अजूनकाही
‘कामरेड का कोट’ ही सृंजय या सुप्रसिद्ध हिंदी कथाकाराची दीर्घकथा अमरनाथ सिंग यांनी नुकतीच मराठीत अनुवादित केली आहे. १९८६च्या दरम्यान बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील बलुआ या गावातल्या डाव्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कमलनाभ उपाध्याय या कार्यकर्त्याच्या जीवनात घडलेली ही घटना आहे. ती सृंजय यांनी कथारूपात सांगितली आहे.
१९२५ साली भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर या पक्षाचे वैचारिक मतभेदांतून दोन-तीन तुकडे होऊन ते आपापल्या कार्यपद्धतीप्रमाणे कार्यरत राहिले. कम्युनिस्टांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठा सहभाग होता, हे वास्तविक सांगण्याची गरज नाही. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील त्यांच्या योगदानाबद्दल बरेच लिहिले गेले आहे. रशियाच्या ‘पेरोस्त्राईका’ प्रयोगानंतर म्हणजे १९९१पासून जगभरात कम्युनिस्टांचा प्रभाव कमी होत गेला, आणि गेल्या दोन दशकांत तो अजूनही क्षीण झाला आहे, अशा प्रकारचा प्रचार उजव्या शक्ती करत असतात. त्यात तथ्यही आहे.
प्रसिद्ध तत्त्वज्ञ आणि मार्क्सवादी मानसशास्त्रज्ञ (स्लावेनियन) स्लावोझ झिझेक यांनी ‘विसाव्या शतकातील पोथीनिष्ठ डावा विचार’ संपलेला आहे आणि २१व्या शतकात त्याचे पुनर्मूल्यांकन करायला हवे, असे जोरदार प्रतिपादन केलेले आहे. २१व्या शतकासाठी डावी विचार पद्धती वेगळ्या रूपात मांडण्याची आणि त्याचे आकलन करून घेण्याची आवश्यकता त्यांनी अनेकदा अधोरेखित केली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आजची तंत्रयुगीय क्रांती, पद्धतशीरपणे सुरू असलेले शीतयुद्ध आणि छुपे साम्राज्यवादी आक्रमण, या व अशा अनेक गोष्टींचे आकलन विसाव्या शतकातील डाव्या पोथीनिष्ठ विचार पद्धतीने होऊ शकणार नाही, असे झिझेक म्हणतात. जगाच्या वेगळ्या पद्धतीने विकसित होत गेलेल्या भांडवली, राजकीय, सामाजिक, आणि सांस्कृतिक संहितेच्या संदर्भामध्ये आपणाला हे वेगळ्या पद्धतीने समजावून घ्यावे लागेल असा त्यांचा आग्रह आहे.
याला नव-मार्क्सवादाचेच रूप म्हणावे लागेल, पण हे विसाव्या शतकातील डाव्या ‘रॅडिकल्स’ना कितपत मान्य होईल, याबद्दल त्यांना शंका आहे. त्यांच्या या म्हणण्यात तथ्य असावे, असे म्हणायला जागा आहे.
सृंजय यांची ही दीर्घकथा याच वळणांनी जाणारी आहे. ती प्रथम हिंदीमधील ‘हंस’ या प्रतिष्ठित नियतकालिकात प्रसिद्ध झाली, तेव्हा लेखक-प्रकाशक यांच्यावर जवळपास दोन वर्षं वर्तमानपत्रांतून आणि मासिकांतून वाद-प्रतिवाद झडत राहिले. या कथेमुळे सृंजय यांना भरपूर शत्रू मिळाले. आजही अभिजात साहित्यिक समुदायात त्यांच्याविषयीचा आकस तेवढाच तीव्र आहे.
राजकीय पक्षात काम करत असताना कार्यकर्त्यांना पॉलिट ब्युरो, पार्टी लाईन, पक्ष शिस्त, या व अशा अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. हे साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांमध्ये आढळते. पण डाव्या पक्षांमध्ये याचा फार काटेकोर पद्धतीने अंमल होतो. त्याची बरीच गाजलेली उदाहरणेही आहेत.
राजकीय पक्षांमध्ये वरून खाली येणारे आदेश शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचतात. त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे वर्तन, त्यांनी केलेल्या कृती, व्यवहार तपासले जातात. पक्ष, संघटना, नेते, कार्यकर्ते, समाजात कार्यरत असण्यासाठी निर्माण केलेली शिस्त, अशा अनेक गोष्टी असतात. त्याची अर्थातच आवश्यकताही असते. पण परिस्थिती पाहून, सर्व अंगांचा अभ्यास करून, कधी कधी काही निर्णय बदलावे लागतात. एखादा प्रश्न वेगळ्या पद्धतीने हाताळावा लागतो, पण कर्मठ नेते तसे करतील याची शाश्वती नसते. यांवरही आजवर विपुल प्रमाणात लिहिले गेले आहे.
पण हे सर्व होत असताना नेतेगिरी, एखाद्या नेत्याचा वर्चस्ववादी वृत्तीचा अतिरेक, नेमके काय घडले आहे, हे समजावून न घेण्याची वृत्ती, त्यातून निर्माण होणारा गोंधळ, वगैरे अनेक गोष्टी घडत असतात. पण त्याबद्दल जाहीर वाच्यता केली जात नाही. नेमक्या याच बाबींवर ही कथा बोट ठेवते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कमलनाभ उपाध्याय यांच्या गावात बाबू जगतनारायण हा जुलमी सरंजामदार असतो. हवेली बांधण्याच्या निमित्ताने त्याने गावातील मजूर बोलावलेले असतात. बऱ्यापैकी कामही झालेले असते, पण मजुरीवरून वाद निर्माण होतो. तेव्हा मजुरी वाढवून देण्याचे नाकारून जगतनारायण दुसऱ्या मजुरांना बोलावून काम सुरू करतो. त्यातून बाचाबाची होते. गावात आपली सत्ता, दहशत आणि वचक राहिला पाहिजे, यासाठी जगतनारायण चार कामगारांचे मुडदे पाडून त्यांना वेशीवरच्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाला उलटे लटकवतो.
कमलनाभ गावातल्या शाळेत शिक्षक म्हणून काम करत असतो. त्याने गावात काही कामही उभे केलेले असते. गावातील कामगारांचे प्रबोधन करून, त्यांना एकत्र आणून कमलानाभने गावातल्या कामगारांची संघटना बांधलेली असते. त्याला या घटनेमुळे गालबोट लागते. पक्षाकडून कमलनाभला ताबडतोब बोलावणे येते. जानेवारी महिन्यातल्या प्रचंड थंडीत रात्रीच्या वेळी आपल्या झोपलेल्या पोराच्या अंगावरची चादर काढून घेऊन कमलनाभ पक्षाने बोलावलेल्या या खास बैठकीला जातो.
मृत कामगारांना न्याय कसा मिळणार? त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या विधवा बायका, मुले यांचे काय होणार? या विषयावर चर्चा करण्यासाठी पॉलिट ब्युरोमधील चक्रधर, रक्तध्वज, आलोक भट्टाचार्य, रामगोबिन मास्तर, कमलाकांत उपाध्याय हे कॉम्रेडस गावाबाहेर एका ठिकाणी रात्रभर चर्चा करतात. ही चर्चा पहाटेपर्यंत चालते. बिहारमध्ये जानेवारीत थंडी हाडे गोठवणारी असते. या कथेला असलेली ही पार्श्वभूमी महत्त्वाची आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
चार कामगारांच्या हत्येमुळे गावात दहशत निर्माण झालेली असते, पण त्यावर उपाययोजना करण्याऐवजी हे लोक भोजनावर ताव मारतात. खास मेजवानीत तयार केलेल्या पदार्थांचे कौतुक करतात. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणावर बरीच उलटसुलट चर्चा करतात. पण प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर काही उपाय काढला जात नाही. पक्षातील काही विशिष्ट पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दलची चर्चा, या कथेमध्ये उपरोधिकपणे आलेली आहे. प्रत्यक्ष घडलेले काय आहे आणि काय करायला हवे, हे बाजूला पडून सैद्धान्तिक चर्चेवर भर दिला जातो. शेवटी वैतागून आणि हताश होऊन कथानायक कमलनाभ घरी परततो. बहुतेक त्याला पक्षातून काढण्याची शक्यता असते, अशा प्रकारची चिन्हे कथेच्या शेवटी सूचित केली आहेत.
१९८०च्या दशकात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता डाव्या पक्षांच्या कार्यपद्धतीवर केलेल्या टीकेमुळे या कथेने प्रागतिक वर्तुळात मोठे वादळ उठवले होते. आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे? ही कथा डाव्या आणि प्रागतिक पक्षांमध्ये कार्य करणाऱ्या नेत्या-कार्यकर्त्यांचे डोळे उघडणारी आहे.
साहित्यामुळे समाजात परिवर्तन झाले, बदल झाले, असे म्हटले जाते. ते जरी फारसे खरे नसले, तरीही अशा परिवर्तनवादी साहित्याचा एक अन्वय मान्य करावाच लागतो. या अनुषंगाने विचार केल्यास ‘कॉम्रेडचा लाल कोट’ या दीर्घकथेचे महत्त्व अधोरेखित करावेच लागेल.
‘कॉम्रेडचा लाल कोट’ - सृंजय, मराठी अनुवाद - अमरनाथ सिंग
मैत्री प्रकाशन, पुणे | मूल्य - १५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक दीपक बोरगावे भाषाशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
deepak.borgave7@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment