आंबेडकरांनी ‘जोहार’चे आणि ‘बुद्धा’चे पुनरुज्जीवन का केले आणि गांधींनी विदेशी आधुनिकतेला विरोध का केला, याची नेमकी उत्तरं ‘जोहार’ या कादंबरीत मिळतात…
ग्रंथनामा - झलक
अशोक बाबर
  • ‘जोहार’ या कादंबरीचे आणि जोहार : रचनात्मक युद्धाचा देशी मासला’ त्यावरील समीक्षापर पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 18 October 2023
  • ग्रंथनामा झलक जोहार Johar सुशील धसकटे Susheel Dhaskate

‘देशीवादा’चे समर्थक आणि समीक्षक अशोक बाबर यांनी लिहिलेलं ‘जोहार : रचनात्मक युद्धाचा देशी मासला’ हे छोटेखानी पुस्तक नुकतंच हर्मिस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात त्यांनी तरुण कादंबरीकार सुशील धसकटे यांच्या ‘जोहार’ या २०१५मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीची समीक्षा केली आहे. अल्पावधीत अनेक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या या कादंबरीविषयी बाबर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या ‘The Mahars : Who were They and How They Became the Untouchables’ या शोधनिबंधात ‘महार’ हे मूळचे महार नव्हते, तर महार हे मूळचे मराठा होते आणि त्यांचा क्षत्रिय कुळात समावेश होता, हे सिद्ध करण्यासाठी जे अनेक संदर्भ दिले आहेत, त्यातील ‘जोहार’ म्हणण्याची रीत फक्त क्षत्रिय मराठा यांच्यामध्येच होती, हा एक संदर्भ महत्त्वाचा मानला आहे. (‘मनुस्मृती’ किंवा बौद्ध साहित्यात ‘महार’ नावाचा समाज होता, हे कुठेही आढळत नाही). आंबेडकरांचे असे म्हणणे होते की, वैदिक काळात ब्राह्मण लोक ‘नमस्कार’ म्हणत आणि क्षत्रिय ‘योद्धार’ असे म्हणत. ‘जोहार’ हा शब्द ‘योद्धार’चा अपभ्रंश आहे.

महार हे जर खालच्या जातीतले असते तर त्यांना ‘जोहार’ हा शब्द वापरण्याची मुभा मिळाली नसती. मांग समाज ‘फर्मान’, तर चांभार समाज ‘दुफारो’ हे शब्द वापरत होते. त्यांना क्षत्रियाचा दर्जा नव्हता. परंतु महार क्षत्रिय कुळातले असल्यामुळे त्यांना ‘जोहार’ म्हणण्याची मुभा होती. ही मुभा फक्त क्षत्रियांनाच होती. शिवाजीमहाराजांनी मालोजी घोरपडे यांना लिहिलेल्या पत्रात ‘जोहार’ असे म्हटले होते. शिवकाळानंतर मराठ्यांनी ‘राम-राम’ म्हणण्याची रीत स्वीकारली, परंतु महारांनी ती का स्वीकारली नाही, हा वेगळा मुद्दा राहतो. परंतु ‘जोहार’ म्हणणे हे क्षत्रिय असण्याचेच निदर्शक आहे (आंबेडकर, २००३:१४१, खंड १७ भाग २).

चोखामेळा यांच्या ‘जोहार... मायबाप, जोहार!’ या पदाव्यतिरिक्त आपणास कसलाही सांस्कृतिक इतिहास माहीत नसल्यामुळे ‘जोहार’ या शब्दाला आता कमीपणाचे, नीचमूलीय संदर्भ लाभले आहेत. ‘जोहार’च्या जागी आता ब्राह्मण भारतातील ‘नमस्कार’ किंवा ‘नमस्ते’ (सदा वत्सले) किंवा ‘राम राम’ म्हणण्याची प्रथा ब्राह्मणांच्या अनुकरणाच्या संसर्गानि रूढ झाली आहे. किंबहुना विदेशी संसर्गाने आधुनिक झाल्याचे निदर्शक म्हणून हिंदू भारतात ‘गुड मॉर्निंग’, ‘हॅलो’, ‘हाय’ इत्यादी फॅशन झाली आहे. त्याच्याही पुढे जाऊन आता जातीनिहाय ‘जय शिवराय’, ‘जय जिजाऊ’, ‘जय भीम’, ‘जय जिनेंद्र’ अशा कडव्या जातीयवादी प्रथासुद्धा रूढ झाल्या आहेत.

असे असताना, देशीवाद भूतकाळाकडे तोंड का फिरवतो? धसकटे यांना पुरोगामी होण्याची संधी असतानासुद्धा ते सांस्कृतिक इतिहासाकडे आपले तोंड का वळवतात? कारण देशीयतेची राखण करण्यासाठी किंवा आपल्या स्वतःच्या पुढे जाण्यासाठी मागे पाहणे ते आवश्यक मानतात. मागे पाहिल्याशिवाय आपणास पुढे जाता येत नाही, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम मागे पाहिले. भारताचा सगळा सांस्कृतिक इतिहास समजावून घेतला आणि नंतर मग त्यांनी पुढे वाटचाल केली. आंबेडकरांची वाटचाल इतकी पुढची होती की, आजही पुरोगामी आणि आधुनिक म्हणवणारे किती मागे आहेत, हे आपल्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. कारण ते एकतर मागे वळून आपल्या परंपरेकडे पाहत नाहीत किंवा परंपरेकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परंपरा शोधल्याशिवाय आजच्या माणसाची जडणघडण कळत नाही. म्हणून आता माणूस कळणंच कठीण झालं आहे. भारतातल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक समस्यांचे मूळ हे आंबेडकरांनी त्यांच्या तीन भारताच्या इतिहासातून शोधून काढले आहे. आंबेडकर मागे वळून पाहतात, इतिहासाला किंवा इतिहासाच्या मांडणीला महत्त्व देतात, कारण ते खऱ्या अर्थाने देशीवादी आहेत. भारतीय इतिहासाची सगळी पाळंमुळं खणून आंबेडकर देशी आधुनिकता स्वीकारतात आणि विदेशी, हिंदू आधुनिकता नाकारतात.

‘जोहार’ या कादंबरीतील मल्हार हे मध्यवर्ती पात्र (protagonist). मल्हार एमफिल पदवीचा अभ्यास करत असतो, तेव्हा त्याचे मार्गदर्शक भोसले सर त्याला ‘पाली, प्राकृत, मऱ्हाटी वगैरे असा आपल्याला फार समृद्ध देशी भाषा वारसा आहे’, (जोहार, पृ० ४२) असे सांगून ‘जोहार’ या शब्दाविषयीची परंपरा सांगतात. ‘जोहार’चा सांस्कृतिक इतिहास समजून घेतल्यावर मल्हारला ‘जोहार’चे संदर्भ आणि त्यातील स्वाभिमानी सत्त्व आणि स्वत्त्व उलगडते, तेव्हापासून तो ‘नमस्कार’ या ब्राह्मणी भारतातल्या शब्दाशी विद्रोह करून स्वतः चोखामेळ्याप्रमाणे जोहार म्हणण्यास सुरुवात करतो.

मल्हारच्या एमफिल पदवीच्या प्रवेशापासून ते एमफिलचा प्रबंध सादर करण्यापर्यंतचा कादंबरीतला काळ असला, तरी ‘जोहार’च्या निमित्ताने धसकटे यांनी या काळात साठ हजार वर्षांपासूनच्या आपल्या परंपरेचा आशय भरला आहे. आपल्या समाजरचनेत अनेक महत्त्वपूर्ण अशा गोष्टी आहेत की, ज्या आपणास अद्याप समजलेल्याच नाहीत. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्नही आपण केला नाही. मात्र धसकटे यांनी हा शोध वास्तवदर्शीपणे घेतलेला असल्याने आपली साठ हजार वर्षांपासूनची समृद्ध परंपरा त्यांनी कादंबरीच्या काळात बसवली आहे. ही परंपरा धसकटे यांनी कादंबरीच्या रूपात समाविष्ट करून कादंबरीच्या रूपाला पूर्णत्व प्राप्त करून दिले आहे.

आपल्या परंपरेची जाण नसणाऱ्या आणि विदेशी हिंदू आधुनिकता मानणाऱ्या पक्या ओहाळला जोहार म्हणणे गुलामासारखे वाटते. पक्या ओहाळ हा आंबेडकरी चळवळीत काम करत असूनसुद्धा त्याला आंबेडकरांची देशीवादी जाणीव लक्षात येत नाही. अशीच अवस्था सर्व पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांचीसुद्धा असल्याने हे लोक आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय विशाल बुद्धी धारण करून फक्त पुढेच बघत राहतात. त्यांना मागे वळून पाहताच येत नाही, म्हणून त्यांच्या विचारविश्वात माणसाच्या सांस्कृतिक इतिहासातले बरेचसे प्रांत अगम्य राहिले आहेत. अशा अगम्य राहिलेल्या प्रांतांचा धसकटे यांनी ‘जोहार’मध्ये शोध घेतला आहे. असा शोध घेण्याच्या इराद्याने चोखामेळा यांनी केलेल्या ‘जोहारा’नंतर धसकटे यांनी आपल्या वाचक मित्रांना ‘जोहार’ करून कादंबरीची सुरुवात केली आहे.

..................................................................................................................................................................

जोहार : कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी

..................................................................................................................................................................

देशीवाद हा पुनरुज्जीवनवादी आहे वगैरे वगैरे शेरेबाजी करून पुरोगामित्व सिद्ध करता येते, परंतु ‘जोहार’चा देशी संदर्भ लक्षात घेऊन ‘जोहार’चे पुनरुज्जीवन केल्यावर आपण खऱ्या अर्थाने म्हणजेच ‘देशी आधुनिकतावादी’ होऊ शकतो. ‘देशी आधुनिकता’ हे देशीवादाचे साहित्यमूल्य म्हणूनच मानले जात असल्यामुळे ‘जोहार’ ही कादंबरी ‘देशी आधुनिकतावादी’ आहे, याचे भान जागृत होऊन आपण ही कादंबरी वाचण्यास सुरुवात करू शकतो. ‘जोहार’चे मूळ शोधून आपण आधुनिक होऊ शकतो, म्हणजे उच्चनिचतेचा भेद संपवूनच आधुनिक होऊ शकतो, हे या कादंबरीचे सूत्र नवीन देशीवादी जाणीव निर्माण करते. ‘गुड मॉर्निंग’ म्हणून किंवा ‘लॉर्ड मेकॉले हे सभ्य गृहस्थ असावेत’ असा रावसाहेबी शेरा मारून आपण आधुनिक होऊ शकत नाही, हे या कादंबरीत भरभक्कम आशयानुरूप चित्रित केलेले आहे.

 

१९८०च्या दशकात सुरू झालेल्या खासगीकरणाच्या स्वीकारामुळे महाराष्ट्रात जे वेगवान सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक स्थित्यंतर घडू लागले, त्याचा परिणाम म्हणून पुढे १९९०च्या दशकात उदारीकरण आणि त्यातून जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतला. या प्रक्रियेवरची प्रतिक्रिया आणि नवा प्रतिकारी जोश म्हणून कादंबरी निर्मितीमध्ये सर्जनशील आशयद्रव्याला सुशील धसकटे यांनी सर्जनशील रूपरेषेबरोबरच सर्जनशील आकार देऊन या कादंबरीचे रूप घडवले आहे.

धसकटे यांनी निवडलेले आशयद्रव्य हे आक्रमक तर आहेच, पण त्याहीपेक्षा ते ज्वलंत संघर्षद्रव्यसुद्धा असल्याने या कादंबरीला विविध सामाजिक स्तरांचे, अवस्थांचे, परस्पर मतप्रवाहांचे कसलेही वावडे नाही. त्यासाठी त्यांनी त्यांची निवेदनशैली सरळ निवेदनाच्या स्वरूपात न मांडता पर्यायी अनुभवाचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे योजली आहेत.

१९९०च्या दशकातील ग्लोबलायझेशन (वैश्विकीकरण) आणि त्याच्याच जोडीने आलेल्या राष्ट्रवादाच्या आक्रमक संघर्षद्रव्याला पोटात घेऊन धसकटे यांना ‘जोहार’ची रचना करण्याची जबाबदारी पार पाडावी लागली आहे. नेमाडे यांच्या ‘कोसला’, ‘बिढार’, ‘हूल’, ‘जरिला’ आणि ‘झूल’ या सर्व कादंबऱ्या १९८०च्या दशकाच्या आधीच्या म्हणजेच खाउजा धोरणाच्या आणि आक्रमक राष्ट्रवादाच्या आधीच्या असल्याने नेमाडे आणि धसकटे यांच्या कादंबऱ्यातील आशयद्रव्य आणि रूपाचे वेगळेपण नजरेआड करता येणार नाही. ‘जोहार’ या कादंबरीचे क्रांतिकारक रूप साकार करताना धसकटे यांनी स्वत:ची विचारप्रणाली प्रबळ केली आहे आणि वाचकांची विचारप्रणालीसुद्धा बळकट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

..................................................................................................................................................................

जोहार : कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी

..................................................................................................................................................................

धसकटे यांनी निऋतीपासून ते थेट कादंबरीतील काशीबाई आजी, आई आणि आबई या समृद्ध मातृसत्ताक स्त्रीसत्ताक वारशाला ही कादंबरी अर्पण केली असल्यामुळे ओघानेच लेखक हा मातृसत्तेच्या स्त्रीसत्तेच्या गोटातला आहे, हे वरकरणीच सिद्ध होते, पण प्रत्यक्षात रचनेची लढाई करताना मल्हार आणि तत्सम पात्रे कशा पद्धतीने वर्तन करतात, यावर या लढाईतील डावपेचांची यशस्वीता पाहता येते. धसकटे यांची ही स्त्रीसत्ताक विचारप्रणाली साहजिकपणेच शरद पाटलांकडून आलेली आहे, याचाही अंदाज घेता येतो. शरद पाटलांचे म्हणणे असे की, जगभरात सर्वत्रच एकेकाळी स्त्रीसत्ताच होती, परंतु त्याची सांगड कुठल्याही मानववंशशास्त्रज्ञाने आधुनिक समाजवादाशी घातलेली नाही. त्यांच्या मते, मातृसत्ता आणि स्त्रीसत्ता यांच्यातील संबंध जैविक होता आणि स्त्रीसत्ता ही अपघाती किंवा अपवादात्मक नव्हती, तर मानवी समाजाची ती नैसर्गिक विकासावस्था होती. स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीचा उगम पितृसत्ताक गणदास समाजात किंवा बूर्वा लोकतंत्र समाजात झालेला नसून स्त्रीसत्तेत झालेला आहे (शरद पाटील, २०१२:४२).

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘जोहार’मध्ये स्त्रीसत्ता आणि आधुनिक खाउजा काळातील लोकशाही यांची सांगड घालण्याचा प्रयत्न धसकटे यांनी केला आहे. आधुनिक काळात सर्वत्र स्त्री आणि पुरुष समानतेची घोषणा स्त्रीवाद्यांकडून होत असते, परंतु मल्हार हा फुल्यांना आधुनिक भारतीय स्त्रीवादी मानत असल्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये ‘जास्त श्रेष्ठ स्त्री आहे’ हीच विचारसरणी केंद्रस्थानी ठेवतो. फुल्यांच्या मते, ‘स्त्री सृष्टीनियमांस अनुसरून आपल्यातील सर्व मुलींचे तर काय, परंतु आर्यभटातील नाडबंद ब्रह्मचारी शंकराचार्याच्या तोलाच्या मुलाचेसुद्धा आपल्या उदरी काकू केल्याशिवाय निमूटपणे नवमांस रात्रदिवस ओझे वागविते’.

फुले म्हणतात त्याप्रमाणे, मल्हारची आई ‘निरपेक्ष बुद्धीने पाठराखेपणा करणारी’ आहे, म्हणून मल्हारला आई खूप थोर वाटते. स्त्री-पुरुष समतेचा कितीही डंका वाजवला, तरीही ही स्त्रीसत्ताक परंपरा आजही अदृश्य स्वरूपात का होईना आहे, याविषयी मल्हार ठाम आहे. या विचारप्रणालीचा आधार धसकटे हे कादंबरीचा रचनाकार म्हणून फुलेंच्या ‘निर्मिक’ या संकल्पनेशी सांधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्या मनातील निर्मिक हा देव नसून एक स्त्री किंवा आई आहे, की जी स्त्री नाडबंद ब्रह्मचारी शंकराचार्याची आणि मल्हारची निर्मिक असते. या निर्मिकाचे भय बाळगणे ही मल्हारची विचारसरणी, तर या निर्मिकाचे कसलेही भय न बाळगणे ही शंकराचार्याची विचारसरणी. याचेच विभाजन ‘स्त्रीसत्ताक’ आणि ‘पुरुषसत्ताक’ असे होते.

स्त्रीसत्ताक परंपरा ही कितीतरी श्रेष्ठ आहे, असे मल्हारला वाटत असले तरी धसकटे यांना कादंबरीचे रचनाकार म्हणून ती एक जोखीम वाटते. कारण जेव्हा स्त्रियांच्या हातात प्रत्यक्षात सत्ता आल्यावर ती इतरांवर अन्याय करणार नाही, याची हमी देता येत नाही.

स्त्रीसत्ता आणि पुरुषसत्ता या डावपेचाची आखणी करताना धसकटे यांनी पत्ररूपी निवेदनाचा आधार घेतल्यामुळे या दोन्ही सत्ता एकमेक ठेवणे शक्य झाले आहे. या दोन्ही भूमिकासुद्धा धसकटे यांनी धोरणाच्या पार्श्वभूमीवरच अधोरेखित केल्या आहेत. मल्हारचा मित्र शिव त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील पती-पत्नी संबंधाचा संघर्ष मांडतो, तेव्हा स्त्रीसत्तेचे आधुनिक रूप समोर येते. शिव लिहितो, ‘जिजाऊ- सावित्रीच्या लेकी अशा शिकून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहतात ही चांगलीच बाब. पण हे कौतुक अतिगर्वात परिणत होता कामा नये, ने नमिताच्या (शिवची पत्नी) बाबतीत होतंय’ (पृ० १८१). येनकेन प्रकारेण स्त्रियांकडे सत्ता आल्यावर स्त्रियासुद्धा बेभान होऊन अन्यायकारक वागू शकतात, हेच शिवच्या पत्रामध्ये ठळक होत राहतं.

त्याचप्रमाणे मल्हार उलटटपाली शिवला अभिव्यक्तिस्वातंत्र्य, एकत्र कुटुंब पद्धतीचा न्हास, भारतीय संस्कृतीचं अवमूल्यन अशी काही उदाहरणे देऊन जागतिकीकरणामुळे झालेल्या मूल्यहासाची कारणे नमूद करताना लिहितो, ‘जिथं माणूस हीच क्रयवस्तू होते, तिथं माणूस म्हणूनच्या भावभावना, माणुसकी, चांगूलपणा, मानवी मूल्यं याला कवडीचंही मूल्य उरत नाही’ (पृ० १८५). अशा काळात देशी जीवनशैलीची राखण करण्याचा शिव आटोकाट प्रयत्न करतो, पण त्याची फक्त घुसमटच होत राहते.

..................................................................................................................................................................

जोहार : कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी

..................................................................................................................................................................

याच प्रकारची जानूतात्यांच्या रमेशची कहाणी मल्हार सांगतो. इथं मात्र रमेशला चांगली नोकरी मिळते, तशी बायकोही बहाद्दरच मिळते. बायकोच्या आग्रहानं घरात सर्व प्रकारची भौतिक सुबत्ताही येते. मग खुद्द रमेशलाच आई-बाप, गाव वगैरे या सगळ्या गोष्टी बकवास वाटू लागतात.

जागतिकीकरणातील आधुनिकीकरणाचा परिणाम म्हणून रमेश गावातलं घर विकून शहरात निघून जातो. घरी जानूतात्या जिवंत असून मेल्यासारखा होतो. रमेशची बायको नोकरी करत नाही, पण बीए झालेली. बस्स. फक्त शिक्षणातून मिळालेली स्त्रीसत्ता. एवढाच तो संदर्भ, पण मल्हार या सर्व परिस्थितीचा खाउजा धोरणातून आलेल्या विकृतीशी संबंध जोडून लिहितो, ‘कालपर्यंत शिक्षण नव्हतं म्हणून बौब, आज शिक्षण घेऊनही बोंब, कस नसलेलं शिक्षण-मूळ उखडवणारं जागतिकीकरण’ (पृ० १९०).

मल्हारचा भाऊ अण्णासुद्धा त्याची स्वत:ची इच्छा नसतानाही त्याला त्याच्या बायकोच्या दबावाखाली वेगळं राहावं लागतं, हेही मल्हार शिवला लिहितो. मल्हारला ही आधुनिकता वरकरणी मोहक वाटली तरी ती तितकीच विकृत आणि भोगवादी वाटते. या मोहकतेला आपण भारतीय बळी पडलो आहोत, अशा प्रकाराने मल्हार स्त्रीसत्तेची किंवा मातृसत्तेची आधुनिक काळातील स्त्री किंवा पुरुष यांच्या संबंधाने चर्चा करतो, तेव्हा निश्चित आणि निर्णायक अशा सत्तासंघर्षाचा निकाल लावू शकत नाही.

धसकटे यांनी कादंबरीतील वेगवेगळ्या उपकहाण्या वाचकांपुढे ठेवल्या आहेत, त्या कहाण्या वाचत वाचत स्वत:च्याही अनुभवातल्या कहाण्यांचे मिश्रण करून वाचकालाच त्याची स्वत:ची कादंबरी रचावी लागते. धसकटे स्वतः मातृसत्तेच्या किंवा स्त्रीसत्तेच्या गोटातले असले तरी मातृसत्ता आणि पितृसत्ता या युद्धातील त्यांनी वापरलेली आयुधे आणि डावपेच त्यांना आता अडचणीत टाकतात, तेव्हा त्यांना उच्चकोटीतील नैतिकमूल्यांशीच तडजोड करावी लागते. दुर्योधनाला कृष्णाने फसवून मारण्यातलाच हा प्रकार असतो. शिवची पत्नी, रमेशची पत्नी किंवा मल्हारच्या भावाची पत्नी दुर्योधनही असू शकतात आणि कृष्णसुद्धा होऊ शकतात.

आजच्या काळातसुद्धा स्त्रीसत्ता की पुरुषसत्ता याहीपेक्षा सहिष्णुता की, असहिष्णुता किंवा बौद्धवाद की, ब्राह्मणवाद याचीच निवड करावी लागेल, अशी विचारसरणी या कादंबरीतून स्पष्ट होत राहते, तेव्हा धसकटे यांच्या विचारव्यूहात स्त्रीसत्ता किंवा मातृसत्तेपेक्षा आंबेडकरांचे न्याय हे प्रमाणक केंद्रस्थानीचे आहे, हाच निष्कर्ष आपल्या हाती येतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

धसकटे यांनी त्यांच्या ‘जोहार’ कादंबरीचे शीर्षक नेमाडेंप्रमाणेच एक प्रभावी आयुध म्हणून वापरले आहे. कादंबरीचे शीर्षक वाचल्या वाचल्या ज्यानं आंबेडकर वाचला नाही, तो ‘जोहार’ या शब्दाचा नीचमूलीय अर्थ गृहीत धरून कादंबरीच बाजूला सारतो. ज्यांनी आंबेडकर वाचला आहे, तो अतिशय उत्साहाने ही कादंबरी वाचण्यास घेतो. ‘जोहार’चे शीर्षक तिन्ही भारतात वेगवेगळ्या प्रकारांनी म्हणजेच कॅलिडोस्कोपिक दृष्टीने पाहिले जात असल्यामुळे या तिन्ही भारतातल्या वाचकांना ‘काय आहे हे आता जोहारचे प्रकरण’ याचे आकर्षण वाटू लागते.

या रचनात्मक युद्धाच्या डावपेचात धसकटे यशस्वी ठरले आहेत.

 

धसकटे बुद्धाला आणि महावीराला खऱ्या अर्थाने संस्कृत या वैदिक वसाहतीविरुद्ध युद्ध पुकारणारे उत्तर-वसाहतवादी मानतात, याचं कारणच त्यांच्या प्राकृत मातृभाषेच्या, देशी भाषेच्या आग्रहात सापडते. या देशी भाषेची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी ते कादंबरीतील रचनेचे डावपेच आखतात. मल्हारचा मित्र सुरेश वैतागून उपरोधानेच म्हणतो, ‘मराठीतून शिकू नका, नाही तर कुत्रंही हाल खाणार नाहीत तुमचं, फुकाचा भाषा अभिमान नको. पोटाला देईल तिच आपली भाषा. शहरी लोकांकडून एवढं तरी शिकलं पाहिजे आपण. जुनं जावू द्या मरणालागुनी’ (पृ० १०५). जे विचारवंत, लेखक आणि पुढारी मराठी भाषेची भलतीच चिंता असल्याचे दाखवणारी बेगडी भाषणे ठोकतात आणि स्वत:ची मुलं-नातवंडांना इंग्लिश माध्यमामध्ये शिकवतात, असल्या ढोंगी लोकांकडूनच मराठीला खरा धोका आहे, तर मल्हारसारखीच ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि बहुजनांतली लाखो पारंपोरी पुढच्या पोटापाण्याची काही शाश्वती नसतानाही मराठी विषय घेऊन शिकतात, हे सत्य मांडताना बुद्धाची देशी भाषेची परंपरा ही बहुजनांची मुलंच बळकट करू शकतात, असा निष्कर्ष अभिजन आणि बहुजन यांच्या एकमेकांवरील भाषिक कुरघोडीतून निघू शकतो, अशी व्यवस्था कादंबरीत करून ठेवल्याचे आढळते.

 

टॉलस्टॉयच्या ‘वॉर ॲन्ड पीस’ या कादंबरीविषयी पर्सी ल्युबॉक म्हणतात, ‘A great and brilliant novel (War and Peace), a well-known novel, and at the same time a large and crowded and unmanageable novel’.  ‘जोहार’ ही कादंबरी साधारणपणे या प्रकाराकडे जाणारी म्हणजेच जोहार ही थोर आणि तेजस्वी कादंबरी आहे. पर्सी ल्युबॉक पुढे म्हणतात, ‘And there is not a sign in the book to show that he (Tolstoy ) knew what he was doing; ap- parently he was quite unconscious that he was writing two novels at once’.

पर्सी ल्युबॉकने पुढे असे निरीक्षण मांडले आहे की, टॉलस्टायने ‘वॉर ॲन्ड पीस’ या कादंबरीत ‘इलीयड’ आणि ‘एनिअड’ ही दोन्ही महाकाव्ये एकत्रित बांधली आहेत. हे काम एखाद्या अफाट बुद्धिमत्तेचा कादंबरीकारच करू शकतो. तसाच काहीसा प्रयत्न धसकटे करताना दिसतात, पण धसकटे काही ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ एकत्रित बांधण्याचा प्रयत्न करत नाहीत. एवढे मात्र म्हणता येते की, धसकटे यांनी दलित, आदिवासी आणि ग्रामीण संवेदनशीलता एकत्रित बांधण्याचा प्रयत्न ‘जोहार’मध्ये केलेला आहे. आणि हा प्रयत्न करताना धसकटे अजाणतेपणाने एकाच वेळी दोन कादंबऱ्या लिहितात. खाउजा आक्रमणाचे दबाव तिसऱ्या जगातील सर्वच लेखक आणि वाचकांवरसुद्धा आहेत. हे दबाव लेखकाला विशेषतः जास्त त्रासदायक असतात. त्या दबावांना सामोरं कसं जायचं, हे आव्हान पेलताना धसकटेंना टॉलस्टॉयप्रमाणेच दुधारी आयुधांचा वापर करावा लागला आहे. असा प्रयत्न मराठीत तरी दुर्मीळ म्हणता येईल. मुद्दामहून नमूद करणे गरजेचे आहे की, इथं टॉलस्टॉय आणि धसकटे यांची तुलना केलेली नसून कादंबरीतले रचनात्मक युद्ध लढताना टॉलस्टॉयचं जे होतं, तसंच काहीसं धसकटेंचं नव्हे, तर अगदी तरबेज आणि वाकबगार कादंबरीकाराबाबतसुद्धा होऊ शकतं.

..................................................................................................................................................................

जोहार : कुणब्याच्या डोक्यातील अंगार जिता ठेवणारी कादंबरी

..................................................................................................................................................................

भारतीय परंपरेच्या गर्भातून आलेली देशी आधुनिकता आणि जागतिकीकरणाच्या कोलाहलातून आलेली विदेशी आधुनिकता, यातील रचनेच्या युद्धात सुरुवातीला गांधींच्या ‘हिंद स्वराज’मधील गोफणीच्या दगडाप्रमाणे सणसणत निघालेली ‘जोहार’ ही कादंबरी शेवटी बुद्ध आणि त्याचा धम्म या क्रांतीत सामील होते. कोणत्या देशी तत्त्वांचं आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे आणि कोणती पाश्चात्य तत्त्वे स्वीकारून ती देशी परंपरेशी जोडावी, या देशीवादी जाणिवेतून धसकटे यांनी लढलेल्या रचनात्मक लढाईतून शोषक विदेशी आधुनिकतेचा पर्दापाश करण्यात यश मिळवले आहे.

ही लढाई करताना भारतीय परंपरेचं अज्ञान असणाऱ्या पुरोगामी हिंदुत्ववाद्यांचीसुद्धा पर्वा न करता त्यांचीही झाडाझडती घेतली आहे. स्वदेशीवाद, देशीवाद आणि विदेशीवाद यांतील असलेल्या सीमारेषांची पक्की जाण असलेल्या धसकटे यांनी भारतीय कादंबरीच्या परंपरेला फिक्शनकडे ओढून नेणाऱ्या ब्राह्मण आणि हिंदू भारतातल्या पंडितांना ‘जोहार’च्या निमित्ताने जोरदार चपराक दिलेली आहे.

आजच्या काळातील मुंबई पाहिली, तर आंबेडकरांना मुंबईची घृणा का आली असावी आणि आजच्या काळातील गुजरातकडे पाहिल्यावर, गांधींनी गुजरातकडे का पाठ फिरवली असावी, याचा अर्थपूर्ण उलगडा होतो. आंबेडकरांनी ‘जोहार’चे आणि ‘बुद्धा’चे पुनरुज्जीवन का केले आणि गांधींनी विदेशी आधुनिकतेला विरोध का केला, याची नेमकी उत्तरं ‘जोहार’ या कादंबरीत मिळतात, म्हणून ही कादंबरी म्हणजे रचनात्मक युद्धाचा एक देशी मासला आहे, असे म्हणण्यात कसलीही खळखळ करावीशी वाटत नाही.

‘जोहार :  रचनात्मक युद्धाचा देशा मासला’ – अशोक बाबर

हर्मिस प्रकाशन, पुणे | पाने – ७६ | मूल्य – १२० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......