प्रसिद्ध नाटककार व स्तंभलेखक संजय पवार यांचं ‘शंभरातल्या नव्याण्णवास’ हे नवीन पुस्तक नुकतंच पिंपळपान प्रकाशन या नव्याकोऱ्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा कुळकर्णी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
संजय पवार यांचं लेखन एकदा आपण वाचलं की, पुढे ते काय लिहिताहेत, त्यांना काय म्हणायचंय, याकडे लक्ष ठेवावंसं वाटतंच. खास करून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रांतल्या विसंगतींबाबत त्यांचं विश्लेषण काय असेल, हे नेहमीच समजून घ्यावंसं वाटत आलंय. तीस-चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी लिहायला सुरुवात केली. आणि अजूनही ते लिहितायत.
इथे एका मैत्रिणीच्या कुटुंबातल्या आत्याबाईंविषयी सांगायचंय. आता नव्वदी पार केलीये या आत्याबाईंनी. त्यांची विचारशक्ती अजूनही चांगली शाबूत आहे. कुटुंबातल्या घडामोडींवर त्यांचं लक्षही असतं. कुटुंबातल्या व्यक्ती विपरीत वागतायत, चुकीच्या दिशेने विचार करतायत किंवा अयोग्य निर्णय घेतायत, असं जेव्हा जेव्हा आत्याबाईंना वाटतं, तेव्हा तेव्हा त्या, नात्यातल्या हितसंबंधांची पर्वा न करता तसं स्पष्टपणे बोलून दाखवतात. तसं बोलताना त्यांचं सुरुवातीचं ठरलेलं एक वाक्य असतं : “मला बोलल्याशिवाय राहवत नाही, म्हणून सांगतेय हो...”
आत्याबाई त्यांच्या चाळीशी-पन्नाशीपासून हे करत आल्यात. आत्याबाई बोलतात, चुका उलगडून सांगतात, धोके दाखवून देतात. त्या त्या वेळी काहींना राग येतो, कुणी नाराज होतं, त्यांचं सांगणं हा काहींना विनाकारण केलेला हस्तक्षेप वाटतो, अवलक्षणदेखील वाटतं. पण बऱ्याचदा घडलंय असं की, बोलल्याशिवाय राहवत नाही, म्हणून आत्याबाईंनी जे जे सांगितलं, ते कुटुंबातल्या संबंधित व्यक्तींनी ऐकल्याने, पटवून घेतल्याने, निर्णय बदलल्याने अनर्थ टळलेत. किंवा एरवी झालं असतं, त्याहून कमी नुकसान झालंय वगैरे. त्यामुळे आत्याबाई म्हणजे त्यांच्या कुटुंबातला ‘विवेकाचा आवाज’ आहेत. त्यांचं कुटुंबाविषयी ममत्व आणि कर्तव्य हे दोन्ही त्यांच्या आवाजातून व्यक्त होत असतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
संजय पवार यांचं कोणतंही लिखाण वाचलं की वाटतं, लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून हा माणूस लिहितोय. सभोवतालावर बारीक लक्ष आहे याचं. आणि त्या आत्याबाईंप्रमाणे हितसंबंध आड न येऊ देता जे डाचतंय ते स्पष्टपणे मांडतोय. त्यामागे आहे, आपल्या समाजाविषयीचं ममत्व. पवार फक्त लेखक नाहीत. ते चित्रकार आहेत, जाहिरातकार आहेत. एकांकिका, नाटक, चित्रपट ही माध्यमं त्यांनी सफाईदारपणे हाताळलीयेत. आणि ते सदरलेखकही आहेत. या प्रत्येकच ठिकाणी त्यांनी भाष्यकाराची, विश्लेषकाची भूमिका वठवली आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांत जिथे जिथे विसंगती आढळत आली, ती ते उघड करत आलेत. त्यांना वाटणारी खंत, चीड आणि दुःखदेखील इतकं प्रामाणिक आहे की, विसंगतीवर बोट ठेवण्यासाठी त्यांना कोणतीही चलाखी करण्याची गरजच नाही. तिथे गुळमुळीतपणाला जराही थारा नाही. त्यांची चिकित्सा नेमकी आणि थेट. हे एक उदाहरण :
“संपूर्ण देशासाठी संविधान तयार करण्याची जबाबदारी घेऊन ती उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या या विद्वानाला भारताचा नाही, तर दलितांचा नेता म्हणूनच लेबल लावून ठेवलंय?
आजही माध्यमक्रांतीनंतरही ‘जात’ न जाता, उलट ती बळकट होत चाललीय! आता पुढारी राष्ट्रीय अथवा राज्यस्तरीय असण्यापेक्षा ‘जातिवंत’ असण्यात अधिक गर्क असतात!
जे वर्ग एकेकाळी मागासवर्गीयांना, आरक्षणांना ‘सरकारी जावई’ म्हणत होते, तेच वर्ग आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून ‘मागासवर्गीय’ प्रवर्गात समाविष्ट करा म्हणून गर्जू लागलेत.
आज हे वर्ग जे आरक्षणासाठी आकाशपाताळ एक करतायत, राजकीय धमक्या देताहेत, ते, त्यांचे नेते ‘आरक्षणाचं सामाजिक तत्त्व’ संविधानात आग्रहाने अंतर्भूत करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करायला चैत्यभूमीवर येतील?
चैत्यभूमी सोडा, आपल्या जिल्हा, तालुका, गावातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालतील? त्यासाठी वेळ पडली तर महारवाड्यात, बौद्धवाड्यात, मिलिंद, रमाई, गौतम, सिद्धार्थ अशा नावांच्या वस्त्यांत जातील?” (‘बा, शोधू कुठं कुठं तुला?’, ८ डिसेंबर २०१३)
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा :
..................................................................................................................................................................
ऐंशीच्या दशकाच्या आगे-मागे संजय पवार हे नाव आधी चळवळीतल्या लोकांच्या परिचयाचं झालं. आणि नंतर हळूहळू मुख्य प्रवाहातल्या माध्यमांद्वारे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू लागलं. ‘आपलं महानगर’ (१९९०-२००५) या सायंदैनिकापासून ‘प्रहार’, ‘लोकसत्ता’ ते ‘कलमनामा’ पाक्षिक (२०१३-१४) आणि ‘अक्षरनामा’ पोर्टल (२०१७-२०)साठी पवार यांनी केलेलं सदरलेखन हे या तीन-चार दशकांच्या काळातल्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय विसंगतींचं मार्मिकपणे केलेलं ‘डॉक्युमेंटेशन’ आहे. उदाहरणार्थ रिअॅलिटी शो या प्रकाराविषयीचं त्यांचं हे भाष्य :
“भारताच्या बहुरंगी, बहुढंगी सामाजिक वास्तवाचा फायदा घेत मग या वाहिन्यांनी दुर्लक्षित प्रांत, समाजगट, भाषा यांतले स्पर्धक निवडून त्यांच्या करुण या कहाण्या प्रक्षेपित करत, शोच्या एका टप्प्यापर्यंत त्यांचा सहभाग चालू राहील असं पाहिलं. भारतीय मानसिकतेतली ‘आपला’ आहे, ही अस्मिता वाहिन्यांनी व्यवस्थित चेतवली आणि आपली रेटिंग वाढवत ठेवली. सुरुवातीला ‘गाण्या’पासून सुरू झालेले हे रिअॅलिटी शो नंतर ‘इन कॅमेरा’ लिव्हिंग दाखवणाऱ्या ‘बिग बॉस’पासून ‘कुछ भी करेगा’ इथपर्यंत येऊन पोहचले. या ‘कुछ भी करेंगे’ कार्यक्रमातून अक्षरशः ‘वाट्टेल’ ते दर्शकांना दिसू लागलं.
एरव्ही ज्यांची गिनती ‘सरफिरा’ अशी झाली असती, ते इथे ‘हिरो’ झाले, अर्थात याचं मूळ ‘गिनिज’ किंवा ‘लिम्का’ बुकात नोंद व्हावी, या प्रेरणेतून मिळालेलं आहे.” (‘नाटकाचा ‘रिअॅलिटी शो’ का करताय?’, २ मार्च २०१४)
त्यांच्या लेखनकाळाच्या सुरुवातीपासून, म्हणजे ‘महानगर’मधल्या ‘पानीकम’ या सदरापासून संजय पवारांच्या लेखनामागचा आंबेडकरी विचार उत्कटपणे जाणवत आला आहे. त्यांच्या कोणत्याही मांडणीचा पाया ‘आंबेडकरवाद’ आहे. हा ‘वाद’ नाही, तर जीवनधारणाच आहे. आंबेडकरी विचारांच्या प्रकाशझोतात गवसणारी वर्तमानातली सत्यं ते उलगडून दाखवत राहतात. आणि भविष्यातल्या धोक्यांबद्दल सावधही करतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘कलमनामा’तल्या सदराचा काळ २०१३-१४चा. आपल्या देशात अभूतपूर्व अशा मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली होती. नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता एकवटत होती. ‘आयडिया ऑफ इंडिया’ म्हटलं जातं, ती बहुविध आणि सर्वसमावेशक संस्कृती धोक्यात येऊ शकते, याची जाणीव होऊ लागली होती. या स्थितीवरची अनेक भाष्यं ‘कलमनाम्या’त आहेत. हा एक नमुना :
“मोदींचा गवगवा करणाऱ्यांनी मोदींच्या मंत्रीमंडळातील इतर दोन मंत्र्यांची नावं सांगावीत. मोदींचा आर्थिक विचार, मोदींचं परराष्ट्र धोरण, मोदींची सांस्कृतिक आवड यांबद्दल कुठे वाचलंय, पाह्यलंय? मोदींच्या आतला कर्मठ संघवाला, मुस्लीम विद्वेष ठासून भरलेला त्याच वेळी पहायला मिळाला, जेव्हा त्यांनी सद्भावना यात्रा, मेळावा भरवला, तेव्हा स्थानिक मुस्लीम नेत्यांनी त्यांना आलिंगन देऊन, मुस्लीम टोपी दिली. ती मोदींनी सपशेल नाकारली! सोनिया गांधी, फारुख अब्दुला, संगमा महाराष्ट्रात ‘फेटे’ बांधून घेतात, शरद पवारांसारखे नेते ‘इफ्तार पार्टी’त मुस्लीम टोपी घालतात, अनेक हिंदू अनेक दग्यांवर चादरी चढवतात, पण मस्तकात ‘आत्मस्तुती’चा ज्वर चढलेल्या मोदींना, राज्यकर्त्या मोदींना सद्भावना दोन मिनीनिटं डोईवर ठेवता आली नाही! असला विखारी, उर्मट, स्वकेंद्री माणूस विकास पुरुष? उभ्या-आडव्या विविध धार्मिक, पंथिक, सांस्कृतिक धाग्यांनी बांधलेल्या भारताचा पंतप्रधान? गुजरात सलग तीन वेळा जिंकलं म्हणून पंतप्रधान? वसंतराव नाईक सलग अकरा वर्षं मुख्यमंत्री होते, विलासराव, शरदराव सात-आठ वर्षं मुख्यमंत्रीपदी होते आणि या सर्वांच्या काळात एकाच (भगव्या) रंगांचा विकास नाही झाला. आजही उरबडवा प्रचार बाजूला ठेवून पाहिलं, तर सर्वांगीण विकासात महाराष्ट्र गुजरातपेक्षा अग्रेसर आहे!
त्यामुळे देशात नि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सलग सत्तेत असलेल्या काँग्रेससह अनेक राजकीय साक्षर लोकांनाही असं विचारावंसं वाटेल - कौन हैं मोदी? क्या हैं मोदी!’ (‘कौन हैं मोदी’, ११ मार्च २०१३)
भारतीय संविधान, समता, सर्वसमावेशकता, स्त्री-पुरुष समानता हे पवारांच्या उमाळ्याचे विषय फिरून फिरून त्यांच्या लेखनात येतात. आणि वाचकांना नवं भान देऊन जातात. खरं तर पवारांची सदरं, त्यांची नाटकं, चित्रपट या सगळ्यांतून वाचकाला मिळतं काय, या प्रश्नाचं उत्तर ‘भान’ हेच आहे. आणि तोच पवारांच्या लेखनाच्या गुणवत्तेचा निकषदेखील.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा :
..................................................................................................................................................................
अनेकदा एका ठरावीक रीतीनेच विचार केला जातो. चाकोरीतल्या व्यवस्थेने आपले विचार चौकटबद्ध करून टाकलेले असतात. पारंपरिक प्रतिमांच्या जाळ्यात अडकून पडायला होतं. वाचकांना जात-धर्म-लिंग यांद्वारे केला जात असलेला भेदभाव कळत असतो, पण वळत नाही. पवारांच्या लेखनातून ते ‘वळणं’ होतं. साच्यातल्या प्रतिसादांना पवार धक्का देतात. या धक्क्यानं उलटं-पालटं व्हायला होतं. आणि नंतर आपल्याही विचारांना गती मिळते. आपल्या नेहमीच्या दिशेहून काही निराळी वळणं आहेत, चौकटीपलीकडे घटनांकडे पाहता येतं, ‘...अरेच्चा... असंही असू शकतं... असंच आहे’ हे आकलन होत जातं. हे वाचा :
“आपण नीट विचार केला, तर ज्या राजकारण्यांना आपण अगदी ‘भ’च्या बाराखडीत शिव्या देतो, त्या राजकारण्यांना तेवढं मस्तवाल व्हायला आपणच प्रोत्साहन देतो. ‘जनता’ नावाची ताकद राजकारण्यांनी धार्मिक, जातीय, श्रीमंत, नवश्रीमंत, सुखवस्तू, शेतकरी, मजूर अशा गटातटांत विभागून टाकलीय. पूर्वी हे सर्व महागाई, वीज, पाणी, इंधन अशा विषयांवर एकत्र यायचे. मोर्चे काढायचे, रस्त्यावर उतरायचे. आपल्यापेक्षा खालच्या स्तराबद्दल संवेदनशील सहवेदना दाखवायचे.
आज चित्र काय दिसतं?” (‘क्षेत्ररक्षणासाठी ‘गांधी’ पाठवा!’, ८ एप्रिल २०१३)
सध्या शंभर-दोनशे शब्दांचे द्विट्स आणि त्याहून थोड्या अधिक शब्दांच्या फेसबुक पोस्ट्सचा काळ आहे. तिथे सतत ‘तू तू-मैं मैं’ सुरू असतं. अशा उन्मादी काळात पवार यांच्या लेखनाचं मोल अधिक आहे. त्यांच्या लेखनात अनेक जुने-नवे संदर्भ येतात. चळवळींचे, साहित्याचे, नाटक-सिनेमासंबंधीचे आणि राजकारण-समाजकारणातलेही. मुद्दे मांडताना कार्यकारणमीमांसा असते, तर्क असतो. आणि या सगळ्याचं मूल्य वर्धिष्णू करणारा सघन आणि सखोल विचार असतो.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
पवारांचं नातं विद्रोही परंपरेशी. त्यामुळे ते व्यवस्था, ती निर्माण करणाऱ्या व्यक्ती यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत राहतात. मात्र ते पक्षपाती नाहीत. जे ‘आपले’, त्यांच्या चुकांकडे डोळेझाक करण्याची लबाडी ते करत नाहीत. ‘आपल्यां’नाही प्रश्न विचारणं, त्यांच्या चुका दाखवणं ते सोडत नाहीत. हे धाडस त्यांच्यापाशी आहे. म्हणूनच त्यांचं विवेचन लखलखीत होऊन जातं. आणि विश्वसनीयसुद्धा. माध्यमातला शब्द अजिबातच भरवशाचा वाटत नाही, अशा काळात पवार लिहिते असणं आश्वासक आहे.
“स्वातंत्र्य मिळवण्यापासून, त्याचं लोकशाही व्यवस्थेत परिवर्तन करून, त्याचा भक्कम पाया घालण्यासाठी या देशातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, पटेल यांसारख्या दिग्गज मंडळींनी आपली बुद्धिमत्ता, आयुष्याचा काळ, राजकीय चातुर्य पणाला लावत, ग्रह-पूर्वग्रह बाजूला ठेवून आपल्याकडे शंकेने पाहणाऱ्या महासत्तांना खणखणीत उत्तर दिलं. आपल्या क्षमतेबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या चर्चिलनाही आपण कृतीद्वारेच उत्तर दिलं. अलीकडेच महासत्ता अमेरिकेच्या निवडणूक मतमोजणीतही गलथानपणा झाला होता आणि आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही विनाघोळ पार पडतात!
या देशात काही लोकांना ही ‘निर्दोष’ व्यवस्था मनात, आत डाचते. त्यांचं एक दूरचं ‘लक्ष्य’ हा ‘ढाचा’ पाडून नवा आणावा, असं आहे. त्यासाठी ते वेळोवेळी ही व्यवस्था, घटना, सभागृहं कशी कालबाह्य झालीय, हे ठसवण्याचा प्रयत्न या अशा छोट्या मोठ्या घटनांतून करतात. त्यासाठी कधी त्यांना हजारे, कधी केजरीवाल, कधी रामदेव बाबा, तर कधी क्षितिज ठाकूर, राम कदमांसारखे लोक कामाला येतात.
लोकशाही मानणाऱ्यांनी हा लांबचा धोका ओळखून तात्पुरत्या प्रतिक्रियेपेक्षा एका दीर्घ लढ्यासाठी तयार व्हायला हवं.” (‘धुळवडीचे रंग खाली बसल्यावर बोलूया!’, १ एप्रिल २०१३)
‘शंभरातल्या नव्याण्णवास’ – संजय पवार
पिंपळपान प्रकाशन, मुंबई | पाने – २५४ | मूल्य – २७० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment