अजूनकाही
२४ ऑक्टोबर २०१६ रोजी ‘अक्षरनामा’ सुरू झाला, त्याला आज बरोबर सात वर्षं पूर्ण झाली.
या काळात आम्ही आमच्या परीनं सतत ‘प्रवाहाविरुद्ध’ (Against The Current) पत्रकारिता करण्याचं काम करत आलो आहोत, यापुढेही जमेल तसे करत राहूच. अर्थात अशा प्रकारच्या पत्रकारितेला सध्याच्या काळात फारसं भवितव्य राहिलेलं नाही; यशाचं, कौतुकाचं आणि सहकार्याचं पाठबळही मिळत नाही, याची जाणीव असूनही आम्ही अजूनही आमच्या धारणेवर ठाम आहोत.
पण गेल्या सात वर्षांतली आपल्या सभोवतालची परिस्थिती अधिकाधिक विषण्ण करणारीच होत गेली आहे, हेही तितकंच खरं. ‘स्किझोफ्रेनिया’ हा आजार फक्त हजारातून एखाद-दुसऱ्या माणसालाच होतो, असं वाटत होतं... पण अलीकडच्या काळात तो समाजातील बहुसंख्य जणांना झाला की काय, अशी दाट शंका यायला लागली आहे. माणसं कशावरही व्यक्त होतात, पण कशीही व्यक्त होतात. डोकं आणि मुख्य म्हणजे त्यातला मेंदू गहाण टाकला की काय, अशा प्रकारे व्यक्त होतात. मेंदू गहाण टाकायला लावणारा आजार म्हणून आजवरच्या वैद्यकीय इतिहासात ‘स्किझोफ्रेनिया’ याच आजाराची नोंद आहे. आणि हा आजार झालेली माणसं सगळीकडे मोठ्या प्रमाणावर दिसायला लागली आहेत...
गलिच्छ राजकारणाची किती चर्चा करायची? आणि किती काळ करायची? ते बदलवण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार? नसू तर मग केवळ चर्चा का करतो? ‘हरी हरी’ करत बसावं, निवृत्त झालेल्यांसारखं! संस्कृती, इतिहास, अस्मिता, जात-धर्म, प्रथा-परंपरा-चालीरिती-श्रद्धा-समज यांचा समंध किती काळ मानगुटीवर बसू द्यायचा? आणि किती? या समंधाला निदान खांद्यापर्यंत खाली तरी उतरवणार की नाही? इतरांच्या विचार-चुटकुल्यांना किती काळ डोकं बंद ठेवून, डोळे बंद करून दाद देणार? स्वतः काहीही न करता इतरांच्या सुमार सादरीकरणाला कुठवर टाळ्या वाजवत राहणार? असे खूप प्रश्न आहेत...
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
इतका गाफील, बेपर्वा आणि बेफिकीर समाज होऊ कसा शकतो? अशा समाजाला आपल्या भावी पिढ्यांचं तर सोडाच, निदान आपलंही बरं चालावं, इतपतही धडका विचार करता येत नाही?
‘कॉमनसेन्स’च्या गोष्टींबाबतही आपण ‘कॉमनली अबसेन्ट’ असल्यासारखे का वागतो?
तुच्छता, तिरस्कार, द्वेष आणि हिंसा, हाच अनेकांचा जगण्याचा प्राणवायू झाला की काय, असं वाटतं अनेकदा.
असो. आज दसरा म्हणजे विजयादशमी, सीमोल्लंघन करण्याचा दिवस. त्यामुळे आजच्या दिवशी तरी निराशावादापेक्षा ‘आशावाद’ बळकट करायला हवा.
या सात वर्षांत ज्या ज्या लेखकांनी आम्हाला लेखनसहकार्य केलं, आजही करत आहेत; त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. तसंच ज्या वाचकांनी आम्हाला वर्गणी भरून आणि त्याशिवाय आर्थिकसहकार्य केलं, आजही करत आहेत; त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. किंबहुना या दोघांच्याच बळावर आम्ही या सात वर्षांच्या खडतर आणि काटेरी प्रवासातही टिकून राहिलो आहोत. त्यामुळे आजच्या या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आमच्या लेखकांप्रति आणि वाचकांप्रति कृतज्ञता व्यक्त करतो.
उमेद आणि आशावाद तर निदान दशक तरी पूर्ण करावा असा आहे, पण पुढचं पुढे.
आजचा दिवस तर ‘साजरा’ करूया!
सर्वांना दसरा उर्फ विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment