हैदराबाद-दक्खनमधील हिंदू-मुसलमान द्वंद्वाला छेद देणारा जातीय राजकारणाचा इतिहास
पडघम - सांस्कृतिक
स्वाती शिवानंद
  • गुलबर्ग्यातल्या विद्याधर गुरुजींच्या घराच्या भिंतीवरील काही महत्त्वाच्या पुढाऱ्यांची छायाचित्रं, २०१७ (छायाचित्र - स्वाती शिवानंद)
  • Mon , 02 October 2023
  • पडघम सांस्कृतिक खिडकी कलेक्टिव्ह Khidki Collective हैदराबाद संस्थान Hyderabad State निज़ाम Nizam मुक्तिसंग्राम रझाकार Razakar हिंदू Hindu Muslim मुसलमान हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन Hyderabad Mukti Sangram Din

‘खिडकी कलेक्टिव्ह’ (Khidki Collective) हा इतिहास, राजकारण आणि संस्कृती यांवरच्या सार्वजनिक चर्चेला प्रोत्साहन देणाऱ्या युवा इतिहासकारांचा एक संच\ग्रूप आहे. दख्खनचा बहुभाषिक-बहुधर्मीय इतिहास, संस्कृती आणि साधनं जपणं, हा त्यांचा उद्देश आहे. त्यांची सध्या हैदराबाद मुक्ती संग्राम आणि १९४८च्या पोलीस अ‍ॅक्शनवरील ‘एकच कथानक असल्याचे धोके’ ही मालिका ‘newsminute’ या इंग्रजी पोर्टलवर प्रकाशित होत आहे. ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या स्वाती शिवानंद, यामिनी कृष्ण आणि प्रमोद मंदाडे यांनी हे लेख एकत्र आणले आहेत. ही मालिका कन्नड, उर्दू, तेलुगूमध्येही प्रकाशित होत आहे. आजपासून ती ‘अक्षरनामा’वर प्रकाशित होईल.

ही मालिका १९४८च्या पोलीस कारवाईबद्दल विविध पर्यायी दृष्टीकोन मांडण्याचे काम करते. हैदराबाद संस्थानाच्या ‘मुक्तीसंग्रामा’च्या स्वरूपातल्या प्रभावी मांडणीचा सध्याच्या द्वेषयुक्त राजकारणासाठी वापर होतो आहे. ही मालिका या ढोबळ मांडणीला आव्हान देऊन, या घटनेतील गुंतागुंत उलगडण्याचे काम करते.

या मालिकेतला हा पहिला लेख...

.................................................................................................................................................................

हिंदू-मुसलमान द्वंद्वाने भारताच्या राजकारणाला गेली शंभर वर्षे तरी ग्रासले आहे. पण अलीकडे जातव्यवस्था केंद्रित संशोधनामुळे सांप्रदायिक संघर्षांनी साचलेल्या या राजकीय वर्तुळाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन उपलब्ध झाला आहे. सांप्रदायिक चौकटीपलीकडे जाऊन इतिहास आणि राजकारण समजून घेण्याची ही संधी आहे.

जुन्या हैदराबाद-दक्खन संस्थानाचा इतिहास आजही ‘हिंदूंचे शोषण करणारे सामंतशाही, इस्लामी राज्य’ अशा मांडणीतच अडकला आहे. या संदर्भात तत्कालीन जातीय घडामोडींचा दृष्टीकोन, विशेषकरून आर्य समाजाच्या जातकेंद्रित सुधारणांचा इतिहास, या साचेबद्ध मांडणीला छेद देणारा आहे. सध्या राजकारण्यांवर ‘रज़ाकार’ (निमलष्करी स्वयंसेवकांचं पथक) असल्याचे, रज़ाकारांना साहाय्य केल्याचे आरोप करून, आणि १७ सप्टेंबरला ‘हैदराबाद मुक्तीदिन’ म्हणून साजरा करून, आपल्या समाजात आग्रहाने सांप्रदायिक तंटे वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत. या परिस्थितीत हिंदू-मुसलमान द्वंद्वाची ही मांडणी तपासून पाहणे गरजेचे झाले आहे. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आर्य समाजाचा संक्षिप्त इतिहास

हिंदू आणि मुसलमान हे जातीय, वर्गीय किंवा प्रादेशिक पातळीवर कोणतीही विषमता नसलेले एकसंघ आणि सनातन, पण एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न असे समाज आहेत; हे हैदराबादच्या, आणि भारताच्यादेखील, इतिहासाच्या सर्वसाधारण मांडणीत गृहीत धरलेले असते. लोकांच्या दैनंदिन जीवनाच्या अनुभवांतून आणि सामाजिक शास्त्रांच्या चौकटीतून झालेल्या चिकित्सक अभ्यासातून ही मांडणी ढोबळ आणि सरसकट आहे, हे स्पष्ट होत असले, तरी त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. तरीही या ‘शोषित’ आणि एकसंघ हिंदू समाजाच्या कल्पनेचा हैदराबाद-दक्खनमध्ये इतका प्रसार कसा झाला, ते पाहूया.

हैदराबाद संस्थानात आणि बाहेर या मांडणीला आणि प्रसाराला जबाबदार होता आर्य समाज. “तब्लीघ आणि मुसलमानांनी इतर उघड किंवा गुप्त संस्थांद्वारे चालवलेल्या धर्मांतराच्या प्रचारावर तो रामबाण उपाय आहे,” अशी आर्य समाजाच्या कार्याची प्रशंसा माधव श्रीहरी अणे या आघाडीच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी केली. या संघटनेचे सुरुवातीचे उपक्रम जातीव्यवस्थेच्या सुधारणांवर, विशेषकरून कनिष्ठ जातींवर केंद्रित होते. पण हैदराबाद-दक्खन संस्थानात तिच्या सामाजिक आणि राजकीय धोरणाचा अर्थ लावण्यासाठी तिचे व्यापक विचारविश्व समजून घ्यायला हवे. त्यासाठी संस्थानाबाहेरच्या तिच्या इतिहासाचा आढावा घेऊया.

१८७२मध्ये देशभर जनगणनेची सुरुवात झाल्यावर आर्य समाजाने ‘शुद्धी मोहिमे’चा पाया घातला, हे गुजरातमधल्या आर्य समाजाच्या अभ्यासातून इतिहासकार डेविड हार्डिमन यांनी सिद्ध केले आहे. कालांतराने धर्मांतरामुळे आपल्या धर्माला धोका आहे, ही कल्पना सर्वसाधारण हिंदू विचारविश्वात घर करून बसली. आर्य समाजाची ‘शुद्धी चळवळ’ मुळात ख्रिस्ती धर्मप्रसाराविरुद्ध होती, पण ‘आक्रमक’ मुसलमान व्यक्तींबद्दल संशय हादेखील त्याच्या विचारचौकटीचा महत्त्वाचा भाग होता.

इतिहासकार केनेथ जोन्स यांच्या संशोधनानुसार, पंजाबमध्ये ‘शुद्ध’ करून घेतलेले बहुतेक लोक मुसलमान होते. यामुळे आर्य समाजाच्या कार्यकर्त्यांचे मन मुसलमानांविरुद्ध प्रवृत्त झाले, आणि सांप्रदायिक संबंध अधिकच बिघडले. त्यातील पंडित लेखराम यांच्या नेतृत्वाखाली असलेला एक प्रवाह तीव्र इस्लाम-विरोधी असून, भारतात इस्लामचा प्रसार ‘नरसंहार आणि विध्वंसाची रक्तरंजित’ होता, अशी त्यांची मांडणी होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आर्य समाजाचे मुख्य समर्थक आणि त्याला आर्थिक बळ पुरवणारे ब्राह्मण व बनिया समाजाचे असले, तरी समाजाच्या कामाच्या आवाक्यात कनिष्ठ आणि दलित समाजही आले. त्यांनाही विधींद्वारे ‘शुद्ध’ करून घेण्यात येई. हैदराबाद-दक्खनमध्ये अशा प्रचारामुळे अधिकाधिक कनिष्ठ जातींतले लोक स्वत:ची ओळख ‘हिंदू’ समाजाचे घटक म्हणून देऊ लागले. आर्य समाजाशी आलेल्या संपर्कामुळे आपल्या आयुष्याला कलाटणी मिळालेल्यांपैकी विद्याधर गुरुजी एक होते.

एका आर्य समाजी कार्यकर्त्याची कहाणी

कर्नाटक राज्याच्या ‘हैदराबाद-कर्नाटक’ भागात विद्याधर गुरुजी स्वातंत्र्य-सैनिक म्हणून प्रसिद्ध आहेत. या भागातल्या ‘स्वातंत्र्यलढ्या’च्या प्रादेशिक आणि स्थानिक इतिहासात त्यांचा उल्लेख हमखास असतो. २०१७मध्ये मी त्यांची मुलाखत घेतली, तेव्हा ते १०४ वर्षांचे होते. त्यांना ऐकायलाही कमी येत होतं. तरीही त्यांच्या सुरुवातीच्या आणि ‘स्वातंत्र्यलढ्यात’ल्या सहभागाच्या आठवणी स्पष्ट आणि तपशीलवार होत्या.

गुरुजींचे पाळण्यातले नाव भिक्षाप्पा. भटक्या आर्य समाजी कार्यकर्त्याशी एका मित्राने गाठ घालून दिल्यावर त्यांचा समाजाशी संपर्क आला. तोपर्यंत गुरुजींना धर्माविषयी विशेष आकर्षण नव्हते. भगवे कपडे धारण केलेल्या स्वामींबद्दल तर त्यांच्या मनात थोडा संशयच होता. ते म्हणाले, “ ‘मी चांगला विद्यार्थी असून धोबी समाजाचा आहे’, अशी स्वामी रामजींशी मित्राने माझी ओळख करून दिली. स्वामी म्हणाले ‘धोबी म्हणू नकोस, तो वसिष्ठ कुलाचा पुत्र आहे. ये कपडे नहीं धोएगा, ये आदमियों को धोएगा’. यामुळे माझ्यात मोठे परिवर्तन घडून आले. मी सर्व मंत्र आणि हवन वगैरे शिकू लागलो. चाळीतल्या सर्व मुलांना गोळा करून त्यांना मंत्र शिकवू लागलो. लोकांना लिहायला-वाचायला शिकवले.”

आर्य समाजात दीक्षा घेतल्यावर मिळू शकणाऱ्या नवीन सामाजिक प्रतिष्ठेचे कनिष्ठ जातींतल्या युवकांना मोठे आकर्षण होते. त्यात शिरलेल्या ब्राह्मणेतर प्रथांमुळे पंजाबात जाट समाजातल्या लोकांना आर्य समाजाचे आकर्षण वाटू लागले. त्यांच्यापैकी अनेकांनी क्षत्रीय दर्जा पत्करला, हे प्रख्यात इतिहासकार नोनिका दत्ता यांनी मांडले आहे.

वसिष्ट कुलाचा वंशज म्हणून मान्यता मिळवून जातेव्यवस्थेच्या उतरंडीत प्रतिष्ठा मिळाल्यामुळे गुरुजींनीही स्वत:ला सामाजिक उद्योगांमध्ये लोटून दिले. त्यांनी आर्य समाजाची दीक्षा घेतली, ते जानवे घालू लागले आणि पुन्हा बारसे करून घेऊन भिक्षप्पाचे विद्याधर बनले. नाव बदलणे हासुद्धा प्रतिष्ठा मिळवण्याचा मार्ग होता. पुढे आर्य समाजाचे कार्यकर्ता झाल्यावर गुरुजी फिरतीवर भेटलेल्या अनेकांची नावे बदलण्याला प्राधान्य घेत.

विद्याधर गुरुजी गुलबर्ग्यातल्या आपल्या घरी, २०१७ (छायाचित्र - स्वाती शिवानंद)

सुरुवातीच्या दिवसांत गुरुजी अस्पृश्यता निवारण, मंदिर प्रवेश आणि सहभोजनाचा प्रचार करत. पण १९३०च्या दशकात आर्य समाजाने बळजबरीने केलेल्या धर्मांतराचा मुद्दा उत्तरेतल्या प्रदेशांप्रमाणेच हैदराबाद-दक्खनमध्येही उचलून धरला गेला. मग गुरुजींनी त्यांच्या प्रचारात या मुद्द्याचाही समावेश केला. इस्लामी संस्थान बळजबरीच्या धर्मांतराला प्रोत्साहन देत आहे, म्हणून लोकांना सजग करण्यासाठी ते गावागावांत फिरू लागले.

ते म्हणाले, “आम्ही निष्पाप हिंदूंकडे जाऊन त्यांना सतर्क करून मुसलमान होण्यापासून त्यांचे रक्षण करत असू. त्यांना गायत्री मंत्र शिकवत असू. कुठेही हिंदूंचे धर्मांतर झाल्यास त्यांना पुन्हा ‘हिंदू’ करवून घेत असू.”

बहादुर यार जंग यांच्या नेतृत्वाखालच्या मज्लिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आणि दलितांचे पुढारी बी. श्यामसुंदर यांच्यातली जवळीक ही आर्य समाजाकरता चिंतेचे कारण होती. ते लोकांना धमकावून, लाच देऊन, त्यांच्यावर दडपण आणून त्यांचे धर्मांतर करत असल्याचे गुरुजींचे आरोप होते. “हे हरिजन या आधी किरकोळ गुन्हेगार होते; आता मुसलमान झाल्यावर त्यांना राजाश्रय मिळाला. गुन्हा केला तरी पोलीस काहीही करत नसत. त्यांनी गुन्हेगारीतून पुष्कळ पैसा कमवला होता,” असेही गुरुजी म्हणाले.

दीनदार चन्नबसवेश्वर सिद्दिकी यांनी स्थापन केलेला संप्रदायदेखील आर्य समाजासाठी काळजीचे कारण बनला होता. सिद्दिकी हे लिंगायत आणि मुसलमानांतील साम्यावर भर देत असत. “या इसमाने छातीवर त्रिशूल गोंदवून घेतली होती. तो स्वत:ला ‘चन्नबसवेश्वरा’चा अवतार म्हणवून घेत असे. त्याचे शिष्य बसवेश्वराची वचने म्हणत. सर्व लिंगायत मंडळी, खासकरून त्यांच्या निष्पाप बायका, या शिष्यांकडे भक्तीभावाने पाहून त्यांना आपले गुरू मानू लागली. पण उच्च-जातीय लिंगायतांना इस्लाम धर्मात आणण्याचा हा कट होता. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत कनिष्ठ स्तरावरच्या लोकांचे धर्मांतर करणे, त्यांना कठीण नव्हते. पण उच्च-जातीय लोकांचेदेखील धर्मांतर करून घ्यायची ही त्यांची पद्धत होती,” गुरुजी.

अजून एका कारणामुळे आर्य समाजाला दीनदार संप्रदाय धोक्याचा वाटणे साहजिक होते. हिंदू आणि इस्लाम हे दोन्ही संप्रदाय एकाच भक्तीपंथात एकत्र येऊ शकतात, असा त्याचा दावा होता. हा दावा दोन्ही धर्मांच्या संपूर्ण, अखंड भिन्नतेवर आणि शुद्धीवर बेतलेल्या आर्य समाजाच्या मुख्य भूमिकेची घडी विस्कटणारा होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पोलीस कारवाई

ब्राह्मणी जातव्यवस्थेत प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन म्हणून सुरू झालेल्या उद्योगाने १९४०च्या दशकात गुरुजींसारख्या व्यक्तींना इस्लामी संस्थानाविरुद्ध ‘हिंदू व्यवस्थेचा बचाव करणारे सैनिक’ करून सोडले. १९४०च्या दशकाच्या सुरुवातीला गुरुजींच्या नावाने वॉरंट निघाल्यामुळे त्यांना हैदराबाद सोडावे लागले. सोलापूर हे शहर हैदराबाद संस्थानाच्या सीमेपलीकडे असलेल्या मुंबई इलाख्यात होते. तिथे ते निज़ामाच्या राज्याच्या मालमत्तेवर हल्ला करणाऱ्या एका अनौपचारिक सैन्यात सहभागी झाले. तिथल्या स्थानिक कलेक्टरांकडून आणि वजनदार व्यापाऱ्यांकडून त्यांना द्रव्य आणि आश्रय मिळत होता. हल्ले-प्रतिहल्ले जसे वाढत गेले, तसा सुरक्षा आणि सुव्यवस्था कोलमडल्याच्या मांडणीला आधार मिळत गेला. त्याच्या जोरावर स्वतंत्र भारत राष्ट्राने पोलीस कारवाईच्या नावाखाली हैदराबादला आपल्या खिशात टाकले.

आर्य समाज ‘हिंदूंची पिळवणूक करणारे सांप्रदायकवादी इस्लामी राज्य’ म्हणून १९३० आणि १९४०च्या दशकांमध्ये हैदराबाद-दक्खन संस्थानाची प्रतिमा तयार करणाऱ्या अनेक संस्थांपैकी एक होते. या समाजाचे हैदराबाद राज्य काँग्रेस आणि हिंदू महासभा या पक्षांशी निकटचे संबंध होते. ‘आसफजाही’ राज्याविरुद्ध असलेल्या विरोधाने या तिघांना एकत्र आणले होते. पण या संस्थांच्या निव्वळ राजकारणावर लक्ष केंद्रित केले, तर त्यांनी केलेल्या सामाजिक संघटनेची नीट कल्पना येत नाही.

आर्य समाजात गुरुजींची सुरुवात सामाजिक प्रतिष्ठेच्या आशेने झाली असली आणि त्यात ते उत्साहाने सहभागी झाले असले, तरी इतर अनेकांप्रमाणे हैदराबाद-दक्खन संस्थान खालसा झाल्यावर ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेले. यातून हैदराबादमधल्या हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक काँग्रेस यांच्यातल्या जवळिकीचादेखील उलगडा होतो.

विस्मरणाचे राजकारण

आजही हैदराबाद येथील मुसलमानांच्या झालेल्या कथित हिंदूंच्या शोषणाची मांडणी प्रभावी आहे, त्याचे कारण आहे विविध राजकीय गटांमधले त्याबद्दलचे एकमत. पण मौखिक इतिहासात अशा प्रबळ एकवाक्यतेला छेद देण्याची क्षमता असते. मी गुरुजींना पोलीस कारवाईच्या दरम्यान आणि नंतर, मुसलमानांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराबद्दल विचारले, तेव्हा ‘तो घडला’, हे त्यांनी लगेच कबूल केले. ते म्हणाले, “हिंदूंना त्यांनी जे भोगलं, त्याचा बदला घ्यायचा होता. मला हे बरोबर वाटले नाही. लष्करी कारवाईनंतर मी सहा महिने सोलापुरातच राहिलो. बाहेरून कोणी पुढारी आला की, जल्लोषाचे जुलूस, मोर्चे निघायचे. तेव्हा हे सर्व गुंड मुसलमानांना लुटायचे. म्हणूनच मी लगेच परत आलो नाही. ही कुप्रसिद्धी मला नको होती.”

गुरुजींच्या या आठवणी सर्वसाधारण ऐतिहासिक स्मृतीचा भाग का झाल्या नाहीत? राज्य आणि जिल्ह्याच्या गॅझेटियरांमध्ये पोलीस कारवाईच्या नंतर झालेल्या हिंसाचाराचा काहीच उल्लेख नाही. उलट, आर्य समाज आणि त्याच्या कार्यकर्त्यांना स्वातंत्र-सैनिक म्हणून गौरवले जाते. विस्मरणाच्या या राजकारणात केवळ मुसलमानांविरुद्ध झालेल्या हिंसाचाराचाच इतिहास नव्हे, तर एका संस्थानी राज्याचा बिमोड करण्यासाठी एक सरसकट, एकसंघ हिंदू आघाडी कशी तयार केली गेली, याचा इतिहासही पुसून टाकला जात आहे.

.................................................................................................................................................................

मूळ इंग्रजी लेखासाठी पहा -

https://www.thenewsminute.com/telangana/how-caste-politics-in-hyderabad-deccan-unsettles-the-hindu-muslim-binary

.................................................................................................................................................................

अनुवाद - प्राची देशपांडे

लेखिका स्वाती शिवानंद मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एजुकेशन येथे शिक्षिका आहेत. ‘खिडकी कलेक्टिव्ह’च्या त्या संस्थापक सदस्य आहेत.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......