‘रा.नां.’ना त्यांच्या हयातीत पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही, हे आपल्या समाजाच्या करंटेपणाचे द्योतक आहे
ग्रंथनामा - झलक
सदानंद मोरे
  • ‘विसाव्या शतकातील मराठा समाज’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 27 September 2023
  • ग्रंथनामा झलक विसाव्या शतकातील मराठा समाज Visavya Shatkatil Maratha Samaj मराठा समाज Maratha Samaj रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

‘विसाव्या शतकातील मराठा समाज’ हे रा. ना. चव्हाण यांचे पुस्तक नुकतेच त्यांचे चिरंजीव रमेश चव्हाण यांनी संपादित करून प्रकाशित केले आहे. गेली काही वर्षं निष्ठेने आपल्या वडिलांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करणाऱ्या रमेश चव्हाण यांनी प्रकाशित व संपादित केलेले हे रा.नां.चे ४५वे पुस्तक आहे. या पुस्तकाला महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे अभ्यासक-विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी लिहिलेली ही एक प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रात धर्माच्या पायावर सुरू झालेल्या सर्वांगीण प्रबोधनाची सांगता विसाव्या शतकाच्या मध्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराने झाली, असे इतिहासाचा वरवर अभ्यास करता दिसते. परंतु थोडा खोल विचार केला, तर ती परंपरा त्याच्याही पुढे सुरू ठेवणारा अखेरचा शिलेदार सापडण्यास अडचण येऊ नये. वाई येथील प्रार्थना - ब्राह्मोसमाजाचे अध्वर्यु रा. ना. चव्हाण हे ते शिलेदार होत.

दादोबा पांडुरंग तर्खड ते रा. ना. चव्हाण हा महाराष्ट्रातील धर्मचिंतनाचा आणि तदनुषंगाने सामाजिक व राजकीय चळवळींचा इतिहास अजूनही समर्थ अभ्यासकाच्या प्रतीक्षेत आहे. शहाजी प्रतापसिंह महाराज, जोतीराव फुले, न्या. रानडे, डॉ. भांडारकर, वामन आबाजी मोडक, लोकहितवादी देशमुख, न्या. चंदावरकर, विठ्ठल रामजी शिंदे, द्वारकानाथ वैद्य, डॉ. आंबेडकर ही या क्षेत्रातील परिवर्तनवादी मंडळी म्हणता येतील.

चिपळूणकर-टिळक यांच्या मुख्य प्रवाहातील प्रभावी परंपरेने या मंडळींकडे तुच्छतेनेच पाहिले. परंतु धर्मचिंतनाच्या मुख्य प्रवाहातच केवलानंद सरस्वती, महादेवशास्त्री दिवेकर, तर्कतीर्थ जोशी, भाऊजी दप्तरी हा धर्मनिर्णय मंडळाचा उपप्रवाह निर्माण झाला. इतकेच नव्हे तर या घुसळणीमुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुमहासभा (सावरकरांची) हे राजकारणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडून घेतलेले अनुक्रमे सनातनी व सुधारकी उपप्रवाहही निर्माण झाले.

तिकडे करवीर छत्रपती शाहू महाराजांनी फुल्यांच्या धार्मिक सामाजिक विचारधारेला राजकीय कलाटणी देऊन चिपळूणकर-टिळक परंपरेला काटशह दिला. मतामतांच्या या गलबल्यात आपली समचित्तता व स्थितप्रज्ञता शाबूत ठेवून धार्मिक, सामाजिक आणि राजकीय, या तिन्ही क्षेत्रांत अभिनिवेशाच्या आहारी न जाता आणि भावनेच्या भरीस न पडता या सर्वांच्या आचारविचारांची तटस्थपणे विद्वत्ताप्रचुर समीक्षा करत समाजाला मार्गदर्शन करणारे एकटे विठ्ठल रामजी शिंदेच होते. विठ्ठल रामजींची परंपरा चालवणारे रा. ना. हे शेवटचे शिलेदार होते हे जसे खरे आहे, तसेच दुर्दैवाने त्यांना एकांडे शिलेदार म्हणून वावरावे लागले, हेही खरेच आहे.

अर्थात रा.ना. एकांडे असले तरी एकांगी नव्हते आणि ते एकांगी नव्हते, याचे कारण आपले गुरू महर्षी शिंदे यांच्याप्रमाणे समाजजीवनाच्या अंगोपांगांकडे समग्रतावादी जैविक दृष्टीकोनातून पाहण्याची त्यांना सवय झाली होती. धार्मिक जीवन हा पाया मानून शिंदे समाजाची सामाजिक, राजकीय व आर्थिक समीक्षा करत, त्यानुसार उचित अशा चळवळी करत व चळवळींना मार्गदर्शनही करत राहिले. गुरुवर्य शिंद्यांचा हा वारसा रा.नां.नी यथामती व यथाशक्ती पुढे नेला. अर्थात स्वातंत्र्य व सत्ता मिळाल्यामुळे समाजच एकांगी झाल्याने ‘रा.नां.’ना त्यांच्या हयातीत पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही, हे रा.नां.चे अपयश नसून आपल्या समाजाच्या करंटेपणाचे द्योतक आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रा.नां.चे विचारधन समाजापुढे ठेवण्याचे कार्य त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी हाती घेऊन एका बाजूला ते रा.नां.चे ऋण फेडत आहेत व दुसऱ्या बाजूला समाजाला ऋणाईत करून ठेवीत आहेत, असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. प्रस्तुतचा लेखसंग्रह हा त्यांच्या व्यापक प्रकाशन प्रकल्पाचाच एक भाग आहे.

रा.नां.नी मराठा समाजाबद्दल वेळोवेळी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. ‘रा.नां.’नी मराठा जातिबांधवांविषयी लिहिणे, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. याबाबतीत त्यांचे आदर्श व स्फूर्तिस्थान अर्थातच कर्मवीर वि. रा. शिंदे हेच आहेत आणि त्यांच्याच विचारांचा त्यांनी कालानुरूप विस्तार केलेला आहे.

भारतीय समाज हा जातिबद्ध समाज आहे, हे वास्तव कोणाला रुचो वा न रुचो, ज्याला या समाजातील कोणत्याही क्षेत्रात काहीतरी काम करायचे आहे, त्याला या वास्तवाची योग्य ती दखल घेऊनच वाटचाल करावी लागते. जातीचा मुद्दा जितका तात्त्विक असेल तितका असो, तो खूपसा व्यावहारिक आहे आणि लोकव्यवहारात वावरणाऱ्याला तो डावलून चालत नाही.

स्वतः विठ्ठलराव शिंदे जातीने मराठा होते व त्यामुळे ब्राह्मणेतरही होते. ज्या धार्मिक वर्तुळात ते प्रविष्ट झाले ते वर्तुळ प्रार्थनासमाजाचे होते. त्यांची धार्मिक-आध्यात्मिक प्रेरणा ही आंतरिक आणि अस्सल होती. प्रार्थनासमाजाचे अनुयायी साधारणत: अभिजनवर्गातील असले तरी जातिव्यवस्था न मानणारे असल्यामुळे शिंद्यांना त्यांच्या वर्तुळात मानाचे उच्च स्थान मिळू शकले.

पण शिंदे एकांगी नसल्यामुळे ब्राह्मोप्रार्थना समाजाचा उपदेशक, प्रचारक वा त्याच्या मुखपत्राचा संपादक एवढ्या मर्यादित भूमिकेत समाधानी राहणे शक्यच नव्हते.

दादोबांच्या ज्या एकेश्वरी परमहंस सभेच्या अवशेषांतून प्रार्थना समाज निघाला, त्याच अवशेषांतून महात्मा जोतीराव फुले यांचा ‘सत्यशोधक समाज’ही निघाला होता. परंतु त्यांच्यात संवादाचा अभाव होता. किंबहुना फुले आणि त्यांच्या सत्यशोधक अनुयायांना प्रार्थनासमाजाच्या उच्चभ्रूबद्दल अविश्वास वाटत होता. मूळ परमहंस सभेतील जातिविरोधी कडवी भूमिका प्रार्थनासमाजाने काही व्यावहारिक कारणामुळे कोमट केली होती. ते जोतीबांना आवडले नाही.

दुसरे असे की, प्रार्थना समाजाचे धुरीण तत्त्वतः जातिव्यवस्थेच्या विरोधात असले, तरी ते स्वतः बहुधा उच्चवर्णीय असल्यामुळे, त्यानुसार काही कृती करण्याची त्यांना निकड नव्हती. जोतीरावांचे तसे नव्हते. त्यांना व त्यांच्या शूद्र जातिबांधवांना जातिव्यवस्थेचे व ब्राह्मणी वर्चस्वाचे प्रत्यक्ष चटके बसत होते. त्यामुळे त्यांचा संशय अनाठायी होता, असे म्हणता येत नाही.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

गरिबांना सरसकट आरक्षण देऊन त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा घटनाकारांचा उद्देश नव्हता. मग सगळ्या समस्यांना आरक्षण हा पर्याय कसा असू शकतो?

मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, मराठा समाजात जी प्रचंड गरिबी निर्माण झालेली आहे, ती कशी दूर करता येईल?

मराठा आरक्षण : मृगजळ आणि आग्यामोहोळ

मराठा आरक्षणाचा चकवा

मराठा आरक्षण आणि सत्ताधारी व विरोधकांचे आपापल्या सोयीचे राजकारण!

मराठा आरक्षणाचा पेच सोडवणार तरी कसा? त्यावर आजघडीला तरी कुठलाही ठाम पर्याय दिसत नाही…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘आरक्षण’ या विषयावर आपली भूमिका खऱ्या अर्थाने ‘रॅशनल’ आहे, असे आम्हाला वाटते, पण ते ‘अरण्यरुदन’ ठरते आहे...

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते...

आंदोलने, मोर्चे यांचे जातीयकरण आणि त्याचे (भयावह) दुष्परिणाम

..................................................................................................................................................................

शिंदे व्यवस्थेच्या दृष्टीने फुल्यांचेच सहप्रवासी असल्यामुळे त्यांना हे समजू शकले आणि त्यांनी प्रार्थनासमाजाला जातिविरोधी व अस्पृश्यताविरोधी कृतिकार्यक्रम देण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमात त्यांना चंदावरकरांसारख्या प्रार्थोंनी सक्रिय पाठिंबा दिला, हे मान्य करायलाच हवे आणि तरीही पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यात शिंदेच आघाडीवर राहिले, हेही विसरता कामा नये. ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ ही शिंद्यांनी स्थापन केलेली संस्था भारतातील अस्पृश्यतानिवारण चळवळीची गंगोत्री आहे, हा इतिहास कोणीही पुसू शकत नाही.

मिशनच्या माध्यमातून शिंद्यांचे कार्य जोमाने चालू असतानाच इकडे शाहू छत्रपतींच्या आश्रयामुळे व धोरणामुळे सत्यशोधक समाजाला एक राजकीय वळण मिळून त्याने ब्राह्मणेतर पक्षाचे रूप धारण केले. फुल्यांच्या काळात सत्यशोधक चळवळीपासून काहीसा फटकून असलेला मराठा समाज शाहू छत्रपतींच्या प्रेरणेमुळे ब्राह्मणेतर चळवळीत नुसताच सक्रिय नव्हे, तर अग्रेसर झाला. राजकीय सत्तेचे महत्त्व जाणणारे शिंदे या घडामोडींपासून स्वतःला अलिप्त ठेवणे शक्य नव्हते. परंतु मराठ्यांमध्ये निर्माण झालेली जागृती केवळ एखाद्या जातीच्या विरुद्ध राजकारण करण्यापुरती मर्यादित न राहता मराठ्यांनी एकूणच देशव्यापी राजकारणाचे धुरीणत्व शिरावर घेण्याचे आपले ऐतिहासिक उत्तरदायित्व निभावले पाहिजे असे त्यांना वाटले व प्रचलित प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत धरून त्यांनी लोकमान्य टिळकांच्या ब्रिटिश साम्राज्यशाहीविरुद्ध लढ्यात मराठ्यांनी सामील व्हावे, यासाठी राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना केली.

तेव्हाच्या स्वराज्याच्या राष्ट्रवादी चळवळीत ब्राह्मणांचे वर्चस्व असले आणि बहुजनसमाज त्याला बिचकत असला तरी एकदा तो जर या चळवळीत आला, तर बहुसंख्येच्या बळावर ही चळवळ ताब्यात घ्यायला त्याला उशीर लागणार नाही, हे हेरणारा दूरदृष्टीचा एकमेव नेता म्हणजे शिंदे. अर्थात शाहू छत्रपतीसारखे जबरदस्त प्रतिस्पर्धी असल्यामुळे शिंदे तेव्हा एकाकी पडले. परंतु अवघ्या एकच दशकात शिंदे आपली भूमिका मराठ्यांच्या गळी उतरविण्यात यशस्वी ठरले आणि गांधीयुगातील अनुकुलता पाहून केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली हा समाज काँग्रेसमध्ये प्रविष्ट झाला, शिंद्यांच्या अंदाजाप्रमाणे तो आणखी दोन दशकांनी सत्ताधारीही बनला.

मराठ्यांना असा उपदेश करण्यामागची शिंद्यांची भूमिका सत्तालोलुप राजकारण्याची नसून, सत्ता मिळवणाऱ्या आणि ती समत्वबुद्धीने राबवणाऱ्या एका ऐतिहासिक कर्तबगार जातीचे राजकीय पुर्नवसन करण्याची होती. ही सत्ता स्वत:च्या स्वार्थासाठी वापरण्याऐवजी शिवकालाप्रमाणे एकूण समाजाचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी पत्करून कर्तव्य बुद्धीने राबवण्याची शिंद्यांची शिकवण होती. इतिहासाला धरून मराठा समाजाला राष्ट्रीय व जागतिक करण्याचे त्यांचे धोरण होते व त्यासाठी त्यांना या समाजाचे व्यापक प्रबोधनही करायचे होते. त्याला सुबुद्ध आणि सुसंस्कृत बनवायचे होते. त्यासाठी प्रसंगी त्यांनी प्रार्थना समाजातील आपल्या राजकीय नेमस्त धर्मबांधवांपासून तर सत्यशोधक-ब्राह्मणेतर पक्षातील राजनिष्ठ जातिबांधवांपर्यंत कोणाच्याही रोषाला जुमानले नाही.

राष्ट्रीय चळवळीच्या ज्या सर्वश्रेष्ठ नेत्याच्या मागे मराठ्यांचे बळ उभे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्या लोकमान्य टिळकांच्या आपल्याच अनुयायांपुढे नमते घेऊन सामाजिक क्षेत्रात मागे राहण्याच्या प्रवृत्तीचाही समाचार घेत त्यांना परिपूर्ण पुढारी म्हणून मान्यता देण्याचे नाकारले. फार काय डॉ. आंबेडकरांनी गांधींवर टिकास्त्र सोडण्याच्याही आधी त्यांनी गांधींना अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे योग्य ते भान दिले व त्याविषयी ते पुरेसे क्रियाशील नाहीत, याविषयी दोष द्यायलाही मागेपुढे पाहिले नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अस्पृश्यांच्या प्रश्नाविषयीचे विठ्ठल रामजींचे कार्य फारच महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी पुरेशा प्रगल्भ नसलेल्या आपल्याच ज्ञातिबांधवांकडून होणारी कुचेष्टा सहन केलीच, पण ज्यांच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाल्या त्यांनीही त्यांची उपेक्षाच केली. चौकोनी चिरा किंवा अष्टपैलू हिरा म्हणता येईल, असा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव पूर्ण पुरुष होता. पण त्यांचे कार्य नेमके ग्रीक पुराणकथेतील सिसिफससारखे; अशक्यप्राय असे होते.

शिंदे एका कालखंडाचे व एका समाजाचे नायक (हिरो) असले तरी ते शोकात्म हिरो आहेत आणि त्यांची शोकांतिका ही एक मर्यादेपर्यंत त्यांच्या स्वत:च्या समाजाची म्हणजे मराठा जातीची शोकांतिका आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाणांसाठी बहुजनसमाजाच्या सत्तेचा आणि डॉ. आंबेडकरांसाठी अस्पृश्योद्धाराचा पाया रचला. पण पायाच्या दगडांप्रमाणे नेमके तेच विस्मृतीत गेले.

विठ्ठल रामजींचे जे महत्त्व तेच महत्त्व त्यांचे शिष्योत्तम रा. ना. चव्हाण यांचे. शिंद्यांप्रमाणेच रा.नां.चीही पिंडप्रकृती अस्सल धार्मिक. त्यामुळे आयुष्यभर त्यांनीही शिंद्यांप्रमाणे ब्राह्मो प्रार्थना समाजाच्या उपासना चालवल्या. परंतु शिंद्यांच्याच तालमीत तयार झाल्यामुळे त्यांच्यावरील महात्मा फुल्यांचे संस्कारही अबाधित राहिले आणि मुख्य म्हणजे गुरुस्थानी असलेल्या शिंद्यांच्याच आदेशावरून ते जिव्हाळ्याच्या आणि आस्थेच्या विविध विषयांवर शिंद्यांप्रमाणेच लिहित राहिले. त्यांच्या लिखाणाचा आधार घेतल्याशिवाय कोणालाही महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचा अन्वयार्थ लावता येणार नाही. त्यांनी केलेल्या लेखनाची वर्गवारी करून त्याचे काही खंड चव्हाण कुटुंबीयांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेले आहेत. प्रस्तुतचा खंड म्हणजे रा.नां.नी मराठे आणि त्यांच्या संघटनांविषयी लिहिलेल्या लेखांचे संकलन. मराठ्यांबद्दल लिहिण्याची त्यांची भूमिका वि. रा. शिंदेंच्या भूमिकेसारखी असणार हे वेगळे सांगायची जरुरी नाही.

रा.नां.चे हे लिखाण तीन टप्प्यातील आहे आणि तिन्ही टप्प्यांचा संबंध ‘जागृति’शी आहे. १९१७ साली ब्रिटिश सरकारने भारताला राजकीय सुधारणांचा पुढील हप्ता देण्यासाठी माँटेग्यू आणि चेम्सफर्ड यांची समिती नेमली. त्याचा एक परिणाम म्हणून ब्राह्मणेत्तरांमध्ये व विशेषतः मराठ्यांमध्ये राजकीय जागृती होऊ लागली. भास्करराव जाधव सारखे मराठ्यांचे जीर्ण मतवादी नेते या बदलाला अनुकूल नव्हते. कारण राजकीय सुधारणांचा शेलका माल ब्राह्मणच बळकावतील, अशी त्यांची भीती होती.

याउलट टिळक पक्षातील लोक अशा सुधारणांसाठी आसुसलेले होते. शिंद्यांनी या कामात मराठ्यांची शक्ती टिळकांच्या मागे उभी करायचे ठरवले व राष्ट्रीय मराठा संघ काढला. हा संघ शाहू छत्रपतींच्या प्रेरणेतून निघालेल्या ‘मराठा लीग’च्या अगदी विरोधी मताचा होता. शिंद्यांच्या मताचा प्रसार करण्यासाठी शिंद्यांचे बडोदे येथील अनुयायी भगवंतराव पाळेकर यांनी ‘जागृति’ नावाचे साप्ताहिक सुरू केले व बरेच दिवस म्हणजे स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालवले.

त्यानंतर मुंबई आणि कोकण येथील काही मंडळींनी ‘मराठा जागृति’ नावाचे मासिक चालवले व ते पन्नासच्या दशकात चांगले चालले. भगवंतराव पाळेकरांच्या ‘जागृति’मधील अग्रलेखांचे संपादन मी डॉ. बाबा आढाव यांच्या महात्मा फुले समता प्रतिष्ठानसाठी करून त्याचा ग्रंथ प्रकाशित केला. ‘जागृति’कार पाळेकरांनी म. कृ. साळवी या सत्यशोधकाच्या ‘रामदास भक्तांचे अश्लाघ्य प्रयत्न’ या पुस्तिकेला लिहिलेली प्रस्तावना मी शालेय वयातच वाचली होती. साळवी माझे वडील श्रीधरअण्णा यांचे स्नेही व सहकारी असून आमच्या देहू गावी राहत. पुस्तिका लिहिताना त्यांना अण्णांचे साहाय्यही झाले होते. दुसऱ्या ‘मराठा जागृति’चे वडिलांच्या संग्रही असलेले काही अंकही मी वाचले होते. त्यात प्रबोधनकार ठाकरेही लिहायचे. रा. नां.चे लेख त्यात असत. मला तेव्हा त्यातील आशय समजणे अवघड होते. नंतरच्या काळात खुद्द रा.नां.चाच परिचय झाला व त्यांच्याशी चर्चेचे खूप योग आले, हा भाग वेगळा.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

गरिबांना सरसकट आरक्षण देऊन त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा घटनाकारांचा उद्देश नव्हता. मग सगळ्या समस्यांना आरक्षण हा पर्याय कसा असू शकतो?

मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, मराठा समाजात जी प्रचंड गरिबी निर्माण झालेली आहे, ती कशी दूर करता येईल?

मराठा आरक्षण : मृगजळ आणि आग्यामोहोळ

मराठा आरक्षणाचा चकवा

मराठा आरक्षण आणि सत्ताधारी व विरोधकांचे आपापल्या सोयीचे राजकारण!

मराठा आरक्षणाचा पेच सोडवणार तरी कसा? त्यावर आजघडीला तरी कुठलाही ठाम पर्याय दिसत नाही…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘आरक्षण’ या विषयावर आपली भूमिका खऱ्या अर्थाने ‘रॅशनल’ आहे, असे आम्हाला वाटते, पण ते ‘अरण्यरुदन’ ठरते आहे...

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते...

आंदोलने, मोर्चे यांचे जातीयकरण आणि त्याचे (भयावह) दुष्परिणाम

..................................................................................................................................................................

साठच्या दरम्यान ‘मराठा जागृति’ बंद पडल्यानंतर तो वेगळ्या स्वरूपात सत्तरनंतर मराठा महासंघाच्या मंडळींनी सुरू केला. रा.नां.चे मराठ्यांबद्दलचे लिखाण ‘मराठा जागृति’च्या या टप्प्यावर अखेरपर्यंत चालू राहिले. त्या सर्व काळात त्यांनी बेळगांव येथून निघणाऱ्या ‘राष्ट्रवीर’मधूनही बरेच लिखाण प्रसिद्ध केलेले आढळते.

महाराष्ट्र आणि मराठा समाज हा प्रस्तुत रा.नां.च्या लेखसंग्रहातील मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. परंतु रा.नां.चे हे लेख प्रांतीय आणि जातीय अभिनिवेशापासून मुक्त आहेत. त्यांचा दृष्टीकोन एका बाजूला शास्त्रीय आणि दुसऱ्या बाजूला नैतिक आहे. आत्मपरीक्षणाचे सूत्र त्यांच्या लेखनात कोठेही सुटलेले नाही.

मराठा समाज त्याच्या संख्येमुळे आणि ऐतिहासिक कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या कण्याच्या ठिकाणी असून तो ‘मध्यवर्ती, सर्वसमावेशक व उदार आणि सर्वशील होता व आहे’, हे त्यांच्या एकूण लेखनाचे मुख्य सूत्र आहे. विठ्ठल रामजींच्या लिखाणातूनही हेच सूत्र आढळते. महाराष्ट्रातील गावगाड्याचे जे स्वायत्त आणि लोकतांत्रिक स्वरूप आहे, ते त्याला मुख्यत्वे मराठ्यांमुळे प्राप्त झालेले असून मराठ्यांची ही कामगिरी अटकेपार झेंडे लावण्यापेक्षा कमी दर्जाची नाही, हे शिंद्यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘राधामाधवविलासचंपू’च्या प्रस्तावनेवर टीका करताना स्पष्टपणे म्हटले होते.

सत्यशोधक चळवळीतून शाहू छत्रपतींच्या काळात मराठ्यांच्या स्वाभाविक धुरीणत्वाखाली एकवटलेल्या ब्राह्मणेतर चळवळीत फाटाफूट होऊन मराठ्यांच्या वर्चस्वाच्या शंकेमुळे आणि शक्यतेमुळे आधी डॉ. आंबेडकरांचा अस्पृश्यसमाज आणि नंतर बोलेबागडेदिकांचा मराठेतर स्पृश्यसमाज बाहेर पडला हा इतिहास शिंद्यांसमोरच घडत होता. त्यामुळे तेव्हाही शिंद्यांचा भर मराठ्यांना त्यांच्या वडिलकीची आणि त्यातून येणाऱ्या जबाबदारीची जाण करून देण्यावर होता.

रा.ना. लिहीत होते, तेव्हा तर इतिहासाच्या पुलाखालून आणखी बरेच पाणी वाहून गेले होते आणि खुद्द मराठ्यांच्या मध्येच सत्तेसाठी फाटाफूट व दुही माजली होती. या काळात ‘रा.नां.’वर शिंद्यांचेच कार्य पुढे नेण्याची वेळ यावी, ही एका अर्थाने खेदकारक असली तरी वास्तव घटना आहे.

यासंदर्भात त्यांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला दिलेला इशारा फार महत्त्वाचा आहे. “राजकारणातील भाऊबंदकी मराठ्यांच्या विनाशाला कारणीभूत झाली होत असते. उदा., श्री. शरदरावांना आय. काँग्रेसमध्ये जाताना कित्येक उच्चभ्रू विवेकवंतांनी पाठिंबा दिला, यामागे मराठ्यांत भांडणे लावून आपले पातेले चुलीवर चढवावे, हा चाणक्य हेतू नसतोच असे नव्हे. सल्लामसलत केवळ देणाऱ्यांची घेणाऱ्यांनी पारखावी लागते. हे सावधपण मराठा समाजातील राजकीय पुढाऱ्यांच्या जवळ नसेल, तर कपाळमोक्ष होईल.”

‘मराठा-जागृति’च्या पहिल्या टप्प्यावर म्हणजे पन्नासच्या दशकात आधी मुंबई राज्य व नंतर महाराष्ट्र गुजरातचे द्वैभाषिक राज्य अस्तित्वात असून संयुक्त महाराष्ट्राचे वारे वाहत होते. या दशकाच्या प्रारंभीच काँग्रेस पक्षातून बहुसंख्य मराठे बाहेर पडून त्यांनी मार्क्स आणि फुले यांचा समन्वय करत डाव्या विचारांचा शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला. विशेष म्हणजे बहुजनांना काँग्रेसमध्ये नेणारे केशवराव जेधेच यात अग्रेसर होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठ्यांमधील बहुतेक मातब्बर काँग्रेस सोडून बाहेर पडले, तेव्हा भाऊसाहेब हिरे आणि यशवंतराव चव्हाण यांनी काँग्रेस सांभाळली. भाऊसाहेबांनी मुरारजी देसाईंना दिलेल्या आव्हानाचा फायदा यशवंतरावांना मिळून त्यांचे नेतृत्व पुढे आले व १९६०मध्ये भाषिक तत्त्वाच्या आधारे निर्माण झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले. या संक्रमणाच्या काळात म्हणजे १९५४मध्ये रा.नां.नी स्पष्ट उच्चार केला होता - “संयुक्त महाराष्ट्रात पुनः मराठा समाजाकडे सत्ता जाणार किंवा या चालू प्रांताच्या राजकारणातही मराठा समाजाकडे लक्षात घेण्याइतकी सत्ता येणारच हे उघड आहे.”

अशा या मराठा नावाच्या “महत्त्वाच्या राष्ट्र घटकाची प्रकृती तपासून ‘तिची’ एक प्रकारची मीमांसा आणि समीक्षा मांडणे’, हे रा.ना. आपले कामच मानतात. ‘मराठ्यांनी मराठ्यांच्या उन्नतीसाठी चालविलेले प्रयत्न जातीय आहेत म्हणून न्यूनगंड धरू नये’, असे त्यांचे सांगणे आहे. त्याची कारणमीमांसा ते रोखठोकपणे करतात. जास्तीत जास्त लोकसंख्या असलेला मराठा समाज आहे व त्याच्या सुधारणेसाठी जे यत्न होतील ते आकुंचित अथवा जातीय म्हणणे, हा महाराष्ट्राचा आत्मघात आहे. मराठा समाज महाराष्ट्राचा व एकूण मराठीचा आत्मा आहे. बाकी सर्व अवयव आहेत म्हणून या आत्म्याची सुधारणा करणे सर्वांचे (सरकारचेही) कर्तव्य आहे. मराठा कणा आहे. कणा मजबूत झाल्याखेरीज महाराष्ट्राची गाडी चालावयाची नाही.

‘मराठा’ हा शब्द व्यापक अर्थाने महाराष्ट्रवाचक घेऊन सेनापती बापटांनी भारताच्या संदर्भात ‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’ असे लिहिले होते. तोच शब्द त्याच्या महाराष्ट्रातील जातिवाचक प्रचलित अर्थाने घेऊन रा.ना. ‘मराठ्याविना महाराष्ट्र गाडा न चाले’ असे त्याच तर्कशास्त्राने म्हणतात.

रा.ना. मराठा वर्चस्ववादी नव्हते. त्यांचा रोख मराठ्यांच्या हक्कांकडे नसून कर्तव्याकडे होता, हे पुन्हा एकदा सांगतो. याच लेखात ते असेही निदर्शनास आणून देतात की, “एकट्या मूठभर व पांढरपेशा ब्राह्मणांना किंवा डॉ. आंबेडकरांच्या महारादि ब्राह्मणांपेक्षा जास्ती संख्यावान जमातीस महाराष्ट्राचा गाडा चालविता यावयाचा नाही! मराठा ही गुलामी लादणारी जमात नाही. गुलामी खाडकन तोडणारी व स्वातंत्र्य आणणारी जमात आहे म्हणून मराठा समाजाचे भय दुसऱ्या कोणत्याच जमातीने किंवा अल्पसंख्यांक जातीने धरू नये. अभयदान देणारा, धर्मरक्षण करणारा, गो इत्यादी पशूंचे पालन करणारा व कापडधान्य पिकवून सगळ्यांच्या पोषणास पर्यायाने कारणीभूत होणारा असा उपयोगी मराठा समाज आहे. गिरण्यांत मजूर होऊन कपडा पिकवणारा व सैन्यात शिपाई होऊन लष्करी बाणा व्यक्त करणारा असा मराठा समाज आहे म्हणून प्रांतीय किंवा जातीय मूल्याने त्याचे महत्त्व तोलता कामा नये.”

रा.ना. हा लेख लिहित होते, तेव्हा १९५२ची निवडणूक होऊन गेली होती व तिच्यात काँग्रेसमधील मराठे व शे. का. पक्षातील मराठे यांच्यात जुंपलेली लढाई सर्वांनीच पाहिली होती. “मराठ्यांची शक्ती या प्रकारे विभागली जाणे अनिष्ट होते व आहे. मराठ्यांनी राजकारणाचा अभ्यास करून एक शक्ती राहील असा पवित्रा धारण करावा नाहीतर 'फोडा व झोडा' या न्यायाने मराठ्यांचा उपयोग संभव असतो.”

“मराठ्यांचे संख्याबळ पाहून काँग्रेसही मराठ्यांना डावलू शकत नाही. महाराष्ट्राची काँग्रेस म्हणजे ज्यामध्ये मराठ्यांचे प्राबल्य आहे अशी एक राजकीय घटना असाच नैसर्गिक अर्थ राहणार. काँग्रेस म्हणजे कोणी परकीय असू शकत नाही. काँग्रेसमधील मराठा पुढाऱ्यांवर व मंत्र्यांवर सर्व बहुजनसमाजाचे हित करण्याची मोठी जबाबदारी आहे.” हा थेट वि. रा. शिंद्यांना साजेल असा सल्ला देताना रा. ना. असा इशारा द्यायलाही विसरत नाहीत की, “केवळ सत्ता मिळविणे हे जर व्यक्तीचे ध्येय राहील, तर काँग्रेसमध्येही मराठ्या-मराठ्यांमध्ये वित्त व सत्तेसाठी संघर्ष निर्माण होईल.”

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

गरिबांना सरसकट आरक्षण देऊन त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा घटनाकारांचा उद्देश नव्हता. मग सगळ्या समस्यांना आरक्षण हा पर्याय कसा असू शकतो?

मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, मराठा समाजात जी प्रचंड गरिबी निर्माण झालेली आहे, ती कशी दूर करता येईल?

मराठा आरक्षण : मृगजळ आणि आग्यामोहोळ

मराठा आरक्षणाचा चकवा

मराठा आरक्षण आणि सत्ताधारी व विरोधकांचे आपापल्या सोयीचे राजकारण!

मराठा आरक्षणाचा पेच सोडवणार तरी कसा? त्यावर आजघडीला तरी कुठलाही ठाम पर्याय दिसत नाही…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘आरक्षण’ या विषयावर आपली भूमिका खऱ्या अर्थाने ‘रॅशनल’ आहे, असे आम्हाला वाटते, पण ते ‘अरण्यरुदन’ ठरते आहे...

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते...

आंदोलने, मोर्चे यांचे जातीयकरण आणि त्याचे (भयावह) दुष्परिणाम

..................................................................................................................................................................

रा.नां.च्या म्हणण्याप्रमाणे ‘मराठा व मराठेतर’ हा वाद ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादासारखा ऐतिहासिक नसून “तत्समांना वाटणारी ती शंका आहे. फार तर बुद्धिवंताकडून होणारा बुद्धिभेदही आहे. तत्समांना मराठा समाजापासून दूर राहून चालू लोकशाहीत स्थान पटकाविता येणे किंवा मिळविणे कठीण आहे. मराठा समाज या सर्व दृष्टीने जात नसून लोकशाहीचा मालक असलेला बहुजनसमाज आहे. येथे जातीय दृष्टीने आम्ही विचार करीत नाही. ही आमची भूमिकाच नव्हे. उलटपक्षी मराठा समाजाने जातीयता टाकून द्यावी. जातीय भूमिकेवरून राजकारण, धर्मकारण व समाजकारण यांचा विचार करू नये. महाराष्ट्राचा नेता व सर्वांचा प्रतिपालक आणि महाराष्ट्र धर्म वाढविणारा असा मराठा समाज आहे. सयाजी नृप व कर्मवीर शिंदे व्यापक विचार प्रगट करीत म्हणून त्यांच्याकडे सर्वच नेतृत्व व अध्यक्षत्व देत असत. अशा पुढाऱ्यांचे विचार समाजाने आदर्श समजावेत.”

रा.नां.चा विचार हा अशा प्रकारे विधायक आणि निकोप आहे. त्यामुळे ‘डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन’च्या कामात गंगारामभाऊ म्हस्के यांना मदत करणाऱ्या न्या. रानडे, प्राथमिक शिक्षणाची सोय मोफत व सक्तीची करण्यासाठी प्रयत्न करणारे ना. गोखले, सत्यशोधकी ‘दीनबंधु’मधून ब्राह्मणांना खडे बोल सुनावणारे राजारामशास्त्री भागवत आणि आत्मपरीक्षणास सदैव तत्पर असणारे लोकहितवादी यांच्याबद्दल त्यांना अतीव आदर आहे. अस्पृश्यता निवारणाच्या बाबतीत मराठे पाहिजे तितके सक्रीय नाहीत, याबद्दल ते त्यांच्यावर टीका करतात. मराठ्यांच्या मागासलेपणाची ते परखड चिकित्सा करतात. “मराठ्यांत जाति अभिमान नाही, कुलाभिमान होता व आहे, वैयक्तिक दृष्टिकोण आहे. सांघिक दृष्टी नाही. विद्येत मागासलेपणा व नव्या युगाची कल्पना नसणे यामुळेच सर्वच मराठ्यांचा पराभव झाला व होतो”, ही त्यांची निरीक्षणे इतिहासाला व वर्तमानाला धरून आहेत.

ब्राह्मण-ब्राह्मणेतर व स्पृश्य-अस्पृश्य या वादांच्या संदर्भात “मराठा समाजाने आपली सामाजिकता वाढवली पाहिजे, दलित व ब्राह्मण इत्यादी जातीत सामाजिक निर्भयता वाटली पाहिजे” हे सल्ले देताना ते असेही निदर्शनास आणतात की, “ब्राह्मण, मराठे व महार यांच्यात फार सामाजिक (धार्मिक) अंतर राहिले व समाजाची प्रकृती तपासता असे आढळले की, ही जणू पृथक् ‘त्रिराज्ये’च आहेत. असो; पण या त्रिराज्यांची भाषा, संस्कृती, प्रकृती, इतिहास व प्रदेश एकच आहेत व मराठ्यांच्या भक्कम एकस्वरूपी खडकावर वाढलेला ‘भागवत’ धर्म जातीय, प्रांतीय मर्यादा ओलांडण्यास भाग पाडतो व राजा राममोहन राय यांच्या विश्वव्यापी दृष्टीकडे नेतो. म्हणून अखिल मराठ्यांनी त्यांच्या व्यापक संस्कृतीचे स्वरूप ओळखले पाहिजे.”

स्वातंत्र्योत्तर काळातील लोकशाहीव्यवस्थेचे आपण सारेच स्वागत करत असलो, तरी जातीयतेला मागे सारील, अशी पक्षीयता फोफावून समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे रा. ना. नोंदवतात. टोकाला जाऊन ‘धर्मनिरपेक्षतेपेक्षा राजकारण निरपेक्षता अधिक जरुरीची आहे’ असे विधान करतात. गेल्या काही दशकांचे मराठ्यांचे आणि दलितांचे राजकारण पाहिले, तर रा.नां.च्या मताशी सहमत होण्याचा मोह टाळता येत नाही.

मराठ्यांचे राजकारणातील व समाजकारणातील स्थान लक्षात घेता सर्वच समाजधुरीणांनी त्यांच्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे, असे रा.नां.ना प्रामाणिकपणे वाटते. यापोटी ते मातब्बरांवरही टीका करायला कचरत नाहीत. एस. एम. - गोरे, तर्कतीर्थ हे आज दलितांच्या बाजूने उभे राहिले असल्याचा निर्देश करून ते लिहितात- ‘पण मराठ्यांना उद्देशून त्यांनी कधीच लिहिले-बोललेले आढळत नाही.’

महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था व मराठी भाषा यांचाही विचार रा. नां.नी गंभीरपणे केलेला दिसतो. परस्परविश्वास संपादन करण्यासाठी भाषेचा उपयोग होतो हा मुद्दा विस्तारताना ते म्हणतात, “चांगली भाषा समाजवृद्धीस व प्रगतीस कारणीभूत होते. व्यक्तिवाचक बोचक व उपहासात्मक लिखाण लिहिण्याचे कुत्सित चिपळूणकरी वळण सर्वांनी टाकले पाहिजे. रानडे, आगरकर यांची बाळबोधपद्धती आदर्श आहे व लो. टिळक यांची निधडी छाती व शूर मराठी अनुकरणीय होय.” स्वतः वि. रा. शिंदे यांनी एके ठिकाणी फुले, टिळक इ.च्या भाषेसंबंधी अशाच प्रकारचे विचार व्यक्त केले होते व त्यांना अलीकडे डॉ. अशोक केळकरांसारख्या जाणत्या भाषाशास्त्रज्ञाने मनापासून दादही दिलेली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

लोकसंख्या व तिच्या प्रमाणातील आमदार-खासदारांची संख्या यांच्या आधारे राजकारणातील मराठा वर्चस्वाचा निष्कर्ष कसा फसावा आहे याचे दिग्दर्शन करताना त्यांनी दोन महत्त्वाच्या बाबींवर बोट ठेवले आहे. एक म्हणजे सचिवालयातील नोकरशाहीतील मराठे नगण्य आहेत आणि दुसरी म्हणजे आर्थिक सत्तेशिवाय राजकीय सत्तेत फारसा अर्थ नसतो. यावर भाष्य करायची गरज नाही.

याच संदर्भातील दुसरा मुद्दा म्हणजे “मराठा सत्ताधाऱ्यांनाच गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल बहुसंख्य मराठ्यांची आठवण नाही! कदर नाही!! पाहुणेराऊळांना मराठा आमदार नामदार नोकरी लावू शकतात. मग कार्यभाग संपतो.” या प्रकाराला रा.ना. ‘सोयरे-धायरेशाही’ असे संबोधतात आणि त्याहीपुढे जाऊन ते असे लिहितात की, “पूर्वीची सामाजिकता या पिढीला लोपली व संपली! याबाबतीत ब्राह्मणांना आता व यापुढे दोषी ठरविता येत नाही. उलट कुन्हाडीचे दांडेच गोतास काळ आहेत.”

मराठ्यांच्या विषयीच्या चर्चेत यशवंतराव चव्हाण यांचा विषय येणे अपरिहार्य असते. तो रा.ना.ही टाळू शकत नव्हते. विशेषत: यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्यातील अंत: स्पर्धा आणि यशवंतराव आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा संबंध हे विषय यासंदर्भात महत्त्वाचे ठरतात. याबद्दल लोक काय कुजबुजतात याची नोंद अभ्यासकांना उपयुक्त ठरावी. “यशवंतरावांनी फारसे काही मराठ्यांसाठी केले नाही. त्यापेक्षा बाळासाहेब देसाई बरे, असे मत मराठे लोक व्यक्त करताना आढळतात. पण दुर्दैव असे की, बाळासाहेबांना यशवंतरावांनी मुख्यमंत्री होऊ दिले नाही. शाहू महाराजांप्रमाणे पदवीधर सुशिक्षित माणसांची फळी यशवंतरावांनी निर्माण केली नाही वगैरे मते व्यक्त केली जातात. तरीपण शिवाजी विद्यापीठाची सुरुवात वगैरे अनेक बाबी त्यांच्या जमेसाठी आहेत. त्या त्यांनी काँग्रेसमध्ये राहून केल्या. ही एक व्यापक पद्धत आहे. त्यांच्या ध्येयधोरणास अनुसरणारे मंत्रीदेखील आज हवे आहेत. महाराष्ट्राचे राज्य म्हणजे मराठा समाजाचे राज्य असावे, व्हावे हे लोकशाहीत अशक्य असते. अव्यवहार्य भलत्याच कल्पना म्हणजे स्वप्न होय.”

तर्कतीर्थ आणि यशवंतराव यांच्यातील संबंधाविषयी रा.नां.नी उपस्थित केलेले मुद्देही मार्मिक आहेत. याबाबतीत श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केलेले मत उधृत करून, त्यावर ते शेरा मारतात - “काही बहुजन समाजाच्या पुढाऱ्यांनी साथ अथवा धोरण म्हणून काही अल्पजनसमाजाच्या मंडळींना हाताशी अवश्य धरले. साहेब व तर्कतीर्थ यांच्यातील संबंधाचे यासंदर्भात कोणालाही स्मरण होईल. परंतु त्याने काही फारसे साध्य झाले नाही. उलट अशा प्रकाराना वशिलेबाजीचे स्वरूप येऊन दोन्ही समाज नाराजच राहिले. जातीपातीचा विचार न करता लायक माणसांची निवड केली असती तर कदाचित ही नाराजी निर्माण झाली नसती” (तरुण भारत, पुणे दि. २.५.८०)

श्रीपाद जोशी यांनी तर्कतीर्थ व यशवंतराव चव्हाण यांच्या संदर्भात केलेले विधान बरेच निःपक्षपाती कोणासही वाटेल. वैयक्तिक संदर्भाने प्रस्तुत लेखकाला येथे काहीही म्हणावयाचे नाही. पण आधुनिक छत्रपती व आधुनिक रामदास यांच्या सलगीचा निष्कर्ष व फलश्रुती आता पुढेही विचारवंत व भावी इतिहासकार संशोधून पाहतील हे अटळ आहे.

वस्तुतः जे वाई हे गाव तर्कतीर्थांचे मुख्य कार्यकेंद्र व तीच रा. नां.चीही कर्मभूमी. याच गावी विठ्ठलराव शिंद्यांनी अखेरचे दिवस व्यतीत केले व येथूनच बहुजन समाज काँग्रेस व्यापून टाकत असल्याच्या वार्ता ऐकल्या. अशा परिस्थितीत यशवंतरावांनी शिंद्यांचा वारसा सांगणे अधिक स्वाभाविक व इतिहाससिद्ध होते. परंतु आपल्या आत्मचरित्रात यशवंतराव शिंद्यांचे कार्य अस्पृश्यतानिवारणापुरतेच मर्यादित ठेवताना दिसतात. बहुजनांना काँग्रेसमध्ये आणण्याचे माप शिंद्यांच्या पदरात टाकताना त्यांनी हात आखडता घेतला आहे. परंतु हा यशवंतरावांच्या राजकारणाचा भाग दिसतो.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

गरिबांना सरसकट आरक्षण देऊन त्यांची फक्त आर्थिक परिस्थिती सुधारावी, असा घटनाकारांचा उद्देश नव्हता. मग सगळ्या समस्यांना आरक्षण हा पर्याय कसा असू शकतो?

मराठ्यांना आरक्षण मिळेल की नाही, यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, मराठा समाजात जी प्रचंड गरिबी निर्माण झालेली आहे, ती कशी दूर करता येईल?

मराठा आरक्षण : मृगजळ आणि आग्यामोहोळ

मराठा आरक्षणाचा चकवा

मराठा आरक्षण आणि सत्ताधारी व विरोधकांचे आपापल्या सोयीचे राजकारण!

मराठा आरक्षणाचा पेच सोडवणार तरी कसा? त्यावर आजघडीला तरी कुठलाही ठाम पर्याय दिसत नाही…

मराठ्यांची आरक्षणाची मागणी मान्य होण्यासारखी नाही. कारण किती जणांना आरक्षण देणार अन किती जणांना सरकारी नोकरी उपलब्ध असणार आहे?

‘आरक्षण’ या विषयावर आपली भूमिका खऱ्या अर्थाने ‘रॅशनल’ आहे, असे आम्हाला वाटते, पण ते ‘अरण्यरुदन’ ठरते आहे...

‘मराठा आरक्षण’ : ‘समन्वय’ ढळतो तेव्हा ‘अन्याया’ची भावना बळावते...

आंदोलने, मोर्चे यांचे जातीयकरण आणि त्याचे (भयावह) दुष्परिणाम

..................................................................................................................................................................

ज्या केशवराव जेध्यांच्या शे. का. पक्षाला तोंड देणारी काँग्रेसची समर्थ शक्ती यशवंतरावांनी उभी केली त्यांना शिंद्यांनी काँग्रेसमध्ये आणले होते. यशवंतरावांना आपली काँग्रेसशी असलेली बांधिलकी स्वतंत्र आणि शिंदे-जेधे निरपेक्ष आहे, असेच ठसवणे भाग होते आणि काही प्रमाणात ते सत्यही आहे. यशवंतरावांच्या अगदी पूर्ववयातसुद्धा त्यांची सत्यशोधकांशी वा ब्राह्मणेतरांशी वैचारिक जवळीक दिसून येत नाही. इतर काँग्रेस नेत्यांच्या तुलनेत यशवंतरावांची उंची नजरेत भरेल इतकी जास्त वाटते, हे खरेच आहे. परंतु तेदेखील शिंद्यांच्या अपेक्षांना पुरे पडले असते काय याविषयी शंका घेता येणे शक्य आहे. एवढे शिंदे त्याहीपुढचे होते.

यशवंतरावांच्या व्यापकपणाची स्तुती रा.ना.ही करतात. पण त्याचबरोबर “यशवंतरावांचा फायदा चाणक्यांनी घेतला. आम्ही दोघे वाईकर असल्यामुळे तर्कतीर्थांचा मुत्सद्दीपणा मला दिसला. टिळक, मोरे, साठे व गाडगीळ तर्कतीर्थांच्या तुलनेने साधे व सोपे ठरतात.” हे मत त्यांनी परखडपणे व्यक्त केले आहे व पुष्ट्यर्थ बाळासाहेब देसाईंचे मतही उदधृत केले आहे. ते लिहितात- “बाळासाहेब देसाई जास्ती फटकळ व स्पष्ट वक्ते होते. त्यांनी तर्कतीर्थ व यशवंतराव ह्या युतीचे धोके जाणले होते. यशवंतरावांनी वाईच्या ब्राह्मणांचे फुकट स्तोम माजविले आहे, असेही बाळासाहेब म्हणत. हा त्यांचा अभिप्राय आज व भावी काळात खरा ठरणारा आहे.”

‘मराठ्यांत आत्मपरीक्षण करणारे लोकहितवादी आज पाहिजेत’, अशी अपेक्षा रा.नां.नी व्यक्त केली आहे. खरे तर संयत व सूचक भाषेत हे काम स्वतः रा.नांनी बरेच केलेले आहे. परंतु मराठ्यांच्या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा लावलेला अन्वयार्थ अधिक मोलाचा व मूलभूत आहे. शिंद्यांना बाजूला करून डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व कसे पुढे आले, याची मीमांसा त्यांनी अत्यंत मार्मिकपणे केली आहे.

“एका बाजूने विठ्ठल रामजींच्या राष्ट्रीय महासंघास शाहू महाराजांचा विरोध व दुसऱ्या बाजूने उदारमतवादी सर चंदावरकर यांची जातिविरोधी प्रार्थनासमाजी दृष्टी व अनुष्ठान अशा कात्रीत व अडकित्त्यात स्वत: कर्मवीर शिंदे ‘सुपारी’ झाले. डॉ. आंबेडकर या महत्त्वाकांक्षी राजकारणी पुरुषाने याचा फायदा घेऊन स्वतःचे नेतृत्व शाहू महाराजांच्या साहाय्याने प्रथमच प्रस्थापित केले. डॉ. आंबेडकर शिंद्यांना मागे सारून पुढे आले.”

सुदैवाने अशा एखाद्या अडकित्त्यातील सुपारी होण्याचा प्रसंग रा.ना. चव्हाण यांच्यावर आला नाही, हे खरे आहे. मात्र त्यांच्या विचारांची व कार्याची जेवढी दखल घ्यायला हवी होती, तेवढी घेतली गेली नाही, हे मात्र खरे. शिंदे-चव्हाण या सरळसोट प्राकृत परंपरेपेक्षा यशवंतरावांना व त्याच्या अनुयायांना शास्त्रीबुवांची पेचदार पंडिती परंपरा राजकारणासाठी अधिक सोयीची व उपयुक्त वाटली असावी. तर्कतीर्थ आणि रा.ना. यांच्या वाट्याला आलेल्या पुरस्कारांचे गुणोत्तर पाहिले, तर मला काय म्हणायचे आहे, हे लक्षात येईल. पण आज मितीला बहुजन समाज त्रिभंगलेला असताना रा.नां.चाच दृष्टीकोन मराठा समाज आणि काँग्रेसी राजकारण यांना मार्गदर्शक ठरणार आहे, हे निश्चित.

‘विसाव्या शतकातील मराठा समाज’ - रा. ना. चव्हाण

संपादक व प्रकाशक - रमेश चव्हाण, पुणे | पाने - ४१६ | मूल्य - ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......