तंत्रज्ञानाचा वापर मानवी सुखासाठी असल्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापरातून सुखकारक वातावरण निर्मिती होणार आहेच. तसेच इतर खूप काही घडणार आहे
पडघम - तंत्रनामा
विजय तांबे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 21 November 2023
  • पडघम तंत्रनामा चॅट जीपीटी Chat GPT एआय AI कृत्रिम बुद्धिमत्ता Artificial intelligence

गेली अनेक वर्षे आपण इंटरनेट वापरतो. ‘कॉम्प्युटर’, ‘लॅपटॉप’, ‘हार्डडिस्क’, ‘प्रोग्रामिंग’ असे खूप शब्द आपल्या दैनंदिन वापरातले आहेत. टुजी, थ्रीजी, फोरजी नंतर आता फाईव्हजीचे आगमन झाले आहे. थ्रीजी नंतर वेगवेगळी ॲप काम करू लागली. फोरजीनंतर ओला, उबर, स्विगी, झोमॅटो असे अनेक शब्द आता मराठी झाले आहेत. गेल्या ३०-३५ वर्षांत आपण किती बदलून गेलोय, हे आपल्याला विसरायला झालंय.

तंत्रज्ञानातून येणाऱ्या नवनवीन सुखसोयींचे आपण स्वागत केले. माझा ‘आज’ अधिकाधिक सुखकर बनवण्याची जबाबदारी तंत्रज्ञानाने घेतल्याने आपण सगळे खुश झालो आहोत. या वर्षी फेब्रुवारी-मार्चच्या आसपास मराठी वृत्तपत्रांतून दोन नावे येऊ लागली- ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आणि ‘चॅट जीपीटी’. त्यावर छोटे छोटे लेखही यायला लागले. तंत्रज्ञान प्रगत असलं, तरी धोक्याचे इशारे येऊ लागले आणि २ मे २०२३ रोजी बातमी आली ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे पितामह’ जॉफरी हींटन यांनी वयाच्या ७६ व्या वर्षी मायक्रोसॉफ्टचा राजीनामा देताना म्हटले ‘वातावरण बदलाच्या धोक्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता जास्त धोकादायक आहे.’ हींटन हे दुर्लक्ष करण्यासारखे व्यक्तिमत्त्व नसल्याने जगभर खळबळ उडाली.

अनेक वर्षे आपण तंत्रज्ञानाची प्रगती अनुभवत आहोत. ही प्रगती दिवसेंदिवस अतिशय वेगाने होत असते. पसरत असते. आपण तंत्रज्ञानाचा फायदा घेतला. त्याने दिलेल्या सुखसोयींमध्ये बुडून गेलो. मात्र हे तंत्रज्ञान इथेच थांबणार नाही, तर पुढे पुढे जात राहणार. पुढे जाणार म्हणजे नक्की कुठल्या दिशेला आणि त्याचे परिणाम काय होणार, हे प्रश्न आपण कधी स्वतःला विचारले का? याबद्दल आपण सिरिअसली विचार केलाय का? याचे उत्तर आपण प्रत्येक वाचकाने स्वतःला द्यायचे आहे. असो. कृत्रिम बुद्धिमत्तेने गोंधळ घातला, असं का वाटतं, ते समजून घेऊ.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विज्ञानाच्या सिद्धान्तांचा वापर करून तंत्रज्ञान निर्माण होते. ते उपयुक्त आणि फायद्याचे आहे हे सिद्ध झाल्यावर त्यात पैसे गुंतवले जातात आणि त्याचा वापर सार्वत्रिक होतो. याचे समाजाला फायदे होत असतात. जसे तंत्रज्ञान विकसित होत गेले तशा कारखान्यातून निर्माण होणाऱ्या वस्तू अधिक सुबक, सुंदर होऊ लागल्या. उत्पादन अतिशय वेगवान झाले. टेलिफोन ते इंटरनेट असा प्रवास पाहिला, तर संपर्क व्यवस्था किती जलद आणि विस्तारित झाली आहे, याचा आपल्याला अंदाज येईल.

तंत्रज्ञान कितीही प्रगत होत गेले, तरी ‘बुद्धिमत्ता’ किंवा ‘प्रज्ञा’ हे शब्द त्यामध्ये आलेले नव्हते. त्यांचा वापर आता होत आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ही फक्त प्रगत प्रणाली नाही, तर ती स्वतःहून विकसित होत जाणारी प्रणाली आहे. ही प्रणाली जेवढे काम करेल, तेवढा डाटा तयार होईल. त्याशिवाय निर्मितीच्या वेळी पुरवलेला डाटा आणि इंटरनेटच्या माध्यमातून मिळणारा अफाट डाटा, या सगळ्यातून तिचा विकास स्वतःहून होईल.

तज्ज्ञांच्या मते हा विकास घातांकीय (exponential) पद्धतीने होतो. तंत्रज्ञानाचा कितीही विकास झाला, तरी आजपर्यंत त्याची सूत्रे मानवाकडे होती. त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांना मानव जबाबदार होता. तंत्रज्ञानाचा वापर मानवी सुखासाठी असल्याने ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या वापरातून सुखकारक वातावरण निर्मिती होणार आहेच. तसेच इतर खूप काही घडणार आहे.

आपण ‘चॅट जीपीटी ४’ या बहुचर्चित ॲपचे उदाहरण घेऊ. हे ॲप माहितीच्या संदर्भात काम करते ही पुरेशी ओळख नाही. हे ॲप शब्दाच्या संदर्भातील तुमची सगळी कामे करते हे खरे वर्णन होऊ शकेल. शब्दांसोबत आपली असंख्य कामे असतात. मित्रांना मेल ते नोकरीच्या अर्जापासून प्रबंध लिहिण्यापर्यंतच हे ॲप थांबत नाही. तर हे ॲप तुम्ही सांगाल तशी कथा, कवितासुद्धा लिहून देते.

आपण गुगल सर्च इंजिनवर माहिती शोधतो. त्या वेळी आपण कशाची माहिती शोधतोय, त्या माहितीचे आपल्याला काय करायचे आहे, याबद्दल आपल्या मनात एक आराखडा तयार असतो. तो आराखडा तयार करताना आपण डोक्याला ताण दिलेला असतो, अनेक शक्यता तपासलेल्या असतात.

आजच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न हे पूर्णपणे नवीन आहेत. त्यामुळे मागची कुठलीही पुस्तके उपयोगाची नाहीत. थोडक्यात, ‘रेडिमेड’ उत्तरे मिळणार नाहीत. आपले सगळे पारंपरिक संस्कार बाजूला ठेवून मानवी मूल्यांच्या आधारे या सगळ्या प्रश्नांचा नव्याने विचार केला, तर मनुष्यप्राणी म्हणून आपण आपले अस्तित्व नक्कीच टिकवू शकू.

तुम्हाला काय हवे आहे ते ‘चॅट जीपीटी ४’ला सांगा. किती शब्दांत हवे आहे ते सांगा. थोड्या सेकंदांत लेख मिळेल. आलेल्या लेख मनासारखा नसेल, तर त्यात बदल करायला सांगायचा. परत काही सेकंदांत नवीन लेख मिळेल. आराखडा तयार करण्यासाठी विविध अंगाने विचार करण्याची गरज राहिलेली नाही. शिरवाडकर  शैलीतून एकांकिका मिळेल, ग्रेस  शैलीतून कविता किंवा गौरी देशपांडे शैलीतील लघुकथा मिळू शकेल. फक्त तुम्हाला तुमच्या अपेक्षा कळवायच्या आहेत. हवा तसा माल मिळेल.

इथे उदाहरणासाठी मराठी साहित्यिक घेतले. ते इतक्या लवकर मिळणार नाहीत, मात्र शेक्सपियरच्या शैलीतले नाटक मिळेल. हे नुसते सुख नाही तर खूपच सुख आहे. तरीही हे ऐकून आपल्याला अस्वस्थ व्हायला का होते? माणूस म्हणून आपलं अस्तित्व धोक्यात आलंय का, अशी भीती वाटू लागते. मग आपल्याला अजून एक साक्षात्कार होतो.

आजपर्यंत आपण असे शिकलोय की, माणसाचे श्रम कमी व्हावेत म्हणून तंत्रज्ञानाची प्रगती होते. प्रगत तंत्रज्ञान आल्यावर प्रत्यक्ष श्रम करणाऱ्यांची, मजुरांची, कारखान्यातील हजारो कामगारांची गरज राहणार नाही. त्यांचे रोजगार कमी होते. त्यांची जागा यंत्र घेतील. आज एक महत्त्वाचा फरक झालेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान जेवढे विकसित होईल, तेवढे कचेरीत काम करणाऱ्यांची, माहिती साठवून तिचा वापर करणाऱ्यांची गरज संपत जाईल. माहितीच्या आधारावर बुद्धिमान समजली जाणारी मंडळी आता कालबाह्य होणार आहेत. मात्र नळदुरुस्त करणारे किंवा वायरमन अशी कौशल्याची आणि श्रमाची कामे करणारी मंडळी टिकून राहतील. थोडक्यात मध्यमवर्गीय पांढऱपेशा मंडळींसाठी पुढचा काळ धोक्याचा आहे.

आपल्याला सुखासीनतेची, वस्तूवैपुल्याची आवड निर्माण होऊन काही दशके उलटली. त्यासाठी तंत्रज्ञानाने तुम्हाला खरेदी सोपी करून दिली आहे. दुकानात जाण्याचे कष्ट करण्याची गरज नाही. आता ‘चॅट जीपीटी ४’ तुमचा विचार करण्याची आवश्यकता कमी करून टाकणार आहे. अशा वेळी माणूस नावाचा प्राणी कसा वागायला लागेल, या प्रश्नाने आपल्याला त्रास व्हायला हवा.

शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, उद्योग, सेवाक्षेत्र, शेती इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव होणार आहे किंवा एव्हाना झालाही असेल. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळू शकत नाही. यातून उडत्या गाड्या, स्वयंचलित गाड्या, एक दिवसात घर बांधणे, अशा अनेक सुरस कहाण्या ऐकायला मिळतील, मात्र त्यासोबतच बेरोजगारीचे मोठे संकट जगभर येण्याची चाहूल लागलेली आहे.

सध्या सर्वत्र दोन रोग पसरले आहेत. पहिला आहे, ‘सेल्फी रोग’. तो सर्व जाती-धर्मात असून त्याने श्रीमंती गरिबीची सीमा ओलांडलेली आहे. दुसरा रोग आहे, ‘रिल्स रोग’. समाजमाध्यमांवर हे रिल्स बघताना आपले तासनतास कसे जातात ते कळत नाही. हे डोके रिकामे ठेवण्याचे व्यसन आहे. अशा स्थितीत माणूस बऱ्यापैकी सवंग आणि उथळ असतो आणि त्यातूनच तो कायम सोपी उत्तरे शोधतो. ही माणसे अस्मिता आणि हिंसा चटकन जवळ करतात. त्यातून हिंसेचा वापर करून अस्मितेचे राजकारण करणे सोपे जाते.

आता या सगळ्याच्या मदतीला तंत्रज्ञानसुद्धा आहे. अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांत २०२४मध्ये निवडणुका आहेत. त्या वेळी आवाज आणि प्रतिमा वापरून कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेऊन खोटे व्हिडिओ बनवले जातील, जनतेत खोटा प्रचार केला जाईल, समाजात दुही माजवली जाईल, अशी भीती दोन्ही देशातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

आज ‘चॅट जीपीटी ४’ हे फक्त शब्दांपुरते आहे, येणाऱ्या ‘चॅट जीपीटी ५’मध्ये शब्दांसोबत चित्रे, चलचित्रे, आवाज यांचा अंतर्भाव असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी आपण पुरवलेली चित्रे, फिल्म, आवाज हा सगळा कच्चामाल किंवा डाटा आहे. त्याचा वापर करून तुम्ही दिलेल्या आज्ञेनुसार तुम्हाला हवे ते उपलब्ध होऊ शकते. उदाहरणार्थ सगळ्या हिंदी फिल्मचा वापर डाटा म्हणून केला, तर मधुबाला पुन्हा हीरोइन म्हणून येऊ शकते. त्यामुळे खोटे व्हिडिओ अगदी खऱ्या सारखे बनवणे सुलभ होणार आहे. हे जसे गमतीशीर आहे, तसेच ही भयंकर धोक्याची सूचना आहे, हे विसरून चालणार नाही.

तंत्रज्ञानाला विचारसरणी, नैतिकता वगैरे काही नसते. मानव जातीने तंत्रज्ञानाला विचार करायची, निर्णय घेण्याची क्षमता प्रदान केली आहे, मात्र हे तंत्रज्ञान होणाऱ्या परिणामांना जबाबदार नाही. तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून समाज अधिकाधिक प्रल्गभ होत जातो, असा एक पूर्वापर गैरसमज आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्त्री-पुरुष संबंधांबाबत स्त्री ही दुय्यम आणि भोगाचे साधन असून पुरुष हा प्रधान आहे, हे बालपणापासून डोक्यात ठसवले जाते. अगदी आपल्या नकळत आपल्या अंतर्मनात हे खोल दडलेलं असतं. यासंदर्भात तंत्रज्ञानाबद्दलचा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. तंत्रज्ञान हे बाजाराच्या मागणीनुसार ग्राहकांच्या आवडीनिवडी, लालसा यांना गोंजारत विकसित होतं. अन्यथा त्या तंत्रज्ञानाला विकसित होण्यासाठी, भांडवल गुंतवणूक करणारा मिळणं कठीण असतं.

चॅट जीपीटी ४ वा ५ आणि त्यासारखी निर्माण झालेली शेकडो ॲप ही फायद्याची मॉडेल असतात. जगात इंटरनेटचा सर्वाधिक वापर, हा अश्लील चित्रफिती बघण्यासाठी होतो, हे सर्वांना माहीत आहे. जगात इंटरनेटवर अश्लील चित्रफिती बघण्यामध्ये भारताचा नंबर तिसरा आहे. याची तपशीलवार आकडेवारी इंटरनेटवर उपलब्ध आहे.

आता तंत्रज्ञान अजून प्रगत झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे आगमन झालेले आहे. त्यातून विकसित झालेल्या तंत्रज्ञानाची दोन उदाहरणे देतो. पहिल्या उदाहरणात जगातले कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सर्वोत्तम दहा रोबो आहेत, त्यापैकी नऊ महिला आहेत. या सुंदर नटलेल्या रोबो महिलांना नावे आहेत. त्या रिसेप्शनिस्ट, वस्तू विक्रीसाठी किंवा बातम्या देण्यासाठी असतात. दहावा रोबो समुद्रात जाऊन तेलाचा शोध घेतो, त्याला पुरुषाचे नाव दिले आहे. बिचाऱ्याला पुरुष म्हणून सजवलेदेखील नाही, अगदी टिपिकल रोबो आहे तो.

यामध्ये स्त्रियांना प्राधान्य नसून स्त्रीही शोभेची वस्तू असल्याची भूमिका आहे, हे आपल्याला मान्य करायला हरकत नाही. दुसरे उदाहरण म्हणजे ‘हार्मनी’ नावाच्या महिला रोबोची २.०० व्हर्जन ही पुरुषांना मानसिक आणि शारीरिक सुख देण्यासाठी बनवत आहेत. २०२३ अखेरपर्यंत ‘हार्मनी २.००’ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल. सुरुवातीला फक्त एक हजार ‘हार्मनी २.००’ बनवल्या जाणार आहेत. त्यांची किंमत पाच ते आठ हजार डॉलरच्या दरम्यान असेल. मात्र ग्राहकांना मागणीप्रमाणे खास बनवून हवी असेल तर किंमत पन्नास हजार डॉलरपर्यंत वाढेल. याचे युट्युबवर व्हिडिओ आहेत. एकंदर परंपरागत दृष्टीकोनाला तंत्रज्ञान खतपाणी घालून धंदा वाढवत आहे, याचे हे आदर्श उदाहरण आहे.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा

चॅट जीपीटी - कृत्रिम बुद्धिमत्तेचा नवीन आविष्कार की, ‘इंडस्ट्री ४.०’मधील सर्वांत क्रांतिकारक घटना? नेमकं आहे तरी काय?

आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण होऊ शकणारे धोके, हे येत्या काळात मानवजातीपुढील मोठे आव्हान असणार आहे...

तंत्रज्ञानाला स्वत:चा विचार, नीतिमत्ता, मूल्ये असे काही नसते. आणि असल्या गोष्टीला आपण ‘बुद्धिमत्ते’चे हत्यार देऊन बसलो आहोत

चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी वास्तवता आणि ‘निरुपयोगी वर्गा’चा उदय

चॅट जीपीटी : कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या साधनाचा सगळ्या मोठा दुष्परिणाम लेखनकलेवर होऊ शकतो. ही कलाच संपुष्टात येऊ शकते

.................................................................................................................................................................

यापुढे शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, उद्योग, सेवाक्षेत्र, शेती इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिरकाव होणार आहे किंवा एव्हाना झालाही असेल. आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला टाळू शकत नाही. यातून उडत्या गाड्या, स्वयंचलित गाड्या, एक दिवसात घर बांधणे, अशा अनेक सुरस कहाण्या ऐकायला मिळतील, मात्र त्यासोबतच बेरोजगारीचे मोठे संकट जगभर येण्याची चाहूल लागलेली आहे.

‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ ते भारताचा ‘नीती आयोग’ या सर्वांनी या बेरोजगारीचे भाकीत केलेले आहे. दरवेळी तंत्रज्ञान बदलले की बेरोजगारी होणार, असे बोलले जाते, पण त्याच वेळी दुसरे रोजगार तयार होतात, असा एक युक्तिवाद केला जात आहे. मात्र दरवेळी बदलणारे तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, यामध्ये हाच फरक आहे. बदलत्या तंत्रज्ञानातून माणसाची एक एक जुनी कौशल्यं कमी होत गेलेली दिसतील.

अगदी सोपी उदाहरणे म्हणजे उत्तम हस्ताक्षरासाठी कोणी आता कष्ट करते का? किंवा अंकलिपीतील दोन ते शंभर  पाढे पाठ करण्याची कोणाला गरज आहे का? खरे तर हीसुद्धा अगदी जुनी उदाहरणे झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तुमची डोक्याला ताप देऊन विचार करण्याची शक्ती कमी होईल. माणसाच्या बुद्धीवर जाड तवंग पसरेल. पारंपरिक संस्कारांचे रूपांतर अधिक उथळपणे प्रकट होईल. नव्हे आत्ताच ते होत आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

ढोल पथकात पुरुषांच्या बरोबरीने महिला ढोल वाजवतात. त्यात त्यांना बरोबरीचा आणि परंपरेचा असे डबल आनंद मिळतात. तशा मुलाखतीचे ‘रिल्स’ फिरत आहेत. या सगळ्यात अधिक प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर आपला पुढचा समाज कसा असेल? माणूस म्हणून स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक प्रगल्भतेने एकोप्याने ताठ उभा असेल की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वावटळीत त्याचा पालापाचोळा झाला असेल? पुढील शिक्षण कसे असेल? रोजगार किती असतील? कोणते असतील? त्याचे स्वरूप काय असेल? रोजगार न मिळालेल्या लोकांनी काय करायचे? कुटुंब व्यवस्था कशी असेल? स्त्री-पुरुष संबंधांचे स्वरूप कसे असेल?

हे सगळे प्रश्न आता सूक्ष्म स्वरूपात दिसत असले, तरी लवकरच डोके वर काढणार आहेत. आजच्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले प्रश्न हे पूर्णपणे नवीन आहेत. त्यामुळे मागची कुठलीही पुस्तके उपयोगाची नाहीत. थोडक्यात, ‘रेडिमेड’ उत्तरे मिळणार नाहीत. आपले सगळे पारंपरिक संस्कार बाजूला ठेवून मानवी मूल्यांच्या आधारे या सगळ्या प्रश्नांचा नव्याने विचार केला, तर मनुष्यप्राणी म्हणून आपण आपले अस्तित्व नक्कीच टिकवू शकू.

‘पुरुष उवाच’ दिवाळी २०२३मधून साभार

.................................................................................................................................................................

लेखक विजय तांबे सामाजिक कार्यकर्ते आणि कथाकार आहेत.

vtambe@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......