जगामध्ये ज्या भूमींना हजारो वर्षांचा इतिहास आहे, परंपरा आहेत, त्यापैकी एक म्हणजे भारत. या भूमीच्या तत्त्वज्ञानाने इतर भूमींतील किती समाजांना प्रभावित केले असेल, याचा अभ्यास तितकासा झालेला नाही. मनोविश्लेषणाचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांच्यावर जर्मन तत्त्वज्ञान आर्थर शापेनहावर यांचा प्रभाव होता आणि त्यांच्यावर उपनिषदांचा प्रभाव होता.
ते म्हणतात, ‘‘उपनिषद हे मनुष्याच्या उच्च विवेकाचा आविष्कार होते. उपनिषदांच्या प्रत्येक वाक्यातून खोल, अभिनव आणि भव्य असे विचार येतात. संपूर्ण संसार या पवित्र अशा विचारांनी व्यापला जातो. संपूर्ण जगामध्ये उपनिषदांइतका उपकारक आणि मनुष्याला उन्नत विचार नाही.”
प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन यांच्या मतानुसार “जगामध्ये हिंदू हा एकच धर्म असा आहे- ज्यामध्ये ही कल्पना केली गेली आहे की, संसार हा अगणित अशा जन्म-मृत्यूतून जातो. हा एकमेव धर्म आहे, ज्यामध्ये काळाबद्दलचे प्रमाण आधुनिक वैज्ञानिक खगोलशास्त्राशी सुसंगत आहे.”
इथे कुठल्याही इतर धर्माला दुय्यम दाखवण्याचा प्रयत्न नाही. मुद्दा हा आहे की, हिंदू तत्त्वज्ञानावर जितकी चर्चा व्हायला हवी, तितकी होताना दिसत नाही. हिंदू धर्मामध्ये अलीकडच्या काही शतकांमध्ये जे महान तत्त्वज्ञ होऊन गेले, त्यांपैकी स्वामी विवेकानंद सर्वांत महत्त्वाचे आहेत. हिंदू धर्मामधील गीतेचे तत्त्वज्ञान जितक्या सहजपणे ते सांगायचे, तितक्याच सहजपणे चार्ल्स डिकन्सची प्रसिद्ध कादंबरी ‘पिकविक पेपर्स’बद्दलही सांगायचे.
हिंदू तत्त्वज्ञान, गीता, उपनिषद, विविध शास्त्र इत्यादींत पारंगत असणारे विवेकानंद जगाचा इतिहास, धर्मांचा इतिहास अशा विविध विषयांवरही अधिकारवाणीने बोलायचे. त्यांचे युरोप यात्रांचे प्रवासवर्णन जरी वाचले, तरी आपल्या हे लक्षात येते. यामुळेच हिंदू तत्त्वज्ञानाची चर्चा करत असताना विवेकानंदांचे त्यावरील भाष्य समजावून घेणे महत्त्वाचे ठरते.
एखाद्या तत्त्वज्ञानाची उपयुक्तता तेव्हाच ठरते, जेव्हा त्या काळातील प्रश्नांची उत्तरे त्या तत्त्वज्ञानात मिळतात. आतापर्यंत हिंदूंचे तत्त्वज्ञान यावर खरे उतरलेले आहे. अलीकडच्या काळातील सर्वांत मोठे उदाहरण घ्यायचे असल्यास पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामध्ये काही राष्ट्रे हिंसा व द्वेषाची पताका फडकवत होते, तेव्हा या देशातील लाखो जनता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली अहिंसा व प्रेमाचा झेंडा उंचावत होती. शत्रूवर पण प्रेम करा, हा त्यांचा जयघोष होता. नंतर संपूर्ण जगाने हाच झेंडा हाती घेतला. पाश्चात्य देश भौतिकवादालाच ‘ईश्वर’ मानत होते, तेव्हा स्वामी विवेकानंद त्या देशांमध्ये जाऊन भौतिकवादाचे धोके सांगत होते.
आपल्या समाजापुढील आजचे प्रश्न काय आहेत? जगभरात घोंघावत असलेले युद्धाचे संकट आणि समाजामध्ये वाढलेली प्रचंड हिंसा, द्वेष व धर्मांधता या संपूर्ण मानवी समुदायाला संपून टाकेल की काय, ही भीती सर्वांच्या मनामध्ये आहे. एकीकडे जगामध्ये फक्त एक टक्का लोकांकडे एकवटलेली ५० टक्के संपत्ती आणि त्याच वेळी जगामध्ये ४२ टक्के लोकांकडे पोषक आहार घेण्यासाठी पैसे नाहीत. जगामध्ये ‘विकसित’ समजल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये २० टक्के म्हणजे पाच कोटी लोक हे मानसिक आजाराने त्रस्त आहेत, तर एक कोटी वीस लाख लोकांनी गंभीरपणे आत्महत्येचा विचार केलेला आहे.
या अत्यंत भयानक परिस्थितीमध्ये जगाला मार्ग दाखवण्याची जबाबदारी असलेला भारत दुर्दैवाने याच मार्गाने जात आहेत का, हा प्रश्न आहे. ज्या भूमीने ‘तेन तक्तेन भुंजीथाः’ म्हणत त्यागामध्ये सर्वोच्च आनंद आहे, असा संदेश दिला, त्या भूमीमध्ये फक्त पाच टक्के लोकांकडे देशाची ६० टक्के संपत्ती आहे आणि १९ कोटी लोक रोज उपाशी झोपतात.
जर एक धर्म सत्य असेल, तर सर्व धर्म सत्य असतील, असे जगाला ठणकावून सांगणाऱ्या विवेकानंदांच्या देशामध्ये धर्मांधता प्रचंड वाढलेली आहे. याच देशामध्ये जवळपास प्रत्येक २० मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो आहे. जातीय अत्याचार अजूनही संपलेले नाहीत. अशा वेळी हिंदूंचे तत्त्वज्ञान पुन्हा एकदा जगाला मार्ग दाखवेल का?
वेद हिंदू धर्माचा पाया मानले जातात. वेदांचे दोन भाग आहेत. एक, कर्मकांड आणि दुसरा ज्ञानकांड. कर्मकांडामध्ये यज्ञयाग वगैरे येतात. ज्ञानकांड हा हिंदू धर्माचा आध्यात्मिक अंश आहे. त्यालाच ‘वेदान्त’ म्हणजे ‘वेदांचा अंतिम भाग’ असे संबोधले जाते. हाच हिंदू धर्माचा तत्त्वज्ञानात्मक पाया आहे. वेदान्त आणि इतर धर्मग्रंथांमध्ये विरोधाभास असल्यास वेदान्ताचे मानणे ग्राह्य धरले जाईल, ही मांडणी विवेकानंदांनी विविध भाषणांमध्ये केलेली आहे.
भारतामध्ये वेदान्ताचे तीन व्याख्याकार असले, तरी वेदान्त म्हणजे ‘अद्वैत वेदान्त’ हे पर्यायवाची झालेले आहे. यामध्ये द्वैत, विशिष्टाद्वैत, अद्वैत असे तीन संप्रदाय येतात. विवेकानंद यांच्या मतानुसार या संप्रदायांमध्ये कुठलाही वाद नसून वेदान्ताचा झालेला हा क्रमविकास आहे. यामध्ये विकासाचे सर्वोच्च टोक म्हणजे ‘अद्वैत वेदान्त’. याचा अर्थ असा नाही की, इतर दोघांचे स्थान कनिष्ठ आहे. मनुष्याच्या आध्यात्मिक विकासामध्ये या तिघांचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.
विवेकानंदांच्या मतानुसार त्या काळामध्ये या भूमीतील लोकांनी सत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आनंद म्हणजे काय, मनुष्याच्या अस्तित्वाचे कारण काय, अशा इतर अनेक प्रश्नांचा तो शोध होता. ‘नासदीय सूक्ता’मध्येसुद्धा हीच जिज्ञासा आलेली आहे.
‘नास॑दासी॒न्नो सदा॑सीत्त॒दानीं, नासी॒द्रजो॒ नो व्यो॑मा प॒रो यत् ।
किमाव॑रीवः॒ कुह॒ कस्य॒ शर्म॒न्नम्भ, किमा॑सी॒द्गह॑नं गभी॒रम् ॥१॥’
(ना नसणे होते, ना होते असणे, मुळारंभी (पृथ्वी नव्हती) वातावरण नव्हते, त्यापलिकडील अवकाश नव्हते (मग झाकलेले काही होते का?) कशाने झाकलेले? कुठे? कुणाच्या ताब्यात (कोणी)? द्रव (तरी) होते काय? अगाध, अथांग)
सुरुवातीला त्या ऋषींनी बाह्य जगामध्ये हे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला. यज्ञादी इतर कर्मकाडांचा शोध, हा याचाच परिणाम होता. पण हा प्रयत्न पुरेसा नव्हता. भारतीय मनाला बाह्यजगामध्ये जितके मिळणार होते, त्यामध्ये त्यांचे समाधान झाले नाही.
विचारात घेण्यासारखी बाब म्हणजे, हा शोध घेत असताना या ऋषींनी या गोष्टी देवावर किंवा नशिबावर सोडल्या नाहीत. त्यांनी स्वतःहून याचा शोध सुरू केला. त्यांनी इतकंच केलं नाही, तर जे त्यांनी शोधलं त्यावरसुद्धा प्रश्न विचारले आणि समानधानकारक न वाटल्यानं पुन्हा शोध सुरू केला. उदा. यज्ञामुळे जेव्हा त्यांचे समाधान झाले नाही, तेव्हा त्यांनी ते सोडून नव्याने शोध सुरू केला. ऋषींची ही पद्धत तर्कशुद्ध होती.
यानंतर हा शोध बाह्यजगातून मनुष्याच्या अंतरंगाकडे वळला. ‘अस्तीत्यके नायमस्तीति चैके’ - कुणाचे म्हणणे आहे की, मनुष्याच्या मृत्यूनंतर आत्माचे अस्तित्व राहते, तर कोणी म्हणतो की राहत नाही. यमराज यापैकी कोणते सत्य आहे?’ या संसारामध्ये असे काय आहे -
‘तत्र सूर्यः न भाति चन्द्रतारकम् च न इमाः विद्युतः न भान्ति अयं अग्निः कुतः तत् प्रकाशयेत् तं भान्तम् एव सर्वम् अनुभाति। तस्य भासा इदं सर्वम् विभाति॥’
(जिथे सूर्याचे किरण पोहोचत नाही, जिथे चंद्र आणि तारे चमकत नाही, वीज पण त्या स्थानाला प्रकाशित करू शकत नाही, तिथे अग्नी पण कसे जाळू शकेल? जे काही चमकत आहे, तो प्रकाश आहे. संपूर्ण विश्व त्याच प्रकाशाने प्रकाशित होत आहे.)
हा त्या काळातील ऋषींचा प्रश्न होता. त्यांना हे माहीत करून घ्यायचे होते की, अशी कोणती गोष्ट आहे, ज्याचे ज्ञान झाल्यामुळे संपूर्ण विश्वाच्या रहस्याचे ज्ञान होईल.
स्वामी विवेकानंद यांनी ‘वेदान्त’ या विषयावर अत्यंत गाजलेली भाषणे दिली आहे. यामध्ये ते म्हणतात की, ऋषींना या सर्व प्रवासात ते सत्य सापडले. ऋषी या निष्कर्षांपर्यंत पोहोचले की, प्रत्येक मनुष्य हाच ब्रह्म किंवा ईश्वर आहे. त्यांनी म्हटले, ‘तत्वमसि, श्वेतकेतु’ - ‘तूच ब्रह्म आहेस, श्वेतकेतु’. हे भारतीय परंपरेने गाठलेले उच्च टोक होते. हीच या भारतभूमीची संपूर्ण विश्वाला देणगी आहे.
वेदान्त सांगते की, मनुष्य हाच ईश्वर, परमात्मा, ब्रह्म किंवा सत् आहे. मनुष्याला इतर मनुष्य, प्राणी इत्यादींशी भिन्न करणाऱ्या सर्व गोष्टी या माया आहेत. उदा. मनुष्य इतर मनुष्यांशी करत असलेली स्पर्धा ही माया आहे, कारण स्पर्धा मनुष्याला इतर मनुष्यांपासून भिन्न करते. विवेकानंद जातीव्यवस्थेलासुद्धा ‘माया’ संबोधतात.
स्वामी विवेकानंद राष्ट्रांच्या विशेषाधिकारालासुद्धा अमान्य करतात- “कुणालाही इंचभर विशेषाधिकार नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये समान सामर्थ्य आहे. एकामध्ये त्याची अभिव्यक्ती जास्त आहे, दुसऱ्यांमध्ये ती कमी आहे. प्रत्येकामध्ये समान क्षमता आहे. मग विशेषाधिकाराचा दावा येतो कुठून? एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे, हा भाव वेदान्तामध्ये निरर्थक आहे आणि दोन राष्ट्रांमध्ये एक राष्ट्र श्रेष्ठ आहे हा विचारसुद्धा निरर्थक आहे.”
त्याबाबत ते एक कथा सांगतात - एक हिंदू पौराणिक कथा आहे. त्यामध्ये ईश्वराने एकदा पृथ्वीवर वराहाचा म्हणजे डुकराचा अवतार घेतला. त्यांची एक मादी वराह होती. कालांतराने त्यांना अनेक वराह झाली. त्यांच्या परिवारामध्ये ते मोठ्या आनंदामध्ये राहिले. चिखलामध्ये लोळत ते मोठ्या सुखामध्ये राहत होते. ईश्वर स्वत:चे दिव्य माहात्म्य आणि ईश्वरत्वला विसरले. यामुळे देवगण मोठ्या चिंतित होते. देव पृथ्वीवर आले आणि त्यांच्या वराह शरीराचा त्याग करत देवलोकांमध्ये चालण्याची विनंती केली. ईश्वराने त्यांचे ऐकले नाही. त्यांना झिडकारले. ईश्वर म्हणाले, ‘मी येथेच मोठा प्रसन्न आहे आणि सध्याचे रूप मी सोडू इच्छित नाही (कारण यामध्ये मला अत्यंत सुख मिळत आहे)’. कुठलाही पर्याय नसल्याने देवांनी ईश्वराचे वराहरूप भंग केले, ते शरीर नष्ट केले. त्याच वेळी ईश्वराची भव्यता परत आली आणि ते आश्चर्यचकित झाले की, ते वराहाच्या अवस्थेमध्ये प्रसन्न कसे राहिले?
या कथेमधून स्वामी विवेकानंद हे सांगू इच्छितात की, डुक्कराला चिखलामध्ये लोळत मिळत असलेल्या आनंदाप्रमाणे सध्या मनुष्य जो सुख घेत आहे, त्यालाच ‘खरे सुख’ मानत आहे. त्याला खरा आनंद माहीतच नाही. मनुष्याला त्याच्या दिव्यत्वाची प्रचितीच नाही. मनुष्याचा खरा आनंद या संसारामधील इतर जीवांशी असलेल्या एकत्वामध्ये आहे. त्याला जेव्हा ही अनुभूती होईल की, या संसारामध्ये असलेला प्रत्येक मनुष्य एकच आहे आणि त्यांच्यामध्ये कुठलीही भिन्नता नाही, तोच सर्वोच्च आनंद आहे.
इतकेच नाही तर मनुष्याचे या सृष्टीशी असलेले एकत्व हेच सर्वोच्च आहे. जेव्हा मनुष्य हे अनुभवतो, तेव्हा मनुष्य मुक्त होतो. मायाच्या बंधनातून मुक्त होतो आणि याचं आनंदाला ‘सत्-चित्-आनंद’ असे म्हणतात. मनुष्याला इतर जीवांपासून भिन्न करणाऱ्या सर्व गोष्टी या माया आहेत, तर त्याला एकत्वाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी या मुक्ती मार्ग दर्शवणाऱ्या आहेत. मुक्ती हेच मनुष्याच्या जीवनाचे लक्ष्य आहे, हेच वेदान्ताचा सार आहे.
हे एकत्व, एकमेवाद्वितीय ब्रह्म हेच मनुष्य जीवनाचे लक्ष्य आहे. आपल्याला दिसत असलेले भेद हे नाहीतच. मनुष्याच्या अज्ञानामुळे त्याचा तो भाव आहे, माया आहे. या अज्ञानापासून मुक्त होणे आणि मनुष्याला त्या एकत्वाची अनुभूती होणे, यालाच ‘मुक्ती’ असे म्हणतात. मायापासून स्वतंत्रता आणि माणसाच्या एकत्वाची अनुभूती हीच मुक्ती आहे.
या संसारामध्ये असलेला प्रत्येक मनुष्य एकच आहे आणि त्यांच्यामध्ये कुठलीही भिन्नता नाही, तोच सर्वोच्च आनंद आहे. इतकेच नाही तर मनुष्याचे या सृष्टीशी असलेले एकत्व हेच सर्वोच्च आहे. जेव्हा मनुष्य हे अनुभवतो, तेव्हा मनुष्य मुक्त होतो. मायाच्या बंधनातून मुक्त होतो आणि याचं आनंदाला ‘सत्-चित्-आनंद’ असे म्हणतात. मनुष्याला इतर जीवांपासून भिन्न करणाऱ्या सर्व गोष्टी या माया आहेत, तर त्याला एकत्वाकडे नेणाऱ्या सर्व गोष्टी या मुक्ती मार्ग दर्शवणाऱ्या आहेत. मुक्ती हेच मनुष्याच्या जीवनाचे लक्ष्य आहे, हेच वेदान्ताचा सार आहे.
शारिरिक स्वतंत्रता, मानसिक स्वतंत्रता आणि आध्यात्मिक स्वतंत्रता हाच वेदान्ताचा मूळ मंत्र आहे. वेदान्त मनुष्याच्या उद्धाराबद्दल बोलत नाही, कारण मनुष्य हाच ईश्वर किंवा ब्रह्म आहे. त्याचा उद्धार कोण करणार? वेदान्ताचा भर मुक्तीवर आहे.
आपण जेव्हा मनुष्य असे म्हणतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर मनुष्याचा ‘देह’ येतो. उदा. ‘अ’ नावाची व्यक्ती असे म्हटल्यावर रंग, डोळे, नाक इ. देहांशी संबंधित अवयवांच्या एक मनुष्याची आपण कल्पना करतो. वेदान्त हे नाकारते. मनुष्य ‘स्व:’पुरता मर्यादित विचार करतो. त्याला वाटते की, त्याचा देह म्हणजेच ‘तो’ आहे. वेदान्त म्हणते जे काही आहे ते ब्रह्म आहे. आपल्याला दिसत असणारे भिन्न रूप हे त्या ब्रह्माचे प्रक्षेपित रूप आहे. मायामुळे मनुष्याला त्याच्या दिव्यत्वाची प्रचितीच नाही. यामुळे इतर मनुष्य, पशु-पक्षी, झाड इत्यादींपेक्षा तो स्वतःला भिन्न समजतो, तो दुसऱ्यांना ‘भिन्न’ समजतो. यातूनच इतरांची घृणा, ईर्ष्या, दुःख, संघर्ष निर्माण होतो.
उदा. जर ‘अ’ मनुष्य एखाद्या ‘ब’ व्यक्तीवर हिंसा करतो, तेव्हा तो हे समजत असतो की, समोरचा ‘ब’ व्यक्ती हा फक्त ‘देह’ आहे. ‘अ’ व्यक्तीला मायामुळे हे समजत नाही की, सर्व ब्रह्माचे रूप आहेत. ‘अ’ आणि ‘ब’ असे नाहीतच. सर्व एकच आहेत. यामुळे ‘अ’ जेव्हा हिंसा करतो, तेव्हा तो खरं तर स्वतःवरच हिंसा करत असतो. तो मायाच्या आहारी जात मनुष्याच्या एकत्वाच्या लक्ष्यापासून दूर जातो आणि तो स्वतः मनुष्य असुनसुद्धा पशूच्या पातळीवर जातो.
वेदान्ताचे लक्ष्य मनुष्यामधील पवित्रता जागृत करणे आहे. हाच धर्म आहे. पूर्णत्व वा एकत्व हेच वेदान्ताचे लक्ष्य आहे आणि जोवर मनुष्य हे समजणार नाही, तोवर तो आनंदी होणार नाही. यावर विवेकानंद म्हणतात, “जेव्हा आपण समतेच्या अद्भुत स्थितीमध्ये येऊ, म्हणजेच साम्यभाव प्राप्त करू, तेव्हा त्या सर्व वस्तूंवर आपल्याला हसू येईल, ज्याला आपण दुःखाचे किंवा अशुभाचे कारण म्हणत होतो. याला वेदान्तामध्ये ‘मुक्ती लाभ’ म्हटले गेले आहे.”
स्वामी विवेकानंद यांनी ‘वेदान्त’ या विषयावर अत्यंत गाजलेली भाषणे दिली आहे. यामध्ये ते म्हणतात की, ऋषींना या सर्व प्रवासात ते सत्य सापडले. ऋषी या निष्कर्षांपर्यंत पोहोचले की, प्रत्येक मनुष्य हाच ब्रह्म किंवा ईश्वर आहे. त्यांनी म्हटले, ‘तत्वमसि, श्वेतकेतु’ - ‘तूच ब्रह्म आहेस, श्वेतकेतु’. हे भारतीय परंपरेने गाठलेले उच्च टोक होते. हीच या भारतभूमीची संपूर्ण विश्वाला देणगी आहे. वेदान्त सांगते की, मनुष्य हाच ईश्वर, परमात्मा, ब्रह्म किंवा सत् आहे. मनुष्याला इतर मनुष्य, प्राणी इत्यादींशी भिन्न करणाऱ्या सर्व गोष्टी या माया आहेत. उदा. मनुष्य इतर मनुष्यांशी करत असलेली स्पर्धा ही माया आहे, कारण स्पर्धा मनुष्याला इतर मनुष्यांपासून भिन्न करते. विवेकानंद जातीव्यवस्थेलासुद्धा ‘माया’ संबोधतात.
सर्वसाधारपणे एखाद्या धर्म म्हटला, तर धर्मग्रंथ, व्यक्तीविशेषची पूजा आणि त्याच धर्माची सत्यता या तीन बाबी आहेत. वेदान्त या तीन्ही बाबी नाकारतो. विवेकानंद ८ एप्रिल १९००मध्ये दिलेल्या ‘वेदान्त जगाचा भावी धर्म होईल काय?’ या भाषणामध्ये म्हणतात, “वेदान्त यापैकी कशावरही विश्वास ठेवत नाही. वेदांताची कुठल्याही ग्रंथावर आस्था नाही. एका ग्रंथाचा दुसऱ्या ग्रंथावरील अधिकार मान्य नाही. कोणताही ग्रंथ ईश्वर, जीव, परमतत्व इ. संबंधी सत्यांचा आश्रय होऊ शकतो, या दाव्याचा वेदान्त प्रबळ विरोध करतो.”
पुढे ते म्हणतात, “वेदान्त व्यक्तिविशेषाच्या आराधनेला मान्य करत नाही. तुमच्यापैकी जे वेदान्ताचे विद्यार्थी - वेदान्त म्हणजे उपनिषद - त्यांना माहीत आहे की, हाच एकमेव धर्म आहे, जो कोणत्याही व्यक्तीविशेषशी संबंधित नाही. कोणीही एकच स्त्री किंवा पुरुष वेदान्ताच्या आराधनेसाठी पात्र ठरू शकत नाही. हे शक्यच नाही. कोणता मनुष्य कुठल्याही पक्षी किंवा किटकापेक्षा पूज्य नाही. आपण सर्व भाऊ आहोत. अंतर फक्त परिमाणाचा आहे. जो क्षुद्र कीटक आहे, तो पण मीच आहे. यामुळे वेदान्तामध्ये कोणत्याही दुसऱ्या मनुष्यासमोर हात जोडून उभे राहणे, त्याची आराधना करणे, तो मनुष्य इतरांना जबरदस्तीने ओढून नेत उद्धार करेल, याची शक्यता नाही. वेदान्त मनुष्याला हे देत नाही. कोणताही ग्रंथ नाही, पूजा करण्यासाठी कुठलीही व्यक्ती नाही, काहीच नाही.”
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यानंतर स्वामी विवेकानंद जे म्हणतात ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. वेदान्त लोकशाहीवादी ईश्वराची शिकवण देतो. लोकशाही देशामध्ये सर्व व्यक्ती समान असतात आणि लोकशाहीची ताकद त्या प्रत्येक व्यक्तींमध्ये असते.
‘वेदान्त आणि विशेषाधिकार’ या अत्यंत महत्त्वपूर्ण भाषणामध्ये विवेकानंद म्हणतात, “विशेषाधिकाराचा भाव मानवी जीवनामधील विष आहे. दोन शक्ती निरंतर कार्य करत आहेत, एक मनुष्यजातीला एकत्र करत आहे आणि दुसरी मनुष्यजातीला भिन्न करत आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये असं आपण म्हणू शकतो की, एक विशेषाधिकार बनवण्यामध्ये आहे आणि दुसरी विशेषाधिकार तोडण्यामध्ये आहे. आणि जेव्हा कधी विशेषाधिकार तोडला जातो, तेव्हा मनुष्य समाजाचा विकास होतो. हा संघर्ष आपल्या आजूबाजूला आहे. ’’
यापुढे स्वामी विवेकानंद राष्ट्रांच्या विशेषाधिकारालासुद्धा अमान्य करतात- “कुणालाही इंचभर विशेषाधिकार नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये समान सामर्थ्य आहे. एकामध्ये त्याची अभिव्यक्ती जास्त आहे, दुसऱ्यांमध्ये ती कमी आहे. प्रत्येकामध्ये समान क्षमता आहे. मग विशेषाधिकाराचा दावा येतो कुठून? एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे, हा भाव वेदान्तामध्ये निरर्थक आहे आणि दोन राष्ट्रांमध्ये एक राष्ट्र श्रेष्ठ आहे हा विचारसुद्धा निरर्थक आहे.”
बोस्टनच्या ‘ट्वेन्टिएथ सेंचुरी क्लब’मध्ये ‘वेदांताचे सार तत्त्व आणि प्रभाव’ या भाषणामध्ये विवेकानंद म्हणतात, “जेव्हा मनुष्य उच्चतमला प्राप्त करतो आणि तो पुरुष बघत नाही, स्त्री नाही, लिंग नाही, धर्म नाही, वर्ण नाही, ना जन्म किंवा इतर या पद्धतीच्या मनुष्यांमध्ये दिसणाऱ्या भेदांना बघत नाही, तो पुढे चालत जातो आणि त्या दिव्यतेचा अनुभव करतो, जे मनुष्याचे सत्य स्वरूप आहे, जे मनुष्यामध्ये अंतर्भूत आहे - तेव्हाच तो विश्वबंधुत्व प्राप्त करतो आणि केवळ तोच व्यक्ती वेदांती आहे.”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
सध्याच्या आपल्यासमोर असलेल्या समस्यांवर उत्तर पण हेच तत्त्वज्ञान आहे. सध्याच्या समाजापुढे असलेल्या समस्यांपैकी एक आहे, वर उल्लेख केल्याप्रमाणे असलेली प्रचंड आर्थिक असमानता. भारतामध्ये फक्त पाच टक्के लोकांकडे देशाची ६० टक्के संपत्ती आहे. यावर वेदांताचे उत्तर काय? वेदांतानुसार हे पाच टक्के लोक मायामध्ये जगत आहेत. त्यांच्या संपत्तीलाच ते ‘सुख’ मानत आहेत. खरं तर त्यांचे सुख आभासी आहे. या सुखाला वेदान्त नाकारतो.
या पाच टक्के लोकांनी स्वतःवर संपत्तीचे बंधन घालून घेतले आहे. त्यामुळे इंद्रियसुखांपलीकडच्या एकत्वामध्ये असलेल्या ‘सत्-चित्-आनंदा’ला ते मुकले आहेत. विवेकानंद यांच्या मतानुसार तर ज्यांच्याकडे संपत्ती नाही, त्यांना मुक्त होण्याची लवकर संधी आहे. कारण त्यांच्यावर कुठलेही बंधन नाहीत. या लोकांना जर खरा आनंद हवा असेल, तर या पाच टक्के लोकांनी इतर ९५ टक्के लोकांसाठी ‘जगणे’ महत्त्वाचे आहे. तरच त्यांचा एकत्वाकडे प्रवास सुरू होईल. त्यांना ‘सत्-चित्-आनंद’ मिळू शकेल. तेव्हाच ते मुक्त होऊ शकतात. हेच समाजातील इतर समस्यांवर लागू होते.
हेच विश्वबंधुत्व, हेच मुक्तीचे तत्त्वज्ञान हिंदू धर्माचा पाया आहे. ‘मत कर माया का अहंकार’ म्हणणाऱ्या कबीरांचे तत्त्वज्ञान हेच आहे. महाराष्ट्रातील वारकरी संतांच्या विचारांचे मर्म हेच आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानामध्ये हेच आहे. ‘सकळांसी आहे येथे अधिकार’ असे सांगत भागवत धर्माची पताका फडकवणाऱ्या वारकरी संप्रदायाचे मूळ पण हेच आहे. या भारतभूमीचा आत्मा हाच आहे. ऋषींनी आपल्याला दिलेला हाच वारसा आहे.
विवेकानंदांच्या मतानुसार ‘समता सर्वभूतेषु एतन्मुक्तस्य लक्षणम्।’ (सर्व प्राणिजगतांमध्ये समता हेच खऱ्या मुक्तीचे प्रतीक आहे) हा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी भारतभूमीतील प्रत्येकाची आहे.
.................................................................................................................................................................
लेखक स्वप्निल फुसे पुण्यातील सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत. त्यासोबतच समाजावर प्रभाव टाकणाऱ्या विषयांचे अभ्यासकही आहेत.
prof.swapnil25@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment