‘बदलता भारत : पारतंत्र्यातून महासत्तेकडे’ या द्विखंडी महाग्रंथांचे संपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व अभ्यासक दत्ता देसाई यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त या ग्रंथात भारताच्या बदलत्या राष्ट्रवादाचा, सांस्कृतिक संघर्षाचा आणि भारतीयतेचा तपशीलवार आढावा घेतला आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे येत्या रविवारी, २२ ऑक्टोबर २०२३ रोजी हा ग्रंथराज पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने देसाई यांनी या पुस्तकाला लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
...............................................................................................................................................................
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी ‘एक देश म्हणून भारत टिकणार तरी का?’ अशी चिंता व्यक्त केली जात होती, तर आता ‘भारत महासत्ता बनेल काय?’ असे स्वप्न पाहिले जात आहे. ‘भारत’ नावाच्या या राष्ट्राने आणि ते उभे करणाऱ्या इथल्या विशाल जनसमुदायांनी एक मोठाच पल्ला गाठला आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला नुकतीच पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. जगात काही शतके सर्वाधिक वर्चस्वशाली असणाऱ्या ब्रिटिश सत्तेविरुद्ध इथल्या कोट्यवधी जनतेने अथक संघर्ष करून मिळवलेले हे स्वातंत्र्य. मानवी इतिहासातील एक महान मुक्तिपर्व. एक असा गौरवशाली स्वातंत्र्यसंग्राम, ज्याने आधुनिक भारताला जन्म दिला आणि जगाच्या इतिहासावर आपली छाप उमटवली. असा इतिहास, ज्याने प्रत्येक देशप्रेमी व्यक्तीची मान आजही उंचावते. असा संघर्ष, ज्याला अभिवादन केल्याशिवाय कोणीही भारतीय आज पुढे जाऊ शकत नाही. अशा सर्वांत मोठ्या नवस्वतंत्र देशाची ही पंचाहत्तर वर्षांची वाटचाल. स्वातंत्र्य संग्रामाचा आणि स्वातंत्र्योत्तर देशउभारणीचा आजवरचा दोन शतकांहून अधिक असा हा काळ.
अशा आपल्या इतिहासावर विविध अंगांनी बोलणाऱ्या, त्याचे अंतरंग उकलणाऱ्या आणि त्यातून भारताच्या भविष्याची दिशा दाखवणाऱ्या लेखांचा हा महासंग्रह.
ग्रंथाचे स्वरूप आणि सूत्र
या संदर्भात हा ग्रंथ आणि यातील सर्व लेख एका गाभ्याच्या प्रश्नाला हात घालतात : आपला लढा हा केवळ ‘राष्ट्रवादी’ लढा होता की, तो ‘स्वातंत्र्या’साठीचा लढा होता? म्हणजेच तो केवळ ‘राष्ट्रीय’ वा राजकीय स्वातंत्र्यासाठीचा संग्राम होता की, एकंदर मानवमुक्ती आणि मानवी स्वातंत्र्य साध्य करण्यासाठी होता? ‘मानवी स्वातंत्र्यासाठी राष्ट्र आणि राष्ट्रवाद’ अशा सुरू झालेल्या या संग्रामाचे रूपांतर जर गेल्या काही दशकांत ‘स्वातंत्र्याच्या विरोधात राष्ट्रवाद’ असे केले गेले असेल, तर असे का घडले? ते कसे आणि कशासाठी घडवले जाते आहे? अर्थात हे सारे लेख केवळ हा प्रश्न उपस्थित करून थांबत नाहीत, तर ते त्याचे उत्तरही आपल्यासमोर ठेवतात.
प्रस्तुत ग्रंथ दोन खंडात विभागलेला आहे. त्यात प्रत्येकी चार असे एकूण आठ विभाग आहेत. या आठ विभागात साठ लेख गुंफलेले आहेत. पण हा प्रत्येक विभाग म्हणजे एकेक परिसंवाद नव्हे किंवा केवळ सोयीसाठी लेख त्या त्या विभागात एकत्र आणलेले नाहीत. तर यातील प्रत्येक लेख हा स्वतंत्र विषयावर आहे आणि तो वैशिष्ट्यपूर्ण आहे. या लेखांमधून वाहणाऱ्या काही समान धाग्यांनी त्यांना त्या त्या विभागात एकत्र आणले आहे. यातील प्रत्येक लेखाचे वेगळेपण आणि योगदान याची कल्पना वाचकांना प्रत्येक विभाग सुरू होताना दिलेल्या विभागीय संपादकीयातून येऊ शकेल.
पहिल्या खंडातील विभाग एकमधील लेख हे मुख्यत: प्राचीन-मध्ययुगीन इतिहासातून आलेल्या, आधुनिक काळातही ‘जिवंत’ असलेल्या आणि राष्ट्राविषयीच्या आपल्या ऐतिहासिक जाणिवा घडवणाऱ्या विषयांवरचे आहेत. या इतिहासातील वाटा व वळणे काय आहेत आणि त्यांच्याकडे पाहायचे कसे, हे या लेखांमधून उलगडत जाते.
दुसऱ्या विभागातील लेख आधुनिक राजकीय इतिहासातील काही विवाद्य व विरोधाभासी तसेच उपेक्षित वा ज्यांच्याविषयी बरेच गैरसमज आहेत, असे विषय हाताळतात. त्याबाबतचे वास्तव काय आहे, यावर ते प्रकाश टाकतात. भारतातील विविध राजकीय विचारांना आणि जाणिवांना तसेच भारतीयतेच्या वेगवेगळ्या कल्पनांना आकार कसा आला याची कल्पना यातून येऊ शकेल.
तिसऱ्या विभागातील लेख भारतीयतेचे अंतरंग आणि त्यासाठी विविध अंगांनी घडत आलेल्या आंतरिक संघर्षांचे विश्व आपल्यासमोर उघडतात. यातील कला आणि साहित्यविषयक लेख आपल्यातील अदम्य स्वातंत्र्यवृत्ती आणि वैश्विकतेची आस यांचे दर्शन घडवतात.
चौथ्या विभागात आज निर्णायक बनलेल्या काही महत्त्वपूर्ण राजकीय विषयांवरील लेख समाविष्ट केले आहेत. भारतातील लोकशाहीची प्रक्रिया आणि तिची विविध अंगे, संघराज्य रचना आणि राजकीय व वैधानिक बहुलता, यातून उभे झालेले प्रश्न आणि राष्ट्रीय सुरक्षा व राष्ट्रवाद यांतील गुंतागुंत यांचा वेध हा विभाग घेतो.
दुसऱ्या खंडातील पहिला विभाग हा आज सर्वाधिक संवेदनशील बनलेल्या धर्म आणि संस्कृतीबाबतच्या विषयांवर आहे. राष्ट्रवादाच्या नावाने केले जाणारे ‘धार्मिक-सांस्कृतिक राजकारण’ हे जीवनाचे कसे एकजिनसीकरण करू पाहते आहे, याची चर्चा हे लेख करतात. या क्षेत्रांमधील बहुविधता आणि विविध परंपरांमधील संघर्ष ते आपल्यासमोर ठेवतात.
दुसऱ्या विभागातील लेख हे अशा क्षेत्रांविषयी चर्चा करतात की, जी क्षेत्रे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जोडलेली सामाजिक साधने आणि माध्यमे आहेत. ती राजकारण वा राष्ट्रवाद यापासून अलिप्त असतात, असे बऱ्याचदा मानले जाते. प्रत्यक्षात राष्ट्रभावनेला आकार देणे, देशउभारणीचे व विकासाचे सत्य स्वरूप तपासणे आणि लोक स्वातंत्र्य कितपत अनुभवताहेत व ते अधिक कसे घेऊ शकतील, याचा शोध घेणे, या सर्वच दृष्टीने या क्षेत्रांचे असलेले महत्त्व हे लेख समोर आणतात.
तिसऱ्या विभागातील लेख हे एकाअर्थी सतत चर्चेत असणाऱ्या म्हणजे अर्थकारण आणि विकास या क्षेत्राशी निगडित विषयांवरचे आहेत. पण आज सर्वसाधारणपणे जी चर्चा आहे, त्यापलीकडे हे लेख जातात. भारतीय विकासाचा पर्यावरणासह विविध आंतरसंबंधांचा ते मूलगामी धांडोळा घेतात, त्याचे परखड मूल्यमापन करतात, आजच्या विविध कोंडी व पेचांचा ते वेध घेतात आणि पर्यायाची दिशाही स्पष्ट करतात.
यातील शेवटचा, चौथा विभाग हा भारताची जडणघडण करणारे जे पायाभूत सामाजिक विभाग आहेत, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करतो. हे लेख इथल्या परिस्थितीत या शक्ती जे भोगत आणि तरीही बदल घडवत आल्या आहेत त्याचा लेखाजोखा मांडतात. खऱ्या अर्थाने ‘नवा भारत’ घडवण्यात त्यांची भूमिका काय असू शकेल याची दिशा ते दाखवतात.
हे लेख ‘मुख्यप्रवाही' मांडणीतील विविध मुद्द्यांना जसे हात घालतात, तसेच ते इतिहासातील उपेक्षित वा दुर्लक्षित पैलू पुढे आणतात आणि चाकोरीबाहेरच्या दृष्टिकोनातून चर्चा घडवतात. आपल्या देशाकडे अधिक प्रगल्भतेने पाहण्याला ते मदत करतात.
स्वातंत्र्यलढा : नायक-नायिकांचा आणि जनसमुदायांचा!
पारतंत्र्यातून बाहेर पडून महासत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या आजवरच्या भारताच्या आधुनिक इतिहासाबद्दल हा ग्रंथ बोलतो. अनेक लेख त्यासाठी आधीच्याही इतिहासात आपल्याला नेतात. पण इतिहासाला केवळ उजाळा देणे हा या ग्रंथाचा हेतू नव्हे. म्हणजे, अनेकदा समजले जाते तसे खूप पूर्वीचा, जुना काळ केवळ आठवत बसणे आणि त्याचे स्मरणरंजन करणे यासाठीचा हा आटापिटा नाही.
या ग्रंथातील लेख ब्रिटिशपूर्व तसेच आधुनिक इतिहासाच्या एखाद्या अंगाचे, विशिष्ट समस्येचे वा एखाद्या तिढ्याचे विवेचन जरूर तिथे आवर्जून करतात. आवश्यक तिथे काही प्रतीकांची आणि प्रतिमांचीही चर्चा ते करतात; पण हे लेख या इतिहासाचे, त्याच्या एखाद्या अंगाचे वा त्यातील प्रतीकांचे केवळ गौरवीकरण करत नाहीत, प्रतिमांचे ते केवळ पूजन करत नाहीत. या लेखांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचे वेगवेगळ्या अंगांनी विवेचन येते, मात्र हे विवेचन केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरते मर्यादित नाही, कारण वाचकाला केवळ इतिहासात डुंबवणे हा या ग्रंथाचा हेतू नाही, तर भारताचा ‘पारतंत्र्यातून महासत्तेपर्यंत...’(?)चा इतिहास जाणणे हा उद्देश इथे आहे. भारतातील अगदी आजवरचे अनेकविध बदल टिपणे आणि भावी भारतासाठी त्यांचा वेध घेणे, हा या ग्रंथाचा प्रमुख हेतू आहे.
या इतिहासाचे, या संघर्षाचे आणि देशउभारणीचे ‘नायक’ हे असंख्य स्त्री-पुरुष होते आणि आहेत. पण हा ‘नायक-नायिकां’चा (हिस्टरी ऑफ हिरोज) इतिहास नाही. नेते, सुधारक, धुरीण, विचारवंत, मार्गदर्शक, क्रांतिकारक, महात्मा, महामानव आदी रूपांतील नायक स्त्री-पुरुषांनी आजवर अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आहेत. त्यांचा असीम त्याग आणि त्यांचे नि:स्वार्थ देशप्रेम, त्यांचे अलौकिक कार्य आणि जनतेप्रती असलेली त्यांची अपार बांधीलकी, त्यांचे अनोखे धैर्य आणि मूलगामी विचार, कोंडी फोडणारे त्यांचे राजकारण आणि दिक्कालाला भेदणारी त्यांची दृष्टी, हा सारा आपला वारसा आहे. ते सारे आपल्याला सततच स्फूर्तिदायी ठरले आहेत. आजही ते दीपस्तंभ बनून उभे आहेत. त्यांच्याविषयी आजही देशभर अपार आदर आहे, प्रेम आहे आणि अद्भुत आकर्षणही आहे. हे ‘नायक-नायिका’ आणि हे संघर्ष आपल्याला आणि खास करून युवापिढीला आजही अंतर्मुख बनवतात, रोमांचित करतात, प्रेरणा देतात.
या ग्रंथातील विविध लेख अशा स्त्री-पुरुष नायक-नायिकांबाबत जरूर बोलतात; पण हे लेख चिरपरिचित व्यक्तींबरोबरच अल्पपरिचित आणि काहीशा अपरिचित ‘नायक-नायिकां’वरही बोलतात. काही अपरिचित अथवा अल्पचर्चित पैलूंकडे ते आपले लक्ष वेधतात. मात्र ते ‘नायकां’ची अथवा त्यांच्या लढ्यांची केवळ गौरवगाथा सांगत नाहीत. त्यांचे जीवन आणि कार्य, विचार आणि राजकारण, यावर आजवर सविस्तर असे खूप लिहिले गेले आहे आणि पुढेही हे काम होत राहील. या ग्रंथाचा प्रमुख उद्देश मात्र तो नाही. त्यामुळे अगदी उदाहरणादाखल काही निवडक व्यक्तींच्या प्रतिमांबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट करणारे आणि त्यांचे विचार व राजकारण यांची चर्चा करणारे मोजकेच लेख इथे आहेत. ते वगळता या ग्रंथातील बहुतांश लेख चरित्रात्मक तपशील देणे किंवा केवळ गौरवीकरण करणे असे करत नाहीत, तर ते निवडक तपशील आणि विचार, काही महत्त्वपूर्ण घटना आणि समर्पक सूत्रे, काही गाभ्याचे वादविवाद आणि काही अनोखे आयाम, या ‘नायकां’ची कमाई आणि त्यांच्या कमजोऱ्या यांची आवश्यक तेवढी चर्चा करत जातात. हे सारे ते या महान व्यक्तींच्या कार्याच्या व विचारांच्या प्रकाशात करतात; आणि ते त्या त्या क्षेत्राच्या आणि विषयाच्या संदर्भात आपल्यासमोर ठेवतात. विशिष्ट परिप्रेक्ष्यात आणि राजकारणाच्या चौकटीत त्यांचे योगदान आणि मूल्यमापन यावर हे लेख प्रकाश टाकतात.
त्याच वेळी हे ‘नायक-नायिका’ ज्या प्रक्रियेचा भाग होते आणि ज्या प्रवाहांचे प्रतिनिधित्व ते करत होते, त्याकडे हे लेख आपले लक्ष वेधतात. हे तर खरेच की, हे नायक आणि महान स्त्री-पुरुष आपल्या देशाच्या इतिहासाला वळण नक्कीच देत आले. इथल्या समाजबदलाच्या गतीला त्यांनी काहीएक वेगही दिला. पण असे असले तरी ते सारे या समाजातूनच वर आलेले होते. विशिष्ट टप्प्यावरील व स्वरूपातील जनतेच्या जाणिवा, आकांक्षा, शक्ती आणि स्वप्ने यांचीच ती प्रगल्भ रूपे होती. त्या त्या टप्प्यातील भारतीय समाजातील अशा घडामोडींचे ते सर्वोत्कृष्ट वा उत्कट आविष्कार होते. पुढची दिशा आणि दृष्टिस्वप्ने दाखवणारे ते द्रष्टे स्त्री-पुरुष होते. पण असे असले तरीही शेवटी ते आपल्या देशाचा इतिहास घडवणाऱ्या पायाभूत शक्तींचेच आविष्कार होते.
या पायाभूत शक्ती भारतातील विशाल जनसमुदाय हेच होते आणि आहेत. यात या विविध जनसमुदायांचे जगणे आणि त्यांचे सामाजिक व्यवहार येतात. त्यांचे उफाळते प्रश्न व होणारी त्यांची कोंडी आणि ती भेदण्याचे त्यांचे प्रयत्न येतात. प्रतिकूल परिस्थितीला पुन:पुन्हा आणि नवनव्या रितीने भिडण्याची सहनशीलता, चिकाटी आणि सर्जनशीलता ते दाखवतात. स्वत:ला आणि सभोवतालच्या सामाजिक वास्तवाला बदलण्यासाठीची त्यांची धडपड ही याचाच भाग असते. या क्रमात छोटे-मोठे संघर्ष घडवणे वा त्यात स्वत:ला झोकून देणे हेही हे जनसमुदाय करत आले. तीच आपल्या इतिहासाची ऊर्जा होती आणि तीच भविष्याची चालकशक्ती आहे. हे सूत्र आणि याचे संदर्भ, हे दुहेरी नाते आणि परस्परसंबंध या लेखांमध्ये येत राहतात. काही लेखात ते ठळकपणे येतात, तर काही लेखांमध्ये ते सीमेवर दिसतात. काही लेखांमध्ये ते पार्श्वभूमीला राहतात, तर काहींमध्ये ते अव्यक्त, अध्याहृत गृहीतक म्हणून येतात.
भारत : एक घडणारे राष्ट्र
मुळात, स्वातंत्र्य मिळाले तेव्हाच भारत हे काही एक ‘तयार’ रेडिमेड वा परिपक्व वा आदर्श राष्ट्र म्हणून उभे ठाकले असे अजिबात नव्हे. ही वस्तुस्थिती व्यवहारात आपल्याला बरीचशी माहीत असते आणि सुरेन्द्रनाथ बॅनर्जींपासून डॉ. आंबेडकरांपर्यंत अनेकांनी हे मांडलेलेही आहे. तरीही आज हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करण्याची विशेष गरज आहे. अन्य कोणत्याही राष्ट्राप्रमाणे, पण आपल्या स्वत:च्या गतीने व वैशिष्ट्यांसह, भारतदेखील दीर्घकाळ जडणघडणीच्या अवस्थेतून व गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून (नेशन-इन-द-मेकिंग) जात राहिला आहे.
याचाच दुसरा अर्थ असा की, ही वाटचाल आणि कहाणी ही ‘असा बदलला भारत’ आणि एकंदर ‘बदलता भारत’ अशा स्वरूपाची राहिली आहे. ती राष्ट्रवादाच्या विविध रूपांचा आणि त्याच्या बदलत्या स्वरूपाचा एक प्रदीर्घ आलेखही आहे. देशाच्या विकासाच्या स्वरूपात ती उभी आहे आणि ही वाटचाल या देशातील सामाजिक-सांस्कृतिक संघर्षाचीदेखील आहे. ती बदलत्या भारतीयतेचे अंतरंग खुले करणारी आहे.
आधुनिक काळात, म्हणजे युरोपीय सत्तांच्या आणि खास करून ब्रिटिशांच्या आगमनानंतर, हा संपूर्ण उपखंडीय प्रदेश व येथील विविध समाज बदलण्याची एक गुणात्मकदृष्ट्या नवी प्रक्रिया सुरू झाली. हे बदल अंतर्बाह्य होते आणि ते अनेक अंगांनी घडत गेले. भारत बदलण्याला ‘बाह्य’ आणि वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव) कारणे होती. ती व्यापारी-औद्योगिक-आर्थिक होती आणि सामाजिक-वैचारिक स्वरूपाची होती, तसेच ती मूल्यात्मक-वैचारिक-सांस्कृतिक आणि सत्तात्मक-राजकीय अशीही होती. त्याचे नवे कायदेकानून आणि सामाजिक गतिशास्त्र दीर्घकाळ आकार घेत होते. हे सारे तोवर इथे अस्तित्वात असलेल्या वर्ण-जाति अधिष्ठित सरंजामी व्यवस्थेपेक्षा बरेच वेगळे होते. पण अर्थात, हे दोन्ही तेलपाण्यासारखे वेगळे राहिले नाहीत, तर त्यांची काहीएक नवी रचना आणि नवे गतिशास्त्र तयार झाले. अशा कारणांमुळे भारत बदलत गेला. मात्र, याला ‘अंतर्गत’ व आत्मनिष्ठ (सब्जेक्टिव) कारणेही होती. नव्याने बनणारे वा जागे होणारे वर्ग-जाती-जमाती समूह, विविध उठाव-चळवळी-संघटना-पक्ष तसेच नेते-विचारवंत आणि व्यक्ती यांनीही भारत बदलत नेला. त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारतात जाणीवपूर्वक बदल घडवले.
हे सारे बदल कसे घडले? ते का घडले? ते कोणी घडवले? यात कोणते ताणे-बाणे आले? विविध प्रवाहांनी आणि राष्ट्र-धुरीणांनी हे प्रश्न व ही प्रक्रिया कशी हाताळली? त्यांच्यात कोणते टकराव व कोणती देवघेव झाली? येथील आर्थिक-सामाजिक-राजकीय प्रक्रिया या नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या राहिल्या? त्या राष्ट्रमुक्तीला, राष्ट्रबांधणीला आणि स्वातंत्र्याला कुठे, कशा व कितपत साहाय्यकारी ठरल्या? त्यातून कोणत्या विसंगती आणि कोणते विसंवाद उद्भवले? ब्रिटिश काळात आणि नंतरच्या गेल्या सात-साडेसात दशकांत भारताची ही वाटचाल कशा स्वरूपाची राहिली? असे अनेक प्रश्न या ग्रंथातील लेख हाताळतात.
स्वातंत्र्याची पंचाहत्तरी ही फार मोठी गौरवास्पद बाब नक्कीच आहे; पण ती केवळ साजरी करण्यात समाधान न मानता त्यापुढे जायचे आहे, हेही प्रत्येक विवेकी व्यक्तीच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी स्वत:ला आणि या देशाला पुन्हा एकदा नीट तपासून, समजून घेतले पाहिजे. आजच्या विसंवादी आणि दुभंगलेल्या परिस्थितीमुळे, तसेच स्वप्ने आणि वास्तव यातील वाढत्या दरीमुळे हे अधिकच आवश्यक बनले आहे. असे हे सारे समजून घ्यायचे तर संपूर्ण सामाजिक वास्तवाला भिडले पाहिजे. हे वास्तव वर उल्लेखल्याप्रमाणे एका अर्थी व्यक्तींशी वा ‘कर्त्या' घटकांशी संबंधित म्हणजे आत्मनिष्ठ तर असते, पण ते त्यांच्याबाहेरचे असलेले म्हणजे वस्तुनिष्ठही असते.
या ग्रंथातील सारे लेख ही आत्मनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ कारणे व परिस्थिती, प्रक्रिया आणि कृती यांचे विवेचन करतात, त्यांचे विविध पदर आणि धागे, पैलू आणि बाजू नीटसपणे अलगअलग करून ते सारे आपल्यासमोर ठेवत जातात. त्यामुळेच आपण स्वत: कोण आहोत आणि आज नेमके काय आहोत, आपला देश कोणत्या स्थितीत आहे आणि तसा तो का आहे, अशा अनेक बाबी समजून घेण्यासाठी हे लेख आपल्याला साहाय्यभूत ठरतात.
प्रस्तुत ग्रंथातील लेखांमध्ये अनेक घटना येत राहतात, त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती येते, तसेच त्यात आठवणी, वाद आणि वर्णनेदेखील आहेत. पण हा ग्रंथ म्हणजे या साऱ्याची जंत्री नव्हे आणि हे लेख म्हणजे केवळ वर्णनात्मक आढावे नव्हेत. ते केवळ माहितीपट उलगडणारी इतिहासाची गुळगुळीत, झुळझुळीत वा चकचकीत पानेदेखील नाहीत. तर या साऱ्या घडामोडींमध्ये कोणत्या ऐतिहासिक प्रक्रिया अंतर्भूत होत्या हे ते स्पष्ट करत जातात. प्रथमदर्शनी न दिसणारे अंतरंग ते दाखवतात. दृश्य वास्तवाच्या आत दडलेले सामाजिक वास्तवाचे काही पैलू आपल्यासमोर ते उघड करतात.
हे लेख ब्रिटिशपूर्व भारतीय समाजाच्या काही महत्त्वपूर्ण अंगांचे राष्ट्रवादाशी आणि भारतीयतेशी असलेले संबंध नव्या कोनातून ऐरणीवर आणतात. ब्रिटिशकालीन भारतीय समाजातील बदलांचे विश्लेषण ते करतात. या संदर्भात आधुनिक राष्ट्रवादाच्या आशयाच्या जडणघडणीची आणि त्याच्याशी संबंधित विविध संकल्पनांची चर्चा करतात. हे लेख स्वातंत्र्यलढ्याचा तेव्हाच्या संदर्भात आणि आजच्याही दृष्टीकोनातून अर्थ लावतात. स्वातंत्र्योत्तर समाजरचनेचा व्यामिश्र ढाचा स्पष्ट उघड करून समोर ठेवतात. त्यातील विसंगती, विरोधाभास आणि अंतर्विरोध ते इथून पुढे जाण्यासाठी मांडून ठेवतात.
हे लेख ज्याला भिडतात आणि ज्याचे विश्लेषण करतात, ते वास्तव भूप्रादेशिक आहे आणि पर्यावरणीय आहे. ते सामाजिक-आर्थिक आहे, तसेच ते राजकीय व संस्थात्मक आहे. ते समूहनिष्ठ म्हणजे विविध वर्ग, जाती, जमाती, स्त्रिया आणि भाषा व संस्कृती अशांशी संबंधित आहे. हे वास्तव लोकांच्या परंपरा व रीतीरिवाज आणि प्रथा व जीवनाची अभिव्यक्ती यांच्याशी जोडलेले आहे. ते धार्मिक व सांस्कृतिक स्वरूपाचे आहे, तसेच ते विचार, कल्पना, मानसिकता आणि जाणिवांची विविध रूपे व रचना, उदाहरणार्थ, महाकाव्ये आणि इतिहासमांडणी, साहित्य आणि कला अशा बाबींमधूनही प्रत्ययाला येते आणि आकार घेते. हे लेख भारतीय वास्तवाचे बहुअंगी आणि समग्र चित्र उभे करतात.
इतिहास म्हणजे सरळ रेषेत होणारी केवळ प्रगती नसते. भारताचा हा प्रदीर्घ संघर्ष आणि ही प्रगती म्हणजे थेट सरळ रेषेत आणि चढत्या क्रमाने पुढे जाणारा इतिहास कधीच नव्हता. तो खाच-खळग्यांचा, चढ-उतारांचा, वळणावळणांचा, कधी चक्राकार पद्धतीने मागे येत पुढे जाणारा असा राहिला आहे. ही वाटचाल आणि ही कहाणी एकसंध आणि एकात्म कधीच नव्हती. यात विविध कथने आणि कथानके आहेत. त्यात खंडितता आहे आणि सातत्य आहे. जुन्या रचना आणि जुने सामाजिक संबंध, जुन्या शोषणप्रक्रिया आणि उतरंडी या नव्या बदललेल्या स्वरूपात पुन:पुन्हा समोर येतात, तर कधी दर्शनी जुन्या वाटणाऱ्या बाबी प्रत्यक्षात नवा आशय आणि हितसंबंध पुढे नेतात. यातून दिसणारे वास्तव हे असे बदलते आणि गतिमान आहे. ते बहुआयामी आणि बहुस्तरीय आहे. ही प्रक्रिया बहुविध दिशांनी जाऊ पाहणाऱ्या शक्ती आणि प्रवृत्तींच्या हालचालींची प्रक्रिया राहत आली आहे.
आपल्या देशाच्या आजवरच्या इतिहासाचे हेही वास्तव आहे की, संकुचितता आणि विशालता, जैसे-थे वाद आणि परिवर्तनशीलता अशा अनेक परस्परविरोधी प्रवृत्ती नेहमीच उपस्थित राहिलेल्या आहेत. यात विविध तणाव आणि विसंगती, अंतर्विरोध आणि काहीएक परिपूर्ती हेही राहत आले आहेत. या साऱ्याला आकार देत आणि हे सारे पोटात घेत आलेल्या भारताचे चित्र हे विविधांगी आणि बहुरूपदर्शक (कॅलिडोस्कोपिक) असे आहे. ते जितके विलोभनीय आहे तितकेच ते विषण्ण करणारेही आहे. या ग्रंथात विविध लेखकांनी त्यांच्या स्वतंत्र दृष्टिकोनांमधून आणि आपापल्या परिप्रेक्ष्यांतून भारतीय जीवनाच्या या विविध क्षेत्रांचे आणि पैलूंचे परखड विश्लेषण केलेले आहे.
ग्रंथातील लेख : ‘बहुविधतेमध्ये एकता’
या ग्रंथातील विविध लेखांमधील चर्चा आपल्याला नक्कीच भरीव विश्लेषण आणि एक निश्चित दिशा देणारी आहे. अनेक उपेक्षित व परिघावरचे तपशील आणि मुद्दे, दृष्टीकोन व नव्या विचार चौकटी समोर आणत असतानाच हे लेख एकांगी न बनता व्यापक विचारचौकटींशी जोडलेले राहतात. सतत समावेशकतेचे आणि समग्रतेचे भान आपल्याला देतात.
हा ग्रंथ आणि त्यातील लेख चहुदिशांनी उपस्थित झालेल्या प्रश्नांची आणि पैलूंची, विविध अंगांची आणि प्रक्रियांची चर्चा करतात. विविध अंगांनी व बहुदिशांनी होणाऱ्या या साऱ्या प्रवासाचा ब्रिटिशपूर्व काळापासून आजवरचा एक विशाल पट यातून आपल्यासमोर मांडला जातो. हे सारे लेख दोन पायांवर चालू पाहतात - एक म्हणजे, त्या त्या क्षेत्रात आणि विषयात गेल्या एक-दीड-दोन शतकांत वा त्याहून अधिक काळात नेमकी काय वाटचाल झाली? हा देश आणि त्याच्या विविध कल्पना व शक्ती कशा घडल्या? दुसरे म्हणजे, यातून भारतीय राष्ट्रवादाचा आणि भारतीयतेचा आशय कसा घडत आला, प्रत्येक क्षेत्रात वा समाजाच्या अंगात आणि प्रत्येक टप्प्यावर तो कसा निश्चित होत आणि बदलत आला? हे सारे लेख यावर एकतर थेट प्रकाश टाकतात वा आपल्या चिंतनाला त्या दिशेने जायला साहाय्य करतात.
भारतीय स्वातंत्र्याची कहाणी कुठून व कशी सुरू झाली, ती कुठवर पोहोचली आणि ती अजूनही अधुरी का राहिली आहे, याचा शोध हे लेख घेतात. हा शोध घेताना विचारपद्धती, विश्लेषणे, मांडणीची शैली आणि तात्त्विक भूमिका, निष्कर्ष आणि भावी दिशा याबाबत लेखांमध्ये वैविध्य आहे. वैविध्य हे जसे आपल्या देशाचे बलस्थान आहे, तसेच ते या ग्रंथाचेही बलस्थान आहे. कोणत्या नवीन क्षमता, नवे तणाव आणि नव्या शक्यता यातून उभ्या राहत गेल्या याचा वेध हे लेख घेतात. नव्या मानुष आनंददायी भारताची आणि भारतीयतेची कोणती कल्पना ओठंगून आता आपल्यासमोर उभी आहे याचे चित्र ते रेखाटतात. हे घडवू शकणाऱ्या सामाजिक शक्ती कोणत्या आणि हे घडवण्याची दिशा काय असली पाहिजे, याचेही सूतोवाच हे लेख करतात.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment