अजूनकाही
विद्याधर म्हैसकर हे अत्यंत प्रतिभाशाली निसर्गप्रेमी ललितलेखक, पक्षी-निरीक्षक, उत्तम रंगरेषाकार, अवघ्या प्राणिमात्रांवर मन:पूत प्रेम करणारे संवेदनशील साहित्यकार. त्यांचे एकूण लेखनही हेवा वाटावा, असेच आहे. ‘एक बुलबुल म्हणाला’ ही त्यांची कादंबरी या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. ‘हंस’, ‘मौज’ यांसारख्या दर्जेदार नियतकालिकांमधून त्यांचे लेखन सातत्याने प्रकाशित होत आले आहे. त्यांनी आपला असा खास वाचकवर्ग निर्माण केला आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, आनंद अंतरकर यांच्यासारख्या संपादक-लेखकांशी असलेले सख्य आणि सहवास आपणाला प्रेरक आणि लाभदायी ठरल्याचे म्हैसकर आवर्जून सांगतात.
मुळात म्हैसकर हे तसे रंगरेषांचे आणि शब्दांचे अभिजात किमयागार. अतिशय साधी सोपी शब्दकळा, मायमातीचा गंध ल्यालेली रंगांची भाषा आणि शब्दांचे रंग कवेत घेणारा हा अवलिया. मराठी साहित्यात रंगरेषा आणि शब्द ज्यांना सहज वश आहेत, असे लेखक-कवी एकूणच विरळा. त्यांपैकी व्यंकटेश माडगूळकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी, प्रकाश नारायण संत, वसंत आबाजी डहाके, वासंती मुझुमदार, अनिल डांगे आणि अलीकडचे मधुकर धर्मापुरीकर, शैला सायनाकर, अभिराम अंतरकर इत्यादी काही ठळक नावे. त्यांमध्ये म्हैसकरांचे स्थान विशेष उल्लेखनीय आहे.
‘रेषांतर’ या त्यांच्या नव्या पुस्तकात एकंदर ४५ रेखाटने आणि तितकीच एकपानी शब्दांकने आहेत. अवघे चराचर हे सारे तसे क्षणभंगूर. क्षणाक्षणाला क्षरणारे आणि दृष्टिपार होत जाणारे. परंतु असे काही क्षण समोर ठाकतात की, कलावंताला त्यांची मोहिनी पडते. ती क्षणचित्रे तो असोशीने रेखाटतो. आणि ते क्षण सर्वांगांनी बारीकसारीक तपशिलांसह साजिवंत होऊन जातात.
मग लक्षात येते की, अरे, जीवन हे नित्यनूतन आणि चिरंतन आहे. एका परीने कलावंतांची कलात्मक धनंतरताच! काळानेही थक्क व्हावे अशी. नेहमीच्या जीवनातले साधेसुधे अलक्षित प्रसंग, घटना, वस्तू, वास्तू, पाने-फुलो, प्राणी-पक्षी इत्यादी सगळे रेषांतून साकारते. पण रेषा तशा नि:शब्दच. गूढ मौनात विरघळलेल्या. तरीही त्या रेषा आपल्या डोळ्यांशी बोलतात. अर्थात रेषाचित्रांशी संवाद साधणारे डोळे प्रत्येकाकडे असतीलच असे नाही. असो.
अशा रेखाटनांतून किलबिलणारी म्हैसकरांची ही सुबक आणि बेतशीर अशी रेषाक्षरी कलात्मक लेणी. जाणत्या वाचकांना त्यांची भाषा ऐकू येते आणि तेही क्षणभर थबकतात रेषांच्या शब्दछायेत. आणि मग आपसूकच दर्शक आणि वाचक अशा दोघांपुढेही हलकेच उलगडत जाते एक रेषांगण आणि शब्दांगणही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
म्हैसकरांच्या रेषांची मोठी मौज अशी की, त्या ठळक, ठसठशीत अथवा बोल्ड वगैरे अजिबात नाहीत. त्या आहेत एकदम नाजूक, तुटक, अलवार आणि तशाच सकवार. अगदी हलक्या आबदार हाताने रेखलेल्या. दृश्यादृश्यतेच्या सीमेवर रेंगाळणाऱ्या. त्यामुळे त्यांचे आवाहनसुद्धा तसेच… अगदी अनाग्रही आणि अनाहत. डोळ्यांना इजा होण्याची कसलीच भीती नाही. त्यामध्ये दर्शक-वाचकांच्या अनुनयाचा लवलेशही नाही. पाहा आणि वाचा… जमले तर मनात मुरवा आणि अनुभवा… असा हा आतिथ्यशील मामला. रेषा कशा एकदम साध्या, मन:पूत आणि मनमोदकसुद्धा.
हे झाले रेषांचे रामायण. आता या रेषांना बोलते करणे, हे एक दुसरे आव्हान. तिथेही लेखकाने मिताक्षरी शैलीचा अवलंब केला आहे. नामे-सर्वनामे तेवढी ठळक आणि बाकीची विशेषणे-अव्यये वगैरेंचा बेताचा असा सरंजाम. एकदम नीटनेटका, नेमका आणि आटोपशीर. शब्दांचा अजिबात गलबला नाही. एक-एक शब्द मखरात बसवलेल्या देवावाणी पदसिद्धपणे स्थानबद्ध झालेला.
या पुस्तकातली काही उदाहरणे मोठी लक्षणीय आहेत :
“ती सहज बसली. माझ्या पुढ्यात, पाठमोरी. रुसली नव्हती. रागावली नव्हती. रागवायची कधीच नाही. झेलायची सगळं. स्वभावच तिचा क्षमाशील.” (पान सात)
आता, ही अशी सारी किमया रेषा आणि शब्दांमध्ये अद्वैताचा सेतू सहजच बांधताना दिसते. कोण कोणापेक्षा मोठे असरदार, वजनदार अथवा वफादार वगैरे असला काही कल्लोळ नाही. रेषा आणि शब्द यांच्यामध्ये सहोदरांसारखे सख्य आणि सामरस्य. जे सांगायचे-सुचवायचे ते पानाआडच्या कळीप्रमाणे. अगदी हळुवारपणे.
म्हैसकरांना साधलेली ही विलक्षण कलासिद्धी म्हणावी अशीच आहे. एका ठिकाणी (चित्रातील) ‘ती’ स्वत:शीच पुटपुटल्यागत बोलते, पण ते ऐकू येते आपल्याला :
“खरंच, माझ्यात आणि चित्रात काहीच अंतर नाहीय” (पान सात)
आता, हे दुसरं उदाहरण एका सोप्या रेखाटनाविषयीचे… पाहण्यासारखे आहे -
“पाठमोरी. म्हणून केवळ अंबाडा.
बाकी काही दिसत नसताना
आणि उठावरेषांचा अभाव असताना
ती कशी असेल?
ते मात्र दिसत होतं…
मला उमजलेलं सोपं चित्र हेच” (पान २६-२७)
असा हा एकूण नयनसुखद सोहळा – शब्द आणि रेषांचा.
सहज मनात येते की, हे डोळे असणाऱ्यांसाठी ठीक आहे. त्यांच्या डोळ्यांना ही कारागिरी भावणार, सुखावणार, आता-आत पाझरत जाणार. परंतु ज्यांना डोळे आहेत म्हणजे म्हणायलाच आहेत, त्यांना दिसत नाही. त्यांचे काय?
उगीचच वाटते की, अशी सुंदर पुस्तके ब्रेल लिपीतही जायला हवीत. मराठीतील निवडक ग़ज़लांचे असे एक पुस्तक ब्रेल लिपीत गेले आहे, ते आठवते – ‘स्पर्शांकुर’. (संपादक - डॉ. राम पंडित-भीमराव पांचाळे, प्रकाशन वर्ष २००६)
शेवटी, एक महत्त्वाची गोष्ट अशी की, इतक्या सर्वांगसुंदर पुस्तकाचा ‘स्पाईन’ चक्क कोरा आहे, याचे आश्चर्य वाटते. असो.
विद्याधर म्हैसकरांच्या ‘रेषांतर’ची ही गमभनची निर्मिती खूपच देखणी आहे, यात काही आणि कसलाच वाद नाही.
‘रेषांतर’ – विद्याधर म्हैसकर
गमभन प्रकाशन, पुणे | पाने – ९६ | मूल्य – १७० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment