मीनाकुमारी : ‘कितना हसी सफर था...’
कला-संस्कृती - गाता रहे मेरा दिल
आफताब परभनवी
  • मीना कुमारीची एक अदा
  • Sat , 08 April 2017
  • गाता रहे मेरा दिल Gaata Rahe Mera Dil आफताब परभनवी Aftab Parbhanvi मीनाकुमारी Meena Kumari

जळणारी एक मेणबत्ती, तिच्या भोवती पाघळलेलं मेण किंवा काजळ भरलेल्या मोठ्या डोळ्यांतून ओघळणारे आसु अशी मीनाकुमारीची काहीतरी एक दु:खी प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली आहे. त्याला मीनाकुमारीसह सगळेच जबाबदार आहेत. तिच्या शोकात्म आयुष्याचीही या प्रतिमेला एक पार्श्वभूमी आहे. पण हे सगळं बाजूला ठेवून तिच्या कारकिर्दीकडे तटस्थपणे पाहिलं तर कितीतरी सुंदर, आनंदी प्रेमाची रसरशीत गाणी तिच्या चित्रपटांत सापडतात. पण त्या गाण्यांकडे आपलं लक्ष जात नाही किंवा ही गाणी मीनाकुमारीची आहेत म्हणून मनात ठसत नाहीत. 

अगदी सुरुवातीला ‘अनमोल रतन’ (१९५०) मध्ये संगीतकार विनोदने तलत-लताच्या आवाजात ‘शिकवा तेरा मैं गाऊ, दिल में समाने वाले, भूले से याद करले, ओ भूल जाने वाले’सारखं विरहाचं आर्त गाणं दिलं. पुढं हाच शिक्का मीनाकुमारीवर बसला किंवा तिनंही बसवून घेतला. वास्तविक तिच्या शेवटच्या चित्रपटात- ‘पाकिजा’ (१९७२)मध्ये ‘चलो, दिलदार चलो’सारखं प्रेमाचं अप्रतिम आनंदी द्वंद गीत आहे. म्हणजे सुरुवात दु:खानं करून शेवट आनंदी करणारी ही कलाकार, पण तिची प्रतिमा मात्र आपण दु:खीच करून घेतली.   

‘बैजू बावरा’ (१९५२) हा सगळ्याच अर्थाने मीनाकुमारीचा हिट चित्रपट. यातील गाणी गाजली, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला गोळा केला. मीनाकुमारी एक प्रमुख नायिका म्हणून पुढे आली. आपल्या आधीचा अशोक कुमार असो की, बरोबरचे राजकपूर, देव आनंद, दिलीपकुमार असो किंवा नंतरचे सुनील दत्त, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार असो किंवा त्याही नंतरचा सुपरस्टार राजेश खन्ना असो, सगळ्यांबरोबर तिनं काम केलं. ‘बैजू बावरा’नंतर तिला ‘ए’ दर्जा मिळाला, तो शेवटपर्यंत. यातली एक द्वंद गीत अतिशय गोड आहे.ते गाणं आहे ‘झुले में पवन की आयी बहार’. झोक्यावर बसलेले लहानपणीचे भारतभूषण आणि मीनाकुमारी झोका परत चित्रपटाच्या फ्रेममध्ये येतो, तेव्हा मोठे झालेले असतात आणि नेमकं त्याच वेळी गाणं सुरू होतं. शकिल आणि नौशाद हे एक जबरदस्त गोडवा असलेलं समीकरण. मीनाकुमारीला पहिलं फिल्मफेअर याच चित्रपटासाठी मिळालं होतं. पुढे तिला तीन फिल्मफेअर मिळाले, ते तिच्या दु:खी गाण्यांसाठीच्या चित्रपटांसाठी.

ज्या चित्रपटात भरपूर गाणी होती आणि जवळपास सगळीच गाजली होती, तो चित्रपट म्हणजे ‘आझाद’ (१९५५). या चित्रपटात सी.रामचंद्र यांनी मीनाकुमारीसाठीचं सगळ्यात सुंदर आनंदी द्वंद गीत दिलं आहे. ‘कितना हसी है मौसम, कितना हसी सफर है, साथी है खुबसूरत ये मौसम को भी खबर है’. स्वत: सी.रामचंद्र यांनीच हे गाणं लतासोबत गायलं आहे. जशी नौशाद-शकिल अशी संगीतकार-गीतकार जोडी होती, तशीच सी. रामचंद्र-राजेंद्रकृष्ण अशीही जोडी आहे. या जोडीनं कैक सुमधूर गाणी दिली आहेत. 

पुढच्या वर्षी १९५६ मध्ये मीनाकुमारीची अशी काही अवखळ खट्याळ गाणी आली की, डोळे झाकले तर आपण म्हणून शकतो पडद्यावर मधुबालाच असणार. ‘नया अंदाज’ (१९५६) मध्ये ‘मेरी निंदो मे तूम, मेरी ख्वाबों मे तूम, हो चुके हो तुम्हारी मुहोब्बत मे गुम’ असं पियानोवर बसून गाणारा किशोरकुमार. मीनाकुमारी शमशादच्या आवाजात त्याला उत्तर देत आहे- ‘मन की बीना की धून, तू बलम आज सून, मेरी नजरों ने तुझको लिया आज चून’. शमशादच्या अतिशय दुर्मिळ गाण्यांपैकी हे गाणं आहे. अशा पद्धतीनं तिचा आवाज वापरला गेला नाही. तो फारसा शोभतही नाही. त्याच वर्षीच्या ‘मेमसाहिब’मध्ये मदन मोहनने ‘केहता है दिल तूम हो मेरे लिये’ हे एक अफलातून गाणं दिलं आहे. तलत-आशा असं मस्त कॉकटेल आहे. शांत रोमँटिक भूमिकेतला सोज्वळ शम्मी कपूर पाहणं म्हणजे मजाच. पण गाणं फारच गोड आहे. ना पुढे मदनमोहनचे सूर शम्मीशी जूळले, ना आशा भोसलेला फारशी गाणी मदन मोहनकडे मिळाली. या चित्रपटासाठी राजेंद्रकृष्णची गीतं मदनमोहननं वापरली आहेत. ही जोडी मात्र सगळ्यात जास्त जमली. नाव जरी मदनमोहन- राजा मेहंदी अली खां या संगीतकार-गीतकार जोडीचं झालं असलं तरी मदनमोहन-राजेंद्रकृष्ण जोडीची गाणी जास्त आहेत.

१९५६चा मीनाकुमारीचा तिसरा चित्रपट म्हणजे ‘एक ही रास्ता’. हेमंतकुमारचा धीरगंभीर आवाज आणि त्यात मिसळलेला लताचा कोवळा गोड आवाज, मजरूहचे शब्द 

सावले सलोने आये दिन बहार के, 

झुमते नजारे झुमे रंग डार के, 

नदीकिनारे कोयल पुकारे, 

आया जामाना, गाओ गीत प्यार के 

या गाण्यात माऊथ ऑर्गनचा वापर हेमंत कुमार यांनी अतिशय सुंदर केला आहे. सायकलवर बसलेला सुनील दत्त, पुढच्या बास्केटमध्ये बसलेली छोटी डेझी इरानी, मागच्या डबल सायकलच्या सीटवरची मीनाकुमारी असं हे मस्त गाणं आहे. मीनाकुमारीची सदाबहार टवटवीत गाणी निवडायची म्हटलं तर या गाण्याचा क्रमांक फार वरती लावावा लागेल.

पुढच्याच वर्षी १९५७ ला ‘मिस मेरी’मध्ये राजेंद्रकृष्णला हाताशी धरून (‘नागिन’ची हिट जोडी) हेमंतकुमारनं सुंदर द्वंद गीत दिलं आहे. मीनाकुमारीसोबत जेमिनी गणेशन हा दाक्षिणात्य नट आहे. ‘ओ रात के मुसाफिर, चंदा जरा बता दे, मेरा कसूर क्या है, तू फैसला सुना दे’. यातला जेमिनी गणेशनचा ठोकळेबाज अभिनय खटकतो. पण मीनाकुमारीनं गाणं सावरून घेतलं आहे. बीनाकातही हे गाणं त्या वर्षी हिट ठरलं.  

शंकर जयकिशन आणि किशोर कुमार-गीता दत्त हे सुत्र कधीच जुळलं नाही, पण ही किमया मीनाकुमारीच्या ‘शरारत’ (१९५९) मध्ये घडली आणि रसिकांच्या कानी पडलं एक गोड मस्तीखोर गाणं, ‘तूने मेरा दिल लिया, तेरी बातों ने जादू किया’. गाणं ऐकताना सारखं जाणवत राहतं शंकर जयकिशन-किशोर-गीता हे तीन कोन आहेत. त्यापैकी कोणीच आपली जागा सोडायला तयार नाही. एस.डी.बर्मन जसा किशोर-गीताचा आवाज हवा तसा वळवून घेतो, तसं शंकर जयकिशनला जमत नाही. ओ.पी.नय्यरही किशोरच्या आवाजाला न्याय देऊ शकले नाहीत. ही एक मोठीच अडचण आहे. किंबहुना या संगीतकारांच्या, त्या काळाच्या, गायकांच्या काही मर्यादा असतील. याच चित्रपटात या जोडीचं ‘देख आसमां मे चांद मुस्कुराये’ हे अजून एक गाणं आहे. हे पण मस्त आहे. 

‘अर्धांगिनी’ (१९५९) मध्ये वसंत देसाई यांनी दोन द्वदं गीतं दिली आहेत. एक प्रत्यक्ष मीनाकुमारी आणि राजकुमारवर आहे- ‘प्यार में मिलना सनम, होता है तकदीर से, हो अच्छी रहेगी तनहाई में, बाते तेरी तस्वीर से’. लता आणि हेमंतकुमारच वाटावा अशा सुबीर सेनच्या आवाजात हे गाणं आहे. हे गाणं ऐकताना सारखं ‘झनक झनक पायल बाजे’मधील ‘नैन सो नैन’ या लता-हेमंतच्या गाण्याचीच आठवण येत राहते. कदाचित संगीतकार एक असेल. एकाच काळातील गाणी असल्यामुळेही असेल. 

याच चित्रपटात दुसरं लोकगीतावर आधारीत गीता-रफीच्या आवाजात एक भन्नाट गाणं वसंत देसाईंनी दिलं आहे. मीना कुमारी अणि राजकुमार दूरून रस्त्यावर गाणाऱ्या या लोककलाकारांकडे पाहत आहेत. गाण्याचे बोल आहेत, 

अरे तूने जो इधर देखा, 

मैने भी उधर देखा, काहे को जले है कोई रे, 

नजर भर की हो गयी, नादानी नजर भर की हो गयी, 

काहे को समझ लिया, तेरी मेरी प्रीत पिया, 

दोही दिनों की हुई रे, बदनामी उमर भर की हो गयी

लोकगीताचा ठसका, लोकवाद्यांचा वापर, लोकगीतांचा थेटपणा असा सगळाच प्रत्यय एकत्र देणारं हे गाणं. गीताचा मदमस्त आवाज. त्याला तितक्याच तोडीची रफीची साथ. हिंदी चित्रपटाच्या गाण्यांमधून लोकगीतांवर आधारीत गाणी हुडकून काढायची म्हटली तर सलिल चौधरी, शंकर जयकिशन, एस.डी.बर्मन, नौशाद आणि वसंत देसाई अशा मोजक्याच संगीतकारांची गाणी  शोधावी लागतील. त्यांची यावर विलक्षण हुकूमत होती. 

१९६० मध्ये आलेला ‘कोहिनूर’ हा मीनाकुमारीचा अतिशय गाजलेला सिनेमा. त्यात मीनाकुमारी-दिलीपकुमार ही जोडी होती. मीनाकुमारीच्या आख्ख्या कारकीर्दीत प्रेमाची आनंदी द्वदंगीतं इतक्या संख्येनं असणारा हा एकमेव चित्रपट. एक दोन नाही तर तब्बल चार गाणी यात तशी आहेत. लता-रफीचं ‘दो सितारों का जमी पर है मिलन आज की रात’ हे तर हिट ठरलेलं गाणं. होळीचं गोड गाणं ‘तन रंग लो जी आज मन रंग लो’ तसंच ‘कोई प्यार की देखे जादूगरी’ आणि ‘चलेंगे तीर जब दिल पे’ ही इतरही दोन गाणी चांगली आहेत. 

या नंतर मात्र पडद्यावरच्या मीनाकुमारीच्या टवटवीत रसरशीत तरुण प्रतिमेचा उतरता काळ सुरू झाला. परिणामी तिची अशी गाणी प्रभावी वाटेनाशी झाली. ‘जिंदगी और ख्वाब’ (न जाने कहां तूम थे, १९६१), ‘प्यार का सागर’ (मुझे प्यार की जिंदगी देने वाले, १९६१), ‘चित्रलेखा’ (छा गये बादल, १९६४), ‘पूर्णिमा’ (हम सफर मेरे हम सफर, १९६५), ‘बहु बेगम’ (हम इंतजार करेंगे, १९६७) ही सगळी प्रेमाची आनंदी द्वंद्व गीतं चांगलीच होती. पण याच्या आड मीनाकुमारीची प्रतिमाच येत राहिली. कारण १९६० च्या ‘कोहिनूर’ बरोबरच तिचा दुसरा चित्रपट आला. तो म्हणजे ‘दिल अपना और प्रीत पराई’. यातील शीर्षक गीत तिच्या दु:खी, विरही प्रतिमेसाठी पोषक ठरलं. पुढे १९६२ ला ‘साहब बीबी और गुलाम’ आला. त्यातल्या ‘न जाओ सैंय्या छूडाके बैंय्या’सारख्या गाण्यानं चांगलाच गडद परिणाम रसिकांवर झाला.

अजून एक गोष्ट १९६० नंतर मीनाकुमारीच्या बाबत घडत गेली. पडद्यावर ती आता थोराड वाटू लागली. तशीही आपल्याकडे ३०व्या वर्षांनंतर नायिका तरुणी म्हणून स्वीकारल्या जात नाहीतच. आणि जवळपास सगळ्याच भूमिका या तरुण नायिकांच्याच असतात. धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, सुनील दत्त यांसारख्या तरुण नायकांबरोबर ती शोभेनाशी झाली. म्हणजे एकीकडे मीनाकुमारी सोबत तरुण धर्मेंद्र आणि तिकडे राजकपूर सोबत तरुण हेमा मालिनी असले विरोधाभास रसिकांसमोर यायला लागले. मग रसिकांनी गुपचूप आपली पसंती यातील राजकपूर आणि मीना कुमारी यांना वगळून हेमा मालिनी सोबत धर्मेंद्र यांना गेली. 

मीनाकुमारीचा ३१ मार्च १९७२ रोजी दुदैवी अंत झाला. मार्च एंडचा हिशोब घाईगडबडीनं मिटवावा तसा तिनं वयाच्या ३९ व्या वर्षी जीवनाचा हिशोब तडकाफडकी मिटवला. सगळेच तिच्या निधनाने हळहळले. पण त्यासोबत एक कटू सत्य आम्ही ढोंगीपणाने आजतागायत कबूल केलेलं नाही. ते म्हणजे खरंच मीनाकुमारी अजून जगली असती तर आम्ही नायिका म्हणून काय न्याय दिला असता? कारण तिच्या सोबतच्या इतर नायिका बाजूला शांत बसल्या होत्या. सुरैय्यासारखी तिच्या आधीची नायिका अज्ञातवासात निघून गेली होती. नौशाद, ओ.पी.नय्यर, रवी सारखे संगीतकार गुमसूम झाले. मन्ना डेसारखा मधाळ, तलतसारखा मखमली सूर शांत झाला. यांना दीर्घ आयुष्य लाभलं, पण कठोर हिंदी चित्रपटसृष्टीने यांच्यावर उतरत्या काळात दया दाखवली नाही.

तेव्हा मीनाकुमारीच्याच शब्दांत कबुल करायचं तर

टुकडे टुकडे दीन बिता

धज्जी धज्जी रात मिली

जिसका जितना आंचल था

उतनीही सौगात मिली

तिच्या आणि आपल्या नशिबात होतं तेवढं जास्तीत जास्त आपल्या पदरात टाकून मीनाकुमारी गेली. 

(मीनाकुमारीच्या चित्रपटांतील प्रेमाची आनंदी द्वंद्व गीतंच इथे विचारात घेतली आहेत. इतर गाणी नव्हे.)

         

लेखक हिंदी चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.   

a.parbhanvi@gmail.com

Post Comment

jit jit

Tue , 11 April 2017

नगमा ओ शेर की सौगात किसे पेश करू...


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख