अलीकडचे महत्त्वाचे कादंबरीकार बाळासाहेब लबडे यांची ‘काळ ‘मेकर लाइव्ह’ ’ ही कादंबरी अपारंपरिक आहे. रेमंड विल्यम्स ज्याला ‘सांस्कृतिक भौतिकवाद’ (Cultural Materialism) म्हणतात, त्याच्याशी ही कादंबरी भिडताना दिसते.
अतितंत्रज्ञानीय प्रसारामुळे गेल्या पंचवीस वर्षांत जग कुठल्या कुठे बदलून गेले आहे! आपण आज ‘ॲप’च्या जमान्यात जगत आहोत. हा जमाना अर्धसाक्षर, साक्षर, मध्यम, उच्चमध्यम आणि अतिउच्चमध्यम वर्ग यांच्यापुरता असला, तरी त्याचा प्रभाव आणि प्रादुर्भाव सर्वदूर आहे, यात काही शंका नाही.
आजच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आपणाला कोणतेही ॲप महिनाभर फुकटात वापरायला देतात. त्यामागचे मानसशास्त्रीय तत्त्व म्हणजे, ते वापरण्याची ग्राहकाला सवय व्हावी आणि त्याला आपल्यात खेचून घेऊन गुलाम करता यावे, हे व्यापारी तत्त्व आहे. ग्राहक म्हणून आपण या जाळ्यात अडकतो आणि किमान यातील काही टक्के लोक निश्चितच त्याचे नियमित ग्राहक होतात.
बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या बाजारात अशी अनेक गुलामगिरीची पाती आपल्या नरडीचा घोट घेत आहेत. आणि आपणही ते त्यांना घेऊ देत आहोत. वास्तविक हे सांस्कृतिक भौतिकतेचे खोटे आणि आकर्षक जग आपणाला मोहित करणारे आहे.
ही गोष्ट आपल्या देशातल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि मानसशास्त्रीय संकटांच्या दृष्टीकोनातून पाहायला हवी. शिक्षण, पाणी, वीज, शेतीचे झालेले मातेरे, मोठ्या प्रमाणात झालेल्या खाजगीकरणामुळे कंत्राटी पद्धतीने दिले जाणारे काम, दारिद्र्य आणि एका वेगळ्या रूपात अस्तित्वात असलेला मागासलेपणा, भयंकर प्रमाणात उपस्थित असणारी बेकारी, त्यामुळे साहजिकच तरुणांमध्ये असलेले प्रचंड नैराश्य, या व अशा अनेक कारणांमुळे अशा प्रकारचे भासात्मक आणि खोटे जग निर्माण व्हायला आणि टिकून राहायला मदत होत आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
भांडवली व्यवस्थेचे हे अतितीव्र रूप आपले विराट दर्शन घडवत आपल्या पायात गुलामीच्या श्रृंखलात अडकवत आहेत. एकविसाव्या शतकात खाजगी कंपन्यांनी राजकीय आश्रयाच्या आधारे जोमदारपणे सर्व शक्यता आजमावून हे नवे शोषणाचे जाळे पसरवलेले आहे आणि त्यातून आजच्या तरुण पिढीचे सर्व बाजूने जेवढे करता येईल, तेवढे नुकसान करत आहे.
औद्योगिकीकरणामुळे माणसाच्या ‘परात्मीकरणा’बद्दल (Alienation) मार्क्सने दीडशे वर्षांपूर्वी सावध केले होते. त्याचे आज अतिविराट अस्तित्व आपल्यासमोर ‘आ’ वासून उभे आहे. आणि आपण त्याच्या जबड्यात मरणाचे स्नान करण्यासाठी जात आहोत.
गेल्या तीन दशकांत जागतिकीकरणामुळे व्यक्तीच्या ‘परात्म’तेचा पैस कल्पनेच्या पलीकडे ताणला गेला आहे. सबंध जगाने करोना कालखंडामध्ये याचे प्रात्यक्षिक अनुभवले. ‘काळ ‘मेकर लाइव्ह’ ’ ही कादंबरी याच काळात लिहिली गेली. सर्व जग ठप्प झाले, रस्त्यावरच्या कुत्र्यांनादेखील माणसे का बाहेर पडेनासी झाली आहेत, हे समजेनासे झाले होते. झाडावरचे पक्षी, समुद्रालगतचे प्राणीजीवन, जंगलातले निर्मनुष्य रस्ते, हे सगळे आश्चर्याचा धक्का देणारे होते.
माणूस जर घराबाहेरच पडला नाही, तर काय होऊ शकते, याचे उलटसुलट चित्र प्रत्येक व्यक्तीने अनुभवले. माणूस पर्यावरणाचे नुकसान करणारा प्राणी असल्यामुळे पर्यावरणाचा या काळात खूप कमी ऱ्हास झाला. खेड्यापाड्यांत राबणारा श्रमिक आणि शेतकरी वर्ग यांच्यातली रोगप्रतिकारकतादेखील ठळकपणे समोर आली. हा एक-दोन वर्षांचा अभूतपूर्व, धक्कादायक आणि आश्चर्याचा कालखंड होता.
हे या कादंबरीने व्यवस्थित टिपले आहे. खेडीपाडी, शहरे, महानगरे म्हणजे सगळीकडेच मोबाईलमधील विविध ॲपच्या माध्यमातून मानवी संस्कृतीचे हे क्षूद्रीकरण होताना दिसत आहे. ‘मी एक ॲप, तू एक ॲप, आपण सगळे एक एक ॲप...’ असा हा प्रकार आहे. कोण कोणाचे ऐकायला तयार नाही.
आपल्या सहनशक्तीची मर्यादाही अत्यंत कमी झाली आहे. एका अभ्यासाप्रमाणे, ही सहनशक्ती आता केवळ ३० सेकंद एवढी झाली आहे. ३१व्या सेकंदाला एक तर आपण दुसऱ्यावर उसळतो किंवा दुर्लक्ष करून निघून जातो. असा हा गंभीर सांस्कृतिक असहनशीलतेचा मामला आहे. संवेदनशीलता हरवलेल्या या समाजातील व्यक्तींना आपण प्रबोधित कसे करावे/करणार, ही मोठी समस्या आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
युरोपमध्ये सोळाव्या शतकात रेनेसान्स चळवळ झाली. त्याचा आधुनिक जगनिर्मितीशी फार जवळचा संबंध आहे. आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ, प्रत्येक गोष्टीची विवेकनिष्ठ चिकित्सा, कलेचा विकास, विज्ञानाच्या आधारे प्रत्यक्ष ग्रंथनिर्मिती वगैरे हजारो गोष्टी या काळात झाल्या. हीच आधुनिकता आपल्याकडे इंग्रजांच्या वसाहतवादाबरोबर आली.
या प्रबोधन क्रांतीमुळे धर्मचिकित्सा नावाची गोष्ट प्रथमतः जगात घडली. मार्टिन ल्युथर (१४८३-१५४६) यांच्या क्रांतिकारक धर्मचिकित्सेमुळे जर्मनीत प्रोटेस्टंट पंथाने चर्चच्या अधिकारशाहीला आव्हान दिले. महात्मा फुले यांची धर्मचिकित्सादेखील याच अंगाने भारतात झालेली दिसते.
गेल्या चारशे वर्षांत जगाने जो विकास केला, त्याचा या धर्मचिकित्सेशी मोठा संबंध आहे. आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर काळात जो क्रांतिकारक विकास झाला, त्याचाही या धर्मचिकित्सेशी आणि आधुनिकतेशी संबंध आहे. यातूनच पुढे अतितंत्रज्ञानीय विकासाची सूत्रे (कम्प्युटर आणि आता अँड्रॉइड फोन) देशातल्या मूठभर भांडवलदारांनी हातात घेऊन, आजच्या या उत्तराधुनिक कालखंडात देशाची आणि सगळ्या समाजाची पंचाईत करून ठेवली आहे.
विसाव्या शतकात माणसामाणसांमध्ये जो एक संवाद होता, तो आज अस्तित्वात नाही. एकविसाव्या शतकात प्रबोधन नावाची गोष्ट कालबाह्य झालेली आहे. संवेदनशून्य व्यक्तीला, समाजाला काही सांगता येणं शक्य आहे, पण ज्याची संवेदनशीलताच नष्ट झाली आहे, त्याला आपण काहीच सांगू शकत नाही. प्रत्येक गोष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकली जात आहे.
बाळासाहेब लबडे या लेखकाने एका ॲपवर जाऊन, हा ‘सांस्कृतिक कचरा’ उपसून उपसून आपल्यासमोर आणून टाकला आहे. त्यांचा निवेदक त्या कचऱ्यामध्ये उभा राहून सांस्कृतिकदृष्ट्या आजच्या विदारक परिस्थितीचे प्रामाणिक चित्रण या कादंबरीत करतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अशा सांस्कृतिक, सामाजिक, मानसशास्त्रीय आणि तात्त्विक अर्थाने विस्कळीत आणि विघटित झालेल्या समाजात कोणतेच कथन होऊ शकत नाही. पारंपरिक कथनशास्त्राप्रमाणे आज आपणाला कोणताच घटनाक्रम सांगता येणे कठीण आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ‘घटना’च मुळात अस्तित्वात नाही. माणूस, समाज, व्यक्ती यांच्याप्रमाणेच तीही कोसळलेली आहे. हे कोसळलेपण या कादंबरीत येते. यालाच ‘उत्तराधुनिक घटित’ (Postmodern Phenomenon) म्हणावे लागेल.
याचमुळे या कादंबरीत कोणी नायक-नायिका नाही. त्याचबरोबर प्रत्येक नायक-नायिकांचे क्षूद्रीकरण आणि कचराकरण (Trivialization) झाले आहे. रहम्या, म्हातारा, बहुरूपीया आणि ‘मी’ अशी काही पात्रे येतात, पण ती आशय म्हणून अधिक येतात. ‘मी’ प्रथमपुरुषी निवेदक आहे आणि तो ‘गोष्ट नसलेली’ गोष्ट सांगतो.
प्रत्येक व्यक्तीला लाइव्ह येऊन काही सांगायचे आहे. मात्र, ऐकायचे कोणाचेच नाही. त्यामुळे १९९० पूर्व कालखंडातील प्रबोधन, समाजपरिवर्तन, ग्रंथ, पुस्तके, चर्चासत्रे, संशोधन, विचारधारा, विचारप्रणाली, धर्मचिकित्सा, जातचिकित्सा, जातीअंत, बुद्ध, बसवेश्वर, शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल या ॲपवर ‘लाइव्ह’ येऊन तुम्ही काही सांगू लागलात, तर तुम्हाला या ॲपवर जॉईन झालेल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया असू शकतात? असू शकतील?
- ‘ वा वा. क्या बात हैं! बहोत खूब!’, ‘माशाल्ला! कौन लोग हैं ये?’, ‘अबे, गाना गावो नं! ये क्या चल रहा हैं?’, ‘काहे को ये सब बोल रहे हो, जानम? छोड भी दो नं! चलो, अब एक गाना गावो भै.’
इथं काय नाही? इथं सगळं आहे. तरीही, इथं काहीच नाही. जे आहे ते रितं, भकास आणि उद्विग्न करणारं आहे. इथं स्त्रियांची चित्रं लावलेले पुरुष आहेत आणि पुरुषांची चित्रं लावलेल्या स्त्रिया आहेत. एक्सरसाइज म्हणून डान्स करणाऱ्या अतिश्रीमंत घरातल्या स्त्रिया आहेत. अर्धी चड्डी घातलेले पुरुष आहेत आणि कमी कपड्यात नाचणाऱ्या स्त्रियाही आहेत.
इथं ऑनलाईन पॉर्न चॅटिंग आहे. पॉर्न सेक्स विथ सेक्स डॉल, पे अँड चॅट एनिथिंग विथ गर्ल, फूल सॅटस्फिक्शन एनी भाबी इज देअर, फक हर, असेही ऑप्शन्स यात आहेत. त्याचबरोबर धुणी-भांडी, स्वयंपाक करत ‘लाइव्ह’ करणाऱ्या कनिष्ठ मध्यमवर्गातल्या स्त्रिया आहेत. अनेक मल्टीचॅटबॉक्समध्ये शिवीगाळ सुरू आहे. पुरुष तर सणसणीतच शिव्या देतो आहे, स्त्रियाही पुरुषासारख्याच शिव्या देत आहेत. तरुण-तरुणींमध्ये साठलेला प्रचंड कोलाहल आणि क्रोधाला करून दिलेली ही वाट आहे. कोणी सरळ बोलत नाही. पण काही सरळ बोलणारेही आहेत.
कोण भविष्य सांगायला इथं येतंय. कोण भजन, कीर्तन करायला; कोण पैसे मिळवायला; कोई मनोरंजन के लिए; कोई करियर के लिए; कोई जुआँ खेलने के लिए; कोई पॉप्युलर होने के लिए; कोई लडकी पटाने के लिए, तो कोई टाइमपास के लिए आता हैं….
या कादंबरीत अशा प्रकारचे अठरा ‘लाइव्ह’ आहेत. व्यक्ती व्यक्तीला ॲपवर भेटू इच्छिते, प्रत्यक्ष नाही. यालाच ‘लाइव्ह येणं/होणं’ असं म्हटलं आहे. स्वतःच्या ‘इगो’ला कुरवाळण्यासाठी निर्माण झालेले हे ‘लाइव्ह’ आहेत. या अशा कचाट्यात सापडल्यामुळे व्यक्तीची घुसमट दर्शवणारे या कादंबरीत जागोजागी लेखकाचे अनेक संज्ञा प्रवाह आहेत. ते कादंबरीच्या आशयाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सहज उपलब्ध झालेला अँड्रॉइड फोन, वाढत जाणारी ऑनलाइन संस्कृती, वाढत जाणारे कंत्राटी पद्धतीचे काम, कमी पैशात उपलब्ध असलेला कमी शिकलेला, शिकलेला किंवा उच्चविद्याविभूषित तरुण वर्ग(सुद्धा), दारिद्र्याचे प्रश्न, यातून उपस्थित झालेला तरुणांमधला कमालीचा रिकामटेकडेपणा, यातूनच या तरुणांमध्ये सतत धुमसत राहणारा ‘ॲग्सट्’ (Angst), म्हणजेच अशा प्रकारची एक भावना की जी, या तरुण वर्गाला स्वतःच्या जीवनाबद्दलचा कुठलाच भरावसा देत नाही आणि हा वर्ग सातत्यानं व्याकूळ होऊन हाताला काही लागतं का, याचा शोध घेताना दिसतो आहे.
याचा फायदा आजची अतितंत्रज्ञानीय व्यवस्था घेताना दिसते. त्यातून भडका उडवणारे संवेदनक्षम असे जात, धर्मचिकित्साचे प्रश्न मुद्दामहून छेडले जातात. मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी इतरही असेच अर्थाअर्थी काहीच संबंध नसणाऱ्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणले जाते. फेसबुक, व्हाट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर, पेजर, ब्लॉग, रिॲलिटी शोज, स्वतःचे व्हिडिओज निर्माण करता येण्यासारखे ॲप्लिकेशन्स, टिकटॉक, हजारो उपलब्ध पोर्न साईट्स; ललितकलेच्या अनुषंगाने- कविता, कथन (यात इतिहास कथनही येते; बखरीची भाषा येते), भजन, संगीत, गाणं, कीर्तन, संतसाहित्याची निरूपणं, नृत्य, चित्रकला आदी (अगदी तंबोरा, तबला, म्युझिक ट्रॅक वगैरे) उपलब्ध करून देणारी हजारो ॲप्स, यांत आपल्या देशातील करोडो तरुण-तरुणी, किशोरवयीन मुलेमुली (अगदी पाचवी ते आठवी या वर्गात असणारे) गुंतलेले आहेत. त्यांना सतत गुंतवून ठेवण्याची एक व्यवस्था कार्यरत आहे.
या भयंकर अशा अभूतपूर्व परिस्थितीचा विचार करता उदाहरणार्थ, आज कान्ट, हेगेल, मार्क्स, फ्रॉईड, रेमंड विल्यम्स, एरिक फ्रॉम या तत्त्वज्ञ आणि विचारवंतानी मूलभूत तत्त्वज्ञानात्मक, मानसशास्त्रीय आणि संस्कृती अभ्यासाच्या दृष्टीकोनातून सांगितलेल्या संकल्पनांचा आणि गोष्टींचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. काळ, स्थळ, उत्पादनाची साधनं, उत्पादनाचा मालक, चेतन-अचेतन मनाची घालमेल, नवा संस्कृती पदार्थ/अपत्य, यातून आज रिकामटेकडे बेकार, शेतकरी, कामगार, अर्ध-बेकार, कंत्राटी कामात अडकलेल्या तरुणांचे होणारे चमचमीत वेष्टनात गुंडाळलेले शोषण, या सर्व गोष्टींचा पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे.
विसाव्या शतकातील (विशेषतः १९९० पूर्वीची) ‘संस्कृती-चिकित्सा’ आज कालबाह्य होत आहे काय, असा संभ्रम निर्माण व्हावा, असा सांस्कृतिक माहोल तयार झाला आहे. त्यामुळे या सर्व अभूतपूर्व परिस्थितीची वेगळ्या पद्धतीनं चिकित्सा करावी लागेल. ही कादंबरी या नव्या प्रश्नांना भिडताना दिसते.
महाराष्ट्रातल्या बारामतीच्या सुरज मोडवे नावाच्या एका तरुणाची यात एक कहाणी आहे. त्याला ‘टिक टॉक’वर वर्षभरात दहा लाखाहून अधिक फॉलोअर्स म्हणून मिळतात. त्याला भेटायला लोक गाड्या घेऊन येऊ लागतात. त्याच्याबरोबर सेल्फी काढतात, पण त्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये एक कणभरही फरक होत नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अजून एक दर्दभरी कहानी यात आहे (म्हणजे, अशा अनेक कहाण्या आहेत). ‘काळमेकर’वर आपापले ‘डेली टास्क’ करून काही लोक व्हीआयपी होण्यासाठी रिचार्ज करतात. अशाच एका व्यक्तीच्या रिचार्जची ही कहाणी आहे. वर्षाचे रिचार्ज एकदम करून (जवळपास बारा हजारापेक्षा अधिक रक्कम) हा कलाकार हळूहळू खेळ खेळत राहतो. नंतर आपले पैसे परत मिळावेत म्हणून जुगारात अडकतो आणि जवळपास आठ लाखांपेक्षा जास्त रुपये गमावून बसतो.
रमी, तीन पानी पत्ती असा जुगार अनेक ॲप्सवर अगदी जोरात सुरू आहे. या ॲप्समध्ये करोडो लोक गुंतलेले आहेत. यात सर्वसामान्य जनतेला अडकवण्यासाठी बॉलिवुडचे लाडके अभिनेते त्याची जाहिरात करत असतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लोक आपापले खेळ खेळत बसले आहेत. कोणाशीही ना संपर्क, ना संवाद. यात सामान्य लोकांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा होत आहे.
करोना काळात अनेक ॲप्स समृद्ध झाली. या कंपन्यांनी प्रचंड पैसा कमावला. पैसे गमावण्याचा रिकामटेकड्या लोकांना बसल्या जागी ‘उद्योग’ मिळाला. त्यातून जातीय, धार्मिक तेढ निर्माण व्हावी, ‘ ‘करोना व्हायरस’ हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. भारताचे नुकसान व्हावे अशी योजना चीन, रशिया आणि पाश्चात्य देशांनी केली आहे’, हा प्रचारही या माध्यमांनी केला. आपल्या देशात हिंदू-मुस्लीम संघर्षाचा भडका उडावा, असं पुढे राजकारण घडवलं गेलं. त्यात या अशा अनेक ॲप्सचा मोठा वाटा होता. बाळासाहेब लबडे यांनी या अशा अनेक प्रश्नांचा सखोल कचरा या कादंबरीच्या माध्यमातून बाहेर काढला आहे.
जगप्रसिद्ध साऊथ आफ्रिकन कादंबरीकार एन्गुगी वा. थियांगो यांनी ‘निर्वसाहतीकरणा’चा (Decolonization) जो मुद्दा मांडला आहे, तो वरील विवेचनाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. पुन्हा गावाकडे जाण्याचा मुद्दा (Reverse Migration) हाच एकमेव निर्वसाहतीकरणाचा मुद्दा नाही. कामाच्या शोधात तरुणांचे तांडेच्या तांडे शहराकडे स्थलांतरित झाले, त्यांना कमीत कमी पैशांत वापरून त्यांचा रिकामटेकडेपणा वाढवण्याच्या प्रेरणा या शहरांचा, महानगरांचा आणि काही विशिष्ट प्रदेशांचा अतिविकास, स्मार्ट सिटी नावाचं गौडबंगाल यांत दडलेल्या आहेत, हे नीटपणे समजावून घ्यायला पाहिजे. नको असलेल्या किंवा अनावश्यक अशा वस्तूंची निर्मिती करून विकासाचा खोटा चेहरा समाजाला सतत दाखवला जातो आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यात खाजगीकरणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. बहुराष्ट्रीय खाजगी कंपन्यांचा हा अक्राळ-विक्राळ चेहरा आहे. हा छुपा साम्राज्यवाद सर्व जगभर सुरू आहे. आपल्याकडे अजून विचित्र म्हणजे वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमांतून (यात कुठलंही माध्यम स्पेअर केलेलं नाही. अगदी गाण्यापासून, सिनेमे, टीव्ही सिरियल्स, काही चॅनल्स, बातम्या, चित्रं ते तांडवनृत्यापर्यंत) व्यवस्थितपणे सनातन विचार, कर्मकांड वगैरे विधींचं गौरवीकरण केलं जात आहे. चेतन-अचेतन मनात सांस्कृतिक गोंधळ सुरू राहिला पाहिजे, याची काळजी घेतली जात आहे.
त्यामुळे निर्वसाहतीकरण (Decolonization) वगैरे गोष्टी खूप दूर राहिल्या, उलट एक नवा सांस्कृतिक वसाहतवाद, दहशतवाद आणि साम्राज्यवाद यातून आकारत आहे. प्रत्येक सांस्कृतिक वस्तूची निर्मिती ‘क्रयवस्तू’ म्हणून होत आहे. विका किंवा विकत घ्या, हे या नव्या उद्योगाचं तत्त्व आहे.
भूकबळीपेक्षा निराशग्रस्त मानसिक स्थितीमुळे आत्महत्यांची संख्या विलक्षण वाढली आहे. यातून समाजातील फार मोठा (जवळपास निम्मा) ‘सजग’ असलेला किंवा होऊ शकणारा/पाहणारा लोकसमूह ‘परात्म’ (Alienate) झाला आहे. नैराश्येपोटी स्वतःमध्येच गुंतून जाण्याचा हरवलेपणा, इतरांच्या जीवनात किंवा इतरत्वात कुठल्याही प्रकारचं स्वारस्य न घेण्याची सांस्कृतिक आणि मानसशास्त्रीय स्थिती, या व्यवस्थेनं निर्माण केली आहे.
आणि ही आजची सर्वांत मोठी शोकांतिका आहे. ‘काळ ‘मेकर लाइव्ह’ ’ या कादंबरीने ही शोकात्म कथा कथन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही कादंबरी केवळ या नैराश्याचं चित्रण करत नाही, तर या अशा भयंकर परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल, याचं विवेचनही करते. आणि हीच गोष्ट या कादंबरीचं वेगळेपण सिद्ध करते.
‘ काळ ‘मेकर लाइव्ह’ - बाळासाहेब लबडे
पद्मगंधा प्रकाशन, पुणे | पाने – २९६ | मूल्य – ५५० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक दीपक बोरगावे भाषाशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
deepak.borgave7@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment