अजूनकाही
सबंध राज्यात कोल्हापूर जिल्हा हा धार्मिक सलोख्याचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. शाहू महाराजांनी १९०२मध्ये भारतात प्रथमच आपल्या राज्यात दलित आणि मागासवर्गीयांसाठी राखीव जागांचे धोरण लागू केले. त्याचबरोबर मुस्लीम समाजाच्या प्रगतीसाठीदेखील विशेष धोरण अंगिकारले होते. त्याचप्रमाणे फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा याच दक्षिण महाराष्ट्रात भक्कमपणे उभा राहिला. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर गेली ७५ वर्षे सनातनी हिंदुत्ववादी विचार या भागात कधी मूळ धरू शकले नाहीत.
मात्र, गेल्या एप्रिल-मे महिन्यापासून या परिसरात मुस्लीमविरोधी विखारी प्रचार मोहीम राबवण्यात येत आहे. सुरुवातीला महाराष्ट्राचे दक्षिण टोक असलेल्या आजरा, गडहिंग्लज आणि इचलकरंजी भागांत अनेक ठिकाणी ‘हिंदू जन आक्रोश मोर्चे’ संघटित केले गेले. त्या पाठोपाठ या परिसरात ठिकठिकाणी लहान-मोठी खुसपटे काढून मुस्लीम समाजाविरुद्ध आरोपांची राळ उठवली गेली. काही ठिकाणी अल्प तीव्रतेच्या हिंसक घटना घडल्या आणि गावात बंद पाळले गेले.
मुख्य म्हणजे या सर्व घटनांचा सखोल मागोवा घेत वस्तुस्थिती कोणत्याही प्रसारमाध्यमांत नीटपणे आली नाही. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरांत घडलेल्या या सर्व घटनांचे टोक म्हणजे सात व आठ जून रोजी कोल्हापूर येथे झालेला मुस्लिमांवरील एकतर्फी हल्ला!
ध्रुवीकरणाचा सूत्रबद्ध कार्यक्रम
या हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या अनेक लोकांनी असे सांगितले की, हा हल्ला कोल्हापुरातील लोकांनी केलेला नव्हता. फारच थोडे स्थानिक यात सहभागी होते. मात्र बाहेरून आलेले हिंसक तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कोल्हापुरात या घटनेनंतर स्थानिक लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्षतावादी नागरिकांनी पुढाकार घेऊन पुन्हा एकदा धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु धार्मिक ध्रुवीकरणाचा एक सूत्रबद्ध कार्यक्रम हिंदुत्ववादी संघटना आणि गटांनी आखला आहे, आणि हेच वर्तमानातले मोठे आव्हान आहे.
सात-आठ जूननंतर कोल्हापूर विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांमध्ये काही अल्पसंख्य समुदायांच्या शाळांमध्ये जाणीवपूर्वक शिक्षकांना अडवण्याचे प्रकार वाढले. काही शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांनी धर्मनिरपेक्षतावादी भूमिका घेतली म्हणून व्यवस्थापनावर दबाव आणून सक्तीच्या रजेवर जाणे भाग पाडण्यात आले. काही ठिकाणी वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकांचे बोलणे ध्वनिमुद्रित करून वा मोबाइलद्वारे चित्रित करून ते ‘व्हायरल’ करण्यात आले आणि सदर शिक्षिका ‘हिंदुत्ववादाला पूरक अशी भूमिका घेत नाहीत’ म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात आली आणि त्यांना ‘ट्रोल’ करण्यात आले.
एकंदरीने कोल्हापुरातील वातावरण विविध पातळीवर आणि विविध पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा प्रकारच्या अनेक घटना बाहेर आलेल्या नाहीत. कोल्हापूर आणि आसपासच्या परिसरातील अल्पसंख्याक समाज आणि पुरोगामी धर्मनिरपेक्षतावादी लोक हे आक्रमक हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावाखाली आहेत.
सोशल मीडियातली विघातक घुसखोरी
कोल्हापूरनंतर अशा धार्मिक व ध्रुवीकरणाचे दुसरे केंद्र सातारा जिल्हा ठरत आहे. जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांत सातारा जिल्ह्यात एका विशिष्ट पद्धतीने मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्यात आले. मुस्लीम नागरिकांना कोंडीत पकडण्यासाठी ‘फेसबुक पोस्ट’ हे हत्यार बनवले गेले. एखाद्या दूरच्या खेड्यामधील मुस्लीम तरुणाचा फेसबुक अकाउंट हॅक करून, त्यावर हिंदूविरोधी वाटतील किंवा हिंदू समाजाच्या भावनिक प्रतीक असलेल्या व्यक्तींविषयी अवमानकारक पोस्ट ‘व्हायरल’ केल्या जातात.
मग त्या मुलाचा माग काढून रात्री-अपरात्री हिंदुत्ववादी टोळके त्या गावात घुसते. अकाउंट हॅक केलेल्या मुलाला घराबाहेर बोलवले जाते. हे अकाउंट आणि हे फेसबुक अकाउंट तुझेच आहे ना, एवढेच विचारले जाते. तो मुलगा ‘हो’ म्हणताच, त्याला कोणतीही बोलण्याची संधी न देता बेदम मारण्यात मारहाण केली जाते. त्याला सोडवण्यासाठी घरातील त्याचे वडील, भाऊ अथवा अन्य कोणी मध्ये आले, तर त्यांनाही बेदम मारले जाते.
हा हल्ला जेमतेम अर्धा-एक तास होतो. त्यानंतर ते टोळके गायब होते. त्याच वेळी सातारा जिल्हा पोलिसांकडे सदर मोबाइल धारकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात येते. या पोस्टमुळे हिंदू समाजाच्या भावांना दुखावल्या आहेत, तेव्हा त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली जाते. परिस्थिती तणावाची होऊ शकते आणि सामाजिक असंतोष निर्माण होऊ शकतो, या धास्तीमुळे पोलीस यंत्रणा तातडीने सदर मुलाला पोलीस स्टेशनला बोलावते आणि ताब्यात ठेवते.
मुस्लीम समाज हेच लक्ष्य
अनेक प्रकरणांत असेही घडले आहे की, सदर मोबाइल त्या मुलाचा नसतो. तर त्याच्या आईचा, मावशीचा अथवा काकाचा, वडिलांचा असतो. प्रकरणात मोबाइलच्या मालक म्हणून या घरात कुटुंबातील व्यक्तीलाही पोलीस ताब्यात घेतात. काही प्रकरणांत असेही घडले आहे की, पोलिसांनी तो मोबाइल ताब्यात घेतल्यावरसुद्धा भावना दुखावणाऱ्या तथाकथित पोस्टची मालिका येत राहते. याचा सरळ अर्थ असा आहे की, हॅक करून या अकाउंटवर अशा विकृत पोस्ट कोणीतरी जाणीवपूर्वक पाठवत आहे.
याचा थेट परिणाम त्या गावातील मुस्लीम समाजावर होत आहे. सातारा जिल्ह्यातील अशा लहान-लहान गावांमध्ये मुस्लीम समाजाची कुटुंब हातावर मोजता येतील इतकीच असतात. एखाद्या कुटुंबाला अशा पद्धतीने लक्ष्य बनवले की, इतर कुटुंबेही घाबरून जातात, भेदरतात. परिणामी ही कुटुंबे हल्ला झालेल्या घराला मदत करण्याची हिंमतही दाखवू शकत नाहीत. उलट या कुटुंबापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात.
गेल्या दीड-दोन महिन्यांतल्या अशा घटनांमुळे या गावांमधील मुस्लीम कुटुंबे गाव सोडून निघून जात आहेत. सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या १५ ते १६ घटना घडल्या आहेत. ‘सलोखा संपर्क गटा’च्या कार्यकत्यांनी या सर्व घटनांचा पाठपुरावा केला आहे. त्यातून पुढे आलेली माहिती विषण्ण करणारी आहे.
हतबल पोलिसी खाक्या
नाहक अडकलेला आरोपी मुलगा आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्ती, हे पोलीस स्टेशनला स्वत:हून हजर होतात. अनेक प्रकरणांतली आरोपी मुले अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. म्हणजे या मुलांवर गुन्हे दाखल झाले किंवा नाही झाले, तरी त्यांना बालसुधारगृहात पाठवले जाते. महाविद्यालयांमध्ये शिकणारी किंवा शाळेमध्ये जाणारी ही निरपराध मुले दहा-दहा दिवस अडकून राहतात. काही प्रकरणांमध्ये या मुलांबरोबर पकडण्यात आलेले त्यांचे नातेवाईक प्रत्यक्ष गावात हजरही नव्हते, हेसुद्धा सिद्ध झाले आहे.
असे असूनही सामाजिक तणाव आणि असंतोष नको, म्हणून पोलीस या निरपराध नागरिकांना अडकवून ठेवतात. अर्थातच अशा पद्धतीने अडकलेल्या लोकांना आपले निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी कोर्ट-कचेऱ्या करणे भाग पडत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांची वाताहात होत आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या दीड-दोन महिन्यांत घडलेल्या अशा प्रकरणांचे टोक म्हणजे पुसेसावळी येथे मुस्लीम समाजावर आणि गावातील मशिदीवर करण्यात आलेला हल्ला होय. त्यात आत्तापर्यंत दोन मुस्लीम नागरिक मृत पावले आहेत, तर काही गंभीर जखमी झाले आहेत.
या हिंसक घटनांनंतर ‘सलोखा संपर्क गट’ आणि अन्य पुरोगामी पक्ष संघटनांनी एकत्रितपणे या आक्रमक धार्मिक ध्रुवीकरणाच्या मोहिमे विरुद्ध ठामपणे काम सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातील या प्रत्येक घटनांचा मागोवा घेत, त्यातील प्रत्येक प्रकरणात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
त्याचबरोबर पुसेसावळी येथील हिंसक हल्ल्यानंतर सातारा शहरात सर्व पुरोगामी पक्ष-संघटनांनी या घटनांची निष्पक्ष पद्धतीने चौकशी व्हावी आणि निरपराध मुस्लीम नागरिकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांमुळे काही प्रमाणात मराठी प्रसारवाहिन्यांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये पुसेसावळीमधील घटनांची नोंद घेतली गेली आहे.
लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे, पुसेसावळी येथे हिंदू-मुस्लीम दंगल झालेली नाही, तर मुस्लीम समाजावर एकतर्फी हल्ला करण्यात आला. किंबहुना कोल्हापूर सातारा-सांगली- इचलकरंजी या परिसरांत गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या अल्पसंख्यविरोधी घटना म्हणजे थेटपणे मुस्लीम समाजावरील हल्ला आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.
या सर्व घटनांचे अवलोकन केल्यास असे दिसते की, वस्तुस्थिती उघड दिसत असूनही पोलीस यंत्रणा पुरेशा कार्यक्षम पद्धतीने परिस्थिती हाताळू शकलेली नाही. किंबहुना, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना असे जाणवले की, पोलीस प्रशासन दबावाखाली असावे. विशेषतः आक्रमक हिंदुत्ववादी प्रचारामुळे आणि राजकीय सत्ताधाऱ्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे ते वेगाने परिस्थितीवर नियंत्रण मिळू शकलेले नाहीत.
फेसबुकवर लिहिलेला मजकूर किंवा टिपू सुलतान, औरंगजेब वा वादग्रस्त वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रे फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप पोस्टवर ठेवणे, हा गुन्हा ठरू शकत नाही. त्यामुळे या कारणासाठी आरोपींवर गुन्हा सहज दाखल होऊ शकत नाही, हे पोलीस अधिकाऱ्यांनाही नीट माहीत आहे. मात्र केवळ सामाजिक तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करावी लागते.
थोडक्यात, अशा कारणांवरून मोठा बागुलबुवा उभा करण्यात येत आहे. यामागील स्पष्ट उद्देश हिंदू-मुस्लीम वैर निर्माण करणे, मुस्लीम समाजाची बदनामी करणे आणि ध्रुवीकरण करणे हाच आहे. यासाठी क्रूरपणे मुस्लीम समाजाला हिंसेचे लक्ष्य बनवण्यात येत आहे.
वरील सर्व घटनाक्रम पाहिला, तर एप्रिलपासून एका नियोजनबद्ध पद्धतीने अल्पसंख्याकविरोधी वातावरण तापवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, गडहिंग्लज इत्यादी परिसरांत एका पद्धतीचे ध्रुवीकरण तंत्र वापरण्यात आले, तर सातारा जिल्ह्यात फेसबुक व व्हॉट्सअॅप पोस्टचे भांडवल करण्यात येत आहे.
ही धार्मिक ध्रुवीकरण मोहीम थेटपणे राजकीय कार्यक्रम आहे. हिंदू-मुस्लीम समाजातील सर्वसामान्य सुजाण नागरिकांना हे आता उघडपणे लक्षात येत आहे. तरीही या मोहिमेद्वारे मुस्लीम समाजाला आणि अन्य अल्पसंख्याक समाजाला दहशतीच्या छायेखाली आणले गेले आहे. मुस्लीम समाजाशी संबंधित मशिदी, दर्गे या ठिकाणी हल्ले केले जात आहेत, शाळा-महाविद्यालये इत्यादी ठिकाणी संस्थाचालक आणि शिक्षकांना लक्ष्य बनवण्यात येत आहे. त्यांच्यावर हिंदुत्ववादी पक्षपाती भूमिका घेण्यासाठी दबाव आणला जात आहे.
जोहान गॅल्टंग (Johan Galtung ) या नॉर्वेजियन समाजशास्त्रज्ञाने धार्मिक किंवा वांशिक वितुष्ट निर्माण करून सामाजिक तणाव सातत्याने टिकवून ठेवणे, हे ठिकठिकाणी राजकीय सत्ताधाऱ्यांचे तंत्र कसे आहे, याविषयी व्यापक संशोधन केले आहे. या तंत्रामध्ये हिंसेचा तीन प्रकारे वापर केला जातो. एक म्हणजे, धार्मिक किंवा वांशिक वर्चस्वासाठी लक्ष्य ठरवण्यात आलेल्या समाजातील नागरिकांविरुद्ध शारीरिक हिंसा घडवणे. दुसरा मार्ग म्हणजे, या समाजाचे सामाजिक अस्तित्व दुर्बल करण्यासाठी त्यांचा बहुसंख्य समाजाबरोबर असलेला सामाजिक व्यवहार नष्ट करणे. अल्पसंख्य समाजाच्या विविध संस्था व्यवस्थांवर (उदा. मशिदी, दर्गे, मदरसे इ.) हल्ले करणे. या संस्था बंद पाडणे. त्यायोगे अल्पसंख्याक समाजाला सामाजिक व्यवहार करणे अशक्य होऊन बसते. तिसरा मार्ग म्हणजे, अल्पसंख्याक समाजाच्या ऐतिहासिक खुणा नष्ट करणे.
या तिन्ही प्रकारच्या हत्यारांचा वापर कोल्हापूर, सांगली, सातारा या परिसरांत उघडपणे होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
सातारा-सांगलीच का?
हाच परिसर का निवडण्यात आला, याचाही विचार आपण करायला हवा. सांगली-सातारा-कोल्हापूर हा ऐतिहासिक काळापासून धार्मिक सलोख्याचा आणि पुरोगामी चळवळीचा बालेकिल्ला होता. महाराष्ट्रातील चळवळ, समतेची चळवळ फुले-शाहू-आंबेडकर समाजाची चळवळ, तसेच सामाजिक सलोख्याचा विचार याच परिसराने महाराष्ट्राला दिला. त्यातूनच महाराष्ट्राचे जनमानस आणि राजकीय भूमिका आकाराला आली.
शिवाजी महाराजांपासून संत शेख मोहम्मदपर्यंत आणि शाहू महाराजांपासून प्रबोधनकार ठाकरेंपर्यंत तसेच सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाईपर्यंत विविध ऐतिहासिक नेत्यांचा वैचारिक वारसा महाराष्ट्रात निर्माण झाला. यामुळेच सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरात हिंदू-मुस्लीम समाज अत्यंत एकोप्याने कायम नांदत आले आहेत.
या ऐतिहासिक वारशातून निर्माण झालेली ही सलोख्याची वीण महाराष्ट्राचे सामाजिक वैभव आहे. हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पुरोगामी विचारांचा वारसा देणारा हा परिसर आहे. म्हणूनच हिंदुत्ववादी शक्तींना हा वारसा डाचत आहे. याच वारशामुळे महाराष्ट्र ‘पुरोगामी विचारांचे आगर’ मानले जाते. प्रत्येक नवा विचार मग तो स्त्रीमुक्तीचा असो वा जातीअंताचा असो किंवा धर्मांधता विरोधाचा असो, महाराष्ट्र कायमच सजगपणे आपला वारसा टिकवून आहे.
ही सलोख्याची वीण उसवण्यासाठी हिंदुत्ववादीशक्ती टोकदारपणे या परिसरात प्रयत्नशील असल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी समाज हा हल्ला कसा परतवणार हा प्रश्न आहे!
‘मुक्त-संवाद’ मासिकाच्या ऑक्टोबर २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
लेखक प्रमोद मुजुमदार साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक, अनुवादक व सलोखा संपर्क गटाचे समन्वयक आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment