पुण्याच्या ‘ब्राइट्स सोसायटी’च्या वतीने १६-१७ सप्टेंबर २०२३ रोजी सांगलीत नास्तिक परिषद आयोजित करण्यात आली होती. हा या परिषदेचा दशकपूर्ती समारंभ होता. या परिषदेत मांडलेल्या गेलेल्या विचारांच्या अनुषंगाने लेखिकेने आपल्या तीन पिढ्यांच्या नास्तिक परंपरेविषयी आणि एकदंर नास्तिक-आस्तिक विचारांविषयी केलेली ही मांडणी... नास्तिकांनाही बरेच काही सुचवणारी आणि आस्तिकांनाही...
.................................................................................................................................................................
पूर्वार्ध
‘दो-तीन जनरेशन्स लग जाते हैं नास्तिक पैदा होने में…’
सांगलीला ‘ब्राइट सोसायटी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नास्तिक परिषदे’त बोलताना प्रख्यात कवी-गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनी केलेल्या अनेक विधानांपैकी हे एक. या परिषदेत अख्तर आणि इतर वक्त्यांनी कित्येक महत्त्वपूर्ण विचार मांडले. अनेकांनी नास्तिकतेच्या दिशेने झालेला प्रवास मांडला. मात्र, अख्तर यांच्या या विधानाभवती मी परिषदेचे दोन दिवस आणि त्यापुढले कित्येक दिवस घुटमळत राहिले. कदाचित त्यापूर्वीही या मुद्द्यावर विचार झालेला असावा, पण त्याला चपखल शब्द मिळाले नसावेत.
अख्तर यांनी मांडलेला पिढ्यांचा मुद्दा विचारात घ्यायचा, तर मी तशी तिसऱ्या पिढीतली. म्हणजे आस्तिक किंवा नास्तिक हे शब्द कानावर पडण्यापूर्वीच नास्तिकतेचे संस्कार झालेले. जन्मानंतर पाचवी पूजली जाणं किंवा पत्रिका तयार करून घेतली जाणं, असं काही माझ्याबाबतीत झालं नाही. बारसं थाटात झाल्याचं ऐकलंय, पण त्यातही विधी वगैरे काही झाले नाहीत. घरात एकंदर देवपूजा, व्रतवैकल्यं, उपास, देवळात जाणं, सत्यनारायण, श्राद्धं वगैरे काहीच होत नव्हतं.
अर्थात हे आमच्या विभक्त कुटुंबापुरतं म्हणजे आजी, आजोबा, आई, बाबा आणि आम्ही दोघी बहिणी यांच्यापुरतं. बाबांचे मोठे चुलतभाऊ आणि आम्ही एकाच शहरात म्हणजे धुळ्यात राहत होतो. त्यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती, खड्याच्या गौरी वगैरे असायचं. श्रावणात सत्यनारायणाची पूजा व्हायची. गौरी किंवा सत्यनारायणाच्या पूजेला त्यांच्याकडे गेल्याचं आठवत नाही. गणपती विसर्जनाला मात्र आम्ही जायचो, पण तेही गंमत म्हणून.
आईचं माहेर नाशिकचं. म्हणजे अनेकांच्या दृष्टीनं तीर्थक्षेत्र. अर्थात आजोळीही देवाचं स्तोम नव्हतं. आजोबा स्वत:ला नास्तिक म्हणायचे. आजीने या सगळ्याबद्दल फारसा विचार केलेला नसावा, पण तीही देवभोळी वगैरे नव्हती. तिला पोथ्या वगैरे वाचताना मी कधी बघितलं नाही. ती शास्त्रीय गायिका होती. त्यामुळे संसार सांभाळून उरलेला वेळ रियाजासाठी द्यायची.
आईचे आजोबा असेपर्यंत घरातल्या देवांची पूजा वगैरे करायचे, नवरात्रात अखंड दिवा असायचा. त्यांना होईनासं झालं, तेव्हा देवपूजेचं काम घरातला मोठा मुलगा म्हणून आजोबांकडे आलं, तेव्हा त्यांनी देव गंगेत (म्हणजे गोदावरीत) सोडून द्यावेत, असं सरळ सांगितलं म्हणे! अर्थात त्यांच्या धाकट्या भावानं म्हणजे आईच्या काकांनी देव त्यांच्या घरी नेऊन प्रश्न सोडवला. तरीही आजोबा-आजींच्या घरातल्या देवघरात आजीला लग्नात मिळालेली अन्नपूर्णा, एक बाळकृष्ण वगैरे होता. निरांजन, उदबत्तीघर, घंटा असा सरंजाम होता. त्या देवांना रोज आंघोळ घालून फुलं वाहिली जात. अर्थात सगळ्यांकडे जे होतं, ते थोडक्यात का होईना आपणही करावं, उगाच फार वेगळेपणा करायला जाऊ नये, असा आजीचा विचार त्यामागे असावा. तिला कधी मनोभावे नमस्कार वगैरे करतानाही पाहिल्याचं आठवत नाही.
तरीही अख्तर यांच्या विधानाचा संदर्भ घेऊन मी माझं लहानपण आठवते, तेव्हा नास्तिकांच्या तिसऱ्या पिढीतली असूनही देवघर, पूजा, स्तोत्रं-आरत्या या सगळ्याचं आकर्षण मला नक्कीच होतं. शिवाय घरात एकंदर नास्तिक वातावरण असलं, तरी प्रत्येकाच्या नास्तिकतेत काहीतरी वेगळेपण होतं. म्हणजे आजोबा (वडलांचे वडील) कट्टर नास्तिक असले, तरी खवय्ये होते. गुढीपाडव्याला घरावर गुढी वगैरे उभारली नाही, तरी आदल्या दिवशी चक्का टांगून श्रीखंड झालं पाहिजे, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
आजीने कधी देवपूजा वगैरे केली नाही, तरी तिच्या आईची आठवण म्हणून तिने सांगितलेला वटसावित्रीचा उपास ती नेमानं करायची. माझी आत्या अंबेजोगाईला राहायची आणि तिथली देवी योगेश्वरी आजीच्या माहेरची कुलदेवी. तिची ओटी वगैरे आजीने कधी भरलेली मी बघितली नाही, पण अंबेजोगाईहून आल्यानंतर ती हमखास आमच्या घरी काम करणाऱ्या बाईंना साडी द्यायची.
बाबा नास्तिक होते आणि आहेत. त्यांची देवावर श्रद्धा वगैरे नसली, तरी कोणाकडे सत्यनारायणाच्या पूजेला वगैरे बोलावलं, तर ते सहज हात जोडायचे. निरांजन, उदबत्ती, फुलं वगैरेंमुळे घरात प्रसन्न वाटतं, म्हणून आईने छोटं देवघर मांडलं होतं, पण संकटाच्या वेळी देवाचा धावा करणं किंवा देवाकडे काही मागणं तिला अजिबात मान्य नव्हतं (आजही नाही). किंवा अगदी मासिक पाळी सुरू असतानाही ती तिच्या हौसेनं मांडलेल्या देवघरात निरांजन लावायला अजिबात कचरली नाही.
मुळात देव ही एक कल्पना आहे आणि तो जर खरोखर असेल, तर बाईला मासिक पाळीही त्यानेच दिली असावी, असं तिचं सरळ ‘लॉजिक’ होतं. लहानपणापासून साधारणपणे कोणत्याही ब्राह्मण घरातल्या मुलांना पाठ असतात, तशी स्तोत्रं वगैरे तिला तोंडपाठ होती. मात्र त्याचा सारांश काहीतरी मागणं हा आहे, हे लक्षात आल्यानंतर तिने ती म्हणणं सोडून दिलं. श्राद्धं वगैरे तर आमच्या घरी खूप पूर्वीपासून होत नव्हती.
१९४०-५०च्या दशकांमध्ये जातिभेद संपवण्याच्या उद्देशानं सुधारक विचारांच्या लोकांतर्फे सहभोजनं घेतली जात होती. माझ्या आजोबांनी घरात सहभोजन घातल्यामुळे भटभिक्षुकांनी आमच्या घरावर बहिष्कार टाकला होता. ‘प्रायश्चित्त’ घेतलं, तर श्राद्धासाठी येऊ, असा पवित्रा भटभिक्षुकांनी घेतला होता. त्या वेळी ‘वेगळ्या जातीच्या लोकांबरोबर जेवण्यात प्रायश्चित्त घेण्याजोगं काही नाही’, अशी भूमिका आजोबांच्या वडिलांनी घेतल्यामुळे (ते खरं तर अस्तिक) आमच्या घरात भटभिक्षुक येणं बंद झालं. हे मला वयाच्या बारा-तेराव्या वर्षी कळलं असावं.
आता घरात असं वातावरण असताना त्यात वाढणारी मुलं नास्तिक झाली नाहीत, तरच नवल असं कोणालाही वाटेल. अत्यंत कर्मठ, कर्मकांडात रमणाऱ्या घरांमध्ये वाढलेल्या व्यक्तीही विचाराचं, तर्काचं बोट धरून नास्तिकतेकडे जाऊ शकतात (आणि ते मला खूपच कौतुकास्पद वाटतं), तर मुळात दोन पिढ्या नास्तिकता घेऊन जगणाऱ्यांच्या घरातली मुलं जन्मत:च नास्तिक असणार, असं सहज गृहीत धरलं जाऊ शकतं आणि त्यात काही चूकही नाही. मात्र, दोन पिढ्या नास्तिक विचारांवर पोसलेल्या कुटुंबात जन्माला आलेल्या मुलांनाही कोणत्याही विचाराखेरीज नास्तिकता स्वीकारता येत नसावीच.
मुळात ज्यात विचाराचा प्रवास नसतो, ती नास्तिकता नसतेच. आई-वडील आणि मागच्या कित्येक पिढ्या अस्तिक म्हणून आम्हीही आस्तिक असं आस्तिक लोक सहज म्हणू शकत असावेत. नास्तिक लोक तसं म्हणत नाहीत, किंबहुना म्हणू शकत नाहीत, हाच या दोहोंमधला प्रमुख भेद आहे. आस्तिकांची ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा असते आणि तिच्या आधारावर ते अनेक अतार्किक, अविश्वसनीय बाबींवरही विश्वास ठेवू शकतात.
नास्तिकांचा या अस्तित्वावर विश्वास नसतो. त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट तर्काच्या, विचाराच्या, काळाच्या कसोटीवर घासून बघतात. त्यांच्या आधीच्या पिढ्यांचे विचार, वर्तनही स्वत:च्या कसोट्यांवर घासून बघितल्याशिवाय ते राहत नाही. अर्थात हे फारच ढोबळ विभाजन झालं. नास्तिकतेचेही अनेक प्रकार असतात. नास्तिक होण्यामागची प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. शिवाय कुटुंब नास्तिक असलं, तरी निमशहरी, मध्यमवर्गीय भारतात तरी कुटुंबाची व्याख्याच मुळात व्यापक असते. त्यात जवळचे नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्रमंडळी सगळेच येतात.
आता आमच्या कुटुंबात बऱ्यापैकी नास्तिक वातावरण असलं, तरी नातेवाईकांपैकी काही घरांमध्ये किंवा शेजारीपाजारी देवपूजा, व्रतवैकल्यं जोरात सुरू असायची. सणासुदीला एकंदर वातावरणात पसरणाऱ्या लगबगीचं, प्रसन्नतेचं, उत्साहाचं आकर्षण मला लहानपणापासूनच होतं. सगळ्यांकडे सत्यनारायणाची पूजा होते, मग आपल्याकडे का नाही, असा प्रश्न मी अनेकदा विचारलाही असेल, पण ‘आपला या सगळ्यावर विश्वास नाही’ या वाक्यापलीकडे फारसा संवाद यावर झालेला मला आठवत नाही. कदाचित माझ्या वयाला ते समजणार नाही, असं गृहीत धरून फार खोलात कोणी गेलं नसेल.
शिवाय कर्मकांडांना घरात अजिबात थारा नसला, तरी सण साजरे करायला कोणतीच आडकाठी नव्हती. म्हणजे घरासमोर पेटलेल्या होळीला नारळ वगैरे वाहायला आमच्या घरातून कोणी जात नसलं (आजोबांची तीही इच्छा असायची, कारण त्यांच्या मते अशा प्रकारे भाजल्या गेलेल्या नारळाचं खोबरं फारच खमंग लागतं!) तरी धुळवडीला रंग खेळण्यात मात्र आम्ही पुढे असायचो. दिवाळीत आकाशकंदील आणि पणत्या लावणं, दारापुढे रांगोळी काढणं, फराळाचे पदार्थ, नवीन कपडे वगैरे उत्साहात व्हायचं. मात्र, नरकचतुर्दशीला सूर्योदयाच्या आत अंघोळ झाली नाही, तर नरकात जावं लागतं, असं मी कुठेतरी ऐकून म्हणायला लागले, तेव्हा सगळ्यांनी हसून उडवून लावलं होतं.
स्वर्ग, नरक वगैरे सगळ्या नुसत्या कल्पना आहेत. खरं तसं काही नसतं. तुला उठायचं असेल लवकर, तर उठून अंघोळ करायलाही काही हरकत नाही, पण ती नाही केली, तर नरकात वगैरे जावं लागत नाही, मुळात नरक वगैरे सगळं काल्पनिकच असतं, हे आईने मला स्पष्ट सांगितलं होतं. तरीही आजूबाजूचे सगळेच म्हणतात, म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असलं पाहिजे, असं मला तेव्हा मनापासून वाटत होतं.
लक्ष्मीपूजनही आमच्या घरात कधी झालं नाही. पैसा वाया न घालवणं, उधळपट्टी न करणं, वेळ पडली, तर गरजू माणसाला आपल्या खिशातले पैसे चटकन काढून देता येणं, हाच लक्ष्मीचा म्हणजे पैशाचा मान राखणं आहे, तिला तबकात ठेवून पूजा करण्याची गरज नाही, असं आजोबांनी मला लहानपणी सांगितल्याचं आठवतं. अर्थात सणांच्या काळात ‘त्यांच्याकडे नसतं काही’, ‘ते काही म्हणजे काही मानत नाहीत’ अशा टिप्पण्या आमच्या घराबद्दल झाल्याशिवाय राहायच्या नाहीत.
त्यात खरं तर नकारात्मक असं काही नसेलही, पण तरीही आपल्या घराबद्दल हे फारसं चांगलं बोललं जात नाही, असं मला उगाचच वाटायचं आणि सगळेच देवळात जातात, देवपूजा करतात, उपास करतात, हरताळकेची पूजा करतात, महालक्ष्मी आणतात, घट बसवतात, तर आपणही ते करायला काय हरकत आहे, असं माझ्या मनात कितीदा तरी येऊन जायचं.
आमच्या घरात आजी वगळता सगळे जण चवीने ‘नॉनव्हेज’ खायचे. एकदा आत्याकडचे सगळे दिवाळीत धुळ्याला आमच्या घरी आले असताना, भाऊबीजेच्या दिवशी चिकनचा बेत आखला गेला. घरात कोणालाच त्यात वावगं वाटत नव्हतं. कारण जो पदार्थ आपण खातो, तो कधीही खाऊ शकतो. त्यात दिवसावारांचा काही प्रश्न नाही, हे सगळ्यांनाच मान्य होतं. मी असेन तेव्हा आठेक वर्षांची. दिवाळीच्या दिवशी आपल्याकडे चिकन केलंय, हे कोणालाच कळू नये, कळलं तर सगळे काय म्हणतील, याची प्रचंड धास्ती मला त्या दिवशी वाटत होती.
मी हे जरा चाचरत सांगूनही बघितलं, पण माझ्या आतेभावंडांना ‘नॉनव्हेज’ आवडायचं, आत्या ते खायची किंवा करायची नाही. त्यामुळे धुळ्याला आल्यावर ते व्हायचं. आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळीच निघणार असल्याने आजच केलं, हे आईचं साधं उत्तर होतं. कोणी अहिंसा म्हणून ‘नॉनव्हेज’ खात नसेल, तर ते त्यांच्या जागी योग्यच आहेत, पण एक दिवस ‘नॉनव्हेज’वर आडवा हात मारायचा आणि एक दिवस ते निषिद्ध मानायचं, हे आमच्या घरातल्या कोणाच्याही तर्कात बसण्याजोगं नव्हतं.
मलाही हे पटत नव्हतं असं नाही, पण उगाच सगळ्यांपेक्षा वेगळं आपण कशाला वागायचं, असंही वाटायचं. म्हणूनच सणावारांबाबत कोणी काही विचारलंच, तर ‘आमचा त्यावर विश्वास नाही’ हे आई किंवा आजी देत असलेलं उत्तर न देता ‘काकांकडे असतं सगळं’ असं म्हटलं तर खरं, पण लबाड उत्तरही मी अनेकदा दिलेलं आहे.
नास्तिकता म्हणजे स्वार्थीपणा हा गैरसमजही समाजात बऱ्यापैकी आढळतो. ज्यांना कोणतेच धरबंध नकोत, सतत मनमानी करायला हवी, फक्त स्वत:पुरता विचार करायला हवा, ते नास्तिक, हा आरोप मी अनेकदा ऐकलाय. त्यामुळे मात्र माझं डोकं फारसं कुरतडलं गेलं नाही. कारण व्यक्तिगत आयुष्यात स्तोम जेवढे कमी असतील, तेवढा माणूस समाजासाठी अधिक काम करू शकतो, याची असंख्य उदाहरणं मी आजूबाजूला बघितली आहेत. स्वार्थापोटी नास्तिकतेचा बुरखा घेतलेले लोकही नाहीत असं नाही. मात्र नास्तिकता ही स्वार्थातून आलेली असते, हा आरोप अगदीच निरर्थक आहे. याउलट अस्तिक लोकांच्या प्रत्येक नवसामागे, गाऱ्हाण्यामागे, जपा-तपांमागे काहीतरी मागणं असतं आणि ते सहसा वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाणारं नसतं, हे मी बघितलं आहे.
खरं तर आस्तिक किंवा नास्तिक असणं ही बाब व्यक्तिगत किंवा फार तर कौटुंबिक असावी, पण त्यातलं सामाजिक अंगही महत्त्वाचं आहे. आपल्या धर्मात किंवा जातीत पाळल्या जाणाऱ्या प्रथा-परंपरांमागे, सणावारांमागे अनेकदा समाजाचा दबाव किंवा वेगळं पडण्याची भीतीही असते. ‘तुम्ही देवळात दिसत नाही कधी!’ किंवा ‘श्रावणही पाळत नाही का तुम्ही?’ अशा सहज विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दबाव येतो. चारचौघांसारखं जगण्याला जी मान्यता समाजात मिळते, तिची भूल तर सहजच पडू शकते.
अर्थात हे सगळंही कधीतरी मागे पडलंच. नेमकं कधी हे आता आठवत नाही, पण हळूहळू मीही या सगळ्या प्रथा-परंपरा काळाच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासल्याशिवाय पाळेनाशी झाले. देव-धर्म, प्रथा-परंपरा यांच्या कालबाह्यतेवर, त्यातल्या विषमतेवर, एकंदर या संकल्पनांवर घरात होणाऱ्या चर्चांचं आकलन होण्याइतपत समज आल्यामुळे असेल किंवा वाचन बऱ्यापैकी वाढल्यामुळे वा अनेक दारं खुली झाल्यामुळे असेल, पण आपल्या मनाला पटल्याखेरीज कोणतीही गोष्ट उपचार म्हणून करायची नाही, हे मनावर बिंबत गेलं.
लहानपणी ऐकलेल्या देवांच्या गोष्टी वगैरे तर मजेशीरच वाटायला लागल्या. पृथ्वीपासून एका उंचीवर स्वर्ग नावाची जागा आहे आणि तिथं सगळ्या देवदेवता नटूनथटून विलासात राहतात, अशी कल्पना ‘देव मानणाऱ्यां’च्या मनात खगोलशास्त्र वगैरे शिकल्यानंतरही कायम असते की काय, या विचारानं हसू यायला लागलं.
गणपती चांगली बुद्धी देतो, एखाद्या पोथीचं पारायण केल्यामुळे संकट दूर होतं, सोळा सोमवारांची कथा सोळा जणांना पाठवली नाही, तर मोठं नुकसान होतं, या गोष्टी तर खुळचटच वाटायला लागल्या. सगळे देवाला मानतात, मग आपण मानायला काय हरकत आहे, या विचारातून, वयाच्या साधारण पंधरा-सोळाव्या वर्षापर्यंत मी बाहेर आले होते. ‘तू देवळात जात नाहीस का?’, असं कोणी विचारलं, तर ‘माझा विश्वास नाही’ किंवा अगदी ‘मी नास्तिक आहे’ असं ठामपणे सांगण्याचा आत्मविश्वास तोपर्यंत आला होता.
आता नास्तिक असल्याचं ठामपणे, काहीशा अभिमानानेच सांगणाऱ्यांच्या घरात जन्माला आलेल्या मुलीचा नास्तिकतेपर्यंतचा स्वतंत्र प्रवास निदान इथं तरी पूर्ण व्हायला हवा की नाही? पण नाही, तो तसा होत नसावा. तो वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या पातळ्यांवरून होत राहतो. एका बाजूला आपण नास्तिक आहोत, म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न वेगवेगळ्या रूपांत मेंदू पोखरत राहतो, दुसऱ्या बाजूला नास्तिक असणं म्हणजे नेमकं काय, हे सोबतच्या आस्तिकांना (किंवा काही वेळा स्वत:ला नास्तिक म्हणवणाऱ्यांनाही) समजेल अशा भाषेत सांगण्याचा संघर्षही वेगवेगळे चेहरे धारण करून पुढे जात राहतो. कारण शेवटी आस्तिक बहुसंख्य आहेत आणि नास्तिक अल्पसंख्य हे तर ‘सत्य’च आहे.
अनुकंपा, करुणा या भावनांच्या आड नास्तिकता कधीही येत नाही. त्यामुळे नास्तिक कोरडे किंवा भावनाशून्य नसतात, हे काळाच्या ओघात मला पटत गेलं. प्रेम ही तर नैसर्गिक भावना आहे. ते करण्याची आणि करून घेण्याची आस बहुतेकांना असते आणि त्यात नास्तिक असणं आड येत नाही. नास्तिक लोक जवळच्या व्यक्तींच्या भावनांहून अधिक महत्त्व तर्काला, विचारांना देतात हे खरं, पण हे तर आस्तिकांबाबतही मी बघितलेलं आहे. जवळच्या लोकांच्या भावनांहून अधिक महत्त्व त्यांच्या श्रद्धेला देणारेही असतातच. एकंदर भारतीय समाजात आस्तिक बहुसंख्य आहेत. त्यामुळे विचारांचा संघर्ष होण्याची शक्यता त्यांच्याबाबत कमी होते आणि नास्तिक अल्पसंख्य असल्यानं त्यांच्याबाबत ती वाढते. त्यामुळे नास्तिकांना संघर्ष जास्त करावा लागतो, जवळच्या व्यक्तींचा विरोध जास्त पत्करावा लागतो. याचा अर्थ त्यांच्या मनात कोणाविषयी प्रेम नसतं, असा अजिबात नाही.
नास्तिक म्हणजे अहंकारी, नास्तिक म्हणजे स्वार्थी, नास्तिक म्हणजे कोरडे, नास्तिक म्हणजे अरसिक, नास्तिक म्हणजे पाषाणहृदयी… अशा कितीतरी गैरसमजांमधून वाट काढत जाणं, हे आस्तिक वाक्प्रचार वापरून सांगायचं तर नास्तिकांच्या ‘पाचवी’लाच ‘पुजलेलं’ असतं. खरं तर स्वत:ला नास्तिक म्हणवताना मलाही या सगळ्या गृहितकांशी वा गैरसमजांशी झगडावं लागलं आहे.
आस्तिक जसे देव नावाच्या शक्तीपुढे झुकतात, तसे नास्तिक झुकत नाहीत आणि मग ते कोणापुढेही झुकू शकत नाहीत. आईवडिलांपुढे नाही, गुरूपुढे नाही. आपण नास्तिक आहोत, म्हणजे अहंकारी आहोत का, हा प्रश्न मीही वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षापासून जवळपास पस्तिशीपर्यंत अनेक प्रसंगी स्वत:ला विचारला आहे.
मी स्वत: नास्तिक असले, तरी निसर्गाच्या अचाट शक्तीचा अंदाज मला आहे. मानवाहून वरचढ अशी काहीतरी शक्ती आहे आणि ती प्रबळ ठरते, तेव्हा मानवाचं काहीच चालत नाही, हे मला मान्य आहे. त्याचा प्रत्यय देणाऱ्या महापुरांची, भूकंपांची, वादळांची मला प्रत्यक्ष झळ बसलेली नसली, तरी कल्पना नक्कीच आहे. पण मला यामध्ये कायमच विज्ञान दिसत आलं आहे. निसर्ग किंवा पर्यावरण आणि विज्ञान या दोन परस्परविरोधी बाबी नाहीत. निसर्ग म्हणजे विज्ञान. निसर्गाच्या संसाधनांचा बेसुमार, बेजबाबदार वापर केल्यास त्याची शिक्षा मानवाला मिळणार, पण ही शिक्षा देवाचा अवमान केल्यामुळे लागणाऱ्या ‘पापा’सारखी नक्कीच नाही. ती संपूर्ण मानवजातीला भोगावी लागणार आहे.
जंगलतोड केल्यामुळे पाऊस कमी होतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. त्याकडे अस्तिक लोक इंद्रदेवाचा कोप म्हणून बघत असतील आणि यज्ञयाग करून प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर हा वेडगळपणा आहे (खरं तर केवळ तसंही होत नाही. आस्तिक लोक सहसा दोन्ही डगरींवर पाय ठेवतात. म्हणजे एकीकडे वैज्ञानिक उपायही करत राहतात आणि त्याला ‘श्रद्धे’ची जोड देऊन मनाचं समाधानही करत राहतात. यश मिळालं, तर त्याचं श्रेय श्रद्धेला अधिक दिलं जातं, हेही आहेच). पाऊस कमी व्हायला नको असेल, तर जंगलतोड थांबवणं, नवीन झाडं लावणं, हाच मार्ग आहे, हे एक नास्तिक म्हणून मी ठामपणे म्हणू शकते.
अर्थात मानवाच्या नियंत्रणाबाहेरच्या अनेक शक्ती विश्वात आहेत, हेही मला मान्य आहे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, हेही मान्यच आहे, पण या शक्तीला देव म्हणणं, त्याच्या प्रकोपाच्या कहाण्या रचणं, दुखणं एका ठिकाणी अन् मलम दुसऱ्या ठिकाणी अशा पद्धतीने निरर्थक प्रायश्चित्तं घेत राहणं मला मान्य नव्हतं. यात अहंकाराचा कुठेही संबंध येत नाही. गुरूजनांचा, वडिलधाऱ्यांचा आदर ठेवण्यात नास्तिक असण्याचा कोणताही अडसर येत नाही, असा माझा तरी अनुभव आहे.
अर्थात आदर राखणं आणि अंधभक्ती करणं, यामध्ये एक तरल रेषा आहे. गुरू आहेत, वडीलधारे आहेत, उपकारकर्ते आहेत म्हणजे त्यांनी विहिरीत उडी घ्यायला सांगितली तरी मी घेईन, अशी अंधभक्ती नास्तिकतेत बसत नाही. हे भान अनेक आस्तिकांनाही असू शकतं, पण नास्तिक असण्याचा पायाच या भानावर उभा असल्याने नास्तिकांना ते अधिक असतं, किंबहुना नास्तिक म्हणवून घेणाऱ्यांना ते असलंच पाहिजे, असं मला वाटतं.
नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, हे स्वत: समजून घेण्यासाठी आणि गरज भासल्यास इतरांना पटवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, तो महान क्रांतिकारी विचारवंत भगतसिंग यांचा ‘व्हाय आय अॅम अॅन अथाइस्ट’ हा लेख. या लेखाचा जन्मच मुळात ‘नास्तिकता म्हणजे अहंकार’ या एका मित्राने केलेल्या आरोपाच्या खंडनातून झाला आहे. या आरोपाच्या निमित्तानं भगतसिंगाने त्याचा नास्तिकतेपर्यंत झालेल्या प्रवासाचा संपूर्ण धांडोळा घेतला आहे. नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, तर तो वास्तवाचा स्वीकार आहे, असं भगतसिंगाने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी लिहिलेल्या या लेखात ठामपणे म्हटलं आहे. अंत जवळ आल्यानंतर, देवाच्या अस्तित्वावरचा विश्वास माणसाला कमकुवत, असहाय्य करत असेल, तर तो नाकारणं कधीही चांगलं, अशी खूणगाठ त्याच्या मनाशी नक्कीच बांधली गेली असावी. त्याचा आधीच कधीतरी नास्तिकतेच्या दिशेने सुरू झालेला प्रवास यानंतर निर्णायकतेकडे गेला हे नक्की. नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, तर वधस्तंभाकडे ताठ मानेनं चालत जाण्याची ताकद, असं त्याने याच लेखात पुढे म्हटलं आहे.
माझी नास्तिकतेची बैठक पक्की होत जाण्यामध्ये मोठा वाटा आहे तो थोड्याफार वाचनाचा. नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, हे स्वत: समजून घेण्यासाठी आणि गरज भासल्यास इतरांना पटवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, तो महान क्रांतिकारी विचारवंत भगतसिंग यांचा ‘व्हाय आय अॅम अॅन अथाइस्ट’ हा लेख. या लेखाचा जन्मच मुळात ‘नास्तिकता म्हणजे अहंकार’ या एका मित्राने केलेल्या आरोपाच्या खंडनातून झाला आहे. या आरोपाच्या निमित्तानं भगतसिंगाने त्याचा नास्तिकतेपर्यंत झालेल्या प्रवासाचा संपूर्ण धांडोळा घेतला आहे. नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, तर तो वास्तवाचा स्वीकार आहे, असं भगतसिंगाने वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी लिहिलेल्या या लेखात ठामपणे म्हटलं आहे.
राम प्रसाद ‘बिसमिल’, अशफाक-उल्ला, राजेंद्रनाथ लाहिरी आणि ठाकूर रोशनसिंग या काकोरी खटल्यामध्ये फाशीची शिक्षा झालेल्या चार कॉम्रेड्सचा संदर्भ त्याच्या या प्रवासात महत्त्वाचा होता. खरं तर हे सगळे कम्युनिझम मानणारे. मात्र, व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी देवाधर्मावरची श्रद्धा नाकारलेली नव्हती. ती मनाच्या कोपऱ्यांमध्ये कुठे तरी शिल्लक होती. फाशीची शिक्षा सुनावली गेल्यापासून ते अमलात आणली जाईपर्यंतच्या काळात, हे क्रांतिकारक देवाचा धावा करत होते, उपनिषदांमधले श्लोक म्हणत होते, अल्लाची करुणा भाकत होते. या सगळ्यामध्ये एक प्रकारची असहाय्यता, हतबलता भगतसिंगाला जाणवली असावी.
आपल्या कॉम्रेड्सबद्दल वाटणाऱ्या आदरापोटी त्याने थेट या अर्थाचे शब्द लेखात वापरलेले नाहीत, पण अंत जवळ आल्यानंतर, देवाच्या अस्तित्वावरचा विश्वास माणसाला कमकुवत, असहाय्य करत असेल, तर तो नाकारणं कधीही चांगलं, अशी खूणगाठ त्याच्या मनाशी नक्कीच बांधली गेली असावी. त्याचा आधीच कधीतरी नास्तिकतेच्या दिशेने सुरू झालेला प्रवास यानंतर निर्णायकतेकडे गेला हे नक्की. नास्तिकता म्हणजे अहंकार नव्हे, तर वधस्तंभाकडे ताठ मानेनं चालत जाण्याची ताकद, असं त्याने याच लेखात पुढे म्हटलं आहे.
नास्तिकता म्हणजे अहंकार असेल, तर सगळेच आस्तिक लोक नम्र झाले असते, ते तसे दिसत नाहीत, असा युक्तिवादही त्याने केला आहे. हा लेख लिहिला त्या काळात भगतसिंगाचा शेवटचा तुरुंगवास सुरू होता. आपण आस्तिक असतो, तर हा काळ जरा सोपा गेला असता, असं त्याने लेखात नमूद केलं आहे. मात्र, हा सोपेपणा त्याला नको होता. त्याला धडधडीत वास्तव स्वीकारायचं होतं, ताठ मानेनं वधस्तंभाकडे चालत जायचं होतं. यासाठी लागणारं बळ नास्तिकतेतून आलं होतं. माणसाला प्रगती करायची असेल, तर कायमच प्रस्थापित व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारत राहावं लागतं, त्यांची उत्तरं शोधत राहावं लागतं, तर्काच्या कसोटीवर सगळं काही घासून बघावं लागतं आणि एखाद्या कल्पनेवर, विचारावर किंवा व्यक्तीवर संपूर्ण विश्वास टाकणं, यात बसत नाही, असं भगतसिंगाने म्हटलं आहे. नास्तिकता ही केवळ देवाच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वास न टाकण्यापुरती मर्यादित नाही, तर त्यात एखाद्या व्यक्तीवर आंधळा विश्वास टाकणंही बसत नाही, हा खूप महत्त्वाचा मुद्दा त्याने मांडला आहे.
भगतसिंगाचा हा लेख मला माझ्या नास्तिकतेबद्दल विचार करताना आणि हा विचार रोजच्या आयुष्यात लागू करताना खूप मार्गदर्शक ठरला. नास्तिक म्हणजे देव न मानणारा हा अन्वयार्थ मग खूपच तोकडा वाटायला लागला. कशावरच आंधळेपणाने विश्वास न टाकणाऱ्याला नास्तिक म्हणावं का, असं प्रकर्षानं वाटू लागलं. अर्थात त्यातही गोंधळ होतेच. आता जगाच्या या सगळ्या पसाऱ्यात वाट काढत राहायचं असेल, तर दर ठिकाणी प्रश्न विचारून, अविश्वास दाखवून तर चालत नाही. मग अशा वेळी काय करायचं? प्रश्न कुठे विचारायचे आणि कुठे विचारायचे नाहीत, याचं भान राखणं नक्कीच आवश्यक आहे. विश्वास तर कधी ना कधी, कोणावर ना कोणावर टाकावाच लागतो, पण त्याचे निकष काय असावेत, हे तर आपण ठरवू शकतो.
हे निकष व्यक्तीपरत्वे बदलतात. आता घरात कामाला कोणाला ठेवायचं, तर त्या व्यक्तीशी बोलून, त्यांनी पूर्वी केलेल्या कामाबद्दल बोलून एक अंदाज बांधता येतो. (त्या व्यक्तीची जात वगैरे पाहून विश्वास टाकणारेही बरेच असतात आणि ते बहुतेकदा आस्तिक असतात) पूर्वानुभव हा एक मोठा निकष असतोच. शिवाय समजा विश्वास चुकीचा ठरला, तर त्याचे परिणाम कितपत वाईट होऊ शकतील, हा विचार इथं महत्त्वाचा ठरतो. काही गोष्टी आपल्या हाताबाहेरच असतात. अशा वेळी सकारात्मक विचार करून विश्वास टाकावा लागतो. इथं निरर्थक विचार करून मेंदूला ताण देण्यात काही अर्थ नसतो. उदाहरणार्थ, बसमधून प्रवास करताना आपण ड्रायव्हरच्या कौशल्यावर विश्वास टाकतोच की नाही! माझ्यापुरतं बोलायचं तर माणसातल्या चांगुलपणावरही मी विश्वास टाकते. कारण मला आलेल्या चांगल्या अनुभवांचं प्रमाण वाईट अनुभवांहून खूप जास्त आहे. इथं विश्वासाहून अधिक ‘प्रोबॅबिलीटी’ येते. ती तर्काला धरूनच असते.
मग हाच विश्वास देवावर का टाकू नये, असा प्रश्नही मी स्वत:ला एका टप्प्यावर विचारला आहे. मात्र, मूर्त स्वरूपातल्या देवाची कल्पना जशी बालीश वाटायला लागली, तसं त्या प्रश्नाचं उत्तरही मिळालं बहुतेक. शिवाय, देवावर सहज हवाला ठेवणारे लोक माणसावर विश्वास टाकायला किती कचरतात याचे अनुभवही अनेकदा आले. त्या संशयी वृत्तीच्या तुलनेत तर्काच्या धारेवर गोष्टी घासून बघणं खूप नैसर्गिक, ‘ऑरगॅनिक’ वाटलं आणि नास्तिकतेची बैठक तिथं थोडी आणखी पक्की झाली.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी तर ‘नास्तिक’ या शब्दालाच आक्षेप घेतला आहे. नास्तिक म्हणजे विश्वास न ठेवणारे आणि देवाचं अस्तित्व नाकारणं, म्हणजे कशावरच विश्वास नाही, असं नाही, अशी त्यांची भूमिका आहे आणि ती अर्थातच बिनतोड आहे. (त्यांच्या चार्वाकाबद्दलच्या पुस्तकाचं शीर्षकच ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’ असं आहे.) मात्र, आता आस्तिक आणि नास्तिक हे शब्द एका ठराविक अर्थाने रूढ झालेले असल्यानं आपण तेच वापरतो.
नास्तिकता म्हणजे स्वार्थीपणा हा गैरसमजही समाजात बऱ्यापैकी आढळतो. ज्यांना कोणतेच धरबंध नकोत, सतत मनमानी करायला हवी, फक्त स्वत:पुरता विचार करायला हवा, ते नास्तिक, हा आरोप मी अनेकदा ऐकलाय. त्यामुळे मात्र माझं डोकं फारसं कुरतडलं गेलं नाही. कारण व्यक्तिगत आयुष्यात स्तोम जेवढे कमी असतील, तेवढा माणूस समाजासाठी अधिक काम करू शकतो, याची असंख्य उदाहरणं मी आजूबाजूला बघितली आहेत. स्वार्थापोटी नास्तिकतेचा बुरखा घेतलेले लोकही नाहीत असं नाही. मात्र नास्तिकता ही स्वार्थातून आलेली असते, हा आरोप अगदीच निरर्थक आहे.
याउलट आस्तिक लोकांच्या प्रत्येक नवसामागे, गाऱ्हाण्यामागे, जपा-तपांमागे काहीतरी मागणं असतं आणि ते सहसा वैयक्तिक स्वार्थापलीकडे जाणारं नसतं, हे मी बघितलं आहे. अर्थात यालाही अपवाद असतील किंवा त्याही पलीकडे जाऊन माणसानं स्वत:च्या भल्यासाठी काही करण्यात चूक काहीच नाही, पण नास्तिकता आणि स्वार्थ हे समीकरण होऊ शकत नाही, हे मात्र नक्की.
नास्तिक म्हणजे कोरडे, भावनाशून्य, केवळ विचारांनी चालणारे असाही गैरसमज एकंदर समाजात नेहमी आढळतो. नास्तिकतेत भावनेला स्थान नाही, अशा आविर्भावात वावरणारे नास्तिकही (?) मी बघितले आहेत. मुळात नास्तिकता म्हणजे कोणत्याही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास न टाकणं. मात्र, या विचारात भावनेला खरोखर स्थान नाही का, या प्रश्नाभवती मीही काही काळ फिरले आहे. जिथं भावना प्रबळ ठरतात, तिथं तर्क मागे पडतो असं होऊ शकतं.
मात्र, नास्तिकतेत भावनेला स्थानच नाही हा समज योग्य नाही. भावना या माणसामध्ये (किंवा कोणत्याही सजिवामध्ये) नैसर्गिकपणे असतात. त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं हे कदाचित नास्तिकांना अधिक चांगलं कळतं असावं. कारण ते भावनांना तर्काची जोड देऊ शकतात. त्यामुळे भावनांचे उद्रेक होणं किंवा भावनेच्या भरात वाहून जाणं, या भावनांच्या नकारात्मक आविष्कारांची शक्यता नास्तिकांमध्ये कमी असते. नास्तिक देवाचं अस्तित्व नाकारत असले, तरी माणसांबाबत त्यांना प्रेम वाटतच वाटतं (ते तसं वाटत नसेल, तर त्यामागे नास्तिकता हे कारण निश्चितच नसतं).
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
अनुकंपा, करुणा या भावनांच्या आड नास्तिकता कधीही येत नाही. त्यामुळे नास्तिक कोरडे किंवा भावनाशून्य नसतात, हे काळाच्या ओघात मला पटत गेलं. प्रेम ही तर नैसर्गिक भावना आहे. ते करण्याची आणि करून घेण्याची आस बहुतेकांना असते आणि त्यात नास्तिक असणं आड येत नाही. नास्तिक लोक जवळच्या व्यक्तींच्या भावनांहून अधिक महत्त्व तर्काला, विचारांना देतात हे खरं, पण हे तर आस्तिकांबाबतही मी बघितलेलं आहे. जवळच्या लोकांच्या भावनांहून अधिक महत्त्व त्यांच्या श्रद्धेला देणारेही असतातच.
एकंदर भारतीय समाजात आस्तिक बहुसंख्य आहेत. त्यामुळे विचारांचा संघर्ष होण्याची शक्यता त्यांच्याबाबत कमी होते आणि नास्तिक अल्पसंख्य असल्यानं त्यांच्याबाबत ती वाढते. त्यामुळे नास्तिकांना संघर्ष जास्त करावा लागतो, जवळच्या व्यक्तींचा विरोध जास्त पत्करावा लागतो. याचा अर्थ त्यांच्या मनात कोणाविषयी प्रेम नसतं, असा अजिबात नाही. देवाला नैवेद्य वाहण्यापेक्षा भुकेल्यांना अन्न द्या ही नास्तिकांची भूमिका असते. यात वंचितांबाबत करुणा, अनुकंपा नाही का? आता भावनांची तीव्रता, उत्कटता व्यक्तीपरत्वे कमी-अधिक असते हे तर झालंच. हे आस्तिकांनाही लागू आहेच.
.................................................................................................................................................................
लेखिका सायली परांजपे या मुक्त-पत्रकार आणि अनुवादिका आहेत.
sayalee.paranjape@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment