अजूनकाही
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे वेदानुयायी होते. त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्यावर श्रौत-स्मार्त धर्माचे प्रगाढ संस्कार होते. त्या अर्थाने ते ‘सनातनी हिंदू’ होते. त्यांनी केलेल्या हिंदू धर्माच्या व्याखेत ‘प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु’ हा घटक महत्त्वाचा होता. हिंदू धर्माचे ग्रंथ म्हणून वेदादी श्रुती, ‘भगवद्गीता’, स्मृतीग्रंथ आदी वाङ्मय त्यांना महत्त्वाचे वाटत असे. त्यांची जीवनदृष्टी याच ग्रंथांनी, विशेषतः ‘गीता’ या ग्रंथाने घडवली होती. संत साहित्याविषयी त्यांनी विशेष आस्था प्रकट केल्याचे दिसत नाही.
महात्मा मोहनदार करमचंद गांधीही स्वतःला ‘सनातनी हिंदू’च म्हणवत होते. तरी त्यांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानावर वैष्णव संप्रदाय, भगवान महावीर, भगवान बुद्ध, संत मंडळी आणि ‘गीता’ यांचा विशेष प्रभाव असल्याचे दिसून येते. त्यामुळे गांधींना समजावून घेताना संतसाहित्याची आणि जैन-बुद्ध तत्त्वज्ञानाची चांगलीच मदत होऊ शकते.
लोकमान्य आणि महात्मा यांच्या या पार्श्वभूमीचा त्यांच्यावर आणि त्यांच्या एकंदर भूमिकेवर प्रभाव पडणे अत्यंत स्वाभाविक होते. त्यांच्यातील साम्य-भेद समजून घेण्यासाठीही या पार्श्वभूमीचा चांगलाच उपयोग होतो. टिळक आणि गांधी यांच्या जीवनविषयक आणि राजकीय दृष्टीकोनात त्यामुळेच वेगळेपण दिसून येते.
दोघांनीही स्वराज्याच्या संग्रामात अहिंसेचा धोरण म्हणून स्वीकार केला. परंतु लोकमान्य टिळकांनी अहिंसेचा स्वीकार प्राप्त परिस्थितीची मर्यादा म्हणून केला. इंग्रजी सामर्थ्यापुढे भारतीयांचा टिकाव लागणार नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यामुळे राजकीय धोरण म्हणून अहिंसेचा स्वीकार करण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी मान्य केलेले होते. अन्यथा ‘शठं प्रति शाठ्यं’ अर्थात दुष्टांशी दुष्टत्वाचाच व्यवहार करावा, हेच त्यांचे तत्त्वज्ञान होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधींनी मात्र अहिंसा ही जीवननिष्ठा म्हणून स्वीकृत केली होती. म्हणूनच त्यांच्या अहिंसास्वीकृतीत कोणताही डावपेच किंवा मजबुरी नव्हती. वैष्णव संप्रदायाची पार्श्वभूमी, जैन आणि इतर संत यांच्या प्रगाढ संस्काराचा हा परिणाम असणे स्वाभाविक आहे.
लोकमान्य हे प्रखर बुद्धिमत्ता असणारे व्यक्तित्व होते. ही बुद्धिमत्ता आणि सातत्याने केलेले अध्ययन यांच्यामुळे ते त्या काळातील गाढे विद्वान होते. त्यांच्या परखड आणि तर्कशुद्ध युक्तिवादापुढे भले भले विद्वान परास्त होत असत. ब्रिटिशांच्या अन्यायकारी धोरणांची ते आपल्या बुद्धिरूपी खड्गाने चिरफाड करत असत. त्यांची बुद्धी आणि ज्ञान यांच्या साह्याने त्यांनी केलेले राजकीय प्रश्नांचे विश्लेषण ‘अजेय’ ठरत असे.
महात्मा गांधी मात्र लोकमान्यांच्या तुलनेत तेवढे बुद्धिमान आणि विद्वान मानले जात नव्हते. ज्ञानापेक्षा आणि विद्वत्तापूर्ण युक्तीवादांपेक्षा संतांचे प्रेम आणि भावगर्भताच त्यांच्या ठिकाणी व्यक्त होत असे. १९०८ सालच्या खटल्याच्या वेळी लोकमान्य टिळकांनी स्वसमर्थनार्थ २१ तास दहा मिनिटांचा बुद्धिमत्तापूर्ण युक्तिवाद केला होता.
महात्मा गांधींनी मात्र त्यांच्या विरुद्धच्या तशाच खटल्याच्या वेळी अर्थात १९२२मध्ये कोणताही युक्तिवाद न करता त्यांना दिलेल्या शिक्षेचे स्वागतच केले होते. ही घटना त्यांच्या जीवननिष्ठेमधील फरकाचे द्योतक आहे, हे स्पष्ट आहे.
महात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या विद्वत्ता आणि बुद्धीमुळे नव्हे, तर त्यांच्या हृदयातील कारुण्यामुळेच त्यांची नाळ सर्वसामान्य गरीब, शोषित, पीडित भारतीयांशी जुळून आली. बुद्धीपेक्षा अंतःप्रेरणा त्यांना अधिक महत्त्वाची वाटत असे. कित्येकदा त्यांच्या निर्णयांचा अर्थ बुद्धीच्या साह्याने लावता येत नसे. परंतु त्या निर्णयाचा परिणाम प्रभावी ठरत असे. मिठाच्या सत्याग्रहाचा निर्णय हा तसाच एक निर्णय होता.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
लोकमान्यांना स्वातंत्र्य चळवळीत लोकांच्या सहभागाचे महत्त्व पहिल्या प्रथम जाणवले. त्यासाठी त्यांनी प्रथम ‘मराठा’ आणि त्यानंतर ‘केसरी’ या वृत्तपत्रांचा अत्यंत प्रभावी वापर केला. त्यासाठी त्यांनी माहिती आणि युक्तीवादपूर्ण भाषणांचाही सपाटा लावून दिला. ब्रिटिशांविरुद्ध लोकांचे निर्विवाद सहकार्य मिळवण्यासाठी त्यांनी वादग्रस्त विषय टाळण्याचा प्रयत्न केला. ते रूढार्थाने धार्मिक नसले, तरी त्यांनी धार्मिक कट्टरता, रूढी यांना विरोध केला नाही. उलट त्यांनी या कट्टर लोकांच्या बाजूनेच राहण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच त्यांनी समाजसुधारणेच्या चळवळींना कायम विरोध केला.
लोकमान्यांची ही नकारात्मक बाजू खेदकारक आहे, यात शंका नाही. कदाचित रुधिग्रस्त आणि धर्मप्रभावित लोकांना सुधारणेच्या बाबतीत त्यांच्यासोबत राहिल्याशिवाय स्वराज्याच्या चळवळीत आणता येणार नाहीत, असे त्यांना वाटले असावे. काहीही असो, ते शेवटपर्यंत समाजसुधारणेच्या विरोधातच राहिल्याचे दिसून येते. म्हणूनच त्यांचा समाजसुधारणाविरोधी दृष्टीकोन समर्थनीय मानता येणार नाही.
महात्मा गांधी यांच्यावरही हिंदू धर्माचा प्रभाव होताच. तेही स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत असत. प्रारंभी त्यांनी चातुर्वर्ण्याचेही समर्थनही केले होते. परंतु त्यांनी धर्म, अध्यात्म आणि चातुर्वर्ण्य यांचे स्वतःचे उदारमतवादी अर्थ लावले होते. त्यात कट्टरतेला कोणतेही स्थान नव्हते. जातीभेद, अस्पृश्यता, रूढी यांचा त्यांनी विरोधच केला. चातुर्वर्ण्याचे समर्थन करण्यापासून आंतरजातीय विवाहाच्या आग्रहापर्यंत ते पोचले ते यामुळेच. जन्माधारित प्रतिष्ठा नाकारून त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. स्त्रियांचा सार्वजनिक क्षेत्रातील सहभाग घडवून आणण्याचे त्यांचे कार्य क्रांतिकारकच होते, यात शंका नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंदू धर्माचे अनुयायी राहूनही अस्पृश्य, स्त्रिया यांना प्रतिष्ठित करण्याच्या कामात ते सदैव पुढे होते. या अर्थाने त्यांचा हिंदूधर्म हा लोकमान्यांच्या हिंदू धर्मापेक्षा भिन्न राहिला आहे. लोकमान्यांनी चळवळीत सर्वसामान्यांना सामील करून घेण्याचा प्रयत्न केला, हे खरे आहे. पण महात्मा गांधी हे या क्षेत्रात त्यांच्या कित्येक योजने पुढे गेले, हेही तितकेच खरे आहे. त्यांनी या चळवळीत सर्वसामान्यांचं नव्हे, तर दलित, पीडित, गरीब शेतकरी आणि स्त्रिया यांनाही सोबत घेण्यात जे यश मिळवले, ते अभूतपूर्व असेच होते.
लोकमान्य टिळक विद्वान आणि बुद्धिमान होतेच. पण तत्त्वज्ञ होते काय, यावर निर्विवादपणे सांगणे कठीण आहे. बुद्धिमान व्यक्ती ही तिने प्राप्त केलेल्या ज्ञानाचे बारकाईने आणि सखोल विश्लेषण करू शकते. आपल्या प्रभावी युक्तिवादाने समोरच्याला निष्प्रभ करून टाकू शकते. लोकमान्य तसे होते, हे निश्चित. पण तत्त्वज्ञ हे चिकित्सेपेक्षा नवीन ज्ञानाची निर्मिती करतात. लोकमान्यांनी अशा नवीन ज्ञानाची निर्मिती केली किंवा नाही, यावर वाद होऊ शकतात. भगवद्गीतेवर त्यांनी भाष्य केले. गीतेचा नव्या युगाला उपयुक्त असा कर्मपर अर्थ लावला. पण तो गीतेला अनुसरूनच होता. पूर्वाचार्यांपेक्षा तो वेगळा आणि आधुनिक काळाला सुयोग्य असला, तरी अभिनव असल्याचे वाटत नाही.
महात्मा गांधींनी सत्याचे, अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे नवीन तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी लोकमान्य टिळकाप्रमाणेच गीतेचा कर्मपर असाच अर्थ लावताना अनासक्तियोगाचे महत्त्व विशेषत्वाने प्रतिपादित केले. त्यांचे वाङ्मय वाचताना कोणत्याही विषयावरील त्यांची मते समजावून घेताना साध्या साध्या गोष्टींत अभिनव दर्शनाचा प्रत्यय येत राहतो. परिचित विषय, संज्ञा, विचार यांच्यातील अगदीच वेगळ्या पैलूंचे दर्शन गांधी घडवून आणतात. आपण सहृदयपणे आणि पूर्वग्ररहित दृष्टीने पाहिल्यास आपल्याला गांधींच्या विचारसृष्टीचे अचूक दर्शन होते.
हेही खरे की, संपूर्ण मानवी जीवनाला त्याच्या विविध अंगांनी सामावून घेणारा समावेशक विचारव्यूह मात्र त्यांना मांडता आला नाही. प्रसंगोपात त्यांच्या विचारातून आपल्याला त्यांचे दर्शन घ्यावे लागते. पण गांधींनी चिकित्सा, युक्तिवाद यांचा आश्रय न घेता आपल्या भावगर्भ चिंतनातून, अनुभवातून आणि प्रत्यक्ष प्रयोगातून सत्य, अहिंसा आणि प्रेमाचे नवीन जीवनदर्शन मांडले, यात शंका नाही.
महात्मा गांधी यांनी आपल्या विचार आणि कार्यातून केवळ देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यातच योगदान दिले नाही, तर एकंदर वैश्विक मानवतेच्या उत्थानात महत्त्वाची भूमिका पार पाडली.
.................................................................................................................................................................
लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.
harihar.sarang@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment