सुजित पटवर्धन : पुणे ‘परिसरा’तल्या ‘हिरव्या बोली’ला कृतीचे कोंदण देणारा लढवय्या!
दीपावली २०२३ - लेख
प्रशांत कोठडिया
  • सुजित पटवर्धन आणि त्यांनी स्थापन केलेल्या ‘परिसर’ या संस्थेचे बोधचिन्ह
  • Fri , 10 November 2023
  • दीपावली लेख सुजित पटवर्धन Sujit Patwardhan परिसर Parisar

सुजितला जाऊन एक वर्ष झाले. मागच्या वर्षी, २२ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७७व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याआधी साधारणतः दोन-तीन वर्षे पायाच्या दुखण्यामुळे त्याचा सार्वजनिक वावर कमी झाला होता, परंतु मनाचा उत्साह आणि पर्यावरणाशी निगडीत प्रश्नांबाबतचे विचार, नवनवीन कल्पनांचा धबधबा शेवटपर्यंत कोसळतच होता. अल्पशा आजाराने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तेव्हा तो असा आकस्मितपणे कायमचा निघून जाईल, असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र शेवटच्या टप्प्यात पत्नी विद्या, मुली – लारा व अमृता आणि नातवंडं जवळ होती, ही त्यातली समाधानाची बाब म्हणायची.

सुजितची माझी पहिली भेट १९७९ साली रानडे इन्स्टिट्यूटमध्ये झाली. तेथे मी विद्यार्थी होतो, तर सुजित छपाई तंत्रज्ञान या विषयाचा शिक्षक होता. लंडनच्या ‘दि कॉलेज ऑफ प्रिंटिंग अँड ग्राफिक आर्ट’मधून (१९६४ ते ६८) प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर त्याने १९६९ ते १९७४ या काळात पुण्यातील प्रसिद्ध ‘संगम प्रेस’मध्ये उमेदवारी केली आणि १९७६ साली नारायण पेठेत ‘मुद्रा’ या नावाने स्वतःचा प्रिंटिंग प्रेस सुरू केला. तो अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुरू होता.

सुजित स्वतः ग्राफिक डिझायनर असल्यामुळे छपाईतील सर्वोत्कृष्ट दर्जा आणि डिझाईनिंगमधील वैविध्यामुळे पुण्यातील पहिल्या दोन-चार प्रिंटिंग प्रेसमध्ये ‘मुद्रा’ची गणना होत होती. त्याचे वडील जुन्या काळातील आयसीएस (इंडियन सिव्हिल सर्विस) अधिकारी होते, तर त्याचे दोन प्रसिद्ध काका म्हणजे स्वातंत्र्यसैनिक श्री. अच्युतराव पटवर्धन आणि श्री. रावसाहेब पटवर्धन! या सर्वांचा सुजितवर प्रभाव पडणे स्वाभाविकच होते.

लोकशाही, स्वातंत्र्य, समता व बंधुता, धर्मनिरपेक्षता आदी स्वातंत्र्यचळवळीतील आणि भारतीय संविधानात समाविष्ट असलेल्या जागतिक मूल्यांचे भान सुजितला लहानपणापासूनच होते, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. त्यात आणखीन एक मूल्य त्याच्या मनात रुजले आणि ते म्हणजे ‘पर्यावरण संवर्धना’चे. त्याला दोन बाबी कारणीभूत ठरल्या असल्याची शक्यता वाटते. त्या म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या ‘ऋषि व्हॅली’ या शाळेतून त्याचे झालेले शिक्षण आणि त्यानंतर चार वर्षे लंडनला त्याने घेतलेले छपाई तंत्रज्ञानाचे शिक्षण.

युरोपमध्ये १९६०पासूनच सार्वजनिक वाहतुकीचे वाढते महत्त्व, शहराचे नियोजन करताना सायकली व बस वाहतुकीला दिले जाणारे प्राधान्य, शहराच्या सर्व भागांत राखून ठेवलेल्या मोकळ्या जागा, हिरवीगार उद्याने, तसेच सायकल चालवणाऱ्यांसाठी आणि पायी चालणाऱ्यांसाठी उभारलेली खास व्यवस्था; बांधकामांचे काटेकोर व कठोरपणे पाळले जाणारे नियम, यांची महती सुजितच्या मनात रुजली नसती तरच नवल!

त्यामुळेच तो भारतात परतल्यानंतर ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी, १९८१ मध्ये ‘परिसर संवर्धन’ या संकल्पनेची आणि स्वयंसेवी संस्थेचीही मुहूर्तमेढ रोवली गेली!

जरी सुजित आमचा पत्रकारितेतील शिक्षक असला, तरी पहिल्याच तासाला त्याने ‘मला सुजित म्हणा’ असे जाहीर करून लांबणारे गडगडाटी हास्य केले आणि सर्वच विद्यार्थ्यांची मने जिंकली! त्याचा तो उत्साह, चेहऱ्यावरील आनंददायी भाव पाहताक्षणीच त्याच्याशी मैत्र जुळले! पुढे मी १९८६मध्ये ‘वनराई’ संस्थेचा संस्थापक सचिव म्हणून पूर्णवेळ काम सुरू केले, तेव्हा सुजितसोबत पर्यावरणीय प्रश्नांवर एकत्रितपणे कार्य करण्याची संधी लाभली आणि त्याच्या स्वभावातील विविध निसर्गभावाच्या छटा जवळून पाहता आल्या. दोन वर्षांनंतर माझी पत्नी उज्ज्वला पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी झाली आणि तिचीही सुजितशी मैत्री जुळली… तेव्हापासून आम्ही उभयतांनी जणू त्याच्या मैत्रीचे शिष्यत्व पत्करले.

आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे, पत्रकारितेच्या शिक्षणक्रमातच पुण्यातील प्रसिद्ध पर्यावरणशास्त्राचा अभ्यासक आणि अर्थशास्त्राचा प्राध्यापक श्री. विजय परांजपे याने, पर्यावरण म्हणजे काय, त्याचे संवर्धन का व कसे करायचे, आदी त्या काळी नवीन असलेले विषय हसतखेळत विशद केल्यामुळे, आम्हा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा झाला. मला मात्र दिवंगत श्री. विवेक परांजपे या माझ्या फर्ग्युसन कॉलेजमधल्या मित्राने १९७७ साली सुरू केलेल्या ‘फ्रेंड्स ऑफ अ‍ॅनिमल्स’ संस्थेचा विश्वस्त या नात्याने या क्षेत्राची मला थोडीफार पार्श्वभूमी लाभलेली होती. मात्र सुजित पटवर्धन, विजय परांजपे आणि जगदीश गोडबोले या प्रसिद्ध त्रिमूर्तीमुळे ‘पर्यावरणा’चा विषय किती व्यापक, वैविध्यपूर्ण आणि बहुपरिमाणीय आहे, हे समजायला मदत झाली.

पुण्यात त्या वेळी विकासाचे वारे जोरात वाहत होते. त्यामुळेच अनेक पर्यावरणीय समस्या तयार होऊ लागल्या होत्या. परिणामी कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, फर्ग्युसन रस्त्यावरील झाडे तोडण्यास प्रतिबंध करण्याचा विषय असो अथवा सिंबायोसिस टेकडीवर तसेच एआरएआय संस्थेजवळील सर्व्हे क्र. ४४वरील बांधकामास दिलेली परवानगी असो, शहरातील निसर्गप्रेमींनी या निर्णयांविरुद्ध १९८८ ते १९९१ या काळात अनेक आंदोलने केली. पर्यावरणास धोकादायक ठरणाऱ्या शासकीय निर्णयांविरोधात अनेक संस्थांनी एकत्र येऊन मुंबई उच्च न्यायालयात दादही मागितली होती.

पद्मविभूषण डॉ. श्री. मोहन धारियाजींनी स्थापलेल्या ‘वनराई’ संस्थेचा सचिव या नात्याने मी वरील सर्व आंदोलने व उपक्रमांमध्ये भरपूर सक्रीय होतो. त्या काळी पर्यावरणीय संवर्धनाच्या दृष्टीकोनातून रस्ते व टेकड्यांवरील झाडे वाचवणे, टेकड्यांवर बांधकामास नेमक्या कोणत्या कारणांमुळे विरोध करत आहोत, आदी मुद्द्यांची सुजित ज्या पद्धतीने मांडणी करे, पुणे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना हे सर्व मुद्दे पटवून देण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न करे, त्यातून आमच्यासारख्यांना खूप शिकायला मिळाले.

टेकड्यांवरील बांधकामास परवानगी देण्याच्या संदर्भातील एक आठवण मुद्दामहून सांगितली पाहिजे. पुण्यातील संस्थांच्या व निसर्गप्रेमींच्या विरोधामुळे राज्य शासनाने सर्व्हे क्र. ४४वर बांधकाम करण्यास आधी दिलेली परवानगी रद्द केली. त्यानंतर श्री. मोहन धारिया व सुजितसह आमचे शिष्टमंडळ श्री. शरदराव पवार यांना पुण्यात भेटले. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या पवारसाहेबांचे आभार मानून, अशी चुकीची परवानगी दिलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी सुजितने मागणी करताच, पवारसाहेब काहीसे वैतागले. आता तुमचा प्रश्न सुटला आहे ना? मग आता असली मागणी का करता, असे सांगून त्यांनी हा विषय संपवला. सुजितसह सारेच गप्प झाले, तेव्हा धारियाजीं आणि अंकुश काकडे यांनी मध्यस्थी करून पवारसाहेबांच्या मनातील पुण्याच्या पर्यावरणप्रेमींविषयीचा गैरसमज दूर केल्याचे मला आठवते.

मात्र अशा अनेक प्रसंगांतून सुजितचे पर्यावरणाबद्दलचे प्रेम, तळमळ, निर्भीडपणा आणि त्यासाठी तो करत असलेली धावपळ सर्वांच्याच नजरेस पडत होती. सुजित भारावून जाऊन ‘परिसर’च्या माध्यमातून काम करायचा, त्याचा एकत्रित परिणाम म्हणजे तो सर्वांचा लाडका बनला आणि पुण्यनगरीतील ‘हिरव्या बोलीचा बुलंद आवाज’ बनला.

सुजितचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मुद्रक असल्याने ‘परिसर’ संस्थेच्या वतीने पर्यावरण व निसर्ग संवर्धनाशी संबंधित त्याने अनेकविध प्रश्नांवरील मराठी व इंग्रजीतून प्रकाशित केलेली पुस्तके, त्यातील आशय आणि त्यांची सौंदर्यपूर्ण मांडणी! ‘परिसर’ने प्रकाशित केलेले सर्व साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणता येईल असे होते. पुणे शहराची चहूबाजूने होणारी अनियंत्रित वाढ, वाहतुकीची सर्वत्र होणारी कोंडी, आक्रसत जाणाऱ्या सार्वजनिक जागा, वाढते प्रदूषण, यांसारख्या समस्या सुजितला प्रचंड अस्वस्थ करत. त्याचा जीव वर-खाली होत असे आणि तो मनातून त्रागा करत असे. कुठेही भेटला तरी, ‘अरे, कळलं का?’ असे विचारून ‘सत्ताधाऱ्यांचे काय चालले आहे, हे कळत नाही’ असे म्हणत वैतागलेला सुजित, मनपा वा राज्य व केंद्र सरकारने पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम करणारा एखादा निर्णय घेतल्याची पोटतिडकीने माहिती देत असे.

अर्थात तो केवळ बोलायचा नाही, तर त्या दृष्टीने ‘परिसर’ संस्थेच्या वतीने विविध विषयांवर अनेकविध कार्यक्रमांचे आयोजित करायचा आणि सातत्याने लोकजागृतीचे काम करण्यावर भर द्यायचा. पुढे तर ‘परिसर’ने ‘सार्वजनिक वाहतुकीविषयक धोरणात्मक बदल घडवण्या’वर लक्ष केंद्रित केले. त्याकरता देशभरातील विविध शहरांत काम करणाऱ्या पर्यावरणतज्ज्ञांशी व कार्यकर्त्यांशी तो सतत संपर्कात असायचा, ठिकठिकाणच्या चर्चासत्रांतदेखील सहभागी व्हायचा.

मला आठवतंय, वाहतुकीच्या प्रश्नावर प्रकाश टाकणाऱ्या एक खास माहितीपटाचे १९९२ साली आयोजन केले होते. ‘इंग्लडमध्ये १९५९ साली सुरू झालेला पहिलावहिला हमरस्ता’ या विषयाची माहिती देणारा हा माहितीपट होता. प्रारंभी दररोज १३,००० वाहने या हमरस्त्यावरून जातील, असा अंदाज व्यक्त करून, त्याचे डिझाईन व रचना करण्यात आली होती. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी उदघाटन करताना, ‘प्रगतीचा हमरस्ता’ असे या रस्त्याचे वर्णन केले होते. मात्र पुढील पाच-सात वर्षांतच वाहनांची संख्या भरपूर वाढली आणि मग हा हमरस्ताही कमी पडू लागल्याचे सुजितने सांगितले होते.

सुमारे दीड तासाच्या या माहितीपटासाठी सुजितने पुणे मनपाचे अधिकारी, पुण्यातल्या राजकीय पक्षांचे नेते, नगरसेवक, कार्यकर्ते आणि अर्थातच पर्यावरणप्रेमींना निमंत्रित केले होते. त्याशिवाय श्री. मोहन धारिया, अंकुश काकडे, खासदार वंदना चव्हाण, अनिता बेनिंजर, शांतिलाल सुरतवाला, मोहन जोशी, डॉ. सतीश देसाई, उज्ज्वल केसकर, गिरिश बापट, आदी सर्वपक्षीय नेते आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे मला आठवते. तुम्ही कितीही नवे रस्ते बांधा वा रुंद करा, नवनवीन फ्लायओव्हर बांधा, वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणले नाही आणि सार्वजनिक वाहतुकीची यंत्रणा जर सक्षम केली नाही, तर वाहतुकीची समस्या अजिबात सुटणार नाही, असेही प्रतिपादन सुजितने केल्याचे मला स्मरते.

वाढत्या वाहतुकीमुळे मनपाने रस्तारुंदीसाठी फर्ग्युसन आणि इतर रस्त्यांवरील जुनी व मोठी झाडे तोडण्याचे जाहीर केले होते. त्याविरुद्ध आणि एकूणच पुण्याच्या पर्यवरणाच्या इतर समस्यांविरोधात विविध संस्थांनी मिळून एक मोठा मोर्चा काढला होता. त्याची सांगता फर्ग्युसन महाविद्यालयातील अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झाली होती. त्या प्रसंगी मुख्य वक्ता म्हणून सुजितने पोटतिडकीने केलेले भाषण फारच परिणामकारक झाले होते.

लोकांना संवेदनशील करण्याच्या दृष्टीने ‘परिसर’च्या वतीने अनेक उपक्रम व व्याख्यानांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आठवणीत राहिलेले भाषण म्हणजे प्रसिद्ध पत्रकार पी. साईनाथ यांचे! जपानच्या फुकुओकांना पुण्यात निमंत्रित करून सुजितने ‘One Straw Revolution’ या पुस्तकाचे ‘एका काडातून क्रांती’ हे मराठीतील भाषांतरही ‘परिसर’च्या वतीने प्रकाशित केले होते. असे नवनवीन आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यास हातभार लावणाऱ्या विषयांची वा मुद्द्यांची सुजितला अक्षरशः भूरळ पडायची. काहीही चांगले ऐकण्यात आले वा नवीन काही वाचनात आले की, त्याचे डोळे लकलकायचे! निराशाजनक परिस्थितीतही त्याच्या मनात जणू आशेची पालवी फुटायची आणि कृतीशीलतेच्या फांद्याही वाढू लागायच्या!

दिवसरात्र, उठताबसता सुजितच्या डोक्यात पर्यावरण रक्षणाचे विचारचक्र सतत सुरू असायचे! त्याविषयक आणि इतर जनकल्याणविषयीची शासकीय धोरणांचा अभ्यास करत असायचा, त्यांच्या अंमलबजावणीतील त्रुटी तो जळीस्थळी मांडत राहायचा. पर्यावरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि निसर्गाची हेळसांड करणाऱ्या शासनव्यवस्थेला सुजित स्पष्टपणे विरोध करायचा. विशेषतः शहर विकास आराखडा तयार झाल्यानंतर मनपा जनतेकडून त्याविषयी ज्या सूचना वा हरकती मागवायची, त्या ‘डेव्हलपमेंट प्लॅन’ (डीपी)चा निसर्गप्रेमींनी अभ्यास करावा आणि त्यावर आधारित माहितीपत्र वा लेख लिहून जनतेला या प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी सुजित नेहमी धडपडत असे.

हे सारे सोपस्कार पार पाडल्यानंतर, या डीपीमध्ये राज्य शासनाच्या पातळीवर ‘अदृश्य शक्तीं’कडून अनेक बदल केले जायचे आणि हा प्लॅन अगदी पातळ होऊन जायचा. अशा कारभारावराविरुद्ध सुजित आणि प्रभुती दंड थोपटून उभे ठाकायचे, त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घ्यायचे. त्या काळात सुजित आणि निसर्गप्रेमींना उसंत नसायची. डीपीच्या मूळ प्लॅनमध्ये बदल झाला आहे, असे जेव्हा आढळून यायचे, तेव्हा सुजितची प्रचंड चिडचिड व्हायची, तो मनातून रागाने उकळत असायचा. जिथे जाईल तिथे इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून तो तावातावाने बोलायचा.

सुजितने पर्यावरणाचा कधीही मर्यादित अर्थाने विचार केला नाही. शहर आणि ग्रामीण भागात समतोल आणि सर्वांगीण विकासाचे चांगले काम सुरू असल्याची माहिती मिळाली की, सुजित मनापासून आनंदी व्हायचा. त्याच्या डोळ्यात आशावाद तरळू लागायचा आणि हा विकास चिरंजिवी कसा होईल, याचेही स्वप्न रंगवू लागायचा. त्याच्या आशावादी स्वभावाने त्याला सक्रीय ठेवले होते की, शेवटपर्यंत सक्रीय राहिल्यामुळे आशावादी राहिला होता, हे त्यालाच माहीत. परंतु एक मात्र निश्चित की, सुजितचे असणे कायमच प्रसन्नदायी आणि आशादायी वाटायचे. त्याचा शहरातल्या सर्व थरांत असलेला संचार व वावर प्रागतिक विचारांच्या संस्थांनाही मोठा आश्वासक वाटायचा.

शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गप्रेमींच्या दबावामुळे टेकड्यांवर जैवविविधता उद्यानांसाठी आरक्षित केलेल्या विभागात (biodiversity parks & zones) कोणत्याही प्रकारे बांधकाम होऊ नये, म्हणून अनेक वर्षांपासून खासदार वंदना चव्हाण आणि त्यांचे सहकारी शासनदरबारी जो आग्रह धरत असायचे, त्याबाबतही सुजित नेहमीच जागरूक व सक्रीय होता. त्या विषयी तो अनेक तज्ज्ञांशी, नेत्यांशी व संस्थांशी चर्चा करत राहायचा आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणायचा.

याच दरम्यान, पुण्यातील वाढत्या प्रदूषणाची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने ‘पर्यावरणीय प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण’ (Environment Pollution (Prevention and Control) Authority (EPCA) नेमले होते. प्रदूषणविरहित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याकरता धोरण तयार करण्याची कार्यकक्षा न्यायालयाने या मंडळास आखून दिली होती. त्या आधी २००२मध्ये पुण्यात अनेक संस्थांनी एकत्र येऊन ‘पुणे ट्रॅफिक ऍंड ट्रांस्पोर्टेशन फोरम’ (PTTF) सुरू केला. या फोरमच्या वतीने मेजर जनरल सुधीर जटार (यांचे नुकतेच वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले), सुजित पटवर्धन, अनिता बेनिंजर, विजय लेले, अजय फाटक, संस्कृती मेनन, आदी कृतीशील व्यक्तींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणाऱ्या ‘बस रॅपिड ट्रान्झिट’ (बीआरटी) या योजनेचा जोरदार पुरस्कार केला होता.

ब्राझील, कोलंबिया, मॅक्सिकोसारख्या लॅटिन अमेरिकी देशातील २१हून अधिक शहरांमधून कमी खर्चिक ‘बीआरटी’ मोठ्या प्रमाणात सुरू असून, दररोज अक्षरशः कोट्यवधी प्रवाशांची उत्तम सोय झाल्याचेही या मंडळींनी शासनकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. ‘बीआरटी’मुळे भारतासारख्या देशातली वाहतुकीची समस्याही मोठ्या प्रमाणावर सुटेल, असा विश्वास सुजितसह सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना प्रामाणिकपणे वाटत होता. त्या काळी ‘मेट्रो’चा खर्च प्रति किलोमीटर हा रु. १७५/- कोटी, तर ‘बीआरटी’चा ५ ते ६ कोटी इतका होता. ‘बीआरटी’विषयी लोकांना योग्य माहिती मिळावी म्हणून सुजितने साक्षात ‘बोगोटा’ शहरामध्ये ‘बीआरटी’ यशस्वी करणारे महापौर श्री. एनरिक पेनेलोसा यांना पुण्यात व्याख्यानासाठी निमंत्रितही केले होते.

त्या काळी पुण्याचे नेतृत्व करणाऱ्या खासदार श्री. सुरेश कलमाडींशीही सुजितचा चांगला संपर्क आणि मोकळा संवाद होता. ‘पीटीटीएफ’च्या वतीने ‘बीआरटी’चे महत्त्व कलमाडींना पटवून देण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरले. २००६मध्ये पुण्यात ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजने’अंतर्गत (Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission – JNNRUM) बीआरटीचे काम सुरू झाले आणि २००७मध्ये (घाईघाईने) स्वारगेट–कात्रज रस्त्यावर बीआरटी प्रत्यक्षात धावू लागली. मात्र सरकारी योजना कितीही चांगल्या असल्या, तरी त्यांची अंमलबजावणी नीटपणे झाली नाही, तर त्यांचा पूर्ण बोजवारा उडतो, हा अनुभव ‘बीआरटी’बाबतीत पुणेकरांच्या नशिबी आलाच!

त्यात २००७च्या मनपाच्या निवडणुकीत कलमाडींच्या हातून सत्ता निसटली. आता तर ही संपूर्ण योजनाच बेवारस झाली आहे! तीच गत पुण्याला सायकलींचे शहर करण्याच्या कल्पनेची व योजनेचीही झाली!  

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शासकीय धोरण, त्याची कार्यपद्धती आणि निर्धारित योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भातील गलथानपणाबाबत सुजितने वेळोवेळी विरोध केला असला, तरी तो शासनाच्या विविध समित्यांवर काम करण्यासही तयार असायचा. या महाकाय पण निगरगट्ट यंत्रणेला आतून गदागदा हलवणेदेखील महत्त्वाचे आहे, याची त्याला पूर्ण जाण होती. त्याची तळमळ, मनाची तगमग आणि या क्षेत्रातील त्याचा अभ्यास वजनदार पुढारी आणि शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचायचा. सरकारी अधिकारी असोत की, राजकीय पुढारी, सुजितला एकदा भेटले की, ते त्याचे मित्र होऊन जायचे. त्याचा कोणावरही व्यक्तिगत राग किंवा कसलेही हेवादावे नसायचे.

त्याच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळेच राज्य पर्यावरण संरक्षण समिती, मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या महाबळेश्वर व पांचगणी येथील बांधकाम परवानगी समिती आणि तेथील प्रादेशिक नियोजन मंडळ; पुणे महानगर पालिकेच्या ‘नागरी वारसा जतन समिती’ आणि शहर विकास आराखडा अंमलबजावणी सुकाणू समिती, आदी विविध समित्यांचा सदस्य म्हणून सुजितने मनोभावे आणि अत्यंत प्रभावीपणे काम केले.

‘परिसर’च्या कार्याबरोबरच सुजित देशातील इतर सामाजिक व राजकीय प्रश्नांमध्येही सक्रीय असायचा. एकंदरीतच त्याचे कार्यक्षेत्र अतिशय व्यापक होते. मेधा पाटकर यांच्या ‘नर्मदा बचाव आंदोलना’चा तो खंदा समर्थक होता. पर्यावरणाबरोबरच प्रचलित केंद्र सरकारची लोकशाहीविरोधी धोरणे आणि हुकूमशाही पद्धतीच्या कारभारावरही तो जाहीरपणे विरोध नोंदवायचा.

नोटबंदी, सीएए–एनआरसी, आदी निर्णयांना विरोध करणाऱ्या आंदोलनातही हिरिरीने सहभागी व्हायचा, त्याला जोरदार समर्थन द्यायचा. थोर विचारवंत प्रा. राम बापट, स्वयंसेवी संस्थांचे आधारस्तंभ असलेले डॉ. मुकुंद घारे, गांधीवादी विचारवंत प्रा. वसंतराव पळशीकर, माजी केंद्रीय मंत्री श्री. मोहन धारिया, पर्यावरण तज्ज्ञ प्रा. विजय परांजपे व डॉ. माधव गाडगीळ, प्रा. सुहास पळशीकर, अनिता बेनिंजर, खासदार वंदना चव्हाण, डॉ. वा. द. वर्तक, डॉ. एन. जी. हेगडे, ताहेरभाई पुनावाला, डॉ. बाबा आढाव, विद्याताई बाळ, डॉ. रविंद्र व्होरा, आशिष कोठारी, आदी महनीय व्यक्तींशी सुजितचा प्रवाही संवाद सतत सुरू असायचा.

स्त्री-चळवळीच्या अभ्यासक डॉ. विद्युत भागवत आणि उद्योजक श्री. रवि भागवत हे तर पटवर्धन कुटुंबीय आणि ‘परिसर’ संस्थेचे घटकच होते. सुजितची पत्नी आणि ‘अक्षरनंदन’ या अभिनव शाळेच्या संस्थापिका विद्या पटवर्धन, स्टेटिरा वाडिया, डॉ. नित्या घोटगे, डॉ. राजेंद्र रवी, रणजित गाडगीळ, आदी ‘परिसर’च्या पदाधिकाऱ्यांबरोबरच, श्रीमती संस्कृती मेनन, दिवंगत शरद महाजन, लता श्रीखंडे, तारा वॉरियर, अशोक श्रीनिवास, लक्ष्मी नारायण, पूर्णिमा चिकरमाने, प्रकाश कर्दळे, विनिता देशमुख, अ‍ॅड. अरुणा नाफडे, अ‍ॅड. एन. पी. भोग, सायली पाळंदे, विनोद बोधणकर, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, खासदार गिरीश बापट, उज्ज्वल केसकर, उल्हास पवार, मोहन जोशी, शांतिलाल सुरतवाला, अंकुश काकडे, अन्वर राजन, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. सतीश देसाई, संतोष शिंत्रे, आदी विविध क्षेत्रांतील कितीतरी अभ्यासू नेते, कार्यकर्ते, पत्रकार, तसेच ‘अक्षरनंदन’शाळेशी संबंधित पदाधिकारी आणि शिक्षक या सर्वांच्या सुजित संपर्कात असायचा.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

पुढील काळातही ‘परिसर’मध्ये युवापिढीचा सक्रीय सहभाग कायम राहावा आणि संस्थेचे काम सुरू राहावे, याबाबत सुजितने विचारपूर्वक नियोजन आणि त्याकरता आवश्यक ती तजवीजही केली होती. एका व्यक्तीच्या खांद्यावर असलेली संस्था फार काळ टिकू शकत नाही, याबद्दल त्याच्या मनात स्पष्टता होती. त्यामुळेच ‘परिसर’ची वाटचाल आजही त्याच तळमळीने सुरू आहे. प्रकल्प संचालक रणजित गाडगीळच्या नेतृत्वाखाली अनेक युवा पदाधिकारी संस्थेचे पूर्णवेळ काम करत आहेत.

सुजितने पर्यावरणाचा कधीही मर्यादित अर्थाने विचार केला नाही. शहर आणि ग्रामीण भागात समतोल आणि सर्वांगीण विकासाचे चांगले काम सुरू असल्याची माहिती मिळाली की, सुजित मनापासून आनंदी व्हायचा. त्याच्या डोळ्यात आशावाद तरळू लागायचा आणि हा विकास चिरंजिवी कसा होईल, याचेही स्वप्न रंगवू लागायचा. त्याच्या आशावादी स्वभावाने त्याला सक्रीय ठेवले होते की, शेवटपर्यंत सक्रीय राहिल्यामुळे आशावादी राहिला होता, हे त्यालाच माहीत. परंतु एक मात्र निश्चित की, सुजितचे असणे कायमच प्रसन्नदायी आणि आशादायी वाटायचे. त्याचा शहरातल्या सर्व थरांत असलेला संचार व वावर प्रागतिक विचारांच्या संस्थांनाही मोठा आश्वासक वाटायचा.

हा ‘हिरव्या बोलीचा बुलंद आवाज’ २२ ऑक्टोबर २०२२ रोजी जरी पंचतत्त्वात गुडूप झाला असला, तरी त्याच्या कार्याचा, धडाडीचा आणि अमर्याद ऊर्जेचा प्रतिध्वनी आजही कानावर पडत असतो.

आपल्या सृजनाने ‘परिसर’ खुलवणाऱ्या सुजितला माझा सलाम..!!

.................................................................................................................................................................

प्रशांत कोठडिया

prashant.kothadiya@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर लोकशाहीला, संविधानिक मूल्यांना वाचवायचे असेल, तर सर्वांत पहिल्यांदा ‘गोदी मीडिया’पासूनच लोकशाहीचे रक्षण करावे लागणार आहे. कारण आता माध्यमेच ‘लोकशाहीचे मारेकरी’ बनली आहेत

आज ‘सांप्रदायिकता’ हीच पत्रकारिता झालेली आहे. जर तुम्ही सांप्रदायिक नसाल, जर तुम्ही मुसलमानांच्या विरोधात नसाल, तर ‘गोदी मीडिया’त नेमके काय करता, हा विचारण्यायोग्य प्रश्न आहे. तुम्हाला ‘गोदी मीडिया’त पत्रकार व्हायचे असेल, तर सांप्रदायिक असणे आणि ‘मुस्लीमविरोधी’ असणे, ही सर्वांत मोठी अट आहे. जर तुम्ही ‘सांप्रदायिक’ असाल, तर याचा अर्थ तुम्ही ‘लोकशाहीवादी’ असूच शकत नाही.......