नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘संवैधानिक राष्ट्र भारत पर आसन्न संकट व चुनौतियाँ’ या व्याख्यानमालेत रवीश कुमार यांनी शनिवार, ३ ऑक्टोबर २०२३ रोजी केलेल्या भाषणाचा हा अनुवाद -
.................................................................................................................................................................
१० वर्षे झाली माध्यमांच्या संबंधाने आपण बोलतो आहोत. माध्यमांचा आकार केवळ त्यांच्या नावापुरता राहिला आहे आणि त्यांचे काम ‘निराकार’ झालेले आहे. म्हणजे ते सध्या अस्तित्वात नाही, आणि त्याविषयी मला इथे बोलायचे आहे. काही पत्रकार असते, तर त्यांच्या कृतींबद्दल विश्लेषण केले असते. तुम्ही क्रिकेट न खेळताच स्वत:ला क्रिकेटपटू म्हणवून घेऊ शकता का? नाही म्हणू शकत. पण माध्यमांमध्ये मात्र तुम्ही पत्रकार असा किंवा नसा, तुम्ही अँकर होऊ शकता किंवा स्वत:ला ‘माध्यमकर्मी’ म्हणवून घेऊ शकता.
मी माध्यमांची ज्या ज्या वेळी चर्चा करतो, त्या त्या वेळी ती मुख्य प्रवाहातल्या त्या माध्यमांची करतो, ज्यांना सरकारकडून आणि बाजारातून लाखो-कोटी रुपयांच्या जाहिराती मिळतात. पत्रकारिता या पेशाकडे लोकशाहीतील अनिवार्य बाब म्हणून पाहिले जाते, पण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत. आज आपल्यासमोर आव्हान हे आहे की, जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, किंवा जी काही थोडीफार लोकशाही अस्तित्वात आहे, तिला वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा या माध्यमांपासून आपल्याला लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे.
पंतप्रधानांनी नुकतेच सांगितले की, ‘२०१४ ही केवळ एक तारीख नाही, तर बदलाचे युग आहे’. जी वास्तवात कुठेच दिसत नाही, ती गोष्ट म्हणजे ‘स्वप्न’. मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांच्या पेशात ही स्वप्ने कुठे दिसत नाही. स्वप्नेच नाहीत, ध्येयवाद ही तर मग खूपच दूरची गोष्ट.
पत्रकारितेतले कोणतेही स्वप्न हे संविधानिक मूल्य आणि लोकशाही मूल्यांशिवाय असू शकत नाही. पत्रकारांमध्ये ‘चांगला पत्रकार’ होण्याचं, ‘चांगली पत्रकारिता’ करण्याचे स्वप्न आता दिसून येत नाही.
‘माध्यमे’ हा खूप मोठी ‘उद्योग’ झालेला आहे. इथे हजारोंच्या संख्येने लोक काम करतात, आणि इथे काम करण्याच्या उद्देशाने हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पत्रकारितेचा अभ्यासक्रम निवडतात. वाईट याचे वाटते की, यांच्यामध्ये पत्रकारितेच्या संदर्भात स्वप्ने, ध्येये मात्र दिसत नाहीत. कधी कधी असे वाटते की, जर पत्रकारिताच शिल्लक नसेल, हा पेशाच संपत चालला असेल, तर मग विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारिता शिकत तरी का असतील?
आजचे पत्रकार आपल्या संपादकांकडे कोणती नवी ‘बातमी’ घेऊन जात असतील आणि संपादक कोणत्या बातमीसाठी आपल्या बातमीदारामागे उभे राहत असतील? नवे काहीतरी करण्याचे, अभ्यास करण्याचे सुख आम्ही आमच्या पत्रकारितेच्या व्यवसायात अनुभवलेय. हे आता संपले आहे. माध्यमांच्या मालकांनी, बाजारपेठेने हे स्वप्न, सुख संपवलेय. बातमीदारांमध्ये चांगल्या बातमीसाठी कु्ठलीच स्पर्धा राहिलेली नाही.
आजच्या ‘गोदी मीडिया’त कॉर्पोरेटचा पैसा मोठ्या प्रमाणावर आहे. तिरस्कार पसरवण्याचा धंदा जोरात चालू आहे. काही वर्षांपूर्वी माध्यमांच्या गुणवत्तेवर टीका केल्यावर असे उत्तर दिले जात होते की, ‘आम्हाला टीआरपीमुळे असे दाखवावे लागते, आमची मजबुरी आहे’. पण आता तर मुकेश अंबानींना टीआरपीची काहीच आवश्यकता नाही. टीआरपीमुळे असा किती पैसा मिळतो या माध्यमांना? मग आता नेमके काय झाले आहे? आज मुकेश अंबानींचा चॅनेल सर्वांत बेस्ट असायला हवा होता. आपली लोकशाही मूल्ये टिकवण्यासाठी ही माध्यमे प्रयत्न करत आहेत, असे आजघडीला कुठल्याही नागरिकाला वाटत नाही.
हीच ती माध्यमे आहेत, जी २०१४ पूर्वी ‘नागरिक पत्रकारिते’ची (सिटिझन जर्नालिझम) चर्चा करत होती. नागरिकांच्या वतीने प्रश्न विचारत होती. जनतेप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे, असे त्यांना वाटत होते. आंदोलनांच्या वेळी कितीतरी वृत्तवाहिन्यांनी तिथेच आपले स्टुडिओ बनवून थेट वार्तांकन केले.
हीच माध्यमे आता जनतेतील घटना घडामोडी हा आपला स्रोत आहे, हे विसरली आहेत. या माध्यमांनी सरकारला प्रश्न विचारायचे बंद करून, जनतेलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. लोकांना ‘गद्दार’, ‘देशद्रोही’ अशी तऱ्हेतऱ्हेची नावे ठेवली जात आहेत. ही माध्यमे माहितीच्या क्षेत्रातली ‘बाहुबली’ झालेली आहेत. त्यांचे काम आता ‘माहिती देणे’ हे राहिलेले नसून ‘लोकांपर्यंत खरी माहिती कशी पोहोचू शकणार नाही’, हेच झालेले आहे.
उदाहरण सांगतो. ऑलिम्पिक विजेत्या कुस्तीपटू महिला त्यांच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करत होत्या. त्यांच्या आंदोलनाच्या बातम्या या माध्यमांनी दिल्याच नाहीत. त्यांचा आवाज देशभर पोहोचवला नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना तर ‘आंदोलनजीवी’ असे म्हटले, माध्यमांनी त्यांना ‘आतंकवादी’ ठरवले.
माध्यमे जर जनतेचे विरोधक झाले, विरोधी पक्षांचेही विरोधक बनले, तर मग ते संविधानिक मूल्यांचे पालन करतील, अशी अपेक्षा ठेवणे व्यर्थच म्हणावे लागेल. म्हणूनच मी या ‘गोदी मीडिया’कडून काही अपेक्षा ठेवत नाही.
या माध्यमांनी ज्या वेळी असत्याशी लढण्याची वेळ आली, त्या वेळी त्याच्याशी दोस्ती केली. ही लढाई केवळ ‘अल्ट न्यूज’, ‘बूम लाईव्ह’सारखी माध्यमे लढली. ‘फेक न्यूज’चे खंडन करण्याचे काम माध्यमांनी करायला हवे होते, मात्र ते काम ही माध्यमे करत नाहीत. कारण या बातम्या ‘सरकारी’, ‘राजकीय’ आणि बहुतेकदा सत्ताधाऱ्यांनीच ‘पेरलेल्या’ असतात.
या ‘फेक न्यूज’च्या विरोधात छोट्या छोट्या माध्यमांनी काम केले आहे. मोहम्मद जुबेर यांच्या ट्विटर ‘टाईम लाईन’वर जाऊन पाहा, या एकट्या पत्रकाराने कितीतरी मोठे काम केले आहे! मुख्य प्रवाहातील माध्यमांनी हे करायला हवे. ‘फेक न्यूज’ उघडकीस आणल्यामुळे ‘एएनआय’च्या कितीतरी बातम्या नंतर त्यांना ‘डिलिट’ करायला लागल्या आहेत.
‘गोदी मीडिया’च्या पत्रकारांनी पहिल्यांदा स्वतःमधल्या पत्रकाराची हत्या केली. पत्रकारितेची शिकवण घेताना आपल्याला 5W (Who, What, When, Where, Why) आणि 1H (How) शिकवले जातात. मात्र यापासून माध्यमे दूर गेली आहेत.
या ‘गोदी मीडिया’ला एक सुंदर चेहरा मिळाला आहे, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यांच्या भोवतीच ही माध्यमे आपल्या बातम्या करत असतात. मोदींची लोकप्रियता वेगवेगळ्या राज्यांमध्ये कमीअधिक झाली, तरी या माध्यमांमध्ये मात्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. त्यांच्याप्रती माध्यमांची निष्ठा अबाधित आहे. तेच त्यांचे ‘विचार’ आहेत, तेच त्यांचे ‘संपादक’ आहेत, तेच त्यांच्यासाठी ‘बातमी’ आहेत.
या माध्यमांतून तुम्ही मोदी, भाजप, संघ सर्वांचे गुण पाहू शकता, मात्र विरोधी पक्षांना येथे कुठलेही स्थान नाही. त्यांचा सदैव उपहास केला जातो. विरोधकांची लोकप्रियता, त्यांचे काम अजिबात दाखवले जात नाही. अदानी आणि पुलवामा यांसारख्या मुद्द्यांवर कधीही प्रश्न विचारले जात नाहीत. राहुल गांधी, तेजस्वी यादव, आदित्य ठाकरे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील युवा नेत्यांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवून मांडली जाते. याउलट सत्ताधारी पक्षातील ७० वर्षांच्या व्यक्तीला मात्र युवा नेत्याप्रमाणे भासवले जाते. मोदींचा ‘संकल्प’ हाच या माध्यमांचा ‘संकल्प’ झालेला आहे.
एक टीव्ही अँकर सांगत होता, ‘जर मोदीजी आठवड्यात १०० तासांहून जास्त वेळ काम करू शकतात, तर या देशातील युवक आठवड्यात ७० तास काम का करू शकत नाहीत?’ असे भासवले जात आहे की, जसा काही युवकांना खूप चांगला रोजगार उपलब्ध आहे, मात्र युवकच कष्ट न करता स्वत:हून बेरोजगार राहतात. असेही म्हटले गेले की, ‘पकोडे तळणे’ हाही एक प्रकारचा रोजगारच आहे. मात्र या माध्यमांनी ‘अग्नीवीर’सारख्या योजनांवर ‘ब्र’देखील उच्चारलेला नाही. लोक कसे काय, या माध्यमांना सहन करू शकतात?
प्रेक्षक किंवा दर्शक म्हणून आपली स्वायत्तताच संपवून टाकली गेलीय. ज्याप्रमाणे पत्रकारांनी आपल्या ‘आतल्या’ पत्रकाराची हत्या केली, त्याप्रमाणेच दर्शकांनीही आपल्या ‘आतल्या’ दर्शकाची हत्या केली आहे. त्यांच्यातल्या सगळ्याच संवेदना लोप पावल्यात असे नाही, पण कुणाच्या तरी हत्येवर आनंदी होणे, अमूक एका वर्गासाठी काहीतरी ‘पर्मनंट सोल्यूशन’ करावे, असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
‘गोदी मीडिया’ न पाहण्याची मी अनेकदा चर्चा करतो, पण हे एवढे सोपे आहे का? यातून दर्शकांना बाहेर काढणे, ही अवघड गोष्ट बनली आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ माणसांना ‘धर्मांध’ बनवणे सोपे आहे, पण ‘धर्मांध’ व्यक्तींना किंवा ‘धर्मांधते’च्या आहारी गेलेल्या व्यक्तींना ‘धर्मनिरपेक्ष’ बनवणे, ही असाध्य वाटणारी प्रक्रिया आहे. जो व्यक्ती एकदा धर्मांध किंवा सांप्रदायिक बनतो, तो दीर्घकाळासाठी त्या विचारांच्या आहारी जातो. त्यामुळे दर्शकांना ‘गोदी मीडिया’ पाहू नका, असे सांगणे अवघड होऊन बसले आहे. कारण ते त्याच्या पूर्ण आहारी गेले आहेत. ते आपले सामान्य जगणे विसरून गेले आहेत. पण हेही तितकेच खरे आहे की, लोकांमध्ये जोपर्यंत जनजागृती होत नाही, जोपर्यंत लोक ‘गोदी मीडिया’च्या विरोधात उभे राहत नाहीत, तोपर्यंत हा ‘गोदी मीडिया’ असेच वर्तन करत राहणार.
‘गोदी मीडिया’ न पाहण्याची मी अनेकदा चर्चा करतो, पण हे एवढे सोपे आहे का? यातून दर्शकांना बाहेर काढणे, ही अवघड गोष्ट बनली आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ माणसांना ‘धर्मांध’ बनवणे सोपे आहे, पण ‘धर्मांध’ व्यक्तींना किंवा ‘धर्मांधते’च्या आहारी गेलेल्या व्यक्तींना ‘धर्मनिरपेक्ष’ बनवणे, ही असाध्य वाटणारी प्रक्रिया आहे.
जो व्यक्ती एकदा धर्मांध किंवा सांप्रदायिक बनतो, तो दीर्घकाळासाठी त्या विचारांच्या आहारी जातो. त्यामुळे दर्शकांना ‘गोदी मीडिया’ पाहू नका, असे सांगणे अवघड होऊन बसले आहे. कारण ते त्याच्या पूर्ण आहारी गेले आहेत. ते आपले सामान्य जगणे विसरून गेले आहेत. पण हेही तितकेच खरे आहे की, लोकांमध्ये जोपर्यंत जनजागृती होत नाही, जोपर्यंत लोक ‘गोदी मीडिया’च्या विरोधात उभे राहत नाहीत, तोपर्यंत हा ‘गोदी मीडिया’ असेच वर्तन करत राहणार.
भारताच्या लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. अर्थात माध्यमांनी समाजाचे मोठ्या प्रमाणावर विभाजनही केलेले आहे. म्हणून तर गांधीजींनीही ही माध्यमे न वाचण्याचा सल्ला लोकांना दिला होता. मात्र हेही तितकेच खरे की, स्वातंत्र्यापूर्वी जी माध्यमे ‘विभाजनकारी’ भूमिका घेत होती, ती तदनंतर लयास गेली.
भारताचा इतिहास पाहिल्यास पत्रकारितेत ‘संप्रदायवादी’ बीजे पेरल्याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. पण आज मात्र ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. आपण सांप्रदायिकतेशिवाय पत्रकारितेची कल्पनाच करू शकत नाही. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे.
तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही. तुमच्यातली संवेदना केव्हाच संपून गेलेली असते. मी ‘हिंदू-मुस्लीम’ असा शब्द वापरत नाही, तर ‘अँटी मुस्लीम’ हा शब्द जाणूनबूजून वापरतोय. कारण इथे सगळ्याच गोष्टी एकतर्फी घडत आहेत.
पत्रकारितेतले कोणतेही स्वप्न हे संविधानिक मूल्य आणि लोकशाही मूल्यांशिवाय असू शकत नाही. पत्रकारांमध्ये ‘चांगला पत्रकार’ होण्याचं, ‘चांगली पत्रकारिता’ करण्याचे स्वप्न आता दिसून येत नाही. वाईट याचे वाटते की, यांच्यामध्ये पत्रकारितेच्या संदर्भात स्वप्ने, ध्येये मात्र दिसत नाहीत. कधी कधी असे वाटते की, जर पत्रकारिताच शिल्लक नसेल, हा पेशाच संपत चालला असेल, तर मग विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने पत्रकारिता शिकत तरी का असतील? माध्यमांच्या मालकांनी, बाजारपेठेने हे स्वप्न, सुख संपवलेय. बातमीदारांमध्ये चांगल्या बातमीसाठी कु्ठलीच स्पर्धा राहिलेली नाही. आजच्या ‘गोदी मीडिया’त कॉर्पोरेटचा पैसा मोठ्या प्रमाणावर आहे. तिरस्कार पसरवण्याचा धंदा जोरात चालू आहे.
आता माध्यमांवर छापा पडला, तरी ती माध्यमांसाठीही चिंतेची बाब नसते. त्याची माध्यमांतून चर्चासुद्धा केली जात नाही. केरळच्या ‘मीडिया वन’ चॅनलवर किंवा ‘न्यूज क्लिक’वर छापा पडला, एनआयएची केस सुरू होती, पण कोणत्याच चॅनलने त्यावर चर्चा घडवून आणली नाही. या छाप्यानंतर अभिसार शर्मा या पत्रकारावर अशी वेळ आली आहे की, स्वत: पत्रकार असून तो पत्रकारितेविरुद्ध लढत आहे.
यावरून असे दिसून येते की, आपल्याला जर सांप्रदायिकतेविरुद्ध आणि सामाजिक एकात्मतेच्या बाजूने पत्रकारिता करायची असेल, तर या पत्रकारितेविरुद्धच पहिल्यांदा लढावे लागते. मग तुम्हाला ‘देशाचे दुश्मन’देखील ठरवले जाऊ शकते. किती पत्रकार या विरोधात ‘प्रेस क्लब’मध्ये आवाज उठवतात? कुणीच नाही.
मी एकटा व्यक्ती या सर्व माध्यमांसाठी पर्याय होऊ शकतो का? अजिबात नाही. एका व्यक्तीकडे एवढी सारी संसाधने असू शकत नाहीत. हे काम एकट्या व्यक्तीचे नाही, तर मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचेच आहे.
२०१९मध्ये ऑस्ट्रेलियातील केंद्रीय तपास यंत्रणेने ‘एबीसी न्यूज एजन्सी’वर छापा टाकला. पत्रकारांच्या घरावरही छापे मारले. तेव्हा तिथल्या सर्व वर्तमानपत्रांनी आपल्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरून निषेध नोंदवला आणि टीव्ही वृत्तवाहिन्यांनीही त्या विरोधात प्रश्न विचारले. आपल्याकडे असे का होऊ शकत नाही? आपण तर स्वत:ला ‘ लोकशाहीची जननी’ (मदर ऑफ डेमोक्रसी) म्हणवून घेतो. ऑस्ट्रेलियातील पत्रकारांनी अशी बातमी केली होती की, ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांनी अफगाणिस्तानात युद्धाचे नियम तोडले आहेत. आपण आपल्या देशात अशा बातमीची कल्पना तरी करू शकतो का?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ऑस्ट्रेलियात ‘राईट टू नो’ ही चळवळ सुरू होती, त्या वेळी तत्कालीन प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसर महोदयांची मोठी अडचण झाली होती. आपल्याकडेही ‘माहितीचा अधिकार कायदा’ आहे. खरे तर पत्रकारांनी या कायद्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा, पण असे होताना दिसत नाही. अगदी बोटावर मोजण्याइतके काही पत्रकार, तेही वृत्तपत्रातले, याचा उपयोग करताना दिसतात.
२०१८मध्ये अमेरिकेत ‘बोस्टन ग्लोब’ यांच्या नेतृत्वात तिथल्या माध्यमांनी माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून प्रयत्न केले होते. माध्यम स्वातंत्र्याच्या विरोधातील कृतीचा अग्रलेख लिहून विरोध केला होता. असे अजिबात नाही की, मी केवळ पाश्चात्य देशातील माध्यमांचा गौरव करतोय. आता तर गाझापट्टीत जे युद्ध चालू आहे, त्याचे अतिशय चुकीचे वार्तांकन तिथल्या अनेक माध्यमसंस्था करत आहेत. या युद्धात काही माध्यमसंस्थांचे २८-२९ बातमीदार मारले गेले आहेत. हे मात्र खूप दुर्दैवाचे आहे.
डॉक्टरांसारखाच पत्रकारिता हा समाजासाठी आवश्यक असा पेशा आहे. गेल्या १० वर्षांत लोकशाहीवर अनेक हल्ले झाले. लोक मला विचारतात, यावर इलाज तरी काय? एक सोपा आणि तत्काळ इलाज आहे. तो म्हणजे, या वाहिन्या पाहणे लोकांनी थांबवायलाच हवे. अलीकडे युट्यूबसारख्या वाहिन्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिकतेचा शिरकाव झालेला आहे. हे लोक आता आपल्या मुख्य प्रवाहातल्या मीडियासोबतच ‘सोशल मीडिया’वरही सक्रीय आहेत. यांना मुख्य प्रवाहातील मीडियाही हवाय आणि युट्यूबही हाताशी हवेय.
नुकतीच विरोध पक्षनेता राहुल गांधी यांनी युट्यूबच्या माध्यमांतून सत्यपाल मलिक यांची मुलाखत घेतली. त्या वेळी मला या गोष्टीचे वाईट वाटले - भारताच्या पत्रकारितेची अशी अवस्था झालीय की, एका विरोधी पक्षाच्या नेत्यावर पत्रकार होण्याची वेळ आली आहे आणि जे पत्रकार आहेत, ते मात्र विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवून टाकत आहेत. या विरोधी पक्षनेत्याने हे दाखवून दिले की, जर माध्यमे त्यांचे काम नीट बजावत नसतील, तर मी माझे विरोधी पक्षाचे काम करेनच, पण सोबत पत्रकारिताही करेन. माझ्यासाठी मात्र हे दु:खद होते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
७ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते, ‘ईडीच्या भीतीने हे विरोधी पक्षाचे लोक एकत्र आले आहेत.’ यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हा आरोप केला होता की, ‘सरकार ईडीची भीती दाखवून विरोधी पक्ष फोडत आहे.’ पंतप्रधानांचे हे वक्तव्य एकप्रकारे विरोधी पक्षांच्या मताला दुजोरा दिल्यासारखाच आहे.
याच वर्षी फेब्रुवारीत मोदींनी म्हटले होते की, ‘मोदी पे भरोसा अखबार के सुर्खियों से पैदा नहीं हुआ हैं. मोदी पे भरोसा टीव्ही पर चमकते चेहरोंसे नहीं हुआ हैं. जीवन खपा दिया हैं, पल पल खपा दिये हैं.’ हे किती विचार करायला लावणारे आहे!
तुम्हाला मोदींचे आणखी एक वाक्य सांगतो, त्यावरून पत्रकारितेची काय अवस्था झालीय, हे तुमच्या लक्षात येईल. २०१९च्या निवडणुकीदरम्यान ‘इंडियन एक्स्प्रेस’चे राजकमल झा आणि रविश तिवारी यांनी मोदींची मुलाखत घेतली होता. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘Whether news gets published is not the only thing in a democracy.’ (बातमी प्रकाशित होतेय की नाही, लोकशाहीत हीच एकमात्र गोष्ट नाही.)
हे त्यांचे विधान गांभीर्याने विचार करायला लावणारे आहे.
रवीशकुमार यांचे मूळ हिंदी भाषण ऐकण्यासाठी पहा -
https://youtu.be/jErYBjQ9S4o?si=F4-fBOGMoQR1kcre
.................................................................................................................................................................
मूळ हिंदी भाषणाचा मराठी अनुवाद : सतीश देशपांडे
sdeshpande02@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment