अजूनकाही
अगदी लहानपणापासून ‘मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया’, हे गाणं आपण ऐकलेलं असतं. मामाचं गाव, तिथल्या गमतीजमती, धमाल लक्षात असते. या गाण्यात भेटणारी झुकझुक गाडी आपल्यापैकी अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भागही झालेली असते. पण आपल्यासारख्या हजारो लोकांचा जीव खऱ्या अर्थानं ज्याच्या हातात असतो, तो या झुकझुक अगीनगाडीचा ड्रायव्हर मात्र कायम दुर्लक्षितच राहतो.
रेल्वेचा एखादा अपघात किंवा मुंबईत लोकलच्या मोटरमनचं क्वचित होणारं आंदोलन, अशा घटना वगळता एरवी हा इसम आपल्या खिजगणतीतही नसतो. या माणसालाही कुटुंब असतं, स्वतःच्या आवडीनिवडी, छंद असतात, आपल्यासारख्याच विवंचनादेखील असू शकतात, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. कदाचित रेल्वेच्या अजस्त्र यंत्रणेतला एक सजीव, पण यांत्रिक घटक इतपतच स्थान त्याला दिलं जातं.
आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे नुकतंच प्रकाशित झालेलं ‘रुळानुबंध’ हे पुस्तक. माझा मित्र आणि ‘लोकोपायलट’ (आपल्या भाषेत ‘मेल-एक्सप्रेस गाड्यांचा ड्रायव्हर’) गणेश मनोहर कुलकर्णीचं हे अदभुत पुस्तक. गेली तेहतीस वर्षं तो रेल्वेत नोकरी करतोय. राजधानी, फ्लाईंग राणी, फ्रँटीएर मेल ही लांब पल्ल्याच्या गाड्यांची नावं आपण ऐकलेली असतात, कधीमधी त्यातून प्रवास केलेला असतो, पण गणेशसाठी या गाड्या हेच रोजचं जगणं आहे. एरवी डोंबिवलीत तो चारचाकीच काय, दुचाकी गाडीसुद्धा चालवत नाही. (कारण गाडी चालवायची म्हणजे आम्हाला पुढचा दोन किलोमीटरचा पट्टा क्लिअर असावा लागतो, असं त्याच म्हणणं असतं, अर्थात गमतीनं.) पण एकदा का तो रेल्वे इंजिनात चढला की, मग त्याला अर्जुनाला फक्त ‘पोपटाचा डोळा’ दिसावा, तसा केवळ आणि केवळ नजरेपल्याड, क्षितिजाही पलीकडे पसरलेला रेल्वे ट्रॅक खुणावत राहतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लोकोपायलटचं हे जगणं विलक्षण आणि खूपच वेगळं आहे. बऱ्याचदा आपण रेल्वेत संडास-बेसिन स्वच्छ नाहीत, नळांना पुरेशा दाबानं पाणी नाही, म्हणून कुरकुरत, तक्रारी करत असतो. पण सलग आठ-दहा तास ड्युटी करणाऱ्या ड्रायव्हरसाठी इंजिनमध्ये या मूलभूत सुविधादेखील नसतात, हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना ते आपल्याला माहीतसुद्धा नसतं. मधल्या स्टेशनांवर गाडी थांबते, तेव्हाही नैसर्गिक विधी करण्याएवढाही वेळ त्यांना मिळत नाही. आपण गाडीतून प्रवास करताना दिवसभर काहीबाही चरत राहतो, पण या मंडळींना साधा चहासुद्धा प्यायला मिळत नाही. अनेकदा सोबत आणलेला डबासुद्धा कसाबसा, घिसाडघाईत खावा लागतो.
हे सगळं ‘रुळानुबंध’मध्ये वाचताना, मनाच्या तळाशी एक अपराध-भावना दाटून येते. आपण कुटुंबकबिल्यासहित प्रवास करताना या ड्रायव्हर माणसाचं विश्व मात्र दोन समांतर रूळ आणि सिग्नलचे दिवे, यांच्याशी घट्ट जोडलेलं राहतं, ही जाणीव अस्वस्थ करून सोडते.
इतक्या कठीण आणि आव्हानात्मक स्थितीत वर्षानुवर्षं काम करत असतानाही गणेशने स्वतःमधला वाचक जपलाय, शास्त्रीय संगीताची आवड जोपासली आहे आणि लेखनाची ऊर्मीदेखील उत्फुल्ल ठेवली आहे, याचं मला प्रचंड कौतुक वाटतं. दोन प्रवासांच्या मधल्या वेळेत, जेव्हा विश्रांती घेण्यासाठी तो रनिंगरूममध्ये असतो, तेव्हाही त्याच्या सोबतीला पुस्तकंच असतात.
चौफेर वाचन करत असतानाच हा माणूस अनेक नियतकालिकांत लेखनही करत असतो. चित्र-प्रदर्शनांना भेट देऊन मुलाखती घेत असतो. संगीत-मैफिली आयोजित करतो. आपल्याला वरवर हे सोपं वाटलं, तरी प्रत्यक्षात ते किती कठीण असेल, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
‘डबल इंजन की सरकार’ अशी भाषा आता बंद झाली तर बरे! जीभ आणि रेल्वे, दोन्ही घसरू नये!!
भारतीय रेल्वे कात टाकणार! ५ मेगा हर्ट्झ स्पेक्ट्रममुळे ‘फोर-जी’ नेटवर्क प्रत्यक्षात येणार आहे...
मुंबई लोकल रेल्वेमधल्या झुंडी समजून घेताना...
रेल्वेखाली ठार झालेले १६ कामगार हे सरकारच्या तुच्छतेचे बळी आहेत
..................................................................................................................................................................
अनेकदा गणेशच्या डोळ्यादेखत गाडीखाली सापडून केवळ गाई-गुरंच नव्हे, तर प्रत्यक्ष माणसंदेखील मरतात. इंजिनाला मागे जोडलेल्या २०-२२ डब्यांत बसलेल्या माणसांचं जीवन सुरक्षित राहावं, ही त्याची जबाबदारी असते. पण त्यासाठी त्याच इंजिनासमोर आलेल्या जीवाला मात्र तो वाचवू शकत नाही! ही जीवनातली क्षणभंगुरता त्याला पदोपदी अस्वस्थ करते. अशा परिस्थितीत आपल्या आतली संवेदनशील वृत्ती साक्षीभावाने जपून ठेवणं, हे वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे हे पुस्तक वाचताना मध्ये मध्ये अनेकदा गणेशला सलाम करावासा वाटतो.
एरवी गप्पा मारतानाही गणेश त्याच्या विविधांगी वाचनाचे वेगवेगळे नमुने पेश करत असतो. त्याचं मराठीइतकंच हिंदी-इंग्रजी पुस्तकांचं वाचनही अफाट आहे. ‘रुळानुबंध’ या पुस्तकातही जागोजागी त्याने जे शेर, वचनं यांचे उल्लेख केले आहेत, त्यातून त्याच्या चौफेर वाचनाची साक्ष वाचकांनाही पटेलच. लेखनाच्या ओघात त्याने सांगितलेल्या वेगवेगळ्या किश्श्यांमधून त्याचा अभ्यासही डोकावतो.
रेल्वेची अजस्त्र यंत्रणा दिवसाचे चोवीस तास आणि वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस अखंड सुरू असते. त्यात प्रचंड नियोजन, कार्यप्रणाली आणि ती राबवणारी यंत्रणा, या सगळ्यांचा वाटा असतो. गणेशने ते सगळं साध्या सोप्या शब्दांत मांडलंय, हे त्याच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. अवघड शब्द वापरून किचकट लिखाण करणं सोपं असतं, पण वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेत रेल्वेची अजस्त्र यंत्रणा समजावून सांगणं, हे अवघड काम त्याने चांगल्या प्रकारे पेललं आहे.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/bfwI5
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
गणेशने या पुस्तकात अनेक ठिकाणी निसर्गाची वर्णनं नेमक्या आणि खूप कमी शब्दांत केली आहेत. त्याच वेळी ‘वैतरणेच्या पैलतीरी’ जाणारे उल्लेख येतात, तेव्हा त्याच्या आतली ‘अभ्यस्तता’ आपल्यालाही बुद्धीला स्पर्शून जाते. (या वाक्यातला प्रत्येक शब्द मी जाणीवपूर्वक वापरला आहे.)
तसं म्हटलं तर हे आत्मकथन आहे, पण त्याच वेळी आठवणींच्या प्रदेशात केलेली ही स्वैर मुशाफिरीदेखील आहे. गणेशाची भाषा विलक्षण ओघवती आहे. या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून वेगवेगळे किस्से त्याने सांगितले आहेत. एखाद्या चित्रपट दिग्दर्शकाच्या सफाईने वर्णन केलेले हे ‘मोंताज’ शब्दशः डोळ्यासमोर उभे राहतात. पण त्याच वेळी मनुष्यस्वभावाचं सूक्ष्म निरीक्षण नोंदवण्याचं आणि त्याबद्दल भाष्य करण्याचं त्याच कसब मला जास्त भावलं.
या पुस्तकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ लेखिका व अनुवादक उमाताई कुलकर्णी यांनी म्हटलं आहे की, ‘आपल्याला चिरपरिचित असलेल्या जगाचा अपरिचित अशा नजरेनं घेतलेला एक मागोवा’. हे वर्णन शब्दशः खरं आहे.
‘रुळानुबंध’ – गणेश मनोहर कुलकर्णी | शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक | मूल्य – २६० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक मयुरेश गद्रे किरकोळ विक्री व्यवसायातील उद्योजक आहेत.
mvgadre6@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment