पेशाने स्थापत्य अभियंता, पण ‘वाचणं आणि समजून घेणं ही जीविका’ असलेले सोलापूरचे ग्रंथसंग्राहक नीतिन वैद्य यांचं ‘वाचन-प्रसंग’ हे आपला वाचनानुभव सांगणारं पुस्तक नुतकंच मधुश्री पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
सोलापूरचे ग्रंथसंग्राहक व खंदे वाचनप्रेमी नीतीन वैद्य यांचं प्रस्तुत पुस्तक, हे या वर्षांतलं बहुधा पहिलंच ‘बुक ऑन बुक’ या प्रकारातलं पुस्तक असावं. गेल्या दोन दशकांची ‘बुक ऑन बुक्स’ची मराठीतली वाटचाल साधारणपणे वर्धिष्णू राहत आली आहे. तिला पुढे नेण्यात हातभार लावणाऱ्या या पुस्तकाचं स्वागत करायला हवं.
वैद्य हे जबरी वाचक आहेतच, पण वाचन-ग्रंथमहती इतरांपर्यंत पोहचवण्याचं कामही ते पदराला खार लावून करत असतात. ‘आशय’ हा दिवाळी अंक त्यांनी सोलापुरातल्या काही मित्रांच्या मदतीनं दहा-पंधरा वर्षं काढला होता. त्याने त्या कालावधीत मराठीतला एक वैशिष्ट्यपूर्ण अंक म्हणून लौकिक मिळवला होता. तसंच काही वर्षं ते ‘जागतिक ग्रंथ दिना’च्या म्हणजेच २३ एप्रिलच्या निमित्तानं पुस्तकांविषयीचं ‘फोल्डर’ प्रकाशित करत असत, नंतर त्यांनी विशेषांकही प्रकाशित केले. थोडक्यात, ‘सेवितो हा रस वाटितो आणिका’ या तुकोबाच्या उक्तीचा प्रत्यक्षातला दाखला म्हणून वैद्य यांच्याकडे बोट दाखवता येतं.
हे प्रस्तुत पुस्तकही त्यापैकीच एक. मी वैद्यांना गेल्या १२-१५ वर्षांपासून ग्रंथसंग्राहक म्हणून ओळखतो आहे. त्यामुळे त्यांचं हे पुस्तक खरं तर यापूर्वीच प्रकाशित व्हायला हवं होतं.
या पुस्तकात त्यांच्या १०० वाचननोंदीचा समावेश आहे. यातल्या काही नोंदी त्यांनी दैनंदिनीत लिहिलेल्या आहेत, तर काही फेसबुकवर. या केवळ पुस्तकांबद्दलच्याच नोंदी आहेत, असं नाही. काही नोंदी लेखकांबद्दलच्या (आणि अर्थात त्यांच्या पुस्तकांबद्दलच्याही), काही प्रकाशनसंस्था, काही वर्तमानपत्रं वा नियतकालिकांमधल्या वाचलेल्या लेखनाबद्दलच्याही आहेत. एकाच पुस्तकाबद्दल आणि लेखकाबद्दल त्यांनी एकापेक्षा जास्त नोंदी लिहिल्या आहेत. नंदा खरे यांच्या पुस्तकांचा उल्लेख अनेक नोंदीत येतो. अनेकदा त्यांना एका पुस्तकाबद्दल लिहिताना इतर अनेक पुस्तकं आठवतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मराठी पुस्तकांविषयीच्या नोंदीमध्ये चिं. त्र्यं. खानोलकर, भारत सासणे, अरुण खोपकर, विनय हर्डीकर, किरण नगरकर, वसंत नरहर फेणे, मधू मंगेश कर्णिक, राजन खान, अरुण साधू, तारा वनारसे, चंद्रकांत खोत, मकरंद साठे, त्र्यं. वि. सरदेशमुख, प्रिया तेंडुलकर, बाबा कदम, मिलिंद बोकील, संतोष शिंत्रे, श्रीकृष्ण सवदी, वसंत केशव पाटील, दामोदर प्रभू, प्रल्हाद अनंत धोंड, दिनकर दाभाडे, मधुकर धर्मापुरीकर, चंद्रमोहन कुलकर्णी, सुनील साळुंखे, भीमराव जाधव, बोधक नगरकर, विजय पाडळकर, दीपक करंजीकर, अनंत मनोहर, मोनिका गजेंद्रगडकर, विश्राम गुप्ते, सुप्रिया अय्यर, संतोष वरधावे, अजिता काळे, प्रवीण कुलकर्णी, बा. बा. कोटंबे, सोलापूरचे ग्रंथसंग्राहक आनंद कुंभार, श्रीकांत देशमुख, किरण गुरव, संग्राम गायकवाड, कृष्णात खोत, पंकज भोसले, हृषिकेश पाळंदे, प्रणव सखदेव, हृषिकेश गुप्ते, सचिन कुंडलकर, असे तीन-चार पिढ्यांतले लेखक आणि पुस्तकं भेटतात.
तर हिंदी आणि अनुवादित पुस्तकांविषयींच्या नोंदीतून असगर वजाहत, सुशोभित, जयशंकर प्रसाद, नूर जहीर, सरदार जाफरी, गिरीश कार्नाड, मनोहर श्याम जोशी, आशुतोष भारद्वाज, विजयदान देठा, शंभू मित्र, बादल सरकार, धर्मवीर भारती, कुंवर नारायण, सलाम बिन रज्जाक, शुभा मुदगल, प्राणकिशोर, तिलोत्तमा मुजुमदार, व्हिक्टर ह्यगो, जेरी पिंटो, विश्वनाथ घोष, शंकर, संजीवकुमार, अमृतलाल वेगड, उमेश पंत, बिमल डे, संजाय हजारिका, मार्खेज, विभूतिभूषण बंदोपाध्याय, थोरो, कॉनराड रिक्टर, देर्सू उझाला, व्लादिमिर अर्सेनीव्ह, राईनर मारिया रिल्के, पहल, भारत यायावर, असगर वजाहत, सामदोंग रिनपोछे, उदयन वाजपेयी, असे चार-पाच पिढ्यांतले भारतीय आणि परदेशी लेखक भेटतात.
माझे मित्र आणि अनुवादक जयप्रकाश सावंत यांनी त्यांच्या ‘पुस्तकनाद’मध्ये जगप्रसिद्ध लेखक ऱ्होहे लुईस बोर्हेस यांच्या एका विधानाचा उल्लेख केला आहे - ‘I have always imagined that paradise will be a kind of Library.’ (‘मला नेहमी वाटत आलंय की, स्वर्ग म्हणजे एखादी लायब्ररी असणार.’) प्रस्तुत पुस्तक वाचत असताना मला हे वाक्य सारखं आठवत होतं. वैद्य पुस्तकांच्या स्वर्गात राहणारे सद्गृहस्थ आहेत, याचा प्रत्यय मला पुन्हा पुन्हा येत होता आणि त्यांचा हेवा वाटत होता. खरं तर वैद्यांचा हेवा त्यांची ओळख झाल्यापासूनच वाटत आलाय, पण हे पुस्तक वाचताना त्याची तीव्रता आणखी वाढली, असं म्हणणं जास्त रास्त ठरेल.
वैद्यांचे हे वाचन-ओथांबे ओंजळीत झेलून घ्यावेत आणि मग त्यांनी सांगितलेल्या पुस्तकांच्या आडवाटांवरून चालायला सुरुवात करावी. या सगळ्या आडवाटा आपल्याला मूळ पुस्तकांच्या हमरस्त्याकडे घेऊन जातील. वैद्यांनी ज्येष्ठ बंगाली नाटककार बादल सरकार यांच्या पत्रसंग्रहाविषयी लिहिताना म्हटलंय की, ‘…हमरस्ता गंतव्य स्थानाकडे नेतो हे खरेच, पण समृद्ध तर आडवाटाच करतात.’ वैद्यांचं हे पुस्तकही नेमकं हेच काम करतं.
आता हेच पहा ना, पावसाळ्याच्या दिवसांत ते ‘अंतरीची ओल’ (गो.तु. पाटील) आणि ‘लांबा उगवे आगरी’ (म.सु. पाटील) या व्रतस्थ समीक्षकांची प्रांजळ आत्मकथनं वाचत होते, तर पाय प्लॅस्टरमध्ये असताना, घरात अडकून पडलेले असताना मात्र ‘२१व्या शतकासाठी २१ धडे’ (युव्हाल नोआ हरारी), ‘इंडिका’ (प्रणय लाल, अनु. नंदा खरे), अशी जगाकडे पाहण्याचा सम्यक दृष्टीकोन देणारी पुस्तकं वाचत होते.
तेरावे शतक ते विसावे शतक अशा प्रदीर्घ काळातल्या स्वकुळाचा शोध घेणारी ‘सातपाटील कुलवृत्तांत’ ही ज्येष्ठ कादंबरीकार रंगनाथ पठारे यांची कादंबरी वाचून झाल्यावर वैद्य म्हणतात – “… एखादा प्रचंड सुळका चढून पठारावर यावे तसे श्रमाने क्लान्त झाल्यासारखे वाटत होते… भारावलेपणाच्या जोडीला बरेचसे असमाधानही साठले. काही ठराविक गंतव्यस्थान ठरवून निश्चित रस्त्याने मागे जाऊन इतका प्रदीर्घ रस्ता पुन्हा कापणे रोमहर्षक आहे, पण फारसे अनिश्चिताचे धक्के देत नाही.” तर ‘दोन चाकं झपाटलेली’ हे सतीश आंबेरकर यांनी सायकलवरून जगप्रवास केलेल्या अनुभवांविषयीचं पुस्तक वाचल्यावर ते म्हणतात – ‘‘शब्दांकन नेमके तरी जरा जास्तच साहित्यिक वळणाचे. यात्रा आंबेरकरांची, कथा-कादंबरीकार वडावालांची नव्हे, याचे भान सुटते, तेव्हा शब्दसोस परिणामापासून थोडा लांब घेऊन जातो.’’ असा साक्षेप या पुस्तकातल्या अनेक नोंदींमध्ये दिसतो.
दुसरी गोष्ट म्हणजे वैद्य निस्सीम वाचक आहेत. पुस्तकांवर, लेखकांवर त्यांचं मनापासून प्रेम आहे. पण म्हणून ते भाबडे नाहीत. ‘चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट’ म्हणणं त्यांना जमतं, साधतं आणि म्हणताही येतं. आणि ही मला सर्वांत मोलाची गोष्ट वाटते. मराठीतला सबंध ग्रंथव्यवहार आणि वाचनव्यवहार यांत ही गोष्ट दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालली आहे. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या सुलभतेमुळे आणि ‘करिअरिस्टिक अप्रोच’मुळे पुस्तकं लिहिणं, ती छापणं, त्यांचं कौडकौतुक करवून घेणं, पुरस्कार मिळवणं, हीदेखील तशी ‘सुलभ’च गोष्ट झालेली आहे. त्यामुळे मराठीत ‘हौसेला मोल नाही’ छापाची भरपूर पुस्तकं प्रकाशित होतात. सोशल मीडियामुळे ती भरपूर गाजवताही येतात आणि वाचकांच्या माथीही मारता येतात. परिणामी होत असं की, मराठीत हल्ली ‘ट्रॅश’ म्हणावं असं खूपच लिहिलं, छापलं जातं. आणि वाचनाबाबत पुरेशी सजगता, जागरूकता आणि मार्गदर्शन होत नसल्यामुळे ही ‘ट्रॅश’ पुस्तकंच मोठ्या प्रमाणात वाचलीही जातात. वैद्यांचं हे लेखन मात्र चांगली पुस्तकं, त्यांचं वेगळेपण आणि महत्त्व सांगण्याचं, ठसवण्याचं काम करतं.
पुस्तक वाचत असतानाचा काळ, प्रसंग, त्याचा लेखक, त्याच वेळी आठवणारी इतर पुस्तकं यांबद्दलही वैद्य यांनी लिहिलं आहे. त्यामुळे या नोंदींना अनुभव, निरीक्षण आणि चिंतन असा तिहेरी साज चढलेला दिसतो. सामान्य निरीक्षणं, आस्वादक समीक्षा, रसग्रहणात्मक अभिप्राय, ‘मूड’ष्टोरी अनुभव आणि बयजवार अभिप्राय, असे अनेक प्रकार या पुस्तकात पाहायला मिळतात. पण टोकदार मतं, तिखट अभिप्राय, पूर्वग्रहदूषित चिकित्सा किंवा तर्कदुष्ट निरीक्षणं मात्र पाहायला मिळत नाहीत, ही या पुस्तकाची ‘थोरवी’ आहे. निखळ प्रेम हे निर्मम असतं, ते ‘शहाणीव’ आणि ‘राणीव’ असलेलंही असतं. वैद्यांच्या पुस्तकप्रेमाची-वाचनप्रेमाची ही ‘गाथा’ याच वाटेवरून पुढे जात राहते.
तिसरी गोष्ट म्हणजे खूप वाचणाऱ्या लोकांचा ‘अहम्’ नाही म्हटलं, तरी त्यांच्याही कळत-नकळत मोठा होत जातो. वैद्य यांचं तसं झालेलं नाही, हीदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक नोंदीत वैद्य आहेत, पण त्यांचा ‘मी’ फारच कमी ठिकाणी आहे. आणि जिथं आहे तिथंही तो अतिशय साधेपणानं, नम्रपणानं आणि सहजतेनं आलेला आहे. कुठल्या तरी पुस्तकाच्या निमित्तानं त्यांनी स्वत:विषयी सांगितलंय, पण ते मोजक्याच शब्दांत. पूर्णपणे ‘मी’ केंद्रस्थानी असलेल्या नोंदी या पुस्तकात फारशा नाहीत. स्वत:ला वाचनात, पुस्तकांत विरघळून टाकलेल्या, वाचनमग्न झालेल्या या माणसाचं हे लक्षणही विलोभनीय आहे.
या लक्षणांची अनेक उदाहरणं या पुस्तकात सापडतात. ‘आउटलुक’ मासिकातलं बर्फबारीचं छायाचित्र पाहून त्यांना प्राणकिशोर या काश्मिरी लेखकाची ‘बर्फ पर पडे पदचिन्ह’ ही पूर्वी कधीतरी वाचलेली कादंबरी आठवते. या नोंदीच्या शेवटी ते लिहितात – ‘‘पुस्तकं रोजच्या जगण्याला लटकलेलीच असतात, दिसत नसली तरी’’.
आलोक ओक यांनी संपादित केलेल्या ‘आल्बेर काम्यू – नव्या क्षितिजांचा शोध’ या लेखसंग्रहाबद्दल लिहिताना ते म्हणतात–“या पुस्तकाच्या प्रस्तावनेत एक वाक्य आहे – ‘Every book is a struggle with the self and the world.’ अशा पुस्तकांचं वाचन हाही झगडाच असतो आपल्याशीच, क्वचित आपल्या धारणांशीही.”
अमृतलाल वेगड यांच्या ‘तीरे तीरे नर्मदा’ (अनु. मीनल फडणीस) या प्रवासवर्णनाबद्दल लिहिताना ते म्हणतात – “पुस्तकं वाचल्यावर स्मृतीच्या तळाशी जातात काही दिवसांनी, पण ती असतात तिथे. थोडा कुठे संदर्भ निघायचा अवकाश, वर येतात सरसर. पुन्हा भेटायची ओढ लागते, तेव्हा नजरेसमोर हवीत. पुन्हा त्यात हरवून जाणे शक्य होत नाही, कारण मागे नव्या पुस्तकांची रांग हाकारत असते, पण किमान कृतज्ञतेचा हात दाखवता यावा यासाठी तरी…”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘बिनपावसाचा दिवस’ या अरुण साधू यांच्या कथासंग्रहाविषयी लिहिताना ते म्हणतात – “पुस्तकं आवरताना (तशी ती आपण समजतो तशी फार नाहीत हे लक्षात आलं यानिमित्ताने) त्यांनी नुसताच जाब विचारू नये शंकर वैद्यांच्या कवितेतल्यासारखा, तर दुखणीही सांगावीत, तसा आंतरिक संवाद होतो तेव्हा बरे वाटते.”
चौथी गोष्ट म्हणजे या पुस्तकात जवळपास मराठीच्या बरोबरीने हिंदी पुस्तकांचाही समावेश आहे. मराठीतल्या अनुवादित पुस्तकांविषयी आहे, त्याचप्रमाणे हिंदीत इतर भारतीय भाषांतून अनुवादित झालेल्या पुस्तकांबद्दलही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य यांचा वर्तुळ, व्यास, त्रिज्या आणि परिघ यांचाही तुलनात्मक अंदाज आपल्याला येतो. आपण ‘अभिजात भाषे’चे आणि ‘नोबेल पारितोषिका’च्या तोडीचे दाखले देत असलो, तरी हिंदी साहित्य मराठीपेक्षा कितीतरी अर्थांनी आणि पटींनी पुढे आहे.
पण हिंदी ग्रंथव्यवहारातली एक उणीवही वैद्यांनी एका नोंदीत सांगितली आहे. ज्येष्ठ मुखपृष्ठकार आणि चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या ‘बिटविन द लाइन्स’ या लेखसंग्रहाबद्दल आपला अभिप्राय सांगितल्यानंतर ते पुढे लिहितात - “गेली बारा-पंधरा वर्षं मी हिंदी पुस्तकं पाहतो, वाचतो आहे. हिंदीतला प्रकाशनव्यवहार काहीच्या काही अजस्त्र आहे. बहुतेक पुस्तकं सुरुवातीला फक्त हार्डबाउंडच्या चैनीतच उपलब्ध होतात, काही दिवसांनी त्याच्या निम्म्यापेक्षा कमी किंमत असलेली पेपरबॅक आवृत्ती मिळते. पण एक जाणवलेली गोष्ट अशी की, पुस्तकाचा निर्मितीच्या अंगानं कलावंताला मोकळं सोडणारा विचार हिंदीत होत नाही. किमान माझ्या पाहण्यात तरी नाही. एकाअर्थी लेखकाचा कॉपीराइट आणि प्रकाशकांची मालकी यामधल्या जागेत कुणालाच प्रवेश नाही तिथे, हे याआधीही इतके थेट नाही तरी जाणवले होते… हिंदीत मुखपृष्ठ हाही नाईलाज म्हणून स्वीकारलेला भाग वाटतो. मोठ्या कुणा चित्रकाराचं चित्र थेट, एवढी तसदी मोठ्या लेखनाबाबत घेतली जाते. बाकी तर मुखपृष्ठाचा श्रेयनिर्दशही चित्रकाराच्या नशिबावर अवलंबून असावा. मराठीत व्यवहार कमी असेल खूप, पण याबाबतीत तरी मराठी प्रकाशनव्यवसायाची श्रीमंती अभिमानास्पद वाटते.”
खूप वाचणाऱ्या, तेही पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्या माणसाचे व्रतस्थपणे काम करणाऱ्या माणसासारखेच राग-लोभ तीव्र होत जातात. अशी माणसं एखाद्याचा वाईट अनुभव आला की, त्याच्याबाबत खूपच सावध होतात किंवा त्याला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकतात. वैद्य मात्र तसं करत नाहीत, एखाद्या लेखकाची एक-दोन-तीन पुस्तकं आवडली नाही, तरी ते त्याचं चौथं पुस्तकही विकत घेतात, वाचतात आणि ते आवडलं तर त्याचं कौतुकही करतात, हेही या पुस्तकात पाहायला मिळतं. हीसुद्धा महत्त्वाची आणि अनुकरणीय गोष्ट वाटते.
पाचवी गोष्ट म्हणजे कधी कधी वैद्य पुस्तकाबद्दलचा आपला अभिप्राय दोन-चार ओळींत सांगतात, तर कधी कधी तपशीलवार सांगतात. पण दोन्हींतही साक्षेप असल्यानं ते महत्त्वाचेच ठरतात. सुरुवातीच्या नोंदी छोट्या आहेत, पण आपण वाचत जसजसं पुढे जातो, तसतशा त्या मोठ्या होत जातात. हे त्यांनी जाणीवपूर्वक केलं आहे का, माहीत नाही, पण त्यामुळे एखाद्या शास्त्रीय गायनाच्या मैफलीसारखं हे पुस्तक ‘वाचनीयते’च्या कक्षा चढत जातं, एवढं मात्र नक्की.
सहावी गोष्ट म्हणजे खूप वाचणाऱ्या, तेही पुस्तकं विकत घेऊन वाचणाऱ्या माणसाचे व्रतस्थपणे काम करणाऱ्या माणसासारखेच राग-लोभ तीव्र होत जातात. अशी माणसं एखाद्याचा वाईट अनुभव आला की, त्याच्याबाबत खूपच सावध होतात किंवा त्याला ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकतात. वैद्य मात्र तसं करत नाहीत, एखाद्या लेखकाची एक-दोन-तीन पुस्तकं आवडली नाही, तरी ते त्याचं चौथं पुस्तकही विकत घेतात, वाचतात आणि ते आवडलं तर त्याचं कौतुकही करतात, हेही या पुस्तकात पाहायला मिळतं. हीसुद्धा महत्त्वाची आणि अनुकरणीय गोष्ट वाटते.
सातवी आणि शेवटची गोष्ट म्हणजे वैद्यांच्या या पुस्तकात कथासंग्रह, कादंबऱ्या, प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रसंग्रह, पत्रसंग्रह, आठवणी, आत्मकथनं या वाङ्मयप्रकारातली पुस्तकं भेटतात. पण कवितासंग्रह आणि वैचारिक पुस्तकं फारशी भेटत नाहीत. कवितांचे उल्लेख काही नोंदीत आहेत, नाही असं नाही, पण निखळ वैचारिक स्वरूपाच्या एकाही पुस्तकाचा उल्लेख नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर मला जरा वैषम्य वाटलं होतं. वैद्यांची वैचारिक पुस्तकांबाबतची समज मराठी साहित्यिकांसारखीच सामान्य स्वरूपाची आहे की काय, अशी क्षणभर शंकाही आली होती. पण बावीसाव्या नोंदीत सुरुवातीला कुंवर नारायण यांच्या दोन पुस्तकांतले उतारे, मग मकरंद साठे, नंदा खरे यांचे उतारे देत शेवटी त्यांनी लिहिलंय- “ललितलेखक नाही म्हणून असेल कदाचित, पण हरारीच्या मनात हे भय नाही. तो निर्मम वृत्तीने पाहतो, तपासतो आहे शक्यता. बर्डस आय व्ह्यूप्रमाणे, ड्रोन कॅमेऱ्यातून पाहावे तसा तो माणसाकडे, जगाकडे, इतिहासाकडे, भविष्याकडे पाहतो आहे…’’ ही नोंद वाचल्यावर मला खात्री झाली की, ललितसाहित्यिक आणि वैचारिक लेखक यांच्यातल्या दृष्टीकोनाचा साक्षेपही त्यांच्याकडे आहे.
खूप वाचणाऱ्या लोकांचा ‘अहम्’ नाही म्हटलं, तरी त्यांच्याही कळत-नकळत मोठा होत जातो. वैद्य यांचं तसं झालेलं नाही, हीदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. या पुस्तकातल्या प्रत्येक नोंदीत वैद्य आहेत, पण त्यांचा ‘मी’ फारच कमी ठिकाणी आहे. आणि जिथं आहे तिथंही तो अतिशय साधेपणानं, नम्रपणानं आणि सहजतेनं आलेला आहे. कुठल्या तरी पुस्तकाच्या निमित्तानं त्यांनी स्वत:विषयी सांगितलंय, पण ते मोजक्याच शब्दांत. पूर्णपणे ‘मी’ केंद्रस्थानी असलेल्या नोंदी या पुस्तकात फारशा नाहीत. स्वत:ला वाचनात, पुस्तकांत विरघळून टाकलेल्या, वाचनमग्न झालेल्या या माणसाचं हे लक्षणही विलोभनीय आहे.
थोडक्यात, पुस्तक वाचत असतानाचा काळ, प्रसंग, त्याचा लेखक, त्याच वेळी आठवणारी इतर पुस्तकं यांबद्दलही वैद्य यांनी लिहिलं आहे. त्यामुळे या नोंदींना अनुभव, निरीक्षण आणि चिंतन असा तिहेरी साज चढलेला दिसतो.
सामान्य निरीक्षणं, आस्वादक समीक्षा, रसग्रहणात्मक अभिप्राय, ‘मूड’ष्टोरी अनुभव आणि बयजवार अभिप्राय, असे अनेक प्रकार या पुस्तकात पाहायला मिळतात. पण टोकदार मतं, तिखट अभिप्राय, पूर्वग्रहदूषित चिकित्सा किंवा तर्कदुष्ट निरीक्षणं मात्र पाहायला मिळत नाहीत, ही या पुस्तकाची ‘थोरवी’ आहे. निखळ प्रेम हे निर्मम असतं, ते ‘शहाणीव’ आणि ‘राणीव’ असलेलंही असतं. वैद्यांच्या पुस्तकप्रेमाची-वाचनप्रेमाची ही ‘गाथा’ याच वाटेवरून पुढे जात राहते.
१२३ वर्षांपूर्वी, १९०० साली ‘ग्रंथमाला’ या मासिकात यादव शंकर वावीकर यांचा ‘वाचन’ या विषयावरील दीर्घ निबंध प्रकाशित झाला होता. नंतर तो स्वतंत्रपणे पुस्तकरूपानेही प्रकाशित झाला. १९१०पर्यंत त्याच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या.
या पुस्तकात वावीकर एके ठिकाणी म्हणतात - “अन्न पचन होण्यास तें बेताचेंच खाल्लें पाहिजे; तें सावकाश खाऊन त्याचें चांगलें चर्वण झालें पाहिजे, ह्मणजे तें पचतें. परंतु तेंच अन्न जर जास्त खाल्लें, त्याचें चांगलें चर्वण झालें नाहीं, तर अपचन होईल; इतकेंच नाहीं; तर त्यापासून प्रकृति बिघडून आमांश होईल, त्याचप्रमाणें वाचनाचें आहे. आपलें मन जोंपर्यंत शांत असून वाचनापासून त्याला कंटाळा येत नाहीं, तोंपर्यंतच वाचन चांगलें, परंतु मन व्यग्र होऊन कंटाळवाणें झाल्यावर वाचलें असतां त्यापासून फायदा तर होत नाहींच, परंतु उलट मेंदूस पुष्कळ त्रास मात्र होतो. असाच क्रम कांहीं दिवस चालू असल्यावर मेंदू बिघडून त्याचा स्मरणशक्तीवर अनिष्ट परिणाम होतो! ‘खादाडाला चव नाहीं’ अशी एक ह्मण आपणांत आहे; त्याचप्रमाणे अति वाचणाराला शब्दसौष्ठव, विचारसौंदर्य, शब्दमाधुर्य हीं फारच थोडीं कळतात. भाराभर अति वाचणें चांगलें नसून तें मननपूर्वक बेताचेंच असणें बरें.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
हे पुस्तक वाचताना मला कोकणी साहित्यिक रवीन्द्र केळेकर यांच्या ‘ओथांबे’ (मराठी अनुवाद – रेखा देशपांडे, पद्मगंधा प्रकाशन, २०१०) या पुस्तकाची आठवण होत होती. केळेकर यांचा हा मुक्तचिंतनपर स्फुट लेखांचा, खरं तर, छोट्या-मोठ्या नोंदीचा संग्रह. ‘ओथांबे’ या कोंकणी शब्दाचा अर्थ आहे – ‘पाऊस पडून गेल्यावर पानापानांवरून ओघळणारे थेंब’.
वैद्यांचे हे वाचन-ओथांबे ओंजळीत झेलून घ्यावेत आणि मग त्यांनी सांगितलेल्या पुस्तकांच्या आडवाटांवरून चालायला सुरुवात करावी. या सगळ्या आडवाटा आपल्याला मूळ पुस्तकांच्या हमरस्त्याकडे घेऊन जातील.
वैद्यांनी ज्येष्ठ बंगाली नाटककार बादल सरकार यांच्या पत्रसंग्रहाविषयी लिहिताना म्हटलंय की, ‘…हमरस्ता गंतव्य स्थानाकडे नेतो हे खरेच, पण समृद्ध तर आडवाटाच करतात.’ वैद्यांचं हे पुस्तकही नेमकं हेच काम करतं.
‘वाचन-प्रसंग’ – नीतिन वैद्य
मधुश्री पब्लिकेशन, पुणे | पाने – २१६ | मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Jayant Raleraskar
Wed , 22 November 2023
उत्तम परीचय. पुस्तकाबद्दल कुतूहल वाढवणारे.