बावीस वर्षांपूर्वी या लेखकानं आपल्याला आरसा दाखवला आहे. आपण त्यात कसे दिसतो, हे आता तरी गंभीरपणे आपण पाहणार आहोत का?
ग्रंथनामा - झलक
प्रतिमा जोशी
  • ‘एकलव्याच्या भात्यातून’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 03 November 2023
  • ग्रंथनामा झलक संजय पवार Sanjay Pawar एकलव्याच्या भात्यातून Eklavyachya Bhatyatun

प्रसिद्ध नाटककार व स्तंभलेखक संजय पवार यांच्या  ‘एकलव्याच्या भात्यातून’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच पिंपळपान प्रकाशन या नव्याकोऱ्या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

वर्तमानपत्रातली सदरं ही बव्हंशी तात्कालिक घडामोडींवर लिहिली जातात. काही सदरं चिंतनपर असली, तरी त्यांना वर्तमानाचा संदर्भ असतोच. मुळात सदर या संकल्पनेतच समकालीन भाष्य अभिप्रेत आहे. ज्या काळात ते लिहिलं जातं, त्या वेळी वाचताना ते चुरचुरीत वाटतं, पण मग काही वर्षं उलटल्यानंतर ते लेखन मऊ झालेल्या पापडाप्रमाणे वाटू लागतं. फार तर त्या लेखांतील काही तुकडे आजही समर्पक असतात, पण बहुतांशी त्याचा ताजेपणा आणि संदर्भ म्हणजे ‘रिलेव्हन्स’ काळासोबत हरवलेला असतो. अत्यंत चांगल्या आणि समर्थ लेखकांबाबत काळ हा खेळ करत असतो.

या पार्श्वभूमीवर प्रस्तुत लेखसंग्रहाची दोन वैशिष्ट्यं आहेत. एक तर सदरानं स्पर्श केलेले विषय काळासह जुने तर झालेले नाहीतच, उलट ते अधिक तीव्र आणि हिंस्रही झालेले आहेत आणि त्यामुळे लेखांमधील तत्कालीन संदर्भ जुने झालेले असले, आताच्या पिढीला त्यांचा माग लागत नसला, तरी त्या घटनांच्या निमित्ताने व्यक्त केले गेलेले विचार आजच्या वर्तमानाशी जोडून घेता येतात.

आणि दुसरं म्हणजे लेखक संजय पवार यांनी त्यावर केलेल्या टिप्पण्या, मांडलेली मतं म्हणजे केवळ शेरेबाजी किंवा शब्दांची आतशबाजी नाही. पवार अतिशय चिकित्सक नजरेनं, या घडामोडी पेश करतातच, पण त्यांचे विश्लेषण करताना आणि अन्वयार्थ लावताना त्यांची पक्की वैचारिक बैठक आपल्याला जाणवत राहते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लेखक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलेला असल्याच्या खुणा या लेखनात जागोजागी सापडतात आणि त्याची वैचारिक धारणा फुले-आंबेडकरी मुशीतून घडली आहे, याची साक्ष वाक्यावाक्यातून मिळत जाते. चळवळीशी जोडलेपण असले, पक्की वैचारिक बैठक असली, तरी हे लेखन प्रचारकी तर नाहीच, परंतु कोणत्याही अर्थाने भाबडे किंवा आदर्शवादीही नाही. विचारधारेच्या आधारावर नैसर्गिक मित्र असणाऱ्या व्यक्ती, पक्ष, आंदोलनं यांचा परखड वेध, कित्येकदा तर अंतर्बाह्य ‘स्कॅनिंग’ लेखकानं केलेलं आहे. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच सुमारे २२ वर्षांनंतरही हे लेखन आजच्या पिढीनंही वाचावं इतकं ताजं आहे. आताच्या तरुण पिढीला आपलं वाटेल असं आहे.

या संग्रहाचं आजच्या संदर्भातील महत्त्व अधिक आहे, ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी, या त्या परिवाराच्या राजकीय आघाडीने आज भारताला ज्या फॅसिस्ट वळणावर आणून उभं केलं आहे, त्या संदर्भात. फेब्रुवारी १९९९ ते नोव्हेंबर १९९९ या कालावधीतील एकंदर ४० लेख या संग्रहात आहेत आणि भाजप व संघपरिवाराच्या कावेबाज चालींबद्दल कमीत कमी एका ओळीत तरी वाचकांचं लक्ष वेधलेलं नाही, असे फारच थोडे लेख यात सापडतील. प्रत्येक गोष्टीत संघ दिसतो का, असा वावदूक प्रश्न इथे निरर्थक आहे, कारण या फॅसिस्ट विचारसरणीची वाळवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला आणि समाजाच्या सर्व स्तरांना लागत चाललेली लेखकाला दिसते आहे. ही वाळवी वेळीच साफ करायला हवी ही त्याची तळमळ आहे.

हे लेख लिहिले गेले त्या काळात केंद्रात १३ महिन्यांचं अटलबिहारी वाजपेयी सरकार कोसळून पुन्हा वाजपेयी यांच्याच नेतृत्वाखालील भाजप आघाडीचं सरकार स्थापन झालं होतं. देशात प्रचंड राजकीय उलथापालथी होत असल्याचा तो काळ होता. डावे, समाजवादी, बहुजनवादी हे क्षीण होत जाण्याचा आणि त्याच वेळी संघपरिवार ताकदवान होत जाण्याचा हा काळ आहे.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली गेल्याच्या फॅसिस्ट घटनेनंतरही संघपरिवाराकडून भारतीय राजकारणालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच धोका आहे, सामाजिक न्यायाच्या आणि समावेशकतेच्या संवैधानिक पायावर उभ्या असलेल्या भारत नावाच्या राष्ट्रालाच धोका आहे, याचं गांभीर्य कोणत्याही राजकीय पक्षाला लक्षात आलेलं नसल्याचा काळ आहे. काँग्रेससारख्या जुन्या पक्षाला हे आव्हान जाणवलंच नसल्याचा हा काळ आहे. एका ठरावीक चौकटीत आणि विशिष्ट जातवर्गात खेळला जाणारा देशातील सत्तेचा खेळ संजय पवारांनी नेमका हेरला आहे आणि धोक्याचा कंदील दाखवण्याचं आपलं काम चोखपणे केलेलं आहे.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा : 

वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे

सध्याच्या ‘ऱ्हासमय’ काळात पवारांचं सदरलेखन सामाजिक ‘शल्य-चिकित्सका’ची भूमिका निभावत आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ ‘आक्रमक शैली’, या चष्म्यातून पाहून चालणार नाही!

..................................................................................................................................................................

भाजपचं १३ महिन्यांचं सरकार कोसळलं त्या वेळच्या ‘या माणसाचाच तर दोष आहे’ या लेखात भाषेचा मुलाहिजा न बाळगता संजय पवार म्हणतात, “अटलबिहारी, तुमचा दोष आहे. तुम्ही स्वतःचा चेहरा तुमच्या पक्षाचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करता. तुमचा दोष असा आहे, अडवाणींच्या शरीरावर तुमचे मुख लावून हयवदनचा खेळ करता आहात.... देशाच्या धर्मनिरपेक्षतेचा ढाचा उद्ध्वस्त करणारे विश्वासघातकी, देशद्रोही नाहीत? भडवेगिरीत हयात गेलेल्यांनी तुळशीवृंदावन फुटलं म्हणून ऊर बडवण्याने काय होणार?... गांधी अंगात भिनवायला वेगळीच ताकद लागते. तुमच्या धर्ममार्तंड अनुयायांना खूश ठेवत तुम्हाला गांधी अनुसरता येणार नाहीत. गांधींना गोळ्या मारणारे, प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करणारे, मिशनऱ्यांना जिवंत जाळणारे अनुयायी पाठीशी घालून उद्या हातात काठी आणि पंचा नेसून जरी आलात अटलजी आणि विचारलंत की माझा दोष काय, तर आम्ही म्हणू, तुम्हीच दोषी आहात. आकड्यांच्या गणितासाठी घोडेबाजाराला मूक संमती देणारे तुम्ही बेदाग नाही राहू शकत.”

या लेखनाच्या कालावधीत कारगिल युद्ध घडलं. त्याच्या पार्श्वभूमीवर लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आदींच्या ज्या वक्तव्यांचा समाचार लेखकानं घेतला आहे, तो आजच्या पुलवामा/ गलवान घटनांबाबत सत्ताधारी जी मुक्ताफळे उधळतात, त्यांची आठवण करून देणारा आहे.

खुद्द पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या तथाकथित हिमतीची पोल खोलताना लेखक लिहितो की, “महाजन म्हणतात की अटलबिहारी ठाम आहेत, ते कधी कठोर बोलत नाहीत. तर पंतप्रधानांनी तसं बोलायचं नसतंच, तर थेट कठोर निर्णय घ्यायचे असतात... जे कुणी सुजाण नागरिक असतील त्यांच्या एव्हाना लक्षात आलेलं असेल की, पाकिस्तानी सैन्य चाल किंवा आक्रमण करून आलं नाही, तर ते सरळ तुमच्या हद्दीत घुसून ठाम बसलं होतं. कठोर निर्णय घेणाऱ्या पंतप्रधानांच्या संरक्षणमंत्र्यांची पहिली विधानं होती की, पाक पंतप्रधान निर्दोष आहेत. त्यानंतर घुसखोरांना सुरक्षित परतीचा मार्ग काढून देणारे हे काळजीवाहू सरकार म्हणे कठोर निर्णय घेणारे आहे! देशभर बांगलादेशीयांविरोधात अत्यंत हिणकस पद्धतीचं आणि मुस्लीमद्वेष पसरवणारं आंदोलन करणाऱ्या भाजपच्याच राज्यात सीमेवरून घुसखोरी होते आणि सरकारला दोनतीन महिने पत्ता नव्हता यासारखा विनोद नाही.

आज जर कुणा दुसऱ्या पक्षाचं सरकार असतं, तर प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या वृत्तीने याच अडवाणी, महाजन प्रभृतींनी देशभर कारगिलमधील शहीद जवानांच्या अस्थिकलशाच्या रथयात्रा काढल्या असत्या, भगवी मुंडाशी आणि भगव्या कफन्या घातलेल्या साधूंनी इंडिया गेटजवळ नंगानाच घालायचा बाकी ठेवला असता आणि पाकिस्तानच्या समूळ उच्चाटनासाठी एखादा यज्ञ पेटवून स्वतःच्या पोळीवर तूप ओरपून घेतलं असतं...”

हा तुकडा वाचताना उरी/ पुलवामा आठवणं, गलवान खोऱ्यात चिनी आलेच नाहीत, असं आताच्या पंतप्रधानांनी आधी सांगणं आणि मग त्यांना धडा शिकवला म्हणणं, मेघालय आणि आसाम पेटलेला असणं, जवानांच्या प्रेतांवर मतं मागणं, पंतप्रधानांनी डोळ्यांत पाणी वगैरे आणून भाषणं करणं, हा वर्तमानकाळ ठसठशीतपणे वाचकांपुढं उभा राहणं अगदीच अपरिहार्य आहे. इतकंच नव्हे, तर वर्तमान भूतकाळापेक्षा अधिक दांभिक, कांगावखोर आणि विखारी आहे, हे चित्र लख्ख होत जातं.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा : 

वैयर्थतेने भरलेल्या, असहिष्णुतेने चिरफाळत चाललेल्या, भयाण हिंसेच्या, क्रौर्याच्या टकमक टोकावर उभ्या असलेल्या सद्यकालीन सभोवाराचा उभा-आडवा छेद आणि वेध घेणारं हे जळजळीत शोभनाट्य आहे

सध्याच्या ‘ऱ्हासमय’ काळात पवारांचं सदरलेखन सामाजिक ‘शल्य-चिकित्सका’ची भूमिका निभावत आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ ‘आक्रमक शैली’, या चष्म्यातून पाहून चालणार नाही!

..................................................................................................................................................................

संजय पवारांची लेखणी नैसर्गिक मित्र असलेले राजकीय पक्ष आणि व्यक्ती यांच्याबाबतीत अत्यंत कठोर झालेली दिसते. ‘चुका, विघटित राहा आणि सेटिंग करा’ या लेखात तर ती अत्यंत तिरकस चाललेली दिसते. ते म्हणतात, “आज घटकेघटकेला घटनेच्या कलमांची उजळणी होतेय आणि या घटनेसाठी ज्याने आपली बुद्धी पणाला लावली, त्यांचे वारस तथाकथित राष्ट्रवाद्यांचे उंबरठे झिजवत आहेत, फॅसिस्टांचे हक्क अबाधित राहण्यासाठी झटताहेत, घराणेशाहीच्या पुढील अंकाला प्रस्तावना लिहीत आहेत. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा मंत्र विसरून चुका, ‘विघटित व्हा आणि किंमत वसूल करा’ असा नवाच मंत्र शिकलेत... आणि आपलं लाडकं पोर मांडीवर मुतलं, तर सांगायचं कुणाला अशी समस्त दलित जनतेची पंचाईत झालीय!”

आरक्षणावरून सामाजिक द्वेषाचं आणि राजकीय स्वार्थाचं राजकारण करणाऱ्या वृत्तींचा आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक गुंतागुंतीकडे लक्ष वेधताना लेखकानं मोजूनमापून हिशेबी लिहिणं टाळत थेट विधानं केली आहेत- “सरकार रोज दोनपाच जाती मागासवर्गीय किंवा इतर मागासवर्गीयांत घालत आहे. राजकीय दबावगट तयार करून हे असे फायदे उठवण्याचे जे प्रयत्न आहेत त्यात कुठलीही सामाजिक क्रांती नाही, हे कोण सांगणार? मंडल आयोगानंतर अनेक जातींना आलेलं भान हे सामाजिक क्रांतीचं भान नसून राजकीय सोयीचं भान आहे. या मध्यम जाती एका बाजूला मागासपणाचं लेबलही लावतात आणि पुन्हा हिंदू म्हणून टिळे लावून मिरवायलाही कमी करत नाहीत...” हे पवारांचं म्हणणं आपण सगळे प्रत्यक्षात अनुभवतो आहोत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या लेखणीचे फटकारे ठाकरे, शरद पवार यांच्यापासून मनोहर जोशी, रामदास आठवलेंपर्यंत अनेकांवर ओढले गेलेत. त्यातही जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर लिहिताना हे फटके अधिक जोरात बसताना दिसतात आणि ते स्वाभाविक आहे.

राजकीय विषयांपलीकडे साहित्य, कला, क्रीडा याही विषयांचा या सदरात समावेश होता. या सर्वच क्षेत्रांत घुसलेल्या बिनकण्याच्या विषाणूची हजेरी संजय पवारांनी प्रखरतेनं घेतली आहे. त्यांच्या तडाख्यातून अगदी कुसुमाग्रजही सुटलेले दिसत नाहीत. राजकारणाचं गुन्हेगारीकरण, साहित्यातील कंपूशाही यांवर कोरडे ओढताना ‘उरलो उपकारापुरता’ अशी धन्य भूमिका साहित्यिक घेऊ शकत नाहीत, असं लेखक ठामपणं म्हणतो.

‘जे न देखे रवी...’ या लेखात ते म्हणतात, “जगण्याच्या रोजच्या लढाईत जेव्हा हजारो, लाखो मानवी समूह कीटकाप्रमाणे भरडले जातात, धर्मांध राजकारणाचे बळी पडतात, हक्काच्या गोष्टींना मोहताज होतात, उल्लूमशालांपुढे हतबल होतात, तेव्हा यांच्या पुस्तकी क्रांत्या चांदण्यांचे हात होतात. आणि मग आस्वादक समीक्षेला सांगावंसं वाटतं त्यांच्याच शब्दांत- ‘काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात!’ ”

कुसुमाग्रज हे महाराष्ट्राला वंदनीय नाव आहे, याची पूर्ण जाणीव लेखकाला आहे आणि तरीही स्वत्व हरवून बसलेल्या, हे पण छान ते पण छान म्हणणाऱ्या समाजाला असे चरचरीत डाग अधूनमधून दिले पाहिजेत, असं तो ठामपणे म्हणतो. हा उद्वेग इतका प्रचंड आहे की, गांडुळांना पाठीच्या कण्याचं महत्त्व कसं कळणार, असा प्रश्न लेखक मराठी साहित्य आणि कलाक्षेत्राबाबत बोलताना उपस्थित करतो.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

संजय पवारांनी लिहिलेल्या या लोकप्रिय सदराचं नाव होतं, ‘एकलव्याच्या भात्यातून’. सदराच्या नावापासूनच ते कोणत्या समुदायाची, कोणत्या समाजघटकांची, कोणत्या दुःखांची फिर्याद करणार, हे स्पष्ट होत जातं. त्याच वेळेला एकलव्याचा भाता बाणांनी भरलेला आहे, अशी ठोस जाणीवही करून देतं. या सदरातील प्रत्येक लेखाच्या शेवटी तिखट शेरा मारणारा एक शेवटचा तीर लेखकानं सोडला आहे. उपहासगर्भ विनोदात तो मोडतो आणि कधीकधी मूळ लेखापेक्षा अधिक अणकुचीदार असतो.

‘महाभारता’तील एकलव्यानं गुरू द्रोणचार्यांच्या कुटिल मागणीला बळी पडून आपला अंगठा त्यांना तोडून दिला. पण संजय पवारांचा हा एकलव्य इथल्या व्यवस्थेच्या कुटिल काव्यांना बळी तर पडत नाहीच, उलट तिला ठेंगा दाखवत आपला अंगठा उंचावतो. हे कावे आपल्याला कुठे नेणार आहेत, याकडे निर्देश करतो.

बावीस वर्षांपूर्वी या लेखकानं आपल्याला आरसा दाखवला आहे. आपण त्यात कसे दिसतो, हे आता तरी गंभीरपणे आपण पाहणार आहोत का, की ‘धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते रहें’ या चालीवर पुस्तक वाचून बाजूला ठेवून देणार आहोत?

‘एकलव्याच्या भात्यातून’ – संजय पवार

पिंपळपान प्रकाशन, मुंबई | पाने – १८० | मूल्य – २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......