गानसरस्वती किशोरीताई आणि अलौकिकत्व, प्रतिभासंपन्नता...
पडघम - सांस्कृतिक
केशव परांजपे
  • गानसरस्वती किशोरी आमोणकर - १० एप्रिल १९३१-३ एप्रिल २०१७
  • Tue , 04 April 2017
  • पडघम साहित्यिक किशोरी आमोणकर Kishori Amonkar स्वरार्थरमणी Buy Swararthramani रागरससिद्धान्त Raagrasasiddhant भूप Bhoop

गानसरस्वती किशोरी आमोणकर या अलौकिक प्रतिभासंपन्न थोर गायिका आहेत. त्यांनी संगीताची अपरंपार साधना केली आहे. त्यांची संगीतनिष्ठा, व्यासंग, अभ्यास आणि अभिजात संगीताविषयीची त्यांची तळमळ संपूर्ण भारतीय संगीत जगताला विदित आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी रसिकांना आदरयुक्त प्रेम, एक दरारा आणि विलक्षण कुतूहल आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात अनेक ठिकाणी त्यांनी बातचितीच्या आणि प्रश्नोत्तर सत्रांच्या माध्यमांतून आपलं चिंतन अतिशय प्रभावीपणे प्रकट केलं आहे. आपलं अनेक वर्षांचं चिंतन त्यांनी खूप मेहनतीनं शब्दबद्ध करून ‘स्वरार्थरमणी’ या ग्रंथाच्या रूपानं अभ्यासकांना उपलब्ध करून दिलं आहे. ‘स्वरार्थरमणी’ची सिद्धता करताना त्यांनी अनेक ग्रंथांचं परिशीलन केलं, अनेक विद्वानांबरोबर चर्चा केल्या. आपल्या लेखनाची अनेक परिष्करणं केली. एकदा सुचलं ते लिहिलं व त्याचा ग्रंथ झाला असं केलं नाही, तर प्रत्येक वाक्य, नव्हे प्रत्येक शब्द पारखून, निरखून घेतला आणि चार-पाच वर्षांच्या रात्रंदिवसाच्या अथक परिश्रमांतून आपला ग्रंथ आकाराला आणला. त्यांच्या सांगीतिक विचारांचा सोपा-सहज परिचय करून देण्याचा या लेखाचा उद्देश आहे.

एका प्रख्यात पार्श्वगायिकेच्या भाषणाचा वृतान्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला होता. त्या गायिकेनं म्हटलं होतं की, “कोणताही गानप्रकार गाता यावा यासाठी शास्त्रीय संगीताचा अभ्यास गायकाला उपयोगी पडतो. शास्त्रीय संगीताचा भक्कम असा पाया हा हवाच.” या विधानावर किशोरीताईंची प्रतिक्रिया अगदी अनपेक्षित होती. त्या म्हणाल्या – “शास्त्रीय संगीत हा पाया, तर फिल्मसंगीत हा काय कळस का रे?” प्रश्न अनपेक्षित होता. पार्श्वगायिकेचा हेतू शास्त्रीय संगीताचं महत्त्व अधोरेखित करावं असाच होता, पण तरीही किशोरीताईंचा टोकदार, परखड सवाल अत्यंत सुसंगत होता. तालासुराची समज, आवाजाचा गोडवा ही नैसर्गिक देणगी असते. अशी देणगी लाभलेली मुलं ऐकून ऐकून छोटी गाणी सहज आणि सुंदर गाऊन जातात. पण इथं संगीताची इतिश्री नसते, तर श्रीगणेशा असतो. शब्द, ताल, वाद्यसाथ, कुणीतरी बांधून दिलेली चाल यांतून घटकाभर मनोरंजन करणारं संगीत जन्मजात गायक सहज गातो. पण त्याच्या नैसर्गिक गुणवत्तेचा परिपोष जर कुठे होत असेल तर तो राग-गायनात. आपल्याला जे म्हणायचं आहे, ते आकर्षक करून सांगण्यासाठी सुरांचा उपयोग ही अगदी प्राथमिक अवस्था, तर सुरांना जे सांगायचं आहे ते आपल्या कंठातून अवतीर्ण व्हावं हा कळस! पण म्हणून काही प्रत्येक शास्त्रीय गायन-वादन प्रस्तुती ही प्रत्येक सुगम\चित्रपट गीताहून श्रेष्ठ असते असं मुळीच नाही. सुगम संगीतातील कलाकार आवाजावर जे प्रभुत्व कमावतात, ते गतानुगतिक रूढीवादी शास्त्रीय गायकांजवळ असण्याची शक्यता कमीच असते. स्वरांचे सर्व अलंकार (हरकत, मुरकी, खटका इ.) अभ्यासाने कंठस्थ करावे लागतात. किशोरीताईंनी ते जिद्दीनं आणि हिरीरीने केले आहेत. प्रश्न कुठे येतो? तर या सर्व सामग्रीचा, प्रभुत्वाचा विनियोग कशासाठी केला जातो! त्या विनियोगावर संगीतातील इयत्ता ठरते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

किशोरीताईंच्या संगीतविचाराचा आधारभूत अध्याय हा आहे की, संगीत ही सुरांची भाषा आहे. सामान्यत: जे संगीत निर्माण केलं जातं - अगदी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुद्धा (दुर्दैवानं) याला अपवाद नाही- ते माध्यमाचं प्रदर्शन असतं. म्हणजे काय बरं? माझा आवाज किती चांगला आहे, माझ्या आवाजातून मी किती कसरती (आवाजाच्या) करू शकतो\शकते, मला किती बंदिशी पाठ आहेत, मी तालात किती पक्का\पक्की आहे हे दाखवण्यात कलाकार कलेची इतिकर्तव्यता मानतात. यातून काय साधतं? तर कलाकाराबद्दल श्रोत्याच्या मनात एक दबदबा (‘ऑ’) तयार होतो आणि थोडी करमणूक होते. काही शास्त्रीय गायक-गायिका तर शास्त्रीय गायनाचे नियमच जणू घोकून दाखवतात. अशाने शास्त्रीय गायन रुक्ष-नीरस बनतं. आनंदाच्या ज्या उंचीवर रागसंगीत कलाकाराला आणि श्रोत्याला घेऊन जाऊ शकतं, जी उंची अपेक्षित आहे – तिथवर ते संगीत पोचतच नाही. शब्दप्रधान अशा गानप्रकारांत – म्हणजे भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, चित्रपटगीत, ग़ज़ल, कव्वाली अशा गानप्रकारांत शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ – भावार्थ सजवण्यासाठी, आकर्षक बनवण्यासाठी संगीताचा वापर केला जातो. म्हणजेच स्वर दुय्यम भूमिका स्वीकारतात. अशा वेळी ते आपला संपूर्ण ‘स्व’भाव व्यक्त करूच शकत नाहीत. स्वरांचे स्वयंभू झाड जिथं संपूर्ण मोहरून येतं तिथं पोचण्याचा ध्यास आपल्याला असावा असं किशोरीताई कळकळीनं सांगतात. कुठे त्या झाडाच्या पानांची, तोडलेल्या डहाळ्यांची आरास केलेली असेल तिथंच थांबू नका! आणि स्वरसौंदर्याच्या संपूर्णत्वाचा हा साक्षात्कार संगीताची साधना करणाऱ्या गायकाच्या राग-गायनातूनच येऊ शकतो.

म्हणूनच किशोरीताईंनी संगीत अभ्यासकांना, तरुण गायक-गायिकांना सतत आवाहन केलं आहे की, “संगीत म्हणजे खरोखरी काय ते समजून घ्या. सुराचे सामर्थ्य तुमच्या अनुभवाला येऊ द्या. सुरावर तंत्रानं वरकरणी हुकूमत गाजवू नका, तर सुराची मंत्रशक्ती ओळखी. सुराला शरण जा. सुराचं तुम्हाला दर्शन घडायला हव आणि हे घडायचे असेल तर तुम्हाला अहंभाव, अहंकार सोडून देत जावं लागेल.’’

किशोरीताई नेहमी म्हणतात – “आज किशोरीचा भूप काय रंगला!” हा अभिप्राय खरं तर गाण्याचं न्यून सांगतो, गाणं परिपूर्णतेच्या एक पायरी खाली आहे असंच सुचवतो. जोपर्यंत रसिकाला ‘किशोरीचा भूप’ ही जाणीव होत असते, तोपर्यंत परिपूर्णता आलेली नाही. जेव्हा किशोरीचा हे विशेषण (प्रत्यवाय) गळून पडेल – फक्त भूप शिल्लक उरेल, जेव्हा रसिक म्हणेल “काय तो भूप! काय त्याचे दर्शन” तेव्हाच गाणं परिपूर्तीला पोचलं असे मी समजेन.” त्या नेहमी सांगतात – “रागाला शरण जा. राग हे चैतन्य आहे, तो अपरंपार आहे. आपल्याला गवसतो तो फक्त त्याचा भास! जसे शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र विस्तृत आहे, तसंच रागाचं आहे. राग अमर्याद आहे. आम्ही गायक मैफलीत मांडतो ते रागनाट्य म्हणजेच संपूर्ण रागाचा आभास. रागाला जरा-मरण नाही. किशोरी एक जीव आहे, तिला जरा-मरण आहे. किशोरी जन्माला आली, वाढली, मृत्यू पावली तरी यमन आहेच-तिच्या जन्मापूर्वी होता, तिच्या जीवनकाळात आहे आणि तिच्या मृत्यूनंतरही तो असणारच आहे. जे चिरंतन, जे अजर-अमर ते पहा – कलाकार काय आज आहे, उद्या नाही!”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

किशोरीताई श्रोत्यांची जाणकारी या गोष्टीला महत्त्व देत नाहीत. “रागाचं नाव घोकून काय साधणार आहे? रागाचे आरोह-अवरोह वगैरे नियम कळून काय उमजेल?” श्रोत्याचं मन जितकं निर्मळ, संवेदनशील तितका श्रोता मोठा असं त्या मानतात. आपल्या गायनानं श्रोत्याच्या मनाशी संवाद साधायला हवा. संगीत म्हणजे ‘या हृदयीचे त्या हृदयी’ पोचवण्याचा निरतिशय सुंदर प्रवास असे त्या मानतात. रागशास्त्राचे नियम कशासाठी बनवले आहेत हे समजून घेऊन, त्या नियमांकडे ‘जुन्या जाणत्या कलाकारांनी अनुभवाने सिद्ध केलेली वाट’ या दृष्टिकोनातून कलाकार-अभ्यासकांनी पाहिलं पाहिजे. पुन्हा तोच मुद्दा – संगीताचं शास्त्र म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय? किशोरीताईंनी या प्रश्नाला मूलगामी उत्तर दिलं आहे.

किशोरीताईंच्या संगीतचिंतनाचा गाभा असा आहे की, संगीत भावात्म आहे. संगीताच्या विशुद्ध भाषेच्या आपण जितकं जवळ जाऊ तितकं संगीत अधिकाधिक भावात्म होत जाते. सुरांच्या भाषेचा- म्हणजे संगीताचा – हेतु भाववहन व त्यातून रसानुभव हाच आहे. संगीताच्या सर्व प्रकारांत रागगायनाचा खयाल हा प्रकार सुरांना सर्वाधिक प्राधान्य देऊ शकतो. म्हणूनच खयालगायन हे भावगायन आहे. आता साहजिकच अनभिज्ञ रसिकाला प्रश्न पडतो की, ज्या गानप्रकारात म्हणजे रागगायनात शब्द फारचे थोडे, तेही नीट कळत नाहीत, तो गानप्रकार भावगायन कसा? इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, भाव अनेक माध्यमांतून व्यक्त करता येते. हालचाली (अभिनय), रंग-रेषा, शब्द आणि अर्थातच सुर. सुरांतून भाव प्रकट होणं हे संगीत! (तो शब्दांतून प्रकट झाला तर ते काव्य. लयबद्ध हालचालीतून तो येतो नृत्य रूपाने, रंग-रेषांतून तो चित्रकलेत प्रकट होतो.) म्हणजेच कवितेच्या शब्दांतून भाव जिथं व्यक्त होतो, त्या सुगम संगीतात सूर केवळ साहाय्यक असतात. “जन पळ भर म्हणतिल हाय हाय, मी जाता राहिल कार्य का?” हा भाव आहे आणि तो शब्दमाध्यमानं व्यक्त केला, म्हणजे ही कविता आहे. या कवितेला चाल लावली तरी शब्द पुढे आणि सूर मागून येतात. याउलट शास्त्रीय गायनात भाव प्रकट करण्याची कामगिरी सूर करतात. सुरांनी अव्यक्त भाव रसिकमनापर्यंत पोचवताना शब्द फक्त जो भाव प्रकट होणार आहे, त्याची तोंडओळख करून देतात. यमन रागात सुप्रसिद्ध बंदिश आहे- “एरी आली पिया बिन, कल न परत मोहे घडी पल छिन.” बंदिशीचे हे शब्द फक्त सूचन करतात की, नायिका विरहिणी आहे. विरहावस्थेचा करुण भाव स्वरांनीच अनुभवाला आणून द्यायचा आहे. सूर एक-दुसऱ्याबरोबर गुंफून ‘स्वरमाला’ (स्वरावली) तयार करून, एकामागून एका अशा स्वरावली गाऊन त्या भावाचा अनुभव गायकानं द्यावा आणि श्रोत्यांनी तो घ्यावा, हे संगीत होय!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

संस्कृत ही आपली प्राचीन भाषा. या भाषेत निदान अडीच-तीन हजार वर्षांपासून साहित्यनिर्मिती होत आली आहे. वेद हे तर अतिप्राचीन साहित्य आहे. त्यामानाने पुढचा काळ जरी पाहिला तरी कालिदास, भवभूती, दंडी, शुद्रक अशा महान कवींची नाटकं १०००-१५०० वर्षांपूर्वीची आहेत. साहित्याबरोबरच साहित्याचं शास्त्रही आपल्या संस्कृतीत विकसित झालं. नाटकातून प्रेक्षकाला शेवटी आनंदाचा अनुभव कसा मिळतो, याचं खूप बारकाईनं निरीक्षण करून आपल्या आद्य शास्त्रकारांनी (भरतमुनी) रससिद्धान्त मांडला! नाट्य आणि साहित्य या कलांच्या संदर्भात हा सिद्धान्त मांडला गेला आहे आणि त्यावर विपुल उलट-सुलट चर्चा झाली आहे. या विषयावर अनेक प्राचीन भाष्यकारांचे भाष्य-ग्रंथ उपलब्ध आहेत. किशोरीताईंनी या सिद्धान्ताचा अभ्यास करून हा सिद्धान्त शास्त्रीय संगीताच्या बाबतीतही कसा खरा ठरतो, ते लक्षात आणून दिलं आहे.

कलाकाराला-आपण एका गायकाचा विचार करू- एका गायकाला जरी एखाद्या प्रसंगी स्वत:ला दु:खाचा अनुभव आला, तरी त्यामुळे लगेच त्याचं गायन श्रोत्याला दु:खाचा अनुभव देऊ शकत नाही. गायकाचं माध्यम म्हणजे स्वर, राग, लय, ताल या माध्यमातूनच त्याला आपला अनुभव व्यक्त करायचा असतो. संगीतासारख्या अमूर्त अशा माध्यमात जेव्हा कलाकाराला अनुभव उतरवायचा असतो, तेव्हा तो अनुभव त्याला स्वत:पासून वेगळा करावा लागतो. ती वेळ, तो प्रसंग, त्यामुळे दु:खित झालेला तो, हे सर्व कंगोरे वगळून निव्वळ दु:ख हा अनुभव गायक आपल्या गायनात उतरवतो आणि असं जेव्हा घडतं, तेव्हाच तो अनुभव श्रोत्यापर्यंत पोचतो. (त्या अमूर्त अनुभवामुळे श्रोत्याच्या मनात कोणती एखादी वेळ, कोणता एखादा प्रसंग जागा होऊ शकतो, ही गोष्ट वेगळी!) ज्या ज्या वेळी भावानुभव अशा निखळ, शुद्ध स्वरूपात अनुभवला जातो, तेव्हा त्याचा परिणाम आनंद हाच असतो. कोणत्याही व्यावहारिक व्याख्येत न बसणारा आनंद, ‘कलानंद’ (यालाच शास्त्रकार ‘रस’ म्हणतात!) आणि इथंच संगीत आध्यात्मिक बनते!

हे सर्व काही रागगायनात कसकसं घडतं ते किशोरीताईंनी आपल्या ग्रंथातील विविध प्रकरणांतून तपशीलवार उलगडून दाखवलं आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

स्वर हे कर्णमधुर तर असतातच, पण ते फक्त कर्णमधुर असतात असं नाही, तर त्याही पलीकडे ते भावरूप असतात. स्वर प्रावाहिक आहे, चैतन्यमय आहे हा किशोरीताईंचा स्वानुभव आहे. संगीतातील बराचसा व्यवहार हा फक्त सुरांच्या माधुर्यावरच चालतो, माधुर्यापर्यंतच मर्यादित राहतो. पण खऱ्या कलाकाराने त्या पलीकडे जाऊन स्वराची भावरूप अनुभूती घेतली आणि दिली पाहिजे. स्वरांच्या सौंदर्यातून मिळणाऱ्या सुखमय संवेदनेच्या पलीकडे असलेला भावानुभूतीचा कलानंद घेतला-दिला पाहिजे आणि हीच खरी भारतीय संगीतपरंपरा आहे, अशी किशोरीताईंची अनुभवसिद्ध धारणा आहे.

किशोरीताईंच्या या विचारांचा पडताळा आपल्याला त्यांच्या गायनात येतो. त्यांच्या गायनातून कुठेतरी एक अनीह स्वर्गीय अशा आनंदाची अनुभूती येते असे अनेक रसिक नि:संदेह सांगतात. “ही एका किशोरीला मिळालेली देणगी किंवा वरदान आहे, असं कोणी मुळीच समजू नये. स्वर इतके दयाळू आहेत की, जो जो कोणी त्यांना संपूर्ण शरण जातो त्या त्या साधकावर ते कृपा करतात. गुरूंच्या आशीर्वादामुळे मला सुरांच्या अगाधतेची निदान चाहुल लागली आणि मी मला जमली तेवढी, जमली तशी त्यांची आराधना केली. तुम्ही सुरांच्या अगाधतेचा वेध घ्या. मैफली, पैसा, कीर्ती सगळं ठीक आहे, पण त्या पलीकडे पहा-आपली भारताची संगीतपरंपरा अढळ ठेवा-” किशोरीताई अगदी मनापासून हेच सांगतात.

(‘चौफेर समाचार’, २०१५, या सांगलीहून प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकातील लेखाचं. पुनर्मुद्रण)

.................................................................................................................................................................

लेखक केशव परांजपे अभिनव कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (भाईंदर, मुंबई) इथं मुख्याध्यापक आहेत.

kdparanjape@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......