अजूनकाही
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाला मारण्यासाठी वापरलेली वाघनखं ‘याचि देही याचि डोळा’ बघायला मिळणार, म्हणून अवघा महाराष्ट्र आनंदला आहे. हीच ती वाघनखं आहेत की नाही, याबद्दल वाद असू शकतो, पण मराठी माणसाच्या मनात याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच भावनेला हात घालत, लंडनमध्ये असलेली ही वाघनखं भारतात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नुकताच सामंजस्य करार केला आहे.
इंग्लंडची राजधानी लंडन इतर गोष्टींबरोबरच इथल्या वस्तुसंग्रहालयांसाठी प्रसिद्ध आहे. जगभरातील लोक ती पाहण्यासाठी येतात. इंग्रजांनी जगातील विविध देशांतून गोळा केलेल्या ऐतिहासिक गोष्टींचा खजिना आणि त्यांचा इतिहास इथं पाहायला मिळतो. या वस्तू त्यांनी लुटल्या की, त्यांना भेट मिळाल्या आहेत, याबाबतीत वाद असू शकतो. पण या वस्तूंचं जतन मात्र त्यांनी खूप प्रेमानं केलं आहे, यात शंका नाही. त्यासाठी मोठी यंत्रणा राबत असते.
मराठ्यांच्या वारसांकडून एका इंग्रज अधिकाऱ्याला मिळालेली वाघनखं जिथं आहेत, ते लंडनमधील ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम’ हे उपयोजित कला, सजावटीच्या कला आणि डिझाइनच्या वस्तू असलेल्या जगातील सर्वांत मोठ्या संग्रहालयांपैकी एक आहे. त्यात २.२७ दशलक्ष वस्तूंचा कायमस्वरूपी संग्रह आहे. त्याची स्थापना १८५२मध्ये करण्यात आली आणि राणी व्हिक्टोरिया व प्रिन्स अल्बर्ट यांचं नाव या संग्रहालयाला देण्यात आलं.
व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असो किंवा नॅचरल हिस्टरी म्युझियम अथवा ब्रिटिश म्युझियम, ही वस्तुसंग्रहालयं बघितल्यावर जगात फेरी मारून आल्यासारखं वाटतं. यातील एका वस्तुसंग्रहालयाला भेट द्यायचं म्हटलं, तरी किमान पाच ते सहा तास सहज लागतात. या उत्तमोत्तम संग्रहालयांत आपला इतिहास वाचणं, बघणं हा अनुभव प्रत्येक वेळी रोमांचक ठरतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ही संग्रहालये एकदा पाहून मन भरत नाही, म्हणून इथं वास्तव्यास आल्यावर मी या वास्तूंच्या कित्येक फेऱ्या केल्या आहेत. प्रत्येक वेळी नवीन माहिती घेऊन परत आले. जेव्हा आपल्या देशातील ऐतिहासिक महत्त्वाची वस्तू नजरेस पडते, तेव्हा उर भरून येतो. लक्षात येतं की, ‘आपल्याबरोबर जगातील वेगवेगळ्या देशांतून आलेले कित्येक लोक हे बघत आहेत, आपला इतिहास वाचत आहेत.’ आपला इतिहास जगापर्यंत पोहोचतो आहे.
वाघनखांविषयीच्या संग्रहालयाच्या माहितीत असं नमूद केलं आहे की, ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी जेम्स ग्रँट डफ (१७८९-१८५८) यांच्या वारसाकडून हे शस्त्र संग्रहालयाला देण्यात आलं. १८१८मध्ये साताऱ्यात कंपनीचे अधिकारी म्हणून काम करत असताना पेशव्यांच्या पंतप्रधानांनी त्यांना ही भेट दिली, अशीही नोंद आहे.
पुढे सांगितलं आहे की, “भारतात १७व्या शतकातील राजकीय उलथापालथीतील एका महत्त्वाच्या घटनेचा संदर्भ या शस्त्राला आहे. १६५९मध्ये लष्करी छावणीत मराठा नेते शिवाजी आणि विजापूरच्या सैन्याचा सेनापती अफझल खान यांची तहाची बोलणी करण्यासाठी तंबूमध्ये भेट झाली. दोघंही सशस्त्र आले. शिवाजींनी वाघनखं हातात लपवली होती, ज्याने अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला.”
मात्र असाही स्पष्ट उल्लेख आहे की, शिवाजींनी वापरलेली हीच ती वाघनखं आहेत का, हे तपासणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे ही तीच वाघनखं आहेत की नाहीत, हा वाद निरर्थक म्हणता येणार नाही.
दक्षिण आशियातील समृद्ध वारसा दर्शवणारं वेगळं दालन या संग्रहालयात आहे. २०२१-२२ या वर्षात जवळपास १२ लाख लोकांनी या संग्रहालयाला भेट दिली. कोविडपूर्व काळात ही संख्या ३० लाख ९२ हजार एवढी होती. नॅचरल हिस्टरी म्युझियम व ब्रिटिश म्युझियमला दरवर्षी भेट देणाऱ्यांची संख्या ५० ते ६० लाख एवढी आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कला व संस्कृती यांद्वारे माणसं जोडली जातात. केवळ इतिहास नव्हे, तर जगाच्या वैज्ञानिक, तांत्रिक, औद्योगिक सांस्कृतिक प्रगतीचा प्रवास डोळ्यापुढे उलगडून ठेवणाऱ्या या संग्रहालयांना भेट देऊन आल्यानंतर माझ्या सहा वर्षांच्या लेकीला हजारो प्रश्न पडतात, ते बालमनातील उत्सुकतेचं द्योतक आहे. ही शोध घेण्याची वृत्ती जपण्याचं वस्तुसंग्रहालय साधन आहे.
ही संग्रहालयं शैक्षणिक संस्था व विद्यापीठांसोबत अल्प आणि दीर्घकालीन अभ्यासक्रमदेखील चालवतात. व्यावसायिक अभ्यासक्रमाव्यतिरिक्त हौशी लोकांना सामावून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.
विशेष म्हणजे लंडनमधील बहुतांश संग्रहालयांमध्ये विनामूल्य प्रवेश आहे. सर्व सोयींनी युक्त असलेल्या या संग्रहालयांना सरकारकडून निधी मिळतो, तसेच सशुल्क कार्यक्रम, व्यावसायिक व प्रायोजित उपक्रम यांद्वारे निधी उभारला जातो. सशुल्क कार्यक्रमांनादेखील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. सहज उपलब्ध असणाऱ्या सोयी, नवनवीन कल्पना, सुधारणांमधील सातत्य, लक्षवेधक मांडणी, सर्व वर्गातील व सर्व वयाच्या प्रेक्षकांना लक्षात घेऊन केले जाणारे बदल, यांमुळे ही संग्रहालयं आकर्षण टिकवून आहेत. शिवाय यातून अनेकांना रोजगार मिळतो. युरोपमध्ये अशी अनेक जगप्रसिद्ध संग्रहालयं आहेत.
अशा प्रकारे इतिहास जतन करून ठेवणारी ही प्रतीकं ठेवण्यासाठी जागतिक दर्जाची वस्तुसंग्रहालयं कशी उभारावी, इतिहास कसा जपावा आणि रंजक पद्धतीनं जगापुढे कसा मांडावा, याचा धडा आपण घेणार का? आपल्या देशात हे ‘म्युझियम कल्चर’ रुजवण्यासाठी आपण लंडनकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे.
संग्रहालय म्हटलं की, आपल्यापुढे येतं ते ऐतिहासिक वस्तूंचं प्रदर्शन, पण संग्रहालयं कित्येक प्रकारची असतात. लंडनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियम हे असंच आगळंवेगळं संग्रहालय नावाप्रमाणेच निसर्गाचा इतिहास सांगणारं. जगामध्ये आढळणारी झाडं, फुलं, कीटक, पक्षी, प्राणी, लुप्त झालेल्या, विकसित होत असलेल्या प्रजाती, मानव आणि ब्रह्मांडाच्या इतिहासाची सफर घडवून आणतं. याशिवाय, नैसर्गिक आपत्ती, महापूर, भूकंप, ज्वालामुखी यांमुळे जगात झालेले बदल, याची कारणं आणि जगाच्या भविष्याचा वेध घेणारं संग्रहालय आहे.
आपल्या देशात, महाराष्ट्रातदेखील विविध विषयांवर संग्रहालयं आहेत, ती किती जणांना माहीत आहेत आणि रोज किती लोक ती पाहायला जातात?
येथेदेखील संग्रहालयातून वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार घडत असतात, इतरही समस्या आहेत, पण दर्जा सांभाळण्याची काळजी घेतली जाते.
केवळ पर्यटक नव्हे, तर जगभरातून कामानिमित्त ब्रिटनमध्ये वास्तव्यास आलेले लोकसुद्धा उत्सुकतेनं संग्रहालयं बघायला जातात. यानिमित्तानं देशाच्या सीमा धूसर होतात आणि विविध देशांविषयी, तिथल्या संस्कृती व लोकांविषयीची उत्सुकता निर्माण होते. स्थानिक शाळादेखील मुलांना संग्रहालयं दाखवण्यासाठी नेतात. वाघनखांच्या निमित्तानं आपले छत्रपती शिवाजी महाराज जगातील कित्येक लोकांपर्यंत पोहोचले असतील.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
आपल्या देशात असलेल्या संग्रहालयातील प्रत्यक्ष कलाकृतींबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, पण निधीची कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा, कल्पनेचा अभाव, सुविधांचा अभाव, यांमुळे आपल्या कलाकृती परदेशातील सोडाच, देशातील लोकांच्या नजरेतसुद्धा भरणं अवघड होतं. खाजगी संग्रहालयांच्या समस्यांचीदेखील दखल घेणं गरजेचं आहे. पण सर्वांत महत्त्वाचं आहे वस्तुसंग्रहालयांना भेट देण्याची संस्कृती रुजवणं.
परदेशात गेल्यावर पैसे खर्च करून संग्रहालय बघणारे किती भारतीय कोलकात्यातील ‘इंडियन म्युझियम’ किंवा दिल्लीतील ‘नॅशनल म्युझियम’ बघायला जातात? आपल्याकडेदेखील वेगळ्या विषयावरची संग्रहालयं आहेत. दिल्लीतील ‘इंटरनॅशनल डॉल्स म्युझियम’ किंवा ‘सुलभ इंटरनॅशनल म्युझियम ऑफ टॉयलेट’, पुण्यातील ‘आरबीआई आर्काइव्ह म्युझियम’, अहमदाबादमधील ‘पतंग संग्रहालय’, नाशिकजवळ असलेलं ‘गारगोटी संग्रहालय’, किती जणांना माहीत आहेत आणि किती स्थानिक किंवा पर्यटक जातात ती पाहायला? वस्तुसंग्रहालयांना पर्यटनाचा भाग म्हणून विकसित करण्यात आपण नक्कीच कमी पडतो.
ऐतिहासिक प्रतीकं परदेशातून आणण्याच्या मुद्द्याचा राजकारणासाठी उपयोग अनेकदा केला जातो. कारण त्यात सर्वसामान्य जनतेच्या भावनांना उजागर करता येतं. आपल्या वस्तू आणि प्रतीकं परत यावी, असं जनतेला वाटणं साहजिक आहे, पण त्यापलीकडे जाऊन खऱ्या मुद्द्यांना हात घालणं गरजेचं आहे.
ऐतिहासिक वाघनखं आपल्या संग्रहालयांमध्ये दिसणार, याचा आनंद आहेच, पण याचा निवडणुकीपुरता वापर करण्याऐवजी आपल्या संग्रहालयांची देखभाल व व्यवस्था याकडे आपल्या राज्यकर्त्यांचं लक्ष वेधलं जावं, ही अपेक्षा वाजवी आहे. करार करण्यासाठी लंडनच्या संग्रहालयांना भेट दिलेले राजकीय पुढारी आणि अधिकारी यात लक्ष घालतील का?
.................................................................................................................................................................
लेखिका भाग्यश्री दोडमनी सध्या लंडनस्थित असून मुक्त-पत्रकार आहेत.
bhagyakulthe@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment