जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपण अपूर्ण आहोत, असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकाचा पूर्णत्वाचा शोध सुरू असतो. कुणाला वाटतं, पैसा मिळाला की, आपल्याला पूर्णत्व येईल. कुणाला वाटतं, सत्ता मिळाली की... कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर नाती, तर कुणाला अजून काही...
या जगातील बहुतेक लोक लौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधत असतात.
याउलट, पु.ल. देशपांडे, माधव आचवल, जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यासारखे संवेदनशील कलावंत अलौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधताना दिसतात. हा शोध वेगवेगळे मार्ग चोखाळतो, वेगवेगळे रंग धारण करतो, वेगवेगळी वळणं घेतो… कधी स्वर, कधी रूप, तर कधी शब्द! कधी कलेच्या अंगानं, तर कधी तत्त्वज्ञानाच्या!... कधी बुद्धिप्रामाण्याच्या, तर कधी अध्यात्माच्या!
या शोधामुळे सगळ्या संवेदनशील कलाकारांची आयुष्यं झळाळून जातात. या शोधाला नेहमीच स्त्री-पुरुष मैत्रीची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. कारण तत्त्वज्ञान आणि कला यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये कळत-नकळत पूर्णत्व शोधत असतात.
पुल, आचवल आणि जीए या तीन निर्माणकर्त्यांच्या प्रतिभेवर सुनीताबाई रुंजी घालत राहिल्या आणि त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाच्या साक्षीदार व एक रसिक मैत्रीण बनून राहिल्या. या चार प्रतिभावंतांची मैत्री कलेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या प्रांगणात बहरली. पुल - सुनीता, आचवल - सुनीता आणि जीए - सुनीता यांच्यातील मैत्री विलक्षण होती.
या मैत्रीच्या कल्लोळात या सगळ्यांकडून त्यांच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल, कलेबद्दल आणि तत्त्वज्ञानाबद्दल जे काही लिहिले गेले, ती संवेदनशील मानवी आयुष्याची एक धडकती दास्तान आहे...
.................................................................................................................................................................
लेखांक : चौथा आणि शेवटचा
जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्याच्या रूपात सुनीताबाईंच्या आयुष्यात एक वावटळ आली. अत्यंत संवेदनशील विश्व त्यांच्या आयुष्यात आले. पुढे जीएंची मैत्री त्यांच्या आयुष्यात आली. त्यांना आपल्यासारखाच अतितीव्र संवेदना असलेला ‘खरा मित्र’ भेटल्याचे समाधान मिळाले.
पुल संवेदनाशील होते, माधव आचवल तीव्र संवेदना असलेले होते. पुलंनी आपल्या संवेदनांना अत्यंत सुंदर पद्धतीने हाताळले होते. त्यांच्यामागे आपली फरफट होऊ दिली नव्हती. आचवलांनी आपल्या तीव्र संवेदनांच्या मागे स्वतःला झोकून दिले. त्यांच्यामागे त्यांची फरफट झाली, पण त्यांनी आयुष्य उधळून दिले नाही. जीएंच्या संवेदना अतितीव्र होत्या. सुनीताबाई याच प्रकारच्या. दोघांनाही ‘जीवघेणी मनस्वितता’ मिळाली होती.
मानसशास्त्रात आजकाल ‘हायली सेन्सिटिव्ह पीपल’ अशी एक संकल्पना केली गेली आहे. असे लोक जन्मतः अतिशय संवेदनशील असतात. अत्यंत संस्कारक्षम वयात घडलेल्या घटनांमुळे ही संवेदनशीलता तीव्र होत जाते. जीवनातली दुःखे आणि आनंद या अतितीव्र संवेदनशील लोकांना अत्यंत तीव्रपणे हलवून सोडतात. त्यांना कला आणि तत्त्वज्ञान अतिशय तीव्रपणे प्रतीत होत राहाते.
पुलंच्या समाधानी आणि समजुतदार स्वभावाच्या कोंदणात सुनीताबाई सुरक्षित राहिल्या. त्यांचा गंभीर स्वभाव शोकात्मतेकडे ओढला गेला नाही. त्यांच्या मूळच्या एकलेपणाला समजुतीची साथ मिळाली नसती, तर त्या एकटेपणात ओढल्या गेल्या असत्या, असे वाटते. सुनीताबाईंना आपण पुलंना ‘सांभाळले’ असे वाटत राहिले. व्यवहार वगैरेंच्या बाबतीत ते खरेही आहे, परंतु मानसिकदृष्टया पुलंनी त्यांचा सांभाळ केला, हे तितकेच खरे आहे.
जीए स्वतः आपल्या प्रगाढ तत्त्वचिंतनामुळे अतितीव्र संवेदनशीलतेच्या वावटळीतून तरून गेले. ते स्वतःला भावनिकदृष्टया वय वाढेल तसे सावरत गेले. परंतु माणसाच्या जीवनातली सर्वंकष शोकात्मता, माणसाचा तुटलेपणा, त्याला छळणारी आयुष्यातली अर्थशून्यता, मानवी जीवनाचा बेछूटपणा, वासनांची आदिम ओढ, भावनांची अनावर अपरिहार्यता, या सगळ्या गोष्टी त्यांच्या लेखनात अत्यंत तीव्रपणे आविष्कृत होत गेल्या. यामुळे होणारी माणसाची फरफट हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय राहिला.
सुनीताबाईंमध्ये संवेदनशीलता इतकी तीव्र होती की, त्यामधून जन्मलेल्या आदर्शांपोटी त्या आपले संपूर्ण जीवन उधळून द्यायला तयार होत्या. ब्रिटिशांविरुद्ध बॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करणे, हे त्यांच्या याच वृत्तीचे मुख्य उदाहरण आहे.
जीएंच्या लिखाणात एक बेबंदपणा आहे. जे काही करायचे आहे, ते त्यांना तीव्रपणे करायचे असते. दुःख तर दुःख, पण ते तरी तीव्रपणे आयुष्यात यावे, त्याच्यामुळे हाती काही गवसावे. त्यांच्या एका कथेतील एक पात्र म्हणते- “परिपूर्ण स्त्रीसौंदर्य आहे त्या प्रदेशात मला जायचे आहे... सोन्याच्या मोहापेक्षाही वासना जास्त दाहक असते... वीतभर वासना, मेणाच्या थेंबाएवढी तृप्ती, हे आम्हाला क्षुद्र वाटते. वासना वणव्यासारखी असावी आणि एखादी प्रचंड लाट येऊन त्यावर आदळावी त्याप्रमाणे तिची तृप्ती व्हावी, मग त्यात आपला नाश झाला तरी चालेल.”
आचवलांप्रमाणेच वासना आणि मृत्यू या दोन क्षणांपाशीच जाणीवेचा लोप होऊन काहीतरी हाती लागेल, असे जीएंना वाटत असावे. ‘माणूस’ या कथेत ते लिहितात - “अमावस्येच्या काळजातील हलाहल पाहण्याची ईर्ष्या धरली, दुःखाचे हलाहल प्राशन करून काळोखाच्या अंतिम सीमेपर्यंत वाटचाल केली. पण तिथे दुबळे, सोपे चांदणे भोवती पसरले.” दुःखाच्या तीव्र अनुभवानंतरही सत्य हाती लागत नाही. तीव्र दुःख भोगून झाल्यावर आपले मन हळूहळू छोट्या छोट्या आणि निरस सुखांकडे ओढले जाते आणि त्या नीरस सुखांमध्ये रमूनही जाते.
जीए समजून घेण्यासाठी संवेदनशीलता असावी लागते आणि वाचनाची प्रचंड पार्श्वभूमीसुद्धा. जीएंची मुळे भारतीय तत्त्वज्ञानात पसरलेली होती, तशीच पाश्चात्य तत्त्वज्ञानात आणि साहित्यातसुद्धा. सुनीताबाईंचे भारतीय साहित्याचे वाचन चांगले होते, परंतु पाश्चात्य साहित्याचे वाचन मर्यादित होते. येथे आचवल त्यांच्या मदतीला आले. ‘जास्वंद’ या पुस्तकात त्यांनी जीएंच्या साहित्यावर अप्रतिम लेख लिहिला आहे. जीएंशी ओळख होण्याआधी बाईंनी हा लेख वाचला होता. त्यामुळे त्याच्या प्रकाशात सुनीताबाईंनी जीएंचे साहित्य वाचले होते, असे म्हणता येईल.
आचवल लिहितात - “काही प्रतिभावंतांच्या कलाकृती सावल्यांनी झाकोळलेल्या सरोवरातल्या खोल भोवऱ्यांसारख्या असतात. गूढ, रहस्यमय आणि झपाटून टाकणाऱ्या! त्यांच्याकडे पाहता-पाहता, त्या काळ्या भोवऱ्याची पिसाट वर्तुळगती आपले डोळे फिरवून टाकते आणि एकाएकी स्वतःवरचा ताबा सुटून आपण त्या भोवऱ्याच्या तळाशी वेगाने खेचले जात आहोत असे वाटू लागते. नकळत आपण त्या गतीचाच भाग होत जातो, ती सारीच गती जिथे स्थिरावते त्या भोवऱ्याच्या खोल तळाशी जातो.”
जीएंचे लिखाण आपली नजरबंदी कशी करते, हे आचवलांनी येथे दाखवून दिले आहे. त्यासाठी, आपल्या मनात गूढ भावनांची वलये तयार करणाऱ्या काळ्या पाण्याच्या भोवऱ्याची प्रतिमा आचवलांनी उभी केली आहे.
दुःखाचा काळा रंग फिकटपणे का होईना सुनीताबाईंच्या मनाचा एक भाग होऊन राहिला होता. उदासीनता हा त्यांचा स्थाईभाव होता. ‘आहे मनोहर तरी गमते उदास’ ही त्यांची अतिशय लाडकी ओळ होती. त्यामुळे जीएंच्या लिखाणाच्या काळ्या भोवऱ्यात त्या ओढल्या गेल्या नसत्या, तरच नवल होते. आपल्या उदासीचे कारण शोधण्यासाठी त्या जीएंच्या लिखाणाकडे आणि मैत्रीकडे ओढल्या गेल्या असे म्हणता येईल. त्यांना एकटे वाटत होते आणि उदासीमधून सुटायचे होते. या प्रकारात त्यांच्या कळत-नकळत ‘आपली कुणाला तरी गरज असायला हवी’ ही भावनाच त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन बनून गेली होती.
जीएंची ‘लक्ष्मी’ ही कथा सुनीताबाईंना अतिशय आवडली होती. या कथेतील लक्ष्मी या पात्रासारखी त्यांची अवस्था होती. आता कुणाला आपली गरज उरलेली नाही, असे जाणवल्यावर लक्ष्मीच्या जीवनाचा शेवट झाला. आपली गरज कुणाला उरली नाही, तर आपला शेवट होऊ शकतो, असे कुणाही उदासी भोगणाऱ्या संवेदनशील स्त्रीप्रमाणे सुनीताबाईंनाही वाटत असावे. थोडक्यात, जीएंच्या पात्रांमध्ये सुनीताबाई आपल्यामधील सुप्त भावनांची प्रतिबिंबे पाहत होत्या.
‘जास्वंद’मध्ये आचवलांनी जी. ए. कुलकर्णी हे जगातील नक्की कुठल्या लेखकांच्या प्रवृत्तीचे लेखक आहेत, हे सांगितले आहे. ते लिहितात - “तत्त्वज्ञानच ज्यांच्या लेखनाचे चैतन्य बनून राहिले आहे, असे सार्त्र आणि काम्यू, जीवनाचा वृक्ष मुळापासून उपटून आपल्या प्रतिभेच्या मातीत त्याची नव्याने लावणी करू पाहणारा दोस्तोव्हस्की... जगातल्या सर्व पापांचे मूळ शोधणारा बोदलेअर... प्रत्येक मानवी हेतूचे नग्न रूप आणि सत्य रूप शिकारी कुत्र्याच्या जिद्दीने शोधीत जाणारा ज्याँ ऑन्वी... वासनेच्या उसळणाऱ्या तांडवात आपल्या जाणिवेचा लोप करू पाहणारा हेमिंग्वे... नियतीच्या काळ्याकुट्ट छायेखाली काळवंडून हतबल झालेला ग्रॅहम ग्रीन…”
पुढे आचवल लिहितात की, जीएंचे लिखाण सैगलच्या कांचन स्वरासारखे आहे. आपल्याला एकाकी करून टाकणाऱ्या माणसाच्या दुःखाचा साक्षात्कार आपल्याला सैगलच्या स्वरात होतो, त्याप्रमाणे जीएंच्या लिखाणातही होतो.
पुलंच्या मनोहर संगतीत सुनीताबाईं कुठेतरी अशाच एकाकी होत्या. सेंट एक्झ्युपेरीच्या ‘लिटिल प्रिन्स’मधील ‘It is such a secret place, the land of tears’ या वाक्याने आपल्या हृदयात कसे घर केले आहे, हे जीएंना लिहिलेल्या पत्रात सांगताना सुनीताबाई दिसतात. पुलंच्या निर्मळ विनोदाच्या राज्यात राहूनही आश्रूंच्या गुप्तभूमीविषयी त्यांना ओढ वाटत होती.
जीएंनी खूप सारे अश्रू पचवून आपले आयुष्य सावरले आहे, हे त्यांच्या कथा वाचून सुनीताबाईंनी जाणले होते. जीएंच्या कथांमधून जाणवत राहणाऱ्या त्यांच्या संवेदनशीलतेशी त्या एकरूप होत राहिल्या. त्यांना जीएंशी संवाद हवा होता. जीएंचे पत्रोत्तर लवकर आले नाही, तर त्या अस्वस्थ होत. एकदा जीएंचे पत्रोत्तर यायला उशीर झाल्यावर त्या जीएंना लिहितात - “पत्र मला संवादासारखी वाटतात. संवाद मधेच तुटला तर क्षणभर का होईना जीव कासावीस होतो.”
सुनीताबाई ‘परफेक्शनिस्ट’ होत्या. जीवनाकडून त्यांच्या अवास्तव अपेक्षा होत्या. पुलंनी माणसाचे आणि जीवनाचे अपूर्णत्व स्वीकारलेले होते. सुनीताबाईंना अपूर्णत्व खटकत होते. जीए लिहून गेले होते - “त्याने वेचलेल्या प्रत्येक मोत्याला छिद्र होते.. जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला अपूर्णत्वाचा दोषांचा जहरी शाप होता.” सुनीताबाई यांची हीच अवस्था होती. पुलंच्या मनोहर विनोदावर त्या खुश होत्या, पण पुलंचा आळस, त्यांची अव्यवहारी वृत्ती आणि त्यांचे इतरांकडे दुर्लक्ष करून संगीतात आणि स्वतःत रमून राहणे सुनीताबाईंना खटकत होते.
पुलंनी मल्लिकार्जुन मन्सूर आणि कुमार गंधर्व यांचे केवढे कौतुक केले आहे, हे आपण पाहिले आहे. पण त्यांच्याविषयी सुनीताबाई लिहितात - “आमच्या मल्लिकार्जुन अण्णांचं वर्णन P. L.नं ‘गाण्यात राहणारा माणूस’ असं केलं आहे. पुष्कळ अंशी ते खरंही आहे. पण जगण्यासाठी ज्या अर्थार्जन, संसार वगैरे इतर गोष्टीही त्यांना जरुरीच्या आहेत, त्यांच्या संदर्भात तो (निर्गुण निराकार आणि तरीही ज्वालेसारखा शुद्ध आणि सुंदर) तालेवार स्वर अनेकदा त्यांच्यापासून खूप दूर गेलेला मी पाहिला आहे.”
कुमारांबद्दल सुनीताबाई लिहितात - “गाण्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड न खपवून घेणारा आमचा कुमार. एरवी परिपूर्ण वाटणाऱ्या संगीतातदेखील नवनिर्मिती करणारा कुमार रोजच्या ऐहिक जीवनात अनेकदा बेसूर झाल्याचं मी अनुभवलं आहे.” असं अपूर्णत्व स्वाभाविक आहे असंही सुनीताबाई लिहितात, परंतु निदान खासगी पत्रात तरी त्या अपूर्णत्वाचा उल्लेख त्यांना करावासा वाटतो.
पुल, मल्लिकार्जुन आणि कुमार यांच्या स्वरांच्या दिव्यत्वात राहतात. त्यापुढे या दोघांमधले अपूर्णत्व त्यांना खटकत नाही. सुनीताबाईंना या दोघांनी त्यांना दिलेले दिव्य क्षण पुरेसे वाटत नाहीत. माणूस कितीही मोठा कलाकार असो, त्याच्यातील अपार्थिव कलेला त्याच्या पार्थिव अस्तित्वामुळे भावनिक अस्वस्थतेचा एखादा शाप भोगावा लागतो, परंतु बाईंना हे कुठेतरी मान्य नव्हते, त्यांना पूर्णत्वच हवे वाटत होते.
सुनीताबाईंना जीवनमूल्ये अतिशय महत्त्वाची वाटत होती. जीएंनी अत्यंत अवघड परिस्थितीत आपली जीवनमूल्ये अत्यंत कठोरपणे पाळली होती. सुनीताबाईंना ते फार महत्त्वाचे वाटत होते.
त्या जीएंना लिहितात - “मनुष्याप्रत येऊन पोहोचलेला प्राणी तुमच्यात सतत जिवंत होता, आणि तो पूर्णपणे ‘शुद्ध मानव’ राहू इच्छित होता... माणसाची जीवनमूल्ये हाच त्याचा खरा आधार, हीच त्याला पोसणारी पाळेमुळे असे मला वाटते. जी कोणती जीवनमूल्ये आपण स्वीकारतो, त्यावर ठाम निष्ठेने उभे राहून त्यासाठी कोणते मोल देण्याची आपली तयारी आहे हा प्रश्न महत्त्वाचा.”
प्रभावती आणि नंदा या जीएंच्या मावस बहिणी. अगदी लहानपणी त्यांच्यावरचे आई-वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर या बहिणींचा सांभाळ जीएंनी अत्यंत जबाबदारीने केला. सुनीताबाई लिहितात - “स्कॉलरशिप मिळून परदेशी जाण्याची संधी आणि प्रभावतीचा आजार या दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्या, तेव्हा प्रभावतीसाठी तुम्ही त्या संधीकडे सहज पाठ फिरवली, हे आम्ही कसे विसरू?”
कर्णाला कवचकुंडले ज्याप्रमाणे उपजतच प्राप्त झाली होती, त्याप्रमाणे सुंदर जीवनमूल्ये घेऊन जीए या जगात आले होते आणि ती कवचकुंडले तशीच लेवून ते या जगातून गेले, याचे बाईंना विलक्षण कौतुक होते. जीए गेल्यावर लिहिलेल्या अनावृत्त पत्रात बाई जीएंचे एक वाक्य उदधृत करतात- “जुन्या सागवानी पेटीत जतन करून ठेवलेल्या वस्त्रासारखा तो माणूस, त्याचे नाव घेतानादेखील नमस्कार करूनच ते उच्चारावे.
सुरुवातीपासूनच माझ्या मनात तुमच्याबद्दल ही भावना रुजली, आणि पत्रे लिहिताना भावनेच्या भरात कधी चुकून मी मर्यादा ओलांडली असली, तरी पुन्हा आपल्या श्रेयमार्गावरच येण्याचे भान मला राहिले, याचे कारण तुम्ही स्वतः आखून घेतलेली लक्ष्मणरेषा कधीही ओलांडली नाही हेच होते.
अशी मर्यादशील माणसे तुमच्या लिखाणात खूप आहेत. पण समकालीन कथा-लेखकांनी रंगवलेले स्त्री-पुरुषसंबंध आणि तुम्ही रंगवलेले हे संबंध यांत मला तरी खूप फरक जाणवला. स्त्री-पुरुष ओढ ही फक्त शारीरिक आकर्षणातच असते, बाप-मुलगी, भाऊ-बहीण असली रक्ताची नाती सोडून बाकी कोणतेही स्त्री-पुरुष नाते हे लालसेशिवाय इतर कशावरही आधारलेले असू शकत नाही, स्वच्छ, सुंदर मैत्री ही स्त्री-पुरुषांत संभवतच नाही असेच तुमचे मत असावे, असा भास तुमच्या कथा वाचताना अनेकदा होतो. शॉपेनहॉवरच्या एका निबंधावरून झालेल्या आपल्या चर्चेतदेखील नर-मादी प्रेमाबद्दल आपण लिहिले होते की, ‘कदाचित तेच एक आदिम, स्वच्छ, जीवनाच्या उगमापाशीच असलेले प्रेम ... असू शकेल.’ ”
सुनीताबाईंची माया जीएंनी नाकारली होती, त्याला अजून एक कारण म्हणजे त्यांचे स्वाभिमानाचे मूल्य हेसुद्धा होते. आपल्या शेवटच्या आजाराचा थांगपत्ता त्यांनी सुनीताबाईंना लागू दिला नाही. ब्लड-कॅन्सरवर उपचार करण्यात प्रभावतीसाठी ठेवलेले सगळे पैसे खर्च होतील, म्हणून त्यांनी आपल्या आजारावर उपचार करून घ्यायचे नाहीत, असे ठरवले. सुनीताबाईंना हे कळले, तर त्या निष्णात डॉक्टरांची फौज उभी करतील, अमाप पैसा खर्च करतील, हे जीएंना माहीत होते. सुनीताबाईंच्या घराला चिकटून असलेल्या हॉस्पिटलात दाखल होऊनसुद्धा सुनीताबाईंना कसलाच पत्ता जीएंनी लागू दिला नाही. ते गेल्यावरच सुनीताबाईंना त्यांच्या आजाराविषयी माहिती मिळाली. प्रभावतीच्या प्रेमासाठी कॅन्सरच्या दाढेत जीए अत्यंत शांतपणे चालत गेले.
एका बाजूला जीए सुंदर जीवनमूल्ये पाळत होते, अत्यंत सुसंस्कृत जीवन जगत होते आणि दुसऱ्या बाजूला त्यांना या विश्वातील आदिम तत्त्वांची आणि नात्यांची जाण होती. आदिम दुःख तर त्यांनी खूप पाहिले, अनुभवले आणि लिहिले होते. क्रूरता, संवेदनहीन स्वार्थ, नृशंस आत्ममग्नता या गोष्टी त्यांनी कमालीच्या संवेदनशील हृदयाने पाहिल्या, सोसल्या आणि लिहिल्या होत्या.
कवी ग्रेस यांना लिहिलेल्या पत्रात जीएंनी लिहिले आहे - “विशाल उग्र आयुष्याने मध्येच डोळा उघडून आपल्याकडे रोखून पाहावे असा अनुभव देणारी तुमची कविता आहे.” खरं तर हे वाक्य ग्रेस यांच्या कवितेपेक्षा जीएंच्या साहित्याला जास्त लागू होते असे वाटून जाते.
पुलंच्या संगीतप्रेमाने आणि आचवलांच्या रूपवेधाने या आदिम आणि उग्र आयुष्याकडे पाठ फिरवलेली होती. आदिम आणि उग्र आयुष्याच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची आणि त्याविषयी चिंतन करण्याची संधी सुनीताबाईंच्या आयुष्यात मुख्यत्वेकरून जीएंच्या साहित्याने आणली. हे उग्र आयुष्य जीएंमुळे त्यांच्यासमोर उलगडत गेले. मानवाचे उग्र आयुष्य त्याच्या अनावर आवेगासह जीएंनी दाखवले होते. त्यामुळे जीएंबद्दल त्यांना कमालीचा आदर वाटत होता.
जीए गेल्यावर त्यांना लिहिलेला ‘सप्रेम जीए’ या अनावृतपत्रात सुनीताबाई लिहितात - “दहा बारा वर्षांपूर्वी मला तुमचे पहिले पत्र आले आणि ते वाचता वाचताच मी तुमच्या प्रेमात पडले.” जीएंचे छोटेसे पत्र पण त्याने सुनीताबाईंच्या मनात केवढी मोठी भावना तयार केली होती! कारण सुनीताबाईंनी जीए आधीच वाचले होते आणि त्यातील जीवनाने सुनीताबाईंच्या मनाचा ठाव घेतला होता. जीएंच्या लेखनाने सुनीताबाईंच्या हृदयाशी आधीच संवाद साधला होता. आधीच प्रेम तयार झाले होते. पहिल्या पत्राने ते मनाच्या पृष्ठभागावर आले इतकेच!
सुनीताबाई आणि जीए यांना जोडणारा अजून एक दुवा म्हणजे कविता. जीएंनी कविता लिहिल्या नसल्या, तरी त्यांच्याकडे कवि-हृदय आहे, याची साक्ष सुनीताबाईंना पटली होती. जीएंनीसुद्धा आपले कवितेचे आकर्षण बाईंपासून लपवून ठेवले नव्हते. सुनीताबाईंना लिहिलेल्या एका पत्रात जीए म्हणतात - “माझी खरी इच्छा म्हणजे कवीच होण्याची; म्हणजे सामाजिक जाणीव, क्रांतीचा संदेश वगैरे भानगडी नाहीत. कसाच्या दगडावर सोन्याची रेषा काढावी, केवड्याच्या कणसातून एखादा काटेरी सुगंधी अनुभव घ्यावा, शब्दावर पाण्यावरील लाल प्रकाशाप्रमाणं भाव तरंगावे तसं काही लिहावं असे फार वाटतं. तसं येणार नाही हेही माहीत आहे, पण अनेकदा तसं वाटतं...”
जीएंनी कविता लिहिली नाही, तरी त्यांनी जे काही लिहिले ते काव्यात्म होते. काव्य आणि कविता हे सुनीताबाईंचे पहिले प्रेम होते. जीएंच्या लिखाणातील विलक्षण काव्याने जीवनाविषयी त्यांना एक वेगळी आणि विलक्षण अनुभूती दिले असणार!
माधव आचवल जीएंच्या कथेबद्दल आणि प्रतिमांबद्दल लिहितात - “जीएंची कथा एखाद्या शीशमहालातील झुंबरासारखी आहे. निळ्या सरोवरात उमलेल्या हजार पाकळ्यांच्या कमळासारखे झुंबर!” या झुंबराला प्रतिमांचे लोलक आहेत. त्यांच्यात आशयाच्या प्रतिमा चमकत आहेत, असे आचवलांना वाटत राहाते. ते म्हणतात, “परावर्तित प्रकाशाचे अनेकरंगी नितळ पट्टे आणि खोलवर पोचणाऱ्या अद्भुत छाया या कथेत निर्माण होतात; झुंबराच्या हलत्या प्रकाशामुळे प्रकाश आणि छाया यांचे वेगवेगळे आकार तयार व्हावेत तसे जीएंच्या कथेतून वेगवेगळे आशय आणि गूढ भावना प्रतीत होत राहतात.”
सुनीताबाईंचा पिंड शरतचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबऱ्यांवर घडलेला. त्यांचं म्हणणं असं की, शरतबाबू म्हणतात त्याप्रमाणे स्त्री-पुरुषांमध्ये सुंदर आणि निर्मळ मैत्री तयार होऊ शकते. विश्वास, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांना समजून घेण्याची सुंदर मनोवस्था, या खांबांवर स्त्री-पुरुषांमधली निर्मळ मैत्री उभी राहू शकते. स्त्री-पुरुष प्रेमाची शरतचंद्रलिखित घडण जीएंना हास्यास्पद वाटत होती. त्यांच्या या मतामुळे सुनीताबाईं दुखावल्या गेल्या होत्या. परंतु एक गोष्ट मात्र खरी की, जीए आणि सुनीताबाई बोलत काहीही असले, तरी त्यांच्या मैत्रीत फरक पडला नाही.जीए कधी नव्हे ते कोमलपणे व्यक्त होत राहिले. आपल्या ‘आतड्याच्या’ भावना व्यक्त करत राहिले. आपल्या साहित्यिक मनाचं प्रचंड झळाळतं वैभव आपल्या पत्रांमधून सुनीताबाईं समोर व्यक्त करत राहिले. तीनशे छापील पानं होतील इतक्या मनमुराद गप्पा त्यांनी सुनीताबाईंबरोबर झाडल्या.
जीएंच्या लिखाणात अत्यंत विलक्षण अशा प्रतिमा ठिकठिकाणी विखुरलेल्या आहेत. जीएंची एकेक प्रतिमा वाचकाला जीवंत काव्याचा प्रत्यय देतात.
पु. शि. रेग्यांची एक कविता आहे.
“तापल्या सोन्यासारखी
रसरशीत ती कांति
तिथे कशी ग फुलली
फिकी पिवळी शेवंती?”
रेगे एका स्त्रीला विचारात आहेत की, तुझ्या तापलेल्या सोन्यासारख्या कांतीमधून फिकट पिवळ्या शेवंतीच्या कांतीचे बाळ कसे जन्मले? हाच प्रश्न जीएंना विचारावा वाटतो. तुमच्या सोन्यासारख्या रसरशीत प्रतिभेमधून फिक्या पिवळ्या शेवंतीसारख्या जीवनाने रसरलेल्या प्रतिमांचा जन्म कसा होतो?
जीएंच्या प्रतिमांचे वर्णन करताना आचवल ‘पारदर्शक पेयावर तरंगणाऱ्या बुडबुड्यां’ची जी प्रतिमा तयार करतात, ती वाचली की, आपल्याला वाटू लागते की, कॉफीच्या अनुभवामध्ये जे काम ‘टॅनिन’ करते, सिगरेटच्या अनुभवामध्ये जे काम ‘निकोटिन’ करते आणि वाईनच्या अनुभवात जे काम ‘अल्कोहोल’ करते, ते काम जीएंच्या कथेच्या अनुभवात प्रतिमा करतात.
जीएंच्या प्रतिमा आपल्या मनःस्थिती स्वतःच्या मूडप्रमाणे बदलतात. कित्येकदा या प्रतिमा आपल्या मनात त्यांची स्वतःची अशी जागा तयार करतात. हे आपल्यासाठी प्रत्ययाचे क्षण असतात. हे प्रतिमांचे जग आपल्या मनात या जगाविषयी अनेक आवर्तने तयार करत राहते. तसं पाहायला गेलं, तर या जगाच्या अनुभवातून अर्थ तयार होणार नसतील, आपल्याला जीवनाविषयी नवनवीन प्रतीती प्राप्त होणार नसतील, तर या जगाचा आणि त्याने तयार केलेल्या संवेदनांचा दुसरा उपयोग तरी काय आहे?
जीएंना दिव्य क्षणांचे फार आकर्षण होते. सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात ते लिहितात की, गायकाच्या मैफलीत काही जागी स्वर असे तेजाळ होतात की, त्या वेळी त्या गायकाला बाकी सगळ्यासगळ्याचा विसर पडतो. त्या झगझगीत स्वरपुंजासाठी ती मैफल त्याच्या स्मरणात राहाते. सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात जीए या क्षणासाठी ‘रेडियम-क्षण’ अशी प्रतिमा योजतात.
‘शेंग तडकण्याचा क्षण’ ही जीएंची अत्यंत आवडती प्रतिमा. एखादी शेंग झाडावर तिचे आयुष्य जगत असते, ती गर्भार असते. ती तडकून तिच्यातून बिया मुक्त होण्याच्या क्षणाची प्रतिमा जीए वापरतात. आपण पत्रव्यवहार करतो, संवाद करतो, कारण आपले मन गर्भार राहिलेले असते. अशा संवादात एखाद्या क्षणी आपण हळवे आणि कोमल होऊन बोलू लागतो. आपल्या हळव्या मनस्थिती व्यक्त करायला ज्या क्षणापासून माणसे सुरुवात करतात त्या क्षणाला जीए ‘शेंग तडकण्याचा क्षण’ असे म्हणतात.
जीएंना लिहिलेल्या अगदी सुरुवातीच्या पत्रांमध्येच सुनीताबाईंच्या लिखाणात हा ‘क्षण’ आला. ७८ सालच्या एका पत्रात त्या लिहितात - “तुमचं पत्र पोहोचलं त्या वेळी मी एका छोट्याशा शस्त्रक्रियेच्या निमित्तानं हॉस्पिटलमध्ये होते. शुद्धीवर आल्यावर P. L. म्हणाले, ‘तुला एक फार सुंदर आणि खूप मोठं पत्र आलंय. ओळख कुणाचं ते.’ प्रथम आठवलं ते तुमचं नाव, पण मी ते तसंच गिळलं. कारण तुमचं पत्र सुंदर असेल हे नक्की, पण मुळात ते येईल की नाही, याबद्दलच साशंक होते. आणि इच्छाशक्तीच्या जोरावर एखादी गोष्ट घडू शकते म्हणतात (याला काही निश्चित अर्थ नसला तरी) तसं काही झालं आणि तुमचं पत्र आलंच, तरी ते ‘खूप मोठ्ठे’ निश्चितच नसेल, याची खात्री होती.”
जीए दाखवत नसले तरी त्यांना त्यांची दुःखं असह्य होत असणार, हे सुनीताबाईंनी ओळखलं होतं. जीएंची संवेदनशीलताच तेवढी पराकोटीची होती. त्यामुळे दुःख टाळता आलं नाही, तरी दुःखाच्या संवेदना आणि आठवणी टाळण्याकडे त्यांचा कल झाला होता. त्यांची सख्खी मोठी बहीण तिच्या लहान वयात कोल्हापूरमध्ये मृत्यू पावली, म्हणून मग जीए परत कधी कोल्हापूरला गेलेच नाहीत. प्रभावती आजारी असताना घटप्रभेला डॉक्टरांकडून वाईट अनुभव आला, म्हणून मग त्यांनी घटप्रभा हे गाव त्याच्या नावासह वर्ज्य केलं. असा सगळा प्रकार.
सुनीताबाईसुद्धा याच प्रकारातल्या होत्या. रमीचा डाव जिंकल्यावर मोठ्यानं आनंद व्यक्त केला म्हणून पुलंनी नाराजी व्यक्त केली, म्हणून मग परत कधी रमी खेळायचीच नाही, असं त्यांनी ठरवलं. गरोदर असताना स्वतःसाठी सोललेलं डाळिंबाचे दाणे पुलंच्या भावंडांनी खाल्ले, बाईंना वाटलं किती असंवेदनशील घर हे! अशा असंवेदनशील घराचा राग आला म्हणून मग त्यांनी गर्भपात करून टाकला. या प्रकारात त्यांना परत मूल झालं नाही. दुःखामुळे अनेक गोष्टींवर कायमच्या फुल्या कशा माराव्याश्या वाटतात, हे सुनीताबाईंना चांगलंच माहीत होतं.
इथं एक सांगावसं वाटतं की, जीएंची सुनीताबाईंना आलेली सगळी पत्रं वाचण्याची पुलंना मुभा होती. आणि सुनीताबाईंनी लिहिलेली सगळी पत्रंही जीए प्रभावती आणि नंदा यांना वाचायला देत असत.
सुनीताबाई मोकळेपणाने बोलू लागल्यावर थोड्याच काळात, जन्मभर डोळ्यावर काळा गॉगल घालून आपल्या भावना लपवणारे जीए सुनीताबाईंच्या समोर आपल्या भावना हळूहळू उघड्या करू लागले. आपण भोगलेल्या वेदना उघड करून दाखवू लागले. आपले वेदनादायक अनुभव आणि आठवणी सांगू लागले. पुढे पुढे जीए आपल्या नाजूक मनोवस्था सुनीताबाईंसमोर उघड करू लागले. आपण आता सृजनशीलतेपासून कसे दूर चाललो आहे, हे सांगू लागले.
१९८४च्या एका पत्रात जीए लिहितात - “सध्या मी वेस्टलॅंडमधून चालल्याप्रमाणे झालो आहे. दाट लवचीक असला अंधार ढकलत, पायाखाली काहीतरी स्थिर शोधत, पुढे चालण्याची माझी गोंधळ-धडपड आहे.” हे वाक्य वाचल्यावर आपल्या मनात विचार येतो की, हा आधार कुणा व्यक्तीचा हवा होता की, कुठल्या अंतिम सत्याने झळाळणाऱ्या तत्त्वाचा की, कुठल्या अंतिम सत्याने झळाळणाऱ्या अस्तित्वाचा?
टी. एस. इलियटची ‘वेस्टलॅंड’ ही कविता म्हणजे सृजनशीलता संपलेल्या कवीने केलेले माणसाच्या आध्यात्मिक वांझोट्या अवस्थेबद्दलचे चिंतन आहे.
पत्रलेखनाच्या या काळात जीए आध्यात्मिक संकल्पनांबद्दल त्यांची काय मते आहेत, हे सुनीताबाईंना सांगत होते. या जगात दुःख, दुष्टता, क्रूरता, अमानुषता आहे याचा अर्थ परमेश्वर या जगात नसावा असे त्यांना वाटत होते. ग. प्र. प्रधानांनी लिहिलंय- “मानवी दुःखाचे स्वरूप metaphysical आहे, असे जीएंना वाटत होते."
दुःखाचे स्वरूप ‘मेटॅफिजिकल’ आहे, याचा अर्थ दुःखे ही माणसाच्या आयुष्यात आपल्याला न दिसणाऱ्या शक्तींकडून आणली जातात, असे जीएंना वाटत होते. दुःख माणसाला कसे झपाटून टाकतं, हे त्यांनी पदोपदी बघितलं होतं. जन्मभर या झपाटलेपणाची चित्रत्रं त्यांनी केली होती. यातून त्यांना भुतेखेते, जारण-मारण, भानामती, वेड या सगळ्याबद्दल कुतूहल वाटू लागले असावे. भुतेखेते आणि मुख्य म्हणजे ‘नियती नावाची शक्ती’ माणसाच्या आयुष्यात दुःखं आणत असावी, असं जीएंना कुठेतरी वाटत होतंते. पण त्याच वेळी या जगात परमेश्वर नाहिये, असंही त्यांना वाटत होतं. या जगात जर इतकी दुःखं असतील, तर परमेश्वर कसा असेल, असा विचार त्यांच्या मनात येत असे. थोडक्यात, जे कारण परमेश्वर नसण्याचं होतं, तेच कारण भुतेखेते असण्याचं असणार, असं त्यांना वाटत होतं.
दुःखाचे स्वरूप ‘मेटॅफिजिकल’ आहे, याचा अर्थ दुःखे ही माणसाच्या आयुष्यात आपल्याला न दिसणाऱ्या शक्तींकडून आणली जातात, असे जीएंना वाटत होते. दुःख माणसाला कसे झपाटून टाकतं, हे त्यांनी पदोपदी बघितलं होतं. जन्मभर या झपाटलेपणाची चित्रत्रं त्यांनी केली होती. यातून त्यांना भुतेखेते, जारण-मारण, भानामती, वेड या सगळ्याबद्दल कुतूहल वाटू लागले असावे. भुतेखेते आणि मुख्य म्हणजे ‘नियती नावाची शक्ती’ माणसाच्या आयुष्यात दुःखं आणत असावी, असं जीएंना कुठेतरी वाटत होतंते. पण त्याच वेळी या जगात परमेश्वर नाहिये, असंही त्यांना वाटत होतं. या जगात जर इतकी दुःखं असतील, तर परमेश्वर कसा असेल, असा विचार त्यांच्या मनात येत असे. थोडक्यात, जे कारण परमेश्वर नसण्याचं होतं, तेच कारण भुतेखेते असण्याचं असणार, असं त्यांना वाटत होतं. परमेश्वर नसावा, असं जीएंना वाटत असलं, तरी ‘माया’ ही संकल्पना त्यांना महत्त्वाची वाटत होती.
परमेश्वर नसावा, असं जीएंना वाटत असलं, तरी ‘माया’ ही संकल्पना त्यांना महत्त्वाची वाटत होती. सुनीताबाईंना ते लिहितात - “मला ‘माया’ हा शब्द अतिशय अर्थपूर्ण वाटतो. साधारणपणे ‘माया’ हा शब्द आभास, खोटेपणा या अर्थीच स्वीकारला जातो. पण खुद्द शंकराचार्यांनीदेखील नेहमीच त्या अर्थाने तो शब्द वापरला आहे, असे वाटत नाही. जर वस्तू म्हणजे केवळ form अशी कल्पना केली, तर माया म्हणजे आभास हे ठीक आहे. पण साऱ्याच वस्तुजातात जी एक चैतन्यमय लहर असते, जिच्यामुळे प्रत्येक वस्तू स्थिर दिसत असताही बदलत असते, ती खरी ‘माया’- साऱ्या विश्वात असलेली प्रेरणा! ही कल्पना मला अतिशय भव्य वाटते. मुळांच्या साहाय्याने अन्न शोषून त्याचे पानाफुलांत रूपांतर करणारी, फुलांतून फळ निर्माण करणारी व शेवटी त्यातील बीज जागवून इतर मातीत एकजीव करणारी, तीन मैल खोलीच्या पॅसिफिक सागरात माशांमध्ये प्रकाशकण ठेवणारी, आणि एखाद्या षोडशीच्या डोळ्यांत तसाच प्रकाशकण निर्माण करणारी, यौवनात रक्ताला कढ आणणारी आणि वार्धक्यात कणाकणाने सारे परत मागणारी, घड येताच केळीचे आयुष्य संपवणारी, अंडी घालून प्रजोत्पादन करण्याच्या ओढीने salmon माशांना शेकडो मैल पाण्याच्या उलट दिशेने प्रवासाला नेणारी आणि अंडी बाहेर येताना त्यांना नष्ट करणारी - गडकऱ्यांच्या भाषेत, चिखलात उमललेल्या कमळाला आभाळाकडे पाहायला लावणारी व आभाळात जन्मलेल्या विजेला धरणीवर आणणारी ही चिरंतन शक्ती म्हणजे 'माया'! एखाद्या प्रचंड कारखान्यात चक्रे, यंत्रे, पिस्टन, निरनिराळ्या आकारांचे दिवे यांत वीज निरनिराळ्या आकारांत असावी त्याप्रमाणे! बाह्यतः निश्चल दिसणाऱ्या वस्तूंत सतत बदल होत आहे, ही कल्पना आधुनिक Physicsशी विसंगत नाही. प्रत्येक वस्तूतील electrons अमर्याद गतीने फिरत असतातच; इतकेच नाही, ती विलक्षण गती आहे. म्हणूनच ती वस्तू काही काळ, वेगाने फिरत असलेल्या भोवऱ्याप्रमाणे स्थिर वाटते. Great speed is stability; eternal change is the only eternal thing. माया हेच एकमेव सत्य! माया मागे टाकून ब्रह्मन् कडे शंकराचार्यांबरोबर जाण्या एवढा माझा आवाकाच नाही. मोठ्या प्रयत्नाने मी गंगोत्रीपर्यंत जाईन. पुढील गोमुखापर्यंतचा प्रवास प्रतिभासंपन्न आचार्यांचा!”
माया आणि तिचे कार्य बुद्धीला बघता येते, म्हणून जीए मायेच्या संकल्पनेपर्यंत स्वतःला मर्यादित ठेवत होते, असं वाटतं. शॉपेनहॉवरची भूमिका अगदी अशीच होती, हे आपण पाहिले आहे. शॉपेनहॉवरची वैश्विक इच्छाशक्तीची संकल्पना आणि जीएंनी मांडलेली मायेची संकल्पना यात विलक्षण साम्य आहे. शंकराचार्यांच्या प्रतिभेचे कोणी ब्रह्म गाठण्याचा प्रवास करू शकतील, असं जीए म्हणत होते. म्हणजे शॉपेनहॉवरप्रमाणेच आध्यात्मिक अनुभव खरे असू शकतात, असं जीएंचेही मत होतं, असं म्हणायचं का?
जीए वेस्टलॅंडमधून चालत होते. मी पायाखाली आधार शोधतो आहे, हे सुनीताबाईंना सांगावं, असं त्यांना वाटत होतं. सुनीताबाईंना परमेश्वर नसावा, असंच वाटत होतं. माया या प्रकाराबद्दल विचार करायला त्यांना वेळ नव्हता. या ‘माये’ने तयार केलेल्या या जगात कलेचा सांभाळ करण्यात त्या मग्न होत्या. कलेचे अपार्थिव उन्मेष ज्यांच्यात दिसतील, त्यांना या जगातील त्रासाचा वारा लागू नये, म्हणून त्या प्रयत्न करत राहिल्या.
पुलंचा संसार सुनीताबाई अत्यंत प्रेमानं करत होत्या. माधव आचवल यांच्या तब्येतीविषयी त्या काळजी करत होत्या. त्यांची नाटके व्हावीत म्हणून वणवण करत होत्या. जीए आजारी पडले, तेव्हा नंदाने त्यांना धारवाडवरून उचलून पुण्याला आपल्या सासरच्या घरी आणले. तेव्हा त्यांना स्वतःचा फ्लॅट मिळावा म्हणून सुनीताबाई सरकार दरबारी खेटे घालत होत्या. जीए म्हणत होते की, माया हेच एकमेव सत्य. माया हेच एकमेव सत्य असल्याप्रमाणे सुनीताबाई आयुष्यभर जगत आल्या होत्या. नाहीतर कुठल्या भावनेतून आपलं छत्र त्यांनी या तीन कलावंतांवर धरलं होतं?
जीएंच्या प्रतिमांचे वर्णन करताना आचवल ‘पारदर्शक पेयावर तरंगणाऱ्या बुडबुड्यां’ची जी प्रतिमा तयार करतात, ती वाचली की, आपल्याला वाटू लागते की, कॉफीच्या अनुभवामध्ये जे काम ‘टॅनिन’ करते, सिगरेटच्या अनुभवामध्ये जे काम ‘निकोटिन’ करते आणि वाईनच्या अनुभवात जे काम ‘अल्कोहोल’ करते, ते काम जीएंच्या कथेच्या अनुभवात प्रतिमा करतात. जीएंच्या प्रतिमा आपल्या मनःस्थिती स्वतःच्या मूडप्रमाणे बदलतात. कित्येकदा या प्रतिमा आपल्या मनात त्यांची स्वतःची अशी जागा तयार करतात. हे आपल्यासाठी प्रत्ययाचे क्षण असतात. हे प्रतिमांचे जग आपल्या मनात या जगाविषयी अनेक आवर्तने तयार करत राहते. तसं पाहायला गेलं, तर या जगाच्या अनुभवातून अर्थ तयार होणार नसतील, आपल्याला जीवनाविषयी नवनवीन प्रतीती प्राप्त होणार नसतील, तर या जगाचा आणि त्याने तयार केलेल्या संवेदनांचा दुसरा उपयोग तरी काय आहे?
माधव आचवल आर्थिक सुस्थितीत होते. त्यांच्या आजारपणाजी तशी काळजी सुनीताबाईंना वाटत नव्हती. जीए आब्रूदारपणे राहत असले, तरी त्यांच्या आजारपणांची आणि त्यांच्यावरच्या जबाबदाऱ्यांची सुनीताबाईंना काळजी वाटत होती. छोट्या गावातला अत्यंत प्रामाणिकपणे जगलेला एक प्राध्यापक! असून असून तो किती सुस्थितीत असणार, हा विचार सुनीताबाईंच्या मनात सतत येत असणार.
जीए दाखवत नसले तरी त्यांना त्यांची दुःखं असह्य होत असणार, हे सुनीताबाईंनी ओळखलं होतं. जीएंची संवेदनशीलताच तेवढी पराकोटीची होती. त्यामुळे दुःख टाळता आलं नाही, तरी दुःखाच्या संवेदना आणि आठवणी टाळण्याकडे त्यांचा कल झाला होता. त्यांची सख्खी मोठी बहीण तिच्या लहान वयात कोल्हापूरमध्ये मृत्यू पावली, म्हणून मग जीए परत कधी कोल्हापूरला गेलेच नाहीत. प्रभावती आजारी असताना घटप्रभेला डॉक्टरांकडून वाईट अनुभव आला, म्हणून मग त्यांनी घटप्रभा हे गाव त्याच्या नावासह वर्ज्य केलं. असा सगळा प्रकार.
सुनीताबाईसुद्धा याच प्रकारातल्या होत्या. रमीचा डाव जिंकल्यावर मोठ्यानं आनंद व्यक्त केला म्हणून पुलंनी नाराजी व्यक्त केली, म्हणून मग परत कधी रमी खेळायचीच नाही, असं त्यांनी ठरवलं. गरोदर असताना स्वतःसाठी सोललेलं डाळिंबाचे दाणे पुलंच्या भावंडांनी खाल्ले, बाईंना वाटलं किती असंवेदनशील घर हे! अशा असंवेदनशील घराचा राग आला म्हणून मग त्यांनी गर्भपात करून टाकला. या प्रकारात त्यांना परत मूल झालं नाही. दुःखामुळे अनेक गोष्टींवर कायमच्या फुल्या कशा माराव्याश्या वाटतात, हे सुनीताबाईंना चांगलंच माहीत होतं.
सुनीताबाईंच्या या स्वभावाला पुलंनी सांभाळून घेतलं. त्यांच्या स्वभावातून जन्मलेल्या अशा अनेक गोष्टींमध्ये पुलंनी त्यांचा सांभाळ केला. जीएंचा असा सांभाळ कोण करणार? प्रत्येक पत्रात काळजी व्यक्त करणं, ‘आजारी पडला असाल तर आमच्याकडे या’ असं सांगणं, एवढंच त्या करू शकत होत्या. जीएंची काळजी आपण घ्यावी, असं त्यांना वाटत होतं. जीएंनी त्यांची ही माया स्वीकारली नाही, ही वेगळी गोष्ट!
जीए आणि सुनीताबाई यांच्यात आध्यात्मावर आणि तत्त्वज्ञानावर जशी चर्चा झाली, तशी स्त्री-पुरूष मैत्रीवरसुद्धा झाली. चर्चा कसली वादच तो! स्त्री-पुरुषांची मैत्री कधीही निर्मळ असू शकत नाही. त्यातल्या कुणाच्या तरी मनात रोमँटिक भाव तयार होतो, कुणाच्या तरी मनात शारिरिक प्रेम तयार होते, असे शॉपेनहॉवर म्हणतो, हे जीएंनी सुनीताबाईंना सांगितलं होतं. निसर्गाने रचलेली निर्मितीची आदिम ओढ शारीरिक प्रेमाचा आयाम स्त्री-पुरुष मैत्रीला देतेच देते, असा हा विचार होता. स्त्री-पुरुषांमधले शारिरिक ओढीचं नातं हेच एक आदिम, स्वच्छ आणि जीवनाच्या उगमापाशी असलेलं प्रेम असू शकेल, असं मत जीएंनी सुनीताबाईंपाशी व्यक्त केलं होतं.
सुनीताबाईंचा पिंड शरतचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबऱ्यांवर घडलेला. त्यांचं म्हणणं असं की, शरतबाबू म्हणतात त्याप्रमाणे स्त्री-पुरुषांमध्ये सुंदर आणि निर्मळ मैत्री तयार होऊ शकते. विश्वास, एकमेकांबद्दलचा आदर आणि एकमेकांना समजून घेण्याची सुंदर मनोवस्था, या खांबांवर स्त्री-पुरुषांमधली निर्मळ मैत्री उभी राहू शकते.
स्त्री-पुरुष प्रेमाची शरतचंद्रलिखित घडण जीएंना हास्यास्पद वाटत होती. त्यांच्या या मतामुळे सुनीताबाईं दुखावल्या गेल्या होत्या. परंतु एक गोष्ट मात्र खरी की, जीए आणि सुनीताबाई बोलत काहीही असले, तरी त्यांच्या मैत्रीत फरक पडला नाही.
कर्णाला कवचकुंडले ज्याप्रमाणे उपजतच प्राप्त झाली होती, त्याप्रमाणे सुंदर जीवनमूल्ये घेऊन जीए या जगात आले होते आणि ती कवचकुंडले तशीच लेवून ते या जगातून गेले, याचे बाईंना विलक्षण कौतुक होते. जीए गेल्यावर लिहिलेल्या अनावृत्त पत्रात बाई जीएंचे एक वाक्य उदधृत करतात- “जुन्या सागवानी पेटीत जतन करून ठेवलेल्या वस्त्रासारखा तो माणूस, त्याचे नाव घेतानादेखील नमस्कार करूनच ते उच्चारावे. सुरुवातीपासूनच माझ्या मनात तुमच्याबद्दल ही भावना रुजली, आणि पत्रे लिहिताना भावनेच्या भरात कधी चुकून मी मर्यादा ओलांडली असली, तरी पुन्हा आपल्या श्रेयमार्गावरच येण्याचे भान मला राहिले, याचे कारण तुम्ही स्वतः आखून घेतलेली लक्ष्मणरेषा कधीही ओलांडली नाही हेच होते.
जीए कधी नव्हे ते कोमलपणे व्यक्त होत राहिले. आपल्या ‘आतड्याच्या’ भावना व्यक्त करत राहिले. आपल्या साहित्यिक मनाचं प्रचंड झळाळतं वैभव आपल्या पत्रांमधून सुनीताबाईं समोर व्यक्त करत राहिले. तीनशे छापील पानं होतील इतक्या मनमुराद गप्पा त्यांनी सुनीताबाईंबरोबर झाडल्या.
जीए शरतचंद्रांच्या नायिकांच्या प्रेमाला हसले, हे सुनीताबाईंना फार लागलं होतं. जीए गेल्यावर त्यांना लिहिलेल्या ‘सप्रेम नमस्कार’ या पत्रात सुनीताबाईंनी ही खंत व्यक्त केली. त्या लिहितात - “दुर्दैवाने शरच्चंद्राबाबत एक कुंपण तयार झाले. मूकपणे, फार दुरून, स्वत: झिजत, भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या त्यातील काही नायिका हास्यास्पद वाटू लागल्या. नुकसान शरच्चंद्रांचे झाले नाही, झाले आमचे… ही केवळ माझी त्या क्षणी घातलेली समजूत होती, तुमची सौजन्यशील रीत होती, हे न कळण्याइतकी मी काही दूधखुळी नाही. शरदबाबूंच्या ‘त्या’ नायिका तुम्हांला खरेच हास्यास्पद वाटत होत्या का? की त्यांच्याबद्दल तुम्हांला नफरत होती, कारण तुम्ही त्यांना चक्क घाबरत होता? ती हास्यास्पद आहे हे सिद्ध करण्यासाठी का होईना, तुम्ही तसली एक तरी नायिका रंगवायची होती! तुम्ही म्हणाल, तसे पुरुष तरी मी कुठे रंगवले? पण असे पुरुष मुळातच आधी किती? आणि पुरुषांचे दुःख तरी तसे खोल, भळभळणारे असेल का? मी त्यांना दोष देत नाही. परंपरागत संस्कारांनी पुरुषजातीचे ‘श्रेष्ठत्व’ त्यांच्या अंगी इतके भिनलेय की, जीव तोडून प्रेम करण्याची त्यांची संवेदनाच बोथट होऊन गेली आहे. बिचारे! ‘तुम्हीही त्यांतलेच’ असे मात्र मी म्हणणार नाही. तरीही जाणूनबुजून तुम्ही कुणावरही अन्याय करणार नाही याबद्दल मला मनोमन खात्री होती.”
जीएंनी आपल्यावर अन्याय केला, अशी ही भावना होती. एका लक्ष्मणरेखेच्या पुढे जीएंनी सुनीताबाईंना आपली काळजी घेऊ दिली नाही, याचं सुनीताबाईंना पराकोटीचं दुःख झालं होतं, पण करणार काय? जीएंना पत्रलेखनाच्या पलीकडे कुठे गुंतायचेच नव्हते. त्यांनी लक्ष्मणरेखा आखली होती. त्या उलट सुनीताबाईंना जीएंना आजारपणाच्या वादळापासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक ‘आशियाना’ तयार करायचा होता. परंतु गंमत अशी होती की, जीएंना स्वतःची फारशी पर्वाच नव्हती. सुनीताबाईंना मायेच्या वादळापासून त्यांचं रक्षण करायचं होतं, आणि जीएंना आत कुठेतरी, या मायेच्या पार जायचं होतं.
सुनीताबाईंची माया जीएंनी नाकारली होती, त्याला अजून एक कारण म्हणजे त्यांचे स्वाभिमानाचे मूल्य हेसुद्धा होते. आपल्या शेवटच्या आजाराचा थांगपत्ता त्यांनी सुनीताबाईंना लागू दिला नाही. ब्लड-कॅन्सरवर उपचार करण्यात प्रभावतीसाठी ठेवलेले सगळे पैसे खर्च होतील, म्हणून त्यांनी आपल्या आजारावर उपचार करून घ्यायचे नाहीत, असे ठरवले. सुनीताबाईंना हे कळले, तर त्या निष्णात डॉक्टरांची फौज उभी करतील, अमाप पैसा खर्च करतील, हे जीएंना माहीत होते. सुनीताबाईंच्या घराला चिकटून असलेल्या हॉस्पिटलात दाखल होऊनसुद्धा सुनीताबाईंना कसलाच पत्ता जीएंनी लागू दिला नाही. ते गेल्यावरच सुनीताबाईंना त्यांच्या आजाराविषयी माहिती मिळाली. प्रभावतीच्या प्रेमासाठी कॅन्सरच्या दाढेत जीए अत्यंत शांतपणे चालत गेले.
सुनीताबाईंना खूप वाईट वाटलं, परंतु स्वाभिमानाच्या बावनकशी मूल्याने त्या स्तिमित झाल्या. स्वाभिमानाच्या मूल्यासाठी मृत्यूच्या दाढेत शांतपणे चालत गेलेला मित्र कधी पाहायला मिळेल, असं त्यांना वाटलं नसावं. आपला इतका महत्त्वाचा मित्र आपल्या घरापासून पन्नास फुटावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पत्ताही लागू न देता दाखल होतो काय, तिथं तीन-चार दिवस वेदना भोगत राहतो काय, आणि आपली शेवटची भेट न घेता जातो काय!
नाती आणि लागेबांधे (attachment) हे मनस्वी माणसांच्या आयुष्यात येताना दुःखंच घेऊन येतात, या जीएंच्या वाक्याचा एक वेगळाच अर्थ सुनीताबाईंना प्रतीत झाला असावा. जीएंनी दाखवलेला हा ‘परके’पणा पाहून सुनीताबाई अतिशय व्यथित झाल्या.
त्यांना उत्तर हवं होतं. त्या जीएंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात - “या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत मी कुठपर्यंत जाणार, माझे मलाच माहीत नाही. पण आपली पुन्हा कधी कुठे भेट झालीच, तर मी पहिला प्रश्न हाच विचारीन. तोवर Good bye dear! पण अशी भेट कधी होत असते का? ते शक्य तरी आहे का?”
या नंतर सुनीताबाई रिचर्ड बाखचे वाक्य उदधृत करतात- “Don't be dismayed at good-byes. A farewell is necessary before you can meet again. And meeting again, after moments or lifetimes, is certain for those who are friends.” (“निरोपांना घाबरू नकोस. परत भेटायचे असेल तर निरोप घेणे आवश्यक असते. काही क्षणांनंतर असो अथवा काही जन्मांनंतर, जे मित्र असतात त्यांची भेट होतेच होते.”)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सुनीताबाई स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी आणि निरीश्वरवादी म्हणवत होत्या, तर त्या आत्ता मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल असं का बोलत आहेत, असा विचार आपल्या मनात येतो. एक भावना म्हणून का, मृत्यूच्या आमने-सामने आल्यावर आध्यात्मिक लोक म्हणतात त्याप्रमाणे आपल्यातील आपले अनंत अस्तित्व हुंकार भरते म्हणून? जीएंचा कायमचा निरोप घेणं सुनीताबाईंना अवघड होऊन बसलं होतं.
माधव आचवल ८० साली अचानक गेले. तेव्हाही बाईंनी मृत्यूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. आचवल गेल्यावर त्यांनी लिहिलं- “माधव गेला? मृत्यूवर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा? इतरांच्या जीवनाशी आपले जीवन इतके जुळलेले असते की, आपण आहो आणि तरीही आपल्याशी इतक्या आपुलकीने जुळलेली ती व्यक्ती आता कुठेच नाही ही कल्पना तरी कशी करायची? ‘आपला’ म्हणून जो एक गोतावळा असतो, त्या सगळ्यांच्यात आपले अंश विखुरलेले असतात आणि आपल्या अंतरंगात त्यांचे अंश वास्तव्याला असतात. आठवणी म्हणजे तरी दुसरे काय? ‘माझें माझें म्हणुनि आजवरि जें लेणें ल्यालें’ ते माझा स्वतःचा मृत्यू होईपर्यंत सदैव माझ्या अंगप्रत्यंगांवर असेच झळकत राहणार. माझ्या मृत्यूच्या सोबतीनेच माझ्यापुरते तरी आपण सगळे अज्ञातात जाणार, माधव! अनोळखी रस्त्याने अपरात्री पॅरिस पाहायला जात होतो ना, तसेच काहीसे! ‘परस्परां जडो मैत्र जीवाचें’ हे कविवचन निरर्थक ठरवण्याइतका मृत्यू बलशाली आहे? नाही रे -
‘In the world of feeling, deep may call to deep,
even from a vast distance.’ ”
सखोल भावना खूप दुरवरूनसुद्धा एकमेकांना साद घालू शकतात, हे स्टीव्हन झ्वाइगचे वाक्य खरे असावे, असे त्यांना माधव आचवल गेल्यावर वाटत राहिले.
पुल गेल्यावर त्यांना लिहिल्या पत्रात सुनीताबाई म्हणतात - “रॉबर्ट ग्रेव्हजची एक कविता आहे, मूळ शब्द आज नीटसे आठवत नाहीत, पण मनाच्या गाभ्यात अर्थ मात्र या क्षणी जागा झालाय तो काहीसा असा : मृत्यूतून पुनर्जन्म होणे ही मोठीशी जादू किंवा अशक्यप्राय गोष्ट नव्हे. जीवन बहुधा पूर्णांशाने विझलेलं नसतंच. एखाद्या समर्थ फुंकरीने वरची राख उडून जाते; आणि आतला तेजस्वी जिवंत अंगार धगधगायला लागतो....”
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आपल्या तीन मित्रांचे मृत्यू सुनीताबाईंना नाकारताही येत नव्हते आणि स्वीकारताही येत नव्हते. सुनीताबाई हताश झाल्या होत्या. गोंधळात पडल्या होत्या. आचवल आणि जीए फार पूर्वी गेले होते. आता पुलसुद्धा गेले. सुनीताबाईंनी स्वतः स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या आता संपल्या होत्या. त्यांना आता मनापासून एकटं राहायचं होतं, पण आठवणी त्यांना एकटं राहू देत नव्हत्या.
मनात विचार येतो की, स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणारे पुल, जीए आणि सुनीताबाई वेळोवेळी अध्यात्मातल्या संकल्पना का बोलताना दिसतात? पुल दिव्य स्वरांच्या प्रतीतीनंतर अनंतात विलीन होण्याची भाषा बोलतात. सुनीताबाई मित्रांच्या मृत्यूनंतर त्यांना परत भेटण्याची भाषा बोलतात. जीए दुःखाचा शोध घेताना भुते-खेते, जारण-मारण, भानामती यांच्यात रस घेताना दिसतात. माधव आचवल तर उघडपणे आध्यात्मिक जीवनदृष्टी स्वीकारत होते.
या नक्की कसल्या प्रेरणा म्हणायच्या? पूर्णत्वाच्या शोधात माणूस त्याच्या कळत-नकळत, अगदी अनावरपणे, बुद्धीच्या पलीकडचे स्तर शोधू लागतो का?
या जगातला कुठलीही व्यक्ती पूर्णत्वाच्या शोधात असते. कुणाला वाटतं, पैसा मिळाला की, आपल्याला पूर्णत्व येईल. कुणाला वाटतं, सत्ता मिळायला हवी, कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर नाती, तर कुणाला अजून काही. या जगातील बहुतेक लोक लौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधतात, तर संवेदनशील कलावंत आणि तत्त्वज्ञ अलौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधताना दिसतात. अलौकिक गोष्टीत घेतला गेलला पूर्णत्वाचा शोध वेगवेगळे मार्ग चोखाळतो, वेगवेगळे रंग धारण करतो, वेगवेगळी वळणे घेतो. कधी स्वर, तर कधी रूप, तर कधी शब्द! कधी कलेच्या अंगाने, तर कधी तत्त्वज्ञानाच्या! कधी बुद्धिप्रामाण्याच्या अंगाने, तर कधी अध्यात्माच्या! सगळ्या संवेदनशील कलाकारांची आणि तत्त्वज्ञांची आयुष्ये, या शोधामुळे झळाळून गेलेली असतात. या सगळ्या झळाळत्या शोधाला स्त्री-पुरुष मैत्रीची पार्श्वभूमी लाभलेली आपल्याला नेहमीच दिसून येते. याचे कारण असे की, तत्त्वज्ञान आणि कला यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्येही त्यांच्या कळत-नकळत पूर्णत्व शोधत असतात.
हे सगळे बघितले की, शॉपेनहॉवरचे बुद्धिप्रामाण्य मानणारे तत्त्वज्ञान आणि उपनिषदांचे बुद्धीच्या विसर्जनानंतर सुरू होणारे तत्त्वज्ञान, हे युद्ध आपल्या प्रत्येकात कसे खेळले जाते आणि त्याला स्त्री-पुरुष साहचर्याची पार्श्वभूमी कशी असते, हे आपल्या लक्षात येते.
समाप्त
.................................................................................................................................................................
लेखांक : एक - सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : पु. ल. देशपांडे, माधव आचवल आणि जी. ए. कुलकर्णी
लेखांक : दोन - सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : पुलंसाठी संगीत हा पूर्णत्वाचा शोध होता, तो अनुभव सुनीताबाईंना शक्य नव्हता. त्यामुळे त्या कवितेकडे ओढल्या गेल्या
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment