अजूनकाही
१. योगी आदित्यनाथ हे पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले, तुम्ही तर गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री आहात; मग तुम्हाला कर्जमाफी देण्यास काय अडचण आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
हे म्हणजे हिमालयात बर्फ पडतो आहे, तर सह्याद्रीच्या कातळामध्ये हिरे सापडायला काय हरकत आहे, असं विचारण्याइतकं तर्कशुद्ध आहे. आता पवारांनी हे विचारलं की भाजपमधून कोणीतरी विचारणार, तुम्ही तर १५ वर्षं सत्तेत होतात, तेव्हा अमुक का नाही केलंत? हा असला झिम्मा खेळून खेळून आपण सत्ता घालवली, हेही यांच्या लक्षात येत नाही का? अल्पभूधारक आणि खरोखरच्या गरजू शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफी आहे, बँकांची आणि सावकारांची धन करण्यासाठी नाही, हे सरकारला पटवून द्यायचं आणि ते लोकांपुढेही आणायचं, हे महत्त्वाचं काम करण्याऐवजी या उखाळ्यापाखाळ्या काढत बसलात, तर लोक संघर्षयात्रेतले एसी आणि गुलाबजामच पाहणार.
...................................................................................................
२. ‘सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज’ (सीएसडीएस) या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार ९१ टक्के हिंदूंचे जवळचे मित्र हे त्यांच्याच समुदायाचे असल्याची माहिती आहे. ३३ टक्के हिंदूचे जवळचे मित्र हे मुस्लिम धर्माचे असल्याचे समोर आले आहे. तर ७४ टक्के मुस्लिम व्यक्तींचे हिंदू समुदायातील जवळचे मित्र आहेत. तर त्यांचे ९५ टक्के मित्र हे त्यांच्याच धर्माचे असल्याचे आढळून आले आहे.
यातल्या किती हिंदूंचे मित्र स्वजातीचे आहेत, याचीही माहिती घ्यायला हवी होती. आणखी उद्बोधक माहिती पुढे आली असती. या समाजात सगळ्यांच्या घुसळणीची मेल्टिंग पॉट तयार झाली नाहीत, मुंबईसारख्या कॉस्मोपोलिटन महानगरांमध्ये कामापुरते एकत्र येणारे लोक आपापल्या खासगी कोषात गेले की, पुन्हा जातीवादी, धर्मवादी, प्रांतवादी आणि भाषावादी होतात, हा अनुभव आहेच. कपडे बदलले, विज्ञानाच्या कृपेने राहणीमान बदललं तरी टोळ्या तशाच आहेत, तशाच राहाव्यात अशी समाजाची रचना आहे. यात ३३ टक्के आणि ७४ टक्के हे आकडेही दिलासादायकच म्हणायला हवेत.
...................................................................................................
३. काश्मीरचे तरुण पर्यटनाचा विकास व्हावा ही मागणी घेऊन दगडफेक करत नाहीत तर ते आपल्या देशासाठी दगडफेक करतात असे म्हणत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी या दगडफेकीचे समर्थन केले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘तुम्हाला टुरिझम हवे की टेररिझम’ या प्रश्नाच्या अनुषंगाने बोलत होते. टुरिझम हे आमचे सर्वस्व आहे त्यामध्ये काहीच शंका नाही; परंतु दगडफेक करणारा तरुण हा पर्यटनाचा विकास व्हावा या प्रश्नासाठी आपला जीव धोक्यात घालायला तयार होत नसतो. तो आपल्या ‘देशा’साठी लढत असतो, हे पंतप्रधानांनी लक्षात घ्यावं, असे अब्दुल्ला म्हणाले.
खरं तर काँग्रेसच्या काळात सुरू झालेल्या बोगद्याचं उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावर तुम्ही आकर्षक जुमलेच बोलणार की, खरोखरची काही कामंही करणार, असं विचारायला हवं होतं. पंतप्रधानांची अडचणही समजून घ्या. तुम्हाला गाय हवी की माणसांमाणसांमधलं सौहार्द हवं, असं उत्तर प्रदेशात, छत्तीसगडमध्ये ते विचारू धजत नाहीत; तुम्हाला शाकाहार हवा की, किनारपट्टीवरच्या कोळी बांधवांना त्यांची खानपान संस्कृती टिकवण्याचा हक्क आहे, हे मान्य करण्याची दानत हवी; असं ते गुजरातेत विचारू धजत नाहीत. तिथे विकासाचे मुद्दे सोडून भोंगळ गोष्टींसाठी लढणाऱ्या लोकांचा प्राधान्यक्रम ‘चुकू’ नयेत, यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं बोलावं लागतं.
...................................................................................................
४. केंद्र सरकारकडून दर्जेदार शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांच्या जाहीर करण्यात आलेल्या क्रमवारीत दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू (जेएनयू) आणि जाधवपूर विद्यापीठाला पहिल्या दहांमध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, हे स्थान त्यांना अफजल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे नव्हे, तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनामुळे मिळाल्याचा टोला, केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी हाणला.
टोला हाणता हाणता अनेकदा हाणणाऱ्याच्या अंगठ्यावरच प्रहार होतो, तसा प्रकार जावडेकरांनी करून घेतला आहे. जेएनयू आणि जादवपूर विद्यापीठांमध्ये मुक्त संशोधन होतं कारण तिथे परस्परविरोधी विचारांच्या मांडणीची, चर्चेची, वादविवादाची परंपरा आहे. तिथं भलत्या गोष्टींचे बाऊ केले जात नाहीत. तसं करणाऱ्या विचारधारांमध्ये खऱ्याखुऱ्या प्रागतिक संशोधनाऐवजी आज जगात घडणारं सगळं काही वेदांमध्ये किंवा पुराणांमध्ये सांगितलं होतं, याचं छद्मसंशोधन केलं जातं. संशोधनालाही वातावरणाची पार्श्वभूमी असावी लागते, हे त्यांच्या लक्षात आलं असतं, तर त्यांनी अशा प्रकारचं मुक्त वातावरण सर्वत्र असावं, यासाठी प्रयत्न केले असते.
...................................................................................................
५. उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूनंतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्ज माफ करावे, यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले.
मा. मुख्यमंत्रीसाहेब, तुम्ही काय अभ्यास करायचा तो करा आणि काय तक्ते बनवायचे ते बनवा. तुम्ही राजकीय लाभाच्या वेळेला निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करणार, हे उघडच आहे. पण, काय वाट्टेल ते झालं तरी आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी आहोत, असं सांगू नका, ते आधीच घाबरलेले आहेत, गांजलेले आहेत; आता मागून कोणीतरी ढकलून देईल, या भावनेची त्यात भर नको, प्लीज.
...................................................................................................
editor@aksharnama.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment