सध्याच्या ‘ऱ्हासमय’ काळात पवारांचं सदरलेखन सामाजिक ‘शल्य-चिकित्सका’ची भूमिका निभावत आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ ‘आक्रमक शैली’, या चष्म्यातून पाहून चालणार नाही!
ग्रंथनामा - झलक
राम जगताप
  • ‘कळफलक’ या पुस्तकसंचाची मुखपृष्ठे
  • Tue , 24 October 2023
  • ग्रंथनामा झलक कळफलक Kalphalak संजय पवार Sanjay Pawar

आज दसरा अर्थात विजयादशमी. या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते आणि ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे एक धडाडीचे कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी ‘पिंपळपान प्रकाशन’ ही संस्था सुरू केली आहे. सुरुवातीलाच त्यांनी त्यांचे आवडते लेखक आणि प्रसिद्ध नाटककार व स्तंभलेखक संजय पवार यांच्या चार पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे. ‘प्रतिक्षिप्त’, ‘शंभरातल्या नव्वाण्णवास’, ‘कळफलक’ (भाग १ ते ४) आणि ‘एकलव्याच्या भात्यातून’ (पुनर्मुद्रण) ही त्यातील पुस्तके. यातील ‘कळफलक’ हे साप्ताहिक सदर जानेवारी २०१७ ते जून २०२० या काळात ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झाले. या पुस्तक-चतुष्ट्याला ‘अक्षरनामा’चे संपादक राम जगताप यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

१.

साधारपणपणे बाराएक वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी दै. ‘प्रहार’च्या रविवार पुरवणीचं काम पाहत होतो. नवीन वर्षाच्या सदराची आखणी चालू होती. दलित आणि मुस्लीम समाजाच्या प्रश्नांना वर्तमानपत्रांतून पुरेसं स्थान मिळत नाही, असं वाटत होतं. म्हणून मी मुस्लीम प्रश्नांवर लिहिण्यासाठी अन्वर राजन यांना विनंती केली आणि दलितांच्या प्रश्नांसाठी संजय पवार यांना. तोवर पवारांची ओळख नव्हती. त्यांचं लेखन वाचलं होतं. त्यांनी संवादलेखन व पटकथालेखन केलेले काही सिनेमेही पाहिले होते. पण प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली नव्हती. तरी त्यांना फोन केला आणि सदराची कल्पना सांगितली. त्यावर ते काहीसे तडकून म्हणाले, ‘दलितांच्या प्रश्नांवर दलितांनीच का लिहावं? इतरांनी का लिहू नये? तुम्हा पत्रकारांनाही तसा विचार करता येऊ नये?’ त्यांच्या या सडेतोड उत्तरानं मी गारद झालो, पण तरी धीर एकवटून म्हणालो, ‘तुमचा मुद्दा अगदीच मान्य आहे. पण तुमच्याइतक्या जाणकारीनं इतर कोण लिहील असं वाटत नाही.’ मग इतर थोड्या गप्पा झाल्या आणि त्यांनी सदर लिहायला होकार दिला.

तेव्हापासून सदरलेखनाच्या निमित्तानं सतत त्यांच्याशी संबंध येत राहिला आणि त्यांच्या बहुपेडी व्यक्तिमत्त्वाची ओळख होत राहिली आहे. जसं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे, तसंच लेखनही.

वास्तविक पवारांची चित्रकार, मुखपृष्ठकार, जाहिरातकार, नाटककार, संवादलेखक, पटकथाकार आणि सदरलेखक अशी विविधांगी ओळख आहे. ‘बोकड दाढी’मुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व अनेकांच्या परिचयाचं-ओळखीचं आहे; तसंच ज्वलंत, धगधगत्या राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवरील नाटकांमुळेही ते महाराष्ट्राला माहीत आहे. त्याचबरोबर यशस्वी किंवा हुकमी सदरलेखक अशीही त्यांची ओळख आहे.

१९८३ साली त्यांनी साप्ताहिक ‘मनोहर’मध्ये पहिल्यांदा सदरलेखन केलं. त्यानंतर ‘साप्ताहिक माणूस’, दै. ‘आपलं महानगर’, साप्ताहिक ‘महाराष्ट्र’, पाक्षिक ‘परिवर्तनाचा वाटसरू’, दै. ‘मुंबई सकाळ’, दै. ‘प्रहार’, दै. ‘लोकसत्ता’, दै. ‘मी मराठी लाइव्ह’, दै. ‘पुण्यनगरी’, ‘मुक्त शब्द’ अशा विविध नियतकालिकांमधून त्यांचं सदरलेखन प्रकाशित झालं आहे.

दै. ‘आपलं महानगर’मधून तर त्यांनी सलग १२ वर्षं सदरलेखन केलं. या सदरांची आजवर ‘पानीकम’, ‘पानीकम’ (भाग १ व २), ‘एकलव्याच्या भात्यातून’, ‘चोख्याच्या पायरीवरून’, ‘सदर लेखन संजय पवार यांचे आहे!’, अशी पुस्तकंही प्रकाशित झाली आहेत. त्याशिवाय ‘वेळोवेळी’ हा नैमित्तिक लेखांचाही एक संग्रह आहे.

‘पानीकम’ला अनंत भावे यांची प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात, “अलीकडच्या आणि आजच्या मराठी मुलुखातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक चलनवलनाचा वेगळा वेध घेणारी नजर सदरकार संजय पवारकडे आहे. तो चित्रकार आहे, नाटककार, कथा-पटकथाकार आहे. दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे. आणि या विविधांगी व्यक्तिमत्त्वानं रंगलेल्या वेधक शैलीत बोलणारं हे पुस्तक वाचकाचं रंजन तर करीलच आणि उदबोधनसुद्धा. कोणत्याही पाणीदार किंवा पानीकम सदरानं आणखी काय हो करायचं असतं!”

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘पानीकम’ (भाग १ व २)ला लीना केदारे यांची प्रस्तावना आहे. त्यात त्या म्हणतात, “समाजात जाणवणाऱ्या सर्व तऱ्हेच्या अपप्रवृत्तींबद्दलचा संजय पवारांचा दृष्टीकोन शल्यचिकित्सकाचा असतो. धारदार टीकेचे शस्त्र जरी त्यांनी करी धरले, तरी त्यामागे समाजाचे स्वास्थ्य टिकावे हाच उदात्त हेतू असतो. त्यांच्या सांस्कृतिक-सामाजिक-राजकीय अशा विविध विषयांवरील अनेक लेखांत हे प्रकर्षाने जाणवते. त्या अर्थाने ते ‘सामाजिक-शल्यचिकित्सक’ ठरतात. किंवा परंपरेचा संदर्भ घेऊन बोलायचं ठरवल्यास आधुनिक ‘वार’करी. दंभस्फोटाचा त्यांचा दृष्टीकोन तुकोबाची आठवण करून देतो. त्यांच्या लेखनातील विद्रोह अत्यंत संयमित, विवेकी असा दिसतो, हे त्यांच्या विचारांच्या स्पष्टतेचे द्योतक आहे.”

‘चोख्याच्या पायरीवरून’ला अविनाश महातेकर यांची प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात, “संजय पवार. चोख्याच्या पायरीवर तुक्याच्या मस्तीत बसलेला एक कंदहार माणूस. तुमच्या-आमच्या सारखाच. पण डोळे, मेंदू आणि जिभेवरची वेसण झुगारलेला. बघू नये ते बघतोय, करू नये तो विचार करतोय आणि बापजाद्यांच्या आभाळातले शब्द धुंडाळीत मोकार जीभ सोडून बसतोय. चोख्याच्या पायरीचं कुणाला फारसं देणंघेणं नाही म्हणून, ती त्याच्यासाठी सताड मोकळी असल्यागत बसलाय. रानवट आचार-विचारांच्या जनावरांना उचकवतोय. अंगावर घेतोय. ‘पायरीनं वागा’ असं सांगणाऱ्या, सुचवणाऱ्या किंवा इशारत देणाऱ्यांना तेवढ्याच दमात सांगतोय की, तुमच्याच पायऱ्या सांभाळा. झिजल्यात, निसरड्या झाल्यात. त्यांच्याखाली पेरलेल्या सुरुंगांचा कधीही स्फोट होऊ शकतो.” 

‘एकलव्याच्या भात्यातून’ या पुस्तकाचा ब्लर्ब बबन सरवदे यांनी लिहिला आहे. त्यात ते म्हणतात, “‘एकलव्याच्या भात्यातून’ हे पुस्तक म्हणजे दारूगोळ्यांनी भरलेल्या स्फोटकांचे कोठार आहे. वाचताना प्रत्येक पानावर जो स्फोटकांचा धमाका उडतो, तो भल्याभल्यांची छाती दडपवून टाकणारा आहे… सातत्याने खोटा इतिहास लिहून सोंडी-बोंडीचा आंधळा बाजार मांडणाऱ्यांविरुद्ध संविधानाच्या चौकटीत लोकशाही जपण्यासाठी समतेचा पुरस्कार करणाऱ्या संजय पवार नावाच्या योद्ध्याची ‘एकलव्याच्या भात्यातून’ तीर सोडून केलेली अफलातून तीरंदाजी आवर्जून वाचावी अशीच आहे.”

‘सदर लेखन संजय पवार यांचे आहे’ या पुस्तकाचा ब्लर्ब विद्युत भागवत यांनी लिहिला आहे. त्या म्हणतात, “ ‘सदर लेखन संजय पवार यांचे आहे’ या पुस्तकातील नुसती शीर्षके पाहिली तरी लक्षात येते की, इंग्रजी, मराठी दोन्ही भाषांच्या सरमिसळीचा वापर आग्रहपूर्वक करून दोन्ही भाषांमधून येणाऱ्या कर्मठ संकुचिततेला संजय पवार आव्हान देतात… आभासाच्या दुनियेत जन्मलेल्या या लेखकाला झपाट्याने बदलणाऱ्या जगात स्वप्ने विकली जातात, हे माहिती आहे. परंतु आता स्वप्ने मनाच्या बाहेर पडून आभासाचे रूप धारण करत आहेत आणि असे आभासी वास्तव आपण टक्कर घेऊन फोडून समजावून घेतले पाहिजे, याची जाण दिसते.”

तर ‘वेळोवेळी’ या पुस्तकाचा ब्लर्ब डॉ. अनिल सपकाळ यांनी लिहिला आहे. त्यांनी म्हटलंय, “तसे हे स्फूट लेख. वेगवेगळ्या कथनतंत्राचे केलेले निस्सीम प्रयोग खास संजय पवार यांच्या शैलीत. दृश्यात्मक, नाट्यात्मक, प्रभावी कथनशैली असलेले. उपरोध, विडंबन, उपहास, दंभस्फोट याचबरोबर अंतर्मुख करणारी लेण्यातल्या विशुद्ध गारव्यासारखी गंभीर लेखनशैली. साधारणत: तीन दशकांच्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय पट उलगडून दाखवणारा. या तीन दशकातील घडामोडींचा बंध संजय पवार नेमकेपणाने उलगडून दाखवतात.”

त्यामुळे प्रस्तुत पुस्तकासाठीही खरं तर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीची प्रस्तावना पवारांनी घ्यायला हवी होती. तसं काही न करता त्यांनी त्यांच्यापेक्षा जवळपास एका पिढीचं अंतर असलेल्या माझ्यासारख्या तरुण पत्रकाराला प्रस्तावना लिहायला का जुंपलं असावं? ही दुर्बुद्धी त्यांना का झाली असावी, माहीत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कदाचित ‘अक्षरनामा’चा संपादक म्हणून मी त्यांचं ‘ ‘कळ’फळक’ हे सदरलेखन छापलेलं असल्यामुळे आणि त्या लेखनाचा समावेश प्रस्तुत पुस्तक-चतुष्ट्यामध्ये असल्यानं त्यांनी हे लचांड माझ्या गळ्यात अडकवलेलं दिसतंय. पवारांसारख्या प्रेमळ आणि फटकळ लेखकाला सहसा कुठल्याही गोष्टीला नकार देणं जड जातं, म्हणून हा खटाटोप.

प्रस्तावना हा एक प्रकारे पुरस्कार असतो. त्यामुळे ती शक्यतो मान्यवरांची घ्यावी, अशी महाराष्ट्रात पूर्वापार चालत असलेली एक अलिखित प्रथा आहे, पण हे पवारांना सांगण्याची सोय नाही. कारण ते अशा प्रथा-परंपरांना जुमानणाऱ्यांपैकी नाहीत. किंबहुना त्यांना चूड लावून, त्याच्या धगधगत्या ज्वाळांकडे समाधानानं पाहायला त्यांना आवडतं. ते वृत्तीनं, स्वभावानं आणि लेखनानंही बंडखोर आहेत.

तारुण्य हे बंडखोरी करण्याचं वय असतं. माणूस जसजसा वयानं वाढत जातो, तसतशी ही बंडखोरी कमी होत जाते. दुनियादारी माणसाला वयानुसार बदलवते. त्यामुळे थोडंसं अलंकारिक भाषेत सांगायचं, तर साम्यवादाकडून समाजवादाकडे त्याची वाटचाल सुरू होते. त्या समाजवादाला पन्नाशीनंतर लोकशाही समाजवादाचं वळण लागतं. आणि साठीनंतर काहीशा आक्रमक उजव्या वाटेचं.

अर्थात हे प्रत्येकाच्याच बाबतीत होतं, असं नाही. तारुण्यात साम्यवादी विचारानं प्रभावित झालेली व्यक्ती सहसा उजवीकडे झुकत नाही, फार तर ती मध्यममार्गाकडे जाते. शिवाय व्रतस्थपणे साम्यवादी विचारसरणी अनुसरणारी व्यक्ती उतारवयात सहसा नैराश्यवादी किंवा भ्रमनिराश-वादी होत नाही. कारण व्यक्तिगत हितांपेक्षा म्हणजे भौतिक सुखं वा लाभांपेक्षा पक्षीय हित श्रेष्ठ मानलं जात असल्यानं साम्यवादी विचारसरणीच्या लोकांची सहसा शोकांतिका होत नाही. साम्यवादी कार्यकर्त्यांची आणि उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची आत्मचरित्रं समोरासमोर ठेवून वाचली की, हा फरक स्पष्टपणे दिसतो. 

पवार काही साम्यवादी नाहीत, ते आंबेडकरवादी आहेत. भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील पारंपरिक आंबेडकरवाद्यांइतकेच ते प्रखर, प्रस्थापितविरोधी, बंडखोर आणि ब्राह्मणी मानसिकतेवर दणकावून प्रहार करणारेही आहेत. पण काहीही झालं आणि कितीही चुकीचं असलं, तरी आंबेडकरांच्या सांप्रत पाईकांची बाजू उचलूनच धरायची, असा आपपरभाव त्यांच्याकडे दिसत नाही. त्यामुळे पवार विचारानं जरा जहाल असले, तरी त्यात सोयीस्करपणा नसल्यानं ते साहवतात आणि आवडतातही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२.

‘अक्षरनामा’ या मराठी फीचर्स पोर्टलवर ३ जानेवारी २०१७ ते १६ जून २०२० या कालावधीत पवारांचं ‘ ‘कळ’फलक’ हे साप्ताहिक सदर प्रकाशित झालं. या जवळपास साडेतीन वर्षांत पवारांचे तब्बल १६८ लेख प्रकाशित झाले आहेत. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला-संस्कृती, पुस्तकं, व्यक्ती अशा विविध विषयांवरील लेखांचा त्यात समावेश होता. पवारांच्या याआधीच्या जवळपास सर्वच सदरांप्रमाणे हे त्यांचं सदरही अल्पावधीतच लोकप्रिय झालं. किंबहुना ‘अक्षरनामा’ला नावलौकिक मिळवून देण्यात पत्रकार निखिल वागळे, प्रवीण बर्दापूरकर, जयदेव डोळे, अमोल उदगीरकर आणि संजय पवार यांचा मोलाचा वाटा आहे.

तर या सदरातील बहुतांश सर्व लेखांचा समावेश या पुस्तक-चतुष्ट्यामध्ये केलेला आहे. कुठल्याही सदरलेखनाला जागा आणि वेळ अशा दोन मर्यादा असतात. तिसरी मर्यादा पडते ती हुकमी मजकुराच्या निकडीमुळे, चौथी मर्यादा पडते, ती सदरलेखकाच्या दांडग्या हौसेची, आणि पाचवी मर्यादा पडते, ती समाजाच्या ‘चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट न म्हणण्याच्या’ वृत्तीची. पवारांच्या सदरलेखनाला पहिल्या दोन मर्यादा लागू होत नाहीत. कमी वेळेत आणि उपलब्ध जागेत, कळीच्या प्रश्नांवर नेमकं आणि मुद्देसूद कसं लिहावं, याचा एक वस्तूपाठ म्हणून पवारांच्या प्रस्तुत पुस्तकातल्या (किंबहुना आजवरच्या त्यांच्या सर्वच) सदरलेखनाकडे पाहता येईल.

तिसरी मर्यादाही पवारांच्या लेखनाला लावता येत नाही. कारण त्यांचं सदरलेखन हे नेहमीच संपादकासाठी हुकमाचा एक्का ठरत आलं आहे. म्हणूनच तर गेली तीस-चाळीस वर्षं ते सातत्यानं सदरलेखन करत आले आहेत.

पवारांना सदरलेखन करायला आवडत असलं तरी त्यांना त्याचा सोस नाही. पण एकदा सदर लिहायला सुरुवात केल्यानंतर ते निगुतीनं, मेहनतीनं आणि जबाबदारीनं लिहितात, असा निदान माझा तरी अनुभव आहे.

दै. ‘प्रहार’, दै. ‘लोकसत्ता’, दै. ‘मी मराठी लाइव्ह’ आणि ‘अक्षरनामा’ पोर्टल अशा चार ठिकाणच्या त्यांच्या सदरलेखनाचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. ‘लोकसत्ता’चा अपवाद वगळता इतर तिन्ही ठिकाणची सदरं लिहिण्यासाठी मीच त्यांना विनंती केली होती. त्यापैकी ‘प्रहार’मधलं साप्ताहिक सदर दोन-तीन महिनेच चाललं, ‘मी मराठी लाइव्ह’मधलं सदर सहाएक महिने चाललं, पण ‘अक्षरनामा’वरील सदर मात्र जवळपास साडेतीन वर्षं चाललं. त्यामुळे हे मी खात्रीनं सांगू शकतो की, ते केवळ हौसेखातर सदरलेखन करत नाहीत. कळीच्या प्रश्नांबाबत भूमिका घेण्यासाठी ते लिहितात. परिणामी चौथी मर्यादाही त्यांच्याबाबतीत गौण आहे, हे मी अनुभवानं सांगू शकतो.

आधी म्हटल्याप्रमाणे पवार हुकमी, यशस्वी सदरलेखक आहेत. तत्कालीन राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवर ते रोखठोकपणे लिहितात. त्यामुळे त्यांचं सदर लोकप्रिय ठरतंच. परिणामी ‘समाजाची चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट न म्हणण्याची वृत्ती’ ही पाचवी मर्यादाही त्यांच्या इतर सदरलेखनाप्रमाणे या प्रस्तुत पुस्तकत्रयीलाही लागू पडत नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अतिशय स्पष्ट भाषा, परखड विचार, कुणाहीविरुद्ध ‘ब्र’ उच्चारण्याचं धाडस आणि नीरक्षीरवृत्ती, ही पवारांच्या सदरलेखनाची सार्वकालिक वैशिष्ट्यं त्यांच्या या पुस्तकत्रयीतील लेखांमध्येही पाहायला मिळतात. म्हणूनच इतर पुस्तकांच्या प्रस्तावना आणि ब्लर्बवरील मजकुरात विविध मान्यवरांनी त्यांच्या लेखनाची जी वैशिष्ट्यं सांगितली आहेत, ती सगळी याही लेखनालाही लागू पडतात. 

कुठलाही समाज हा नेहमीच कडेलोटाच्या टकमक टोकाशीच घोटाळत असतो. त्याला त्यापासून प्रयत्नपूर्वक मागे खेचण्याचा अहर्निश प्रयत्न करावा लागतो. अशी कितीतरी दिग्गज माणसं एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातल्या राजकारण-समाजकारण-अर्थकारण, साहित्य, पत्रकारिता, कला, शिक्षण, अशा विविध क्षेत्रांत होती. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांची संख्या बरीच रोडावली. पण तरीही ती आपलं काम निष्ठेनं करत होती. ‘काय करूं आतां धरूनिया भीड, नि:शंक हें तोंड वाजविले, नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित’, या तुकोबाच्या एका अभंगातील ओळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या वर्तमानपत्राच्या शीर्षस्थानी छापलेल्या असत.

अशी माणसं, अशी माध्यमं महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात जवळपास संपुष्टात आली. आजचा महाराष्ट्र कसा आहे? अगदी स्पष्टच सांगायचं झालं तर - महाराष्ट्राला, मराठी माणसाला आणि मराठी साहित्याला सांस्कृतिक गॅंगरीन, वैचारिक मुडदूस, वाद-संवादाचा नॉशिया, चर्चांचा हिवताप, सामाजिक चळवळी-आंदोलनांचा रक्तक्षय आणि सौहार्दपूर्ण आदान-प्रदानाचा फोबिया झालेला आहे!

पत्रकार जेव्हा घटनांनाच ‘वास्तव आणि सत्य’, अभ्यासक वरवरच्या निरीक्षणांना ‘सिद्धान्त’, सामाजिक कार्यकर्ते आक्रस्ताळेपणाला ‘पुरोगामीपणा’ आणि लेखक वाह्यात कल्पनांना ‘प्रतिभा’ मानू लागतात, तेव्हा समाजाचं ‘संतुलन’ बिघडतंच. संतुलन गमावलेली माणसं शारीरिक-मानसिक ‘अनारोग्या’ला आमंत्रण देणारी असतात. हे अनारोग्य पवारांना व्यवस्थित समजलेलं आहे, याचे कैक पुरावे या लेखनातून मिळतात.

‘सामाजिक क्रांती’ जशी रातोरात घडून येत नाही, तसाच ‘सामाजिक अध:पात’ही रातोरात घडून येत नाही. आणि हळूहळू घडणाऱ्या ऱ्हासाकडे गांभीर्यानं पाहण्याची महाराष्ट्राची, मराठी माणसांची आणि मराठी साहित्याची परंपराच राहिलेली नाही. अशा ऱ्हासमय काळात पवारांचं सदरलेखन सामाजिक शल्य-चिकित्सकाची भूमिका निभावत आलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे केवळ आक्रमक शैली, या चष्म्यातून पाहून चालणार नाही, तसंच ‘तात्कालिक’ हे लेबलही त्याला लावता येणार नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही गोष्ट खरी आहे की, पवारांच्या लेखनात पाश्चात्य लेखक-विचारवंतांची अवतरणं नसतात आणि भारतीय वा महाराष्ट्रीय महानुभवांचीही. एवढंच काय पण त्यांना दार्शनिक होण्याचाही सोस नसतो. संदर्भबहुल महिरपींपासून ते नेहमीच स्वत:ला आणि लेखनाला वाचवत आले आहेत. काहीशा आक्रमकपणे सत्य सांगणं, वस्तुस्थितीकडे बोट दाखवून लबाडांच्या पायखालचं जाजम खेचून घेणं, उपरोध-शालजोडी यांचा चपखल वापर करून भाष्य करणं, विसंगती-खोटेपणा-अर्धसत्य नेमकेपणानं दाखवून देणं आणि दांभिकतेची पायरी अधोरेखित करणं, अशी पवारांच्या या लेखनाची वैशिष्ट्यं विशेषत्वानं सांगता येतील.

किंबहुना हे पुस्तक-चतुष्ट्य म्हणजे २०१७ ते २०२० या काळातला राजकारण-समाजकारण आणि साहित्य-कला-संस्कृती या क्षेत्रांतील प्रमुख घटनांचा दस्तवेज आहे, हे सहजपणे लक्षात येईल. पवार लेखांना शीर्षकं अतिशय चपखल व नेमकी देतात. आणि त्यांचं म्हणणंही स्पष्ट व थेट असतं. ते राष्ट्रीय राजकारणावर जेवढ्या तडफेनं टीका करतात, तेवढ्याच तडफेनं चांगल्या माणसांचं, पुस्तकांचं आणि नाटक-सिनेमांचं कौतुकही करतात. तथाकथित उबगवाण्या राष्ट्रभक्तीवर आसूड ओढतात, तसंच पत्रकारितेतल्या सवंगपणावरही.

ते कधीही नमनाला घडाभर तेल घालत बसत नाहीत आणि ज्यावर टीका करायची आहे, ती आडवळणाचा आधार न घेता करतात. एखाद्या विषयावर ते उपरोधानं लिहितात, तेव्हा तर अगदी बहार आणतात. विचारांतल्या आणि आचारांतल्या विसगंतींवर अतिशय नेमकेपणानं बोट ठेवतात. आणि एखाद्या वर्तमानकालीन वादाचा नेमका इत्यर्थ काय आहे आणि त्याची महत्ता नेमकी कशात आहे वा नाही, हेही ते अचूकपणे सांगतात.

या पुस्तक-चतुष्ट्यातले सामाजिक-सांस्कृतिक प्रश्नांवरचे त्यांचे लेख अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या दोन्ही विषयांवर ते काहीशा संतापानं लिहितात खरे, पण त्यामागची त्यांची समाजहिताची कळकळ ठसठशीतपणे अधोरेखित होते.

पवार आंबेडकरवादी आहेत, पण आंबेडकरांचा विचारवारसा सांगत तत्त्वहीन राजकारण करणाऱ्या आंबेडकवाद्यांवरही ते टीका करतात, तसंच शिवसेना-भाजप यांच्या जात-धर्मद्वेषावर आधारलेल्या राजकारणावरही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘सब चलता हैं’छाप संस्कृतीवर टीका करतात, तशी कम्युनिस्टांच्या झापडबंदपणावरही. मराठी साहित्यिकांची ‘मूगगिळू’ वृत्ती त्यांना डाचते, तशीच नाटक-सिनेमा क्षेत्रांतला थिल्लरपणाही. समाजाच्या दांभिकतेचा, मूल्यहिनतेचा आणि जातीय उच्चनीचतेचा तर त्यांना मनस्वी राग आहे. याचा पडताळा या पुस्तक-चतुष्ट्यातूनही येतोच.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

३.

भगवान गौतम बुद्धाचं एक वचन आहे – ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’. हे वचन पहिल्यांदा वाचल्यावर वाटतं की, इतकी साधी गोष्ट बुद्धासारख्या महात्म्यानं सांगण्याची गरज होती का? हे तर कुठलाही शहाणा माणूस सांगू शकतो. पण जसजसं आपलं वय वाढतं, जगाचा अनुभव येऊ लागतो, तेव्हा बुद्धाला नेमकं काय म्हणायचं आहे, याचा पडताळा यायला लागतो. या जगात सर्वांत कठीण निवाडा कुठला असेल, तर तो हाच आहे की, सत्याला सत्य म्हणून जाणून घेणं आणि असत्याला असत्य म्हणून जाणून घेणं. सध्याच्या सोशल मीडियाच्या, आयटीसेलच्या आणि राजकीय प्रपोगंडाच्या काळात, तर ती नितांत निकडीची गोष्ट झाली आहे.

या बुद्धवचनाचा मन:पूत स्वीकार पवारांच्या जगण्यात, लेखनात आणि आचारांत दिसतो. किंबहुना ते त्याबाबतीत कमालीचे आग्रही असतात. अशा व्यक्तीला आपण सहसा निर्भीड, परखड, सडेतोड, बंडखोर, धाडसी, कणखर आणि खंबीर यांपैकी एक-दोन विशेषणं लावून मोकळे होतो, फार तर तीन. पण पवारांना आणि त्यांच्या लेखनाला ही सगळीच विशेषणं लागू पडतात. 

यावर काहींचं असं म्हणणं असू शकतं की, यातले काही शब्द हे समानार्थी आहेत, त्यामुळे त्यांची पुनरावृत्ती करण्याची गरज नव्हती. त्यांच्यासाठी एक खुलासा – जसा कुठलाही एक माणूस दुसऱ्या माणसासारखा नसतो. तसंच काहीसं समानार्थी शब्दांचंही असतं. तीही एकाला दुसरा पर्याय किंवा एकाचं काहीसं दुसऱ्यात प्रतिबिंब इतपतच साधर्म्य असलेली असतात. त्यामुळे वरील विशेषणांपैकी कुठलेही शब्द एकमेकांचे यथार्थ पर्यायी शब्द आहेत, असं मानायचं कारण नाही.

पवारांचं लेखन मला नेहमीच तटस्थपणाचा उत्तम नमुना वाटत आलं आहे, आणि चांगल्या सदराचं उदाहरणही. कारण ते राजकीयदृष्ट्या कुठल्याही पक्षीय विचारसरणीबाबत पक्षपाती नाहीत, साहित्य-कला-संस्कृतीबाबत उगाच खोटा अभिमान दाखवत नाहीत आणि सामाजिक ऱ्हासाबाबत बोलताना त्यांच्या शब्दांची धार जरा तिखट होत असली, त्यांचा प्रस्थापितविरोधही काहीसा प्रखर होत असला, तरी ते एकारलेले वाटत नाहीत. 

अशा या नि:पक्ष, तटस्थ आणि रोखठोक लेखकाचे हे पुस्तक-चतुष्ट्य वाचकांना आवडेल, आवडावे.

१) कळफलक २०१७ : संजय पवार | पाने – २६२ | मूल्य – २८० रुपये

२) कळफलक २०१८ : संजय पवार | पाने – २५७ | मूल्य – २८० रुपये

३) कळफलक २०१९ : संजय पवार | पाने – २२२ | मूल्य – २४० रुपये

४) कळफलक २०२० : संजय पवार | पाने – १२४ | मूल्य – १४० रुपये

प्रकाशक : पिंपळपान प्रकाशन, मुंबई

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......