विजय जावंधिया : शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार
संकीर्ण - ललित
प्रवीण बर्दापूरकर
  • डावीकडून प्रवीण बर्दापूरकर, ‘महात्मा गांधी विद्यापीठा’चे कुलपती अंकुशराव कदम आणि विजय जावंधिया
  • Sat , 07 October 2023
  • संकीर्ण ललित विजय जावंधिया Vijay Jawandhiya शेतकरी चळवळ Farmer Movement शरद जोशी Sharad Joshi शेती Farming

ज्येष्ठ सहकारी असलेल्या प्रा. डॉ. आशा देशपांडे यांचा फोन आला की, शेतकरी नेते विजय जावंधिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. विजयची गळाभेट झाली. खूप वर्षांनी भेटलो. दोघांचाही गहिवर दाटून आला. बऱ्यापैकी गप्पा झाल्या. गिले-शिकवे झाले. मन भूतकाळात गेलं.

माझी आणि विजयची ओळख १९८०तली. महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ बहरात होती. त्यातला विदर्भातील एक धुरंधर विजय होता. तो वयानं ज्येष्ठ, पण लगेच आम्ही एकेरीवर आलो, कारण आमच्यात तसं अंतर फार नव्हतं. त्या काळात नागपुरातच नाही तर अन्य अनेक ठिकाणी आमच्या भेटी होत. नागपुरात त्याचं घर सीताबर्डीवरील मोदी गल्लीत होतं. घर कसलं मोठा वाडाच होता तो! विजयच्या आईच्या हाताला मस्त चव होती आणि त्या माऊलीच्या ती चाखण्याची संधी मला मिळालेली आहे.

त्या काळात विजयचं एक पाऊल नागपुरात आणि दुसरं देशात कुठेही. जिथे कुठे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, तिथे विजय हमखास सापडणार, हे म्हणजे अगदी ‘चुकला फकीर मशिदी’त तस्सं झालेलं होतं. उंच आणि काहीशी धिप्पाड शरीरयष्टी, रापलेला निमगोरा वर्ण, विस्तीर्ण भाल प्रदेश कारण डोईवर केसांचा बऱ्यापैकी दुष्काळ, डोळ्यांवर चष्मा, चष्म्याआडचे डोळे कायम उत्सुकतेनं चाळवलेले, अंगावर खादीचे कपडे, शर्टावर शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि खिशात एक पेन व काही कागद नक्की असणारच, पायात साध्याशा चपला....

पायी चालत असेल तर तो झपाझप चालणार अशा गतीने की, सोबत चालणाऱ्याची दमछाक व्हावी. त्या काळात अनेकदा विजय लुनावरून नागपुरात फिरत असे आणि ते दृश्य डोळ्यांचे पारणे फिटवणारे असे! आता वार्धक्याच्या खुणा चेहऱ्यावर दिसू लागलेल्या आहेत, बाकी विजय तेव्हा होता अगदी तस्साच आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विजयचा जन्म आणि शिक्षण नागपुरात झालं, पण मूळचा तो महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याचा परिमळ लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील वायफडच्या मालदार कुटुंबातला. मालदार म्हणजे भरपूर शेती असलेल्या घरातला. शेतीत लक्ष घातलं आणि विजयला शेतीची परवड लक्षात यायला वेळ लागला नाही. मग त्यानं त्याच्या स्वभावाला शोभणाऱ्या शैलीत केवळ शेतीच नाही, तर एकूणच शेतीसमस्येचा मूलभूत अभ्यास सुरू केला.

समतेचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या विजयला शेतकरी, शेतमजूर यांच्या विदारक स्थितीचं आकलन झालं. शेतीच्या सर्व पैलूंबाबत तो पारंगत झाला. शरद जोशी यांची ‘शेतकरी चळवळ’ विदर्भात पोहोचण्याआधीच तो या विषयावर बोलता आणि लिहिताही झाला. जोशी आणि त्यांच्या ‘शेतकरी चळवळी’च्या संपर्कात आल्यावर त्याच्या बोलण्याला धार आली.

शेतीशी संबंधित प्रश्नांवर विजय टोकदार झाला. त्याच्या वक्तृत्वाला विलक्षण समंजस अशी ऐट आहे. अतिशय संयत पण वास्तवाचा पाया असलेल्या बोचऱ्या शैलीत तो मांडणी करतो. वाचन भरपूर असल्यानं रूपकं, कविता असे अनेक दाखले देत, तो असं काही बोलतो की, समोरचे मंत्रमुग्ध होतात. विजय काळजाचा ठाव घेतो आणि त्याच्या प्रतिपादनाशी ऐकणारे सहमत होतात.

हे केवळ मराठीबाबतच घडतं असं नाही, तर हिंदी आणि इंग्रजीतही तो तेवढाच प्रभावी ठरतो. विजयनं लिहिलेली प्रसिद्धीपत्रकंही मुद्देसूद; कोणताही फापटपसारा नसतो. अक्षर देखणं नसलं तरी सुवाच्य. त्याच्या अक्षरांना एक वेगळंच वळण. पत्रकांच्या भाऊगर्दीतही ते वळण लगेच लक्षात येत असे; व्याकरणाशी मात्र सलगी नसे!

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच!

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

शरद पवार विरुद्ध शरद पवार...

..................................................................................................................................................................

विजयचा निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचा आणि वेगळी मत स्पष्टपणे मांडण्याचा स्वभाव शरद जोशी यांना फारसा रुचत नसल्याचं जाणवत असे, पण प्रश्न विचारणं आणि स्पष्ट मतं मांडणं, ही विजयची खासीयतच होती. ‘शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी सर्वेसर्वा’ असा तो काळ होता. (तेव्हा जोशी यांना आम्ही काही पत्रकार खाजगीत ‘बिग ब्रदर’ म्हणत असू; याचा संदर्भ जॉर्ज ऑरवेलच्या ‘ऑल टाइम ग्रेट’ असलेल्या ‘1984’ या कादंबरीशी होता.) तरीही बाकी सर्व गुणांमुळे विजय जोशींच्या गळ्यातला ताईत बनला नसता, तरच नवल होतं. इतका लाडका ताईत की, शरद जोशी यांचा उत्तराधिकारी विजयकडे म्हणून बघितलं जाण्याचे  दिवस आले. विजयकडे संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची सूत्रे आली. 

देशात ठिकठिकाणी विजय शेतकरी संघटनेतर्फे संबोधित करू लागला. तेव्हा लाखांच्या गर्दीत झालेल्या त्याच्या सभा अजूनही आठवतात. त्याचा वावर राष्ट्रीय होण्याचा तो काळ होता. ते सर्व संपर्क विजयनं अजूनही कायम राखले आहेत. मात्र वावर राष्ट्रीय होऊनही नागपुरात आला की, ‘डाऊन टू अर्थ’ अकृत्रिम मैत्रीचा प्रत्यय विजयकडून येत असे. आम्हा मित्रांत असणारा त्याचा वावर ‘अहं’पासून कोसो दूर असायचा.

आज प्रथमच लिहितो आहे, शरद जोशी यांच्या सर्वच भूमिका विजयला पटणं शक्य नव्हतं आणि कधी तरी तो त्यांच्यापासून विभक्त होण्याची वेळ येणार यांचा अंदाज आलेला होता. ‘राजकारणात कधीच येणार नाही’, ‘निवडणूक लढवणार नाहीच’ (यातील ‘च’ महत्त्वाचा; एक पत्रकार म्हणून मीही तो अनेकदा ऐकलेला आहे) असं एकीकडे जोशी ठासून सांगत आणि दुसरीकडे उजव्या विचाराच्या राजकारण्यांशी सलगी साधत असल्याची सुरू झालेली कुजबूज हळूहळू वाढतच गेली. (पुढे तर जोशी याच उजव्यांच्या सहकार्यानं कृषी विषयक राष्ट्रीय समितीवर गेले, राज्यसभेवर नियुक्त झाले.)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जोशी यांच्यापासून बंडखोरी करण्याचा निर्णय विजयने अखेर घेतलाच. तेव्हा तो फारच धाडसी होता, कारण जो जोशी यांच्यापासून दुरावला तो संपला, असं समजलं जाण्याइतका जोशींचा करिष्मा गडद होता. मात्र दुरावल्यावरही त्यांच्या धोरणाच्या संदर्भात विजय मत प्रदर्शन करत असे; जोशी यांचा अवमान होईल असा शब्द विजयच्या तोंडून (अगदी खाजगीतही) बाहेर पडला असल्याचं किमान मला तरी आठवत नाही आणि तो सर्वांचाच अनुभव असणार, याची खात्री आहे. विजयच्या अंगी असणारा हा सुसंस्कृतपणा विलक्षण भावणारा आहे, यात शंकाच नाही.

मात्र शेतकऱ्यांच्याप्रती असणाऱ्या संवेदनापासून विजयने मुळीच फारकत घेतली नाही. त्याच्या जगण्याचा श्वास आणि नि:श्वास शेतकरी आणि शेतमजूर आहे, त्यांचे प्रश्न विजयचा रक्तगट आहे आणि त्यांना सन्मानानं जगण्याचा समतेचा हक्क मिळावा हेच त्याचं स्वप्न आहे.

तो आणि नंतरचा काही काळ विलक्षण घुसमटीचा होता, प्रवादांचा होता आणि प्रश्नांच्या भोवऱ्यातही गुंतवणारा कसा होता, हे ठाऊक असणाऱ्यात मी एक आहे. ते सर्व ताकदीनं सहन करून, प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मशाल हाती घेऊन चालण्याची विजयची एकांडी शिलेदारी विविध व्यासपीठांवरून आजही सुरू आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

अस्वस्थतेच्या ज्वालामुखीवर महाराष्ट्र…

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – मोदी म्हणजे भाजपच!

लोकसभा निवडणुकीची खडाखडी – ‘इंडिया’

शरद पवार विरुद्ध शरद पवार...

..................................................................................................................................................................

शेतीची दुरावस्था, कोसळलेलं अर्थकारण, शेतीचं समाजकारण, कडेलोट झालेलं भावजीवन याविषयी मग सातत्यानं बोलत राहिला. त्याच्या मांडणीची दखल पंतप्रधानांसह सर्वच राज्यकर्ते गंभीरपणे घेऊ लागले. एकदा तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विजयच्या वर्धा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावी गेले. त्याचं शेतीबद्दलचं म्हणणं त्यांनी तब्बल तासभर ऐकून घेतलं. अशी मान्यता मिळूनही विजय उतला नाही, मातला नाही. त्याचे पाय जमिनीवरच घट्ट राहिले.

विजय आणि माझे या सर्वापलीकडे जाऊन मैत्रीचे बंध आहेत. ते रेशमी आहेत, त्यांना भावनेची किनार आहे. माझी बेगम मंगलाच्या मृत्यूनंतर त्याचा फोन आला, पण आम्ही दोघंही काहीच बोललो नाही, इतके ते बंध गहिरे आहेत, पण ते असो.

विजय जावंधिया नावाच्या एकांड्या शिलेदार मित्राचा मला सार्थ अभिमान आहे... हे समाधान अपरंपार आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......