सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : पुलंसाठी संगीत हा पूर्णत्वाचा शोध होता, तो अनुभव सुनीताबाईंना शक्य नव्हता. त्यामुळे त्या कवितेकडे ओढल्या गेल्या (लेखांक  : दुसरा)
दीपावली २०२३ - लेख
श्रीनिवास जोशी
  • पु. ल. देशपांडे, जी. ए. कुलकर्णी, माधव आचवल आणि सुनीता देशपांडे
  • Sat , 11 November 2023
  • दीपावली २०२३ लेख सुनीता देशपांडे Sunita Deshpande माधव आचवल Madhav Achaval जी. ए. कुलकर्णी G.A. Kulkarni पु. ल. देशपांडे P. L. Deshpande

जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपण अपूर्ण आहोत, असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकाचा पूर्णत्वाचा शोध सुरू असतो. कुणाला वाटतं, पैसा मिळाला की, आपल्याला पूर्णत्व येईल. कुणाला वाटतं, सत्ता मिळाली की... कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर नाती, तर कुणाला अजून काही...

या जगातील बहुतेक लोक लौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधत असतात.

याउलट, पु.ल. देशपांडे, माधव आचवल, जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यासारखे संवेदनशील कलावंत अलौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधताना दिसतात. हा शोध वेगवेगळे मार्ग चोखाळतो, वेगवेगळे रंग धारण करतो, वेगवेगळी वळणं घेतो… कधी स्वर, कधी रूप, तर कधी शब्द! कधी कलेच्या अंगानं, तर कधी तत्त्वज्ञानाच्या!... कधी बुद्धिप्रामाण्याच्या, तर कधी अध्यात्माच्या!

या शोधामुळे सगळ्या संवेदनशील कलाकारांची आयुष्यं झळाळून जातात. या शोधाला नेहमीच स्त्री-पुरुष मैत्रीची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. कारण तत्त्वज्ञान आणि कला यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये कळत-नकळत पूर्णत्व शोधत असतात.

पुल, आचवल आणि जीए या तीन निर्माणकर्त्यांच्या प्रतिभेवर सुनीताबाई रुंजी घालत राहिल्या आणि त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाच्या साक्षीदार व एक रसिक मैत्रीण बनून राहिल्या. या चार प्रतिभावंतांची मैत्री कलेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या प्रांगणात बहरली. पुल - सुनीता, आचवल - सुनीता आणि जीए - सुनीता यांच्यातील मैत्री विलक्षण होती.

या मैत्रीच्या कल्लोळात या सगळ्यांकडून त्यांच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल, कलेबद्दल आणि तत्त्वज्ञानाबद्दल जे काही लिहिले गेले, ती संवेदनशील मानवी आयुष्याची एक धडकती दास्तान आहे...

.................................................................................................................................................................

लेखांक  : दुसरा

पुल, आचवल आणि जीए या तीन मित्रांकडे दैवी देणग्या होत्या. सुनीताबाईंना त्याची अत्यंत सुंदर जाणीव होती. हे तिघेही आपापल्या व्यासंगाच्या महालात राहत होते. त्या ऐश्वर्याचे सुनीताबाईंना अप्रूप होते.

पुल गेल्यानंतर सुनीताबाईंनी त्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांना पुलंचा नक्की कसला मोह पडला होता आणि अजूनही पडलेला आहे, हे अतिशय सुंदर शब्दांत लिहिले आहे. त्यात पुलंना मिळालेला आनंदाचा दैवी ठेवा, त्यांचे जन्मजात सुसंकृतपण, जीवनावरचे प्रेम, त्यांच्या बोटांमधील आणि कंठामधील संगीताची जादू अशा कितीतरी दैवी गोष्टी होत्या!

पुल, आचवल आणि जीए या तिघांच्या व्यासंगाचा अंदाज घेणे, म्हणजे सुनीताबाईंच्या या तिघांशी असलेल्या मैत्रीचा अंदाज घेणे, हे आपण पहिल्या लेखांकामध्ये पाहिले. यात आपण पुलंसाठी संगीत म्हणजे नक्की काय होते, हे त्यांच्याच शब्दांत पाहूया.

पहिल्या लेखांकाच्या शेवटी आपण शॉपेनहॉवरचे आणि श्री अरविंद यांचेही कलेबद्दलचे मत पाहिले. शॉपेनहॉवरसाठी कला म्हणजे या जगात अध्याहृत असलेल्या अस्वस्थतेपासून दूर जाण्याचा एक मार्ग होता. भ्रष्ट, दुःखपूर्ण आणि अस्वस्थ जगाच्या वाळवंटातील कला हे एक ‘ओअॅसिस’ होते. अरविंद यांच्यासाठी कला मानवी आत्म्याची एक अंगभूत आनंदप्रेरणा होती.

शॉपेनहॉवर आणि अरविंद या दोघांचेही कलेचे तत्त्वज्ञान पुलंच्या संगीतावरच्या लिखाणातून प्रतीत होताना दिसते. शॉपेनहॉवर आणि अरविंद यांनी जे जाणतेपणाने जाणले होते, ते पुलंनी कळत-नकळत आणि उत्स्फूर्तपणे जाणले होते.

शॉपेनहॉवर आणि अरविंद यांनी जशी तत्त्वज्ञानाची उपासना केली होती, तशीच पुलंनी संगीताची. ती सुनीताबाईंनी जन्मभर पाहिली होती. संगीताची उपासना करणाऱ्या पुलंची असंख्य मनोहर रूपे त्यांनी आपल्या मनाच्या कोषात साठवून ठेवली होती. पख्वाजाच्या कडकडीत पर्णावर जीव ओवाळून टाकणारे पुल, वसंतराव देशपांडे यांच्या फुललेल्या पलाशपुष्पांसारख्या गायकीला तसल्याच तेजाळ शब्दांमध्ये लेख लिहून दाद देणारे पुल, मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या गायकीमधल्या श्रीमंत मुक्ततेचा आदर करणारे पुल, कुमार गंधर्वांच्या गायकीतील दैवी अंशाला आपल्या शब्दांनी स्पर्श करू पाहणारे पुल... अशी कितीतरी रूपं!

अख्तरीबाईंचा स्वर, विलायत खाँची आर्तता, बालगंधर्वांची साक्षात सरस्वती देवीने जन्माला घातलेली तान, अशा कितीतरी गोष्टी सुनीताबाईंनी पुलंच्या साथीमध्ये समजून घ्यायचा प्रयत्न केला होता.

अशा पुलंनी सुनीताबाईंना आपल्या जीवनाची ‘स्वामिनी’ बनवलेले होते. आपल्या आयुष्याची सारी सूत्रे त्यांच्या हाती बहाल केलेली होती. बाई त्यामध्ये आपल्या अंतर्यामीच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तृप्तसुद्धा होत्या.

पुल संगीताच्या आनंदाच्या समुद्रात राहत होते. त्यांना त्या महान दुनियेत प्रवेश होता. तिथे या जमिनीवरच्या भ्रष्ट दुनियेला आणि दुःखांना प्रवेश नव्हता. तसं बघायला गेलं, तर संगीत बहुतांश लोकांना आवडतं, परंतु खरं स्वरज्ञान असणं आणि शास्त्रीय संगीताचं खरं ऐश्वर्य कळणं, या फार दुर्मीळ गोष्टी आहेत.

पुल समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्या विनोदापेक्षा आणि अभिनय वगैरे कलांपेक्षा त्यांच्या संगीतप्रेमाकडे जावे लागते. सुनीताबाईंना याची पूर्ण जाण होती. त्या लिहितात, “संगीत हा भाईचा प्राण होता”.

या दुनियेतील दुःखे, दुष्टता, भ्रष्टाचार, अन्याय आणि एकंदर मूल्यनाश यांना तसे काही औषध नसते, हे काही माणसांनी ओळखलेले असते. या जगातील सौंदर्याची पूजा हेच या सगळ्यावर उत्तर असते. अर्थात वैयक्तिक पातळीवर! या गोष्टींपासून स्वतःला वाचवणे हासुद्धा एक मोठा उद्योग असतो. सुनीताबाईंमध्ये या गोष्टींशी लढण्याची खुमखुमी होती. स्वातंत्र्ययुद्धात भाग घेणे, मालेगावला आदिवासी मुलांच्या शाळेत शिकवायला जाणे, असे अनेक प्रकार त्यांनी मन लावून केले.

पुलंचा हा रस्ता नव्हता. संगीत हा पुलंसाठी भ्रष्ट आणि अस्वस्थ जगापासूचा एक सुंदर आसरा कसा होता. त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांच्यावर आणि एकंदरीतच संगीतावर जे लिखाण केले आहे, त्यातून हा मार्ग आपल्या लक्षात येतो. ‘संगीत म्हणजेच पावित्र्य’. त्यामुळे संगीत आणि या जगतातील भ्रष्टाचार वगैरे क्षुद्र गोष्टी एकत्र जाऊ शकत नाहीत, अशी ही धारणा होती. त्यांचा मल्लिकार्जुन मन्सूर यांच्यावरील लेख वाचताना ही गोष्ट जास्त प्रखरपणे लक्षात येते. मन्सूर यांच्या समोर एका भ्रष्ट माणसाचे नाव निघाल्यावर काय झाले, हे पुलंनी फार सुंदर लिहिले आहे.

पुल लिहितात - “अण्णा एकदम तडकून म्हणाले, “शीः शीः! अहो, इथं तंबोरे जुळले आहेत —असल्या भ्रष्ट माणसाचं नाव घेऊ नका हो. त्यांनी कधी सुरांचा आनंद घेतलाय काय? अहो, आम्ही त्यांच्याशी बोलणं ही आम्हांला लाज आणणारी गोष्ट आहे! गाणं जाऊ द्या, जो विषय शिकवतात, त्यात जरी ते रमले असते तरी माणूस झाले असते! कुत्र्यात आणि ह्यांच्यात काय फरक हो?… अण्णा एकदम अशा त्वेषाने बोलत होते की, पूर्वीचे ऋषी सात्त्विक संतापाने कसे उफाळत असतील त्याचे दर्शन झाले! मी हळूच तंबोऱ्यावरच्या शिष्यांना खूण केली. तंबोऱ्यांचे गुंजन सुरू झाले. आणि यमनाच्या सुरांनी वातावरण प्रसन्न होऊन गेले. गाणारा माणूस पुन्हा आपल्या सुखाचिया माहेरा गेला. किनाऱ्यावरची आगबोट समुद्रात जायला लागल्यावर बाहेरची दुनिया दूरदूर तशी त्या खोलीबाहेरची दुनिया आस्ते आस्ते दूर जायला लागली. आतल्या दुनियेत आम्ही होतो, तो गाणारा माणूस होता आणि तो यमनरागाचा महासागर होता!”

सौंदर्याच्या आसमंतात स्वतःला विसरून जाणे, ही गोष्ट अनेक लोक ऐकून असतात, पण त्यावर बहुतेक लोकांचा विश्वास नसतो. कारण त्यासाठी सुरांच्या, चित्रांच्या किंवा शिल्पकलेच्या किंवा साहित्याच्या सौंदर्याच्या दुनियेत प्रवेश झालेला असावा लागतो. या विश्वात फार कमी लोकांना हा प्रवेश नियतीने दिलेला असतो. ज्या त्या क्षेत्रातील सौंदर्य हृदयात येऊन वस्तीला राहावे, अशी संवेदनशीलता त्या त्या क्षेत्रांतील कलाकारांना आणि अव्वल दर्जाच्या रसिकांना दिली गेलेली असते.

सुरांच्या आगबोटीतून, यमन रागाच्या सुरांच्या महासागरात मन्सूरअण्णांबरोबर निघून जायला लागणारी सांगितिक प्रतिभा पुलंना मिळालेली होती! या जगाकडून आपल्यावर अनेक अन्याय होतात. त्यापासून दूर जाण्याचा एक मार्ग म्हणजे संगीत. त्याच्या तपस्येमधे रमून गेल्यामुळे मान-अपमान आणि यशापयश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लोकांना राहता आले.

आयुष्याच्या उतरणीला लागेपर्यंत वसंतराव देशपांड्यांना संगीत क्षेत्रात मानाचे स्थान दिले गेले नव्हते. वसंतरावांना त्याची फिकिर नव्हती. त्याबाबत पुल लिहितात - “पहिल्या दर्जाच्या मैफिलीत त्याला अजून स्थान नाही ह्याची आम्हांलाच खंत; वसंतराव संपूर्ण उदासीन! एकदा ह्या बाबतीत तो सुरेख बोलला, ‘अरे भाई, मान मान क्या बात हैं! सुरांची दौलत गळ्यात असल्यावर गळ्याबाहेर नाही पडला हार म्हणून बिघडलं कुठे?’ ” या जगातील पावित्र्य आणि मांगल्य, मान आणि सन्मान, यश आणि अपयश जे काही असेल, ते सौंदर्यपूर्ण सुरांच्या संदर्भात! सुरांच्या पलीकडे काहीच नाही!

जीवनातील नकारात्मक गोष्टींना संगीत दूर ठेवत होतेच, पण काव्य-शास्त्र-विनोद करण्यासाठीसुद्धा संगीताचे माध्यम हे लोक वापरत होते. जीवनातील उत्सव संगीतातूनच साजरे केले जात होते.

वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेखात पुढे पुल म्हणतात - “विडंबन हा जसा एक साहित्यप्रकार मानला जातो, तसा संगीतातही एक मानला गेलेला प्रकार असता, तर साहित्यात आचार्य अत्र्यांचे जे विडंबनकार म्हणून स्थान आहे, ते संगीतात वसंताला द्यायला हरकत नव्हती. गळ्याला संगीतातले मनाला येतील ते चमत्कार निर्माण करायची- देणगी लाभली होती; त्यामुळे अनेक गायकांच्या गाण्याची तो व्यंगचित्रासारखी गायकीतून व्यंग-गानचित्रे काढायचा.”

जीवनातील उत्सव आणि विनोदन ही त्यामानाने एक साधी गोष्ट झाली, पण मस्तवाल तारुण्यसुद्धा पुलंना संगीतातूनच भेटायला येत होते. किंबहुना संगीत हे पुलंसाठी चिरंतन तारुण्यच होते.

वसंतरावांबद्दल पुल पुढे लिहितात - “वसंताची गायकी परंपरेच्या पालखीतून संथपणाने मिरवीत जाणारी नाही. दऱ्या-खोऱ्यांतून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पाहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी. वसंताचे गाणे ऐकताना ती दूर सरलेली जवानी पुन्हा आपल्याला शोधीत येते.”

संगीत ही पुलंची पॅशन होती. ते त्यांच्या अंतरंगाने त्यांच्या कळत-नकळत साधलेले अध्यात्म होते. ते हे सगळे अनुभव इतक्या समर्थपणे सांगू शकले, कारण त्यांना स्वरांबरोबरच शब्दसुद्धा प्रसन्न होते. सुनीताबाईंकडे फक्त शब्द होते. त्यांना संगीत आवडत असले, तरी स्वरांच्या दिव्यत्वाशी त्यांचा संवाद होऊ शकत नव्हता. पूर्णत्वाचा ओझरता का होईना स्पर्श आपल्याला होतो आहे, असे पुलंना वाटत होते, तो अनुभव सुनीताबाईंना शक्य नव्हता. या सगळ्यामुळे सुनीताबाई कवितेकडे जास्त ओढल्या गेल्या. याच कारणासाठी त्या, काव्यात्म कथेमधून तत्त्वज्ञान लिहिण्याची किमया साधणाऱ्या जीएंच्या प्रतिभेकडे ओढल्या गेल्या. या जगातील रूपाचे सौंदर्य शब्दांमध्ये बांधण्याची हुनर माधव आचवलांकडे होती. त्यामुळे सुनीताबाईंची आचवलांशीही अत्यंत सुंदर मैत्री झाली.

याच्याही पुढे जाऊन म्हणता येईल की, पुलंसाठी संगीत म्हणजे नुसतेच तारुण्यच नव्हते. संगीत हा त्यांच्यासाठी एक जीवंत रोमान्ससुद्धा होता. सनातन रोमान्स…कधीही न संपणारा!

पुल लिहितात - “तंबोरे जुळत येत असताना ती मजा घेत बसणे हा एक फार मोठा आनंद आहे… जुळत येणारा तंबोरा ऐकणे हे प्रसाधनात गुंग झालेल्या युवतीला पाहण्यासारखे आल्हाददायक आहे… कुंद बोलणाऱ्या तंबोऱ्याच्या तारांवर जव्हार बोलायला लागली म्हणजे होतो. तो स्वर आता गायकाच्या गळ्यातून बाहेर केव्हा येतो याची उत्कंठा लागते. प्रसाधन संपल्यावर ती सौंदर्यवती आता आपल्याकडे पाहून प्रसन्न स्मिताची मेहेरबानी केव्हा करील, या उत्कंठेसारखीच ही पहिल्या षड्ज-मिलनाची उत्कंठा! त्या पहिल्या षड्जातच पहिल्या स्मितासारखे समोरच्या माणसाला जिंकण्याचे सामर्थ्य एकवटलेले असते… पहिल्या षड्जातच जे आपल्याला समोर ऋणायित करून गाणे ऐकायला बसवतात, त्या श्रेष्ठ गायकांतले मल्लिकार्जुन मन्सूर हे एक गायक आहेत, जव्हारीदार षड्जात मिसळणारा त्यांचा तो पहिला षडून ऐकायचे भाग्य गेली पस्तीस-छत्तीस वर्षे मला लाभले आहे. हा षड्ज सतत त्यांच्या हृद्वीणेवर वाजत असतो. किंबहुना, ती वीणा म्हणजेच मल्लिकार्जुन मन्सूर.”

हे जग फार सुंदर आहे आणि तरीही इथल्या दुष्टपणासारख्या अनेक गोष्टी माणसाला अस्वस्थ करत असतात. या जगात आपण नक्की काय करायचे? सौंदर्याची उपासना करायची की, वाईटाचा सामना करायचा? याचे उत्तर असे आहे की, ज्याने त्याने आपली अंतःप्रेरणा आपल्याला जे सांगेल, ते करायचे! जगाशी भांडण मांडून बसणे किती लोकांना शक्य होते?

सुनीताबाई त्यातल्या होत्या. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बॉम्ब वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला. मोर्चे काढले, भूमिगत वगैरे झाल्या. पुढे आदिवासी शिक्षण वगैरेंमध्ये भाग घेतला. नंतर त्या दमून गेल्या. पुल, आचवल आणि जीए या प्रकारातील नव्हते. या तिघांचा रोमान्स या जगातील सौंदर्याचा वेध हाच होता! त्यांची सौंदर्य ही राहण्याची जागा होती. सामान्य लोक सुंदर सुंदर महालांमध्ये राहतात, हे प्रतिभावंत साक्षात सौंदर्याच्या म्हणजे सौंदर्यतत्त्वाच्या महालांमध्ये राहत होते!

सुनीताबाईंकडे भावनांची विलक्षण तीव्रता होती. या तीव्रतेला पुलंनी जीवनभर संवादी करून घेतले. सुनीताबाईंनी पुलंना जसे सांभाळून घेतले, तसेच पुलंनीही सुनीताबाईंना सांभाळून आणि त्यांच्यामधले विसंवादी सूर संवादी करून घेतले. सुनीताबाईंची धडपड पूर्णत्वाच्या भावनेसाठीची होती. ती पूर्णता त्या खूप वर्षे पुलंमध्ये शोधत होत्या. पुलंनी आपल्याला, आपल्या प्रेमाला समजून घ्यावे असे त्यांना वाटत होते. पुलंनीही आपल्या आयुष्यात सुनीताबाईंचे व्यक्तिमत्त्व अनेक वेळा सेलिब्रेट केले आहे. त्यांना जागोजागी मनसोक्त दादसुद्धा दिली आहे. उदा. ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकातील डॉ. सतीशने केलेले प्रेयसी उषाचे वर्णन पहा- “कधी गौरीसारखी अल्लड, तर कधी गौरीसारखी प्रेमळ, कधी पार्वतीसारखी निग्रही, तर कधी साक्षात महिषासुर मर्दिनी”. हे वर्णन करताना पुलंच्या डोळ्यासमोर सुनीताबाईच होत्या. परंतु तरीही सुनीताबाईंना कुठेतरी, काहीतरी कमतरता राहून जात आहे, असे वाटत होते.

पुलंनी ‘गुण गाईन आवडी’मध्ये मन्सुरांवर ‘एक गाण्यात राहणारा माणूस’ हा लेख लिहिला आहे. त्यात पुल म्हणतात - “मल्लिकार्जुन मन्सूर हा एक गाण्यात राहणारा माणूस आहे. तसा त्यांचा टपाली पत्ता ‘मृत्युंजय बंगला, धारवाड’ असा आहे. पण अण्णांचे वास्तव्य गाण्यात. सकाळी ते तोडी- आसावरीत राहतात. दुपारी सारंगाच्या छायेत असतात. संध्याकाळी पूरिया- मारव्यांच्या ओसरीवर येऊन बसतात, आणि रात्री यमन - भूप- बागेश्रीच्या महालात असतात.”

आपल्याला या जगात कुठेतरी राहावे लागते. जगाशी दोन हात करावे लागतात, पण आपले मन मुख्यत्वेकरून कुठे राहायला गेलेले असते, हे महत्त्वाचे असते.

पुलंकडे एक सुंदर ‘भावनिक समतोल’ (‘इमोशनल बॅलन्स’) होता. त्यातच ते संपूर्ण आयुष्यभर राहिले. या सुंदर सामंजस्याचा उगम त्यांच्या संगीतसाधनेत होता. कुठल्या भावना कुठल्या परिस्थितीत संवादी आहेत आणि कुठल्या परिस्थितीत कुठल्या भावना विसंवादी आहेत, याची फार सुंदर जाण त्यांना होती.

पुलंच्या शांत-सुंदर मनोभूमीवर भावनेने आर्द्र झालेल्या सुरांची सतत शिंपण होत राहिली होती. पुल लिहितात - “खूप गवई गातात-तयार गातात, पण त्यांच्या गळ्यातला सूर भिजलेला नसतो. रसिकाला स्वरपानाचा आनंद देत नाहीत ते सूर. ‘दया छाया घे’ म्हणताना बालगंधर्व जे काळजाचे पाणी करीत त्याला कारण स्वरातली ती आर्द्रता, ते आर्जव. असले गायक ऐकणाऱ्याच्या मनोभूमीवर सूर शिंपीत जातात! कसल्याही दानात या भिजले- पणाला खूप महत्त्व आहे. सुरांचा भिजलेपणा हे अण्णांच्या सुरांचे लक्षणीय वैशिष्टय आहे. सुरांचे खजिने असणारे गायक आहेत. अण्णांकडे सुरांचे झरे आहेत. ते सतत आत वाहतच असतात.”

पुलंना हे सर्व जाणवत होते कारण ते स्वतःसुद्धा तसेच होते. भावनांची सुंदर आर्द्रता पुलंवर आसक्त होती. त्यामुळेच जीवनात कुठलाही आवर्त आला तरी पुल भावनिक समतोलाच्या समेवर अलगदपणे स्थिरावताना दिसतात.

सुनीताबाईंकडे भावनांची विलक्षण तीव्रता होती. या तीव्रतेला पुलंनी जीवनभर संवादी करून घेतले. सुनीताबाईंनी पुलंना जसे सांभाळून घेतले, तसेच पुलंनीही सुनीताबाईंना सांभाळून आणि त्यांच्यामधले विसंवादी सूर संवादी करून घेतले.

जगाशी भांडण मांडून बसणे किती लोकांना शक्य होते? सुनीताबाई त्यातल्या होत्या. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बॉम्ब वगैरे बनवण्याचा प्रयत्न केला. मोर्चे काढले, भूमिगत वगैरे झाल्या. पुढे आदिवासी शिक्षण वगैरेंमध्ये भाग घेतला. नंतर त्या दमून गेल्या. पुल, आचवल आणि जीए या प्रकारातील नव्हते. या तिघांचा रोमान्स या जगातील सौंदर्याचा वेध हाच होता! त्यांची सौंदर्य ही राहण्याची जागा होती. सामान्य लोक सुंदर सुंदर महालांमध्ये राहतात, हे प्रतिभावंत साक्षात सौंदर्याच्या म्हणजे सौंदर्यतत्त्वाच्या महालांमध्ये राहत होते!

सुनीताबाईंची धडपड पूर्णत्वाच्या भावनेसाठीची होती. ती पूर्णता त्या खूप वर्षे पुलंमध्ये शोधत होत्या. पुलंनी आपल्याला, आपल्या प्रेमाला समजून घ्यावे असे त्यांना वाटत होते. पुलंनीही आपल्या आयुष्यात सुनीताबाईंचे व्यक्तिमत्त्व अनेक वेळा सेलिब्रेट केले आहे. त्यांना जागोजागी मनसोक्त दादसुद्धा दिली आहे. उदा. ‘तुझे आहे तुझपाशी’ या नाटकातील डॉ. सतीशने केलेले प्रेयसी उषाचे वर्णन पहा- “कधी गौरीसारखी अल्लड, तर कधी गौरीसारखी प्रेमळ, कधी पार्वतीसारखी निग्रही, तर कधी साक्षात महिषासुर मर्दिनी”.

हे वर्णन करताना पुलंच्या डोळ्यासमोर सुनीताबाईच होत्या. परंतु तरीही सुनीताबाईंना कुठेतरी, काहीतरी कमतरता राहून जात आहे, असे वाटत होते. या जगातील बहुतेक स्त्रियांना असेच वाटत राहते. सुनीताबाई पुलंमध्ये आणि त्यांच्यासाठी मांडलेल्या संसारामध्ये मग्न होत्या. संसारातील प्रत्येक क्षणाला त्यांना पुलंची साथ हवी होती, त्यांचा हात आपल्या हातात हवा होता. पण गंमत अशी की, पुल क्षणोक्षणी कलेत आणि मुख्यत्वेकरून संगीतात मग्न होते. त्यांना त्यांची पूर्तता संगीताच्या सौंदर्यामध्ये खुणावत होती. या तपस्येतून एका बाजूला पुल स्वतःला संपृक्त करून घेत होते आणि दुसऱ्या बाजूला संगीत परंपरेचा ठावसुद्धा घेत होते.

कुमार गंधर्व गात असताना आपल्या गळ्यातून गात नसून खूप ‘आतून’ गात आहेत, असं वाटत राहतं. कुमारांचं हे आतलं गाणं पुलंसारखे जाणकार श्रोते ‘आतून’ ऐकत होते. कुमार गंधर्वांनी साठ वर्षे पूर्ण केली, तेव्हा एक कार्यक्रम केला गेला. त्यातील भाषणात पुल म्हणतात - “तुकारामांनी म्हटलंय, ‘आम्ही वैकुंठवासी, आलो याच कारणाशी, बोलले जे ऋषी, साचभावे वर्ताया.’ ...कुमारांसारख्याचं गाणं ऐकताना ते आतून ऐकल्यासारखं आम्हाला वाटतं. भारतीय संगीताची ज्यांनी स्थापना केली… त्यांना जे काही म्हणायचं होतं, ते साचभावे सांगण्यासाठी कुमार गंधर्व आलेला आहे…”

एका बाजूला कुमार आतून गात होते आणि त्याच वेळी भारतीय संगीताच्या परंपरच्या आतल्या अर्थांवर आपल्या प्रतिभेचा प्रकाश टाकत होते. पुलंसारखे जाणकार ते सगळे विलक्षण नाट्य कृतार्थ होऊन पाहत होते. त्या विलक्षण आनंदाच्या समुद्राच्या सफरीवर या जगाला विसरून निघून जात होते.

संगीत हा पुलंसाठी भ्रष्ट आणि अस्वस्थ जगापासूचा एक सुंदर आसरा कसा होता. त्यांनी मल्लिकार्जुन मन्सूर, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व यांच्यावर आणि एकंदरीतच संगीतावर जे लिखाण केले आहे, त्यातून हा मार्ग आपल्या लक्षात येतो. ‘संगीत म्हणजेच पावित्र्य’. त्यामुळे संगीत आणि या जगतातील भ्रष्टाचार वगैरे क्षुद्र गोष्टी एकत्र जाऊ शकत नाहीत, अशी ही धारणा होती.

पुलंची संगीत यात्रा समजून घेताना शॉपेनहॉवर आपल्याला इथपर्यंत साथ करतो. इथून पुढच्या भागात श्री अरविंद यांच्या तत्त्वज्ञानच्या प्रकाशात पुलंची संगीत यात्रा समजून घ्यावी लागते.

‘मी अश्रद्ध आहे’, असे पुलंनी अनेक ठिकाणी म्हटलेले आहे, परंतु, संगीतावरील लिखाणात पुल अनंतात विलीन होण्याबद्दल बोलताना दिसतात.

भास्करबुवा बखले हे विलक्षण गायक होते. त्यांची कीर्ती सगळ्यांनीच ऐकलेली आहे. त्यांच्यावर ‘गुण गाईन आवडी’मध्ये लिहिलेल्या पुल म्हणतात - “गोपाळ गायन समाजाचे गोविंद काका देसाई म्हणाले होते - ‘भास्करबुवांचे गायन ऐकून घमेंड, दुष्टपणा, हेवा, ईर्ष्या, निंदा इत्यादी विकार नाहीसे होत’.”

याच लेखात पुढे पुल संगीतामुळे तयार होणाऱ्या अशाच अनुभवाविषयी केशवसुत आपल्या ‘सतारीचे बोल’ या कवितेत काय लिहितात हे सांगतात- “ ‘सतारीचे बोल’ ऐकून केशवसुतांनीही सारे ममत्व, सारे अहंकार गळलेल्या अवस्थेचे वर्णन केले आहे.

तों मज गमलें विभूति माझी

स्फुरत पसरली विश्वामाजी

दिक्कालांसहि अतीत झालों;

उगमीं विलयीं अनन्त उरलों;”

…केशवसुतांनी सांगितलेलेच गोविंदकाका देसायांनी साध्या शब्दांत सांगितले आहे. चांगल्या कलेच्या साक्षात्काराने अशी भावावस्था होणे मुळीच अशक्य नाही. इथली सारी नाती सुटली असे वाटते-उच्च आनंदाच्या क्षणी एकच भावना उरते; ती म्हणजे त्या क्षणी अनंतात विलीन होऊ जाण्याची. भास्करबुवांच्या गाण्याच्या परिणामाविषयी लिहिताना एकानेच नव्हे, तर कितीतरी श्रोत्यांनी ‘अश्रुधारा वाहू लागत’ असे वर्णन केले आहे. ‘रडू फुटणारे कसले हे गाणे!’ असे  म्हणत गेलेल्या शिल्पकार फडक्यांनाही आपले अश्रू आवरेनात… मैफिलीत एखाद्या क्षणी असा रंग जमून जातो की, ऐकणाऱ्याच्याच काय गाणाऱ्या किंवा वाजवणाऱ्या कलावंताच्या डोळ्यांत त्याला कळण्यापूर्वी अश्रू तरारतात. कित्येकदा तंबोऱ्याची जोडी अशी जमते की, सुरांचे ते अलौकिक अद्वैत डोळ्यांत यावेळी स्वतःचे मर्मस्थान पकडतात.”

इथे हे संगीतप्रेमी सुरांच्या शुद्धतेमध्ये अनंत म्हणजेच पूर्णत्व शोधत होते. त्याची स्पष्ट जाणीव या सगळ्यांना होतीच, असे म्हणता येणार नाही, पण अत्यंत शुद्ध, सुंदर आणि अद्भुत असे काहीतरी अनुभवाला येत आहे, असे त्यांना नक्कीच वाटत होते, असे म्हणायला जागा आहे. नाहीतर जेव्हा जेव्हा अतीव सौंदर्याचा अनुभव येतो, तेव्हा तेव्हा मानवाच्या डोळ्यात अश्रू का उभे राहावेत?

या जगाची अपूर्णता विसरण्याचा असा अनुभव ही पुल, मन्सूर, वसंतराव आणि कुमार यांच्यासाठी एक विलक्षण सुंदर नशा होऊन गेली होती. सतत सुरांमध्ये राहणे हा त्यांचा स्वधर्म आणि या सुरांच्या सौंदर्यात राहणे, ही त्यांची तपस्या बनून गेली होती. 

पुल लिहितात, “अण्णांना सुरांची मायाच अशी काही अलौकिक जडली आहे की, त्यांचा क्षणभर विरह त्यांना सहन होत नसावा… स्वरांचे गुंजन कुठे तुटत म्हणून नाही. पाण्याच्या कारंजासारख्या त्या सुरांच्या लीला. धार नाचत असते, तुटत नाही. त्या नर्तनातले सामर्थ्य ओसरत नाही. उलट वाढत्या तपस्येच्या तेजाने त्या पाण्याला आता तीर्थाचे स्वरूप लाभले आहे.”

पुल संगीताच्या आनंदाच्या समुद्रात राहत होते. त्यांना त्या महान दुनियेत प्रवेश होता. तिथे या जमिनीवरच्या भ्रष्ट दुनियेला आणि दुःखांना प्रवेश नव्हता. तसं बघायला गेलं, तर संगीत बहुतांश लोकांना आवडतं, परंतु खरं स्वरज्ञान असणं आणि शास्त्रीय संगीताचं खरं ऐश्वर्य कळणं, या फार दुर्मीळ गोष्टी आहेत. पुल समजून घ्यायचे असतील, तर त्यांच्या विनोदापेक्षा आणि अभिनय वगैरे कलांपेक्षा त्यांच्या संगीतप्रेमाकडे जावे लागते. सुनीताबाईंना याची पूर्ण जाण होती.

कुमार, वसंतराव आणि पुल या तिघांचीही अवस्था फार काही वेगळी नव्हती. सूर हीच साधना, सूर हीच तपस्या! पु ल लिहितात - “शुद्ध कल्याणाविषयी बोलताना कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, ‘भूप गाताना कुणा मोठ्या गायकाला ‘अरे, जरा मलाही आत घ्या,’ म्हणून विनवणी करणारा शुद्ध मध्यम दिसला असेल आणि त्याने त्याला 'बस' म्हणून जराशी जागा दिली!’ तसेच अण्णाही चिजेतले संकोचाने मागे राहिलेले सौंदर्य पाहतात आणि त्या सुंदरतेला आवाहन करतात.”

अशा तपस्येमुळे या सगळ्यांच्या सौंदर्यदृष्टीला निखार येत गेला आणि सौंदर्यदृष्टीला निखार येत गेल्याने तपस्येला प्रगाढ खोली प्राप्त होत गेली. या तपस्येमधे रमून गेल्यामुळे मान-अपमान आणि यशापयश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या लोकांना राहता आले.

एका चांगल्या गायकात ऐकण्यासारखे काय आहे, असे वसंतरावांना विचारल्यावर वसंतराव म्हणाले होते - ‘त्याचा पाण्यासारखा निर्मल सूर!’ संगीतातले सूर ऐकता ऐकता आपल्या अस्तित्वामधील शुद्ध सूर ऐकण्याची ही कसोशी होती.

कुमार गंधर्वांवरील भाषणात पुल म्हणाले होते की, “कुमार गंधर्वांचे गाणे असा उल्लेख ऐकला की मला आरती प्रभूंची ओळ आठवते - ‘तो न गातो, ऐकतो तो सूर आपुला आतला’… आपण एखादा पिंजरा उघडावा आणि त्यातील पक्षी बाहेर पडावा तसे कुमार ‘आ’ करतात आणि त्यातून गाणं बाहेर पडतं. हा  सहजोद्भव गंगोत्री सारखा आलेला आहे.”

गंगा जशी सहजपणाने शिवाच्या जटेमधून निघून हिमालयात उद्भवते, त्याचप्रमाणे सुरांचा उद्भव कुमार गंधर्वांच्या गळ्यातून होत राहतो, असं पुलंना म्हणायचे आहे. कुमार गंधर्वांचे नाव शिवपुत्र होते, हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे. ही उपमा पुलंच्या ‘सब-कॉन्शस’मधून बाहेर पडली असावी, असे वाटते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

चांगलं जगायचं असेल, तर आपल्याला आपल्या पलीकडे जाणे आवश्यक असतं. त्यासाठी, आपला अहंकार जिथे जिरेल अशी जागा मिळणं आवश्यक असतं. भास्करबुवा बखल्यांवरच्या लेखात पुढे पुलंनी ‘अहंकार जिरवणाऱ्या’ दिव्य सुरांच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत. गायकांच्या गळ्यातून आणि विविध वाद्यांमधून निघालेले दिव्य आणि झगमगीत सूर या त्या अहंकार जिरवणाऱ्या जागा होत्या.

पुल लिहितात - “पुण्याला डॉ. सोमणांनी बालगंधर्वांचे गाणे केले होते. ‘जोहार मायबाप’ म्हणताना नारायणरावांचा शुद्ध धैवत असा लागला की, सारी मैफिल क्षणभर निःसंग झाली.”

अंजनीबाई मालपेकर ८० वर्षांच्या असताना त्यांच्या गळ्याला भैरवीमधील मध्यम अचानक कसा विलक्षण होऊन बिलगला याची आठवण कुमार गंधर्वांनी सांगितली होती, असे पुल नमूद करतात. त्या वेळी कुमार म्हणाले होते -

“माईचा तो मध्यम असा मुष्किल होता की, पुढले काही क्षण आम्ही बेहोष म्हणजे खरोखरीच बेहोष झालो. मला तर बाकीचे सूर दिसेचनात. तो मध्यम तसा एकदाच भेटला.”

संगीताच्या तपस्येमधले असे काही असामान्य क्षण येतात की, या वेळी निराकार सुरांचे सौंदर्य आकार धारण करते आहे, असे वाटत राहते.

पुलंनी याबाबतीत रविशंकर आणि अली अकबर खाँ यांच्यातील जुगलबंदीची आठवण लिहिली आहे. ललत राग गुंजत असताना अली अकबर खाँ यांच्या सरोदमधून विलक्षण असा कोमल मध्यम उमटला. पुल लिहितात, “एखाद्या सुंदर मूर्तीकडे पाहात राहावे, तसे रविशंकर त्या आपर्थिव मध्यमाकडे पाहात राहिले.”

या अशा दिव्य सुरांविषयी पुल म्हणतात, “गेल्या तीस चाळीस वर्षांतल्या माझ्या मैफिली ऐकण्याच्या अनुभवात फार तर तीस चाळीसच क्षणांचे संचित माझ्यापाशी असेल. एखाद्या वेळेला त्यांच्या नुसत्या स्मरणाने डोळे भरून येतात. अशा क्षणांची गाठ पडते, त्या वेळी ‘अहं’चे अस्तित्वच संपते.”

संगीत ही पुलंची पॅशन होती. ते त्यांच्या अंतरंगाने त्यांच्या कळत-नकळत साधलेले अध्यात्म होते. ते हे सगळे अनुभव इतक्या समर्थपणे सांगू शकले, कारण त्यांना स्वरांबरोबरच शब्दसुद्धा प्रसन्न होते. सुनीताबाईंकडे फक्त शब्द होते. त्यांना संगीत आवडत असले, तरी स्वरांच्या दिव्यत्वाशी त्यांचा संवाद होऊ शकत नव्हता. पूर्णत्वाचा ओझरता का होईना स्पर्श आपल्याला होतो आहे, असे पुलंना वाटत होते, तो अनुभव सुनीताबाईंना शक्य नव्हता. या सगळ्यामुळे सुनीताबाई कवितेकडे जास्त ओढल्या गेल्या. याच कारणासाठी त्या, काव्यात्म कथेमधून तत्त्वज्ञान लिहिण्याची किमया साधणाऱ्या जीएंच्या प्रतिभेकडे ओढल्या गेल्या. या जगातील रूपाचे सौंदर्य शब्दांमध्ये बांधण्याची हुनर माधव आचवलांकडे होती. त्यामुळे सुनीताबाईंची आचवलांशीही अत्यंत सुंदर मैत्री झाली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुलंना कळत होते, तेवढे संगीत कळत नसल्याने सुनीताबाई त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने चर्चा करू शकत नव्हत्या. तीच गोष्ट रूपात्म कलेबद्दलही होती. आचवलांएवढी चित्रकला आणि शिल्पकला सुनीताबाईंना कळत नव्हती. त्यामुळे त्या आचवलांशीही बरोबरीच्या नात्याने चर्चा करू शकत नव्हत्या. शब्दांशी मात्र सुनीताबाईंचे अतिशय जवळचे नाते होते. त्यांना कलेच्या या क्षेत्राबद्दल आत्मविश्वास वाटत होता. शब्द हे त्यांचे स्वतःचे माध्यम होते.

शब्द हे स्वर आणि रूपात्म कला यांच्या एवढे मुक्त नसले तरी भावनांची खोली व्यक्त करण्यासाठी खूप जास्त समर्थ ठरतात. कुठलीही स्त्री शोधत असते, तशा सुनीताबाईसुद्धा भावनांच्या सखोलतेमध्ये जीवनाचा अर्थ शोधत होत्या. त्यामुळे कलेसंदर्भात सुनीताबाईंच्या ज्या काही खडाजंगी चर्चा झाल्या त्या जीएंशी. या दोघांमध्ये भावना आणि विचारांबद्दलची प्रचंड देवाण-घेवाण झाली.

असे असले तरी, स्वरांकडून शब्दांकडे जाताना मध्ये रूपाचे स्टेशन लागते, हे आपल्याला विसरता येत नाही. शब्द असतात तसे स्वर अर्थाने बद्ध नसतात. रूपाचीसुद्धा तशीच अवस्था असते. स्वर आणि रूप अर्थाची मदत न घेता आपल्यापर्यंत आशय पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ती एक वेगळीच मुग्ध अशी मौज असते.

.................................................................................................................................................................

लेखांक : एक - सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : पु. ल. देशपांडे, माधव आचवल आणि जी. ए. कुलकर्णी

.................................................................................................................................................................

जीए आणि सुनीताबाई यांच्या काव्यात्म वैभवाने नटलेल्या मैत्रीकडे जाण्याआधी माधव आचवलांनी रूपाच्या माध्यमातून साधलेली सौंदर्याची तपस्या आपण पुढच्या लेखांकात पाहू.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Pradeep Gadgil

Sun , 12 November 2023

छान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......