म. फुले यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना २४ सप्टेंबर १८७३ रोजी केली. सत्यशोधक समाजाने एका लोकचळवळीचे रूप धारण करून सामाजिक व धार्मिक पुनर्रचनेसाठी प्रबोधनाचा व परिवर्तनाचा झंझावात निर्माण केला. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सत्यशोधक चळवळीचे अनन्यसाधारण योगदान आहे. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २४ सप्टेंबर २०२३ रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने सत्यशोधक चळवळीने एक पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न कसा केला, याचा परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखामध्ये केला आहे. (‘मुक्त शब्द’च्या एप्रिल २०११च्या अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा हा संपादित अंश...)
..................................................................................................................................................................
१.
आधुनिक मराठी साहित्य, समाज व संस्कृतीच्या जडणघडणीवर सत्यशोधक चळवळीचा मोठा प्रभाव पडला आहे. मानवी स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, बुध्दिवाद, सामाजिकता व परिवर्तनशीलता यांचे नवे भान सत्यशोधक चळवळीने दिले. सत्यशोधकीय तत्त्वविचारांमधून आत्मभान आलेल्या सजग व संवेदनशील सत्यशोधकांनी रचनात्मक सामाजिक कार्याबरोबरच साहित्यनिर्मिती केली. १८५५पासून (म. फुले यांचे ‘तृतीय रत्न’ नाटक व मुक्ता साळवेंचा निबंध) १९३०पर्यंत सत्यशोधकीय साहित्याचा एक स्वतंत्र जोमदार प्रवाह अस्तित्वात आला. पुढे त्याचे स्वतंत्र अस्तित्व राहिले नसले, तरी आजपर्यंत सत्यशोधकीय प्रभाव व प्रेरणेतून साहित्यनिर्मिती होत आहे. वैचारिक साहित्याबरोबरच कादंबरी, कथा, कविता, नाटक या ललित व इतर स्फुट वाङ्मयप्रकारातून मोठ्या प्रमाणावर साहित्यनिर्मिती झाली.
सत्यशोधकांची साहित्यविषयक एक स्वतंत्र भूमिका होती. त्यांनी ती सैध्दांतिक स्वरूपात नीटपणे मांडली नसली, तरी त्यांच्या साहित्याचे स्वरूप, शैलीतत्वे व मूल्यविचार यांमधून त्याचे वेगळेपण व पारंपरिक प्रस्थापित पांढरपेशी मराठी साहित्याहून भिन्नत्व लक्षात येते. सत्यशोधकांनी वाङ्मय निर्मितीबरोबरच प्रकाशनसंस्था, नियतकालिके, बुकडेपो वगैरे काढून एक पर्यायी वाङ्मयीन संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
एकोणिसाव्या शतकातील नागरकेंद्रित शिक्षण, पांढरपेशी मध्यमवर्गीय समाजाच्या सुधारणांच्यासाठी झटणार्या ब्राम्हो, प्रार्थना, आर्य, परमहंस वगैरे संस्था, उच्चभू्र वर्गांचे प्रश्न मांडणारी सार्वजनिक सभा, राष्ट्रीय सभा; इंग्रजी विदया व इंग्रजी भाषेच्या अभिमानापोटी कार्यरत गट, इंग्रजी व संस्कृत साहित्याचे अनुकरण करून वा रंजनप्रधान काल्पनिक निर्मितीमध्ये रमलेले साहित्य विश्व, असे विविध पातळयावर समाजकारण व देशकारण उच्चभू्र नागरकेंद्रीत झाले होते. त्याबाहेर असलेल्या गरीब श्रमिक जनसमूहांच्या अस्तित्वाची दखलही घेतली जात नव्हती. अशा एकवर्णीय सत्ताकेंद्री काळात म. फुले व त्यांचा सत्यशोधक समाज खेडूत गोरगरीब जनसमूहांचे प्रश्न, हक्क आणि अधिकार घेऊन उभा राहिला.
प्रस्थापित व्यवस्थेमध्ये श्रमिक, कृषिजन समूहांच्या वाट्यास वर्षानुवर्षे दु:ख दैन्य का येते? शेतकरीच दारिद्रयात खितपत का पडतो? उपासमारीने का मरतो? सगळ्या संकटामध्ये आपत्तीमध्ये प्रथम बळी का जातो? व्यवस्थेमध्ये त्याचे स्थान काय? त्याचे माणूसपण व भवितव्य कसे फुलवता येईल? यासारखे अनेक मूलभूत प्रश्न सत्यशोधकांनी उपस्थित केले. अत्यंत बुध्दिवादी, इहवादी, कार्यकारणभावात्मक दृष्टीकोनातून शेतकरी कष्टकर्यांच्या जीवनवास्तवाचा आणि समग्र व्यवस्थेचा अन्वयार्थ लावला. श्रमिक जनसमूहांच्या दु:ख-दैन्य मुक्तिसाठी प्रस्थापित शोषणकारी व्यवस्था परिवर्तनाचा विचार मांडला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सर्व प्रकारच्या शोषणास, गुलामीस, भेदभावास नकार, ईश्वर व धर्मग्रंथासह धर्मव्यवस्थेची तर्कशुद्ध चिकित्सा, कालबाह्य घटकांना विरोध, वर्णजातलिंगादी भेदांचे उच्चाटन, स्वातंत्र्य, समता, बंधुताधिष्ठित नवसमाजरचना, मानवी हक्क अधिकार व मानवी प्रतिष्ठेचा स्वीकार, बुद्धिवाद, इहवाद यांसारखे मुक्तीचे क्रांतितत्व सत्यशोधक चळवळीने मांडले. साहित्याच्या पातळीवर ते सतत व्यक्त होत राहिले
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपासून म. फुलेंसारख्या शेतकरी तत्त्वज्ञाच्या कृतिशील मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते काम करीत होते. फुल्यांनंतर सत्यशोधक चळवळ ग्रामीण भागात वाढत गेली. राजर्षी शाहू महाराजांच्या पाठिंब्यामुळे १९११नंतर बृहन्महाराष्ट्रात सर्वदूर चळवळीचा प्रसार झाला. खेडुतांपर्यंत नवी जाणीव जागृती झाली. सामान्य माणसांना आत्मभान येत गेले. यांमधूनच सत्यशोधकीय, लेखक, कवी, विचारवंत, संपादक, नेते, कार्यकर्ते, जलसे, प्रवचनकार, कीर्तनकार, शिक्षणप्रसारक, शिक्षणतज्ज्ञ वगैरेंची पिढी उदयास आली. ती उत्तरोत्तर विकसित, बहरत, फुलत गेली. साहित्यासह सर्व क्षेत्रांमध्ये आज ग्रामीण भागातील पिढी आघाडीवर आहे. अशा प्रकारे सत्यशोधक चळवळीने गेल्या दीडशे वर्षांपासून ग्रामीण समाजजीवनाची मनोभूमी नांगरल्यामुळे हे परिवर्तन शक्य झाले. आजच्या ग्रामीण दलित आदिवासी वगैरे परिवर्तनवादी साहित्यिकांची व साहित्याची मुळे सत्यशोधकीय प्रबोधन परंपरेत आहेत.
ग्रामीण शेतकरी कष्टकरी समाज व त्यांची संस्कृती हे सत्यशोधक चळवळीचे केंद्र होते. शेतीमध्ये प्रत्यक्ष राबणारा शेतकरी, कुळे तसेच बलुते, आलुते, भटके, आदिवासी आदी सर्व भूमिकेंद्रित जीवित असणारे जनसमूह, महानगरांतील श्रमजीवी कामगार, झोपडपट्टयातील गरीब लोक यासारख्या कोट्यवधी श्रमिकांच्या जीवनवास्तवाला ऐरणीवर आणणारी, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी सत्यशोधक चळवळ ही भारतातील पहिली लोकचळवळ होती.
सत्यशोधक चळवळीचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे त्यांनी अठरापगड जातिजमातीमध्ये विभागलेल्या, सर्वदूर विखुरलेल्या, भुकेकंगाल बिनचेहर्याच्या कोट्यवधी कष्टकर्यांच्या जनसमूहाला देशाचा मुख्य घटक म्हणून अधोरेखित करण्याचा क्रांतिकारी प्रयत्न केला. त्याला साहित्याचा नायक म्हणून चित्रित केले. समाजजीवनात केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण समाज व कष्टकरी जनसमूह यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये मध्यवर्ती स्थान देण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्याहीपुढे जाऊन त्यांनी श्रमिक, कृषिजन समूहकेंद्रित व्यवस्था परिवर्तनाचा क्रांतिकारी विचार मांडला.
‘मध्यमवर्गीय पांढरपेशा समाज म्हणजे देश’ या रूढ समीकरणाला सत्यशोधकांनी छेद दिला. ‘ज्यांच्या प्रचंड संख्येमुळे व श्रमामुळे देशाला देशत्व आले आहे तो शेतकरी कामगार, स्त्री, शुद्र, अतिशुद्र जनसमूह म्हणजे खरा देश आहे’ हे वास्तव त्यांनी ठणकावून सांगितले. फुल्यांनी ‘गुलामगिरी’ (१८७३) आणि ‘शेतकर्यांचा असूड’ (१८८३) या ग्रंथातून हा देश शेतकर्यांचा आहे, हे दाखवून दिले. शेतकर्यांच्या शोषण संघर्षाची एक ऐतिहासिक उपपत्ती मांडून त्यांच्या जीवन वास्तवाच्या आकलनाची अन्वेषक दृष्टी दिली.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती!
‘समाजवादी सत्यशोधक’ राजर्षी शाहू महाराजांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ
..................................................................................................................................................................
फुल्यांची परंपरा कृष्णराव भालेकर, मुकुंदराव पाटील, कृ.क.चौधरी, श्रीपतराव शिंदे, शामराव देसाई, दिनकरराव जवळकर, माधवराव बागल, केशवराव विचारे आदी असंख्य सत्यशोधकांनी विविध पातळ्यांवर पुढे चालवली. त्यांनी लेखणी आणि वाणीतून शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. कृष्णराव भालेकरांनी ‘शेतकरी मालक देशाचे’ अशी उद्घोषणा केली. ‘बळीबा पाटलां’ना कादंबरीचे (१८८८) नायक करून नव्या वाङ्मयीन संस्कृतीचे बीजारोपण केले. शेतकर्यांच्या कल्याणाचा अष्टोप्रहर ध्यास घेऊन त्यांच्या जीवन वास्तवाचा कादंबरी, काव्य, पोवाडे, लावण्या, संवाद, पत्रकारिता, चित्रे अशा विविध माध्यमातून समर्थपणे आविष्कार केला. शेतकरीमय झालेला हाडाचा सत्यशोधक व सजग कलावंत म्हणून भालेकरांचे स्थान फार वरचे आहे. कृ. क. चौधरींनी ‘शेतकर्यांचे दु:खोद्गार’ या लेखमालेतून (‘दीनबंधु’, १९०६) शेतकर्यांचे दु:ख वेशीवर टांगले.
कृषिजनसमूहांच्या, कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी १८७७ ते १९३० या काळामध्ये ‘दीनबंधु’, ‘दीनमित्र’, ‘शेतकर्यांचा कैवारी’, ‘विश्वबंधु’, ‘जागरूक’, ‘जागृति’, ‘विजयी मराठा’, ‘सत्यप्रकाश’, ‘भगवा झेंडा’, ‘राष्ट्रवीर’, ‘प्रबोधन’, ‘हंटर’, ‘ब्राह्मणेतर’, ‘सिंध मराठा’, ‘सत्यवादी’, ‘नवयुग’, ‘कैवारी’ आदी साठहून अधिक नियतकालिके सुरू झाली. ती शेतकरी कष्टकर्यांच्या मुक्तिलढ्याची मुखपत्रेच होती. त्यांच्या संपादक व लेखकांनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर अतिशय मौलिक लेखन केलेले आहे. शेतकर्यांचे अज्ञान, दारिद्रय, पारंपरिक मानसिकता, भोळाभाव, अंधश्रध्दा, खर्चिक, अविचारी उधळा स्वभाव, व्यसनाधिनता यांचे अत्यंत परखड चित्रण केले आहे. सरकार, नोकरशाही, सावकार, भटजी, व्यापारी यांच्याकडून होणार्या शेतकर्यांचे नागवणुकीचे प्रत्ययकारी व जिवंत वर्णन केले आहे. शेतकर्यांच्या अभ्युदयाचे मार्गही सुचवले आहेत. तत्कालीन शेतकर्यांच्या स्थितीचा अस्सल दस्तऐवज म्हणून हे लेखन संदर्भसाधन ठरते.
दिनकरराव जवळकरांनी ‘शेतकरी - हिंदुस्थान = शून्य’ असे सूत्र मांडले. त्यांनी ‘शेतकरी हिंदुस्थान’ हे पुस्तक लिहून शेतकर्यांचे महत्त्व व समाजकारणातील स्थान अधोरेखित केले. सत्यशोधकांची शेतकरीविषयक भूमिका व त्यांचे साहित्य यामधून त्यांचे वेगळेपण व मौलिकत्व सिध्द होते. आपल्या कामाने, घामाने सगळया मानवजातीला जगवणार्या शेतकरी कष्टकरीरूपी मूकनायकाला सत्यशोधक चळवळीने व सत्यशोधकीय साहित्याने महानायक केले. शेतकर्यांच्या स्थितिगतीवर देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे सांगितले. एकूणच शेतकरी हा साहित्यादी सर्व सामाजिक घटकांच्या केंद्रस्थानी आणून त्यांच्या परिवर्तनाचा विचार प्रवाहित केला.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२.
सत्यशोधकीय साहित्याने वास्तवाचा अन्वयार्थ लावणारी अन्वेषक मूल्यदृष्टी दिली. ‘सार्वजनिक सत्यधर्म’मध्ये म. फुल्यांनी वैश्विक सत्याची संकल्पना मांडली आहे. अशा व्यापक मानवतावादी भूमिकेतून सत्याचा सर्जन शोध व मानवमुक्ती हे सत्यशोधकीय साहित्याचे प्रयोजन आहे व हेच त्याचे भारतीय साहित्य विचारास योगदान आहे.
सत्यशोधकीय परंपरेने वैचारिक व ललित साहित्याची विपुल निर्मिती केली. म. फुल्यांचे कार्य, विचार, वाङ्मय व सांस्कृतिक दृष्टीकोन सत्यशोधकीय साहित्याची प्रेरणा आहे. फुल्यांनी तत्कालीन संकुचित ब्राह्मणी मध्यमवर्गीय साहित्य संस्कृतीपासून फारकत घेऊन स्वत:च्या भूमिनिष्ठ संवेदना स्वतंत्रपणे व्यक्त केल्या.
फुल्यांच्या विचारव्यूहामध्ये भूमी, भूमिपुत्र, भूमिनिष्ठ संवेदना यांना अनन्यसाधारण स्थान होते. लोकपरंपरेतील मौखिक आविष्कार शैलीतून आधुनिकतेचा आशय समर्थपणे व्यक्त करण्याचे कितीतरी सशक्त पर्याय सत्यशोधकीय परंपरेने विकसित केले.
सत्यशोधकीय साहित्यपरंपरेने कृषिजन संस्कृती केंद्रस्थानी आणली. शेतकर्यांच्या प्रिय बळीराजापासून खंडोबा, जोतीबा, भैरोबा, म्हसोबा, जाणाई, जोखाई, सातीआसरा वगैरे दैवतव्यवस्थांचा नव्या सांस्कृतिक ऐतिहासिक संदर्भाने अन्वयार्थ लावला. कृषिजनसमूहांची ऐतिहासिक काळापासूनची स्वतंत्र देशी परंपरा सिद्ध केली. लोकायत, गौतमबुद्ध, वर्धमान महावीर, बसवेश्वर, कबीर, तुकाराम, म. फुले यांच्या वैचारिक परंपरेशी स्वत:ला जोडून घेतले. मानवमुक्तीसाठी जगभर सुरू असलेल्या परिवर्तनशील लढ्याशी एकरूपता साधली. वंचित, शोषित जनसमूहांच्या बाजूने सत्यशोधकीय साहित्य प्रतिक्रिया व्यक्त करत राहिले. हेच त्याचे वेगळेपण व वैशिष्ट्य होते.
३.
सत्यशोधकीय वैचारिक साहित्यामध्ये धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था, वर्णजातिव्यवस्था तसेच शेतकरी, दलित, स्त्री आदी घटकांच्या जीवनवास्तवाची सूक्ष्म व तर्कशुद्ध चिकित्सा केलेली आहे. प्रस्थापित समाजव्यवस्थेचे स्वरूप, त्यामध्ये सामान्य जनसमूहांचे स्थान यांचे विश्लेशण व शोषकतत्त्वांना नकार असे वैचारिक साहित्याचे स्वरूप आहे. व्यवस्थेमधील प्रत्येक घटकाची तर्कशुद्ध, कार्यकारणभावात्मक पद्धतीने चिकित्सा केलेली आहे व मानवमुक्तीचा विचार अधोरेखित केले आहे.
धर्मचिकित्सा हा सर्व चिकित्सेचा पाया आहे असे मार्क्सने म्हटले आहे. धर्मसंकल्पना, धर्मग्रंथ, धार्मिक तत्त्वज्ञान, ईश्वर यासह धर्मव्यवस्थेतील सर्व घटकांची बुद्धिनिष्ठ चिकित्सा सत्यशोधकीय साहित्याने केली. धर्मव्यवस्थेतील कालबाहय, अनिष्ट, शोषक घटकांवर कठोर टीका केली. सत्यशोधनांचा आग्रह धरला, ‘इहवाद’, कालानुरूप बदल व लोककल्याणकारी आशय धर्मव्यवस्थेस देण्याचा प्रयत्न केला.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
..................................................................................................................................................................
म. फुलेंचा ‘सार्वजनिक सत्यधर्म’ (१८९१) ग्रंथ या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. धर्मशरणेतून येणारी मानसिक गुलामगिरी आणि त्यातून होणारे शोषण व र्हास यावर सत्यशोधकीय साहित्याने भर दिला. सामान्य ग्रामीण कृषिजनसमूहांचे एकूणच जगणे धर्मशरण होते. त्यामुळे त्यांची झालेली नागवणूक सत्यशोधकीय साहित्याने उघड केली. लोकांना धर्मव्यवस्थेच्या पारंपरिक रूपापासून सजग, सावध केले. बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकी बनवण्याचे प्रयत्न केले. वैचारिक ग्रंथ, स्फुटलेख, ललित साहित्य यामधून धर्मचिकित्सा सातत्याने केलेली आढळते.
ग्रामव्यवस्था हा सत्यशोधकांच्या चिंतनाचा व कार्याचा केंद्र होता. गावगाड्यातील पारंपरिक शोषक वतनदारी सरंजामी व्यवस्थेस सत्यशोधकीय साहित्याने विरोध केला. समूहभाव, शोषणमुक्ती, श्रमिकांना प्रतिष्ठा व ग्रामकेंद्रित विकासाची संकल्पना सत्यशोधकांनी प्रतिपादन केली. खेडुतांची रूढिपरंपराशरण जीवनशैली, जत्रायात्रा, नवस, विधी, मंत्रतंत्र, अंधश्रद्धा, दानधर्म, अंगात येणे, श्राध्द, सत्यनारायण, कर्मकांडे वगैरेमुळे येणारी मानसिक गुलामगिरी व होणारे शोषण आणि अध:पात यांची अनेक रूपे सत्यशोधकीय साहित्याने प्रकाशात आणली. पारंपरिक मानसिकता व गावगाड्याचे सरंजामी रूप यामुळे गावांच्या आणि गावकर्यांच्या अध:पाताची व मागासलेपणाची मीमांसा सत्यशोधकांनी केली. विधायक, रचनात्मक परिवर्तनाचा प्रकाश दाखवला. सत्यशोधकीय नियतकालिकांमधून यासंदर्भात प्रचंड लेखन झालेले आहे.
पुरुषप्रधान कुटुंबव्यवस्था हा ग्रामीण सरंजामी सत्ताकारणातील महत्वाचा घटक आहे. म. फुल्यांनी या सत्ताकारणातील अमानुशता स्पष्ट करून स्त्री-पुरुष समतेचा पुरस्कार केला. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ (१८८२) या निबंधामध्ये पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमधील स्त्रीजीवनाची होरपळ वेशीवर टांगली. धर्मव्यवस्था, धर्मग्रंथ, देवदेवता, कुटुंब, समाज अशांसारख्या अनेकविध घटकांमधून प्रकटणारे पुरुषी हिततत्त्व आणि स्त्रियांचे दुय्यमत्व यांचा अतिशय परखड समाचार ताराबाईंनी घेतला. स्त्रीकेंद्रित व्यवस्थापरिवर्तनाच्या दिशेने स्त्रीमुक्तीच्या काही शक्यता दाखवून दिल्या.
तानुबाई बिर्जे, सावित्रीबाई रोडे, यमुनाबाई घोडेकर, आनंदीबाई शिर्के, शांताबाई चव्हाण, कमलाबाई जाधव यासारख्या लेखिकांनी स्त्री स्वातंत्र्य, समानता व स्त्री हक्काचा पुरस्कार करणारे लेखन नियतकालिकांच्यामध्ये केलेले आढळते. मात्र ताराबाईंच्या बंडखोर मार्गावरून सत्यशोधकीय साहित्य फारसे पुढे गेले नाही. सत्यशोधकांवरील ग्रामीण पुरुषी मानसिकतेचा पगडा व स्त्रियांच्याकडे दुय्यमत्वाने पाहण्याचा दृष्टीकोन यांमधून दिसतो. ही सत्यशोधकीय विचार व साहित्याला पडलेली मोठी मर्यादा होती.
अस्पृश्यतेविरोधात सत्यशोधकांनी वैचारिक कृतिशील लढ्याच्या पातळीवर मोठी कामगिरी केली. गोपाळबाबा वलंगकर (‘विटाळ विध्वंसन’, १८८९), शिवराम जानबा कांबळे, किसन फागुजी बनसोडे, हरिभाऊ तोरणे आदींनी नियतकालिकांमधील लेखनातून वर्णजातिव्यवस्थेवर हल्ले चढविले. संपूर्ण गावगाडा भेदाभेदमुक्त समूहभावाने जगावा आणि आधुनिकतेच्या पायावर विकसित व्हावा, असे सत्यशोधकीय विचारसूत्र होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
शिक्षण हे वंचितांच्या मुक्तीचे क्रांतितत्त्व म्हणून त्यांनी प्रतिपादले. अशा प्रकारे सत्यशोधकीय साहित्यामधून वैचारिक परिवर्तनशील मूल्यविचार व अन्वयार्थक विश्लेषक मूल्यदृष्टी प्रकट झाली. मराठीमधील भूमिनिष्ठ व प्रगतिशील असा हा स्वतंत्र प्रवाह आहे.
सत्यशोधकीय साहित्य ललित साहित्य प्रकारामध्येही निर्माण झाले आहे. कादंबरी, कथा, काव्य, नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये सामाजिकता, वास्तवता व मूल्यात्मकता आणण्याचे कार्य आधुनिक मराठी साहित्यामध्ये सर्वप्रथम सत्यशोधकीय साहित्याने केले आहे. कृष्णराव भालेकरांची ‘बळीबा पाटील’ (१८८८) ही शेतकरी नायक असलेली, शेतकर्यांचे प्रश्न आणि ग्रामजीवनाचे वास्तव चित्रण करणारी मराठीतील पहिली तत्त्वचिंतनात्मक कादंबरी आहे. मुकुंदराव पाटील यांच्या ‘होळीची पोळी’ (१९१२), ‘चंद्रलोकीची विलक्षण रूढी अथवा दादासाहेबांची फजिती’ (१९११), ‘ढुढ्ढाशास्त्री परान्ने’ (१९१५), ‘तोबातोबा’ (१९२७) या सामाजिक समस्याप्रधान कादंबर्या आहेत. मुकुंदराव पाटील यांनी ग्रामीण भागातील पाटिलकीचे वतन व मानपानासाठीची भांडणे (होळीची पोळी) आणि स्त्रीदास्य (चंद्रलोकीची विलक्षण रूढी...) हे प्रश्न मांडले. धर्मव्यवस्था, पुरोहितशाही, सावकारशाही यांच्याकडून कृषिजन समूहांचे होणारे विविधांगी शोषण कथांमधून चित्रित झाले आहे.
सत्यशोधकीय काव्यप्रवाह अत्यंत समृद्ध आहे. सत्यशोधकीय कवितेतून कृषिजन समूहांचे दु:खदैन्य, शोषण, होरपळ, दारिद्रय, नागवणूक यांचे वास्तव, भेदक व हादरवून टाकणारे प्रत्ययकारी चित्रण झाले आहे. ओवी, अभंग, अखंड, पोवाडा, लावणी, फटके, कटाव वगैरे देशी रचनाबंधामधून सत्यशोधकीय कवींनी कृषिजन संस्कृतीशी असणारी आपली वीण अधिक घट्ट तर केलीच; पण त्याचबरोबर देशी काव्यबंधामधून आधुनिकतेचा समर्थ आविष्कार करण्याचे शैलीसामर्थ्य दाखवून दिले.
४.
गौतमबुद्धापासून म. फुल्यांपर्यंतची परिवर्तनवादी परंपरा सत्यशोधकीय साहित्याची प्रेरणा आहे. शेतकरी, कष्टकरी, दलित, आदिवासी, शुद्रादिशूद्र वर्ग सत्यशोधक चळवळीच्या कार्याचा केंद्र होता. याच श्रमिक जनसमूहांच्या जीवनवास्तवाचा अन्वयार्थक सर्जनशील आविष्कार सत्यशोधकीय साहित्यामधून झाला आहे.
एकोणिसाव्या शतकामध्ये मराठी साहित्याला नागर, मध्यमवर्गीय, अनुकरणात्मक, संकुचित स्वरूप प्राप्त होऊ लागले होते. सत्यशोधकीय साहित्याने या विरुद्ध विद्रोह केला. कृषिजन समूहांच्या अभिव्यक्ती शैलीआड येणारे ब्राह्मणी व पश्चिमी दबाव नाकारले. देशी मौखिक, वाङ्मयीन लोकपरंपरेच्या आविष्काराच्या वाटा खुल्या केल्या. कृषिजनसमूहांच्या सांस्कृतिक विकासाचे स्वतंत्र भूमिनिष्ठ पर्याय दिले. हजारो वर्षांपासून भारतीय समाजव्यवस्थेत शोषित, वंचित मूकनायक असलेल्या शेतकरी कष्टकरी वर्गास सत्यशोधकीय साहित्याने नायक केले.
..................................................................................................................................................................
हेही पाहा\वाचा :
सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती!
‘समाजवादी सत्यशोधक’ राजर्षी शाहू महाराजांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकणारा ग्रंथ..................................................................................................................................................................
सत्यशोधकीय साहित्याने प्रथमच खेडूत, आदिवासी, शेतकरी, मजूर, स्त्रीशूद्रादिशूद्र जनसमूहांच्या जीवनसत्याला गवसणी घातली. कृषिजन समूहाच्या बोली भाषेत त्यांच्या व्यथावेदनांना वाचा फोडली. लोकभाषेला ज्ञान भाषेचे, वाङ्मयीन भाषेचे रूप प्राप्त करून दिले. त्यामुळे विविध समाज स्तरांची अस्सल भाषा साहित्यामधून आली.
सत्यशोधक चळवळीमुळे ग्रामीण कृषिजन समूहांमध्ये आत्मभान, आत्मविश्वास व आत्माविष्कार यांच्या प्रबळ प्रेरणा जागृत झाल्या. यातून ग्रामीण भागातील, कृषिजन समूहांमधील साहित्यिक, विचारवंतांची एक ताकदीची परंपरा महाराष्ट्रामध्ये उदयास आली. स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, देशी, जनवादी, विद्रोही आदी साहित्यप्रवाहांच्या रूपाने ते नव्या रूपामध्ये तरारून आले.
दुर्दैवाने, सत्यशोधकीय साहित्याला चांगले, साक्षेपी समीक्षक व अभ्यासक मिळाले नाहीत. त्यामुळे ते दुर्लक्षित, उपेक्षित राहिले.
.................................................................................................................................................................
लेखक प्रा. डॉ. अरुण शिंदे कोल्हापूरच्या नाइट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्समध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment