पुण्याच्या ‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने १६-१७ सप्टेंबर २०२३ रोजी सांगलीत नास्तिक परिषद आयोजित करण्यात आली होती. हा या परिषदेचा दशकपूर्ती समारंभ होता. या परिषदेत मांडलेल्या गेलेल्या विचारांच्या अनुषंगाने लेखिकेने आपल्या तीन पिढ्यांच्या नास्तिक परंपरेविषयी आणि एकदंर नास्तिक-आस्तिक विचारांविषयी केलेली ही मांडणी... नास्तिकांनाही बरेच काही सुचवणारी आणि आस्तिकांनाही...
.................................................................................................................................................................
उत्तरार्ध
नास्तिकता म्हणजे अरसिकता हा आणखी एक समज. तो माझ्याही मनात नकळतपणे होता. आधी म्हटलं त्याप्रमाणे सणवार साजरे केल्यामुळे वातावरणात निर्माण होणाऱ्या उत्साहाचं आकर्षण मला लहानपणी खूप होतं. त्या काळात शाळा, अभ्यास वगळता इतर उद्योग फारसे नसल्यामुळे हे आकर्षण जास्त होतं. पुढे थोडेफार उद्योग, व्यवधानं आल्यावर ते कमी झालं, पण अजूनही पुरतं गेलंय, असं अजिबात नाही. मधला एक टप्पा जरा विचित्र होता. प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा काळाच्या, तर्काच्या कसोटीवर घासून बघणं, ही आपली जबाबदारी आहे असं वाटायचं. या कसोटीवर निरर्थक ठरणाऱ्या गोष्टींचा त्याग केला, तरच आपण खरे ‘रॅशनल’ हा समज मनात पक्का होता. मात्र हे सगळं वजा करून टाकलं, तर आयुष्यातला रसच संपून जाईल की काय, अशी भीतीही मनाच्या एका कोपऱ्यातून सतत वर येत राहायची.
गणपती नावाच्या एका पुराणातल्या अगम्य रितीनं जन्माला आलेल्या देवाची मूर्ती दहा दिवस भक्तिभावानं बसवायची, जोरात उत्सव साजरा करायचा, मग तिचं विसर्जन करायचं, ही कल्पनाच मनाला खूप बालिश वाटत होती (अजून वाटते). मात्र आजूबाजूचे बहुतेक जण या उत्सवात रमलेले असताना, आपण यातून बाजूला राहणं म्हणजेही एका निखळ आनंदाला मुकणं तर नाही ना, हा विचारही अस्वस्थ करत होता. कोणाकडे गेलं तर गणपतीला केलेली आरास बघून तिचा मोह पडल्यासारखं व्हायचं. आपणही घरात अशी सुंदर आरास करायला काय हरकत आहे, असा विचार मनात यायचा. पण ही आरास ज्याच्यासाठी केली जाते, त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवायला बुद्धी काही तयार नसायची (तो ‘बुद्धी’ची देवता म्हणवला जात असला तरीही).
वसंताची चाहूल लागल्यानंतर झाडांना फुटणारी पालवी, कोकिळाचं गोड कूजन, सोनेरी उन्हाची पखरण हे सगळं मनाला आतून प्रसन्न करतं, हे तर खरंच. निसर्गातल्या या ऋतूबदलाकडे विज्ञानाच्या दृष्टीकोनातून बघण्याऐवजी एक त्यातल्या गुढतेचा आनंद घ्यावा, त्यातला ‘रोमँटिसिझम’ मनात भरून घ्यावा ही माझी सहज प्रेरणा होती. मात्र याकडे ‘जादू’ म्हणून बघितल्यामुळे आपल्यातल्या नास्तिकतेशी दगाफटका होतोय की काय, याची चिंताही कुठेतरी पोखरत राहायची. अर्थात याला पर्याय आस्तिक होणं हा नव्हताच. म्हणजे वसंत अनुभवण्यासाठी कधीच पिवळे कपडे घालून ‘वसंतपंचमी’ची पूजा करावी, असं कधी मला वाटलं नाही. तरीही तर्कात न बसणारं असंही खूप काही आहे आणि त्याला नास्तिकतेत थारा आहे की नाही, ही शंका सारखी मनात यायची.
शिवाय ही वाट निसरडी आहे. यातून आपण देवाधर्माच्या जाळ्यात अडकू की काय असंही, आज खुळचट वाटलं तरी, वयाच्या विशी-पंचविशीमध्ये खरोखर वाटत होतं. मात्र सणांबद्दल आपल्याला जे आकर्षण वाटतंय, ते सांस्कृतिक स्वरूपाचं आहे आणि त्यापोटी आस्तिकतेच्या मार्गानं जाण्याची काहीच गरज नाही, हे वाढत्या वयासोबत ओघात पटत गेलं. म्हणजे एखादा सण साजरा करून आनंद मिळत असेल, तर तो करायला काहीच हरकत नाही. मात्र तो साजरा करण्याचं बंधन नसावं, त्यातल्या रूढीत अडकून पडण्याची तर अजिबातच गरज नाही, हा विचार हळूहळू आकार घ्यायला लागला.
माझ्या लहानपणी घरात दिवाळी साजरी होत होती. त्यातला आकर्षणाचा भाग हळूहळू कमी होत गेला. नंतर वर्तमानपत्रात नोकरी करायला लागल्यानंतर दिवाळीची सुटी हा प्रकार निकालात निघाला. म्हणजे एक दिवस ‘क्लोजिंग ऑफ’ (दुसऱ्या दिवशी अंक येत नाही तो) असतो, पण तो भाऊबीजेच्या आदल्या दिवशी असतो. कारण तेव्हा वितरकांना, वर्तमानपत्रं टाकणाऱ्या मुलांना सुटी हवी असते. एखाद्या वर्षी ही सुटी ‘भाकड’ दिवशी येते, एखाद्या वर्षी पाडव्याला. मी मुंबईत नोकरी करत होते, आई-बाबा वेगळ्या शहरात असायचे. त्यामुळे मी ‘क्लोजिंग ऑफ’ला जोडून पुढे रजा घ्यायचे आणि बाबांच्या सुटीचा फायदा घेऊन आम्ही कुठे तरी बाहेर जायचो किंवा घरी नातेवाईक वगैरे यायचे.
थोडक्यात लक्ष्मीपूजनाला मी बहुतेकदा ऑफिसमध्ये असायचे. दिवाळीच्या काळात वर्तमानपत्रामध्ये जाहिरातींचा सुळसुळाट असल्यानं काम कमी असायचं, पण बऱ्याच जणांची सुटी असल्याने मनुष्यबळही कमी असायचं. मी मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हमखास ऑफिसमध्ये असायचे. त्या वेळी इतर कोणी बरोबर असलेले लोक मारूनमुटकून काम करत असायचे. आता सगळे घरापुढे रांगोळी काढत असतील, आता घरी पूजा सुरू असेल, सोसायटीतले लोक दर्शनाला आले असतील, फराळाला आले असतील, मुलं फटाके उडवायला बाहेर गेली असतील, अशा चर्चा मोजक्या लोकांमध्ये सुरू असायच्या. मी कधीच त्या चर्चांशी ‘रिलेट’ केलं नाही.
मुळात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काम करून आपण काहीतरी ‘मिस’ करतोय असं वाटलंच नाही. घरी तर जाणारच आहोत, त्यापुढेही प्लान्स आहेत, दिवाळी संपली तर संपली, हाच विचार असायचा. आपण घरात नसणारच आहोत दिवाळीमध्ये तर दिवे, आकाशकंदील, फराळाचे पदार्थ याचा प्रश्नच येत नाही, असाही साधा विचार होता. दिवाळीची तयारी ही गोष्ट माझ्या आयुष्यातून पूर्णपणे वजा झालेली होती आणि त्यामुळे काहीतरी हुकतंय असं मला कधीही पुसटसंही वाटलं नाही.
माझ्यासाठी दिवाळी म्हणजे ‘दिवाळी अंक’ हे समीकरण तोवर फिट झालं होतं. मुलाच्या जन्मामुळे मी वर्तमानपत्रातली नोकरी सोडली. दरवर्षी येते तशी दिवाळी आलीच. मी नेहमीच्या सवयीनुसार तयारी वगैरे काहीच केली नव्हती. साध्या पणत्याही आणल्या नव्हत्या. अचानक धनत्रयोदशीपासून आजूबाजूच्या सगळ्या घरांपुढे आकाशकंदील आणि इलेक्ट्रिक दिव्यांच्या माळा लागल्या, ओळीत पणत्या लुकलुकताना दिसू लागल्या, फराळाच्या पदार्थांचे वासही येत होतेच. मला अचानक या सगळ्यातून एकदम वेगळं पडल्यासारखं वाटायला लागलं. वातावरणातल्या या उत्साहाचा भाग आपण होऊ शकत नाहीये, असं काहीतरी विचित्र ‘फीलिंग’ आलं.
खरं तर दिवाळीही एक ऋतूबदलाचाच सण. हिवाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज करणारा. आता कळ दाबल्याबरहुकूम इलेक्ट्रिक दिव्यांनी सगळं काही उजळून टाकण्याच्या काळात या पणत्यांना खरंच काही अर्थ आहे का? की एक प्रतीक म्हणून चार पणत्या लावायला काय हरकत आहे?
हिवाळ्यात शुष्क पडणारी त्वचा स्निग्ध करण्यासाठी दिवाळीत अभ्यंगस्नानाची परंपरा सुरू झाली असणार हे नक्की. पण ते केवळ एक दिवस करून भागणार आहे का? आणि ‘कोल्ड क्रीम’ लावूनच त्वचा स्निग्ध करण्याचा पर्याय आपण स्वीकारला असेल, तर या एका दिवसाच्या अभ्यंगस्नाला अर्थ आहे का? त्यात घरातल्या पुरुषांना बायकांनी उटणं लावण्याच्या, त्यांना ओवाळण्याच्या प्रथेतली ‘मिसोजिनी’ का चालू ठेवायची? अशा अनेक प्रश्नांशी झगडून या प्रथा समजून-उमजून मागे टाकल्या. मात्र त्यामुळे आयुष्यातले साधे साधे आनंदही गमावले जाताहेत का, हा नवीन प्रश्न त्या दिवाळीत मला छळायला लागला.
अर्थात यावर उपाय काढणं फार कठीण गेलं नाही. दिवाळीतल्या ज्या प्रथा पटत नाहीत, त्या पाळण्याची गरज नाही, तसं बंधन कोणी घातलेलं नाही किंवा घातलं तरी ते झुगारण्याइतपत बळ आपल्यात आलेलं आहे. मात्र खिडकीत आकाशकंदील लावून, चार पणत्या लावून, फराळाचे थोडेफार पदार्थ करून, चांगले कपडे घालून आजूबाजूच्या उत्साहाचा भाग व्हावंसं वाटत असेल, तर त्यातही एक नास्तिक म्हणून अपराधी वाटून घेण्याचं काहीच कारण नाही, हे मनाशी ठरवलं. आता मी मला हवी तशी दिवाळी साजरी करते. माझ्या खिडकीत पणत्या लावलेल्या बघून ‘लागलीस वाटतं तूही करायला दिवाळी वगैरे’ असे शेरे अस्तिक आणि नास्तिक दोन्ही पक्षांकडून ऐकायला मिळालेले आहेत, पण त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही.
नास्तिकता म्हणजे कोरडेपणा, रुक्षपणा, अरसिकता नाही. देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा माणूसही उत्तम साहित्यात खोलवर बुडू शकतो, संगीताचा आनंद लुटू शकतो, निसर्गाशी समरस होऊ शकतो आणि सौंदर्याचा आस्वाद घेत आयुष्य जगू शकतो आणि त्याचबरोबर चुकीच्या, अन्यायकारक, विषमतेला खतपाणी घालणाऱ्या प्रथापरंपरांमध्ये न अडकता तर्काची कास धरून विवेकी आयुष्यही जगू शकतो.
आस्तिकतेकडून नास्तिकतेकडे जातानाचा स्वत:चा प्रवास नास्तिक संमेलनात अनेकांनी सांगितला. त्यात आस्तिकता ही भीती आणि आमीष या दोन नकारात्मक बाबींवर आधारलेली आहे, हा मुद्दा मला मनापासून पटला. आस्तिक म्हणजे विश्वास ठेवणारे, आणि विश्वास तर सकारात्मक असतो. आधी म्हटलं त्याप्रमाणे माणसातल्या चांगुलपणावर विश्वास, दीर्घ सहवासातून परस्परांबद्दल निर्माण झालेला गाढ विश्वास वगैरे. मात्र आस्तिकतेच्या अर्थात विश्वास असला तरी त्याच्या समाजातल्या आविष्कारांमध्ये तो दिसत नाही. सततची असुरक्षितता, आजूबाजूच्या जगावरचा अविश्वास ह्यामध्ये देव नावाच्या काल्पनिक बाबीवर विश्वास टाकणं, श्रद्धा टाकणं लोकांना सोपं वाटत असावं.
भगतसिंगाच्या लेखातही या सोपेपणाचा उल्लेख आहे. दसऱ्याच्या उत्सवात बॉम्ब टाकल्याचा आरोप करून भगतसिंगाला जेव्हा पोलिसांनी पकडलं, तेव्हात तो नास्तिकतेपर्यंत पोहोचलेला होता. त्याच्या मते त्या वेळी तुरुंगात काढावे लागलेले दिवस त्याच्या नास्तिकतेची परीक्षा होती. त्या काळातही देवाचा धावा करण्याची गरज भासली नाही, इच्छा झाली नाही, म्हणजे आपण खरोखर नास्तिक झालो, अशी खात्री त्याला पटली.
खऱ्या नास्तिकतेची परीक्षा कठीण काळातच होते. देवावर हवाला ठेवून सगळं चांगलं होऊ दे म्हणणं सोपं असतं, आधार देणारं असतं, पण खरं पण या सोप्याचा आधार न घेता जे होईल ते सहन करणं म्हणजे नास्तिकता. विश्वाच्या अनंत, अगम्य पसाऱ्यात खूप काही घडत असतं. आपण त्या पसाऱ्याच्या खिजगणतीतही येणार नाही एवढे सूक्ष्म आहोत. त्या घडामोडींचा भाग म्हणून आपल्या आयुष्यातही काही नको असलेलं घडत असेल, तर ते स्वीकारलं पाहिजे, त्याला तोंड दिलं पाहिजे ही खूणगाठ बांधण्यासाठी नास्तिक विचार उपयोगी पडतो. ‘मला ह्यातून सुखरूप बाहेर पडू दे, तुझ्या भेटीला अनवाणी पायाने डोंगर चढून येते किंवा मला यातून सोडव, तुला सोन्याच्या दुर्वा वाहतो’ या आमिषांना नास्तिकतेत जागा नसते.
माझ्या बाबांना वयाच्या पन्नासाव्या वर्षी हार्ट अॅटॅक आला होता. त्या वेळी ते जालन्याला जिल्हा न्यायाधीश होते. आमच्या सरकारी क्वार्टरमध्ये वास्तूशांत वगैरे झालेली नसल्यामुळेच इथं आल्यावर लगेच त्रास झाला, आपण पूजा करून घेऊ, असा आग्रह कोर्टातल्या स्टाफने धरला. त्या वेळी माझ्या आईची भूमिका स्पष्ट होती. ‘तीस वर्षं सिगरेट ओढल्याचा परिणाम म्हणून हार्ट अॅटॅक आला आहे. यात उगाच वास्तूला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. पूजा वगैरे आम्ही करणार नाही.’ तरीही स्टाफने हट्ट करून घराच्या ओसरीवर कोणती तरी पूजा करून घेतलीच, पण माझे आई-बाबा काही यजमान म्हणून त्या पूजेला बसले नाहीत.
संकटाच्या काळातही देवाचा धावा करण्यापेक्षा किंवा दोषाचं खापर अस्थानी फोडण्यापेक्षा वस्तुनिष्ठ विचारांची कास न सोडणं म्हणजेच नास्तिकता. यात अहंकार नसतो, तर वास्तव किंवा काही वेळा स्वत:च्या चुकाही स्वीकारून परिणाम भोगण्याची तयारी असते. म्हणूनच नास्तिक माणूस अहंकारी नसतो, तर वास्तववादी असतो.
नास्तिकांबद्दल आस्तिकांचे जे काही आरोप असतात, तशाच नास्तिकांच्याही आस्तिकांबद्दल धारणा असतातच. नास्तिकतेच्या प्रवासात त्याबद्दल विचार करणंही अनिवार्य आहे, असं मला वाटतं. आपण नास्तिकता स्वीकारली म्हणजे आस्तिकतेबद्दल विचारच करण्याची गरज नाही, असं मला वाटत नाही. कारण, समाजात वावरताना, अगदी कुटुंबात, मित्रमंडळींमध्ये आस्तिक विचाराच्या लोकांशी आपला संबंध येत असतो, मैत्री असते, नातं असतं. भगतसिंग म्हणतो त्याप्रमाणे तर्कबुद्धी ही नैसर्गिक असते आणि तिला अटकाव झाला नाही, तर ती माणसाला नैसर्गिकपणे नास्तिकतेकडे घेऊन जाते.
नास्तिक असणं ‘ऑरगॅनिक’ आहे, नैसर्गिक आहे हे मान्य करणं म्हणजेच आस्तिक असणं हे कृत्रिम, घडवलेलं आहे, हेही मान्य केलं पाहिजे. मग असं असूनही नास्तिक अल्पसंख्य आणि आस्तिक बहुसंख्य का, याची कारणं शोधण्याचा प्रयत्न मी बराच काळ केला, कदाचित अजूनही तो शोध सुरूच आहे.
आस्तिकांचेही वेगवेगळे प्रकार निश्चितच आहेत. घरात चालत आलेल्या परंपरा पुढे सुरू ठेवणं आपलं कर्तव्य आहे, असं अनेकांना वाटत असतं. घरात आधीच्या पिढीतले सगळे देव मानत असल्यामुळे फार खोलात न जाता, प्रश्न न विचारता ते स्वीकारणारे अनेक जण असतात, तर्काच्या चौकटीत (खरं तर ही चौकट खूप व्यापक आणि पक्की आहे तरीही) न बसणाऱ्या गोष्टींची ‘प्रचिती’ आल्यामुळे देवावरचा विश्वास पक्का झालेले अनेक जण असतात, आयुष्याला काहीतरी अर्थ मिळावा म्हणून देवाच्या भक्तीत रममाण झालेलेही असतातच.
युव्हाल नोआ हरारीचं ‘सेपियन्स’ वाचताना यामागची कारणं शोधायला थोडीफार मदत झाली. स्वत: अनुभव न घेता लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास टाकण्याची प्रवृत्ती मानवामध्ये अंगभूत आहे, असं हरारी यांनी म्हटलं आहे. कदाचित म्हणूनच मानव शतकानुशतकं समूह म्हणून टिकून आहे. वडीलधाऱ्यांनी, गुरूजनांनी सांगितलेल्या गोष्टींवर मानव सहज विश्वास टाकतो, त्यावरून मतं तयार करतो आणि अगदी अभिनिवेषापर्यंत जातो. आस्तिकवाद आचरणास तुलनेने सोपा, समाजमान्यता असल्याने तो स्वीकारला जातो आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विनासायास सरकवला जातो.
अर्थात हे एवढं सोपं नाही. मुळात देव नावाची कल्पना आपल्याला का लागते, या प्रश्नाभवतीही मी दीर्घकाळ घालवला आहे. या संकल्पनेची आवश्यकता समजून घेताना मला दोन गोष्टी जाणवल्या. या जगाच्या पसाऱ्यातून वाट काढताना माणसाला जाणता-अजाणता अनेक गोष्टींची मदत होत असते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज वाटते.
अशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दरवेळी मिळतेच असं नाही किंवा कृतज्ञतेची ही जाणीवच अनेकदा ‘सबकॉन्शस’ स्तरावर असते. त्यामुळे देव नावाच्या एका शक्तीप्रती प्रातिनिधिक कृतज्ञता व्यक्त करून माणसाला समाधान वाटत असावं. अशी कृतज्ञता व्यक्त केली गेली नाही, तर माणूस स्वत:ला सर्वेसर्वा समजायला लागेल आणि त्यातून त्याचा अहंकार वाढत जाईल, ते टाळण्यासाठी देव नावाची संकल्पना तयार झाली असावी.
आस्तिक आणि नास्तिक यांचा विचार करता अस्तिक बहुसंख्येने आहेत, हे तर सत्यच. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्याकडे बघण्याचा नास्तिकांचा दृष्टीकोन कसा असावा, याचा विचारही महत्त्वाचा आहे. आस्तिक म्हणजे पुराणमतवादी, सनातनी, जुनाट विचारांचे असे शिक्के मारणं मी स्वत: नास्तिक असूनही (आणि आस्तिकांना नास्तिकांवर शिक्के मारतना बघितलं असूनही) मला योग्य वाटायचं नाही, आजही वाटत नाही. देवाचं अस्तित्व मान्य करूनही अत्यंत पुरोगामी विचार मांडणारे तुकारामांसारखे संत होऊन गेले आहेत. आस्तिकतेची कास न सोडता व्यापक मानवतावाद, सहिष्णूता, सेक्युलॅरिझम, करुणा, शांती यांचा संदेश देणारा गांधीवाद आपण नाकारूच शकत नाही.
दुसरा मुद्दा क्षमायाचनेचा. माणूस म्हटल्यावर चुका करणं आलंच. अनेकदा या चुकांची जाणीव माणसाला होते आणि पश्चात्तापाची, शरमिंदेपणाची भावना मनात निर्माण होते. आपल्या चुकीचे परिणाम भोगणाऱ्यांची क्षमा आपण मागितली पाहिजे, असं मनापासून वाटतं. मात्र ते प्रत्यक्षात शक्य असतंच असं नाही. काही वेळा आपल्या चुकीचा परिणाम भोगणारे आपल्याला अज्ञात असतात, काही वेळा ते या जगातच राहिलेले नसतात, काही वेळा प्रत्यक्ष जाऊन त्यांची क्षमायाचना करायची, तर अहंकार आडवा येतो. मग अशा वेळी देव ही संकल्पना उपयोगी पडते.
अर्थात ही क्षमायाचना क्षमा मागण्याच्याच स्वरूपात केली जाते असं नाही. कधी एखाद्या देवस्थानाला देणगी देऊन, तर कधी एखादा याग वगैरे करून अप्रत्यक्षपणे क्षमायाचना केली जाते. ख्रिश्चन धर्मात चर्चेसमध्ये ‘कन्फेशन बॉक्सेस’ असतात चुकीची कबुली देण्यासाठी, इस्लाममध्ये जकात म्हणजे मिळकतीचा ठराविक हिस्सा दान करण्याची शिकवण आहे, जैनधर्मीय ‘मिच्छामी दुक्कडम्’ म्हणून कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी माफी मागतात.
अर्थात काळाच्या ओघात एखाद्या कृतीमागची मूळ प्रेरणा नाहीशी होऊन, तिला इतर अनेक बाबी चिकटत जातात आणि पुढे मूळ प्रेरणा बाजूला राहून आजूबाजूच्या गोष्टींचंच स्तोम माजवलं जातं. तसंच इथेही झालं असावं. कृतज्ञता आणि क्षमायाचना या दोन्ही अभिव्यक्ती जेव्हा प्रत्यक्ष संबंधितांपुढे करणं शक्य असेल, तेव्हा त्या तशा केल्या, तर बऱ्याच गोष्टी स्वच्छ होऊन जातील. पण हे म्हणणं जेवढं सोपं आहे, तेवढं करणं कठीण आहे, याचा अनुभव मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकाला असेल.
नकळत झालेल्या चुकांसाठी किंवा अज्ञातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देव ही संकल्पना उपयोगी पडते इथपर्यंत ठीक आहे. मात्र चूक लक्षात आली आणि तिचा परिणाम भोगणारे समोरच असतील, तरी त्यांची क्षमा आपण मागतो का? किंवा एखाद्याची मदत झाली, तर भरभरून कृतज्ञता व्यक्त करतो का? हे ज्यांना खरोखर जमत असेल, त्यांना देव या संकल्पनेची आवश्यकता तेवढी भासणार नाही.
मात्र नास्तिक परिषदेत समारोपाचं भाषण करताना असीम सरोदे यांनी याबाबत खूपच छान उदाहरण दिलं. देवळात जाताना ‘पादत्राणं बाहेर काढून ठेवा’ अशी पाटी लिहिलेली असते आणि लोकांनी पादत्राणं काढली आहेत की नाही, हे तपासण्यासाठी एका माणसाची नियुक्ती केलेली असते. एका माणसाच्या पायात मुळात चपलाच नसतात. तरीही त्या काढल्याखेरीज देवळात जायचं नाही, असा आग्रह चप्पल तपासणारा माणून धरतो.
नास्तिक विचारांपर्यंत पोहोचण्यात एक बाई म्हणून काही वेगळे अनुभवही येतातच येतात. खरं तर तार्किक विचार, बुद्धिवाद ही काही पुरुषांची मक्तेदारी नाही. मात्र आपल्या कुटुंबव्यवस्थेत, समाजात चौकटी मोडणं पुरुषांसाठी तुलनेने सोपं आहे. एखादा पुरुष नास्तिक असेल, तर त्याकडे काहीसं कौतुकाने बघणारे लोक नास्तिक बाईवर ‘अतिशहाणी’ असल्याचा शिक्का मारायला उत्सुक असतात. नास्तिक पुरुषाचं आस्तिक बाईशी लग्न झालं, तर फार फरक पडत नाही, पण नास्तिक बाईची गाठ आस्तिक पुरुषाशी किंवा त्याच्या कुटुंबाशी बांधली गेली, तर तिची ‘निरगाठ’ होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. एक बाई नास्तिक आहे, म्हणजे अतिशहाणीच असणार (तिला तर शहाणं असण्याचा हक्कही नुकताच मिळालाय!) असं बहुतेकांनी गृहीत धरलं असावं. मी या गृहितकांची फारशी पर्वा केली नाही, हे तर आलंच.
देव या संकल्पनेबाबत आपलं काहीसं असंच झालं आहे. लोकांनी दुसऱ्याच्या वाट्याचं हिसकावून घेऊ नये, खोटं बोलू-वागू नये, दुष्टपणा करू नये, याच उद्देशाने देव ही संकल्पना जन्माला आली असावी. चुकीचं वागलं तर देव शिक्षा करतो, पाप लागतं यावर विश्वास बसला, तर लोक चांगलं वागतील हा मूळ हेतू. मात्र, मुळातच चांगलं वागणाऱ्या लोकांना या संकल्पनेची गरज आहे का? किंवा दुसरं म्हणजे, लोक एकीकडे अन्याय, अत्याचार, खोटेपणा सगळं करणार असतील आणि दुसरीकडे देवाची पूजा करून त्याचं परिमार्जन झालं असं समजणार असतील, तर देव या संकल्पनेचा उपयोग आहे का?
देव या संकल्पनेचा जन्म संकटाच्या काळात माणसाला आधार वाटावा म्हणून झाला असेल, तर त्याची भीती लोकांना वाटता कामा नये. त्याचप्रमाणे ‘मॉरल सँक्शन’ म्हणून म्हणजेच लोकांच्या दुष्कृत्यांना आळा घालण्यासाठी देव ही संकल्पना आली असेल, तर लोकांनी तिचा उपयोग दुष्कृत्यं धुण्यासाठी करता कामा नये. या दोन्ही गोष्टी घडताना आजूबाजूला दिसत नाही. याचाच अर्थ देव या संकल्पनेवर विश्वास ठेवण्यात म्हणजे आस्तिकवादात समाजाचं फार काही भलं आहे, असं अजिबात नाही.
नास्तिक विचारांपर्यंत पोहोचण्यात एक बाई म्हणून काही वेगळे अनुभवही येतातच येतात. खरं तर तार्किक विचार, बुद्धिवाद ही काही पुरुषांची मक्तेदारी नाही. मात्र आपल्या कुटुंबव्यवस्थेत, समाजात चौकटी मोडणं पुरुषांसाठी तुलनेने सोपं आहे. एखादा पुरुष नास्तिक असेल, तर त्याकडे काहीसं कौतुकाने बघणारे लोक नास्तिक बाईवर ‘अतिशहाणी’ असल्याचा शिक्का मारायला उत्सुक असतात. नास्तिक पुरुषाचं आस्तिक बाईशी लग्न झालं, तर फार फरक पडत नाही, पण नास्तिक बाईची गाठ आस्तिक पुरुषाशी किंवा त्याच्या कुटुंबाशी बांधली गेली, तर तिची ‘निरगाठ’ होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
माझ्या नवऱ्याचे विचारही नास्तिकतेकडेच जाणारे असल्याने तो संघर्ष मला फारसा करावा लागला नाही. त्यात लग्न बऱ्यापैकी उशिरा झाल्यामुळे विचारांमध्ये स्पष्टता होती. अमुक एक गोष्ट मी करणार नाही, हे सांगण्याचा आणि ती का करणार नाही, हे पटवून देण्याचा आत्मविश्वास तोवर आलेला होता. लग्न नोंदणी पद्धतीनेच झालं. पुढे कधी तरी सोसायटीच्या गणपती मंदिरात पूजेला बसणार का, अशी विचारणा झाली तेव्हा नवऱ्याने ‘आमचा या गोष्टींवर फारसा विश्वास नाही’ असं सांगितल्यावर ‘आमचा’ या अनेकवचनाकडे फारसं लक्ष न देता ‘तुझा नसेल, वहिनींचा तर असेलच ना, तू नुसता त्यांच्याबरोबर बस’ असा युक्तिवाद झाला. त्यावर ‘ती तर माझ्याहूनही नास्तिक आहे’ हे उत्तर नवऱ्याने दिल्यानंतर सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
एक बाई नास्तिक आहे, म्हणजे अतिशहाणीच असणार (तिला तर शहाणं असण्याचा हक्कही नुकताच मिळालाय!) असं बहुतेकांनी गृहीत धरलं असावं. मी या गृहितकांची फारशी पर्वा केली नाही, हे तर आलंच.
युव्हाल नोआ हरारीचं ‘सेपियन्स’ वाचताना यामागची कारणं शोधायला थोडीफार मदत झाली. स्वत: अनुभव न घेता लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास टाकण्याची प्रवृत्ती मानवामध्ये अंगभूत आहे, असं हरारी यांनी म्हटलं आहे. कदाचित म्हणूनच मानव शतकानुशतकं समूह म्हणून टिकून आहे. वडीलधाऱ्यांनी, गुरूजनांनी सांगितलेल्या गोष्टींवर मानव सहज विश्वास टाकतो, त्यावरून मतं तयार करतो आणि अगदी अभिनिवेषापर्यंत जातो. अस्तिकवाद आचरणास तुलनेने सोपा, समाजमान्यता असल्याने तो स्वीकारला जातो आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विनासायास सरकवला जातो. अर्थात हे एवढं सोपं नाही. मुळात देव नावाची कल्पना आपल्याला का लागते, या प्रश्नाभवतीही मी दीर्घकाळ घालवला आहे. या संकल्पनेची आवश्यकता समजून घेताना मला दोन गोष्टी जाणवल्या. या जगाच्या पसाऱ्यातून वाट काढताना माणसाला जाणता-अजाणता अनेक गोष्टींची मदत होत असते. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज वाटते.
माझा मुलगा नास्तिकांच्या चौथ्या पिढीतला. म्हणजे माझ्या बाजूने तरी. नवरा आणि मी दोघंही देवधर्म पाळणारे नसल्यामुळे त्याच्यावरही नकळत तसे संस्कार होत असतीलच. पण मी माझ्याबाबतीत म्हटलं तसं, आजूबाजूच्या समाजाचा परिणाम त्याच्यावरही होत असणार. तरीही तो कधीही आपण गणपती बसवायचा का वगैरे विचारत नाही. आता तो दहा वर्षांचा आहे. पाचेक वर्षांचा होता, तेव्हा राम देव होता का, असं त्याने मला विचारलं. मी ‘रामायण’ हे महाकाव्य आहे आणि राम त्यातलं एक पात्र आहे, हे त्याला समजेल अशा भाषेत सांगितलं होतं. त्यानंतर अयोध्येत राममंदिर बांधण्याचा जो गाजावाजा सुरू होता, तेव्हा तो मला एकदा म्हणाला होता, ‘आई, राम देव आहे हे आपण मानूनच टाकू, कारण सगळे तसं मानतात आणि आपल्याला सगळे वेडं म्हणतील.’ समाजमान्यतेचा किडा यालाही चावतोय की काय, असं मला तेव्हा वाटलं, पण ते फार पुढे गेलं नाही.
जेव्हा आजूबाजूला सण साजरे होत असतात, तेव्हा मी त्या सणांमागच्या गोष्टी त्याला सांगते. म्हणजे ‘अशी समजूत आहे’ टाइपची भाषा वापरून. तथ्य सांगावं तसं. अमुक एका गोष्टीला जुन्या काळात अर्थ असेल, पण आता परिस्थिती बदलली आहे आणि ती गोष्ट करण्याची गरज उरलेली नाही, म्हणून आपण ती करत नाही, हेही त्याला समजेल अशा भाषेत आम्ही सांगतो.
मुस्लीम, ख्रिश्चन सणांबाबतही त्याला सांगितलं आहे. माझ्या बहिणीचा नवरा आणि कुटुंब ख्रिश्चन असल्यामुळे त्याला या वैविध्याची थोडीफार ओळख आहे. बहिणीचा मुलगा नऊ वर्षांचा आहे आणि तो स्वत:ला ‘प्युअर नास्तिक’ म्हणवतो. तसं काही माझा मुलगा अजून म्हणत नाही. त्यालाही या विचारापर्यंत एक प्रवास करूनच पोहोचावं लागेल कदाचित. नास्तिकतेचा चार पिढ्यांचा ‘वारसा’ असला तरीही.
आस्तिक आणि नास्तिक यांचा विचार करता अस्तिक बहुसंख्येने आहेत, हे तर सत्यच. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्याकडे बघण्याचा नास्तिकांचा दृष्टीकोन कसा असावा, याचा विचारही महत्त्वाचा आहे. आस्तिक म्हणजे पुराणमतवादी, सनातनी, जुनाट विचारांचे असे शिक्के मारणं मी स्वत: नास्तिक असूनही (आणि आस्तिकांना नास्तिकांवर शिक्के मारतना बघितलं असूनही) मला योग्य वाटायचं नाही, आजही वाटत नाही. देवाचं अस्तित्व मान्य करूनही अत्यंत पुरोगामी विचार मांडणारे तुकारामांसारखे संत होऊन गेले आहेत.
आस्तिकतेची कास न सोडता व्यापक मानवतावाद, सहिष्णूता, सेक्युलॅरिझम, करुणा, शांती यांचा संदेश देणारा गांधीवाद आपण नाकारूच शकत नाही. मला व्यक्तीश: पंडित नेहरूंचे विचार अधिक जवळचे आणि पटणारे असले, तरी महात्मा गांधींच्या विचारांची व्यापकता नाकारण्याचा संकुचितपणा मी करू शकत नाही. त्यामुळे आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काही मूलभूत मतभेद असले, तरी आस्तिक हे नास्तिकांचे (किंवा उलटही) शत्रू आहेत, असं मला कधी वाटलेलं नाही, आजही नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नास्तिक संमेलनात बोलताना तुषार गांधी यांनी ‘सेक्युलॅरिझमची जागा अथाइझमने घेतली पाहिजे’ या विचाराशी म्हणूनच मी पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. कारण सेक्युलॅरिझमला जसा पर्याय नाही, तसा ‘अथाइझम’लाही नाही, असं स्वत: नास्तिक असूनही मला वाटत नाही. सेक्युलॅरिझम नाकारणारे लोक हे परधर्मीयांचे हक्क नाकारतात, त्यांचं अस्तित्वच नाकारतात. आस्तिकतेत विरुद्ध विचार नाकारणं अध्याहृत नाही.
गेल्या काही वर्षांत आस्तिकतेचे जे आक्रमक आविष्कार आपल्याला दिसत आहेत, त्यामागे अनेक राजकीय, धार्मिक कारणं आहेत. नास्तिक विचार स्वीकारणाऱ्यांची संख्या वाढली, तर देवाधर्मावरून लोकांना भडकावणं राजकीय पक्षांसाठी सध्या आहे, तेवढं सोपं राहणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी नास्तिकतेकडे वळावं असं मला व्यक्तीश: नक्कीच वाटतं. मात्र तरीही एखादी व्यक्ती नास्तिक आहे, म्हणजे ती सहिष्णू, सर्व धर्मांप्रती समान आदर राखणारी आहे, असं गृहीत धरता येत नाही.
व्यक्तिगत आयुष्यात नास्तिक असलेले लोक सामाजिक आयुष्यात धार्मिक धृवीकरणाला पाठिंबा देत असल्याची उदाहरणं मी जवळून बघितली आहेत. देवळात गेल्यानंतर हातही न जोडणारे आणि देव गंगेत सोडून देऊ म्हणणारे माझे आजोबा म्हणजे आईचे वडील बाबरी मशीद पाडण्यासाठी ‘कारसेवक’ म्हणून गेले होते. अशी आणखीही उदाहरणं माझ्या बघण्यात आहेत. त्यापेक्षा आस्तिक राहून धार्मिक सहिष्णूता मानणारे लोक अधिक चांगले असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता व नास्तिकता या दोन बाबींकडे स्वतंत्रपणे बघितलं जावं. नास्तिकतेत सर्वधर्मसमभाव आलाच, असं या उदाहरणांमुळे मी म्हणू धजावत नाही.
आणखी एका मुद्दयावर मी बऱ्याच काळापासून विचार करत आले आहे. नास्तिक संमेलनामुळे या विचाराला चालना मिळाली. ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या शारदा साठे यांनी विवेक जपण्याचा खूप महत्त्वाचा मुद्दा एका परिसंवादाच्या प्रास्ताविकात मांडला. मला वाटतं नास्तिक विचाराच्या लोकांनी तो नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे.
तर्कशुद्ध, शास्त्रशुद्ध, बुद्धिवादी विचार माणसाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे, हे तर स्पष्टच आहे आणि तो विचार स्वीकारलेल्यांनी त्याचा प्रचार करण्यातही गैर काहीच नाही. मात्र, या विचारापर्यंत पोहोचू न शकलेल्यांबाबत तुच्छ भाव बाळगण्यापेक्षा त्यांना समजेल अशा भाषेत हा विचार पटवून देण्याचा प्रयत्न करणं किंवा ते त्यांना समजू शकत नसेल, तर तेही समजून घेणं नास्तिकांना जमलं पाहिजे. देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारे लोक दिवसाचे चोवीस तास ईश्वरभक्तीत रममाण असतात, असं नाहीच.
त्याव्यतिरिक्तही खूप काही विधायक, रचनात्मक काम तेही त्यांच्या आयुष्यात करत असतात. एखाद्या डॉक्टरने आपल्या दवाखान्यात देवघर ठेवलं, तर नास्तिक विचारांना ते नक्कीच पटणार नाही, पण याचा अर्थ त्याच्या वैद्यकीय ज्ञानात काही कमतरता आहे, असा काढणंही आतातायीपणाचं आहे. निसर्गातल्या अज्ञात, आकलनाबाहेरच्या शक्तीला देवाचं नाव दिलं, मूर्त स्वरूप दिलं, तर अनेकांना त्या शक्तीची भीती वाटण्याऐवजी आधार वाटतो. तो जर कोणाला लागत असेल, तर तो नाकारण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्याची गरज भासू नये म्हणून काही प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. अर्थात आस्तिक ‘आपल्या जागी बरोबर’ आणि नास्तिक ‘आपल्या जागी बरोबर’ अशी बोटचेपी भूमिका घेणंही मला पटत नाही.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
आस्तिकांबद्दल नास्तिकांनी तुच्छता बाळगू नये, हे तर खरंच (ती आस्तिकांनीही नास्तिकांबद्दल बाळगू नयेच), पण नास्तिकता ही माणसाची अधिक उत्क्रांत अवस्था आहे, या ठाम मतापर्यंत मी आता पोहोचले आहे आणि जास्तीत जास्त लोक बुद्धी आणि विवेकाची सांगड घालून या अवस्थेला पोहोचले तर यात समाजाचं भलं आहे, असंही मला वाटतं.
माझे आजोबा (वडिलांचे वडील) आस्तिक आणि नास्तिक यांच्यातला फरक स्पष्ट करताना एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, मतपत्रिकेवर राजकीय पक्षाचं, उमेदवाराचं नाव लिहिलेलं असतं आणि पक्षाचं चिन्हंही असतं. ते चिन्ह मुळात असतं वाचता न येणाऱ्या निरक्षर लोकांसाठी. साक्षर लोक उमेदवाराचं किंवा पक्षाचं नाव वाचून मत देतात, निरक्षर लोक चिन्ह बघून. देव ही संकल्पना या चिन्हांसारखी आहे. या चिन्हापलीकडचं आकलन ज्याला होतं, त्याच्यासाठी चिन्हाचं महत्त्व उरत नाही. नास्तिक विचारही असाच आहे. आकलनाचा स्तर देवाच्या मूर्त संकल्पनेपलीकडे जातो, तेव्हा देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता वाटत नाही, त्याचं भय बाळगून किंवा त्यातून आपल्याला काहीतरी मिळेल, अशी आशा ठेवून कर्मकांडं, नवससायास करण्याचा तर प्रश्नच येत नाही.
अर्थात उमेदवाराचं किंवा पक्षाचं नाव वाचून शिक्का मारणाऱ्याने चिन्ह बघून शिक्का मारणाऱ्याकडे तुच्छतेने बघू नये. कारण त्याच्याही मताचं मोल तुमच्या मताइतकंच आहे. त्याला लिहिता-वाचता येत नसलं, तरी जगण्याचं शहाणपण त्याच्याकडे नक्कीच आहे. चिन्हांचा आधार लागणाऱ्यांशी आपलं शत्रुत्व वगैरे अजिबातच नाही, पण या चिन्हांनी आक्राळविक्राळ, बटबटीत रूप घेऊ नये, म्हणून त्यांना अक्षरांच्या दिशेने वळवता आलं, तर ते त्यांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने अधिक चांगलं. हेच काहीसं आस्तिकवाद आणि नास्तिकवाद यांबाबतही असावं.
आस्तिकांशी फटकून राहणं, त्यांना तुच्छ लेखणं, हे सगळं नास्तिकांनी विवेकानं टाळलं पाहिजे. त्याचबरोबर नास्तिक विचार हा आस्तिक विचारांच्या तुलनेत अधिक तर्कशुद्ध, प्रगत, उत्क्रांत टप्पा आहे, हे ठामपणे सांगणंही तेवढंच आवश्यक आहे, या विचारापर्यंत मी आता येऊन पोहोचले आहे.
नास्तिकांच्या तिसऱ्या पिढीत जन्म घेऊनही इथवर पोहोचण्यासाठी आयुष्याची पस्तिशी गाठावी लागली, याचं कोणाला आश्चर्यही वाटेल, पण विचारांचा हा प्रवास अपरिहार्य असावा कदाचित... निदान प्रत्येक नास्तिकासाठी तरी.
.................................................................................................................................................................
लेखिका सायली परांजपे या मुक्त-पत्रकार आणि अनुवादिका आहेत.
sayalee.paranjape@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment