अजूनकाही
आधुनिक पॅलेस्टिनी कवितेचा विकास हा पॅलेस्टिन व इस्रायलच्या संघषार्शी निगडित आहे. तीव्र उपरोध, आपल्या अस्तित्वाचा शोध आणि स्वत:ची ओळख हा आधुनिक पॅलेस्टिनी साहित्याचा अंगभूत विशेष आहे. इस्रायलने प्रदेश व्यापणे, तो गमावणे आणि जबरदस्तीने लादलेली हद्दपारी यांनी केलेला प्रतिकार, स्वदेशप्रेम, मायभूमीची ओढ यांचा आविष्कार पॅलेस्टिनी कवितेत झाला आहे. ‘पॅलेस्टिनी कविता’ या रमेशचंद्र पाटकर यांनी अनुवादित केलेल्या आणि लोकवाङ्मय गृहातर्फे डिसेंबर २०१८मध्ये प्रकाशित झालेल्या संग्रहातील रफीफ झिआद या कवयित्रीची ही मुलाखत...
.................................................................................................................................................................
रफीफ झिआद (Rafeef Ziadh) ही ‘Spoken Word Poet’ आहे आणि मानवी हक्क चळवळीतील एक कार्यकर्ती. (चार भिंतींच्या आत काव्यवाचन न करता फक्त उघड्यावर ‘सादर करण्या’च्या (perform) हेतूने निर्मिलेल्या कवीला सामान्यपणे ‘Spoken Word Poet’ अशी संज्ञा आहे. अशा प्रकारच्या ‘सादरीकरणा’च्या कवितेमुळे श्रोत्यांशी/प्रेक्षकांशी तत्काळ व प्रत्यक्ष संवाद साधला जातो. अशा प्रकारच्या काव्यात विद्यमान घटना व प्रश्न यांचा बऱ्याच वेळा संदर्भ असतो आणि ते समकालीन श्रोते/वाचकांसाठी प्रसंगानुरूप किंवा प्रस्तुतीचित (relevent) असतात. पॅलेस्टिनमध्ये अशा स्वरूपाच्या कवितेची परंपरा होती. - अनुवादक) आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दलची भावनिक ओढ झिआदच्या कवितांतून दिसून येते. तिच्याशी लंडनला झालेले संभाषण म्हणजे ही मुलाखत.
बोलताना झिआद सांगत होती :
“आमच्यासारख्या पॅलेस्टिनी निर्वासितांना पॅलेस्टिनबद्दल बोलणं थोडं विचित्र आहे. पण बालपणापासून आमच्या रोमारोमांत ते भिनले आहे. हा फरक फार मोठा आहे.” त्यामुळे इस्रायलने पॅलेस्टिन बळकावल्यापासून त्याविरुद्ध पॅलेस्टिनींच्या चाललेल्या लढ्याचे प्रतिबिंब तिच्या काव्यात उमटले आहे.
झिआदचे काव्यलेखन तरुणपणापासून सुरू झालेले असले, तरी २००४पर्यंत कवितेचे सार्वजनिक सादरीकरण तिने केले नव्हते. टोरोंटोच्या सार्क विद्यापीठात शिकत असताना एक दिवस इस्रायलविरुद्ध निदर्शने करताना तिने आपली प्रतिक्रिया कवितेचे सादरीकरण करून व्यक्त केली. निदर्शनांच्या वेळी विद्यार्थ्यांनी एक ‘दृश्य’ सादर केले, त्यात तपासणी-नाके (Checkpoint), एक इस्रायल, सैनिक व पॅलेस्टिनी नागरिक होते.
“त्यात पॅलेस्टिनी नागरिक म्हणून रस्त्यावर पडलेल्या विद्यार्थ्यांपैकी मी एक होते,” झिआदने स्पष्ट केले.
“एक झिऑनिस्ट (Zionist) आला. (झिऑनिझम ही ज्यूंची राष्ट्रवादी व राजकीय चळवळ होती. ज्यू संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे, हा त्यामागील एक उद्देश होता. इस्त्रायलची ऐतिहासिक भूमी म्हणून सांगितलेल्या प्रदेशात ज्यूंच्या मायभूमीची पुनर्स्थापना व्हावी, या मुख्य मागणीसाठी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य व पूर्व युरोपात ‘राष्ट्रीय पुनरुज्जीवन’वादी चळवळ सुरू झाली. त्यातून झिऑनिझमचा उदय झाला. - अनुवादक) यार्क विद्यापीठाजवळ होणारी निदर्शने नेहमीच गरमागरम असत. मी जमिनीवर पडलेले होते, म्हणून माझ्या पोटावर त्याने जोरदार लाथ हाणली. म्हणाला, ‘तुला दहशतवादी मुलं होण्यापूर्वी तुझ्यावर बलात्कार करण्याएवढी तुझी लायकी आहे.’ त्या विद्यार्थ्याने मारलेली लाथ आणि त्याच्या मनात साचून राहिलेला द्वेष धक्कादायक व किळसवाणा होता,” हे तिने कबूल केले.
झिआद म्हणाली, “त्या घटनेचा समाचार घेण्याचा फक्त एकच मार्ग होता आणि तो म्हणजे त्यासंबंधी लिहिणे. त्यातून ‘Shades of Anger’ (‘संतापाच्या छटा’) या कवितेची निर्मिती झाली. त्या विद्यार्थ्याने केलेल्या वंशवादी शेरेबाजीचा प्रतिकार करणे, तसेच मुकाटपणे अन्याय सहन करायला नकार देणे, हे त्या कवितेतून सूचित केले आहे.”
“काव्यलेखनाला सुरुवात करण्यापूर्वी इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनीमधील लोकांना होणाऱ्या यातना व त्यांच्या छळाला वाचा फोडणे, तसेच विस्थापित म्हणून जगभर विखुरलेल्या पॅलेस्टिनींमध्ये जागृती करणे, हे कार्य गेल्या दहाएक वर्षांपासून ती करत आहे.
“माझे कुटुंब हाइफामध्ये (Haifa) निर्वासित म्हणून आले. पण माझे काही कुटुंबीय इस्रायलमध्ये विस्थापितांसारखे विखुरले गेले आहेत,” ती म्हणाली. रफीफ झिआदचा जन्म बेरूतमधला. निर्वासितांची तिची तिसरी पिढी. १९८२ साली बेरूतला घातलेला वेढा आणि होणारे बॉम्बहल्ले यांच्याशी निगडित असलेल्या बालपणीच्या आठवणी आहेत.
“त्यानंतर माझ्या कुटुंबाने बेरूत सोडले आणि ‘देश नसलेले पॅलेस्टिनी’ म्हणून आम्ही वणवण करत आहोत. पीएच.डी. करण्यासाठी मी शेवटी कॅनडात स्थायिक झाले. तोपर्यंत एका देशातून दुसऱ्या देशात आम्हाला हद्दपार केले जात होते. अलीकडेच मी लंडनला आले,” तिने सांगितले. रफीफ झिआद कधीच पॅलेस्टिनला गेलेली नाही. पण आपल्या वडीलधाऱ्यांच्या मनात घट्ट रुजलेल्या आठवणी तिला आठवत असतात.
“हद्दपारीचे जीवन जगताना बरेच जण त्यांना ठाऊक असलेल्या भूमीला मुकतात. पण आम्ही ठाऊक नसलेल्या भूमीला मुकलो... ज्या भूमीबद्दल आम्ही नुसते ऐकलेले असते, तिलाही आम्ही मुकतो. घराबद्दल आम्हाला सांगितलेले असते. घर तीच कल्पना घट्ट पकडून आहे आणि लवकरच आम्ही आमच्या घरी परतणार आहोत, असे म्हणतो आणि तीच कल्पना मी माझ्या लेखनात पकडण्याचा प्रयत्न करते व माझ्या कवितांमध्ये त्याबद्दल सांगते.”
‘Boycotts, Divestment and Sanction’ (BDS) या मोहिमेची झिआद सक्रिय कार्यकर्ती आहे. वंशवाद आणि अतिरेकी झिऑनिस्ट विचारसरणीच्या विरुद्ध (झिऑनिस्ट ही संघटित चळवळ असून ती थिओदॉर हेर्झ (Theodor Herzi) यांनी १८७९मध्ये सुरू केली, असे सांगितले जाते. ही राष्ट्रवादी व राजकीय चळवळ आहे. ज्यूंची मायभूमी म्हणून, तसेच इस्रायलची ऐतिहासिक भूमी सांगितली गेली आहे, तिची पुनर्स्थापना करणे, हे या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे. साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या चळवळीने पॅलेस्टिनमध्ये ज्यूंच्या नव्या वसाहती स्थापन केल्या. ही चळवळ आजही सुरू असून तिचा इस्रायलला पाठिंबा आहे. - अनुवादक) न्याय मिळवणे व समतेसाठी लढा देणे, हे झिआदचे मुख्य उद्दिष्ट आहे.
“ ‘बीडीएस’ चळवळ ही मुख्यतः स्वातंत्र्य, न्याय व समतेसाठी आहे. आम्हाला त्यापेक्षा काहीही कमी-अधिक नको.
“आम्ही भ्रष्टाचार, वसाहतवाद आणि वर्णद्वेषाविरुद्ध आहोत. सर्व पॅलेस्टिनींना आणि जे इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनमध्ये राहतात, त्या सर्वांना न्याय मिळावा, यासाठी लढत आहोत.
“कारण इस्रायलीसुद्धा स्वतः मुक्त नाहीत. जर ते इतरांवर दडपशाही करत असतील आणि त्यांची तरुण मुलं आपल्या वडिलांसारखाच अधिकार गाजवत असतील, तर ते आपली मानुषता नष्ट करत असणारच.
“पण जेव्हा आम्ही स्वातंत्र्य, न्याय आणि समता म्हणतो, तेव्हा फक्त वेस्ट बँक व गाझापट्टीतील पॅलेस्टिनींबद्दल आम्हाला बोलायचे नसते, तर जगात जिथे कुठे पॅलेस्टिनी असतील, त्यांच्याबद्दल सांगायचे असते.
“कारण पॅलेस्टिनी निर्वासितांना आपल्या मायभूमीत परतण्याचा हक्क असतो. इस्रायलमधील पॅलेस्टिनी नागरिकांना भेदभावाने न वागवता समानतेने वागवण्याची गरज आहे; आमचा प्रदेश ताब्यात घेण्याचे थांबवण्याची आणि वर्णद्वेषाची भिंत कोसळून टाकण्याची गरज आहे. त्यात जर काही कमी-अधिक असेल, तर ते पॅलेस्टिनींना न्याय देणारे नसेल. कारण हीसुद्धा मूलभूत मानुषता असेल,” झिआद सांगत होती.
“आजच्या काळात आणि युगात अशा प्रकारे कोणी कसा काय जगत असेल? तरीही ही योग्य वागणूक आहे, असे सांगावे. लोकांना अशा प्रकारे वागवायचा आणि त्यांचे आयुष्य नियंत्रित करायचा हा मार्ग योग्य आहे?गाझापट्टीत लोकांची उपासमार करणे आणि मध्ययुगीन काळाला साजेल, अशा पद्धतीने प्रदेश बळकावणे, हे योग्य आहे का? हे कसे काय योग्य आहे? हे स्वाभाविक (normal) आहे?... पॅलेस्टिनचा प्रश्न उठवायचाही आणि नाहीही, हे योग्य नाही, हे सांगायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. हे स्वाभाविक नाही आणि आपण त्याबद्दल काहीतरी करायला हवे. इस्रायल सरकारला व त्याच्या समर्थकांना कितीही वाटले, तरी आम्ही गप्प बसणार नाही आणि अपराधात सामील होणार नाही... ‘We teach Life Sir’ ही झिआदची आणखी एक मर्मभेदी कविता आहे. ‘संतापाच्या छटा’ (‘Shades of Anger’) या कवितेमागे पॅलेस्टिनसाठी काम करताना आलेल्या अनुभवांची प्रेरणा आहे.
“पण बरेच जण यावर भरपूर क्लिष्ट वादविवाद करत असतात. नुसते सांगत बसतात- ‘ही गुंतागुंतीची राजकीय परिस्थिती आहे; ती कायमची कशी सुधारता येईल?’ जर प्रत्येकाला आपल्या भूमीत समतेने राहणे शक्य असेल, तर समतेत काय चुकीचे आहे? जे इस्रायलचे समर्थन करत असतात, तर त्याची जी सध्याची वर्तणूक आहे, त्याचे समर्थन करण्यासाठी ते आकाशपाताळ एक का करतात? एखाद्या प्रदेशातील जनतेवर दडपशाही होत आहे आणि तिच्या भूमीचा कब्जा घेतला जात आहे, हे स्पष्ट दिसत आहे, तर मग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे काय आहे?
“त्याचे समर्थन करण्याची गरजच काय? आपल्या भूमीत राहणाऱ्या प्रत्येकाला समता हवी, एवढे तुम्ही सांगा. जर तुमचा वर्णद्वेषाला विरोध असेल, तर तुमची भूमिका तार्किक म्हणता येईल.”
: इस्रायली आणि पॅलेस्टिन कधीतरी गुण्यागोविंदाने नांदतील का?
“ते गुण्यागोविंदाने राहणे कठीण आहे; हा माझ्यासाठी प्रश्न नाही. ते ज्या परिस्थितीत राहतात, त्यावर हे अवलंबून आहे; कारण पॅलेस्टिनी शतकानुशतके आपल्या भूमीत शांततेत राहत होते. इस्रायली आणि पॅलेस्टिनींनी समतेने राहायचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी फक्त ज्यू राष्ट्र निर्माण करायचा प्रयत्न केला. जर न्याय असेल, समता असेल, तर लोक नक्कीच गुण्यागोविंदाने नांदतील.
“वर्णद्वेष नष्ट करण्याची, न्याय देण्याची गरज आहे. ती पूर्ण केली गेली, तर पॅलेस्टिनचा प्रश्न सोडवता येईल. ती जोपर्यंत पूर्ण केली जात नाही, तोपर्यंत हा प्रश्न खरोखरच सोडवता येणार नाही.”
: तर मग हा प्रश्न सोडवण्यासाठी पॅलेस्टिनींना कोण अडवत आहे, अडथळा कोणता?
“प्रामाणिकपणे सांगायचे तर पॅलेस्टिनींच्या यातना कमी करायला हव्यात,” झिआद म्हणाली.
“अडथळ्याचा विचार केलात, तर इस्रायल भिंत बांधत असल्याचं तुम्हाला दिसेल. त्याची तपासणी-नाकी लोकांची कसून झडती घेत आहेत. जणू काही विज्ञानकथेवरील चित्रपट आहे. इस्रायल पॅलेस्टिनींना यातना भोगायला लावत आहे; तरी पण मध्य आशियात फक्त इस्त्रायलमध्येच लोकशाही आहे, असे पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे आणि टीव्ही वाहिन्या सांगत आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
“ही परिस्थिती अस्वाभाविक (abnormal) आहे, असा विचार लोक करणार नाहीत, ही मला वाटणारी फार मोठी भीती आहे. पण परिस्थिती फारच अस्वाभाविक आहे. परंतु लोकांना त्याचा राग येत नाही. का, ते मला खरोखरच समजत नाही.
“आजच्या काळात आणि युगात अशा प्रकारे कोणी कसा काय जगत असेल? तरीही ही योग्य वागणूक आहे, असे सांगावे. लोकांना अशा प्रकारे वागवायचा आणि त्यांचे आयुष्य नियंत्रित करायचा हा मार्ग योग्य आहे?गाझापट्टीत लोकांची उपासमार करणे आणि मध्ययुगीन काळाला साजेल, अशा पद्धतीने प्रदेश बळकावणे, हे योग्य आहे का? हे कसे काय योग्य आहे? हे स्वाभाविक (normal) आहे?
“पॅलेस्टिनचा प्रश्न उठवायचाही आणि नाहीही, हे योग्य नाही, हे सांगायचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. हे स्वाभाविक नाही आणि आपण त्याबद्दल काहीतरी करायला हवे. इस्रायल सरकारला व त्याच्या समर्थकांना कितीही वाटले, तरी आम्ही गप्प बसणार नाही आणि अपराधात सामील होणार नाही.”
‘We teach Life Sir’ ही झिआदची आणखी एक मर्मभेदी कविता आहे. ‘संतापाच्या छटा’ (‘Shades of Anger’) या कवितेमागे पॅलेस्टिनसाठी काम करताना आलेल्या अनुभवांची प्रेरणा आहे. “तुमच्या मुलांना द्वेष करू नका, असे शिकवले, तर ती द्वेष करायचे थांबवतील, असे तुम्हाला वाटते काय?” असा नेमका प्रश्न एका पत्रकाराने झिआदला संयुक्त राष्ट्रसंघात (UN) झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी विचारला. चिथावणीखोर प्रश्न विचारणे, ही पाश्चात्त्य प्रसारमाध्यमांची सर्वसाधारण वृत्ती आहे. अशा वृत्तीला झिआदला नेहमीच तोंड द्यावे लागते.
“इस्रायलच्या तुरुंगातील पॅलेस्टिनी कैद्यांचे सध्या उपोषण (Hunger Strike) सुरू आहे. त्या बाबतीत पाश्चात्त्य प्रसारमाध्यमे देत असलेल्या प्रतिक्रिया या वृत्तीला धरून आहेत,” झिआद म्हणाली.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
“जेव्हा गिलाद शालित (Gilad Shalit) या पॅलेस्टिनी सैनिकाचे अपहरण करून — अपहरण या शब्दावर भर देणे महत्त्वाचे आहे — त्याला तुरुंगात टाकले, तेव्हा तो इस्रायलव्याप्त पॅलेस्टिनच्या मुलुखात होता. पण प्रसारमाध्यमांनी या अपहरणाबद्दल एक शब्दही उच्चारला नाही; पण त्याला, त्याच्या आईला व वडिलांना होणाऱ्या यातना इत्यादी सर्व काही सांगितले.
“दोन हजार पॅलेस्टिनी कैदी उपोषण करत आहेत. पण प्रसारमाध्यमे त्याबद्दल काही सांगणार नाहीत. अगदी अलीकडे आम्ही अशा ‘कहाण्यां’त (Stories) लक्ष घालू लागलो आहोत. प्रसारमाध्यमे पॅलेस्टिन आणि पॅलेस्टिनींना न्याय मिळण्याचा प्रश्न कसा हाताळत आहेत, याचे हे एक छोटे उदाहरण. हीच ती पूर्वग्रहदूषित दुटप्पी वृत्ती.”
कविता सादर करताना झिआद आपल्या आणि आपल्या लोकांच्या मनात खदखदणाऱ्या संतापाचा आविष्कार करते. पण त्याचबरोबर न्याय, स्वातंत्र्य आणि समतेबद्दल चिरकाल वाटणारी आशाही व्यक्त करते.
‘पॅलेस्टिनी कविता’ - रमेशचंद्र पाटकर, लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने - ९७ | मूल्य - १५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘We teach Life Sir’ ही झिआदची मर्मभेदी कविता ऐकण्यासाठी पहा -
https://youtu.be/aKucPh9xHtM?si=0hv5NegOpYxnTf61
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment