विकोपाला जाण्यापासून नात्याचा बचाव करता यावा, यासाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ ही काळाची गरज ठरते!
दीपावली २०२३ - लेख
अनिरुद्ध राम निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 13 November 2023
  • दीपावली २०२३ विवाहपूर्व समुपदेशन प्री-मॅरेज काउन्सिलिंग Pre-Marriage Counseling लग्न Marriage

लग्नानंतर नवरा-बायकोच्या नात्यात समस्या येणे, सामान्य बाब आहे. त्यासाठी अनेक वेळा कुटुंबीय आणि नातेवाईक दोघांमध्ये समेट घडवून दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना यश मिळत नाही, तेव्हा ‘विवाह समुपदेशका’ची मदत घेतली जाते. परंतु मागील काही वर्षांपासून एक नवा ‘ट्रेंड’ पाहायला मिळतोय. आता विवाहित जोडपी लग्नानंतर नव्हे, तर लग्नाआधीच ‘समुपदेशना’चे सत्र घेत आहेत. हा ट्रेंड मेट्रो शहरांमध्ये झपाट्याने वाढतो आहे. याला ‘विवाहपूर्व समुपदेशन’ (प्री-मॅरेज काउन्सिलिंग) असेही म्हणता येईल.

विवाहपूर्व समुपदेशन म्हणजे काय? ही एक प्रकारची थेरपी आहे. यामध्ये लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर जोडप्यांना येणाऱ्या संभाव्य समस्यांवर चर्चा केली जाते. तसेच मूल जन्माला आल्यानंतरच्या स्थितीबद्दलही बोलले जाते. यामध्ये एकमेकांचे वागणे, तसेच जोडीदाराबद्दलच्या काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. समुपदेशकाच्या मदतीने तुम्ही स्वतःतील न्यूनगंड दूर करत, लग्नानंतर येणाऱ्या समस्यांचा यशस्वीपणे सामना करू शकता.

हे विवाहपूर्व समुपदेशन जोडप्यांना लग्नासाठी मानसिकरित्या तयार करण्यास उपयुक्त ठरते. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे नाते आयुष्यभर सशक्त राहू शकते, याची खात्री देण्यासाठी अशा समुपदेशनाचा उपयोग होतो. थोडक्यात, असे समुपदेशन विवाहापूर्वीच जोडप्याचे नाते सुधारण्यास मदत करते.

काहींच्या मनात येईल, ‘लग्न टिकवायचं म्हटलं की, कसही टिकवतां येतं. हे विवाहपूर्व समुपदेशन वगैरे पाश्चिमात्य देशांचं अनुकरण आहे. आमची लग्नं नाही का टिकली? आमच्या वेळी असलं काही नव्हतं.’ हे म्हणणं खरं आहे. पण त्यांच्या काळात इतर अनेक गोष्टी नव्हत्या. त्या गोष्टी आजची पिढी अगदी सहजरित्या हाताळते आहे. उदा. मोबाइल, लॅपटॅाप, समाजमाध्यमं... बरंच काही! सध्याच्या जगाचे बदलते संदर्भ लक्षात घेता, गरजेचे असणारे बदल या पिढीने सहज स्वीकारले आहेत. तसेच तिने विवाहपूर्व समुपदेशनाचे महत्त्वसुद्धा स्वीकारायला हवे, कारण लग्नानंतरचा ‘हनिमून पिरियड’ आयुष्यभरासाठी नसतो!

एका अभ्यासावरून लक्षात आले आहे की, लग्नाआधी समुपदेशन करून घेतलेल्या ८० टक्के जोडप्यांना त्याचा चांगला उपयोग होतो. मुळात असे समुपदेशन फक्त लग्न होऊ घातलेल्यांसाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठीसुद्धा लाभदायी आहे.

दर वेळी ओळखीतून किंवा नात्यातूनच लग्न ठरेल, असे नाही. त्यामुळे लग्नाची किंवा जुळून येणाऱ्या नात्याची विश्वासार्हता तपासून घ्यायची झाली, तर लग्नाआधी एकमेकांबद्दल अधिकाधिक माहिती होणे, संभाव्य जोडीदार अगदी ‘परफेक्ट मॅच’ नसला, तरी अगदीच विरुद्ध नसल्याची खातरजमा करून घेणे, खूप आवश्यक झाले आहे. नुसते लग्न झाले म्हणून, जोडीदाराबरोबर निभावून नेण्यापेक्षा, सर्वार्थाने लग्नगाठ जुळवता आली, तर अधिक सयुक्तिक ठरणार नाही का?

‘सुखी संसार’ हा रोज होणाऱ्या संवादावर आणि रोजच्या आयुष्यातल्या अनेक छोट्या-छोट्या निर्णयांवर अवलंबून असतो. विवाहपूर्व समुपदेशनामध्ये रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक विषयांवर चर्चा केली जाते. उदा. सवयी, नोकरी, करिअर, घरकाम, पैसे खर्च करणे, मुले जन्माला घालणे, पालकत्वाची जबाबदारी, वादाचे विषय, स्वभाववैविध्य अशा व इतर अनेक विषयांवरील एकमेकांची मते जाणून घेतली जातात, त्यांवर चर्चा केली जाते.

लग्नानंतर फक्त लग्न करणाऱ्या दोघांच्याच नाही, तर घरातल्या सर्वांच्याच आयुष्यात बदल होतो. आपल्या संस्कृतीमध्ये तर लग्नात संपूर्ण कुटुंबाचा - खास करून पालकांचा - सहभाग असतो. त्यामुळे लग्न करणाऱ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनीसुद्धा या नव्या बदलाची पूर्वतयारी करणे आवश्यक ठरते.

काही वर्षांपूर्वी आजी-आजोबा, आई-वडील, सख्खी/चुलत काका-काकू, भावंडे असे सर्व एकत्रित राहत असतील, तर ते ‘एकत्र कुटुंब’ समजले जात असे. आता मुलाचे आई-वडील सोबत राहणार असतील, तरी त्याला ‘एकत्र कुटुंब’ समजले जाते. शिवाय आताच्या पालकांना एक किंवा दोनच अपत्ये असतात. त्यामुळे आपली मुलगी दुसऱ्या घरात जाणार किंवा दुसरी मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांच्या अपेक्षाही विशेष असतात. या नव्या भूमिकेमध्ये आपल्या जबाबदाऱ्यांत होणारे बदल समजून घेणेही तितकेच गरजेचे ठरते.

उदाहरणार्थ, काही मुली लग्न होऊन सासरी गेल्यावरदेखील दिवसभरात घडलेल्या सर्व गोष्टी आपल्या आईला सांगतात. अशा वेळी त्या संसारामध्ये सुनेच्या आईचा किती सहभाग असायला हवा, हा प्रश्न उपस्थित होतो किंवा शहरी भागात राहणारी तरुण मुलगी अगदी सहजपणे तोकडे कपडे घालते. अशा वेळी या गोष्टींच्या सासरी होणाऱ्या स्वीकाराबाबर प्रश्न उपस्थित होऊ शकतो. तसेच मुलगा लग्नाआधी घरकामात फारसे लक्ष घालत नसला, तरी लग्नानंतर बायकोला मदत करू लागल्यावर त्याबाबत होणारी किंचितशी हेटाळणी, हा मुद्दाही घरातील वादासाठी कारण ठरू शकतो.

मुलगी/सून, मुलगा/जावई, सासू/आई असे फरक सुशिक्षित घरी केले जात नाहीत, असे आता म्हणतात. पण जेव्हा मुलगी उशिरा उठते, तेव्हा तिची आई तिला मस्करीत, “आळशी... उठा”, असे म्हणते. पण सुनेला असे म्हटले, तर ती हे मस्करीत घेईल का? आईला बाहेर काम असले आणि उशीर होणार असला, तर ती आपल्या मुलाला “कुकर लावला आहे. लक्ष ठेवशील” असे अधिकाराने सांगते. तसे सासू जावयाला अधिकारवाणीने सांगू शकते का?

नवी मुलगी तिचे घरदार सोडून सासरी येणार असल्यामुळे तिला सासरी माहेरसारखे, थोडेफार मिळतेजुळते वातावरण मिळावे, यासाठी सासरच्यांची तयारी असते का? बहुतेक घरी मुलाचे लग्न होईपर्यंत घरखर्च पालक करत असतात, पण लग्नानंतर आधीच्या सवयीमुळे ही बाब मुलाच्या लक्षात आली नाही आणि नवीन जबाबदारीमुळे, तसेच वाढत्या खर्चामुळे तो विचित्र वागू लागला, तर तो त्याच्या बायकोमुळे असे वागत असल्याचा निष्कर्ष काढून त्यात वाद निर्माण करण्यापेक्षा त्या विषयावर चर्चा होऊ शकते का?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

समुपदेशकाच्या मदतीने अशा विविध विषयांवरील प्रश्नांची उत्तरे शोधता येतात. अशा समुपदेशनामुळे पालकसुद्धा आपल्या मुलामुलींच्या सुखी संसारासाठी हातभार लावू शकतात. मात्र कुठलेही नाते दोन्ही बाजूंवर अवलंबून असते. म्हणजे एखादी सासू तिच्या सुनेला प्रेमाने मुलीप्रमाणे वागवण्याची इच्छा ठेवत असेल, पण सून एकत्र न राहण्याविषयी आधीपासूनच ठाम असेल तर? अर्थात, याच्या उलटही होऊ शकते. तेव्हा लग्नामुळे नव्याने एकमेकांशी बांधल्या गेलेल्या सर्वांनीच आपले विचार किती आणि कसे बदलायचे, एखाद्या वाक्याचा कसा अर्थ लावायचा, पूर्वग्रह मनात धरून वावरायचे की नाही, या सर्वांवर नाते टिकणे अवलंबून असते. आता या सगळ्यात लग्न करणाऱ्या कुटुंबातील लोकांचा संबंध आहे. मग या बाबतीत एकुणात ‘समाज’ म्हणून काय बदल अपेक्षित आहे?

तर ‘समाज’ म्हणजे कोण? तर आपणच! ‘आपले भाचा-भाची, पुतण्या-पुतणी यांचे लग्न होईल आणि काही वर्षांत त्यांचा घटस्फोट होईल’ अशी स्वप्नं आपण नक्कीच रंगवत नाही. कुणाचेही लग्न होते, तेव्हा ते सुखी राहावेत, अशीच सर्वांची इच्छा असते. तेव्हा समाज म्हणून आपलीदेखील काही जबाबदारी असते. कधी कधी आपणही गप्पांच्या ओघात, ‘तुम्ही आहेर केला, त्या मानाने त्यांनी चांगला आहेर केला नाही’. किंवा ‘सुनेच्या माहेरच्यांनी तिला फार दागिने दिले नाहीत’ असे बोलतो. तसेच ‘तुझ्या सासरचे तुला एकदाच देणार आहेत... चांगले ठसठशीत मंगळसूत्र करून घे’ किंवा ‘तुम्हाला मुलगा नाही. तेव्हा तुमचीपण जबाबदारी जावयीच आहे’ असे सल्ला देणारे अहितचिंतक म्हणून आपण वागतो का, याचा समाज म्हणून आपण विचार करायला पाहिजे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

सुखी संसार करायला आई-वडील किंवा इतर नातेवाइकांनी चांगले वागण्याची अपेक्षा असली, तरी त्याचा पाया जोडीदारांनाच घालावा लागतो. एखाद्या नात्याला आनंदी, समाधानी कसे ठेवायचे, हे कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाही. तेव्हा सर्वांत खास नात्यासोबत सुरुवात करताना विवाह सोहळ्यासोबत लग्नाचीपण तयारी करायला हवी!

पुढे जाऊन वाद होतीलच आणि नाते तुटेलच, म्हणून विवाहपूर्व समुपदेशन करायचे नसून मानवी स्वभावाला अनुसरून प्रसंगी कटुता, कुरबुरी गैरसमज झाले, तरी त्यातून मार्ग काढता यावा आणि विकोपाला जाण्यापासून नात्याचा बचाव करता यावा, यासाठी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ ही काळाची गरज ठरते. अखेरीस लवचीक नातं, म्हणजे दुधात साखरच नाही का!

.................................................................................................................................................................

लेखक अनिरुद्ध राम निमखेडकर मूळचे नागपूरचे असून एका आयटी कंपनीमध्ये काम करतात.

aniruddhanimkhedkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......