‘सनातन’ हे मूलतः धर्माचे विशेषण असल्याचे दिसते. हल्ली मात्र ते धर्माचे नाव म्हणूनच वापरले जात आहे...
पडघम - सांस्कृतिक
हरिहर सारंग
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 25 September 2023
  • पडघम सांस्कृतिक सनातन धर्म

‘सनातन धर्म’ याचा सर्वसाधारण अर्थ, प्राचीन काळापासून चालत आलेला आणि पुढेही चालू राहणार असलेला अर्थात शाश्वत धर्म असा केला जातो. नेमका अर्थ सांगायचा झाल्यास त्याची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे सांगता येईल : सन् + अत् + अन् + अच् या धातू आणि अव्ययांनी हा शब्द बनला असून त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे व्युतपादिता येतो : सन् - सदा किंवा नेहमी; अन् - श्वास घेणे किंवा जिवंत राहणे. अर्थात् नेहमीसाठी अस्तित्वात असणारा धर्म म्हणजे सनातन धर्म असे म्हणता येईल.

वरील अर्थावरून ‘सनातन’ हे मूलतः धर्माचे विशेषण असल्याचे लक्षात येते. हल्ली मात्र ते धर्माचे नाव म्हणूनच वापरले जात आहे.

आता धर्म म्हणजे काय, हे पाहिले पाहिजे. धर्माचा नेमका अर्थ सांगणे कठीण आहे. कारण या शब्दातून प्रत्येकाला अभिप्रेत असलेला अर्थ वेगवेगळा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांनी धर्माचे वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. असे असले तरी त्याची शक्य तितकी  सर्वसमावेशक व्याख्या करण्याचा प्रयत्न करूयात.

समाजाचे धारण होण्यासाठी धर्मात मुख्यतः पुढील बाबींचा समावेश होऊ शकतो - १) व्यक्ती -व्यक्तींमधील, व्यक्ती आणि समाज यांच्यातील, या दोहोंचा कोणत्या तरी अलौकिक शक्तीशी किंवा निसर्गाशी असलेला संबंध, २) हा सबंध नियमित करण्यासाठी विशिष्ट वर्तननियम, श्रद्धा, विश्वास किंवा विशिष्ट कर्मकांड. यातही वर्तनाच्या नियमाला विशेष महत्त्व आहे. मानवी समाजाला धारण करण्यासाठी समाजाने पूर्वीपासूनच काही नियम केलेले आहेत. यांनाच ‘धर्म अशी’ संज्ञा देता येईल.

समाजधारणेसाठी पूर्वीपासून बळ, दंड, शिक्षा, बक्षीस, भीती, लालुच यांचा वापर केला जातो. परंतु ‘धर्म’ या शब्दाने सकारात्मक अर्थ ध्वनित होणे अपेक्षित असते. त्यामुळे न्यायावर आधारित समाजधारणा करणाऱ्या वर्तन नियमांनाच धर्म मानणे संयुक्तिक असले पाहिजे. या अर्थाशी सुसंगत असलेले प्राचीन अर्थात् सनातन वर्तननियम हेच ‘सनातन धर्म’ या  नामाभिधानास पात्र राहायला हवेत. भगवान बुद्धांनी सनातन धर्माची उत्कृष्ट अशी व्याख्या केलेली आहे. ‘धम्मपदा’तील सदर व्याख्या अशी -

‘न हि वेरेन वैरानि सम्मन्तीध कुदाचनं।

अवेरेन च सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो।।’

अर्थात्- वैराने वैर कधीच शांत होत नाही, ते निर्वैरानेच  शांत होते । हाच सनातन धर्म आहे ।

वरीलवर्तननियम कालातीत आहे. म्हणूनच तो सनातन आहे, असे म्हणता येते. ‘मनुस्मृति’मध्येही (अध्याय चौथा) – ‘सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् न ब्रूयात् सत्यमप्रियम् । नासत्यं च प्रियं ब्रूयात् एष धर्मः सनातनः ॥’ अर्थात सत्य बोलणे हाच ‘सनातन धर्म’ असल्याचे प्रतिपादित केलेले आहे.

सध्या मात्र ‘सनातन धर्म’ म्हटले की आपल्यासमोर श्रौत - स्मार्त धर्मच प्रकटतो. म्हणजे श्रुती अर्थात वेदग्रंथ आणि स्मृतिग्रंथ यांच्यावर आधारित असलेला धर्म होय. वेद हे अपौरुषेय असल्याने ते अनादी अर्थात् सनातन आहेत. ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’ अर्थात् वेद हे धर्माचा मूलभूत स्रोत असल्याने आणि ‘पितृदेवमनुष्याणां वेदश्चक्षुः सनातनम् । अशक्यं चाप्रमेयं च वेदशास्त्रं इति स्थितिः ।।’ अर्थात् ‘वेद सदा पितृ व देवता व मनुष्यों के नेत्र हैं । वेद व शास्त्र दोनों संशय के योग्य नहीं हैं और न तर्क करने के योग्य हैं।’ म्हणूनच वेदशास्त्रजनित धर्मही सनातनच असला पाहिजे.

वर्तन नियम आणि कर्मकांड हे प्रामुख्याने वेदानुसारी स्मृतिग्रंथांचे विषय आहेत. त्यामुळे हे स्मृतिग्रंथच खऱ्या अर्थाने सनातन धर्माचे स्त्रोत मानले जातात. जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठत्वावर आधारित चातुर्वर्ण्य आणि त्यातही ब्राह्मणश्रेष्ठत्व हा स्मृतिग्रंथाचा प्राण आहे. या ग्रंथांनी व्यक्ती व्यक्तींमधील सबंध, त्यांच्यातील आंतरक्रिया आणि व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा, तसेच अधिकार निश्चित करण्यासाठी वरील तत्त्वांचाच आधार घेतल्याचे स्पष्ट होते.

याचाच अर्थ स्मृतिग्रंथातील वर्तन नियमांचा आधार मानवतावाद, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता नसून विषमता हाच आहे, हे अमान्य करण्यात अर्थ नाही. म्हणूनच स्मार्त धर्मानुसार सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे समाजघटकांतील वितरण हे जन्माधारित श्रेष्ठ-कनिष्ठत्वावर आधारित असल्याचे स्पष्ट होते.

स्मृतिग्रंथप्रणित धर्माचा सामाजिक न्याय किंवा मानवतावादी मूल्यांशी कधीही सबंध आलेला नाही. त्यामुळे स्मृतिग्रंथांवर आधारित सनातन धर्म मानवतेच्या विकासाला केव्हाच उपयुक्त ठरलेला नाही. आधुनिक काळाने आणि मूल्यांनी या धर्माला केव्हाच इतिहासात ढकलून दिलेले आहे.

भारतीय घटनेने या तथाकथित सनातन धर्माचे व्यावहारिक महत्त्व पूर्णपणे संपुष्टात आणले आहे. तरीही देशातील काही घटकांना या स्मृतिप्रणित सनातन धर्माचा अजूनही अभिमान वाटतो. एवढेच नव्हे तर त्याविरुद्ध बोलणाऱ्यांचा शिरच्छेद करण्याचे धर्मादेशही काढले जातात, याचे आश्चर्य वाटते.

उदयनिधी यांच्या वक्तव्यांवरून त्यांना कोणता ‘सनातन धर्म’ अपेक्षित होता, हे स्पष्ट होते. सामाजिक न्याय आणि समता यांना विरोध करणारा सनातन धर्म त्यांना अपेक्षित असल्याचे दिसून येते. आणि असा धर्म आज व्यवहारात अस्तित्वात नसला तरी त्याचा अभिमान बाळगणारे लोक आजही आपले अस्तित्व दाखवतात, असे त्यांना सुचवायचे असावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही स्मृतिग्रंथांवर आधारित हिंदू धर्म हा धर्म (Religion) नसून विधिनिषेध नियमांचा संग्रह आहे, असे म्हटलेले आहे. त्यामुळे असा धर्म नष्ट करण्यालायक असल्याचेही त्यांनी प्रतिपादित केलेले आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास-

“I have, therefore, no hesitation in saying that such a religion must be destroyed, and I say there is nothing irreligious in working for the destruction of such a religion.” (‘Annihilation of Caste’)

असे असले तरी सनातन धर्म म्हणजे स्मृतिग्रंथांवर आधारित धर्मच आहे, असे सर्वांनाच अभिप्रेत आहे, असे मानण्याचे कारण नाही. उपनिषदांचा अभ्यास केल्यास सनातन धर्माचे एक सकारात्मक रूप आपल्या लक्षात येते. हाच सकारात्मक सनातन धर्म महात्मा गांधी आणि देशातील अनेकांना अभिप्रेत असू शकतो.

अज्ञान आणि असत् यांच्यावर मात करून त्यापासून मुक्ती मिळवणे, हा औपनिषदिक सनातन धर्माचा उद्देश असतो. सदाचार आणि मानवतावादाचा अविष्कार ज्या धर्मातून प्रकट होतो, तोच सनातन धर्म असे भगवान बुद्ध, उपनिषदे आणि संतमंडळी यांचे प्रतिपादन असते. आणि म्हणूनच  ते स्मार्त धर्माला विरोध करणे अपरिहार्य असते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्मात मूलभूत परिवर्तन करण्याचे आवाहन करताना समता, बंधुता, स्वातंत्र्य या मूल्यांसाठी उपनिषदांचा आधार घेण्यास सुचवलेले आहे. उदयनिधी जेव्हा सरसकट ‘सनातन धर्म’ नष्ट करण्याचे आवाहन करतात, तेव्हा अशा सनातन धर्मियांना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतु असे सनातनधर्मीय उदयनिधी यांचा शिरच्छेद करण्याचे आदेश देणार नाहीत, असे धर्मादेश काढणारे स्मार्तधर्मीय सनातनीच असले पाहिजेत. आणि त्यांचा ‘सनातन धर्म’ हा केवळ देशासाठीच नव्हे, तर मानवतेसाठी घातकच ठरणार आहे.

.................................................................................................................................................................

लेखिक हरिहर सारंग माजी राज्यकर उपायुक्त आहेत.

harihar.sarang@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......