जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपण अपूर्ण आहोत, असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकाचा पूर्णत्वाचा शोध सुरू असतो. कुणाला वाटतं, पैसा मिळाला की, आपल्याला पूर्णत्व येईल. कुणाला वाटतं, सत्ता मिळाली की... कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर नाती, तर कुणाला अजून काही...
या जगातील बहुतेक लोक लौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधत असतात.
याउलट, पु.ल. देशपांडे, माधव आचवल, जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यासारखे संवेदनशील कलावंत अलौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधताना दिसतात. हा शोध वेगवेगळे मार्ग चोखाळतो, वेगवेगळे रंग धारण करतो, वेगवेगळी वळणं घेतो… कधी स्वर, कधी रूप, तर कधी शब्द! कधी कलेच्या अंगानं, तर कधी तत्त्वज्ञानाच्या!... कधी बुद्धिप्रामाण्याच्या, तर कधी अध्यात्माच्या!
या शोधामुळे सगळ्या संवेदनशील कलाकारांची आयुष्यं झळाळून जातात. या शोधाला नेहमीच स्त्री-पुरुष मैत्रीची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. कारण तत्त्वज्ञान आणि कला यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये कळत-नकळत पूर्णत्व शोधत असतात.
पुल, आचवल आणि जीए या तीन निर्माणकर्त्यांच्या प्रतिभेवर सुनीताबाई रुंजी घालत राहिल्या आणि त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाच्या साक्षीदार व एक रसिक मैत्रीण बनून राहिल्या. या चार प्रतिभावंतांची मैत्री कलेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या प्रांगणात बहरली. पुल - सुनीता, आचवल - सुनीता आणि जीए - सुनीता यांच्यातील मैत्री विलक्षण होती.
या मैत्रीच्या कल्लोळात या सगळ्यांकडून त्यांच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल, कलेबद्दल आणि तत्त्वज्ञानाबद्दल जे काही लिहिले गेले, ती संवेदनशील मानवी आयुष्याची एक धडकती दास्तान आहे...
.................................................................................................................................................................
लेखांक : तिसरा
माधव आचवल हे रूपाची भूल पडलेले व्यक्तिमत्त्व होते. या जगातली असंख्य रूपे काय किमया करतात, हे त्यांनी अत्यंत संवेदनशील मनाने आयुष्यभर निरखले होते. या किमयेचा काव्यात्म आस्वाद घेतला होता. रूप आणि संवेदना यांचा एकमेकांवर काय आणि कसा परिणाम होतो, हे अत्यंत काव्यात्म मनाने अनुभवले होते. त्यावर रात्रंदिवस चिंतन केले होते.
पुलंना संगीताची उपजत जाण होती, तशी आचवलांना रूपाची होती. मुख्यत्वेकरून रेषेची! कुठल्याही कला प्रकाराचे अभिजात सौंदर्य आपल्याला खऱ्या अर्थाने उमगायचे असेल, तर त्या कलेचे आणि आपले ‘ट्यूनिंग’ जन्मजात असायला लागते!
आचवल लिहितात - “रेडिओवर ज्याप्रमाणे ट्यूनिंग बरोबर झाले, तरच गाणें ऐकू येतें; नाही तर नुसती खरखर! कलेशी असें ‘ट्यूनिंग’ होणें हा खरे तर एकेकाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो. पण तें सहजतपणे होऊं शकलें, तर या कलाप्रांताचा उंबरठा ओलांडता आला. आता पुढे किती जातां येईल हें प्रेमावर, प्रयत्नांवर अवलंबून.”
पुलंना जसे स्वरांचे सौंदर्य उमजत गेले होते, तसेच आचवलांना रेषांचे. स्वरांविषयी बोलताना पुल जसे काव्यात्म होत जातात, तसेच रेषांबद्दल बोलताना आचवल. संगीत काव्यात्म भाषेत समजून घेताना सुनीताबाई पुलंच्या मैत्रीण झाल्या, रेषा आणि रूपातील सौंदर्य काव्यात्म भाषेत समजून घेताना आचवलांच्या.
रेषांबद्दल आचवल लिहितात - “रेषा… किती निराळ्या, किती विविध प्रकारच्या, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वांनी पूर्ण अशा! गुलमोहराच्या डहाळीची बाकदार, झुकलेली, रंगेल रेषा, आणि वडाच्या खोडाची जाड, मस्त आणि रगेल रेषा. लाटांच्या हलत्या, पसरत्या, विरत्या द्रवरेषा आणि त्यांनी किनाऱ्यावर रेखलेल्या भुरभुरत्या, हलक्या किनारी रेषा. धनुष्याच्या दोरीची ताणावलेली रेषा, आणि उदबत्तीच्या वलयांची, असले-नसलेपणाच्या सीमेवरची मुलायम रेषा. खारीच्या शेपटीची वक्र, लवलवीत, गुबरी रेषा; मुलाच्या जावळाच्या मऊ, विरळ रेषा आणि ओठांच्या मुरडींतली ती, आणि तीच रेषा. असंख्य रेषा! गहिऱ्या व्यक्तिमत्त्वांनी भरलेल्या स्वयंसिद्ध रेषा! त्यांतूनहि जीवनांतल्या कांही चिरंतन सत्यांचा साक्षात्कार होतच असतो की! तो साक्षात्कार सौंदर्याचा, आणि तो जाणतां येतो कवीला, कलावंताला, रसिकाला!”
इथेही संगीताप्रमाणेच चिरंतन सत्याच्या साक्षात्काराची अस्फुट जाणीव प्रत्येक अनुभवाच्या मागे झळकत राहते! अनेक ठिपक्यांची रेषा बनते. रेषेचे आकार बनतात. रेषेचे आणि अवकाशाचे एक मूलभूत नाते असते. आचवल लिहितात - “आभाळांत पक्षी उडतांना बघितला की, आभाळहि निराळ्या तऱ्हेने जाणवतें. तेवढ्या ठिपक्याने आभाळाला चैतन्य येतें.”
रेषांनी आकार तयार होतात आणि ते निरामय अवकाशाला जीवंत करतात असे आचवलांना म्हणायचे आहे. आचवल लाओ त्सु या चिनी तत्त्वज्ञाचा हवाला देतात - “समुद्रांत बुडवली एक बालदी... बालदींत पाणी... बाहेर पाणी. पाणी एकच, आणि तरीहि निराळें, अवकाशांत रचलेल्या वास्तूच्या मध्येसुद्धा अवकाशच असतें. ज्या तऱ्हेने या अवकाशातील जीवनाशी त्या वास्तूने संबंध जोडलेले असतात, त्यात त्या वास्तूचे वास्तूपण लपलेले असते. त्यात त्या वास्तूचे खरे जीवनतत्त्व लपलेले असते.” वास्तूच्या आत-बाहेर अवकाश असते, तसेच रेषेच्या दोन्ही बाजूला अवकाशच असते.
आपल्या भोवतीच्या वास्तूंबरोबर आपल्या भावना जोडलेल्या असतात. तिच्या रूपांशी त्या एकजीव झालेल्या असतात. वास्तू, तिच्याभोवती विणल्या गेलेल्या भावना आणि त्यातले सौंदर्य, यांविषयी लिहिताना आचवल तरल होत जातात. अशा वेळी रूप कविता बनून आली आहे, असे वाटते.
आचवल लिहितात - “आठवणी, श्रावणांतल्या सोमवारच्या गाभुळलेल्या चिंचेच्या चवीच्या. शाळेला अर्धा दिवस सुटी असायची. गावांत शंकराची देवळें कांही थोडीं नव्हती. पण आमचे आवडतें देऊळ गावाबाहेरच्या तलावाकाठचें. सारीं चांगलीं देवळें नदीवर, नाही तर तलावाच्या काठींच कां बरे असतात! घंटानादांच्या लहरी पाण्याच्या लहरींवर विरल्याखेरीज देवळाला देऊळपण येत नाही. काठाशीं देऊळ नाही म्हणून कित्येक वर्षे हिरमुसलें तोंड करून बसलेले तलाव पाहिले की, त्यांचे दुःख मला समजते. पण हा तलाव सुखी होता; कारण त्याच्या काठी देऊळ होते.”
आचवल असे लिहितात, तेव्हा वाटते की, सौंदर्य हे तत्त्व आहे की, ती एक भावना आहे!
रेषांमधून रूपे तयार होतात. रूपांमध्ये प्रकाशाचे अवतरण होते, पाण्याचेही अवतरण होते. प्रकाश आणि पाणी हीसुद्धा रूपे असली, तरी नुसत्या रूपांपेक्षा त्यांच्यात काहीतरी जास्त असते. प्रकाश आणि पाणी इतर रूपांवर संस्कार करतात. प्रकाश रूपाला प्रकाशित करतो आणि पाणी रूपाला परावर्तित करत राहाते.
आचवल लिहितात - “पाणी आले की झाडे वेडी होतात… जमिनींत रुतून बसलेल्या शहाण्या झाडाकडे कोणी बघत नाही. पण पाण्याने हें सारें चित्रच ढासळून जातें आणि दृष्टीला भ्रम होतो. झाड एकदम उपरें आणि अलग होतें; जास्त अस्थिर आणि हलकें वाटायला लागतें; काटकुळें आणि उंच होतें. तें जास्त 'झाड' होतें. पाण्याच्या स्पर्शाने बावचळतें आणि नार्सिसससारखें आपलेंच रूप न्याहाळू लागतें. अशा स्वत:तच रमलेल्या झाडाकडे बघतांना आपल्याला चोरट्यासारखें होतें. आणि मग बघितलें तरी न बघितल्यासारखें करीत आपण झटझट तलावाकडे धावूं लागायचे.”
जे झाडांचे तेच ताजमहालसारख्या वास्तूचे. आचवल लिहितात - “ताजमहालच्या बागेत फिरत असतांना वास्तूबरोबरच तिचे प्रतिबिंब आपणांस सतत दिसत राहते आणि त्यामुळे जमिनीशीं चिकटून असणाऱ्या इमारतींना आपल्या अनुभवांत जो जडपणा, कठीणपणा आणि स्थिरपणा संबद्ध असतो, त्यापासून ती मुक्त होते. …एवढी प्रचंड वास्तु, पण हलकी वाटू लागते. बागेत मध्यभागी असलेल्या तळ्याच्या काठीं उभे राहिलें की, संपूर्ण प्रतिबिंबच दिसूं लागतें. वास्तूच्या सर्व सरळ रेषा प्रतिबिंबांत हलत, सळसळत असतात. छायाप्रकाशांचे आकार डुचमळत असतात. पाण्यांतल्या वास्तूच्या प्रतिबिंबावरून सरकणारे आकाशांतल्या पांढऱ्या ढगांच्या पुंजक्यांचे प्रतिबिंब हलक्या हाताने सारे दृश्य अस्पष्ट करते. हे पाहून पुन्हा वर मान केली की, समोरच्या वास्तूची घनताच कमी झाल्यासारखी वाटते. रेषा मृदु होतात; चौकोन, वर्तुळ, लंबवर्तुळ, त्रिकोणादि भूमितीच्या आकृतींतून घडविलेल्या आकारांना स्वभावतःच जो गणिती कठीणपणा असतो, त्याला कुठे तरी बालकाच्या हाताचा स्पर्श होतो.” पाण्याचे हे असे!
प्रकाश रूपाला अक्षरशः घडवतो असे म्हटले तरी चालेल. पाश्चात्य शिल्पकार रोदांचे उदाहरण देऊन आचवल प्रकाश रूपाला कसे घडवतो, हे उलगडून सांगतात. ते लिहितात - “आकार खरोखर घडवतो कोण? रोदां एकदा आपल्या एका शिष्याला म्हणाला, ‘तूं व्हीनस पाहिली म्हणतोस?... चल, मी तुला व्हीनस दाखवतों.’ त्याने स्टुडिओतल्या व्हीनसच्या पुतळ्याच्या बाजूला फिरता प्रकाशझोत लावला, आणि हलकेच तो त्या पुतळ्याभोवती फिरवला, कमी-जास्त, मंद केला. दिवसा केवळ एक घनाकार म्हणून जाणवणाऱ्या त्या पुतळ्याच्या अंगाअंगांतल्या बारीक खळग्या, शिरान् शिरा, त्वचेची तलम झळाळी... सारे फुलून आलें. मंद प्रकाशाने रेखलेल्या गर्द, फिकट, स्पष्ट आकाररेषा दर्शविणाऱ्या आणि पुसट विलीनतेंत जाणाऱ्या छायांच्या छटांतून... व्हीनस जिवंत झाली. तें शिल्पच निराळ्या तऱ्हेने जाणवू लागलें... तें उभे राहिलें! प्रकाश असा आकार घडवतो, क्षणोक्षणीं निराळा करतो. तो आकार आकारित करतो. सूर्यप्रकाश व चांदणें वस्तूवर पडतांना वातावरणाचे सारे ढंग घेऊन येतें. त्याचे वस्तूवर पडून परावर्तित होणारे किरणहि आपल्या डोळ्यांना भिडतांना असेच वातावरणांतून आलेले असतात.”
छाया-प्रकाशाच्या खेळाशिवाय कसले आकार? प्रकाश आणि पाणी रूपावर असे संस्कार करत असतानाच या सगळ्या छाया-प्रकाशाच्या खेळात रंग उतरून येतात. आचवल लिहितात - “छायांना रंग असतात. पांढऱ्या संगमरवरावर छाया पडते, ती नितळ पाण्यावर पडलेल्या सावलीसारखी; विटकरी दगडावर जांभळट लाल; निळ्या दगडावर करडी आणि गुलमोहराच्या झाडाची छाया पण तितकीच मोहरलेली. संध्याकाळच्या प्रकाशांत वस्तूंच्या छायाकृति दिसतात आणि सामान्यतः न जाणवणारें वास्तुदर्शन होऊं लागतें.”
आचवलांचे सौंदर्यासक्त मन रोज रूपाच्या वर्षावात अशा रितीने नाहून निघत होते. ताजमहालाविषयी ते लिहितात, “ताज सकाळच्या उन्हात बघावा, रात्री चांदण्याच्या प्रकाशात बघावा आणि दुपारी आजुबाजूच्या बागेतील कर्दळींच्या फुलांच्या झुपक्यातूनसुद्धा बघावा… कर्दळीच्या गर्द मखमली फुलांच्या झुपक्यांतून बघतांना पलीकडचा ताजमहाल त्यांचा रंग ल्याल्या आहे असे तुम्हाला वाटेल.”
रूपाचा हा सुंदर भूलभुलैय्या! त्यात माणसाचे मन अडकून पडते. त्याच्या भावना अंगडाई घेतात. घनतेमध्ये एक अंगभूत चैतन्य असते असे आचवलांचे म्हणणे. त्यात माणसाच्या मनाचा ओघ अडकून पडतो. याचे उदाहरण देताना आचवल लिहितात - “संगमरवरी इमारतीआडून प्रकाश आला की, त्या प्रकाशाला अडवणाऱ्या वास्तूच्या कडा, थोड्या पारदर्शक असल्यामुळे उजळती रेषा दाखवतात. एखाद्या सलीम चिस्तीच्या मकबऱ्याच्या जाळींआडून रात्रीं दरवान दिवा घेऊन फिरूं लागला की तिच्यांतील मोकळ्या जागांत प्रकाशाची खडी रेखली जाते आणि जाळीला स्वप्न पडतें!”
सौंदर्याच्या दीप्तीने प्रकाशमान झालेली रूपाची रत्ने आणि त्यामुळे ढवळून निघालेल्या सौंदर्यपूर्ण भावना यांचे इंद्रधनुषी गारूड म्हणजे आचवलांची जीवनदृष्टी! पुल आणि सुनीताबाईंना आचवलांच्या या सौंदर्यपूर्ण जीवनदृष्टीचा अनावर मोह होता. आचवलांनी काही लिहिले आहे, असे कळवले की, हे दोघे गाडी काढून बडोद्याला आचवलांकडे जात. लेखनाचे वाचन होई. त्यावर गप्पा होत. दोन-चार दिवसांचा गप्पांचा स्वर्ग अक्षरशः आकार घेत असे!
रेषा हे आचवलांसाठी सौंदर्याने अवकाशावर केलेले लिखाणच होते. रेषा अवकाशाच्या निराकारतेवर निश्चितता आणि अनिश्चितता यांचा खेळ मांडून बसलेली होती. आचवल तो खेळ आपल्या धडकत्या हृदयाने बघत होते.
आचवल लिहितात - “रेषा दृष्टीला वस्तू मोजण्याचें निराळेंच माप देतात. ताजमहालच्या संगमरवरी बांधणींत सफाई इतकी की सांध्याच्या रेषा दिसूच नयेत. वरच्या कोरीव कामाने पृष्ठभागाचीच जाणीव होत राहावी. पण त्या वास्तूचा तोल सांभाळणारे मनोरे मात्र प्रत्येक दोन पांढऱ्या दगडांत इंचभर रुंदीची काळी रेषा दाखवतात. म्हणूनच त्यांच्याकडे बघतांना, दगडावर दगड रचून ते बनवले आहेत, जड आहेत, भक्कमपणे जमिनींत रोवले आहेत, ही जाणीव मनांतून जात नाही.”
ताजच्या पृष्ठभावरील तरलता त्याच्या भक्कम दिसणाऱ्या मनोऱ्यांनी तोलून धरली होती. हे सौंदर्यनाट्य सुनीताबाई आचवलांच्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करत होत्या.
पुल आणि आचवल यांचीही शब्दांवर हुकूमत होती. कुणालाही आश्चर्य वाटावे, अशी हुकूमत होती. शब्द दोघांनाही प्रसन्न होते. शब्दांचे वर्म पुल आणि आचवल यांना माहीत होते. पुल आणि आचवल यांनी शब्दांबरोबर ‘रोमान्स’ केला, असे म्हणता येईल, पण सुनीताबाई आणि जीए यांना शब्दांच्या ठाई असलेले जीवघेणे मर्म प्रतीत होत होते. पुलंकडून आचवल यांच्याकडे येताना समाधानाकडून समाधानाच्या तीव्र शोधाकडे आपण येतो. आचवलांकडून जीए आणि सुनीता यांच्याकडे येताना आपण समाधानाच्या तीव्र शोधाकडून अत्यंत आदर्शवादी अशा भावनिक असमाधानाकडे येतो. शेवटी आदर्शवाद म्हणजे तरी काय, पूर्णत्वाची आसच ना?
आचवलांनाही आपल्याला सुचलेले सौंदर्यसूक्त लोकांना सांगण्याची ओढ होती. ‘किमया’ पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत आचवल म्हणतात - “आजूबाजूच्या विश्वासंबंधी माझ्या स्वतःच्या अशा कांही जाणिवा होत्या. वास्तुकलेसंबंधी आणि तिच्या अनुरोधाने शिल्प व चित्र या कलांसंबंधी कांही विचार व कल्पना मनांत घोळत असत. या सर्वांच्या रसायनांतून स्फटिक निर्माण व्हावे तसे हे लेख लिहिले गेले, कधी या रसायनांतले घटक एकमेकांत विरघळून गेले, एकरूप झाले; कधी झाले नाहीत. त्या स्फटिकांचे मनांतच अस्पष्ट जाणवलेले आकार शब्दांकित करावे, त्यांतून त्यांचीं प्रतिबिंबें दुसऱ्या एखाद्या रसिकमनांत उमटावीं, हाच या निबंधांचा हेतु.”
थोडक्यात, सौंदर्य, विचार आणि कल्पना यांच्या संयोगातून जे आकारांचे स्फटिक मनात तयार झाले त्यांची प्रतिबिंबे म्हणजे आचवलांचे लिखाण. सगळेच सौंदर्यपूर्ण.
रूपाने आणि त्याच्या भोवती नाचणाऱ्या प्रकाशाच्या संगीताने आचवलांचे जग नाचत होते. हे संगीत चित्रांच्या, शिल्पांच्या आणि वास्तूच्या बंदिशीत बंदिस्त करणे म्हणजे कला अशी आचवलांची कलेची साधी व्याख्या होती. याचा अर्थ असा नाही की, आचवलांना या जगातील कुरूपता आणि कुरूप असंवेदना अस्वस्थ करत नव्हती.
‘निऑन साइन्स’ना आचवल ‘वीज-आळ्या’ म्हणतात. ते लिहितात - “शहराच्या गजबजलेल्या भागांत रात्रीं जावें; वीज-आळ्यांनी व रंगीत नळ्यांनी घातलेल्या हैदोसाने साऱ्या भागाचें रूप बकाल, हिडीस होऊन गेलेलें असतें. जणु वाकड्या तिकड्या जळवाच गावाच्या अंगाला चिकटल्या आहेत. प्रकाश खूप असतो. त्याचा पडघम वाजत असतो आणि सारें संगीत लोपून जातें.”
भारतातील सुंदर नद्यांची जी अवस्था झाली आहे, त्याबाबत आचवल लिहितात - “आमच्याहि नद्यांना इतिहास होता. आमच्याहि जीवनाचा त्या एकदा अविभाज्य भाग होत्या. वेदांतल्या ऋचांचा नाद त्यांच्याहि किनाऱ्यांनी ऐकला आहे. संस्कृतीचे लोट त्यांच्याहि प्रवाहावरून वाहत गेले आहेत. मालाने भरगच्च भरलेले रंगीबेरंगी शिडांचे काफिले त्यांच्यांतूनहि गावोगावी फिरत गेले आहेत. आर्यबालांनी सरित्पूजन करून त्यांच्याहि प्रवाहांत दीपमाला सोडून दिल्या आहेत... पण त्या दीपमाला प्रवाहाबरोबर वाहत वाहत ज्या एकदा सागराला जाऊन मिळाल्या, त्या पुन्हा कधी दिसल्याच नाहीत. त्या शोधण्यासाठी सागरतीरीं जावें आणि क्षितिजाकडे डोळे लावून बसावें.. त्यांची आठवण म्हणून मागे राहिलेला दीपस्तंभ फक्त दिसतो. बिचारा अगदी एकटा आणि उदास वाटतो.”
पुढच्या काळात आपण पाण्याचे प्रेम विसरून गेलो असे आचवलांचे म्हणणे आहे. ते लिहितात- “आम्हीं पाण्याला पवित्र मानलें आणि त्याच्यावर प्रेम करायचे सोडून दिलें. प्रेम करायचे सोडलें आणि त्यांतून एक दुरावा निर्माण झाला; दुरावलेल्या साऱ्याच पवित्र वस्तूंची जी विटंबना होते ती मग त्याचीहि झाली. आंघोळ करतांना बादलींतल्या पाण्यांत आज जर गंगा-यमुना-गोदावरी-सरस्वती आणि नर्मदा-सिंधु कावेरी अवतरल्या, तर खरोखरीच माणसाला मोक्षप्राप्ति होईल! जिथे आमचा स्पर्श झाला नाही तिथेच आमच्या नद्या स्वच्छ राहिल्या; जिथे जिथे आम्हीं त्यांना स्पर्श केला तिथे तिथे त्या नासून गेल्या.”
पूर्णतेच्या शोधासाठी पुलंना संगीतातील सौंदर्य पुरेसे वाटत असावे. आचवलांसाठी रेषा, अवकाश आणि स्त्रीचे सौंदर्य ही शोधाची मुख्य माध्यमे होती. जीए आणि सुनीता यांना स्वर आणि रेषा मोहवीत होते, त्यातले सौंदर्य मोहवीत होते, पण त्यांना त्यांच्या शोधासाठी ते पुरेसे वाटत नव्हते. जीवघेण्या भावनांचा ठाव घेण्यासाठी, शब्दांसारखे ऐसपैस माध्यम त्यांना आवश्यक वाटत होते. असे वाटते की, आपल्या जीवघेण्या भावना या दोघांनाही एकदाच्या व्यक्त करायच्या होत्या आणि त्यातून सुटायचे होते.
पुलंना या जगातील असुंदराची जाणीव होती, तशीच आचवलांनाही होती. परंतु गंमत अशी की, जाणीव असली तरी असुंदराला या दोघांच्या मानसिक आणि कलात्म जीवनात जीवनात प्रवेश नव्हता.
सुनीताबाई या जगातील असुंदराकडे दुर्लक्ष करू शकत नव्हत्या. असुंदर त्यांना अतिशय अस्वस्थ करत होते. या बाबतीत त्यांचे आणि जीएंचे जमत होते. पुल आणि आचवल यांचे जग सुंदर होते. पुलंनी स्वरांच्या कोंदणात आणि आचवलांनी रूपाच्या कोंदणात आपले जग सुरक्षित ठेवले होते. सुनीताबाई आणि जीएंचा तो स्वभाव नव्हता. रूपाच्या या भूलभुलैय्यामध्ये भावना कशा उमलत जातात, याची अतिशय सुरेख जाण आचवलांना होती.
आचवल लिहितात - “प्रेमाला प्रकाश हवा पणतीचा. सौम्य, मंद. खोलीच्या कांही भागांत काळोखाचे गूढ कोनाडे निर्माण करणारा. प्रियतमेच्या चेहऱ्यावर, पूर्वी कधी न जाणवलेलें सुप्त सौंदर्य प्रकट करणारा. प्रेमाला प्रकाश हवा कुजबुजीइतका हलका. दोन जिवांतले नाजुक धागे ज्याने करपून जाणार नाहीत असा. म्हणून त्याने नाते जोडलें चंद्राशीं.”
रखरखीत प्रकाशात प्रेम उमलून येत नाही. “रखरखीत ऊन पडलें आहे, भक्क उजेडाने डोळ्यांपुढे अंधारी येत आहे, खोलीच्या खुंटीवर टांगलेले कपडेसुद्धा तापले आहेत… भर दुपारच्या अशा रम्य प्रहरीं मालतीच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढीत माधव म्हणाला, ‘प्रिये...’ ” असे वर्णन कुठल्याही कादंबरीत वाचायला कधी मिळेल असे वाटत नाही”, असे आचवल म्हणतात.
प्रकाशाचे आपल्या भावनांशी कसे नाते असते हे सांगताना आचवल लिहितात - “टेबलावर ठेवलेल्या मेणबत्त्यांच्या चंचल प्रकाशांतील जेवणाच्या वेळच्या गप्पांना निराळी खुमारी येते, आणि बाहेर टांगलेल्या रंगीबेरंगी विविध आकारांच्या जपानी कंदिलांनी उजळलेला परीकथेंतला रस्ता पाहिला की चालतांना पाऊल हळू पडतें!”
ही साक्षात भूल. अशाच एका सुंदर भुलीचे चित्र आचवल रंगवतात - “अशीच भूल रात्रीं आजी सांगत असलेल्या गोष्टींची छोट्या बालकांवर पडते. अंथरुणें घालून झाली आहेत. छोटी पिल्लें खुरमांड्या घालून कान टवकारून बसली आहेत. खोलींतल्या काळोखांत कोनाड्यांतल्या पणतीची वात जळते आहे. आजीच्या मांडीवर एक तान्हें बाळ हलतें आहें. तिच्या तोंडावर फक्त एका बाजूने उजेड येत असतो आणि सुरकुत्यांच्या त्या जाळ्यांत मुलें पकडली जातात.”
आचवलांच्या प्रज्ञेची मुळे एकाच वेळी, तत्त्वज्ञान, अध्यात्म, शास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या सगळ्या क्षेत्रात खोल गेलेली होती. आचवल वाचत असताना आपल्याही प्रज्ञेचा विस्तार वाढत जातो. ‘किमया’ या आचवलांच्या मुखपृष्ठावर जाळ्यात अडकलेल्या एका सोनेरी मासोळीचे चित्र आहे. रूपाच्या जाळ्यात अडकलेले हे सौंदर्य आहे की, रूपाच्या जाळ्यात अडकलेले चैतन्य आहे? का सौंदर्य म्हणजेच चैतन्य? यातले काहीही असले, तरी या दोघांनाही रूपाचा आधार घ्यावासा वाटतो, ही गोष्ट अगदी खरी आहे! रूपाचा आधार का घ्यावासा वाटतो यांना? पूर्णत्वाला अपूर्णत्वाचा आधार घ्यावा असं का वाटत असेल? संपूर्ण आयुष्यभर जीए या प्रश्नावर डोके आपटत राहिले. जीए आणि आचवल ही दोन प्रतिभावंतांची विलक्षण मैत्री होती. दोघेही पूर्णत्व आणि अपूर्णत्व यांच्यामधील ‘इंटरफेस’वर... शॉपेनहॉवर आणि श्री अरविंद यांच्यातील सीमारेषेवर राहत होते.
रूपाच्या अनुभवामध्ये नाद आणि गती उतरून येतात आणि आपल्या भावनांना तरलता प्राप्त होते. आचवल लिहितात - “आपल्या सर्व अनुभवांत गति आणि नाद हीं इतकीं एकरूप झालेलीं असतात की, नादाशिवाय गतीची आपणांला कल्पनाच करतां येत नाही. समुद्रकिनाऱ्यावरील शांत निसूर हालचालीच्या वस्त्राला किनाऱ्यावरील लाटांच्या नादाची फक्त किनार असते. तिने शांतताच जास्त गहिरी होते. समोरच्या दृश्यांतल्या साऱ्या वस्तू केवळ चित्ररूपांत उरल्यासारख्या वाटतात. असेच कांही वेळ बघत राहिले तर चुकून कधी तरी या अशरीरी चित्ररूपाशी आपण स्वतःच एकरूप होत चाललो आहोत असे एकाएकीं वाटतें. ही जाणीव होते न होते तोच पुसट होत होत नाहीशी होते आणि त्या विरत्या जाणिवेच्या मागे मन वेड्यासारखें धावू लागते... पण ती सापडत नाही आणि डोळ्यांत मात्र पाणी येते.”
रेषा, प्रकाश, छाया, रंग, पाणी, नाद आणि गती सगळे सगळे एकत्र झाले. आता यात स्त्री-रूप उतरून आले नसते तरच नवल होते. आचवलांसाठी स्त्री म्हणजे सौंदर्य, स्त्री म्हणजे नाती, स्त्री म्हणजे नात्यांचा मोह, स्त्री म्हणजे घर, स्त्री म्हणजे सृजन आणि स्त्री म्हणजे साक्षात जीवनरस!
एका टेकडीविषयी आणि तिच्यावर बांधलेल्या घराविषयी लिहिताना आचवल लिहितात- “एक लहानशी टेकडी. धरणीला माता म्हणतात, पण प्रथम ती स्त्री असते याची जाणीव देणारी. मृदु, हळुवार, द्यायला आणि घ्यायला उत्सुक, स्वतःचे मूड्स् असणारी टेकडी… रातकिड्यांच्या आवाजाने जास्तच गर्द झालेल्या शांततेंत जमिनीवर छायांची जाळीं विणीत बसलेली झाडे. करड्या वाटणाऱ्या फुलांच्या पेल्यांत चकाकणारे दवबिंदूंचे मोती. गारव्यांत गळ्याभोवती मफलर गुंडाळावा, तसें झाडाभोवती तरंगणारे धुकें…
…कांही आजूबाजूची झुडुपें जशी स्वैरपणे, स्वच्छंदाने, जमिनींतून जीवनरस शोषून घेऊन वाढतात, तसेंच हे घरहि वाढले आहे.” द्यायला आणि घ्यायला उत्सुक असे स्त्रीरूप आचवलांना त्या टेकडीमध्ये दिसते.
पु. शि. रेगे यांची एक कविता रेषांबद्दल आणि त्यामधून व्यक्त होणाऱ्या स्त्रीच्या रूपाबद्दल आहे-
“रेषा...
रेषांतुन तूं,
लववित किरण उभे,
मनवित छाया
अवघडत्या.”
आचवलांना रेग्यांची ही कविता अतिशय आवडत असे! स्त्रीचे शरीर रेखताना रेषा इतकी नाजूक आणि सुंदर वळणे घेतात की, कुठल्याही रूपवाद्याला त्याचा प्रत्यय आला की, स्त्री रूपाची आठवण येते. स्त्री रूपाची सय येते. अत्यंत नाजूक आणि सुंदर रेषा, आणि त्या सुंदर रेषांच्या अत्यंत मृदू पण अत्यंत अवघड अशा छाया यांच्या मीलनातून स्त्रीचे सौंदर्य आकार घेत असते.
‘जास्वंद’ या पुस्तकात रेगे यांच्यावरील लेखात आचवलांनी त्यांचे एक गाजलेले वाक्य दिले आहे - “सौंदर्याचें- मग तें कोणाचेही असो - त्याचे आकलन मी केवळ स्त्रीनिष्ठ समधाततेतच करू शकतों.” सौंदर्य कुठलेही असले तरी स्त्रीच्या सौंदर्याची आठवण रेग्यांना होणारच!
आचवल तर या बाबतीत रेग्यांच्या पुढे जातात. सौंदर्य कुठलेही असले तरी मुख्यतः रतिक्रीडेच्या अंगानेच त्या सौंदर्याचे आकलन होत असते, असे आचवल लिहितात. रूपामुळे त्यात उतरून आलेल्या सौंदर्यामुळे पुरुष त्याच्या कळत नकळत रतिक्रीडेकडे ओढला जात असतो. पण सौंदर्याच्या दर्शनाने स्त्रीचे काय होते?
रूपाचे सौंदर्य बघत बघत नकळत आचवल रूपाच्या पार, केवलत्वाकडे जाताना दिसतात. आचवल अनावरपणे रूपांचे अनावर अनुभव घेत होते. त्याचा विचार करताना त्यांच्या मनात जे स्फटिक तयार होत होते, ते त्यांच्या लिखाणात उतरत होते. पुल आणि सुनीताबाईसुद्धा त्या अनुभवांमध्ये आणि त्यांच्या स्फटिकी लिखाणात ओढले जात होते. लिहिता लिहिता आचवल अचानक तत्त्वज्ञान लिहून जातात आणि या विलक्षण खेळात जीएसुद्धा ओढले जातात.
स्त्रीसुद्धा रतिक्रीडेकडे ओढली जाते, पण ती तिथे थांबत नाही, ती पुढे मातृत्वाकडे सरकते. सौंदर्य स्त्रीमध्ये सुंदर भावना निर्माण करते, या भावना मातृत्वासाठी पूरक असतात. ‘धूसर विरल’ या आपल्या कवितेत इंदिरा संत यांना सौंदर्य कसे दिसते याचे उदाहरण आचवल देतात.
“धूसर विरल श्यामल आभाळ
फिकट पांढरें सूर्याचें वर्तुळ
पांढरें गढूळ रेशमी ऊन
मधूनमधून धारांची शिंपण!
खालती हिरवा सतेज माळ...”
हे दृश्य पाहून इंदिराबाईंना मातृत्वाची आठवण होते, असे आचवल लिहितात -
“प्रेमळ सावळी कोण ही जननी
गोमटें तान्हुलें पायावरी न्हाणी!
तेलाहळदीचें पिवळें कोवळें
सतेज बालक, रूपच आगळें!
चांदीचा कलश, अमृताचें पाणी :
त्याच पाणीयाचा घेउनी मुलामा
येईल अंबरीं पिवळा चंद्रमा!”
रूपाला स्त्रीत्वाचा स्पर्श नसेल आणि रूपामधून जीवनरस वाहत नसेल, तर त्या अस्तित्वाला काय अर्थ उरतो? आणि, रूपाला स्त्रीत्वाचा आणि जीवनरसाचा स्पर्श झाला की, चैतन्य कितीसे दूर राहते?
आचवल लिहितात - “संगीताचा तरल परिणाम नादाच्या 'वजना'शी निगडित असतो; प्रकाशहि आकाराला असेंच वजन देतो-आणि त्यांतून वस्तूच्या केवल-रूपाचें दर्शन घडवतो. कलावंताची झेप असते ती या ‘केवल’ रूपाकडे. बाकी सगळीं त्याची साधनें.”
पायाची घडी घालून मुरली वाजवत कृष्ण उभा आहे, असे चित्र कित्येक शतके रेखले जात आहे. या चित्राविषयी लिहिताना आचवल म्हणतात - “गोपींना नादी लावणारा लबाड कृष्ण मात्र ‘मुरलीधर’ होतांना पायांची घडी घालतो! बघतांना वाटतें, कुठली मुरली? हे सारे रूपच ‘मुरली’ होऊन गेलें आहे!”
आचवल ‘कृष्ण गोपींना नादी लावतो आहे’ असा शब्दप्रयोग करतात, तेव्हा आपल्याला थोडे खटकते. कारण ‘नादी लावणे’ याचा आधुनिक अर्थ फारसा चांगला नाही. पण आपण थोडा विचार केला की, ‘नादी लावणे’ याचा खरा अर्थ आपल्या लक्षात येतो. आपल्या मुरलीच्या नादात बद्ध करून टाकणे म्हणजे नादी लावणे. आपल्या मुरलीसारख्या अस्तित्वाने मोहित करून टाकणे म्हणजे नादी लावणे. अवघे रूपच नाद होऊन जाते.
गोपी नादातून कृष्णाकडे गेल्या. आचवल रूपाकडून त्यांच्या अगदी नकळत कृष्णाकडे जातात. एका सुंदर घराविषयी लिहिताना आचवल त्यांच्या नकळत रूपाच्या पलीकडे जाताना दिसतात- “(त्या घराच्या) दगडी पायऱ्यांवरील सावल्यांच्या कशिद्यावरून वाळलेल्या पानांचा कुरकुरीतपणा अनुभवीत वर जावें. क्षणभर अंगणातील हिरव्या झुडुपाआडच्या पुतळ्याजवळ थांबावे. मग पुढे जावे आणि बागेतील वृक्षांच्या छायेंत दगडी बैठकीचा गारवा पाठीशी घेत आडवें व्हावे. डोळे मिळावे. क्षणभर डोळ्यांपुढे रंगीबेरंगी त्रिकोण, वर्तुळें नि चांदण्याच्या आकृत्यांच्या लाटा याव्यात. नंतर त्याहि ओसराव्या, आणि शांत व्हावे. मिटलेल्या डोळ्यांपुढे नुसता अथांग निळसरपणा असावा आणि आपण त्या निळसरपणांत तरंगणारें पीस व्हावें.... -असें स्वप्न डोळ्यांपुढे तरंगतें!”
पुलंना या जगातील असुंदराची जाणीव होती, तशीच आचवलांनाही होती. परंतु गंमत अशी की, जाणीव असली तरी असुंदराला या दोघांच्या मानसिक आणि कलात्म जीवनात जीवनात प्रवेश नव्हता. सुनीताबाई या जगातील असुंदराकडे दुर्लक्ष करू शकत नव्हत्या. असुंदर त्यांना अतिशय अस्वस्थ करत होते. या बाबतीत त्यांचे आणि जीएंचे जमत होते. पुल आणि आचवल यांचे जग सुंदर होते. पुलंनी स्वरांच्या कोंदणात आणि आचवलांनी रूपाच्या कोंदणात आपले जग सुरक्षित ठेवले होते. सुनीताबाई आणि जीएंचा तो स्वभाव नव्हता. रूपाच्या या भूलभुलैय्यामध्ये भावना कशा उमलत जातात, याची अतिशय सुरेख जाण आचवलांना होती.
अथांग निळसरपणा आणि पीस, आचवलांच्या अंतर्मनात कळत-नकळत कृष्ण रूपात उतरत असतो. रूपाचे सौंदर्य बघत बघत नकळत आचवल रूपाच्या पार, केवलत्वाकडे जाताना दिसतात. आचवल अनावरपणे रूपांचे अनावर अनुभव घेत होते. त्याचा विचार करताना त्यांच्या मनात जे स्फटिक तयार होत होते, ते त्यांच्या लिखाणात उतरत होते. पुल आणि सुनीताबाईसुद्धा त्या अनुभवांमध्ये आणि त्यांच्या स्फटिकी लिखाणात ओढले जात होते. लिहिता लिहिता आचवल अचानक तत्त्वज्ञान लिहून जातात आणि या विलक्षण खेळात जीएसुद्धा ओढले जातात.
आचवल अचानक लिहून जातात - “वस्तुविश्वाचा कल आपला तोल सांभाळण्याकडे असतो. अनंत अवकाशांत पसरलेल्या ग्रहमालांपासून तो धुळींच्या कणांत सामावलेल्या अणुपरमाणूंपर्यंत! स्वतः मध्ये सामावलेल्या चैतन्यचा जवाब तें सतत शोधीत असतें, आणि तो सापडला की त्या दोहोंच्या संयोगांतून एक 'सचेतन तोला'ची स्थिति निर्माण होते. अशा स्थितीमध्ये स्थिरतेंत, निश्चलतेंत, गतीची जाणीव होत राहते; अचेतन वाटणाऱ्या अवस्थेत चैतन्याचा साक्षात्कार होतो. या स्थितीची जाणीव हा कलांचा आधार.”
आचवलांच्या प्रज्ञेची मुळे एकाच वेळी, तत्त्वज्ञान, अध्यात्म, शास्त्र आणि सौंदर्यशास्त्र या सगळ्या क्षेत्रात खोल गेलेली होती. आचवल वाचत असताना आपल्याही प्रज्ञेचा विस्तार वाढत जातो.
‘किमया’ या आचवलांच्या मुखपृष्ठावर जाळ्यात अडकलेल्या एका सोनेरी मासोळीचे चित्र आहे. रूपाच्या जाळ्यात अडकलेले हे सौंदर्य आहे की, रूपाच्या जाळ्यात अडकलेले चैतन्य आहे? का सौंदर्य म्हणजेच चैतन्य? यातले काहीही असले, तरी या दोघांनाही रूपाचा आधार घ्यावासा वाटतो, ही गोष्ट अगदी खरी आहे!
रूपाचा आधार का घ्यावासा वाटतो यांना? पूर्णत्वाला अपूर्णत्वाचा आधार घ्यावा असं का वाटत असेल? संपूर्ण आयुष्यभर जीए या प्रश्नावर डोके आपटत राहिले. जीए आणि आचवल ही दोन प्रतिभावंतांची विलक्षण मैत्री होती. दोघेही पूर्णत्व आणि अपूर्णत्व यांच्यामधील ‘इंटरफेस’वर आणि शॉपेनहॉवर व श्री अरविंद यांच्यातील सीमारेषेवर राहत होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आचवलांच्या ‘किमया’ या पुस्तकामधील एका प्रकरणाचे नाव आहे ‘विटेवरी उभा’. चैतन्य रूपामध्ये उतरले आहे आणि येऊन विटेवर उभे आहे, रूपामधून चैतन्याला आवाहन करणे म्हणजे कला, असे आचवलांना वाटत राहते. ते लिहितात - “कधी ताजमहाल आपल्या संगमरवरी शुभ्रतेंतून, कमानीच्या लयकारींतून, घुमटाच्या अतिहलक्या भासणाऱ्या आकारांतून स्वतःच्याच सगळ्या प्रचंडतेला, शारीरिक अस्तित्वाला ‘नाकार'तांनाहि एखाद्या केवल भावाचें स्वरूप होतो.”
स्वर आणि रूप यांचे सौंदर्य सांगण्यासाठी पुल आणि आचवल केवळ काही क्षणांसाठी शब्दात उतरून आले. रूप आणि स्वर यांचे सौंदर्य जाणवत असतानाही केवळ भावनेच्या आकर्षणापोटी पूर्णवेळ जीए शब्दांचेच राहिले. आचवल लिहितात - “...रेषा अगदी नादी लावतात. जाळे विणून त्यांत पकडतात आणि मग एखादी रेषा हसतहसतां आडवी होऊन विचारते- तुझ्या या सगळ्या अक्षरब्रह्माच्या मुळाशी तरी कोण आहे, माहीत आहे?”
अक्षराच्या मुळाशी रेषाच असते असे आचवलांचे म्हणणे, तर अक्षराच्या मुळाशी रेषा असली तरी त्या अक्षरांच्या रेषांच्या मुळाशी स्वर असतो, असे पुल म्हणाले असते. या दोघांचे म्हणणे ऐकून जीए मनातल्या मनात म्हणाले असते - ‘तुम्हाला जे म्हणायचे आहे ते म्हणा, पण चैतन्य ज्या क्षणी नियतीने बांधले गेले, त्याक्षणी दुःख तयार झाले, पारतंत्र्य तयार झाले; या सगळ्या चर्चेचे मूळ त्या पारतंत्र्यात म्हणजे नियती मध्ये आहे. आपण दुःख विसरण्यासाठी या सगळ्या मोहात अडकतो.’ जीएंचे मत ऐकायला शॉपेनहॉवर उपस्थित असता, तर त्याने जीएंचा हात प्रेमाने आपल्या हातात घेतला असता.
शॉपेनहॉवरने प्रेमाने जीएंचा हात आपल्या हातात कौतुकाने घेतलेला श्री अरविंद यांनी पाहिला असता, तर श्री अरविंद पुल-आचवलांना म्हणाले असते - ‘अरे, या जीए आणि शॉपेनहॉवरकडे लक्ष देऊ नका. ही दुःखात बुडालेली पोरे आहेत. दुःख हा मायेचा आविष्कार असल्यामुळे त्याच्यापासून दूर जाण्याचा तुमचा प्रवास सुरू ठेवा. अध्यात्म भावनांवर आणि विचारांवर रेंगाळू देत नाही.
रूपामधला आणि स्वरामधला आनंद तुम्ही शोधत आहात. आनंद हे चैतन्याचे मूलभूत लक्षण आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही या जगातील सौंदर्यात आनंद शोधत असता, तेव्हा तुम्ही कळत-नकळत का होईना चैतन्य शोधत असता. हा चैतन्याचा शोध सुरू ठेवा. तुम्हाला कळत नाहिये, पण तुम्ही चैतन्याच्या म्हणा किंवा केवलत्वाच्या म्हणा, फार फार जवळ पोहोचला आहात.’
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पुल आणि आचवल यांनाही काही भावना अनावर होत असणार. ते कुणाला चुकले आहे? पण, या दोघांनीही भावनांवर आरूढ होण्यात थोडे का होईना यश मिळवले होते. विशेषतः पुलंनी! आचवल स्त्रीच्या सौंदर्याने आणि स्त्रीबद्दल वाटणाऱ्या प्रेमाच्या आवेगाने घायाळ होत राहिले, ही वेगळी गोष्ट! परंतु, जीए आणि सुनीता यांचे सारे आयुष्य भावनांनी घायाळ होण्यात गेले. कारण या दोघांच्या वाट्याला जीवघेणी भावनिक संवेदनशीलता आली होती. या अति-तीव्र भावना या जगात कुठेही संवादी होऊ शकत नव्हत्या. दोघांनाही ‘जिव्हाळघरटी’ हवीशी वाटत होती, पण अशी त्यांना मिळाली, तरी या दोघांना हवे होते, तसे जिव्हाळ्याचे पूर्णत्व मिळत नव्हते.
पूर्णतेच्या शोधासाठी पुलंना संगीतातील सौंदर्य पुरेसे वाटत असावे. आचवलांसाठी रेषा, अवकाश आणि स्त्रीचे सौंदर्य ही शोधाची मुख्य माध्यमे होती. जीए आणि सुनीता यांना स्वर आणि रेषा मोहवीत होते, त्यातले सौंदर्य मोहवीत होते, पण त्यांना त्यांच्या शोधासाठी ते पुरेसे वाटत नव्हते. जीवघेण्या भावनांचा ठाव घेण्यासाठी, शब्दांसारखे ऐसपैस माध्यम त्यांना आवश्यक वाटत होते. असे वाटते की, आपल्या जीवघेण्या भावना या दोघांनाही एकदाच्या व्यक्त करायच्या होत्या आणि त्यातून सुटायचे होते.
पुल आणि आचवल यांचीही शब्दांवर हुकूमत होती. कुणालाही आश्चर्य वाटावे, अशी हुकूमत होती. शब्द दोघांनाही प्रसन्न होते. शब्दांचे वर्म पुल आणि आचवल यांना माहीत होते. पुल आणि आचवल यांनी शब्दांबरोबर ‘रोमान्स’ केला, असे म्हणता येईल, पण सुनीताबाई आणि जीए यांना शब्दांच्या ठाई असलेले जीवघेणे मर्म प्रतीत होत होते.
पुलंकडून आचवल यांच्याकडे येताना समाधानाकडून समाधानाच्या तीव्र शोधाकडे आपण येतो. आचवलांकडून जीए आणि सुनीता यांच्याकडे येताना आपण समाधानाच्या तीव्र शोधाकडून अत्यंत आदर्शवादी अशा भावनिक असमाधानाकडे येतो. शेवटी आदर्शवाद म्हणजे तरी काय, पूर्णत्वाची आसच ना?
आचवल, रेषांचे भावनांशी असलेले नाते नाते रेखाटतात. चैतन्य, सौंदर्य, मांगल्य आणि प्रेम यांचे नाते रेखाटतात. इंदिरा संतांनी म्हटलंय-
“अजंठ्याच्या कलाकाराची
विसरून राहिलेली
एक पुसट रेषा
माझ्या रक्तांतून वाहत आहे...”
.................................................................................................................................................................
लेखांक : एक - सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : पु. ल. देशपांडे, माधव आचवल आणि जी. ए. कुलकर्णी
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment