणि संबंधित विषयाचे विविध पैलू समोर आणण्याचंही काम चांगल्या प्रकारे करते. यंदाची विशेष लेखमाला आहे ‘एआयचं जग’ या सध्या जगभर चर्चेत असलेल्या विषयावर. तिचं संपादन केलं आहे कथाकार, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘चौथ्या औद्योगिक क्रांती’चे अभ्यासक विजय तांबे यांनी. यात सहभाग घेतला आहे- आदित्य गोविलकर, डॉ. तपन निर्मला प्रदीप, अजय वाळिंबे, जयदीप हर्डीकर, अमोल साळे, डॉ. अजित जोशी, दीपा पळशीकर, अजय वाळिंबे, रवि आमले, आशिष दीक्षित आणि अभय टिकेकर यांनी. या लेखकांनी अनुक्रमे तंत्रज्ञान, आरोग्य, कायदा, शेती, उद्योग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, शिक्षण, शेअर बाजार, फेक न्यूज, एआय आणि विज्ञान, या क्षेत्रांत एआयमुळे नेमके काय बदल होऊ घातलेत, होतील आणि त्याचे काय परिणाम-दुष्परिणाम होऊ घातलेत, होतील, याची अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी केली आहे.

सध्या मराठीत एआय नावाचा बागुलबुवा अर्ध्याकच्या माहितीवर उभा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या लेखमालेतली समतोल, तटस्थ आणि साधकबाधक चर्चा वाचल्यावर आपल्या लक्षात येतं की, हे तंत्रज्ञान आपण समजतो तितकंही वाईट नाही आणि काही क्षेत्रांत त्याचा फारसा फायदा होण्याचीही शक्यता नाही. पण त्याचे काही तोटेही होणार आहेतच. शेवटी कुठलंही तंत्रज्ञान हे तुम्ही कसं, कशासाठी आणि कशाप्रकारे वापरता, यावरच अवलंबून असतं. या लेखमालेतील काही लेखांचं पुनर्लेखन करून घेतलं आणि काहींमध्ये अजून थोडी भर घातली, तर एका चांगल्या पुस्तकाचा निर्मिती होऊ शकेल, इतकी ही लेखमाला दमदार आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्यानंतर नंबर लागतो तो समीर गायकवाड यांनी संस्करण व संपादित केलेल्या ‘कविता वेश्यांच्या’ या विभागाचा. तो अंकात तिन्ही ठिकाणी विखुरला आहे. खरं तर तो एकत्रितपणे सलग दिला असता आणि त्यांचा क्रम जरा अजून जाणकारीनं ठरवला असता, तर बरं झालं असतं. पण तरीही हा या अंकातला अतिशय स्फोटक विभाग आहे, असं म्हणावं लागेल. वेश्यांविषयीच्या आपल्या समज-अपसमजांच्या चिंध्या उडवणारी आग आणि धग या कवितांमध्ये आहे. कविता म्हणून त्या भलेही फार चांगल्या गणल्या जाणार नाहीत कदाचित, पण भारतीय पुरुषांची नजर बाईच्या शरीरावर जशी फिरते, त्या नजरेला उलटवून त्याच्याच काळजात ती रुतवून, त्यातून ‘कळ’ निर्माण करण्याची ताकद या कवितांतल्या शब्दांमध्ये आहे.

त्यानंतरचा असाच दाहक अनुभव आहे पार्थ एम.एन. यांच्या ‘मणिपूरची फाळणी’ या रिपोर्ताजमध्ये. प्रत्यक्ष मणिपूरमध्ये फिरून, अनेक लोकांशी बोलून त्यांनी लिहिलेला हा मराठीतला पहिलाच रिपोर्ताज असावा बहुधा. स्वत:ची विवेकबुद्धी जागृत असलेल्या कुठल्याही सुबुद्ध माणसाच्या खाडकान मुस्कटात मारणारं वास्तव या रिपोर्ताजमध्ये आहे.

आता स्फोटक, दाहक, जळजळीत वास्तवाकडून जरा विनोदाकडे वळू. त्यात पहिला नंबर लागतो तो डॉ. हृषिकेश रांगणेकर यांच्या ‘असंही राशीभविष्य’ या आगळ्यावेगळ्या वार्षिक राशीभविष्याचा. रांगणेकरांच्या या लेखनात बोचकारे, ओरखडे, उपरोध, चिमटे, शालजोडी, उपहास, खिल्ली, राजकीय टीकाटिपणी, व्यंग आणि निर्मळ विनोद, असा सबंध ‘जादुई पेटारा’च भरलेला आहे.

त्यानंतर उल्लेख करावा लागेल, तो प्रसिद्ध नाटककार संजय पवार यांनी घेतलेल्या ‘सरस्वती सन्मान’ पुरस्कारप्राप्त दलित लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या मुलाखतीचा. या सात पानी मुलाखतीच्या पहिल्या तीन पानांत पवारांनी लिंबाळे यांची पहिली भेट आणि त्यानंतरच्या एक-दोन भेटींमध्ये त्यांना दिसलेल्या, समजलेल्या लिंबाळे यांच्याविषयी लिहिलं आहे. चौथ्या पानाच्या मध्यावर लिंबाळे यांची प्रत्यक्ष मुलाखत सुरू होते. म्हणजे प्रत्यक्ष मुलाखत आहे जेमतेम साडेतीन पानांची. त्यात पवारांनी १९८४-८५ साली ‘अक्करमाशी’ या लिंबाळे यांच्या पुस्तकाला मिळालेल्या पुरस्कारापासून सरस्वती सन्मानापर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला, एवढंच जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एकही तिरकस प्रश्न विचारलेला नाही. आणि लिंबाळे यांनीही आपल्या आयुष्याविषयी, विविध अनुभवांविषयी आणि साहित्याविषयी आपली मतं मनमोकळेपणाने सांगितली आहेत. त्यांच्या वाट्याला आलेलं बहिष्कृत जगणंही सांगितलं आहे, आणि मराठी साहित्यानं त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराविषयीही. या मुलाखतीचं शीर्षक आहे – ‘मला आता नोबेल मिळवायचंय’. तर शेवटच्या पानावर त्यांनी म्हटलंय की, ‘आता सरस्वती सन्मान मिळाला, आता ज्ञानपीठ आणि नोबेल मिळवायचं!’ लेखकाने ‘कॉन्फिडंट’ असावं, पण इतकंही ‘ओव्हर कॉन्फिडंट’ असू नये, असं काहींना वाटू शकतं. पण मनाचा कद्रूपणा न दाखवता समस्त मराठी जणांनी लिंबाळे यांना त्यांच्या या ध्येयासाठी शुभेच्छा द्यायला हव्यात. असं हिमालयाच्या उंचीचं स्वप्न पाहण्यासाठीही ‘जिगर’ तर लागतेच ना!

.................................................................................................................................................................

*!#* ‘अक्षरनामा’ दीपावली २०२३ विशेषांक *!#*

वेगळे, नावीन्यपूर्ण, अर्थसंपन्न आणि अंतर्मुख करायला लावणारे चिंतनशील असे १३ लेख...

पाहावाचाअनुभवाइतरांनासूचवा

https://www.aksharnama.com/client/sub_categories_articles/166

.................................................................................................................................................................

‘मॅडपणा नुस्ता’ या लेखात गजू तायडे यांनी १०२ वर्षांचं उदंड आयुष्य लाभलेल्या आणि सलग ५५ वर्षं ‘मॅड’ या नियतकालिकांत व्यंगचित्रमालिका रेखाटणाऱ्या अ‍ॅल जॅफी या व्यंगचित्रकाराविषयी लिहिलं आहे. हा वाचनीय आणि चांगला लेख आहे, त्याचं शीर्षक मात्र जरा वेधक असायला हवं होतं.

‘देशी आणि आधुनिक’ हे हेमंत कर्णिक यांचं व्हिएतनामचं प्रवासवर्णन, ‘शेजारी देशांमधले मुसलमान’ हा पाकिस्तान, म्यानमार आणि चीनमधील मुस्लिमांची ओळख करून देणारा जतिन देसाई यांचा लेख, ‘देशावर प्रेम आहे म्हणून’ हा जाफर पनाही या दिग्दर्शकाच्या व्यक्तिमत्त्वाची आणि सिनेमांची ओळख करून देणारा मीना कर्णिक यांचा दीर्घ लेख, ‘बेलेइव्हचे पाळतू कोल्हे’ हा ‘सेल्फ-डोमेस्टिकेशन’विषयीचा अंजली चिपलकट्टी यांचा अभ्यासू लेख, ‘ब्रूसलीचा प्रश्न’ हा लोकेश शेवडे यांचा राज्यकर्त्यांच्या चुका आणि त्यांची कबुली यांविषयीचा खणखणीत लेख, हा या अंकातला मौलिक ‘ऐवज’ आहे. ‘नेहरू आणि मी’ हा प्रदीप चंपानेरकर आणि ‘चारचौघे’ हा (सुधीर नांदगावकर, जयंत धर्माधिकारी, वि. वि. करमरकर, कमलाकर नाडकर्णी) प्रकाश अकोलकर यांचा, हे दोन्ही लेख मात्र थोडासा अपेक्षाभंग करतात.

याशिवाय या अंकात सतीश तांबे, वासिम मणेर, विवेक गोविलकर, डॉ. संतोष पाठारे आणि शिल्पा पाठक यांच्या कथांचाही समावेश आहे. कथा वाचणं आणि त्यांची प्रतवारी ठरवणं, हे काम प्रस्तुत प्रतिनिधीच्या आवाक्याबाहेरचं असल्यानं त्यांचा फक्त उल्लेख केलेला आहे… कळावे, गैरसमज नसावा.

‘अक्षर’ : संपादक – मीना कर्णिक, हेमंत कर्णिक, पाने – २५८, मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘ऋतुरंग’चे अरुण शेवते यांचं यंदाही अभिनंदन करायला हवं. त्यांचा दरवर्षीचा अंक एकाच ‘थीम’वर बेतलेला असतो. त्यामुळे त्याला ‘भारदस्तपणा’ येतो आणि तो कमालीचा ‘वाचनीय’ही असतो. यंदाची थीम आहे- ‘आपलं माणूस’. घरातली, घराबाहेर भेटलेली, न भेटलेली माणसं असा या ‘थीम’चा विस्तार शेवते यांनी केला आहे. या विशेषांकात तब्बल ४० लेखांचा समावेश आहे. उंबरठ्यापासून सातासमुद्रापार या लेखांचा पैस आहे. दोन-चार महिन्यांत इतक्या लेखकांकडून आपल्याला हवं तसं लिहून घेणं, हे तसं दुष्कर काम, पण ते शेवते दरवर्षी कौशल्यानं करत आले आहेत. यंदाही शेवतेंच्या कल्पक संपादनला दाद द्यावीच लागते.

हा ‘आपलं माणूस’ विशेषांक आहे, ‘व्यक्तिचित्र’ नाही, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे संबंधित माणसाचं आपल्या आयुष्यातलं, सहवासातलं, अनुभवातलं स्थान याच परिघातले हे लेख आहेत. खरं तर या लेखांची ‘घरातली माणसं’, ‘घराबाहेर भेटलेली माणसं’, ‘न भेटलेली माणसं’ आणि ‘सातासमुद्रापलीकडील माणसं’, अशी थेट विभागणी केली असती, तर वाचकांच्या दृष्टीनं ते अधिक सोयीचं ठरलं असतं. ‘सातासमुद्रापलीकडे’ हा एकच वेगळा विभाग केला आहे फक्त, पण त्याने फार फरक पडत नाही.

मात्र एक उत्तम ‘पॅकेजिंग’ कसं करावं, याचं संपादन म्हणून शेवते यांना अतिशय चांगलं भान असल्यामुळे ते अंकाचा विषय निवडण्यापासून त्यातील लेखक निवडण्यापर्यंत आपलं संपादकीय कौशल्य गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं दाखवत आले आहेत… त्यात यशस्वीही होत आले आहेत. यंदाचा अंकही त्याला अर्थातच अपवाद नाही.

संपादकाचं खरी कसोटी दोन ठिकाणी लागते, असं म्हणतात. पहिली, ‘चांगला विषय’ निवडण्यात आणि दुसरी, त्या सुचलेल्या विषयासाठी ‘चांगले लेखक’ निवडण्यात. मांडणी, सजावट, मुखपृष्ठ, रेखाटनं, छायाचित्रं या बाबीही महत्त्वाच्याच, पण त्या नंतरच्या टप्प्यात येतात. पहिल्या दोन्ही कसोट्यांवरही शेवते गेल्या काही वर्षांपासून षटकार-चौकार याच ‘रेंज’मध्ये राहत आले आहेत. आवंदा तं मायंदळच धमाल उडवून दिलीय त्यास्नी. त्याचबरोबर मुखपृष्ठ, मांडणी, शीर्षकलेखन, व्यक्ती-रेखाटनं, याही बाबी उल्लेखनीय म्हणाव्या अशाच आहेत. मुखपृष्ठावरील छायाचित्रासाठी कार्तिकी गोन्सालीस, रेखाटनांसाठी अन्वर हुसेन, विजयराज बोधनकर आणि शीर्षकलेखनासाठी अक्षरसुलेखनकार बी. जी. लिमये यांचंही अभिनंदन.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

‘हेमांगी’ आणि ‘चौफेर समाचार’ : ‘उत्तम अंकां’च्या मांदियाळीत ‘वरच्या’ श्रेणीत उत्तीर्ण होणारे दिवाळी अंक

दिवाळी अंकांची लोकप्रियता हा एक भास!

दिवाळी अंक आणि ‘प्रतिभे’ला बेजार करून सोडण्याचे दिवस!

दिवाळी अंक आणि साहित्याचे दिवाळे

.................................................................................................................................................................

या अंकातले उत्तम लेख : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : साहिर – जावेद अख्तर, माझे उजवे हात – गुलज़ार, इरण्णा – समीर गायकवाड, पार्टनर – श्रीकांत बोजेवार, मनस्वी – अंबरीश मिश्र, जवाहरलाल – मैथिलीशरण गुप्त (अनु. प्रदीप निफाडकर), निळूभाऊ – विश्वास पाटील, आमचा आदिल – राजीव खांडेकर, मासळी विकता विकता – प्रगती बाणखेले, पद्मश्री आत्याबाई – अरुण शेवते.

चांगले लेख : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : एका डोळ्याने क्रिकेट जगलेला फायटर – प्रदीप चंपानेरकर, मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर – दिलीप माजगावकर, पवनारचे गौतमभाई – सुप्रिया सुळे, महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम – संपत मोरे, जलऋषी – श्रीराम पवार, सहजीवन छत्तीशी – विनय सहस्त्रबुद्धे (‘आपलं माणूस’मध्ये पत्नीविषयी लिहिणारा या अंकातला हा एकमेव लेख आहे), वाळिंब्यांचे जग – पंकज भोसले, गुरुजी – द. वि. अत्रे.

मध्यम मध्यम : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : असाही एक न्यायाधीश – संजय भास्कर जोशी, हरित इस्त्रायलचे जनक – सचिन इटकर, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउलें – किशोर मेढे, महात्मा  - रामदास भटकळ, वामनराव – गिरीश कुबेर, जोगतिणीचा प्रवास – शुभदा चौकर, त्या दोघींनी ऑस्कर जिंकले – पूजा सामंत, दिलदार स्नेही – सुशीलकुमार शिंदे (या पाच पानी लेखात शीर्षक  व दोन रेखाटनांनी जवळपास दीड पान जागा व्यापलीय. दीड पान नेमाडे यांच्या लेखातली अवतरणं आहेत. उरली दोन. त्यात खास असं काही नाही.).

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘सातासमुद्रापलीकडे’ या विभागात १४ लेखांचा समावेश आहे, मात्र हा विभाग आधीच्या विभागासारखाच वैविध्यपूर्ण असला, तरी तो काहीसा ‘उणा’ पडला आहे. ‘आपलं’ माणूस ‘असणं आणि ‘वाटणं’, यांत फरक आहे. तो यातल्या काही लेखकांनी नीट लक्षात घेतला नाही किंवा त्यांना ते नीट सांगता आलेलं नाही.

या अंकातले उत्तम लेख : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : सूरस्नेही – धीरज अकोलकर, मार्ट आणि मफाल्दा – मिलिंद चौबळ

चांगले लेख : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : आमची हक्काची माणसं – डॉ. संग्राम पाटील, यारी दोस्ती – अरुंधती देवस्थळी, बर्लिनचा बासरीवादक – अशोक राणे, युक्रेनियन सूनबाई – राधिका टिपरे, सृजनाचे बंध  - शिरीन कुलकर्णी

मध्यम मध्यम : क्रम चढत्याकडून उतरत्याकडे : मुक्काम पोस्ट तुरीन - मृदुला बेळे, फ्रान्सच्या एका खेडेगावात – जाई गुलमोहर (आपटे), परिघाबाहेरच्या मैत्रणी – यशोदा वाकणकर, जॉर्डनचे राजपुत्र आणि स्लोव्हिनियाचे राष्ट्राध्यक्ष – संदीप वासलेकर, ऑक्सफर्डचे दिवस – शर्वरी शेवते, दक्षिण कोरियाच्या आठवणी – सुधीर देवरे. आणि अमेरिकेत मी खासदार झालो – श्रीनिवास ठाणेदार. या शीर्षकातूनच या लेखाचं स्वरूप स्पष्ट होतं. या लेखकानं स्वत:लाच ‘आपलं माणूस’ समजून स्वत:विषयीच लिहिलं आहे.

एकंदरीत, गोळाबेरीज हीच निघते की, हा अंक वैविध्यपूर्ण, भरगच्च आणि तरीही संग्राह्य झालेला आहे.

‘ऋतुरंग’ : संपादक – अरुण शेवते, पाने – ३२०, मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......