मराठा जातीला मागास म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही, हे सर्वश्रुतच आहे; आणि ते आंदोलनकर्त्यांनाही माहीत आहे, पण…
पडघम - राज्यकारण
अर्जुन कोकाटे
  • महाराष्ट्राचा नकाशा आणि मनोज जरांगे मराठा आरक्षण मोर्च्यात बोलताना
  • Thu , 12 October 2023
  • पडघम राज्यकारण मनोज जरांगे Manoj Jarange मराठा समाज Maratha Samaj मराठा आरक्षण Maratha reservation

मराठा ही जात महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात टक्केवारीने अधिक आहे. या जातीचे मराठा, कुणबी व इतर, असे तीन वर्ग आहेत. अस्सल मराठा स्वतःला ‘क्षत्रिय’ मानतो. एके काळी राजे, सरदार, जमीनदार व लढवय्ये लोक यांचा या वर्गात समावेश होता. त्यांच्याकडे आजही गाव, प्रांतातील सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात आहे. कुणबी म्हणजे शेती करणाऱ्या मराठ्यांनाच ‘कूळवाडी’ असेही संबोधले जाते. तिसऱ्या वर्गात मात्र काही पोटजातींचा समावेश होतो. त्यात सुतार, लोहार, गवंडी, परीट, भंडारी, तेली, माळी, चित्रकथी, न्हावी इत्यादींची नावे घ्यावी लागतात. ९६ कुळी मराठा स्वतःला राजपूत वंशाचे मानतात.

गावागावांत बहुसंख्य असल्यामुळे वर्षानुवर्षे मराठा समाजाकडेच गाव-परिसरातील सर्व प्रकारच्या राजकीय सत्ता राहिलेल्या आहेत. शिवाय गावशिवारातील जमिनीचे क्षेत्रही त्यांच्याच सातबाऱ्यावर अधिक राहिलेले आहे. पाऊस-पाणी आणि शेतमालाला जेव्हा जेव्हा चांगला दर मिळाला किंवा जमिनीचा एखादा तुकडा त्याने विकला, तेव्हा तेव्हा या समाजाच्या पुरुषांनी अनेक प्रकारची व्यसने करत आपल्या वागण्याचा अतिरेक केलेला आहे. त्याच्या अनेक सुरस कथा मराठी सिनेमा-नाटकांमधून दाखवण्यात आलेल्या आहेत. मात्र मूठभर मराठ्यांच्या या विलासीपणाच्या इरसाल कथा खूप रंगवून दाखवल्या आहेत.

मराठा समाजाने पाटीलकीसारखी एकेकाळी सर्वंकष मानली गेलेली सत्ता यथेच्छ उपभोगली आहे. तथापि, गावातील एकूण मराठा जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचे प्रमाण किती, या प्रश्नाला बगल देत हा समाज बदनाम करण्याचे षडयंत्रही सर्वश्रुत आहे. अर्थात मराठा समाजाचे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रांत वर्षानुवर्षे राहिलेले वर्चस्व खुपलेल्या विशिष्ट लोकांचे हे जाणीवपूर्वक उद्योग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

राज्यातील बहुतेक गावांत मराठा समाज बहुसंख्याक असल्यामुळे, इतर जाती-जमातींवर या समाजाच्या निष्ठ-अनिष्ठ चालीरिती, रिवाज यांचा प्रभाव दिसतो. त्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या एकूणच सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनावर या समाजाचा मोठा आणि वेगळा ठसा आहे. त्यामुळेच राजकारणातही आपलेच वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गावपातळीपासून राज्य आणि केंद्र पातळीपर्यंत या समाजातील पुढारी आटापिटा करताना दिसत असतात.

गाव स्तरावर मराठा समाजाने पुढाकार घेऊन आजवर समस्त बहुजन समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत, हे खरे असले तरी १०० वर्षांपूर्वी असलेली या समाजाची स्थिती आणि आजची स्थिती, यात मोठे अंतर पडलेले आहे. आज या जातीतील एक वर्ग राजकीय आणि जमीनदारीमुळे शिक्षण घेऊन भक्कम झालेला आहे. अर्थात या जातीतील उच्च आणि मध्यमवर्गाची संख्याही तशी कमी नाही. हाल-अपेष्टा आहेत त्या भूमीहीन, अल्प व अत्यल्प भूधारक गरीब मराठ्यांच्या. शिवाय यातील बरेच जण कोरडवाहू जमिनीचे मालक असल्यामुळे धड ना शिक्षणात, धड ना राजकारणात अशी एकूण असहाय्य, असुरक्षित आणि बेभरवशाची स्थिती आहे.

सर्वच समाजापासून मराठा तुटला असल्यामुळे तो आतूनही तुटला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत गावा-गावांत ही संख्या वाढतच गेली आहे. त्यामुळे अशा कुटुंबातील तरुण पोरं काहीशी एकाकी पडली आहेत. गावात असलेल्या बारा-बलुतेदारांची मुलं गावं सोडून शहरांत गेली आणि आता शिक्षण घेऊन व विविध व्यवसायांचे कौशल्य शिकून त्यांच्यापेक्षा सुरक्षित झाली आहेत. शिवाय राजकारणात त्यांना मिळत असलेल्या आरक्षणामुळे हे लोक सामान्य मराठ्यापेक्षा पुढे गेलेले आहेत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गात विभागलेला मराठा समाज एक कसा असू शकतो? - व्ही. एल. एरंडे

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते... - विनोद शिरसाठ

मराठा आरक्षणाचा चकवा - रमेश जाधव

‘आरक्षण’वादी समाजांत कलह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्य सरकार अजून तरी या कोंडीतून मार्ग काढू शकलेलं नाही

..................................................................................................................................................................

त्यामुळे मराठा जातीतील तरुणांची अस्वस्थता वाढली आहे. त्याच्या जीवघेण्या एकाकीपणाचे उत्तर आता तो शोधू लागला आहे. आपल्या या स्थितीला कोण कारणीभूत आहे? असे का घडते आहे? या अशा प्रश्नांनी तो आता बिथरला आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळींवरील सर्वच निवडणुकांमध्ये गाव परिसरातील सधन मराठा पुढाऱ्यांनी त्याचा वापरच केला. त्यांना सत्ता मिळाली, पण ‘माझ्या हाती काय पडले?’ या प्रश्नाने जणू त्याला जाग आणली आहे. आता ‘कर नाही, तर मर’ अशी भूमिका घेतल्याशिवाय त्याच्याजवळ पर्यायच उरला नसल्याच्या अगतिक भूमिकेपर्यंत तो पोहोचला आहे.

त्यात प्रामुख्याने ज्या शेतीवर त्याची पिढ्या न् पिढ्या भिस्त होती, तिने या वर्षी महाराष्ट्रात सर्वत्र पडलेल्या अत्यल्प पावसामुळे दगा दिला आहे. या भयानक वास्तवात त्याला आपले जगणे अशक्य असल्याचे वाटू लागल्याने आरक्षणासाठी तो अधीर-आतुर झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसते आहे.

ही गोष्ट आजही खरी आहे की, मराठा समाजातील पुरुषांना इतर कशाहीपेक्षा राजकारणाचे व्यसन मोठे आहे. त्यांच्या या व्यसनाचे मूळ अर्थातच या जातीला लाभलेल्या सत्तेच्या परंपरेत आहे. ही गोष्ट कधीच लपून राहिलेली नाही, मात्र हेच व्यसन गेल्या काही वर्षांपासून या जातीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. गाव पातळीवरील छोट्या सत्तेपासून तर पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती\अध्यक्ष आमदार, खासदार आणि मंत्री होण्यासाठी या समाजाचे पुढारी वाटेल त्या थराला गेल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

आत्महत्या करणाऱ्यांत ९५ टक्क्यांवर मराठा शेतकरीच

गेल्या काही वर्षांपासून मात्र मंडल आयोग आणि महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आल्यामुळे राजकीयदृष्ट्या या समाजाला असुरक्षित वाटते आहे. वडिलोपार्जित जमिनीची सातत्याने वाटणी होत असून जमिनीचे तुकडे तुकडे होत आहेत. त्यामुळे त्याच्या उत्पन्नावरही मोठा परिणाम झाला आहे.

मराठा समाजात शिक्षणाचा टक्का जरूर वाढतो आहे. तरीही लोकसंख्येच्या तुलनेत तो तसा कमीच आहे. अक्षर ओळख नसलेल्या व अर्धशिक्षितांची संख्या आजही या समाजात मोठी आहे. त्यात जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था आणि खाजगीकरणाचा बुलडोझर इथल्या सर्व व्यवस्थेवर निरंकुशपणे फिरायला लागल्यापासून तर लक्षावधी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात ९५ टक्क्यांवर मराठा समाजातील शेतकऱ्यांचीच नावे आहेत.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गात विभागलेला मराठा समाज एक कसा असू शकतो? - व्ही. एल. एरंडे

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते... - विनोद शिरसाठ

मराठा आरक्षणाचा चकवा - रमेश जाधव

‘आरक्षण’वादी समाजांत कलह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्य सरकार अजून तरी या कोंडीतून मार्ग काढू शकलेलं नाही

..................................................................................................................................................................

त्याचे अनेक गंभीर परिणाम लक्षावधी कुटुंबावर झाले असून, अशा कुटुंबातील स्त्रिया आणि मुले अक्षरश: बेसहारा झाले आहेत. आत्महत्या केलेल्या कुटुंबांच्या वाट्याला अत्यंत हलाखीचे जीवन आले आहे. अशा कुटुंबातील तरुणांना आता आरक्षण हाच आधार वाटत असल्यामुळे, त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची मानसिकता बनली आहे.

त्या आरक्षणासाठी तब्बल १६ दिवस आमरण उपोषण करणारा मनोज जरांगे पाटील तसा फाटका तरुण आहे. तरीही तो उपोषणाला बसल्यावर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला, ही वस्तुस्थिती नजरआड करून चालणार नाही. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा तरुणांच्या हजारो तुकड्या आंतरवाली सराटी या गावाकडे झेपावल्या.

अवघ्या १६ दिवसांत मराठा आरक्षणाचा वणवा राज्यभर पेटल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष खडबडून जागे झाले. सरकार-प्रशासनाचेही लक्ष जरांगे पाटलांच्या उपोषणाकडे लागले होते. मात्र मराठा समाजाचे लोक कोण होते, याचा अभ्यास प्रसारमाध्यमे, समाजशास्त्रज्ञ, राजकीय पुढारी आणि प्रशासनाने का केला नाही? ज्यांना ‘आज लढलो नाही, तर उद्या संपून जाऊ’ ही भीती सातत्याने डाचत होती, तेच लोक या उपोषणात होते.

या मराठ्यांचा वापर करून आपल्याला फेकून देणाऱ्या आपल्याच ‘मराठा’ पुढाऱ्यांविरुद्ध राग होता, तरीही आपला लढा लोकशाहीच्या, शांततेच्या मार्गानेच लढला पाहिजे, ही जाण आणि आग्रह धरत जेव्हा एखादे आंदोलन पेटते, तेव्हा ते संबंधितांना समजावून घ्यावे लागते.

सुरुवातीला काही दिवस या उपोषणाकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. मात्र उपोषणाला पाठिंबा देणारी गर्दी पाहून माध्यमांना आणि सरकारला जाग आली. मात्र संवादच न करण्याच्या सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे वातावरण पेट घेण्याची शक्यता असल्याचे पोलीस आणि प्रशासनाने निदर्शनास आणून दिले. तेव्हा मात्र दोन-दोन मंत्री, आमदार, प्रशासकीय अधिकारी जरांगे पाटलांनी उपोषण सोडावे म्हणून विनवण्या करू लागले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठा समाज संयम सोडत नाही

या उपोषणाची अल्पावधीत इतकी व्याप्ती वाढली की, महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमधील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासाठी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निवेदने देण्यात आली. त्या वेळी निघालेल्या मोर्चामध्ये प्रामुख्याने सुशिक्षित बेरोजगार आणि शेती करू न शकणाऱ्या मराठा तरुणांचा प्रचंड संख्येने सहभाग होता. हे तरुण अनेकदा प्रक्षुब्ध भाषा बोलत असल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध झालेत, मात्र त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडेल असे कुठे वर्तन केल्याचे वाचनात व ऐकीवात नाही.

यावरून सरकार व व्यवस्थेविरुद्ध कितीही रोष असला तरी, मराठा समाज संयम सोडत नाही, असा अर्थ निघतो. सुमारे आठ-नऊ वर्षांपूर्वीही या समाजाने मुंबईपासून जवळपास सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर याच मागणीसाठी लाखोंचे मोर्चे काढले होते. त्या वेळी या मोर्चाच्या संयम आणि शांततेच्या सर्वच प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्या आजही अनेकांच्या स्मरणात असतील.

जरांगे पाटलांच्या १६ दिवसांच्या उपोषणात तर अनेक गावे आणि शहरांमधील मराठ्यांनी एकत्र येऊन आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायचे नाही, असा निर्धार केला. तथापि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रीमंडळानेदेखील काहीही करून जरागे पाटलांचे उपोषण सुटले पाहिजे, अशी व्यूहरचना केल्यामुळे १६व्या दिवशी मुख्यमंत्री जरांगे पाटलांना पटवण्यात यशस्वी झाले आणि त्यांनीही मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून उपोषण सोडले.

ज्या दिवशी हे उपोषण सुटले, त्या दिवशी नेमका बैलपोळा, शेतकऱ्यांसोबत शेतीत राबणाऱ्या बैलांच्या सन्मानाचा दिवस होता. त्या वेळी हजारो तरुण शेतकऱ्यांनी आपाल्या लाडक्या बैलांच्या पाठीवर ‘मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशी घोषणा लिहून आपल्या भावना किती तीव्र आहेत, हे दाखवून दिले... तर हजारो ग्रामपंचायतींनी ठराव करून, ‘जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, पुढाऱ्यांना गाव बंदी केल्याचे’ स्पष्ट निर्देश दिले.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गात विभागलेला मराठा समाज एक कसा असू शकतो? - व्ही. एल. एरंडे

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते... - विनोद शिरसाठ

मराठा आरक्षणाचा चकवा - रमेश जाधव

‘आरक्षण’वादी समाजांत कलह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्य सरकार अजून तरी या कोंडीतून मार्ग काढू शकलेलं नाही

..................................................................................................................................................................

त्याच वेळी आरक्षण लढ्याचा केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटी गावाबाबत काही धक्कादायक माहिती प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली होती. या गावाची लोकसंख्या ४५०० असून, त्यात ४० टक्के मराठा समाज आहे. १५ टक्के मराठा कुटुंबे भूमीहीन, तर ७० टक्के अल्प व अल्पभूधारक आहेत.

यावरून हे आंदोलन आता मराठा समाजातील गरीब, बेरोजगार आणि भूमिहीन ग्रामस्थांनी हाती घेतलेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या गावात २०० मराठा तरुण शिक्षण घेऊन ही बेरोजगार आहेत, तर त्यातील शंभरावर मुलांचे वय उलटूनही विवाह झालेले नाहीत. ही या गावाचीच नाही, तर महाराष्ट्रातील बहुसंख्य गावातील मराठा समाजाची व्यथा आणि कथा आहे.

महाराष्ट्रातील मराठा जात पिढ्या न् पिढ्या शेती करून स्वतः बरोबरच इतरांचेही पोषण करणारी आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांत आणि शेती व्यवसायाला सुलतानी व अस्मानी संघटनामुळे घरघर लागली आहे. त्यामुळे गावागावांतील मराठा समाजात तीव्र असुरक्षितेची भावना बळावली आहे. परिणामी त्यांचा रोष सत्तास्थानी असलेल्यांच्या विरुद्ध वाढत चालला आहे.

या एवढ्या मोठ्या संख्येला रोजगार, नोकरी, व्यवसायासाठी कर्ज वगैरे कोण उपलब्ध करून देणार? त्यांना कोण व कसा रोजगार उपलब्ध करून देणार? आणि तो देणार नसेल, तर हे लोक काय खाऊन जगणार?

आंदोलनात भिड्यांची उडी, सर्वानीच केली बेदखल!

या आंदोलनाच्या निमित्ताने, मराठा आरक्षणाबाबत थोडीशीही आस्था नसलेले काही लोक चमकोगिरी करण्याच्या हेतूने आणि मराठा समाजातील काही तथाकथित भटाळलेल्या नेत्यांच्या मर्जी खातर उपोषणस्थळी आले होते. आपले ‘पुतणा मावशीचे प्रेम’ त्यांनी दाखवले, तथापि आता मराठा समाजातील शिक्षण घेऊन तयार असलेल्या बऱ्याच तरुणांना नेमके आपले शत्रू कोण हे समजायला लागले आहे. आतातो आपले सर्व प्रकारचे शोषण करणाऱ्यांच्या हातात आपली जगण्याची सूत्रे देण्यास तयार नाही.

आणि म्हणूनच बहुजनांच्या प्रतीकांवर गेल्या काही वर्षांपासून वेळोवेळी बेताल टीका करणाऱ्या तथाकथित संभाजी भिडेला बेदखल करण्यात आल्याचे सर्वांनी पाहिले आहे. स्वतःला राजे (?) म्हणवून घेणाऱ्यांचीही उपोषणस्थळी फार दखल घेण्यात आली, अशी स्थिती नव्हती. तिकडे जरांगे पाटलांचे उपोषण सुरू असतानाच काही तथाकथित मराठा मंडळींनी राज्यात दौरा करून झंझावात करण्याचाही प्रयत्न सपशेल फसल्याचे दारुण चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ऊठ मराठ्या जागा हो.... मराठा आरक्षणाचा धागा हो...!

मराठा समाज राज्यातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, नाटक, सिनेमा या सारख्या माणसाला जगवणाऱ्या आणि जागवणाऱ्या क्षेत्रांबाबत कमालीचा अनभिज्ञ, नव्या व आधुनिक बदलांविषयी अत्यंत उदासीन, खोट्या प्रतिष्ठेच्या पाठीमागे धावणारा आहे. परिणामी त्याच्यात सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक नुकसानीची मोजदाद न करण्याची बेपर्वाईही आहे. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या अहंकाराची झालर, काळाबरोबर न चालण्याचा हेकटपणा आणि या सर्व असहाय्य अवस्थेला पारंपरिक आणि भटा-ब्राह्मणांच्या यज्ञयागाला बळी पडण्याच्या एकुणच भोळसट, परंतु अंधश्रद्धाळू स्वभावामुळे मराठा समाज मोठ्या गतीने खोल गर्तेत फसत गेला आहे. रितीरिवाज, व्रत-वैकल्य,कर्मकांडे आदि जोखड अंगावर वागवण्यातच भूषण वाटण्याच्या नादात घरातल्या स्त्रीला उंबऱ्याच्या बाहेर न पडू देण्याचा पुरुषी अहंकारही त्याच्या अवनतीला जबाबदार आहे.

तथापि या सर्व गोष्टींचे भान येत नसल्याने अनेक परिणामांना सामोरे जात त्याचा जीव मेटाकुटीला आला आहे. म्हणून ‘ऊठ मराठ्या जागा हो... आरक्षणाचा धागा हो...’ अशी आर्त हाक देऊन हजारो स्थानिक मराठा तरुणांनी या आंदोलनात आपला सक्रिय सहभाग नोंदवून गावागावातील मराठा समाजाला या आंदोलनात आणले होते. २०१४-१५च्या ‘मराठा मूक क्रांती मोर्चा’पेक्षाही गावागावात पोहोचलेली या आंदोलनाची ठिणगी वादळापूर्वीची शांतता ठरावी, अशीच एकूण स्थिती आहे.

आता पुढे काय?

जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यात सरकारला तात्पुरते यश आले असले, तरी मराठा समाजाच्या या अत्यंत ज्वलंत मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष किंवा चालढकल करण्याची हिंमत कोणत्याही सरकारला वारंवार करता येईल, असे वाटत नाही. कारण काही वर्षांपूर्वी निघालेल्या ‘एक मराठा, लाख मराठा’ क्रांती मोर्चाने मराठा आरक्षणाबरोबरच इतरही काही मागण्या केल्या होत्या. जरांगे पाटलांचे उपोषण मात्र केवळ आणि केवळ ‘मराठ्यांना कुठूनही द्या, पण आरक्षण द्या’ एवढ्या एकाच मागणीसाठी होते.

उपोषणस्थळी लक्षावधी लोक जमूनही ते शांततेला गालबोट लागणार नाही, याची दक्षता घेत होते. म्हणजे शांततेच्या मार्गाने जेव्हा लक्षावधी लोक एकत्र येऊन आपल्या मनातली खदखद व्यक्त करतात, तेव्हा त्यांना निदान लोकशाहीचा अर्थ कळला आहे, हे सिद्ध होते. पण ज्यांना लोकशाहीचा विचार आत्मसात करण्याची सवय लागलेली असते, तो समूह किंवा समाज प्रसंगी कायदाही हातात घेऊ शकतो. बेभरवशाची शेती आणि इतर कामासाठी सहकारी सोसायट्या, बँका आणि खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्तेसुद्धा भरण्याची क्षमता गमावून बसलेला शेतकरी - मराठा कुणाहीपेक्षा अधिक अस्वस्थ आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘शोषक’ आणि ‘शोषित’ अशा दोन वर्गात विभागलेला मराठा समाज एक कसा असू शकतो? - व्ही. एल. एरंडे

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते... - विनोद शिरसाठ

मराठा आरक्षणाचा चकवा - रमेश जाधव

‘आरक्षण’वादी समाजांत कलह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्य सरकार अजून तरी या कोंडीतून मार्ग काढू शकलेलं नाही

..................................................................................................................................................................

मराठा समाजासमोर आज अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झालेले दिसत असले, तरी ते एका दिवसात वा एका वर्षात निर्माण झालेले नाहीत. त्याला बऱ्याच वर्षांची पूर्वपीठिका आहे. पोटाला टाचे मारून मुलांना शिक्षण दिले, मात्र बेरोजगारीच्या संकटाने त्याला पुरते घेरले आहे. शिकलेल्या मुलाची अवस्था त्याला पाहवत नाही. ‘धड ना शेतीत, ना नोकरीत’ या वास्तवाने तो सैरभैर झाला आहे. त्याला वर्षानुवर्षे शोधूनही उत्तर सापडत नसले, तरी तो हिंसाचाराचा आधार न घेता अतिशय शांततेने आपली आरक्षणाची मागणी पुढे रेटू पाहतोय. ही गोष्ट दखलपत्र असली, तरी तिचा उद्रेक होणारच नाही, असे नाही.

ही गोष्ट खरे तर मराठ्यांचे ‘क्रांती मोर्चा’ निघाल्यानंतर राज्यकर्त्यांनी आणि त्यातही सत्तेत सहभागी असलेल्या विशेषत: मराठा आमदार, खासदार, मंत्री आणि आता मराठा मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होती.

बड्या मराठा पुढाऱ्यांचे हे नेहमीचेच...!

वर्षानुवर्षे महाराष्ट्र राज्याच्या आणि भारताच्या मंत्रीमंडळात महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या शरदराव पवार यांच्यापासून संभाजी महाराज भोसले यांच्यापर्यंत बड्या मराठा पुढाऱ्यांनी नेहमीसारखेच कोणत्याही उत्तरदायित्वाशिवाय अगदी सुरुवातीलाच जरांगे पाटलांची भेट घेऊन कानगोष्टी केल्या आणि ‘लढ’ असा आदेश दिल्याचे प्रसारमाध्यमांनी आवर्जून दाखवले. इतरही मराठा पुढाऱ्यांनी मग उपोषणस्थळी हजेरी लावून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. तथापि ही मंडळी जाऊन आल्यानंतर मराठा तरुणांनी सोशल मीडियावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया देऊन, आजपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटला नाही? हा आणि असे अनेक प्रश्न विचारून तीव्र नापसंती व्यक्त केली. केवळ सरकारी पक्षाला आणखी उपद्रव व्हावा, एवढ्या पुरत्याच या भेटी होत्या का? असे प्रश्न विचारायलाही ही तरुण मुलं विसरली नाहीत!

हे खरे आहे की, मराठा जातीला मागास जात म्हणून आरक्षण मिळणे अजिबातच शक्य नाही, हे सर्वश्रुतच आहे, तसेच ते आंदोलनकर्त्यांनाही माहीत आहे. त्यामुळेच ‘कसेही करून ते मिळावेच’ आणि ‘आम्ही मराठ्यांना आरक्षण दिल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही’, या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या घोषणांमध्ये नेहमीप्रमाणे दम नाही. फक्त जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे परिस्थिती चिघळू नये आणि आपली खुर्ची टिकावी, यासाठीच हा सर्व खटाटोप आहे.

तसे नसते, तर उपोषण सुटल्यानंतर गेल्या १५ दिवसांत महाराष्ट्र सरकारने असे काय प्रयत्न केले की, या सरकारविषयी मराठा तरुणांच्या मनात आत्मीयता निर्माण व्हावी? सरकारमध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत असलेली भूमिका स्पष्ट करावी आणि मुख्य म्हणजे या समाजाला उगीचच मधाचे बोट दाखवत झुलवत ठेवू नये!

‘आंदोलन – शाश्वत विकासासाठी’ या मासिकाच्या ऑक्टोबर २०२३च्या अंकातून साभार संपादित स्वरूपात

.................................................................................................................................................................

लेखक अर्जुन कोकाटे राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष आहेत.

arjunkokate123@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 14 October 2023

गाव स्तरावर मराठा समाजाने पुढाकार घेऊन आजवर समस्त बहुजन समाजाचे प्रश्न सोडवलेले आहेत, हे एक भरमसाट विधान आहे. सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक व्यावसायिक अशा कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवण्यात मराठा समाजाचे भरीव योगदान आहे. गावातले तंटे आणि हेवेदावे सोडवणे किंवा त्यात मध्यस्ती करणे म्हणजे प्रश्न सोडवणे नसते.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......