अजूनकाही
१. सत्तेत आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना तत्त्वांचा विसर पडला आहे. सत्तेच्या नशेमुळे मी दिलेली शिकवण ते विसरले आहेत, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले. शुंगलू समितीच्या अहवालात केजरीवाल यांच्यावर करण्यात आलेल्या दोषारोपांच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. केजरीवाल यांच्यासारख्या शिकलेल्या तरुणांमुळे देश भ्रष्टाचारमुक्त होईल, असे स्वप्न मी पाहिले होते. पण ते आता भंगले आहे, अशी खंत अण्णांनी व्यक्त केली. आंदोलनाच्या काळात केजरीवाल माझ्यासोबत होते. त्यावेळी मी त्यांना चारित्र्यवान बनण्यासाठी पंचसूत्री सांगितली होती. माझे जीवन पाहून केजरीवाल प्रभावित झाले होते. मात्र, सत्तेची नशा चढल्यामुळे त्यांना या सगळ्या तत्त्वांचा विसर पडल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले.
कोणाच्या सुपारीमुळे अण्णांना आता अचानक कंठ फुटला आहे, असा प्रश्न हे आत्मस्तुतीने आणि दंभाने भरलेलं निवेदन वाचून कोणालाही पडेल. अण्णांचं, चतुराईने प्रोजेक्ट केलेलं जीवन पाहून केजरीवालांप्रमाणे देशातले अनेक लोक प्रभावित झाले होते. प्रत्यक्षात अण्णांनी भलतीच रामलीला करून वेगळीच सुपारी वाजवली, हे पाहिल्यावर त्यांचा जो भ्रमनिरास झाला, त्याच्या पासंगालाही केजरीवाल पुरणार नाहीत.
.............................................................................................
२. तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य न केल्यामुळे दिल्ली ते कोलकाता विमानाला अर्धा तास उशीर झाला. सेन या आपल्या आईसोबत प्रवास करत होत्या. त्यांची आई व्हीलचेअरवर होती. त्यांच्या आईसाठी जो बोर्डिंग पास देण्यात आला होता तो इमर्जन्सी एक्झिटशेजारी होता. नियमांप्रमाणे व्हीलचेअरवर असणाऱ्या व्यक्तीला या एग्जिट डोअरजवळ सीट देता येत नाही. त्यामुळे तुम्ही जागा बदला, अशी विनंती डोला सेन यांना करण्यात आली. त्यांनी ही विनंती धुडकावली आणि वाद घातला.
या मंडळींपैकी कोणी उद्या खासदार आहोत म्हणून पायलटच्या मांडीवरच बसण्याचाही आग्रह धरला तरी आश्चर्य वाटणार नाही. सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे सर्वपक्षीय निधीतून एक सर्वपक्षीय एअरलाइन्स सुरू करावी. देशभरातल्या राजकीय पक्षांच्या सदस्यांना, मंत्र्यासंत्र्यांना आणि आमदार-खासदारांनी त्या विमानसेवेचा लाभ घ्यावा आणि तिथे आपली हवी तेवढी अरेरावी करावी. हवं तर समुद्रावर आळीपाळीने विमानही चालवून पाहावं.
.............................................................................................
३. मारेकरी, गुंड, गुन्हेगार यांना हिंदू आणि मुस्लिम या नजरेतून बघू नये. आरोपी हा आरोपीच असतो, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत मांडले. राजस्थानमध्ये अलवार महामार्गावर दोन दिवसांपूर्वी सहा वाहनांमधून गायींची दुग्धपालनासाठी वाहतूक करत असताना २००हून अधिक गोरक्षकांनी चालकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू झाला.
आपल्या पाळीव राष्ट्रीय मुस्लिमत्वाला जागणारंच नक्वी यांचं हे वक्तव्य आहे. गुंड हे गुंडच असतात, हे फक्त धर्मनिरपेक्ष गुंडगिरीच्या बाबतीतच सत्य असू शकतं. जेव्हा गुंड कायदा हातात घेऊन किंवा सरकारच्या समर्थनाच्या खात्रीने विशिष्ट धर्माच्या लोकांना ठरवून लक्ष्य करतात, एखाद्या पाळीव जनावरावरच्या श्रद्धेची ढाल करून कोणाचा जीव घेतात, तेव्हा ते त्या धर्माच्या नावानेच हैदोस घालणारे गुंड असतात, धार्मिक गुंडच असतात.
.............................................................................................
४. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे पक्षीय आणि वैचारिक मतभेद दूर ठेवून तब्बल तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीला धावल्याने दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मनमोहन सिंग यांच्या दिलदार वृत्तीची चर्चा सध्या रंगली आहे. गुरुवारी राज्यसभेने एकच कररचना लागू करणाऱ्या ऐतिहासिक अशा वस्तू व सेवा कराला साहाय्यभूत ठरणारे चार कायदे पारित केले होते. यामुळे एक जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला. सत्ताधारी मोदी सरकार राज्यसभेत अल्पमतात आहे. काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सुचवलेल्या दुरुस्तीचा आग्रह धरला नाही. सर्वसहमती व्हावी यासाठी मनमोहन सिंग यांनीच हा सल्ला दिला होता, असे रमेश यांनी जाहीर केले आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सत्ताधारी बाकावरील अर्थमंत्री अरुण जेटली यांनीदेखील मनमोहन सिंग यांचे आभार मानले.
अरे देवा, सोनिया गांधींच्या आणि राहुल गांधींच्या हुकुमावर नाचणारा मूक बाहुला अशी त्यांची प्रतिमा बोलभांड पक्षाच्या निष्ठावंत अनुयायांनी सर्व माध्यमांत रंगवलेली असताना त्यावर मनमोहन सिंगांची दिलदारी मात करणार की काय! छट्, आता उद्यापासून पाहा, सगळ्या सोशल मीडियात मनमोहन सिंगांची कशी वरात काढतील, ऊर्जित पटेल स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे झटपट अर्थतज्ज्ञ.
.............................................................................................
५. आमिर खानच्या 'दंगल' या लोकप्रिय सिनेमातले तिरंग्याचे आणि राष्ट्रगीताचे दोन सीन वगळा आणि मगच हा सिनेमा पाकिस्तानात प्रदर्शित होईल, या पाकिस्तानी सेन्सॉर बोर्डाच्या अटीपुढे सहनिर्माता आणि अभिनेता आमिर खान झुकला नाही. पाकिस्तानातले अनेक सिनेवितरक हा सिनेमा प्रदर्शित करण्यास उत्सुक असताना सेन्सॉर बोर्डाने त्या दोन कटची मागणी केल्याने आमिरने पाकिस्तानात चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. हे दोन्ही सीन महत्त्वाचे आहेत, शिवाय ही मागणी अनावश्यक वाटते. त्यामुळे एकतर सिनेमा आहे तसा प्रदर्शित करायचा किंवा प्रदर्शितच करायचा नाही, असे ठरवण्यात आले, अशी माहिती आमिर खानच्या प्रवक्त्याने दिली.
केवढी ही कानठळी शांतता! एका खानाने, तेही हिंदी सिनेमाच्या, खरं तर हिंदवी सिनेमाच्या आयत्या बिळावर भुजंगांसारख्या बसलेल्या ‘खानावळी’तल्या एकाने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं म्हणजे धर्माभिमान्यांसाठी लाहौलविलाकुव्वत! याच खानावर बहिष्कार घालण्याच्या मागणीसाठी केकाटलेली तोंडं आता गप्प झाली आहेत, पण लवकरच ती काही ना काही निमित्त काढून भुंकू लागतीलच. आताही त्यांना स्नॅपडीलवरच्या बहिष्काराची आठवण होते; पण, याच आमिर खानच्या याच ‘दंगल’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन कचऱ्यात फेकून सर्वाधिक भारतीयांनी तो पाहिला, याची आठवण काही केल्या होत नाही.
.............................................................................................
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Sun , 09 April 2017
<<"आपल्या पाळीव राष्ट्रीय मुस्लिमत्वाला जागणारंच नक्वी यांचं हे वक्तव्य आहे. गुंड हे गुंडच असतात, हे फक्त धर्मनिरपेक्ष गुंडगिरीच्या बाबतीतच सत्य असू शकतं. जेव्हा गुंड कायदा हातात घेऊन किंवा सरकारच्या समर्थनाच्या खात्रीने विशिष्ट धर्माच्या लोकांना ठरवून लक्ष्य करतात, एखाद्या पाळीव जनावरावरच्या श्रद्धेची ढाल करून कोणाचा जीव घेतात, तेव्हा ते त्या धर्माच्या नावानेच हैदोस घालणारे गुंड असतात, धार्मिक गुंडच असतात.">> कसे लाख मोलाचे विचार लिहिलेत, आमचे ही हेच म्हणणे तर आहे. ११ ऐगस्त२०१२ रोजी २ लोकांचा जीव घेणारे, ५४ लोकांना जखमी करणारे (त्यातले ४५ तर पोलीसच होते,) महिला पोलीसावर पण हल्ले करणारे आणि एकूण पावणे तीन कोटींच्या मालमत्तेची नासधूस करणारे लोक धार्मिक गुंडच तर होते . अगदी बरोबर . गुंड गिरीला, दहशतवादाला जात, धर्म, लिंग प्रादेशिकता राष्ट्रीयत्व सगळे काही असते.