अजूनकाही
पॅलेस्टिनी लेखिका अदानिया शिब्ली यांची आज म्हणजे, २० ऑक्टोबर २०२३ रोजी फ्रँकफर्ट लिटप्रॉममध्ये सन्मान आणि प्रगट मुलाखत होणार होती. पण ‘हमास’ने केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा समारंभ बेमुदत पुढे ढकलला आहे, असे जाहीर केले गेले. सुरुवातीला लेखिका अदानिया यांच्या वतीने तशी विनंती झाल्याचे सांगितले गेले. मात्र ‘पॅलेस्टिनी लोकांचा आवाज जगापुढे आणण्याची ही संधी सोडणार नसल्या’चे अदानिया यांनी जाहीर केले. तेव्हा अनेक नोबेल विजेत्या व इतर लेखकांनी तिच्या बाजूने काढलेल्या पत्रकावर स्वाक्षरी केली. बुधवारपर्यंत म्हणजे १८ ऑक्टोबरपर्यंत सुमारे ३०० जणांनी स्वाक्षरी केली होती, ती संख्या आज गुरुवारी एक हजारावर गेली आहे.
अदानिया शिब्ली ही १९७४मध्ये जन्मलेली पॅलेस्टिनी लेखिका. अदानिया जर्मनी आणि पॅलेस्टिन येथे आलटूनपालटून राहतात. त्यांना अरेबिक, हिब्रू, इंग्रजी, फ्रेंच, कोरियन आणि जर्मन भाषा येतात. तिने इंग्लंडहून डॉक्टरेट मिळवलेली आहे. निबंध, ललितलेखन, नाटक अशा अनेक प्रांतात तिने लेखन केलेले आहे. तसेच लेखक-विचारवंतांच्या अनेक उपक्रमांमध्येही ती १९९६पासून सक्रीय आहे. यापूर्वी २००१मध्ये ‘टच’ तर नंतर ‘ऑल ऑफ अस आर फार फ्रॉम लव्ह’ या पुस्तकांसाठी तिला पुरस्कार मिळालेले आहेत.
‘मायनर डिटेल्स’ (किरकोळ तपशील) ही कादंबरी अदानिया यांनी २०१७मध्ये लिहिली. तिच्या भाषांतराचा समावेश २०२१मध्ये ‘बुकर प्राइझ’च्या यादीत करण्यात आला होता; २०२०मध्ये भाषांतरित पुस्तकांत ‘बुकर’च्या लघुयादीत तिचा समावेश झाला होता.
‘मायनर डिटेल्स’ ही छोटीशी कादंबरी इस्त्राईलची स्थापना होत असताना ऑगस्ट १९४९मध्ये ती वसाहत करणाऱ्या सैनिकांकडून एका बदायुनी मुलीवर बलात्कार आणि खून झाला, या सत्यघटनेवर आधारित आहे. (नंतर या घटनेची न्यायालयीन चेौकशी होऊन दोषींना शिक्षा मिळाली होती.)
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
इस्रायलचा प्राचीन इतिहास आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी (भाग १)
इस्रायलचा प्राचीन इतिहास आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी (भाग २)
या सततच्या खाली वाकण्याने माझ्या पाठीचं रूपांतर प्रश्नचिन्हात केलंय. तू उत्तर कधी देशील?
..................................................................................................................................................................
पहिल्या सुमारे पन्नास पानांत मूळ सत्यघटनेची पार्श्वभूमी आणि त्या घटनेचे वर्णन आहे. त्यापुढील साठएक पानांत २५ वर्षांनी जन्माला आलेल्या मुलीने त्या घटनेचे तपशील शोधण्याच्या केलेल्या प्रयत्नांची कहाणी आहे. दोन्ही घटनांमधील साम्य आणि काळ गेला, तरी पॅलेस्टिनी जनता, तेथील भटके यांची परिस्थिती बदललेली नसल्याचे अंगावर येणारे वास्तव आपल्याला कळते.
एक लेखिका म्हणून अदानिया यांची कारागिरी लक्षात घेण्यासारखी आहे. केरोसिनचा वास, खूप पाण्याने आंघोळ, गोळीचे आवाज, उंटांचे अस्तित्व, कुत्र्याचे भुंकणे, ही रूपके दोन्ही वर्णनांत आहेत. तर ‘माणूसच टिकेल, रणगाडे नाही’, हे वाक्य लिहिलेली भिंत दोन्ही वर्णनात सामायिक आहे.
कादंबरीच्या दुसऱ्या भागात वर्णन करणारी व्यक्ती तरुणी आहे, हे बराच काळ वर्णनातून किंवा भाषेतून कळत नाही. ती व्यक्ती सतत विविध तणावात राहत असल्याने तिची मानसिकता कशी बदलते, याचे वर्णनही नेमकेपणाने केलेले आहे. किरकोळ तपशीलाकडेच जास्त लक्ष देण्याची निवेदकाची मानसिकता असल्याने हे गद्य वेगळेच तत्त्वचिंतन असल्यासारखे वाटते.
या कादंबरीतील काही काही वर्णने अंगावर शहारे आणतात. उदा. बॉम्ब वर्षाव होताना खिडक्या उघड्या ठेवल्या, तर हवेच्या दाबाला वाव मिळून काचा फुटत नाहीत, पण धुरळा आत येतो. किंवा सैनिक बायकांच्या पासपोर्ट वगैरे कागदपत्रांकडे, छायाचित्रांकडे आणि व्यक्तींकडे निरखून पाहिलं जात नाही. त्यामुळे एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये जाताना एक-दुसऱ्याची ओळखपत्रे\परवाने वापरणे त्यांना शक्य होते. मात्र पकडले गेलोच, तर मदत करणाऱ्या माणसाला शिक्षा होऊ नये, म्हणून ‘ते ओळखपत्र आपण चोरले’ असे सांगणे असे अनेक तपशील आपल्यासाठी नवीनच आहेत.
एका झोनमधील माणसाला दुसऱ्या झोनमध्ये जाताना कितीतरी अडचणी येतात. अचानक रस्त्यांची नाकाबंदी होते. पर्यायी रस्ते वापरावे लागतात, असे अनेक तपशील पॅलेस्टिनी लोकांची स्वतःच्याच देशात झालेली विचित्र स्थिती आपल्याला सांगतात.
पॅलेस्टाईनवर दुसऱ्या लोकसमूहाने वसाहतीकरण केले. मूळ लोक विस्थापित झाले. त्यांचे नामोनिशाण राहिलेले नाही. ते देशोधडीला लागले. विविध संस्था, त्यांना पर्यायी जागा दिल्याचे सांगतात. ही माणसे अभावग्रस्त असतात. त्यांना रोजच्या जगण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. पण तेथून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर हे सगळे मुबलक असते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ही विषमता आणि भारतातील प्रकल्पग्रस्तांचे विस्थापित होणे सारखे आहे. शिवाय शेती आतबट्ट्याची ठरत असताना लातूर, जालना सोलापूर अशा भागातून तात्पुरते म्हणून जगायला पुण्यात येणाऱ्यांची परिस्थिती याहून वेगळी आहे, असे वाटत नाही. केवळ पुण्यापुरताच विचार केला तरी स्थानिकांनी गावातील प्रभागांना दिलेली नावे - उदा. भांबुर्डा, एरंडवणे, कचरे वाडी, खिलारे वस्ती, बहिरटवस्ती इ. - नागरीकरणाबरोबर लोप पावताना त्याबरोबर सामाजिक इतिहासही गाडला जातो आहे. प्रत्येक ठिकाणाची सामाजिक वैशिष्ट्ये एकजिनसीकरणात व सपाटीकरणात नष्ट होत जातात, हेदेखील ही कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येते.
ही छोटेखानी कादंबरी आवर्जून वाचावी अशी आहे, ही शिफारस करताना, अशीही सूचना करावीशी वाटते की, मुख्य प्रवाहातील इंग्रजी साहित्याबरोबरच इतर विदेशी साहित्याचेही इंग्रजीतून का होईना, मराठीत अनुवाद होणे गरजेचे आहे. ते छापून उपलब्ध होणे व्यवहारात परवडणारे नसते, ते फार माणसांपर्यंत पोहोचत नाहीत, हेही खरे. आतातर पाचशे प्रतींची आवृत्ती निघते आणि तीही संपायला पाच वर्षं लागतात, असं सांगितलं जातं. त्यामुळे ही मराठी भाषांतरे मूळ लेखकाची परवानगी घेऊन निदान नेटवर वाचण्याची सोय असायला हवी. त्यातून मराठी माणसाचा झापडबंदपणा काहीसा कमी होण्याची शक्यता निर्माण होईल. यासाठी संगणक व नेटमधील अधिकारी व्यक्तींनी काही प्रयत्न करावेत, अशी त्यांना विनंती करावीशी वाटते.
असो. तर अदानिया शिब्ली या पॅलेस्टिनी लेखिकेची फ्रँकफूर्टमध्ये आपल्या देशवासियांचा आवाज उमटवण्याची संधी हिरावून घेतली आहे. २०१६मध्येही तिची अशीच एक संधी पॅलेस्टिनी अतिरेक्यांनी हिरावून घेतली होती. पॅलेस्टिनी कवी अश्रफ फयाध यांनी इस्लामचा त्याग केल्यामुळे धार्मिक अतिरेक्यांनी त्याला शिरच्छेदाची शिक्षा जाहीर केली होती, त्या विरोधात अदानिया आणि त्यांच्या इतर काही लेखकमित्रांनी बर्लिनमध्ये एका कार्यक्रमात भाग घेतला होता.
हमास म्हणजे पॅलेस्टिनी नागरिक नव्हेत, नागरिकांची होरपळ एकीकडे पॅलेस्टाईनवादी अतिरेक्यांकडून होत आहे, तर दुसरीकडे हमासच्या हल्ल्याला उत्तर देताना इस्त्राईलने केलेल्या सरसकट आणि सर्वंकष हल्ल्यांमुळेही होत आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात इस्त्राईलला मिळालेल्या सहानुभूतीमुळे परत एकदा पॅलेस्टिनी जनतेचा आणि लेखकांचा आवाज दडपला जात आहे, हे या निमित्तानं लक्षात घेण्यासारखं आहे.
.................................................................................................................................................................
लेखक जयंत गाडगीळ हे अनुवादक आहेत.
jayantgadgil22@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment