‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ : स्त्रीवादी जाणिवांचं प्रत्यक्ष कार्यरत रूप या पुस्तकाच्या रूपानं आपल्यासमोर येतं...
ग्रंथनामा - झलक
संध्या नरे-पवार
  • ‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 20 September 2023
  • ग्रंथनामा झलक अर्ध्या दुनियेच्या शिलेदार Ardhya Duniyechya Shiledar प्रवीण घोडेस्वार Pravin Ghodeswar

प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचं ‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ हे नवं पुस्तक नुकतंच पुण्याच्या अमित प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकांत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या २१ कर्तबगार स्त्रियांची ओ‌ळख करून दिली आहे. या पुस्तकाला पत्रकार संध्या नरे-पवार यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

वर्तमानपत्रातील सदरामध्ये स्त्रियांवर होणारं लेखन हे अनेकदा ‘सापडली स्त्री, टाक साच्यामध्ये’ या स्वरूपाचे असते. संबंधित स्त्रीची व्यक्तिगत आयुष्यातील यशस्वी वाटचाल एवढ्यापुरतेच असे लेखन मर्यादित असते. यातून अनेक स्त्रियांची नावं समाजाच्या पृष्ठभागावर आल्यासारखी वाटतात, पण त्यामुळे स्त्रीवादी जाणीव विकसित व्हायला मदत होत नाही.

‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ या प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या सदरामध्ये मात्र मानकरी स्त्रियांची निवड अतिशय विचारपूर्वक केलेली दिसते. लेखकाने एक विशिष्ट दृष्टीकोन मनाशी ठेवून यातील २१ स्त्रियांची नावे निवडल्याचे दिसते. वर्षभर चाललेल्या या सदरामधून आपल्याला काय सांगायचे आहे, हे लेखकाच्या डोळ्यासमोर स्पष्ट होते. त्यामुळे या सदराला एक बांधीव आकार आलेला आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांतील स्त्रियांची यशोगाथा एवढ्यापुरतं हे सदर मर्यादित न राहता, स्त्रीवादी विचारविश्वाचे वेगवेगळे पैलू या सदरामधून अधोरेखित होतात. किंबहुना स्त्रीवादी जाणीवेची जडणघडण कशी झाली, वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या स्त्रियांनी त्यात आपले योगदान कसे दिले, हे या सदरातील लेखांमधून स्पष्ट होत जाते.

स्त्रीवाद म्हटला की, पाश्चिमात्या स्त्रीवाद आणि त्यात योगदान देणाऱ्या पाश्चिमात्या स्त्रिया, हीच बाब आजही पुढे येते. अनेकदा भारतीय स्त्रियांच्या कार्याची चर्चाही पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या निकषांनुसार केली जाते.

‘भारतीय स्त्रीवाद’ नावाचे काही स्वतंत्र घटित आहे, याची जाण भारतातील उच्चजातीय मुख्य धारेतल्या स्त्रीवादी प्रवाहाला बराच काळ नव्हती. त्यामुळे स्त्रीवाद म्हटला की, पाश्चिमात्त्य स्त्रीवादाचे विचारविश्वच पुढे येत असे. वर्तमानपत्री मांडणीही त्याच धाटणीची असे. अनेक वेळा या पाश्चिमात्य स्त्रीवादाच्या विरोधी सूरही वर्तमानपत्री मांडणीतून उमटत असे.

समकालात तर स्त्रीवाद विरोधी उच्चार अधिक तीव्र आणि कर्कश झाला आहे. संस्कृतीरक्षणाच्या नावाने आपल्या प्राचीन परंपरांचे गोडवे गातानाच, स्त्रीवादाला पाश्चिमात्य ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे.

जातवर्णवर्गवर्चस्ववादी व्यवस्था ज्यांना कायम ठेवायची आहे, त्यांना ‘स्त्री-पुरुष समता’ हा शब्दच मान्य नाही. त्याकडे ते आपल्या महान प्राचीन परंरपेरचा विरोध, याच दृष्टीने बघतात. त्यांच्या मते आजही स्त्रीने गृहलक्ष्मी बनून कुटुंब सांभाळावे आणि राष्ट्राला गरज असेल तेव्हा दुर्गा बनत रस्त्यावर उतरावे वा संस्कृतीरक्षक सांगतील त्या शत्रूला नामोहरम करण्यात आपला वाटा उचलावा. जातवर्णवर्गवर्चस्ववादी व्यवस्था कायम राखण्यासाठी स्त्रीने केवळ पूरक भूमिका निभवावी.

या पार्श्वभूमीवर या लेखसंग्रहातील पहिलाच लेख अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे शीर्षक ‘भारतीय स्त्रीवादाचे मूळ आणि पाश्चिमात्त्य स्त्रीवादाचा प्रभाव’ असे आहे. प्रवीण घोडेस्वार लेखाची सुरुवात बुद्ध विचारप्रणालीने करतात आणि भारतीय स्त्रीवादाची मुळं कुठे कुठे पसरली आहेत, त्याचे दिशादिग्दर्शन करतात.

गौतम बुद्धांना अपेक्षित असलेल्या समाजरचनेत स्त्रियांना आर्थिक-आध्यात्मिक-धार्मिक-राजकीय स्वातंत्र्य आणि समानता होती. बुद्धांनी स्त्रियांच्या संघाला मान्यता देऊन भिक्षूंप्रमाणे भिक्षूणींनाही धर्मप्रसार करण्याची मुभा दिली होती. या भिक्षुणींना ‘थेरी’ असे म्हणत आणि या थेरींनी आपल्या अनुभवांचे केलेले कथन ‘थेरीगाथा’ या नावाने प्रसिद्ध आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘थेरीगाथा हा भारतीय स्त्रीवादाची मांडणी करणारा मौलिक ग्रंथ आहे’, हे प्रवीण घोडेस्वार पहिल्याच लेखात स्पष्टपणे सांगतात. भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीतील कार्यकर्ते व अभ्यासक यांनी थेरीगाथेकडे दुर्लक्षच केलेले आहे; मात्र प्रवीण घोडेस्वार थेरीगाथा हा भारतीय स्त्रीमुक्तीचा आद्य हुंकार आहे, अशी स्पष्ट भूमिका घेतात. ‘थेरीगाथा’ हा स्त्रीजीवनाविषयी समग्रपणे बोलणारा ग्रंथ आहे, या त्यांच्या मांडणीतून त्यांच्या पुढच्या लेखांचे विचारसूत्र काय आहे, ते स्पष्ट होते.

सनातनी, वैदिक मंडळीही वेदवाङ्मयातल्या गार्गी-मैत्रेयीचा दाखला देत भारतीय स्त्रीमुक्तीचे मूळ तिथे नेऊन जोडतात. पण त्यांची कोणतीही लिखित संहिता आज उपलब्ध नाही. मात्र दोन हजार वर्षांपूर्वींच्या थेरींच्या गाथा आज आपल्यासमोर आहेत. त्यांनी जगण्याविषयी, जगण्यातल्या दुःखाविषयी, स्त्री म्हणून येणाऱ्या अनुभवांविषयी, पती-पत्नी नात्याविषयी केलेले चिंतन, मुक्ततेविषयीचा त्यांचा उद्गार आज त्यांच्या गाथांच्या रूपाने आपल्या समोर आहे.

हा लिखित पुरावा केवळ गौरववादी भूमिकेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रवीण घोडेस्वार यांची थेरीगाथेला भारतीय स्त्रीमुक्तीचा आद्य हुंकार मानण्याची भूमिका वैदिकांच्या गौरववादी भूमिकेपेक्षा वेगळी आहे.

प्रवीण घोडेस्वार यांच्या भूमिकेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते सनातनी, गौरववादी मंडळींप्रमाणे पाश्चात्य स्त्रीवादाचा प्रवाह नाकारत नाहीत. उलट त्याचाही स्वीकार करत, या दोन्ही प्रवाहांचा एकत्रित विचार करतात. म्हणजे भारतीय स्त्रीवादाची मुळे शोधताना दोन्ही बाजू इतिहासाचा शोध घेत असल्या, तरी सनातनी मंडळी पाश्चात्य ते सारे हीन अशी कट्टरतावादी भूमिका घेतात, तर प्रवीण घोडेस्वार भारतीय स्त्रीवादाचं मूळ भारतीय मातीत, बुद्धविचारांमध्ये शोधतानाही उदारमतवादी भूमिका घेत पाश्चात्य स्त्रीवादाच्या योगदानाचे, त्यांच्या सैद्धान्तिक मांडणीचे, या सिद्धान्तनाच्या आधारे स्त्रीवादामध्ये निर्माण झालेल्या वेगवेगळ्या विचारप्रवाहांचे महत्त्व मान्य करतात.

खरे तर अशी तुलना करण्याचे काही कारण नाही. पण समकालात विविध भूमिकांची इतकी सरमिसळ होत आहे, सत्याचा इतका विपर्यास होत आहे, इतिहासाची इतकी मोडतोड केली जात आहे की, काही गोष्टी स्पष्टपणे सांगाव्या लागतात.

पाश्चात्य स्त्रीवादाला विरोध करत गार्गी-मैत्रेयीचा दाखला देणाऱ्यांचे ध्येय पुरुषसत्तेच्या शोषणाला विरोध करत स्त्री-पुरुषसमतावादी समाजरचनेची निर्मिती करणे, हे नसते. भारतीय स्त्रियांच्या मुक्तीच्या लढ्याला बळ देणाऱ्या भारतीय संविधानाविषयीही त्यांना प्रेम नसते.

याउलट आपल्या पहिल्याच लेखाचा समारोप करताना प्रवीण घोडेस्वार लिहितात- “थेरीगाथा-भारतीय संविधान आणि ‘सेकंड सेक्स’च्या तत्त्व नि विचारप्रणालीवर काम करणाऱ्या स्त्रियांच्या कार्य आणि योगदानाचा परिचय आपण या सदरातून करून घेणार आहोत.” म्हणजे आपल्या लेखसंग्रहासाठी आपण ज्या स्त्रियांवर लिहिणार आहोत त्यांची निवड कोणत्या आधारावर केलेली आहे, त्याची त्रिसूत्री ते स्पष्ट करतात.

‘द सेकंड सेक्स’ हा सिमोन दि बुव्हाने लिहिलेला ग्रंथ पाश्मिमात्य स्त्रीवादाचा मुख्य ग्रंथ मानला जातो. सर्वांगीण स्त्री-पुरुष समता आणि ती अस्तित्वात येण्यासाठी शोषणशासनाच्या व्यवस्थेत बदल हेच या त्रिसूत्रीचे उद्दिष्ट आहे. साहाजिकच हे सूत्र धरून कार्य करणाऱ्या स्त्रियांचे काम आणि त्यांचे आयुष्य हे नेहमीच्या यशस्वी साच्यातल्या स्त्रियांपेक्षा वेगळे असणार. हे वेगळेपण या लेखसंग्रहातील प्रत्येक लेखात आढळते.

या २१ स्त्रियांपैकी ५ स्त्रिया विदेशी आहेत. त्यांचं लेखन एक तर स्त्रीवादाची मूलभूत मांडणी करणारे आहे किंवा भारतातील दलित-अस्पृश्यांच्या स्थितीगतीचा मागोवा घेणारे आहे. मला आवड आहे म्हणून मी स्वैपाक करते, स्त्री आहे म्हणून नाही, असे सांगणाऱ्या लोरा ब्रुएक या अमेरिकेतल्या शिकागो विद्यापीठात हिंदी साहित्याच्या प्राध्यापक आहेत.

त्या दलित साहित्य, दलित स्त्रीवाद यांच्या अभ्यासक असून दलित साहित्य आणि लॅटिन-अमेरिकन साहित्य यातील साम्यस्थळांचा त्या अभ्यास करतात. स्त्रीवाद हा समलैंगिकतेच्या, अल्पसंख्याकांच्या अधिकारांशी, लहान बालकांच्या अधिकारांशी, कामाशी संबंधित अधिकारांशी जोडलेला आहे, अशी स्त्रीवादीची व्यापक मांडणी करतात. बंदुकीचे नियंत्रण हीदेखील एक स्त्रीवादी बाब आहे, हेही त्या अधोरेखित करतात. यातूनच या सदराचं ‘टिपिकल’ नसणं स्पष्ट होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘द सेकंड सेक्स’ हा स्त्रीवादीची पायाभूत मांडणी करणारा ग्रंथ लिहिणारी सिमोन द बुव्हा आणि ‘सेक्शुअल पॅलिटिक्स’ या ग्रंथामध्ये दोन लिंगांमधील द्वंद्व या भूमिकेतून स्त्रीच्या दुय्यमत्वाची मांडणी करणारी केट मिलेट, या दोघींचाही समावेश या सदरामध्ये आहे.

पर्यावरण-प्रदूषण आणि सर्वसामान्य कामगार यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर रस्त्यापासून ते न्यायालयापर्यंत संघर्ष करणाऱ्या बांगलादेशच्या सईदा रिझवाना हसन हे भारतीयांसाठी अपरिचित असलेलं नाव या सदराच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतं.

आंबेडकरवादाच्या अभ्यासक एलिनॅर झेलिएट हे नाव महाराष्ट्रातील अभ्यासाच्या क्षेत्रात परिचित असले, तरी सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांची ओळख करून देणे आवश्यक आहे. एलिनार संतसाहित्यही अभ्यासत होत्या. संत एकनाथ व संत चोखामोळा यांच्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमधून शोधनिबंध सादर केले होते.

स्त्रियांचे अधिकार आणि पर्यावरण, यातील नातं स्पष्ट करणाऱ्या सोमालियातील फातिमा जिब्रेल यांची या सदरातील ओळख स्त्रीवादाचे नवे आयाम विकसनशील राष्ट्रांतील कार्यकर्त्या महिलांकडूनच पुढे येतील, हे ठळक करते.

भारतीय नावांमध्ये मणिपूरच्या इरोम शर्मिला या नावाच्या सोबतीनेच काश्मीरमधील महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या आणि त्यातच जिचा अंत झाला, त्या आसिया जिलानीच्या कार्याची ओळखही होते. फुले-शाहू-आंबेडकर-गांधी-मार्क्स यांच्या विचारांनुसार काम करणाऱ्या अनिता पगारेंबरोबरच प. बंगालमध्ये जन्मून अफगाणिस्तानातील तरुणाशी विवाहबद्ध होऊन अफगाण स्त्रियांच्या हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या आणि तालिबान्यांकडून मारल्या गेलेल्या सुष्मिता बॅनर्जी यांची माहिती आपल्या स्त्रीवादी जाणिवा विकसित करण्यासाठी महत्त्वाची आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भगिनीभाव म्हणजे नेमके काय, हे सुष्मिता बॅनर्जी यांच्या कामातून स्पष्ट होते. पुस्तकी व्याख्यांपेक्षा ही अशी जिवंत उदाहरणं आजच्या तरुण पिढीपर्यंत, सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आज धर्माच्या नावावर एकारलेलं वातावरण निर्माण केलं जात आहे. अशा हिंसक वातावरणात धार्मिक कट्टरतावाद्यांकडून, तालिबान्यांकडून मारल्या गेलेल्या सुष्मिता बॅनर्जी यांच्या कार्याची चर्चा होणं महत्त्वाचं आहे.  

७५ वर्षांत देशाची जी जडणघडण झाली, त्यात अनेक महिलांचं योगदान आहे. विशेषतः स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्यचळवळ आणि स्वातंत्र्यानंतरची सुरुवातीची देश उभारणीची वर्षं, या कालखंडात अनेक महिला कार्यरत होत्या. स्त्री अभ्यासाचं क्षेत्र वगळता या स्त्रियांच्या योगदानाची दखल वर्तमानपत्री लेखनात क्वचित घेतली जाते. प्रवीण घोडेस्वार मात्र अनुसया साराभाई, लीला सेठ, हंसा मेहता, सलमा सिद्दीकी, रमणिका गुप्ता, जाई चंदीराम, रजनी तिलक या वेगवेगळ्या क्षेत्रांतील महिलांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांचं महत्त्व विशद करतात. पांडवानी गाणाऱ्या तिज्जनबाईचा विद्रोह ते विसरत नाहीत. दलित समाजातून येऊन उद्योगाच्या क्षेत्रात खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या कल्पना सरोजही आपल्याला या लेखसंग्रहात भेटतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

वृत्तपत्रीय सदरलेखनाचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. विशिष्ट अशा अभ्यासविषयाची, त्यातल्या विविध विचारप्रवाहांची माहिती नसलेल्या अनेकांच्या हाती वर्तमानपत्र जातं. वर्षभर चालणाऱ्या सदरामधून संबंधित विषयाची प्राथमिक माहिती लोकांना होते. ज्यांना त्या विषयात अधिक रस वाटतो, अशी मंडळी मग अधिक संदर्भवाचन करून आपल्या जाणीवा विस्तारतात. हे एक प्रकारचं लोकशिक्षण असतं.

गंभीरपणे लिहिलेल्या सदराचा विद्यार्थीवर्गाला विशेष लाभ होतो. कारण त्यातून पाठ्यपुस्तकाबाहेरचे अनेक संदर्भ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. या दृष्टीनेही प्रवीण घोडेस्वार यांचं हे सदर महत्त्वाचं आहे. सखोल अभ्यास केल्यावरच हाती गवसतील असे अनेक संदर्भ यात आहेत. उदा. अनुसया साराभाई यांनी १९१४मध्ये सलग ३६ तास काम करणाऱ्या महिलांचे कामाचे तास कमी व्हावेत, त्यांच्या मजुरीत वाढ व्हावी, यासाठी आंदोलन केलं होतं.

तसंच साठच्या दशकात कोळसा कामगारांना संघटित करत बिहारच्या राजकारणात उतरलेल्या रमणिका गुप्ता उत्तर आयुष्यात पत्रकार म्हणून काम करु लागल्या आणि दलित-आदिवासी-स्त्रिया यांचे प्रश्न आपल्या ‘युद्धरत आम आदमी’ या नियतकालिकातून मांडू लागल्या. हे असे छोटे छोटे संदर्भ संबंधित कालखंडात घडणाऱ्या घडामोडींमागची वैचारिकता स्पष्ट करतात.

स्त्रीवादी जाणिवांचं प्रत्यक्ष कार्यरत रूप या पुस्तकाच्या रूपानं आपल्यासमोर येईल.

या पुस्तकाला माझ्या शुभेच्छा!

‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’ : प्रा.डॉ. प्रवीण घोडेस्वार

अमित प्रकाशन, पुणे | मूल्य - २०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......