जगातल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपण अपूर्ण आहोत, असं वाटत असतं. त्यामुळे प्रत्येकाचा पूर्णत्वाचा शोध सुरू असतो. कुणाला वाटतं, पैसा मिळाला की, आपल्याला पूर्णत्व येईल. कुणाला वाटतं, सत्ता मिळाली की... कुणाला प्रसिद्धी, कुणाला सुंदर नाती, तर कुणाला अजून काही...
या जगातील बहुतेक लोक लौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधत असतात.
याउलट, पु.ल. देशपांडे, माधव आचवल, जी. ए. कुलकर्णी आणि सुनीताबाई देशपांडे यांच्यासारखे संवेदनशील कलावंत अलौकिक गोष्टीत पूर्णत्व शोधताना दिसतात. हा शोध वेगवेगळे मार्ग चोखाळतो, वेगवेगळे रंग धारण करतो, वेगवेगळी वळणं घेतो… कधी स्वर, कधी रूप, तर कधी शब्द! कधी कलेच्या अंगानं, तर कधी तत्त्वज्ञानाच्या!... कधी बुद्धिप्रामाण्याच्या, तर कधी अध्यात्माच्या!
या शोधामुळे सगळ्या संवेदनशील कलाकारांची आयुष्यं झळाळून जातात. या शोधाला नेहमीच स्त्री-पुरुष मैत्रीची पार्श्वभूमी लाभलेली दिसते. कारण तत्त्वज्ञान आणि कला यांच्याबरोबरच स्त्री-पुरुष एकमेकांच्या प्रेमामध्ये आणि मैत्रीमध्ये कळत-नकळत पूर्णत्व शोधत असतात.
पुल, आचवल आणि जीए या तीन निर्माणकर्त्यांच्या प्रतिभेवर सुनीताबाई रुंजी घालत राहिल्या आणि त्यांच्या प्रवासात एक महत्त्वाच्या साक्षीदार व एक रसिक मैत्रीण बनून राहिल्या. या चार प्रतिभावंतांची मैत्री कलेच्या आणि तत्त्वज्ञानाच्या प्रांगणात बहरली. पुल - सुनीता, आचवल - सुनीता आणि जीए - सुनीता यांच्यातील मैत्री विलक्षण होती.
या मैत्रीच्या कल्लोळात या सगळ्यांकडून त्यांच्या विचारांबद्दल, भावनांबद्दल, कलेबद्दल आणि तत्त्वज्ञानाबद्दल जे काही लिहिले गेले, ती संवेदनशील मानवी आयुष्याची एक धडकती दास्तान आहे...
.................................................................................................................................................................
लेखांक : पहिला
सुनीताबाई देशपांडे यांच्यासाठी कला जीव की प्राण होता. लौकिकापेक्षा अलौकिकाला त्यांच्या मनात फार मोठे स्थान होते. त्यांच्यासाठी अलौकिकापुढे लौकिक तुच्छ होते. कला, कलेतील चैतन्य, कलेतील सौंदर्य, या जगातील सौंदर्य आणि सत् म्हणजे जीवनमूल्ये यांच्या शोधात त्यांचे सर्व जीवन व्यग्र राहिले.
मैत्री आणि प्रेम हे मानवी प्रगतीचे महामार्ग आहेत, याची सुनीताबाईंना जाणीव होती. पहिल्यांदा त्यांना स्त्री सुलभ आकर्षणातून आलेली पुलंची मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पुलंमधील कलेचे आकर्षण होते. नंतरच्या आयुष्यात पुलंच्या पलीकडे जाऊन आपल्या भावनिक, वैचारिक आणि तत्त्वज्ञानात्मक उत्क्रांतीच्या शोधात त्यांची पहिल्यांदा माधव आचवल आणि नंतर जी. ए. कुलकर्णी यांच्याशी सुंदर मैत्री झाली. पुल तर त्यांचे जीवनच होते, पण आचवल आणि जीए हे दोघेही सुनीताबाईंच्याच भाषेत सांगायचे, तर त्यांच्यासाठी ‘जिव्हाळघरटी’ होऊन गेली होती.
सौंदर्य आणि सुख-दुःख यांच्याभोवती बहुतांश कलेचा संसार मांडला गेलेला असतो, पण कलेचे मूळ ईप्सित जीवनाच्या शोधातच लपलेले असते. बाई लिहितात - “रत्न, नक्षत्र, झरा, फूल, सुख, दुःख... साऱ्या शब्दांना अस्तित्व असते, पण स्वतंत्र सामर्थ्य प्राप्त होते, ते आपण त्यांना संदर्भ देऊन आपल्या आतड्याशी अर्थाची व गाठ मारतो त्या वेळीच ना? असे शब्द मग कवितेत वगैरे चिरंजीव होऊन राहतात.” सौंदर्य आणि मानवी सुख-दुःखांचे रेखाटन आणि या दोन माध्यमांतून जीवनाच्या अर्थाचा शोध, अशी मांडणी त्यांच्या मनात तयार झालेली होती.
सुनीताबाईंना पुलंचा मनसोक्त सहवास मिळाला. पुलंच्या कलेच्या सगळ्या प्रेरणा कळत-नकळत त्यांना आत्मसात होत गेल्या. पुढे आयुष्याच्या वाटचालीत त्यांची माधव आचवल आणि जीए कुलकर्णी यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीमुळे त्यांना आचवल आणि जीएंच्या कलेचा आणि आपल्या व इतरांच्या कलेकडे हे दोघे प्रतिभावंत नक्की कसे बघतात, याचा अंदाज घेता आला. त्यातून या दोघांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान काय आहे, हे समजून घेता आले.
सुनीताबाईंची आचवलांशी मैत्री तीन दशकांची होती. या काळात त्यांच्या आचवलांबरोबर अनेक चर्चा झाल्या. जीए आणि सुनीताबाई यांचा स्नेह फक्त नऊ-दहा वर्षांचा होता. दोघेही पन्नाशीच्या बरेच पुढे गेल्यावर त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. तो जीएंच्या ६४व्या वर्षी झालेल्या मृत्यूबरोबर संपला. या नऊ-दहा वर्षांत जीए आणि सुनीताबाई यांच्यात विस्तृत पत्रव्यवहार झाला. जीएंनी त्यांना तीनशे छापील पाने होतील एवढी पत्रे लिहिली. सुनीताबाईंनी जीएंना लिहिलेल्या पत्रांचा संग्रहसुद्धा एकशे ऐंशी छापील पानांचा आहे.
जीए आणि सुनीताबाई यांच्यातील नाते नेमके कोणत्या प्रकारचे होते, याविषयी विविध विचारवंतांनी विविध मते व्यक्त केली आहेत. ‘जीएंची पत्रे’ या संग्रहाच्या पहिल्या खंडाचे संपादक ग. प्र. प्रधान म्हणतात की, सुनीताबाईंचे प्रेम एखाद्या बहिणीच्या आणि मैत्रिणीच्या जातीचे होते.
सुनीताबाईंनी जीएंना लिहिलेली पत्रे ‘प्रिय जीए’ या संग्रहात प्रसिद्ध झालेली आहेत. या संग्रहाचे संपादन अरुणा ढेरे यांनी केले आहे. त्याच्या मते सुनीताबाईंच्या रूपाने जीएंना एक ‘मायेचे माहेर’ भेटले. ढेरे म्हणतात, बहीण, मैत्रीण, सखी आणि आईही होऊ शकणारी ही व्यक्ती जीएंच्या आयुष्यात आली. प्रधान आणि ढेरे यांना ‘बहीण’ वगैरे शब्द वापरावेसे वाटले, याचे आश्चर्य वाटते. कारण या दोघांच्या पत्रव्यवहारात ‘भाऊ-बहीण’ या नात्याचा संदर्भ कुठेही सापडत नाही. सुनीताबाईंमध्ये एक ‘पेरेंटिंग’ व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांच्यातील आईची छाया त्यांच्या सगळ्या नात्यांवर पडलेली होती, हेच दिसते. ढेरे त्यांच्या प्रस्तावनेमध्ये ‘मैत्री’ अधोरेखित करतात, त्यासाठी त्या ‘मैत्र’ हा शब्द वापरतात. त्याचबरोबर खालील ओवी देतात -
‘की आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटितां
ऐसा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ।।’
(कुमुदिनी म्हणजे कमळाचे फूल. हे कमळाचे फूल, चंद्र प्रकट झाला असता, आपली जागा न सोडता, दुरूनच, अनुराग भोगते. अनुराग म्हणजे प्रेम. संस्कृत साहित्यात रात्री फुलणारी कुमुदिनी ही चंद्राची आणि सकाळी फुलणारी कुमुदिनी ही सूर्याची प्रेयसी असते, असे मानले गेले आहे.)
या पार्श्वभूमीवर ढेरे बाई लिहितात की हा ‘चंद्र’ मैत्रीचा होता. पुढे त्या लिहितात - “नाना भावनांनी डवरलेल्या शैलीतील सुनीताबाईंची ही पत्रे वाचताना स्त्री-पुरुषांमधील्या प्रौढ-सुंदर मैत्रीचा एक समंजस खेळ दृष्टीला पडतो आणि असेही वाटते की, आपल्या भाग्यानेच आपल्या कातरकाळ्या आयुष्यात ही चांदणीसारखी मैत्रीण आली, असे एखाद्या लख्ख क्षणी जीएंनी निदान स्वतःशी तरी नक्कीच कबूल केले असेल.”
‘बहिणीचे प्रेम’, चंद्र आणि कुमुदिनी यांच्यामधील ‘मैत्री’, स्त्री-पुरुषांमधील्या प्रौढ-सुंदर मैत्रीचा एक ‘समंजस’ खेळ, चांदणीसारखी मैत्रीण; ढेरेबाईंनी मनसोक्त गोंधळ उडवून दिला आहे.
सुनीताबाई आणि जीए यांच्यातील सुंदर मैत्री, वेडेवाकडे अर्थ न काढता मराठी वाचक समजून घेतील, असे प्रधान आणि ढेरे यांना वाटले नसावे. प्रधान यांची प्रस्तावना १९९४ची आणि ढेरेबाईंची प्रस्तावना २००४ची आहे. म्हणजे, अगदी आधुनिक काळात हा गोंधळ घातला गेला.
जीए-सुनीताबाई यांच्या मैत्रीचे सगळ्यात सखोल ‘इंटरप्रिटेशन’ दत्ता दंडगे यांनी त्यांच्या ‘सोहम कोहमच्या गोष्टी’ या नाटकात केले आहे. पुलं, सुनीताबाई, आचवल आणि जीए यांच्यावरील या नाटकात सुनीताबाईंचा स्वतःचा शोध रेखाटण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मी कोण आहे आणि माझ्या आयुष्याचा अर्थ काय, अशा प्रश्नांचा शोध त्या घेत होत्या, म्हणून ‘सोहम कोहमच्या गोष्टी’.
पात्रांची मूळ नावे कायम ठेवून हे नाटक करायला सुनीताबाईंनी परवानगी दिली नाही. कारण दंडगे यांनी जीए-सुनीताबाई यांच्या नात्याचे फार गडद अर्थ लावले आहेत, असे त्यांना वाटले. वास्तविक, तसे काही नाही, हे नाटक पाहिल्यावर वाटते.
या नाटकात सुनीताबाईंच्या शोधाचा प्रवास जीए आणि आचवल यांच्याशी झालेल्या संवादातून मांडला आहे. त्यामुळे त्यांची जीए आणि आचवल यांच्याशी असलेली मैत्री या नाटकात आली आहे. परंतु सुनीताबाईंची पुलंशी असलेली मैत्री जीए आणि आचवल यांच्या मैत्रीएवढीच किंवा त्याहूनही महत्त्वाची असली, तरी हे नाटक ती मांडत नाही. असो.
‘सोहम कोहमच्या गोष्टी’ हे नाटक ही या लेखमालेची मूळ प्रेरणा आहे. नाटक हे माध्यम निवडले गेले असल्याने वेळेची आणि संवांदामधून सगळे सांगण्याची मर्यादा पडली. या चौघांकडेही प्रतिभेचे आणि भावनांचे अपरंपार वैभव होते. त्याला या नाटकात न्याय मिळाला नाही, म्हणून हे लेख लिहावेसे वाटले.
खरं तर, जीए आणि सुनीताबाई ही मैत्री अतिशय समृद्ध होती. मानवी आयुष्यातील विविध प्रश्नांच्या चर्चा या मैत्रीत झडल्या. जीए प्रकांड वाचक आणि चिंतकही होते. त्यांनी अगदी हिरीरीने आपली मते सुनीताबाईंसमोर आणि फक्त त्यांच्यासाठी मांडली. त्याचबरोबर आपले मन आणि काही जखमा उघड्या केल्या. या दोघांच्या मैत्रीची व्याख्या करत बसण्यापेक्षा ही मैत्री किती समृद्ध आणि बहारीची होती, हे बघणे जास्त मनोज्ञ ठरते. त्याचबरोबर सुनीताबाईंच्या बाकी दोन्ही मैत्र्या किती सुंदर आणि अर्थपूर्ण होत्या, हे बघणेसुद्धा.
सुनीताबाईंनी या तिघांबद्दल खूप लिहिले आहे. त्यात त्यांनी त्यांच्यासमोर आपण कसे सामान्य आहोत, हे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यांच्याकडे जशी असामान्य प्रतिभा आहे, तशी आपल्याकडे नाही, हेही त्या आवर्जून सांगतात.
आपल्याला बुद्धीचे थोडेबहुत लेणं लाभलेलं आहे, हे बाईंना माहीत होतं. तसा उल्लेख त्या ‘आहे मनोहर तरी’मध्ये करतात. त्याचबरोबर तौलनिक विचारशक्ती, कष्टाची आवड आणि त्यागाचे आकर्षण, अशा काही गोष्टी आपल्याकडे आहेत, याचीसुद्धा त्यांना जाण होती. तरीही आपण कलावंत, लेखिका अथवा विचारवंत नाही आहोत, याची स्पष्ट जाणीव होती. कलावंत असणे, प्रतिभा असणे याला बाईंच्या मनात फार मोठे स्थान होते. त्या आकर्षणापोटीच त्या या तीन मित्रांकडे ओढल्या गेल्या.
सुनीताबाई अतिशय कमी माणसांमध्ये रमल्या. त्या लिहितात - “मी तशी रेशमाच्या किड्याच्या जातीची, स्वतःभोवती छोटासा कोष विणून त्यात राहणारी व्यक्ती आहे. माझ्या या बंदिस्त जगात ज्यांना स्थान आहे अशी मोजकीच माणसं आहेत. तिथे त्यांच्या मनाचे आणि मतांचे फार मोल आहे. त्या बाहेरील जगाला माझ्या हिशेबी काही महत्त्व नसावे. …मला योग्य वाटेल तिथे कितीही आणि काहीही देताना आणि पुढल्या क्षणी ते विसरूनही जाताना मला मी पाहिले आहे.”
पुल, आचवल आणि जीए ही अत्यंत वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे होती. ती कशी हे पाहूच, पण त्याआधी सुनीताबाईंना या तिघांमध्ये काय साम्ये दिसली, म्हणून त्यांनी त्यांच्याशी मैत्री केली, हे पाहू.
पहिले म्हणजे सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता.
पुलंमधील जन्मजात सुसंस्कृतपणाच्या आणि समजूतदारपणाच्या मोहात बाई पडल्या. पुलंचा हजरजबाबीपणा हेसुद्धा त्यांच्यासाठी एक मोहाचे स्थान होते. पुल आयुष्यभर एखाद्या लहान मुलासारखे भाषेशी खेळत राहिले. पुलंसाठी जीवन हा एक उत्सव होता. त्यामुळे तो बाईंच्याही व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून गेला. पुलंमधील परावलंबी मूलपणा आणि आपल्यामधील थोडाबहुत कर्तबगार आईपणा, या गुणांमुळे आपला संसार इतकी वर्षं टिकला, असे त्या लिहितात.
सुनीताबाई स्त्री-पुरुषांमधली शरीराची ओढ किती तीव्र असते, हे जाणून होत्या, परंतु त्यांना स्त्री-पुरुष प्रेमातून येणारी मानसिक देवाण-घेवाण जास्त महत्त्वाची वाटत होती. “आंतरिक ओढीतून निर्माण झालेली शारीरिक ओढ कितीही जबरदस्त असली, तरी त्या एकत्र येण्यात स्वत:हून स्वीकारलेली मानसिक बंधने अधिक प्रभावी असतात…” असं त्यांनी लिहून ठेवलंय.
त्यांचे पुलंवर प्रेम होते, त्यांना सांभाळण्यात त्या कृतार्थ होत्या. पुलंमधील लहान मुलाचा फार मोठा मोह सुनीताबाईंना होता. परंतु तरी आपण अपूर्ण आहोत, ही भावना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनून राहिली होती. परिपूर्णतेच्या शोधात बाई सतत अस्वस्थ राहिल्या. त्यांना मानवी आयुष्याचे अपूर्णत्व छळत राहिले. पण असे असले तरी त्यांना पुलंचा समाधानी स्वभावही मोहवत राहिला. पुलंमधील समाधानाचा आणि सुनीताबाईंमधील असमाधानाचा शोध म्हणजे त्यांच्यामधील सुंदर मैत्रीचा शोध.
माधव आचवल ही एक मोठी असामी होती. साहित्य, वास्तुशास्त्र, चित्रकला आणि शिल्पकला अशा अनेक विषयांत त्यांना मन स्तिमित करणारी गती होती. या विलक्षण माणसातही एक लहान मूल लपलेले आहे, हे सुनीताबाईंना जाणवले.
जीए तर जीएच होते. अनेक दशके रोज पाच-सातशे पाने वाचून अत्यंत समृद्ध झालेले व्यक्तिमत्त्व. सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांमध्ये त्यांनी आपले ‘साहित्यिक मन’ उघडे केले आहे. जीएंमध्येसुद्धा एक लहान मूल सुनीताबाईंना दिसले.
जीए फार कुणाला भेटत नसत. काही ना काही कारणे देऊन भेटी टाळत. ती कित्येकदा बालिश असत. लोकांना न भेटण्याचा हा अट्टाहासदेखील सुनीताबाईंना बालिश वाटत असे. त्या जीएंना लिहितात - “माझ्या भावाच्या मुलाला लहानपणी उंच, कुठंतरी चढून लपून बसायची खोड होती. तिथं कसा पोहोचत असे हे कोडंच असायचं. पण खूप शोधाशोध झाल्यावर तो माळ्यावर, नाहीतर कपाटावर लपलेला दिसला की, आम्ही काही बोलण्यापूर्वी तोच सांगायला लागायचा, ‘लहान मुलांनी असं उंचावर चढू नये की नाय? मग पडला तर पाय मोडतो. मग सगळे लोक लंगडा लंगडा म्हणणार. आणि कुणीसुद्धा खेळायला घेणार नाय. आणि डोकं फुटलं तर? मग मरायलाच होणार...’ त्याला सगळी थिअरी पाठ असायची. पण प्रत्यक्षात मात्र तो उंचावरच कुठंतरी लपलेला सापडायचा. काही माणसं वयानं वाढली तरी काही बाबतींत अशी पोरकटच राहत असावी. त्यांना फक्त थिअरी पाठ असते.”
शॉपेनहॉवरच्या ‘सेक्युलर दृष्टी’तून बघा किंवा श्री अरविंद यांच्या ‘आध्यात्मिक दृष्टी’तून - कलेचे स्थान मानवी जीवनात अपरिहार्य आहे. पुल, आचवल आणि जीएंचे कलेविषयीचे लिखाण बघितले की, शॉपेनहॉवर आणि श्री अरविंद नक्की काय म्हणत आहेत, हे आपल्या लक्षात येत जाते. अर्थात पुल, आचवल, जीए आणि सुनीता हे चौघेही तत्त्वज्ञ नव्हते. या जगातले अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी मांडी ठोकून बसलेले योगी वगैरेही नव्हते. आपण असतो तशाच गुणदोषांनी लिप्त असलेली ही माणसे होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पृष्ठभागावरून त्यांच्या गुणांची ‘शुभ्र गंगा’ आणि त्यांच्या दोषांची ‘काळी यमुना’ वाहत होती. परंतु त्यांच्या अंतर्यामी त्यांच्याही कळत-नकळत कलेची सरस्वती वाहत होती.
पुल आणि सुनीताबाई यांची माधव आचवल यांच्याशी तीन दशकांची मैत्री होती. आचवलांबद्दल पुलं लिहितात - “माधवची ‘एक छोटा माधव’ आणि ‘एक मोठा माधव’ अशी दोन रूपे मनाला भावायची. त्याच्या त्या चिमुकल्या मूर्तीत आणि हालचालींत, रागावण्याचा अभिनय करून बोलण्यात आणि घटकेत मनापासून हसण्यात एक प्रकारचे ‘बालपण’ असायचे.”
पुलंना दुजोरा देत सुनीताबाई आचवलांबद्दल लिहितात - “माधवचे डोळे मुळातच हसरे आणि ओले ओले होते. तो हसायला लागला म्हणजे तर ते तुडुंब व्हायचे.”
पुल, आचवल आणि जीए यांच्यातील लहान मुलांकडे बाई ओढल्या गेल्या. कारण विश्वास हे मूल्य बाईंना मैत्रीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे वाटत होते. त्या लिहितात - “मित्र म्हणजे विश्वास. तिथे भांडण शक्य आहे, पण गैरसमजाला थारा नाही.”
अविश्वास आहे तिथे मैत्री कशी असेल? हे लोक विश्वासघात करणार नाहीत, असा विश्वास सुनीताबाईंना वाटला. विश्वास तयार झाल्यामुळे या तिघांना समजून घेणे त्यांना सोपे गेले. या तिघांच्या व्यक्तिमत्त्वात कसलाच कावा आणि कपट नसल्यामुळे त्या निर्धास्त होत्या.
एखाद्या लहान मुलाप्रमाणे निरागसता हा तिघांच्याही व्यक्तिमत्त्वाचा एक भाग होता. तिघांशीही बाईंचे खटके उडाले, भांडणे झाली, पण यांच्याकडे कावेबाजपणा नाहीये, हे बाईंना स्पष्टपणे कळत असल्याने त्यांनी त्यांच्यासमोर दरवेळी पडते घेतले. पुल आणि जीए छोट्या-मोठ्या लबाड्या करत, पण दोघेही इतके निर्मळ होते की, लगेच पकडले जात. बाईंना राग येण्यापेक्षा त्या लबाड्यांची गंमतच वाटे.
स्त्रीच्या प्रेमाच्या संकल्पनेमध्ये आपल्याला समजून घेतले जावे, अशी एक सनातन अपेक्षा असते. पण फार कमी स्त्रियांची ही अपेक्षा पूर्ण होताना दिसते. कारण समजूतदारपणा अतिशय कमी नात्यांमध्ये दिसून येतो. सुनीताबाई याचे कारण ‘अहम्’मध्ये शोधतात. त्या लिहितात, “समजूतदारपणा ही इतकी दुर्मीळ चीज का असावी? माणसाच्या ‘अहम्’चा प्रभाव किती जबरदस्त आणि सर्वव्यापी आहे.’’
‘अहम्’मुळे माणूस समजुतीपासून दूर जातो. लहान मूल हे लहान मूल असते, कारण त्याच्यावर ‘अहम्’चा फारसा पगडा नसतो. पुल, आचवल आणि जीए, या तिघांनी आपला अहम् आणि आपले व्यक्तिमत्त्व या ना त्या प्रकारे बाईंपुढे समर्पित केल्याचे दिसते. त्याची त्यांना जाणीव होती. त्यामुळेच त्या या तिघांच्या मृत्यूपर्यंत आणि त्यानंतरही त्यांची मैत्रीण बनून राहिल्याचे दिसते. उलट या तिघांच्या मृत्यूनंतर बाईंची मैत्रभावना अजून तीव्र होत गेली. या तिघांची मैत्री बाईंना मिळाली, पण त्यांचे मन भरले नव्हते. या मित्रांच्याच काय, पण आपल्या स्वतःच्या मृत्यूनंतरही त्यांना ही मैत्री कायम ठेवायची होती.
एका बाजूला सुंदर लहानपण आणि दुसऱ्या बाजूला विलक्षण प्रगल्भता, असे हे तिघे होते. ते आपापल्या प्रांतांमध्ये सौंदर्याचा वेध आणि जीवनाच्या अर्थाचा शोध घेत होते. सुनीताबाईंना संगीत, चित्रकला, शिल्पकला, कविता, आणि एकूण साहित्य यांतील सौंदर्य कळत होते, पण या तिघांकडे असलेली प्रातिभ संचार-क्षमता नव्हती. हे तिघेही सर्जक होते. बाईंकडे सर्जनशीलता नव्हती. त्या या तिघांचे सर्जन आणि त्यांनी इतर कलानिर्मितीला दिलेली दाद एन्जॉय करत राहिल्या. त्याद्वारे स्वतःचे आयुष्य संपन्न करून घेत राहिल्या. निर्मितीप्रवाहाच्या काठावर बसून कलेचा आणि अर्थाचा शोध घेत राहिल्या.
हे जग जितके सुंदर आहे, तितकेच भ्रष्टही आहे. जितके सुखदायी आहे, तितकेच दुःखपूर्णही आहे. त्याचा आपल्याला खूप त्रास होत असतो. अशा वेळी संवेदनशील माणसापुढे या जगाशी भांडण मांडून बसणे किंवा या जगातील सौंदर्याच्या आश्रयाला जाणे, असे दोन पर्याय उभे राहतात.
सुनीताबाईंचे तीन मित्र कमालीचे सौंदर्यासक्त होते. आचवलांवर या जगातील रूपाच्या सौंदर्याची मोहिनी होती, जीएंवर साहित्याची म्हणजे शब्दांमधून होणाऱ्या विचारांची आणि भावनांची मोहिनी होती. पुल लेखक म्हणून प्रसिद्ध-लोकप्रिय असले तरी त्यांच्यावर मुख्यत्वेकरून संगीताची मोहिनी होती.
या तिघांच्या व्यासंगाचा अंदाज घेणे म्हणजे सुनीताबाईंच्या या तिघांशी असलेल्या मैत्रीचा अंदाज घेणे.
पुल, आचवल, जीए आणि सुनीताबाई यांची कला ‘माये’च्या संकल्पनेपाशी येऊन थांबली आहे, असे दिसते. त्यांना पुढे ‘आनंदतत्त्व’ खुणावत आहे, त्याचा मोहसुद्धा पडला आहे, पण शॉपेनहॉवरप्रमाणेच बुद्धीच्या अंगणातून त्यांना पुढे जाववत नाहीये, असे वाटते. इथे आपल्या मनात अजून एक प्रश्न येतो की, दुःखापासून आणि अस्वस्थतेपासून सुटका, एवढेच काम कला करते का? कलेचे सकारात्मक काम पाहायचे असेल, तर आपल्याला उपनिषदातल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना श्री अरविंद यांच्याकडे यावे लागते. त्यांनी आधुनिक जगाच्या संदर्भात उपनिषदातील तत्त्वज्ञान उलगडून दाखवले आहे.
संवेदनशील माणूस कलात्म निर्मितीकडे का ओढला जातो? लौकिक आयुष्यापेक्षा अलौकिक आयुष्य त्याला जास्त महत्त्वाचे का वाटते? संवेदनशील माणसाला आयुष्याचा अर्थ का शोधावासा वाटतो? संवेदनशील माणसाला आदर्शांची ओढ का असते? या प्रश्नांचा विचार करायला सुरुवात केली, तर उत्तरे आपल्याला पटकन सुचत नाहीत. त्यासाठी तत्त्वज्ञानाकडे जावे लागते.
सुनीताबाई आणि त्यांचे तीन कलावंत मित्र, यांच्यातील मैत्रीच्या नात्याकडे तत्त्वज्ञानाच्या चष्म्यातून बघितले तर आपल्याला अंदाज येतो. कलेच्या प्रेमातून ही मैत्री तयार झाली असली, तरी कलेचे प्रेम नक्की कुठून तयार होते, हे लक्षात घेतल्याशिवाय या ‘कलाप्रेमा’ची ‘गहराई’ समजणार नाही.
सूर, रूप आणि शब्द अशी ही तीन माध्यमे तीन मित्रांच्या रूपाने सुनीताबाईंच्या आयुष्यात आली. यातले संगीत हे सगळ्यात शुद्ध माध्यम! पुल जन्मभर संगीतात राहिले. त्यांचे संगीतावरचे लेखन बघितले, तर त्यांचा मुख्य शोध संगीत हाच होता, हे लक्षात येते!
या जगातील अनेक मोठ्या तत्त्वज्ञांनी संगीताला फार मोठे स्थान दिले आहे. प्लेटोपासून काम्यूपर्यंत अनेकांनी संगीताचा एक शुद्ध कला म्हणून आदर केला आहे. परंतु, शॉपेनहॉवरने संगीताला तत्त्वज्ञानात जसे गुंफले आहे, तसे कोणी गुंफलेले नाही. संगीताची आणि त्यातील अभिजात सौंदर्याची अनावर धुंदी आपल्या जीवनातून दुःखाला कशी हद्दपार करते, हे शॉपेनहॉवरने समजावून सांगितले आहे.
शॉपेनहॉवरची जीवनदृष्टी समजून घेतली, तर पुलंसाठी संगीत नक्की काय होते, हे उमजते. किंबहुना पुल, सुनीताबाई, आचवल आणि जीए यांच्या वा इतर कुणाही संवेदनशील कलावंत आणि व्यासंगी व्यक्तीच्या कलाप्रेमाचा यथायोग्य अंदाज घ्यायचा असेल, तर आपल्याला शॉपेनहॉवरच्या तत्त्वज्ञानाच्या सहवासात काही क्षण घालवावे लागतात.
शॉपेनहॉवरच्या मते जग दोन गोष्टींनी बनलेले आहे. एक म्हणजे या जगाचे सार आणि दुसरे म्हणजे हे दृश्य जग. या जगाचा ‘इनर इसेन्स’ आणि त्याची अभिव्यक्ती असलेले आपल्याला दिसणारे जग. जगाच्या या ‘इनर इसेन्स’ला शॉपेनहॉवर ‘जगण्याची इच्छाशक्ती’ (Will to live) असे नाव देतो.
ही वैश्विक इच्छाशक्ती संपूर्ण निसर्गामध्ये व्यक्त होताना दिसते. जगण्याच्या इच्छा, इतर वासना आणि इच्छा, त्यांतून जन्मलेली तडफड, त्यांमधून जन्मलेली कमतरतेची भावना, या इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली अविरत प्रयत्नशीलता आणि या सगळ्या गोंधळामुळे तयार झालेली अस्वस्थता.
शॉपेनहॉवर म्हणतो, ही इच्छाशक्ती अज्ञानाने झाकोळलेली असते. तिला कसलेही ध्येय नसते. ती अंध असते. ती काळाच्या पलीकडची असते. ही इच्छाशक्ती जगाच्या सगळ्या रूपांमध्ये लपलेली असते.
आपण सगळे निसर्गाचाच भाग असल्यामुळे ही इच्छाशक्ती आपल्यामधूनही व्यक्त होत राहते. या कधीही तृप्त न होणाऱ्या इच्छाशक्तीमुळेच आपले जीवन अस्वस्थतेमुळे भरून गेलेले असते. आपल्या मनात आपल्या कळत-नकळत अपूर्णतेची एक भावना सतत वास करून राहिलेली असते. त्यातून सुटायचे असेल, तर आपल्याला या अतृप्त इच्छाशक्तीच्या कचाट्यातून बाहेर पडावे लागते. पुलं, आचवल, जीए यांच्यासारखे सगळेच कलावंत आपल्या अपूर्णत्वाच्या भावनेतून कला करत असतात, असे शॉपेनहॉवरचे म्हणणे.
या इच्छाशक्तीच्या पाशातून बाहेर पडण्याचे कलेव्यतिरिक्तचे इतरही काही मार्ग शॉपेनहॉवर सांगतो. उदा., त्यागाचा, करुणेचा, तत्त्वज्ञानाचा आणि आध्यात्मिक अनुभवाचा मार्ग!
मैत्री आणि प्रेम हे मानवी प्रगतीचे महामार्ग आहेत, याची सुनीताबाईंना जाणीव होती. पहिल्यांदा त्यांना स्त्री सुलभ आकर्षणातून आलेली पुलंची मैत्री आणि प्रेम या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर पुलंमधील कलेचे आकर्षण होते. नंतरच्या आयुष्यात पुलंच्या पलीकडे जाऊन आपल्या भावनिक, वैचारिक आणि तत्त्वज्ञानात्मक उत्क्रांतीच्या शोधात त्यांची पहिल्यांदा माधव आचवल आणि नंतर जी. ए. कुलकर्णी यांच्याशी सुंदर मैत्री झाली. पुलं तर त्यांचे जीवनच होते, पण आचवल आणि जीए हे दोघेही सुनीताबाईंच्याच भाषेत सांगायचे, तर त्यांच्यासाठी ‘जिव्हाळघरटी’ होऊन गेली होती.
पुल, आचवल, जीए आणि सुनीताबाई यांची विचारांची आणि भावनांची देवाण-घेवाण पाहिली की, हे प्रतिभावंत वरील सगळेच मार्ग त्यांच्याही कळत-नकळत कसे अवलंबत होते, हे पाहायला मिळते.
त्यामुळे शॉपेनहॉवरचे हे मार्ग माणसावरची इच्छाशक्तीची पकड ढिली कशी करतात, हे पाहायला हवे.
त्याग करण्याच्या सवयीमुळे इच्छा कमी होतात आणि आपल्यावरची इच्छाशक्तीची पकड कमी होते. कलेतील सौंदर्याच्या अनुभवामुळे आपण स्वतःला काही काळासाठी तरी विसरतो. करुणेमुळेसुद्धा आपण स्वतःला जे अतिरेकी महत्त्व देतो, ते महत्त्व कमी होते. तत्त्वज्ञानामुळे आपण आपल्या कोषातून बाहेर पडतो. शॉपेनहॉवर आध्यात्मिक भाषेत बोलत नाही, परंतु ते अनुभव खरे असू शकतात, असे त्याचे म्हणणे आहे.
या सर्व मार्गातील कुठल्या ना कुठल्या मार्गावरून आपण कळत न कळत का होईना चालतो किंवा चालण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या गरजा कमी केल्या पाहिजेत, असे आपल्याला वाटत असते. मूड गेला की, आपण गाणे ऐकतो, एखाद्या प्रॉब्लेमने हताश झालो की, काही ना काही तत्त्वज्ञान बोलतो. स्वार्थाच्या बाहेर पडून जगात रमायचा प्रयत्न करतो.
पुल, जीए आणि आचवल यांच्यासारखे प्रज्ञावंत जन्मभर कलेची साधना करतात, कलेच्या मार्गाने सुकून प्राप्त करून घेतात. सुनीताबाई आणि जीए त्यागाच्या मार्गाने चालायचा प्रयत्न करतात. जीए आणि आचवल यांना गूढ अनुभवाबद्दल आकर्षण वाटत राहिले. पुलंच्या विनोदाला करुणेची झालर असते. कला, त्याग, करुणा आणि तत्त्वज्ञान हे सगळेच एकमेकांच्या हातात हात घालून चालले आहेत, हे या चौघांची आयुष्यं पाहिली की, आपल्या लक्षात येते.
हे दिग्गज जाणतेपणाने शॉपेनहॉवरच्या मार्गावरून चालत नव्हते. आपणही जाणतेपणाने त्या मार्गावरून चालत नसतो. सगळी मानवजात अनाहूतपणे ज्या मार्गावरून चालते, त्याचे निरीक्षण करून शॉपेनहॉवर मानवजात त्या मार्गांवरून का चालत आहे, ते मार्ग नक्की कुठे जात आहेत, हे सांगत असतो. खऱ्या तत्त्वज्ञानाचे आणि मानवी जीवनाचे तंबोरे एका सुरात झंकारताना आपल्याला दिसतात.
आता प्रश्न असा येतो की, भारतीय तत्त्वज्ञान याबद्दल काही सांगते का? उपनिषदे काय सांगतात? खरं तर शॉपेनहॉवरने आपली ‘वैश्विक इच्छाशक्ती’ची संकल्पना उपनिषदांवरूनच घेतली होती, असे म्हटले जाते. अस्वस्थ इच्छाशक्तीची कल्पना शॉपेनहॉवरला ‘माये’च्या संकल्पनेवरून सुचली असावी, असा अंदाज अनेक विचारवंतांनी व्यक्त केला आहे.
उपनिषदीय तत्त्वज्ञान म्हणते की, हे जग ब्रह्म या सर्वोच्च तत्त्वापासून तयार झाले आहे. पण गंमत अशी की, ब्रह्म स्वतः हे जग तयार करत नाही. ते पहिल्यांदा सृजन करणारे तत्त्व तयार करते. आणि सगळ्या जगाचे सृजन करणारे हे तत्त्व नंतर ‘माया’ तयार करते.
थोडक्यात, हे चल आणि अचल जग, या जगातील सृजन, या जगातील सृजनाचे कायदे, अशा सगळ्या गोष्टी मिळून ‘माया’ तयार होते. भौतिक आणि इतर शास्त्रांचे नियम हेसुद्धा मायेचाच भाग. माणसाचे मन, त्याच्या भावना, त्याची बुद्धी, त्याची जगत राहायची इच्छा, हा सगळा मायेचाच भाग. आपण या जगापासून वेगळे आहोत, हा ‘अहम् भाव’सुद्धा मायेचाच भाग आहे. ही माया सतत बदलणारी आहे, म्हणून अशांत आहे.
सगळ्यात जास्त अशांतता आपल्या बदलत राहणाऱ्या आयुष्यामुळे तयार झालेली असते. उदा. पैसे मिळतील का? मिळत राहतील का? पैसे पुरतील का? नाती कायम आणि सुंदर राहतील का? मृत्यू अचानक येईल का? हजार प्रश्न! या उलट ब्रह्म सतत असणार आहे, म्हणून शांत आहे. कायमचे अस्तित्व म्हणजे शांतता, ही संकल्पना नीट समजून घ्यायची असेल, तर गंमत म्हणून एक विचार करता येईल. आपल्याकडे पैसे कायम असतील, आपली नाती कायमची आणि सुंदर असतील आणि आपल्याला मृत्यू असणार नाही, आपण कायमचे आणि तरुण असणार आहोत, अशी खात्री आपल्याला वाटली, तर किती शांतता तयार होईल?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
येथे अजून एक गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. उपनिषदे सांगतात, आपण मायेचे अशांत रूप असलो, तरी आपल्यात ब्रह्माचा एक अंश लपून बसलेला असतो. म्हणजे अशांततेत शांतता लपून बसलेली असते, पण ती आपल्याला थेटपणे जाणवत नाही. आपल्या अशांत अपूर्णत्वाकडून शांत आणि आनंदमय पूर्णत्वाकडे जाणे म्हणजे ‘आध्यात्मिक प्रगती’.
बाकी काहीही असले, तरी एक गोष्ट नक्की सांगता येते- माणूस बदलाला घाबरतो, कारण त्याला सुंदर आणि शांत असे जीवन हवे असते. शॉपेनहॉवर नेमके हेच सांगतो. जीवनाच्या इच्छेमुळे सगळे जग अस्वस्थ आहे! शॉपेनहॉवरची अस्वस्थ इच्छाशक्ती आणि मायेची अस्वस्थता यातील साम्य लक्षात घेण्यासारखे आहे. उपनिषदांचचंही हेच सांगणं आहे की, इच्छेमुळे तयार झालेल्या अशांततेमधून सुटण्यासाठी मायेच्या पार जावे लागते. स्वतःला विसरावे लागते.
कलावंताची आयुष्ये बघितली, तर आपल्या लक्षात येते की, कळत-नकळत का होईना, नेमक्या या सगळ्या प्रश्नांचा शोध घेण्यासाठीच संवेदनशील कलावंत आपले जीवन कलेच्या किंवा ज्ञानाच्या साधनेत व्यतीत करतात. लौकिक आयुष्याला थोडे बाजूला ठेवून, हे लोक आपले आयुष्य कलेसारख्या अलौकिक गोष्टीत व्यतीत करत असतात.
येथे एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो की, ‘माये’सारखी संकल्पना मांडायची, पण ‘ब्रह्म’ ही संकल्पना नाकारायची, असे शॉपेनहॉवर का करतो? कारण ‘सेक्युलर तत्त्वज्ञ’ असल्याने तो बुद्धीच्या पलीकडे जायला तयार नाही. मानवी अस्वस्थता आणि एकूण विश्वातली अस्वस्थता आपल्या बुद्धीला दिसते, म्हणून शॉपेनहॉवर ती मान्य करतो. या उलट, आपल्यात लपलेली शांतता बुद्धीने जाणून घेता येत नाही, म्हणून तो ‘ब्रह्म’ या संकल्पनेवर बोलत नाही. ‘ब्रह्म’ जाणायचे असेल, तर त्यासाठी बुद्धीच्या पलीकडे जाऊन आध्यात्मिक अनुभव घेणे अनिवार्य ठरते. शॉपेनहॉवर स्वतःला माणसामध्ये दिसणाऱ्या जीवनाच्या इच्छेपर्यंतच मर्यादित ठेवतो. अर्थात आध्यात्मिक अनुभव खरे असू शकतात, असेही तो म्हणतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
पुल, आचवल, जीए आणि सुनीताबाई यांची कला ‘माये’च्या संकल्पनेपाशी येऊन थांबली आहे, असे दिसते. त्यांना पुढे ‘आनंदतत्त्व’ खुणावत आहे, त्याचा मोहसुद्धा पडला आहे, पण शॉपेनहॉवरप्रमाणेच बुद्धीच्या अंगणातून त्यांना पुढे जाववत नाहीये, असे वाटते.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
इथे आपल्या मनात अजून एक प्रश्न येतो की, दुःखापासून आणि अस्वस्थतेपासून सुटका, एवढेच काम कला करते का? कलेचे सकारात्मक काम पाहायचे असेल, तर आपल्याला उपनिषदातल्या तत्त्वज्ञानाचा विचार करताना श्री अरविंद यांच्याकडे यावे लागते. त्यांनी आधुनिक जगाच्या संदर्भात उपनिषदातील तत्त्वज्ञान उलगडून दाखवले आहे. कलेचे महत्त्व सांगताना माणसात लपून बसलेला आत्मा आणि कला यांच्यातील साम्य अधोरेखित केले आहे. ते म्हणतात -
“For the ancient Indian idea is absolutely true that delight, Ananda, is the inmost expressive and creative nature of the free self because it is the very essence of the original being of the Spirit. But beauty and delight are also the very soul and origin of art and poetry. It is the significance and spiritual function of art and poetry to liberate man into pure delight and to bring beauty into his life.”
(आनंद हे माणसाच्या आत्म्याचे मुख्य लक्षण आहे. त्याची अभिव्यक्ती म्हणजे कला. याच कारणामुळे सौंदर्य आणि आनंद हे कलेचेही मुख्य लक्षण असते. माणसाला त्याच्यामध्ये लपून बसलेल्या आनंदाच्या आणि मुक्ततेच्या राज्यात घेऊन जाणे, हे कलेचे मुख्य कार्य आहे. देहामध्ये म्हणजे मायेमध्ये बांधल्या गेलेल्या जीवाला त्याच्यामध्ये लपून बसलेल्या आनंदाच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायची असते. हीच ‘आध्यात्मिक प्रगती’. तिच्या उपजत ओढीमुळे माणूस कलेकडे आणि सौंदर्याकडे ओढला जातो.)
शॉपेनहॉवरच्या ‘सेक्युलर दृष्टी’तून बघा किंवा श्री अरविंद यांच्या ‘आध्यात्मिक दृष्टी’तून - कलेचे स्थान मानवी जीवनात अपरिहार्य आहे. पुल, आचवल आणि जीएंचे कलेविषयीचे लिखाण बघितले की, शॉपेनहॉवर आणि श्री अरविंद नक्की काय म्हणत आहेत, हे आपल्या लक्षात येत जाते.
अर्थात पुल, आचवल, जीए आणि सुनीता हे चौघेही तत्त्वज्ञ नव्हते. या जगातले अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी मांडी ठोकून बसलेले योगी वगैरेही नव्हते. आपण असतो तशाच गुणदोषांनी लिप्त असलेली ही माणसे होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पृष्ठभागावरून त्यांच्या गुणांची ‘शुभ्र गंगा’ आणि त्यांच्या दोषांची ‘काळी यमुना’ वाहत होती. परंतु त्यांच्या अंतर्यामी त्यांच्याही कळत-नकळत कलेची सरस्वती वाहत होती. ती नक्की कुठल्या समुद्राच्या ओढीने वाहत होती, या शोधाचा प्रवास म्हणजे कलेच्या तत्त्वज्ञानाचा प्रवास…
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Pradeep Gadgil
Sat , 11 November 2023
Well researched article. Very well written.