बबनराव ढाकणे नावाचं वादळ…‘ऐसे’ राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत… 
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रवीण बर्दापूरकर
  • बबनराव ढाकणे
  • Mon , 30 October 2023
  • संकीर्ण श्रद्धांजली बबनराव ढाकणे Babanrao Dhakne

पत्रकारांच्या माझ्या पिढीनं महाराष्ट्राच्या रस्त्यावरच्या आणि विधिमंडळातल्या राजकारणात अनेक ‘बलदंड’ नेते पाहिले. १९७५ ते ९०चा तो कालखंड होता. तेव्हाचे बहुसंख्य नेते उच्चविद्याविभूषित नव्हते, पण सुसंस्कृत आणि जनतेच्या समस्यांविषयी तळमळ असणारे होते. भलेही बहुसंख्य नेते शैक्षणिक आघाडीवर फारशी चमक दाखवू शकले नसतील, पण त्यांच्या आकलनाच्या कक्षा वैपुल्यानं व्यापक होत्या. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, सहकार, प्रशासन, अर्थकारण, या क्षेत्रांची त्यांना असणारी सूक्ष्म जाणकारी अनुभवताना चकित व्हायला होत असे. प्रशासनावरची त्यांची पकड वाखाणण्यासारखी असे.

एखादा प्रश्न पूर्णपणे जनहिताचा आहे, हे लक्षात आलं की, नियम आणि कायदे बाजूला कसे सारावेत, हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. सरकारनं एकदा निर्णय घेतला की, कामाचे आदेश (जीआर) आजच्यासारखे महिनोगणती रेंगाळण्याचे ते दिवस नव्हते. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकरराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, तर सरकारनं सकाळी एखादा निर्णय घेतला की, दुपारपर्यंत आदेश जारी झालेला असे. सत्तेत प्रामुख्यानं काँग्रेस असण्याचा तो काळ होता आणि विरोधी पक्षात जे बलदंड नेते होते, त्यापैकी बबनराव ढाकणे एक. ते वादळच होतं.

१९७७ साली मी पत्रकारितेत आलो, तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात बबनराव ढाकणे (जन्म १० नोव्हेंबर १९३७ - मृत्यु २६ ऑक्टोबर २०२३) यांचं नाव चांगलंच गाजत होतं. याचं कारण त्यांच्यातली वादळी आक्रमकता. बबनराव अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी या दुष्काळी तालुक्यातले. पाथर्डी तालुक्याचे प्रश्न सरकार सोडवत नाही, म्हणून तेव्हा तरुण असलेले बबनराव इतके संतप्त झाले की, विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सरकारविरोधी पत्रकं फेकत त्यांनी चक्क सभागृहात उडी घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभेत अशी घटना तत्पूर्वी घडली नव्हती. त्यामुळे सभागृह अवाक झालं होतं!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बबनरावांची उडी हा सभागृहाचा मानभंग आहे, म्हणून बबनरावांनी माफी मागावी, असा प्रस्ताव विधानसभेनं संमत केला, पण बबनराव बधले नाहीत. या ‘अँग्री यंग मॅन’नं माफी मागायला ठामपणे नकार दिला आणि आठ दिवस तुरुंगवास पत्करला. बबनरावांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात झाली, पण आवर्जून सांगायचं म्हणजे तेव्हाचे राजकारणी सुसंस्कृत होते. कारागृहातून सुटका झालेल्या बबनरावांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बोलावून घेतलं. त्यांचं म्हणणं काय ते समजावून घेतलं आणि पाथर्डी तालुक्यात विकासाची अनेक कामं सुरू करण्याचे आदेश दिले. असं सुसंस्कृत, उमदं राजकारण आणि राजकारणी आता केवळ आठवणीतच उरले आहेत. 

गमतीचा भाग असा की, प्रेक्षक गॅलरीतून विधानसभेत उडी मारणारा बबनराव नावाचा ‘अँग्री यंग मॅन’ पुढे त्याच सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला. एवढंच नाही, तर पुलोदच्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रीमंडळात ते मंत्री होते. पुढे बॅ. अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. अंतुले यांच्या पाठोपाठ बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि तेही अंतुले यांच्याप्रमाणेच उच्चशिक्षित म्हणजे बॅरिस्टर होते. या दोन बॅरिस्टरांविरुद्ध जेमतेम आठवी शिकलेले बबनराव सभागृहात तडफेनं संघर्ष करत असत.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते असतानाच बबनरावांशी माझा एक पत्रकार म्हणून जवळून संपर्क आला. तेव्हाची एक हकिकत इथे आवर्जून सांगायला हवी, कारण त्यातून तत्कालीन विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबद्दल कसे आक्रमक होते, हे लक्षात येईल.

तेव्हा मी नागपूरच्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो. प्रशासनाच्या लालफितशाहीचा फटका एकनाथ बागडे नावाच्या एका इसमाला कसा बसला, परिणामी त्याला कारागृहातच कसं राहावं लागलं, अशी एक बातमी माझ्या हाती लागली. एकनाथकडून वेडाच्या भरात पोटच्या गोळ्याचीच हत्या झाली होती. म्हणून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याची बिघडलेली मन:स्थिती लक्षात घेऊन न्यायालयानं त्याला मनोरुग्णालयामध्ये पाठवलं.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

विजय जावंधिया : शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

सीमाताई साखरे : सासूनं नव्वदी ओलांडली!

अरुवार कवी आणि माणूसही...

..................................................................................................................................................................

पुढे खटला चालला. न्यायालयानं त्याची निर्दोष मुक्तता केली, पण त्याच्या सुटकेचे आदेश पोलीस, कारागृह की आरोग्य खात्यानं जारी करायचे, अशा लालफितशाहीत एकनाथची मुक्तता तब्बल पाच वर्षे लांबली. दरम्यान एकनाथची बिघडलेली मन:स्थितीही पूर्णपणे सावरली होती. थोडक्यात, एका शहाणा माणूस वेड्यांच्या इस्पितळात प्रदीर्घ काळ (सुमारे पाच वर्ष) खितपत पडला होता.

विधिमंडळाच्या नागपूरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या काळातच ही बातमी प्रकाशित झाली. माणूस पाठवून बबनरावांनी मला बोलावून घेतलं. सर्व माहिती जाणून घेतली आणि सभागृहात हा प्रश्न उपस्थित केला. प्रकरण गंभीरच होतं. म्हणून साहजिकच विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनीही ते लावून धरलं. बबनराव आणि अन्य काही सदस्य इतके आक्रमक झाले की, सभागृहात उत्तर देत असलेल्या तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी यांची भंबेरीच उडाली. अखेर मुख्यमंत्री असलेले बॅ. ए. आर. अंतुले यांना हस्तक्षेप करत एकनाथची तातडीनं सुटका केली जाईल, असं जाहीर करावं लागलं. जनतेच्या प्रश्नावर विरोधी सदस्य राजकीय विचार बाजूला ठेवून एकत्र कसे येतात, याचं दर्शनच त्या निमित्तानं विधानसभेत घडलं. तेव्हापासून बबनरावांची आणि माझी चांगली जानपहचान झाली.

चळवळीतून तावूनसुलाखून नेता झालेला राजकारणी जनतेच्या प्रश्नाप्रती संवेदनक्षम जसा असतो, तसंच लोकांत वावरताना मोकळा-ढाकळाही असतो. बबनरावांचं व्यक्तिमत्त्व हे असंच होतं. बंडखोरी आणि तडफ त्यांच्या रक्तातच होती. कारण नसताना वसतिगृहाचे अधिकारी रागावले, म्हणून तेव्हा १४ वर्षे वय असलेल्या बबनरावांनी चक्क विनातिकीट प्रवास करत दिल्ली गाठली आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना भेटून त्या अधिकाऱ्याची तक्रारही केली होती. अशी अफलातून जिगर  बबनरावच दाखवू जाणे! ही हकिकत त्यांच्या रसाळ कथनशैलीत ऐकण्याचा अनुभव मला घेता आला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

बबनरावांच्या आक्रमकतेची विधिमंडळाच्या इतिहासात नोंदवली गेलेली आणखी एक घटना राजदंड पळवण्याची आहे. मंडल आयोगाच्या शिफारशीवर राज्य सरकारनं चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी विधानसभेत लावून धरली, पण सरकार ढिम्म होतं. वातावरण तापलं. इतकं तापलं की, विरोधी पक्षांचे सदस्य संतप्त झाले.

बबनरावांना तर इतका राग आला की, त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या समोर ठेवलेला राजदंडच सभागृहाबाहेर पळवून नेला. मध्यम उंची, निमगोरा वर्ण, काहीशी स्थूल म्हणता येईल, अशी शरीरयष्टी असणारे बबनराव तसे चपळ होते. त्यामुळे राजदंड घेऊन त्यांनी सभागृहाबाहेर धूम ठोकल्यावर सुरक्षारक्षकांची तो राजदंड परत मिळवताना बरीच दमछाकच झाली. सुरक्षारक्षकांनी तो राजदंड जागच्या जागी ठेवल्यावर जणू काही घडलंच नाही, अशा हसतमुखानं सभागृहात प्रवेश करणारे बबनराव अजून आठवतात. तेव्हापासून हा राजदंड कुलूपबंद करण्याची सोय करण्यात आली.

बबनराव आक्रमक होते, पण आततायी नव्हते. आक्रमकता आणि आततायीपणा यातला भेद त्यांना चांगला ठाऊक होता, म्हणूनच त्यांनी सभागृहात किंवा सभागृहाबाहेरही वावरताना अनेक ‘धाडसी’ कृत्यं केली, पण ते आततायी म्हणा का वचावचा, कधी वागले नाहीत.

बबनरावांचं वाचन चांगलचं होतं आणि महत्त्वाची बाब म्हणजे त्यांची स्मरणशक्ती अतिशय दांडगी होती. शेवटपर्यंत त्यांच्या सभागृहातील किंवा रस्त्यावरील राजकारणाच्या काळातला संदर्भ तारखेनिशी अचूक सांगत असत. जनता पक्षात असताना त्यांना स्वपक्षीयांविरुद्धही बराच संघर्ष करावा लागला, पण ते डगमगले नाहीत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

विजय जावंधिया : शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

सीमाताई साखरे : सासूनं नव्वदी ओलांडली!

अरुवार कवी आणि माणूसही...

..................................................................................................................................................................

त्यांचा लोकसंग्रह ‘अ‍ॅक्रॉस द पार्टी’ होता. एखाद्या पट्टीच्या राजकारण्याला शोभेशा (पण अनेकांना अनाकलनीय वाटणाऱ्या) राजकीय तडजोडीही त्यांनी केल्या (असंख्याचं श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडच्या मुद्द्यावर ते गोपीनाथ मुंडे यांनाही थेट भिडले होते.) आणि त्यांची किंमतही न डगमगता चुकती केली. वादळी वागण्यामुळे वाट्याला आलेली स्वपक्षीयांची नाराजी बबनरावांनी तमा न बाळगता कसलेल्या राजकारण्याला शोभेशा वृत्तीनं घेतली.

लोकसंग्रह करताना त्यांच्यात स्वार्थीपणा नसायचा, हेही तेवढंच खरं. त्यामुळे त्यांचा लोकसंग्रह महाराष्ट्रभर होता. त्यामुळेच बीड लोकसभा मतदारसंघातून केशरकाकू क्षीरसागर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा पराभव करता येणं, बबनरावांना शक्य झालं. ते लोकसभेवर विजयी झाले आणि केंद्रात राज्यमंत्रीही झाले. हे असं असूनही राजकारणातून बाजूला पडल्यावर म्हणा की, निवृत्त पत्करावी लागल्यावर म्हणा, वसतिगृहाच्या एका खोलीत विरक्तपणे जगण्याचा बाणाही बबनरावांच्या जगण्याच्या शैलीला शोभेसाच होता.

सहकाराच्या क्षेत्रातही बबनरावांनी चांगली कामगिरी बजावली. अर्थात हे तेव्हाच्या सर्वपक्षीय राजकारण्यांचं वैशिष्टचं होतं. जिल्ह्यातल्या बड्या सहकारी नेत्यांशी टक्कर देत पाथर्डीसारख्या दुष्काळी भागात त्यांनी केदारेश्वर साखर कारखाना उभारला, शिक्षण संस्था सुरू करून तालुक्यातल्या हजारोंना ज्ञानाच्या वाटेवर चालण्यास उद्युक्त केलं. त्यांच्या बायोडेटातील अशी बरीच कामं सांगता येतील. बबनरावांच्या राजकीय कारकिर्दीचा सूक्ष्म आढावा घेण्याइतका मी त्यांच्या निकट नव्हतो, पण फार दूरही नव्हतो, तरी त्यांची राजकीय कारकीर्द एक पत्रकार म्हणून चांगलीच अनुभवता आली.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/bfwI5

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

आम्ही दिल्ली सोडून औरंगाबादला स्थायिक झाल्यावर एक दिवस बबनरावांचा अचानक फार वर्षांनी फोन आला. माझ्या एका ब्लॉगमध्ये असलेला त्यांचा उल्लेख आणि एका घटनेविषयी त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते माझ्या लेखनाचे नियमित वाचक आहेत, हे तोवर मला ठाऊकच नव्हतं. (आमच्यातला हा संपर्क केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आणि माझ्या लेखनाचे नियमित वाचक प्रवीण शिंदे यांनी घडवून आणला होता.) नंतरही अनेकदा त्यांचा फोन येत असे. एखादा राजकीय संदर्भ हवा असला की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मित्रवर्य रत्नाकर महाजन यांच्याशी संपर्क साधण्याची माझी सवय अजूनही आहे; मग त्या यादीत बबनरावांचं नाव जोडलं गेलं.

पाथर्डीच्याच प्रा. डॉ. संजय उदामले यांनी ‘महाराष्ट्र विधानमंडळातील बबनराव ढाकणे’ हे पुस्तक संपादित केलं आहे. त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं भेटायचं आमचं ठरलं होतं, पण करोनामुळे तो कार्यक्रमच लांबला आणि नंतर तो झाला, तेव्हा त्यात सहभागी होण्याबाबत माझी प्रकृतीची अडचण होती. मात्र त्या कार्यक्रमासाठी माझ्या प्रतिक्रियेची व्हिडिओ क्लिप बबनरावांनी मागवून घेतली होती. मी जे काही बोललो, ते आवडल्याचं बबनरावांनी आवर्जून तेव्हा लगेच कळवलं. समक्ष भेटण्याचे आणि भरपूर गप्पा मारण्याचे वादे आम्ही परस्परांना दिले, पण का कोण जाणे ते कधीच प्रत्यक्षात उतरले नाहीत. आता तर बबनरावच या जगात नाहीत... 

जनतेच्या समस्येविषयी नितातं तळमळ असणारे बबनराव ढाकणे यांच्यासारखे आक्रमक आणि उमद्या स्वभावाचे राजकारणी आता दुर्मीळ झाले आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......