“मी त्या सायंकाळी तोंडावर पाण्याचे सपकारे मारताना आरशात पाहत होतो आणि मोठ्यानं हसत स्वतःशीच म्हणालो, ‘नॉट बॅड, नॉट बॅड अॅट ऑल!’ माझा चेहरा मला कमालीचा देखणा वाटत होता. आज सकाळीच नाही का, उषानं मी तिला आवडतो अशी कबुली दिली होती? आणि ती काळीसावळी फ्लोरेन्स? तिनं नाही का माझं घट्ट असोशीनं चुंबन घेतलं होतं? माझ्यात काही तरी आहे खास... ते मी जगापुढे सादर करणार आहे. कारण माझा चेहरा ‘प्रेझेंटेबल’ आहे. त्यामुळे जग मला उद्या पाहिल. माझी तारीफ करेल, त्यामुळे मी नट बनणार आहे, नव्हे स्टार. चंदेरी तारा होय, मी त्या दिशेनं आता जाईन. सिनेमाची मक्का असलेल्या मुंबईत जाईन, तिथलं रंगीत ग्लॅमरस जग माझी वाट पाहत आहे आणि मी तिथला रंगीत प्रकाशझोत स्वतःकडे वळवून घेऊन सदैव झगमगत राहीन!”
१९४५ (‘हम एक हैं’) ते २०११ (‘चार्जशीट’) असा सहा दशकांपेक्षा जास्त काळ ‘सुपरस्टार’ राहिलेल्या देव आनंदला चंदेरी दुनियेतच आपलं स्थान आहे व त्यासाठीच आपला जन्म झाला आहे, याचा आत्मसाक्षात्कार झाल्याचा हा ‘प्रकाशमय’ क्षण त्याचा जीवनात १९व्या वर्षी आला. त्या वर्षी तो लाहोरच्या सरकारी महाविद्यालयातून बी.ए. इंग्रजी ऑनर्सचं ‘पासिंग सर्टिफिकेट’ घेऊन परतताना वर्गातली एकमेव सुंदर मुलगी उषा त्याला ‘परत एम.ए.ला ये सुट्टीनंतर’ असं म्हणून ‘तू मला आवडतोस’ अशी कबुली दिली होती.
त्या सायंकाळी आरशात पाहत चेहऱ्यावर पाणी मारताना आपला चेहरा देखणा व प्रेझेंटेबल आहे व आपण हिंदी सिनेमाचे स्टार होऊ शकतो, याची जाणीव झाल्याचा साक्षात्कारी अनुभव देव आनंदनं २००७ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमान्सिंग वुईथ लाईफ’ या आपल्या रसिल्या आत्मचरित्रात रोचकपणे वर्णिला आहे.
तो वाचताना मला जाणवलं की, स्वत:वर आणि जीवनावर बेहद प्रेम करणाऱ्या ‘नार्सिसस्ट’चं भारतीय गंधर्व रूप म्हणजे देव आनंद आहे. त्याच्या ज्यावर भारतीय रसिकांनी अव्यभिचारी प्रेम केलं! किमान तीन पिढ्यासाठी तो ‘हार्टथ्रोब’ होता. एकाच घरातील आजी (पन्नाशीच्या दशकातील), मुलगी (सत्तरीच्या दशकातली) आणि नात (ऐंशीच्या दशकातली) अशा तीन पिढ्यांच्या स्त्रियांना देव आनंद आवडत होता. हे अदभुत नवलचं म्हटलं पाहिजे!
हे अद्भूत रसायन होतं तरी काय? आजही जी जुनी गाणी टीव्हीवर दाखवली जातात, त्यातील किमान पन्नास टक्के गाणी देव आनंदची असतात आणि आजच्या तरुण पिढीला ती आवडतातही. ही कसली अजोड किमया आहे? त्याचे समकालीन नायक दिलीपकुमार व राज कपूरच्या तुलनेत देवानंद अभिनयात खूपच कमी होता, नंतरचा सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन व आजच्या तीन खानच्या तुलनेत त्याचं ‘स्टारडम’ तुलनेनं फिकं होतं; तरीही त्याच्यात असा काही ‘चार्म’ होता, असं काही लोहचुंबकीय व्यक्तिमत्त्व होतं की, जे वर उल्लेखिलेल्या स्टारकडे नव्हतं, नाहीय. आणि पहिल्या सिनेमापासून ते शेवटच्या २०११च्या ‘चार्जशीट’पर्यंत तो नायकच राहिला. वयाच्या हिशोबानं ऐंशी वर्षे ओलांडली असली तरी आणि त्याचा सिनेमा सत्तरीच्या दशकानंतरचा कितीही भंकस असला तरी तो पडद्यावर कधी देखणेपणात व ‘स्टारिझम’मध्ये फिका वाटला नाही... त्याला सारे जण ‘एजलेस वंडर’ म्हणायचे, ते अगदी सार्थ होतं!
हे देखणं कोडं उलगडून घ्यायचं असेल तर, इंग्रजीतलं त्याचं ‘रोमान्सिंग वुईथ लाईफ’ हे आत्मचरित्र मुळातूनच वाचायला हवं. खरं तर हे भारतीय कलावंतांचं एका अर्थानं पहिलं स्वत: लिहिलेलं आणि साहित्यिक मूल्य असलेलं आणि ‘आत्मचरित्र’ या वाङ्मयप्रकाराची अपेक्षा, बऱ्याच प्रमाणात पूर्ण करणारं प्रामाणिक लेखन आहे, असं मी निःसंदिग्धपणे म्हणने! ते सुगम्य, रसाळ इंग्रजीत देवानंदनं लिहिलं आहे. त्याचं भाषेवरचं प्रभुत्व सिनेमॅटिक पद्धतीनं ‘फ्लॅशबॅक’ तंत्र वापरून केलेलं घटना वर्णन, काहीशी अतिरंजित शैली आणि स्वतःचं जीवन उलगडून दाखवताना सहजतेनं कथन केलेलं जीवनदर्शन- न-तत्त्वज्ञान... या साऱ्यामुळे मला हे त्याचं आत्मचरित्र एक महत्त्वाची साहित्यकृती वाटते! पण त्याकडे साहित्यिक समीक्षकांचं फारसं लक्ष गेलेलं नाही... फिल्मी नजरेनं पाहिलं गेलं व हे आत्मचरित्र फारसं चर्चिलं गेलं नाही. गाजलं नाही.
या आत्मचरित्रातून जाणवतं की, देव आनंद हा केवळ माणूस नव्हता, केवळ ‘स्टार’ कलावंत नव्हता, तर ते एक जगण्याचं स्वच्छंदी तत्त्वज्ञान होतं. देव आनंद हे एक खरंखुरं घडलेलं कल्पनाचित्र होतं! ‘आयडिया ऑफ इंडिया’मध्ये जसं स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि अंत्योदय, या उदात्त कल्पना समाविष्ट आहेत, असं आपण मानतो, तद्वतच ‘आयडिया ऑफ देव आनंद’मध्ये स्वतःवर, जीवनावर आणि जगावर कसं बेहद प्रेम करत, सतत वर्तमानात जगत भविष्यकाळावर नजर ठेवावी आणि चिरतरुण राहावं, या कल्पना समाविष्ट आहेत.
जगानं ‘विकास निर्देशांक’ हा आर्थिक प्रगतीचा सिद्धान्त सिद्ध केला आहे, तर भूतान या आपल्या शेजारी देशानं ‘समाधान निर्देशांक’ (ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स) या सिद्धान्ताला साकारलं आहे. मानवी जीवन सुखी करण्यासाठी या समाधान निर्देशांकात देव आनंद जे जीवन जगला त्याची सूत्रे - मंत्र जर समाविष्ट केली तर प्रत्येक माणसाचं जीवन हा खऱ्या अर्थानं ‘रोमान्स वुईथ लाईफ’ होऊ शकेल!
कुणाला वाटत नाही चिरतरुण रहावं शेवटपर्यंत? कुणाला वाटत नाही भूतकाळाचा बागुलबुवा न करता वर्तमानात आनंदी जगावं? देव आनंदचं ८८ वर्षांचं जीवन त्याचा आदर्श म्हणावा इतका नमुनेदार वस्तुपाठ होता!
काय आहे ‘आयडिया ऑफ देव आनंद?’ सूत्ररूपानं सांगायचं झालं तर असं सांगता येईल-
“मी वयाचा कधीच विचार करत नाही. तो माझ्यासाठी केवळ एक आकडा आहे फक्त!” देव आनंदची शेखर गुप्तानी घेतलेली एक मुलाखत आजही ‘यू ट्यूब’वर उपलब्ध आहे. ‘वॉक द टॉक’मध्ये समुद्र किनारी खडकातून चालत चालत देव आनंदनं वयाच्या ८५व्या वर्षी दिलेली मुलाखत ऐकताना मी थक्क झालो होतो. खरंच देव हा ‘एजलेस वंडर’ आहे. नि:संशय. त्याचं वय जाणवत होतं, पण फार तर तो साठीचा वाटत होता; पण त्याचा तिशीतल्या तरुणासारखा सळसळता उत्साह आणि अदम्य आत्मविश्वास शब्दाशब्दांत झळकत होता. त्याचं त्याचं रहस्य अनेक वेळा सांगितलं आहे. ‘मी नेहमीच वर्तमानात जगतो आणि माझी भविष्यावर नजर असते.’
देव आनंदला पुन्हा सतत जगाला विकसत कार्यमग्न राहणं आवडायचं. तो शेवटपर्यंत पहाटे चारला उठायचा आणि दुपारी चुकूनही कधी झोपायचा नाही की, आराम करायचा नाही. जीभेवर ताबा, शरीराची काळजी, सतत नवी स्वप्नं पाहणं आणि त्यासाठी काम करणं, हे त्याच्या चिरतारुण्याचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. तो त्याच्या कदाचित शेवटच्या एक वृत्तपत्रीय मुलाखतीमध्ये म्हणाला होता की, ‘आय अॅम टुडे अँट ए ब्युटिफूल स्टेज ऑफ एटीएट.... पण मला या क्षणीही विशीच्या वयात असावं तसं उत्साही वाटतंय.’ हे ‘आयडिया ऑफ देव आनंद’चं पहिलं सूत्र सांगता येईल!
‘आय टेक लाईफ अॅट इट कमस्’ हे देव आनंदचं आणखी एक जगण्याचं लाडकं तत्त्वज्ञान होतं. त्याच्या ‘हम दोनो’मध्ये साहिरचं एक गाजलेलं गीत आहे, ‘मैं जिंदकी का साथ निभाता चला गया...’ ते त्याच्या जगण्याचं जणू प्रतीक रूप आहे. माणसाला जीवनात सुखी व्हायचं असेल, तर ‘हर फिक्र धुए में उडाता चला गया...’प्रमाणे, जशी सिगरेटची राख चुटकीसरशी झटकता येते, तशी जीवनातली दुःख, निराशा झटकता आली पाहिजे. देवानंदला ही कला जमली होती. त्याची दोन उदाहरणं त्याच्या आत्मचरित्राच्या आधारे देता येतील.
१९४८ ते १९५१ या तीन वर्षात देव आनंद व त्या काळची ‘सिंगींग सुपरस्टार’ सुरैय्या यांनी एकूण सात सिनेमांत नायक-नायिका म्हणून काम केलं होतं. सततच्या निकट सहवासानं दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांना लग्न करायचं होतं, पण त्यांचे भिन्न धर्म आड आले. त्याचबरोबर सुरैय्याच्या घरासाठी ती सोन्याची अंडी देणारी कोंबडी होती. तिच्या आजीच्या हाती तिच्या पैशाचे सर्व व्यवहार होते. तिनं त्यांच्या प्रेमात खो घातला आणि दुबळ्या व नात्याच्या बंधनात गुरफटलेल्या सुरैय्याला माहेरच्या माणसांची ती बंधनं तोडता आली नाहीत. तिनं त्या वेळी देवानंदनं दिलेली तीन लाख रुपयांची गुप्तपणे केलेल्या एंगेजमेंटची हिऱ्याची अंगठी समुद्रात फेकून देऊन प्रेमाची ‘इतिश्री’ केली. कारण तिला घरच्यांनी चक्क धमकी दिली होती, एक तर तिला संपवून टाकू किंवा आजी आत्महत्या करेल. त्यामुळे तिनं देववर उत्कट प्रेम असूनही आपल्या प्रेमाला तिलांजली दिली. पुढे तिनं आयुष्यात कधी लग्न केलं नाही...
या प्रेमभंगातून देव बाहेर कसा आला? त्यानं आपल्या आत्मचरित्रात फार सुंदर शैलीत आपली मनोवस्था प्रगट केली आहे ती अशी :
“सुरैय्यानं मी दिलेली एंगेजमेंटची बहुमोल अंगठी समुद्रात फेकून दिली आणि समुद्राच्या लाटा पहात किती वेळ तरी ती दर्दभऱ्या भिजल्या आवाजात गात होती. हे मला आमचा समान मित्र व प्रेमकाळापासून आमचा संपर्कदूत दिवेचानं मला सांगून असं म्हटलं की, ‘उद्या शेक्सपिअर पुन्हा जन्म घेऊन जगात आला, तर तुमच्या दोघांच्या असफल प्रेमावर ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ला मागे सारेल असं सरस नाटक लिहिलं.’
माझं हृदय विदीर्ण झालं होतं. माझं अवघं विश्व छिन्नविछिन्न झालं होतं. तिच्याविना माझ्या अस्तित्वाला काही अर्थच नाही असं वाटत होतं. पण न जगणं म्हणजे स्वत:चा नाश हे मला कळत होतं व माझी अंत:शक्ती मला त्याबाबत इशारा देत होती. पण प्रेमभंगाचं दुःख तीव्र होतं. त्याची परिणती माझा मोठा भाऊ, माझा मार्गदर्शक चेतन आनंदच्या खांद्यावर डोकं ठेवून माझ्या रडण्यात झाली. तो माझी समजूत घालत म्हणत होता, ही घटना तुला अधिक समर्थ व परिपक्व करेल देव आणि पुढील जीवनातील मोठ्या लढण्यासाठी तयार करणारी ठरेल!
मी दूर क्षितिजाकडे पाहत होतो. संध्याकाळचा मावळता सूर्य माझ्यावर जणू खास माझ्यासाठी राखीव ठेवलेली खास किरणे माझ्या चेहऱ्यावर टाकतो आहे, असं मला वाटलं. त्यानं माझा चेहरा जणू उजळून निघत होता. मी सूर्याकडे पाहत होतो आणि चेतन मला समजावत होता- ‘जीवन प्रत्येक टप्प्यावर माणसाला धड्यामागून धडे त्याच्या खास पद्धतीनं शिकवत असतो. तुझ्या आयुष्यातला सुरैय्यानामक धडा आता कायमस्वरूपी संपला आहे. आता तुला जीवनातला नवा धडा चॅप्टर सुरू करण्यासाठी सुरुवात केली पाहिजे.”
किती कलात्मक व परिपक्व पद्धतीनं देवनं सुरैय्या प्रकरणातून तो किती लवकर आणि कशा रितीनं बाहेर आला, हे लिहिलं आहे. मला ते वाचताना बेहद भावलं होतं. पुन्हा त्याच्या जगण्याचा आशावाद आणि दुर्दम्य विश्वास की, ‘सूर्याची (पक्षी - जीवनाचे) खास माझ्यासाठी राखून ठेवलेली किरणं माझ्यावर पडत होती व नवा मार्ग दाखवत होती’. सुखी राहण्याचा व पुढे पुढे जात जीवन जगण्याचा एक मंत्रच देव आतून तुम्हा-आम्हांला देतो, असं मला वाटतं! ही त्याची ‘नेव्हर से डाय’ ही वृत्ती ‘आयडिया ऑफ देव आनंद’चा एक विशेष आहे. इथे मला त्याच्या एका मुलाखतीमधील एका तत्त्वज्ञानाकडे झुकलेल्या सुभाषिताप्रमाणे वाटणाऱ्या वाक्याची आठवण येते. तो म्हणाला होता- ‘आय नेव्हर गिव्ह मायसेल्फ ए चान्स टू गेट डिप्रेस्ड आय थिंक अहेड अँड ऑफ कोर्स पॉझिटिव्ह!’
देव आनंदने जीवनाप्रमाणे सिनेमातही शेवटपर्यंत ‘लीड’ - प्रमुख रोल भूमिका सोडली नाही. त्याबाबतचा एक किस्सा सांगण्याजोगा आहे. २००७ साली फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ हा शाहरूख खान-दीपिका पदुकोणचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या एका गाण्यात दोन डझन स्टार्स - थेट धर्मेंद्र-रेखापासून सर्व टॉपचे स्टार्स नाचत होते. त्या गाण्यासाठी फराह खाननं देवला ‘गेस्ट ॲपिरियन्स’साठी विचारलं होतं, तेव्हा त्यानं नकार देताता म्हटलं होतं, ‘मी आजही फक्त लीड रोलच करतो’.
२००७मध्ये देव आनंद ‘टेलिग्राम’ वृत्तपत्रात अमित रॉयला दिलेल्या एका मुलाखतीत सुरैय्या त्याला मिळाली नाही, यासंदर्भात म्हणाला होता की, हे ठीकच झालं की, ती मला लाभली नाही. अन्यथा जीवनाची दिशा वेगळी राहिली असती... तो असं का म्हणाला असेल? त्याचं सुरैय्यावर तर निरतिशय प्रेम होतं. तिच्या भेटीसाठी रात्रीच्या वेळी सातव्या मजल्यावर मध्यरात्री तो धाडसानं प्रियाराधनाच्या काळात पाईपवरून चढून गेला होता. मग ती त्याला पत्नी म्हणून मिळाली नाही, हे ठीकच झालं, असे उद्गार त्यानं का काढले असावेत?
मला वाटतं, त्याचं लग्न झालं असतं, तर एकमेकांच्या प्रेमात ते सुखी जीवन जगले असते. पण तिच्याविना तो कणखर बनला आणि पुढे त्यानं स्वत:इतकं नार्सिसिस्टप्रमाणे कुणावरही प्रेम केलं नाही. अगदी पत्नी कल्पना कार्तिकवरही. त्यामुळे त्याचं स्टारडम, त्याची दिलफेक रोमँटिक व भेटलेल्या व आवडलेल्या सुंदर स्त्रीशी सौम्य फ्लर्टिंग करत त्यांच्यावर प्रभाव टाकत त्यांना आपला ‘फॅन’ बनवणं आणि स्वत:च्या ‘स्टारडम’चं वलय अधिकाधिक गडद करणं त्याला कदाचित शक्य झालं असावं!
त्याला कधीच अॅक्टर म्हणून जाणकारांनी जमेस धरलं नव्हतं. तो अंतर्बाह्य स्टार होता. सुरैय्यासोबतच्या सफल प्रेमविवाह आणि नंतरच्या कोमट संसारानं कदाचित त्याचं वलयांकित स्टारडम झाकोळलं गेलं असतं. त्याचा मूळ स्वभाव ‘शोमनशीप’ व ‘स्टारडम’ कोंबड्याच्या तुऱ्यासारखा सदैव मिरवण्याचा होता, तो फिका पडण्याचा धोका होता! त्यानं हे सारं मुलाखतीत बोलून दाखवलं नाही; पण मला वाटतं, माझं हे विवेचन त्याच्या भूमिकेशी अनुकूल म्हणून संभव आहे.
सुरैय्या प्रकरणातून तो लवकरच सावरला गेला आणि १९५१च्या ‘बाजी’च्या वेळी त्याला कल्पना कार्तिक भेटली. ती आधी त्याच्या प्रेमात पडली व मग त्याला तिनं अक्षरश: आपल्या जाळ्यात ओढलं. त्यांचं लवकरच लग्न झालं आणि तिनं सिनेमात काम करणं बंद केलं. देव मात्र एकापेक्षा एक स्टायलिश आणि रंजक सिनेमे करत आपलं स्टारपण गडद करत राहिला आणि शेवटपर्यंत फिकं न पडलेलं वलयांकित तारकत्व त्यानं मिळवलं!
नार्सिसिस्टप्रमाणे त्याचं सर्वांत आधी व सर्वांत जास्त स्वतःवर, स्वतःच्या ‘स्टारपणा’वर प्रेम होतं. बाकी जीवनात त्याच्यासाठी पत्नी कल्पना, मुले पण कमीच होती. व्यवहारी जगाची फूटपट्टी लावली, तर याला स्वार्थी व आत्मकेंद्रीपणा म्हणता येईल. तो खराही आहे, पण त्यानं घरच्यांसाठी आयुष्यभराची उत्तम तरतूद केली होती. झिनत अमाननंतर अपवाद वगळता कल्पनावर पत्नी म्हणून त्यानं एकनिष्ठ प्रेमही केलं होतं. बाप म्हणून बाल सुनीलला घेऊन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो सहजपणे हिंडला. दोन्ही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण, करिअर व लग्नं करू दिली, पण आपली तरुण प्रतिमा व स्टारडमसाठी त्यानं कुटुंबाला सिनेसृष्टीपासून दूरच ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे!
आत्मचरित्रात लग्नानंतर कल्पनाचा फारचा उल्लेखही देव करत नाही, यातच सारं आलं! त्याचं पहिलं अस्सल प्रेम सुरैय्या होतं, तर कल्पना कार्तिक हा त्यावरचा व्यावहारिक आणि प्रेमापेक्षाही तारुण्यासाठीचा देवनं शोधलेला उपाय होता, असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल.
पुढे काही वर्षांनी ओसरतं तारुण्य व वाढतं वय थोपवण्याच्या मनःस्थितीत वयाच्या साठीच्या आसपासच्या काळात झिनत अमान त्याच्या जीवनात नवी टवटवी आणि असोशी घेऊन आली... त्याच्या एव्हरग्रीन तारुण्यावर प्रेमाचं अमृत शिंपून गेली आणि त्याची ‘इंटरनल रोमँटिक लव्हर’ची प्रतिमा अधिक गडद करून गेली.
सुरैय्याशी लग्न झालं असतं, तर कदाचित त्याचं स्टारडम दीर्घकाळ टिकलं नसतं, असं त्याला मागे वळून पाहताना वाटत असणार. त्यामुळेच ‘सुरैय्या मला लाभली नाही, हे एका परीनं बरंच झालं’ असं तो म्हणला असणार. काही असो. आम्हा देव फॅन्ससाठी त्याचं ‘स्टार’ व ‘रोमँटिक’ असणं व त्याच्या चंदेरी पडद्यावरील प्रेमी नायकाच्या प्रेमात राहत आपण सामान्यजनांनी आपली अवांछित व प्रत्यक्षात न साकार होणारी स्वप्नं त्याचा रूपानं कल्पनेच्या पातळीवर पूर्ण करणं, हे आपल्यासाठी त्याच्या वैयक्तिक जीवनातील असफल प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. त्यानं किमान तीन पिढ्यांना असं सुख व पूर्तता दिली, हे त्याचं मोठं यश म्हटलं पाहिजे!
तो जीवनावर बेहद प्रेम करणारा माणूस होता. त्यामुळे तो जीवनातील अपयशालाही उमदेपणानं सामोरं गेला. पण त्याचं त्यानं फुकाचं दुःख केलं नाही. देवानंद पराभव व निराशा सहजतेनं स्वीकारत आणि आपला पराभूत भूतकाळ सिगरेटचा ‘कश’प्रमाणे केवळ ओठाबाहेरच नव्हे, तर मनाबाहेरही सहजतेनं काढत जीवनाला सामोरा जात राहिला. कारण तो ‘बी पॉझिटिव्ह’ या गुणसूत्राचा होता!
याच एका छान उदाहरण अनुपमा चोपडा या सिनेपत्रकारानं ‘दि फिलॉसॉफी ऑफ देव आनंद’ या त्याच्या मृत्यूनंतर ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात सापडतं. ‘हरे कृष्णा हरे रामा’ या त्याच्या रौप्यमहोत्सवी चित्रपटानंतर त्यानं ‘इश्क इश्क इश्क’ हा बिगबजेट सिनेमा १९७४ला काढला होता. त्यात शेखर कपूर व शबाना आझमी हे कलावंत होते, पण तो ‘सुपरफ्लॉप’ ठरला. त्या सिनेमा रिलीजच्या सायंकाळी एका पार्टीमध्ये देवसह सारे जण मूडमध्ये मस्ती करत असताना चित्रपट सर्वत्र रिकाम्या थिएटरनं जात आहे, हे कळलं. देवनं ते समजल्यावर दहा मिनिटांसाठी सर्वांची रजा घेतली व तो एका बंद खोलीत एकटा राहिला. मग तो बाहेर येत त्याच्या ‘ट्रेडमार्क’ फेसाळत्या उत्साहानं शेखरला म्हणाला, ‘मला आताच एका नव्या सिनेमाची ग्रेट कथा सुचली आहे. त्यावर मी काम उद्यापासून काम सुरू करणार आहे...’
लक्षात घ्या, प्रचंड पैसा ओतून काढलेला महत्त्वाकांक्षी चित्रपट फ्लॉप झाल्यावर केवळ दहा मिनिटांत देव त्यातून सावरत बाहेर येतो आणि ‘देस परदेस’वर काम सुरू करतो, हे किती थक्क करणारं आहे!
देव आनंदचे अनेक टीकाकार म्हणतात की, देवचा आपलं वाढतं वय व वार्धक्य न स्वीकारण्याचा अट्टाहास, हा विकृतीच्या सीमेवरचा होता. काय हरकत होती, त्याला वयाप्रमाणं प्रौढ भूमिका करायला? त्याचे टीकाकार हे विसरतात की, तो कधीच चरित्रभूमिका करू शकला नसता, कारण तो स्टार होता. स्टाईल व मॅनेरिझमच्या साह्याने रूपेरी पडद्यावर रंगीत तारुण्याची प्रेम, फ्लर्टिंग आणि स्वप्नांची दुनिया गुलजार करणारा स्टार होता. अभिनय (काही मोजके चित्रपट वगळता) हा त्याचा फारसा विशेष प्रांत नव्हता. त्याच्यात ती कुवत होती, पण चिरतरुण मनासोबत प्रयत्नपूर्वक जपलेलं तरुण शरीर, ट्रेडमार्क कॅप्स, रंगीबेरंगी कपडे व स्कार्फ, वेगवान संवाद फेक आणि स्टायलिश मॅनेरिझमच्या बळावर त्यानं शेवटपर्यंत स्टार आणि तरुण राहणंच पसंत केलं. ही त्याची निवड होती. एक तर ती तुम्हाला आवडेल वा न आवडेल, पण त्याचा अशा निवडीचा अधिकार होता.
त्यानं हिमालयाचं सौंदर्य समग्रतेनं ‘इश्क’मध्ये टिपताना त्याचा मनमुराद आस्वाद घेतला होता. पण तो सिनेमा पहिल्याच दिवशी सणकून आपटला. मात्र दहा मिनिटांत तो स्वतःला काय ताकदीनं सावरतो व त्यातून बाहेर येतो! त्याचं कारण त्याची आंतरिक शक्ती. ‘नेव्हर से डाय’ हा खास अॅटिट्यूड. सतत नवीन काही तरी सुचणं, त्याचा ध्यास घेणं आणि त्यासाठी मागचं सारं विसरणं, हे त्याचं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, तसंच त्याच्या चिरतारुण्याचं रहस्यपण!
सूरज सनिम या प्रसिद्ध पटकथालेखकाने देवसाठी ‘छुपा रुस्तुम’, ‘देस परदेस’ व ‘हिरा पन्ना’ आदी सिनेमाच्या पटकथा लिहिल्या होत्या. त्यानं एकदा देवबाबत फार मार्मिक टिपणी केली होती. ‘देव आनंदसाठी भूतकाळ हा जणू अस्तित्वात नाही. तो आजच्यासाठी वर्तमानासाठी आणि उद्याच्या अधिक चांगल्या भविष्यकाळाच्या आशावादासाठी जगतो. तो खरे तर जाणीवपूर्वक भूतकाळ विसरायचा प्रयत्न करतो.’ या त्याच्या मनोवृत्तीत आणखी एक ‘आयडिया ऑफ देवानंद’ दडलेली आहे.
खरं तर अगदी तरुण माणसेही जरा पण चांगला असलेला काल-परवाचा भूतकाळ किती चवीनं चघळत असतात. देवचा तर १९४५ ते १९८० पर्यंतचा भूतकाळ किती वलयांकित आहे. त्यात उत्तुंग यश, प्रेक्षकांचं गुदमरून जावं असं प्रेम, सुंदर स्त्रिया आणि पैसा- किती सारं काही किती अधिक प्रमाणात आहे!
‘हम दोनो’, ‘गाईड’, ‘ज्वेलथीफ’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘हरे कृष्णा हरे रामा’सारख्या सिनेमांचं अफाट यश व तेवढीच देवदुर्लभ लोकप्रियता आहे. पण हे सारं मागे वळून आठवायला आणि त्यावर बोलायला देवला कधी आवडलं नाही. तो आज आणि आत्ता करत असलेला (टुकार असला तरी) सिनेमाबद्दल, त्यातल्या कोवळ्या सुंदर वेस्टर्नाईजड नायिकेबद्दल व तिच्या शरीर सौंदर्याबद्दल (‘शी हॅज ग्रेट लेग्ज! शी इज चार्मिंग अँड सेक्सी’) भरभरून बोलायचा व समोरच्यालाही भारावून टाकायचा. ही त्याची वर्तमानात सदैव जगण्याची वृत्ती त्याला ताजा, प्रासंगिक व समकालीन तरुण ठेवते असे.
जेव्हा राजेश खन्ना व अमिताभ बच्चन सिनेसृष्टीचे सरताज होते, त्या काळात साठीतल्या देवचे ‘जॉनी मेरा नाम’, ‘जोशीला’ हे चित्रपट धमाल उडवत होते. यातून त्याची प्रासंगिकता दिसते. लक्षातघ्या, त्याच्यापेक्षा दोन वर्षे लहान असलेला राज कपूर या काळात ‘कल, आज और कल’, ‘धरम करम’मध्ये बापाचा रोल करत होता. दिलीप कुमार चरित्रनायक बनला होता. पण देव शेवटच्या क्षणापर्यंत सिनेमाचा नायकच होता. अगदी ८८व्या वर्षी प्रदर्शित झालेल्या २०११च्या ‘चार्जशीट’मध्येही त्याचं प्रधान पात्र होतं व कॅमेऱ्याचा तोच प्रमुख फोकस होता. तेव्हाही तो ऐंशीऐवजी साठीतला प्रौढ वाटत असला, तरी त्याचा जुना चार्म व देखणेपणा बऱ्याच अंशी कायम होता, हे आवर्जून सांगितलं पाहिजे.
सूरज सनिम या प्रसिद्ध पटकथालेखकाने देवसाठी ‘छुपा रुस्तुम’, ‘देस परदेस’ व ‘हिरा पन्ना’ आदी सिनेमाच्या पटकथा लिहिल्या होत्या. त्यानं एकदा देवबाबत फार मार्मिक टिपणी केली होती. ‘देवानंदसाठी भूतकाळ हा जणू अस्तित्वात नाही. तो आजच्यासाठी वर्तमानासाठी आणि उद्याच्या अधिक चांगल्या भविष्यकाळाच्या आशावादासाठी जगतो. तो खरे तर जाणीवपूर्वक भूतकाळ विसरायचा प्रयत्न करतो.’ या त्याच्या मनोवृत्तीत आणखी एक ‘आयडिया ऑफ देव आनंद’ दडलेली आहे.
१९८२ साली प्रदर्शित झालेल्या देव आनंदच्या ‘स्वामी दादा’ या सिनेमाचं आदल्या वर्षी एका स्टुडिओत शुटिंग सुरू होतं. बाजूलाच राज कपूरच्या ‘चोर मंडली’ या कधीच प्रदर्शित न झालेल्या सिनेमाचं पण शुटिंग चालू होतं. राज कपूर ब्रेकमध्ये देवला भेटायला गेला, तेव्हा जुन्या आठवणीनं ‘नॉस्टेल्जीक’ होत म्हणाला, ‘देव, आपले तारुण्यातले जुने दिवस किती सोनेरी होते नाही? किती प्रेम व आदर मिळायचा आपल्याला. पण आता काळ किती बदलला आहे नाही?’ त्यावर देवनं राजला मध्येच थांबवत उत्तर दिलं, ‘मला कळत नाही तू काय बोलतो आहेस ते. काळ तुझ्यासाठी बदलला असेल, माझ्यासाठी नाही.’
देव-दिलीप-राज या त्रिमूर्तींना चित्रजगत ‘थेस्पियन’ म्हणायचं, जे देवला कधी आवडायचं नाही. खरं सांगायचं तर त्याच्या चाहत्यांनाही. त्यांच्यासाठी तो कायमचा ‘चिरतरुण’ होता आणि शेवटपर्यंत राहिला. त्याचे अनेक टीकाकार म्हणतात की, देवचा आपलं वाढतं वय व वार्धक्य न स्वीकारण्याचा अट्टाहास, हा विकृतीच्या सीमेवरचा होता. काय हरकत होती, त्याला वयाप्रमाणं प्रौढ भूमिका करायला? त्याचे टीकाकार हे विसरतात की, तो कधीच चरित्रभूमिका करू शकला नसता, कारण तो स्टार होता. स्टाईल व मॅनेरिझमच्या साह्याने रूपेरी पडद्यावर रंगीत तारुण्याची प्रेम, फ्लर्टिंग आणि स्वप्नांची दुनिया गुलजार करणारा स्टार होता.
अभिनय (काही मोजके चित्रपट वगळता) हा त्याचा फारसा विशेष प्रांत नव्हता. त्याच्यात ती कुवत होती, पण चिरतरुण मनासोबत प्रयत्नपूर्वक जपलेलं तरुण शरीर, ट्रेडमार्क कॅप्स, रंगीबेरंगी कपडे व स्कार्फ, वेगवान संवाद फेक आणि स्टायलिश मॅनेरिझमच्या बळावर त्यानं शेवटपर्यंत स्टार आणि तरुण राहणंच पसंत केलं. ही त्याची निवड होती. एक तर ती तुम्हाला आवडेल वा न आवडेल, पण त्याचा अशा निवडीचा अधिकार होता.
आणि खरं सांगू का, वयाप्रमाणे भूमिका बदलणे हा निसर्ग नियम आहे, पण त्याला देवच्या रूपानं एक अलौकिक अपवाद सापडला, तर त्याचं कौतुक व स्वागतच केलं पाहिजे. आणि ते भारतीय सिनेरसिकांनी भरभरून केलं, यातच देवची प्रासंगिकता व ताजेपणा दिसतो... असा सिनेगंधर्व दुसरा होणे नाही, हेच खरं!
तर ही अशी ‘आयडिया ऑफ देव आनंद’ची प्रमुख सूत्रं सांगितल्यानंतर हे देव नावाचं नार्सिसस्टचं गोड गंधर्व रूप लाभलेलं चिरतरुण व लोभस रसायन कसं घडत गेलं, हे समग्रपणे जाणून घ्यायचं असेल, तर त्याचं ८५व्या वर्षी २००७ साली प्रकाशित झालेलं ‘रोमान्सिंग वुईथ लाईफ’ हे आत्मचरित्र वाचण्याखेरीज पर्याय नाही. तसेच यूट्यूबवर उपलब्ध असलेल्या सिमी गरेवाल, शेखर गुप्ता व इतरांनी त्याच्या २००५ ते २०१० च्या काळात घेतलेल्या मुलाखती पण पाहाव्यात. त्यातून त्याचं सदाबहार व्यक्तिमत्त्व उलगडलं जाऊ शकतं.
सुरैय्याशी लग्न झालं असतं, तर त्याचं स्टारडम कदाचित दीर्घकाळ टिकलं नसतं, असं त्याला मागे वळून पाहताना वाटत असणार. त्यामुळेच ‘सुरैय्या मला लाभली नाही, हे एका परीनं बरंच झालं’ असं तो म्हणला असणार. काही असो. आम्हा देव फॅन्ससाठी त्याचं ‘स्टार’ व ‘रोमँटिक’ असणं व त्याच्या चंदेरी पडद्यावरील प्रेमी नायकाच्या प्रेमात राहत आपण सामान्यजनांनी आपली अवांछित व प्रत्यक्षात न साकार होणारी स्वप्नं त्याचा रूपानं कल्पनेच्या पातळीवर पूर्ण करणं, हे आपल्यासाठी त्याच्या वैयक्तिक जीवनातील असफल प्रेमापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. त्यानं किमान तीन पिढ्यांना असं सुख व पूर्तता दिली, हे त्याचं मोठं यश म्हटलं पाहिजे!
देव हा एका उच्च मध्यमवर्गीय घरात जन्मलेला उच्चविद्याविभूषित नट होता. त्याच्याहून दहा वर्षं मोठा असलेला भाऊ चेतन आनंद हा त्याचा आदर्श. चेतनचं उत्तम इंग्रजी बोलणं, पाश्चात्य एटिकेटस्, कलावंतांची प्रतिभा आणि उंची जगणं, याचा देववर खोलवर प्रभाव जाणवतो. धाकटा भाऊ विजय आनंद (गोल्डी)वर पण त्याचं उत्कट प्रेम होतं. देव व गोल्डीने जे ‘क्लासिक’ सिनेमे दिले, त्यामागे दोघांची ट्युनिंग व तादात्म्य होतं. परस्परांच्या कलेवर विश्वास होता! देववर त्याच्या वडिलांचाही गहिरा प्रभाव होता, पण त्याच्यासाठी त्याची आई खास होती. तिच्या आजारपणात त्यानं तिची खूप सेवा केली होती. गोल्डीनं एकदा याबाबत फार हृदयस्पर्शी उद्गार काढले होते- ‘आम्हा तिघांत सर्वश्रेष्ठ देवच आहे. आम्ही त्याला सरपास करूच शकत नाही. कारण आईचा आशीर्वाद त्याच्याबरोबर होता!’
चित्रपटसृष्टीत गुरुदत्त व किशोरकुमारचं त्याच्या भावजीवनात खास स्थान होतं! देवला खरा ‘पीपल्स स्टार’ बनवलं ते गुरुदत्तनं. ‘बाजी’ या सिनेमापासून देवचं स्टारपण सुरू झालं, ते पुढे विजय आनंदनं ‘जॉनी मेरा नाम’पर्यंत कितीतरी ठळकपणे अधोरेखित करीत पुढे नेलं. देव व गुरू हे ‘प्रभात’ कंपनीत धडपडणारे कलावंत. दोघांनी मिळून भविष्याची कितीतरी स्वप्नं पाहिली होती. दोघंही पुढे आपापल्या परीनं मोठे झाले. गुरुदत्तचा अकाली मृत्यू देवला रडवून गेला. किशोरकुमार त्याचा ‘जिद्दी’पासूनच ‘आवाज’ होता... त्याचं स्टारपण वलयांकित करण्यात किशोरच्या स्वच्छंदी स्वरांचा फार मोठा हात होता!
पण नार्सिसिस्टप्रमाणे त्याचं सर्वांत आधी व सर्वांत जास्त स्वतःवर, स्वतःच्या ‘स्टारपणा’वर प्रेम होतं. बाकी जीवनात त्याच्यासाठी पत्नी कल्पना, मुले पण कमीच होती. व्यवहारी जगाची फूटपट्टी लावली, तर याला स्वार्थी व आत्मकेंद्रीपणा म्हणता येईल. तो खराही आहे, पण त्यानं घरच्यांसाठी आयुष्यभराची उत्तम तरतूद केली होती. झिनत अमाननंतर अपवाद वगळता कल्पनावर पत्नी म्हणून त्यानं एकनिष्ठ प्रेमही केलं होतं. बाप म्हणून बाल सुनीलला घेऊन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो सहजपणे हिंडला. दोन्ही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे शिक्षण, करिअर व लग्नं करू दिली, पण आपली तरुण प्रतिमा व स्टारडमसाठी त्यानं कुटुंबाला सिनेसृष्टीपासून दूरच ठेवलं, ही वस्तुस्थिती आहे!
आधी गुरुदत्त, राज खोसला व चेतन आनंद, मग गोल्डीच्या दिग्दर्शनाखाली त्याच्या ‘नवकेतन’ संस्थेने एकापेक्षा एक सरस व हिट चित्रपट निर्माण केले. पण मग त्याला साठीच्या थोडं मागेपुढे दिग्दर्शनाचा किडा दंश करून गेला. त्यानं सुरुवातीला ‘प्रेमपुजारी’, ‘हरे कृष्णा हरे रामा’, ‘देस परदेस’ व ‘लूटमार’ हे बऱ्यापैकी चांगले सिनेमे दिले. मग मात्र त्याचा स्वतःच्या लेखन व दिग्दर्शकीय प्रतिभेवरचा विश्वास इतका वाढला गेला की, त्यानं ‘आली लहर केला कहर’ या उक्तीप्रमाणे ‘स्वामीदादा’ ते ‘चार्जशीट’ असे डझनभर सुमार म्हणता येईल असे भुक्कड चित्रपट निर्माण केले... जे आठवडाभर पण कुठे चालले नाहीत. पण त्याच्या प्रत्येक चित्रपट निर्मितीचा उत्साह तोच व तेवढाच असायचा.
‘आय टेक लाईफ अॅट इट कमस्’ हे देवानंदचं आणखी एक जगण्याचं लाडकं तत्त्वज्ञान होतं. त्याच्या ‘हम दोनो’मध्ये साहिरचं एक गाजलेलं गीत आहे, ‘मैं जिंदकी का साथ निभाता चला गया...’ ते त्याच्या जगण्याचं जणू प्रतीक रूप आहे. माणसाला जीवनात सुखी व्हायचं असेल, तर ‘हर फिक्र धुए में उडाता चला गया...’प्रमाणे, जशी सिगरेटची राख चुटकीसरशी झटकता येते, तशी जीवनातली दुःख, निराशा झटकता आली पाहिजे. देवानंदला ही कला जमली होती.
चित्रपट निर्मितीच्या दरम्यान आपण निर्माण करत असलेला सिनेमा हा काहीतरी भव्य-दिव्य, काळाच्या पुढचा ग्रेट असणार आहे, असा त्याचा अभंग आत्मविश्वास असायचा. पडलेला व टीकाकारांनी झोडपलेला प्रत्येक मागच्या सिनेमाच्या अपयशाचा त्याच्यावर काहीच परिणाम व्हायचा नाही. ‘रोमान्सिंग वुईथ लाईफ’चा उत्तरार्ध त्यानं दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक सिनेमाबाबत स्वस्तुतीने ओतप्रोत भरलेला म्हणून काहीसा कंटाळवाणा झाला आहे. त्यात भरपूर तपशील आहे, गोष्टीवेल्हाळपणा आहे, नव्या कोवळ्या अठरा-विशीतल्या नव्या नायिकांचा शोध आपणास कसा लागला, याच्या रंजक वर्णनांनी व पुनरुक्तीनं भरलेला आहे. परदेशात हॉटेल, पब, डिस्कोमध्ये कुणीतरी तरुणी त्याला भेटणं, तिचा सुंदर चेहरा, तिची सेक्सी फिगर व ‘ग्रेट लेग्ज इन स्कर्ट’ इत्यादीनं आकर्षित करणं मग त्यानं तिला रोल ऑफर करणं...
हे सारं वाचताना देवच्या वाढत्या वयातील त्याची सेक्स, तारुण्य व स्त्रीच्या देहसौंदर्याची वाढती आसक्ती आत्मचरित्रात पानोपानी जाणवते. त्यातही त्याच्यावर मुली कशा फिदा होतात, त्यांच्याशी देवनं केलेलं ‘हार्मलेस’ फ्लर्टिंग व स्तुतीवजा संभाषण याचेही तपशील पानोपानी वाचकांना वाचायला मिळतात. मग त्याच्या ‘सेक्शुअल अफेअर’ची धीट व ‘व्होएरेस्टिक’ वर्णनं तपशीलानं येतात. हे सारं अनोळखी स्त्रियांबाबत. नायिकेसोबत केवळ हलकंफुलकं फ्लर्टिंगचा अंश असलेलं संभाषण, तसंच त्या देवच्या चार्मनं कशा प्रभावित व्हायच्या, याचं रसिलं वर्णन देव आत्मचरित्रात करत राहतो. यातूनही त्याची ‘डॅशिंग’, ‘डिबोनियर’ व ‘एव्हरग्रीन’ प्रतिभा वाचकांच्या मनात गडद राहावी, असा त्याचा उघड प्रयत्न दिसतो.
खरं तर देवचं हे आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या प्रेमात ठार बुडालेल्या एका कमालीच्या नार्सिसिस्ट स्टारचं जीवनचरित्र आहे. त्यात मानवी दु:ख, प्रेमभंग, अपयश चवीपुरतं, यशाचं गोडपण वाचताना फारच गोड गोड वाटू नये इतकंच येतं! पण ते खरं व प्रामाणिक आहे, हेही जाणवल्यावाचून राहवत नाही. कारण देवचं व्यक्तिमत्त्वच तसं आहे. म्हणूनच तो देव आहे.
ज्या वेळी ‘हम एक हैं’ हा (१९४५ साली) प्रभात कंपनीचा पहिला सिनेमा त्याला मिळाला, तेव्हा पी. एल. संतोषी या दिग्दर्शकानं त्याच्याबद्दल म्हणलं होतं- ‘देव हँडसम आहे, त्याचं हास्य दिलफेक आहे व त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक आकर्षण आहे.’ ते देवनं शब्दश: भावार्थासह खरं मानत स्वत:वर प्रेम केलं! आणि त्याचाच एक भाग म्हणून नवनव्या अठरा-विशीतल्या मॉडर्न, आंग्लाळलेल्या, परफेक्ट फिगर असणाऱ्या बिनधास्त सेक्सी तरुण मुलींना नायिका म्हणून आपल्या सिनेमात आपल्या सोबत ‘कास्ट’ करणं (आठवा झिनत अमान, टीना मुनिम, रिचा शर्मा, अनिता अयुब, मिंक इत्यादी) आणि आपलं तारुण्य टिकवणं, यात जणू देवनं परफेक्शन पूर्णत्व मिळवलं होतं. त्या अर्थानं तो शेवटपर्यंत ‘रूपपुजारी’ व ‘प्रेमपुजारी’च राहिला.
त्याने जीवनाप्रमाणे सिनेमातही शेवटपर्यंत ‘लीड’ - प्रमुख रोल भूमिका सोडली नाही. त्याबाबतचा एक किस्सा सांगण्याजोगा आहे. २००७ साली फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’ हा शाहरूख खान-दीपिका पदुकोणचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या एका गाण्यात दोन डझन स्टार्स - थेट धर्मेंद्र-रेखापासून सर्व टॉपचे स्टार्स नाचत होते. त्या गाण्यासाठी फराह खाननं देवला ‘गेस्ट ॲपिरियन्स’साठी विचारलं होतं, तेव्हा त्यानं नकार देताता म्हटलं होतं, ‘मी आजही फक्त लीड रोलच करतो’.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
देवने मुलगा सुनील आनंदला ‘लाँच’ करण्यासाठी ‘आनंद और आनंद’ हा ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’वर बेतलेला सिनेमा काढला, पण त्यातही सुनीलच्या बरोबरीनं प्रत्येक फ्रेममध्ये देव होता. हा त्याच्या नार्सिसिझमचा कळस होता. मुलगा हिरो म्हणून प्रस्थापित व्हावा, म्हणून काढलेल्या सिनेमातही देवला दुय्यम रोल स्वतःकडे घेणं व कॅमेरा सुनीलवर फोकस करणं मंजूर नव्हतं. तो सिनेमा पाहताना म्हणजे त्याची काही दृश्यं यू-ट्यूबवर पाहताना मला देवमध्ये ‘ययाती’ दिसत होता! त्यामुळे मी अस्वस्थ झालो, पण देव कदापिही झाला नसणार!
या सिनेमाच्या अपयशानंतर सुनीलनं पुन्हा कधीच सिनेमात शक्य असूनही काम केलं नाही, पण नंतर दहा-बारा वर्षं देव स्वत:ला प्रमुख भूमिका देत सिनेमा काढत राहीला... यावर हसावं की टीका करावी, की देव हा मानवी वर्तनाला अपवादरूप होता, म्हणून त्याचं कौतुक करत त्याच्या पडद्यावरच्या लोभस रूपावर प्रेम करावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे....
पण काहीही असो, देव हे बॉलिवुडचं एकमेव असं अद्वितीय अदभुत रसायन आहे. तो अखेरपर्यंत चिरतरुण स्टार राहिला. त्यानं आपल्या मनाप्रमाणे शरीराचं तारुण्य कसोशीनं जपलं, हे महत्त्वाचं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याचं वर्तमानात अखंड जगणं, दुःख-पराजय सहजतेनं पचवत विसरणं, अखंड कार्यमग्न राहणं आणि सिनेमा या माध्यमाशी अखंड निष्ठा राखत, त्या माध्यमातून जीवनाशी सतत रोमान्स व प्रणयक्रीडा करणं, हा देवच्या ८८ वर्षांच्या जीवनाचा सारांश आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
देवचा उत्साह आणि कार्यप्रवणता एवढी प्रचंड ऊर्जामयी आहे की, त्याला शंभर वर्षांचं आयुष्यही कमी पडावं. तो त्याच्या जलदगती संवाद फेकीसाठी प्रसिद्ध होता. त्याबाबत त्याला अनुपम खेरनं एकदा विचारलं असता, त्याचं उत्तर होतं- ‘लाईफ इज सो शॉर्ट, आय कांट स्पीक स्लोली’. इथं ‘स्पीक’ऐवजी ‘वर्क’ हा शब्द टाका. मग त्याच्या अखंड कार्यमग्नतेचं रहस्य लक्षात येतं!
देव कधीच स्थिर राहायचा नाही. सिनेमाच्या निमित्तानं तो देश-विदेश अखंड भटकायचा. त्याचं अवघं जीवन एक न संपणारा तरुण सिनेमा होता. त्यामुळे आपण जीवनाची किती वर्षं पार केली, याची त्याला पर्वा नव्हती. मुख्य म्हणजे जाणीव नव्हती. फक्त आत्मचरित्र लिहिण्यासाठी त्यानं मागं वळून पाहिलं असावं, पण तेथेही त्याचा फोकस बालपण व गतजीवनापेक्षा अलीकडचाच अधिक होता!
त्यामुळे या ‘आयडिया ऑफ देव आनंद’च्या संकल्पनेचा शोध घेणाऱ्या या लेखाचा शेवट त्याच्या एका मुलाखतीमधील वाक्यानं करणं मी पसंत करेन. त्यात तो म्हणतो : ‘‘माझा चाळीस वर्षांचा सिनेजगाचा प्रवास झाला आहे, यावर विश्वास बसत नाही. मी कधीच आर्मचेअरवर विसावत पुस्तक हाती घेत म्हातारा होणार नाही. त्याची मला कल्पनाही करवत नाही. मी सदैव हिंडत राहीन... तेच माझं भागधेय व जीवन आहे...”
हॅटस ऑफ टू यू देव!
.................................................................................................................................................................
लेखक लक्ष्मीकांत देशमुख कथा व कादंबरीकार आणि अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.
laxmikant05@yahoo.co.in
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment