“उत्तम जमलेल्या मैफलीत एक विलक्षण आनंद मिळतो. कधीकधी तर असाही अनुभव येतो की, कुणी ‘दुसरं’च गात आहे आणि ‘आपण’ ते ऐकतो आहोत.” - मालिनीबाई राजूरकर
संकीर्ण - पुनर्वाचन
रोहिणी गोविलकर
  • मालिनीताई राजूरकर यांच्या गातानाच्या विविध मुद्रा आणि ‘स्वरभाषिते’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 20 September 2023
  • संकीर्ण पुनर्वाचन मालिनीताई राजूरकर Malini Rajurkar स्वरभाषिते Swarbhashite हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका Hindustani classical singer ग्वाल्हेर घराणे Gwalior Gharana ख्याल Khyal टप्पा Tappa

ग्वाल्हेर घराण्याची संगीत परंपरा अत्यंत सुरेलपणे पुढे नेणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका मालिनीताई राजूरकर यांचं नुकतंच निधन झालं. त्यांना ख्याल, टप्पा गायकी, ठुमरी आणि नाट्यसंगीत यांसाठी ओळखलं जातं. कमालीच्या प्रसिद्धीपराङमुख असलेल्या मालिनीताईंची दीर्घ मुलाखत रोहिणी गोविलकर यांच्या ‘स्वरभाषिते’ या नुकत्याच अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकात आहे. तिचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी किंवा जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी माणूस अनेक वाटांनी जाऊन बघतो. तुम्ही संगीताची वाट याच हेतूनं निवडली का?

- खरं तर असं काही घडलं की नाही, ते काही सांगता येणार नाही. लहान मूल शाळेत जातं, तेव्हा ते भाषा, गणित, चित्रकला आणि संगीत असे सगळेच विषय शिकत असतं. अजमेरच्या आमच्या शाळेतही इतर विषयांसारखाच ‘संगीत’ हा एक विषय होता. त्याला काही खास स्थान नव्हतं. त्यामुळे तेव्हा जीवनाचा अर्थ वगैरे शोधण्याचा काही प्रश्नच नव्हता.

माझ्या भावाचं आणि बहिणीचं गाण्याचं शिक्षण अजमेरमधील असुरक्षित वातावरणामुळे थांबलेलं होतं. मी पंधरा-सोळा वर्षांची झाले, तेव्हा माझ्या काकांनी वडिलांना सांगितलं की, ‘प्रभाला ताला-सुराची समज जरा बरी दिसतेय, तर तिला गाणं शिकू द्या. तुमची इच्छाही तुमच्या मुलांनी गाणं शिकावं अशी होतीच ना! त्या वेळी ‘गाणं शिकणं’ यामध्ये व्यावसायिक हेतू काहीच नव्हता. तो काळ म्हणजे बालगंधवांच्या नाट्यपदांच्या मोहिनीचा काळ होता. माझे वडील, काका, आई हे तिघेही उत्तम हार्मोनियम वाजवायचे. हे वाजवणं केवळ स्वतःच्या मनोरंजनासाठीच होतं. गावातल्या इतर मंडळींवर जेवढी नाट्यसंगीताची मोहिनी होती, तेवढीच माझ्या काकांवर, वडिलांवरही होती. नाट्यपदांच्या अनुषंगानं बागेश्री, भीमपलासी, यमन असे अनेक बेसिक राग ओळखता यायचे. माझे वडील घरातच अधिक रमायचे.

मनोरंजनासाठी जे काही करायचं ते घरातच, त्यामुळे आम्हा भावंडांना जे संगीताचे संस्कार लाभले ते घरातच. सर्वांनाच तालासुराची उत्तम जाण तेव्हापासूनच आहे. गायनशाळेचं रीतसर शिक्षण पुढे चालू झालं. पण त्यापूर्वी शाळेतल्या गाण्याच्या तासाला आम्हाला एखादा छोटा ख्याल, त्याचे दोन-चार आलाप, ताना शिकवल्या जायच्या. इतर मुलांसारखंच, तेवढंच गाणं मी तेव्हा शिकले.

त्या वेळेस आपल्याला पुढे गाणंच शिकायचं असं मनात नव्हतं. काकांच्या म्हणण्याप्रमाणे पंधरा-सोळाव्या वर्षी वडिलांनी मला रीतसर 'अजमेर संगीत शाळेत' दाखल केलं तिथले प्राचार्य होते पं. गोविंदराव राजूरकर. तेच पुढे माझे सासरे झाले. माझ्या शालेय संगीत शिक्षणाची शेवटची दोन वर्षं पूर्ण करण्यात मला माझे मानस भाऊ शमी, शरद, व वसंत चांदोरीकर यांची खूपच मदत झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षणाची एकेक पायरी ओलांडत बी.ए. पदवीसारखी ‘संगीतनिपुण’ ही पदवी मी मिळवली. या पदवीला ‘पदवी’ म्हणण्यापलीकडे फारसा अर्थ नव्हता. एकूण गाणं फार कमी शिकता यायचं. त्यामुळे संगीताचं पुरेसं ज्ञानसुद्धा आम्हाला तेव्हा नव्हतं. एखाद राग गायचा असेल, तर वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याची मांडणी कशी करावी याची एक ढोबळ कल्पनाच केवळ आम्हाला पदवीपर्यंत प्राप्त झाली होती. माझ्या पदवीच्या तिसऱ्या वर्षापासून मला गुरुजींनी (पं.राजूरकर) गाणं शिकवलं. जे पुढे चार-पाच वर्षं चालू राहिलं. या सर्व काळात जीवनाचं ध्येय, जीवनाचा आनंद, गाणं शिकण्याचा उद्देश यापैकी कशाची मला आधी कल्पनाही नव्हती. त्यामुळे खूप विचार करून मी गाण्याकडे वळले असं काही झालेलं नाही. माझ्या आयुष्यात गाणं सुरू झालं, पण ते मी सुरू केलं नव्हतं..

खरंतर आमच्या घरातली परंपरा होती ती गणिताची! वडील, काका, भाऊ सर्वच गणिती ! मला तर गणिताची विलक्षण आवड होती. गणितात खूप पुढे जावं आणि गणिताचा प्राध्यापक व्हावं असं माझं स्वप्न होतं. प्राध्यापक होता आलं नाही, तर बँकेत मोठी ऑफिसर व्हावं, असंही मला त्या काळात वाटायचं. अजूनही माझं गणिताबद्दलचं प्रेम अजिबात संपलेलं नाही. मला गणितं आठवतात. एखादी मैफल उत्तम झाली की, मला जेवढा आनंद होतो, तेवढाच आनंद एखादं गणित आज सोडवता आलं तर होतो. तीस-बत्तीस वर्षांनंतरही आपण गणिताला विसरलेलो नाही, याचाच मला खूप आनंद होतो. पण माझ्या दैवानं माझं नातं गाण्याशी बांधून टाकलं. विविध गानस्पर्धांमध्ये मी बक्षिसं मिळवली. राज्यपातळीवर गाण्यात प्रथम क्रमांक मिळाला आणि म्हणून मला संगीत शिक्षणासाठी दोन वर्षांची सरकारी शिष्यवृत्ती मिळाली.

याच दरम्यान मी व माझ्या गुरुजींचे पुतणे वसंतराव राजूरकर यांनी लग्न करायचे ठरवलं होतं. माहेरच्या सासरच्या दोन्हींकडच्या लोकांचा या लग्नाला अजिबात विरोध नव्हता. मात्र आईचं म्हणणं होतं की, ‘आधी शिष्यवृत्ती मग लग्न’. सासरची सगळीच मंडळी गाणारी. वसंतराव राजूरकरही संगीत शिक्षकच होते. शेवटी गुरुजींच्या सांगण्यानुसार शिष्यवृत्ती देणाऱ्याचं बंधन होतं की, ‘अमुक अमुक गुरुंकडेच गाणं शिकायचं.’ मी त्याला स्पष्ट शब्दांत नकार दिला. ‘मी इतकी वर्ष ज्यांच्याकडे गाणं शिकले, त्यांना सोडून दुसऱ्या गुरुकडे मी शिकायला जाणार नाही!’ शेवटी त्यांनी मला अजमेरात राहून गुरुजींकडेच गाणं शिकण्याची परवानगी दिली.

नक्की कसं स्वरूप होतं त्या शिष्यवृत्तीचं?

- ही दोन वर्षांची पूर्ण वेळची शिष्यवृत्ती होती. त्या काळात महिन्याला दोनशे रुपये मिळायचे. या शिष्यवृत्तीच्या काळात गाण्याव्यतिरिक्त इतर काहीही करायला परवानगी नव्हती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तुमच्या गुरुजींनी तुम्हाला सून म्हणून स्वीकारताना तुमच्या गाण्यातल्या बुद्धिमत्तेचा अधिक विचार केला होता का?

- छे! तसं काहीच नव्हतं. त्यांच्या परवानगीपूर्वीच आम्ही लग्न ठरवलेलं होतं. राजूरकरांच्या मनात मात्र असं निश्चितच होतं की, ‘ही चांगली गाणारी आहे. आणि तिचं गाणं मी टिकवेन’ व त्यांनी ते निभावलं, पण सून व शिष्या या दुहेरी नात्यांमुळे मला पुढे फार मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागलं.

वसंतराव राजूरकरांचं गाण्याचं शिक्षण कुणाकडे झालं होतं?

- माझे गुरुजी आणि हे या दोघांचंही गाण्याचं शिक्षण ग्वाल्हेरच्या राजाभैया पूँछवाल्यांकडे झालं होतं. तसेच श्री. प्रभाकर चिंचोरे यांच्याकडे पण राजूरकर खूप शिकले. श्री व सौ. चिंचोरे हे आम्हा उभयतांचे फार मोठे श्रद्धास्थान आहे. 'यांच्याही गाण्याच्या सर्व परीक्षा देऊन झाल्या होत्या. त्यांची ग्वाल्हेरला तीन-चार वर्षे गायन शाळाही होती. यांच्यासारखीच गुरुजींनाही माझ्या गाण्याची कुवत कळली होती. वर्गातल्या सात-आठ जणांमध्येही ते मला खास वेगळं शिकवायचे. विद्यार्थ्यांच्या कुवतीनुसार त्याला पचवता येईल एवढंच गाणं गुरुजी शिकवायचे. त्यांची शिकवण्याची हातोटी फारच सुंदर होती. विद्यार्थी तयार करणं ही त्यांची खासियत होती.

शिष्यवृत्तीचा दीड वर्षाचा काळ लोटल्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर सहा महिने मी अजमेरलाच होते, नंतर हैद्राबादला आले. तिथून आमच्या संसाराला आणि गाण्याला सुरुवात झाली.

मालिनीबाई, अजमेर-हैद्राबाद हा काय संबंध आहे?

- वसंतराव राजूरकर हैद्राबादला ‘गव्हर्नमेंट म्युझिक कॉलेज’मध्ये संगीत शिक्षक होते. हैद्राबादला येताना मनात विचार होता की, आपण पुन्हा गणित शिकू, एम.एस्सी करून कॉलेजमध्ये प्राध्यापक होऊ, पण हैद्राबादला आले आणि जे गाणं सुरू झालं ते आजपर्यत. वसंतराव राजूरकरांना गणितात फारसा रस नव्हता आणि मला गाणं व गणित या दोन्ही आघाड्या सांभाळणं शक्य नव्हतं त्यामुळे शेवटी यांच्या इच्छेप्रमाणे मी गाणं करायचं ठरवलं.

गाणं आणि गणित यांच्यात काही आंतरिक संबंध आहे का हो? आणि असलाच तर तो तुम्हाला कसा जाणवतो?

गाण्यामध्ये गणित असतंच की. तालामध्ये जजमेंटचा जो भाग असतो तो म्हणजे गणितच. गणितामध्ये ‘लॉजिकल थिकिंग’चा जो भाग असतो तो गाण्यालाच नव्हे, तर सगळ्या आयुष्यालाच उपयोगी पडतो. आता बघा ना, माझे साथीदार आणि गणितज्ज्ञ श्री. अरविंद थत्ते यांची विचारसरणी मला अतिशय पटते. एखाद्या गोष्टीबद्दल मला काही निर्णय घेता येत नसेल, तेव्हा मी थत्तेंना विचारते, “थत्ते, हे मी म्हणतेय ते बरोबर की चूक!’ थत्ते एकदम थेट काय ते उत्तर देतात. त्यांच्या विचारांमध्ये कसलाच घोळ नसतो, असे माझे मत आहे. हा सगळा गणिताचा प्रभाव.

सात-आठ वर्ष गाणं शिकल्यावर, शिष्यवृत्ती मिळून गाणं शिकल्यावर तरी ‘गाणं’ या प्रकाराची संगीतकलेची ताकद तुम्हाला कळली होती का? गाण्यानं मला काहीतरी दिलं आहे, माझं जगण्याचं क्षितिज जरा व्यापक होतं आहे, असं तुम्हाला वाटत होतं का? गाण्याशी तुमचा लगाव निर्माण झाला होता का?

- गाण्यात मला आनंद नव्हता असं नाही. शाळेत असताना आई तर अनेकदा म्हणायची की, ‘गाणं सोडून बाकी सगळ्या विषयात तू नापास होशील.’ अभ्यास कर म्हटलं की, मी फक्त गाण्याचाच रियाज करायची. गाणं म्हणताना मला आनंद व्हायचाच, पण त्यामुळे संगीताशी माझा काही विशेष लगाव निर्माण झाला होता, असं म्हणता येणार नाही. संगीत हेच आपले क्षेत्र आहे हे कळण्याचंही ते माझं वय नव्हतं. मी थोडी बावळटच होते म्हणा ना! कदाचित बाहेर जाऊन गाणं म्हणणंही तेव्हा न झाल्यानं गाण्याची म्हणून एक वेगळी जाणीव तेव्हा निर्माण झाली नसेल. ‘गाताना आनंद मिळतो’ एवढंच मला तेव्हा पुरेसं वाटत होतं. आपण कधी मैफली करू असा विचार माझ्या मनात यावा असं आमच्या घरातलं वातावरण नव्हतं. त्यामुळे ‘गाणं’ हेच आपलं जीवनाचं ध्येय वगैरे असावं असं मला तरी त्या काळात वाटणं शक्यच नव्हतं. गाण्यात मी काय करू शकते, हेही मला जिथे माहीत नव्हतं, तिथे गाण्यानं आनंदाव्यतिरिक्त इतर काही मला दिलं आहे किंवा गाणं मला घडवतंय, हे ओळखण्याची शक्यताही माझ्या बाबतीत संभवली नाही.

गुरुजींकडे गाणं शिकतानाच्या काळातला, तुमच्या गाण्यामुळे गुरुजींना झालेल्या आनंदाचा एखादा प्रसंग तुम्हाला आठवतो का?

- नाही, कारण गोविंदराव राजूरकरांचं घराणं ग्वाल्हेरचं. ते अगदी टिपिकल होते. विद्यार्थ्याला काही येतंय, हे त्याच्या तोंडावर सांगण्याची त्यांची पद्धत नव्हती. एखाद्या गोष्टीमुळे झालेला आनंद उघडपणे दाखवण्याची त्यांची रीत नव्हती. पण माझ्या मागे आई-वडिलांकडे, गायन-शाळेतल्या शिक्षकांकडे माझ्या गाण्याबद्दल ते बोलायचे. गुरुजीच काय पण माझ्या आई-वडिलांनीही कधी माझ्या तोंडावर तारीफ केली नाही. आणि ते एका अर्थानं योग्यच झालं, असं मला वाटतं. मात्र गाणं शिकायला सर्वांत जास्त बढावा माझ्या आईनं मला दिला. ती म्हणायची की, ‘आता तुला सरकारचा पैसा मिळतोय. त्याचा योग्य उपयोग झालाच पाहिजे. गुरुजी जसं शिकवतात तसं गाता आलंच पाहिजे. नाहीयेत म्हणजे काय? प्रयत्न कर. तुझ्यात कुवत आहे म्हणूनच तुला गुरुजी शिकवतायत ना? मग खूप मेहनत घे, पण चांगलं गाणं शिक.’ आईनं हे केलं नसतं, तर मी एवढी मेहनत घेतली असती की, नाही कोण जाणे. माझ्या गाण्यात माझ्या आईचा (शारदाबाई वैद्य) खूपच मोठा वाटा आहे. माझी आईही चांगल्या तालासुरात भजनं गायची.

या सगळ्या काळात फक्त ग्वाल्हेर गायकीचंच शिक्षण तुम्हाला मिळालं का?

- त्याचं काय आहे की, शिकायला सुरुवात केली, तेव्हा ‘घराणं’ वगैरे गोष्टीचं मला काहीच ज्ञान नव्हतं. माझ्या आई-वडिलांनाही गाण्याची आवड होती, होतं, पण त्यांनाही घराण्याशी काही मतलब नव्हता. मात्र माझे गुरुजी ग्वाल्हेरवाले, गायन शाळेचे शिक्षकही ग्वाल्हेर घराण्याचेच आणि परीक्षकही असायचे ग्वाल्हेरचेच. म्हणून प्रामुख्यानं ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचीच तालीम मला मिळाली. शिकवताना आम्हा विद्यार्थ्यांना कोणी असं सांगायचं नाही की, ही ग्वाल्हेर घराण्याची पद्धत आहे. पण एका विशिष्ट पद्धतीनं रागाची बढत कशी करायची, आलाप, ताना कशा घ्यायच्या, हे शिकवायचे. पण गुरुजी ग्वाल्हेरचेच असल्यामुळे साहजिकच कॉलेजमध्ये ग्वाल्हेर गायकीनुसार शिक्षण पद्धती होती.

तुम्ही स्वतःहून इतर कोणाचं गाणं ऐकत होतात का?

- त्या काळात अजमेरमध्ये गाण्याच्या मैफली फार क्वचितच होत असत. जास्तकरून रेडिओवरच सगळ्यांचं गाणं ऐकायचं. पं. भीमसेन जोशींची प्रत्यक्ष मैफल मी खूपच उशिरा ऐकली. मात्र शिष्यवृत्तीच्या पैशातूनच मी थोडेसे पैसे साठवून ठेवायची आणि मुंबईहून ७८ एम.एम.च्या साडेतीन रुपयांना एक या भावानं मिळणाऱ्या रेकॉर्ड्स मागवून घ्यायची. पण रेडिओमुळे ज्यांचं गाणं ऐकलं होतं, त्यांच्याच रेकॉर्ड्स मी मागवायची. खासकरून कुमार गंधर्वांच्या. सगळेच म्हणायचे की, ‘लहान वयात तो कुमार गंधर्व काय गातो बघ.’

माझे आई- बडील मूळचे इंदूरचे. त्यांना कुमार गंधर्वांचं विशेष प्रेम. म्हणून त्यांच्या रेकॉर्ड्स, कॅटलॉग वाचून स्वत:च्या आवडीचे राग म्हणजे यमन, मारवा, मालकंस, शंकरा मागवायचे. तेव्हा आर्थिक परिस्थिती खास नव्हती. एक छोटासा ग्रामोफोन होता. त्यावर त्या तबकड्या वाजवायच्या. आमच्या शेजारच्या एका मानलेल्या भावानं - श्री. वसंत पंडित - ज्यांचं इलेक्ट्रिकल वस्तूच दुकान होते, एक पिक-अप त्या ग्रामोफोनच्या सुईला बसवून दिला, ज्यामुळे मी एखादी रेकॉर्ड कधीही कुठेही थांबवू शकायची. त्यामुळे शांतचित्ती गाणं ऐकू शकायचे...

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मैफलीचं गाणं नेमकं केव्हा सुरू झालं?

- शिष्यवृत्तीच्या काळातच अजमेरला माझा पहिला जाहीर कार्यक्रम झाला. गुरुजी म्हणाले की, ‘इथून पुढे तू कुठे जाशील काही कल्पना नाही. गाणं चालू ठेवशील की नाही, हेही सांगू शकत नाही. तर तू इथल्या गणपती समोर गा!’ गायला सुरुवात करताना माझ्या डोक्यात काहीच ठरलेलं नव्हतं. काय गायचं - काय नाही, यावर कसलाच विचार मनाशी नव्हता. समोर बसलेले गुरुजी सांगत गेले आता हे गा, मग ते गा, आणि मी गात गेले. जवळजवळ रात्री साडेनऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत गायले.

एखादा नट जसा काही काळासाठी ‘दुसरं’ कुणीतरी झालेला असतो. आणि तसं होतानाच ते दुसरं आणि तो स्वतः यांच्यामध्ये एक देवघेव चालू असते. गाण्याच्या बाबतीत नेमकं काय होतं?

- गाण्यातही तसंच असतं. मी व्यक्ती म्हणूनही असते. गातानाच मी गायिकेची भूमिका करत असते असं म्हणा ना! भूमिका करायची तर त्या भूमिकेचा मनोभाव व्यक्त करण्यासाठी एकाग्रता लागते. स्वतः एकाग्रतेनं गाण्यात रमले की, मी ‘व्यक्ती’ म्हणून जाणीव राहत नाही. जोपर्यंत एकाग्र होत नाही. तोपर्यंत ही जाणीव असते. गाण्याच्या क्षणी प्राधान्य असतं ते गाण्यालाच! अर्थात स्वतःला क्षणकाल विसरून गाण्याशी तादात्म्य पावण्याची संधी वारंवार येत नसते. नेहमीच्या सरावानं मैफली केल्या जातात ते सोडा! पण जेव्हा गायक गाण्याशी एकरूप होतो, तेव्हा खूपदा असं वाटतं की, हा गातोय तो राग संपूच नये. माझ्या बाबतीत सांगायचं, तर मैफलीच्या सुरुवातीला पंधरा-वीस मिनिटं मी खूप नर्व्हस असते. तेवढ्या वेळात सगळीकडे लक्ष जातं. लोकांच्या चेहऱ्यावरचे भावही कळतात. पण एकदा गाणं जमायला लागलं की, मी हळूहळू मोकळी होते आणि मला एकाग्रता साधू लागते. असं नर्व्हस किंवा स्वतःबद्दल साशंक असण्यास एक मोठं कारण मला असलेल्या अनेक अॅलर्जी हे पण आहे.

अशी एकरूपता जेव्हा तुम्हाला साधते, तेव्हा ‘मालिनी राजूरकर’ यांचे विचार, भावना, त्या दिवसातल्या एखाद्या प्रसंगाची आठवण या सगळ्या गोष्टी विरून जातात का?

- तुम्ही म्हणता तशा या गोष्टी विरून जातात की नाही, हे सांगणं थोडंसं अवघड आहे, पण गाताना गाणं सोडून कुठलेही विचार मनात असले किंवा आले तर गाण्यातल्या ‘सुसंगतता’ एकसूत्रताला बाधा येते. पण एक गोष्ट मात्र खरी की, उत्तम जमलेल्या माझ्या मैफलीत मला स्वतःला एक विलक्षण आनंद मिळत असतो. मी स्वतः गाते आहे याची जाणीवही उरत नाही. कधीकधी तर असाही अनुभव येतो की, कुणी ‘दुसरं’च गात आहे आणि ‘आपण’ ते ऐकतो आहोत. मधूनच कधीतरी असा काही सूर लागतो की, त्या वेळेस समोरचे लोक काय, मालिनीबाई काय, राग काय, कसलाच विचार डोक्यात नसतो. सर्वत्र भरलेला असतो तो एक विलक्षण नाद! आणि नादच केवळ!

प्रत्येक मैफलीला जाण्यापूर्वी आपण कुठे गाणार आहोत, त्यानुसार काही आराखडा मनाशी तयार असतो का?

प्रत्येक वेळेस नसतो, पण बऱ्याच वेळा असतो. यामध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार असतो बघा! एखाद्या गावात शहरात जर गायचे असेल, तर विचार करावाच लागतो की, वेगळं काहीतरी गायला हवं. कधीतरी आतूनच असं वाटतं की, आज हाच राग म्हणूया! मग तो गाते. आजकाल बऱ्याच वेळा मी साथीदारांनाच विचारते की, आज काय गाऊ? कारण त्यांचाही काही ऐकण्याचा मूड असतो. काही वेळेला इतर व्यवधानं एवढी असतात की, मुळात आपण गाणार आहोत याचा ‘स्वीच ऑन-स्वीच ऑफ’सारखा विचार करून मला त्या भूमिकेत शिरावं लागतं. अशा वेळेस माझे साथीदार मला काही सुचवतात, काही राग माझ्या मनाशी येतात, मग त्यातून काही निवड करून मी गाते. जर ‘श्रोतावर्ग’ शास्त्रोक्त गाण्याशी अजिबात ओळख नसलेला असला तर मात्र मी त्यांना रुचेल, पचेल व आवडेल अशा पद्धतीनं पण शास्त्रोक्तच गायन गाण्याचा प्रयत्न करते.

पं. गिंडे व पं. कुमार गंधर्व यांचे तुमच्या गाण्यावर झालेले संस्कार जरा सविस्तर सांगू शकाल का?

- पं. गिंड्यांचा आणि राजूरकरांचा ऋणानुबंध अनेक वर्षांचा! राजूरकरांमुळे माझा त्यांचा संबंध आला. ते मला वडिलांसमानच! त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. श्री. गिंडे यांच्याकडून मला राग मांडणी, बंदिशीची लय, तसेच बंदिशीचं व्यक्तिमत्त्व काय असतं, हे समजलं व श्री. जितेंद्र अभिषेकी व श्री. कुमारजी यांच्या गाण्यातून मला रागांची प्रगल्भता, रागांकडे बघण्याची वेगळी दृष्टी, सूर लावणे, या सर्व गोष्टी विचारात घेण्याचे विचार व दृष्टी मिळाली.

माझं गाणं एखाद्या गावी असलं व जर श्री. गिंडे तिथे असले तर ते आवर्जून गाण्याला यायचे. लखनौ-बनारस कुठेही गाणं असलं तरी ऐकायला यायचे. त्यांच्या असण्याची मला भीतीही वाटायची आणि त्याच वेळी खूप आधारही वाटायचा. असं वाटायचं की, भले आपलं गाणं शंभर टक्के चांगलं होत असेल, पण यांच्यासारखे गुणीजन आपलं गाणं ऐकतायत म्हणजे काहीतरी आपण त्यांना देत असू! आणि मला वाटतं, आयुष्यासाठी तरी इतकं समाधान मला पुरेसं आहे! खूपदा मला वाटतं की, सगळं सांभाळून आपण जेवढा काही वेळ गाण्याला देतोय, त्या मानानं आपल्याला बरंच काही मिळतंय.

कुमारजींच्या एखाद्या अप्रतिम मैफलीची आठवण तुम्हाला सांगता येईल का?

- मी त्यांच्या खूप मैफली ऐकल्या. प्रत्येक मैफलीनंतर एकच वाटायचं की, त्यांचं गाणं ऐकताना मनात यायचं की, ‘हा माणूस जिथपर्यंत पोहोचतोय, तिथपर्यंत पोचणं आपल्याला या जन्मात तरी शक्य नाहीये.’ त्यांच्या गाण्यातून अखंड जाणवायचं ते चैतन्य! एखाद्या रागाची आपल्या परिचयाचीच चीज ते म्हणायचे, पण त्या गाण्यात एक वेगळंच चैतन्य जाणवायचं. आपल्याही गाण्यात असं चैतन्य आणता येईल का, याचा मी खूप विचार केला. प्रयत्न केला. कितपत यश मिळालंय, हे तुम्हीच ठरवू शकाल!

मुख्य म्हणजे कुमारजींच्या गाण्यातनं स्वरांवर प्रेम करणं, स्वरांशी खेळणं आणि गाणं सुंदर करत जाणं, या गोष्टी मला शिकता आल्या. कुमारजींची मी ऐकलेली प्रत्येक मैफल म्हणजे अफाट आनंद तर होताच, पण तो माझ्यासाठी एक अभ्यासवर्गही असायचा (हे सगळं स्पष्ट करून सांगताना मालिनीबाई या रागातील ‘कवन बटरिया गइलो माई’ ही चीज कुमारजींच्या पद्धतीने गाऊन दाखवतात.)

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मालिनीबाई, बंदिशीतल्या शब्दांना नेमकं किती महत्त्व असतं?

- बंदिशीत शब्दांना महत्त्व असतं हे खरं. शब्दांमुळे भावदर्शन करणं अधिक सोपं जातं हेही खरं! तरी एखाद्या शब्दाची किती मोडतोड करायची, याचा विचार गायकाला करावाच लागतो. यातूनच पूर्वीसारखी चार आवर्तनांची अस्थाई न म्हणता ती दोन आवर्तनांवर आली असावी. गाण्यात शब्द वरचढ होऊन चालत नाहीत. कारण गाण्याचा आत्मा ‘स्वर’ आहेत, तर शब्द हे केवळ माध्यम आहे. मला स्वतःला शब्दप्रधान गाणं आवडतं, कारण त्यामुळे श्रोता आणि गायक यांच्यात फार लवकर संवाद साधला जातो. बंदिश मांडणीचं महत्त्व मला श्री. गिंडे यांच्याकडून व त्यांच्या गाण्यातून समजलं.

अनेकदा श्रेष्ठ दर्जाच गाणं ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी येतं, अंगावर सरसरून काटा येतो, एक प्रकारची अस्वस्थता निर्माण होते. श्रोत्यांवर असा परिणाम करणारा जो गायक असतो त्याची त्या वेळेस तशीच अवस्था असते का?

- तुम्ही म्हणता तसा परिणाम श्रोत्यांवर होतो, हे तर मीही अनुभवलेलं आहे. आता माझ्यापुरतं बोलायचं तर श्रोत्यांमध्ये असे बदल घडत असताना मला स्वतःला त्याचं काही भान नसतं. मी आपली गात राहते. मात्र दुसऱ्या कुणा श्रेष्ठ गायकाचं गाणं ऐकताना माझ्या अंगावर अनेकदा सरसरून काटा आलेला आहे. अशा वेळेस त्या गाण्यातल्या शब्दांमागची भावना आणि स्वर यांची विलक्षण एकरूपता झालेली असते. शास्त्रीय संगीतामध्ये ‘शास्त्रपक्ष’ आणि ‘भावपक्ष’ अशा दोन गोष्टी तर आहेतच. या दोन्ही अंगांना सारखंच महत्व आहे. चीजेच्या शब्दानुसार आणि त्याच्या अर्थानुसार या दोन अंगामध्ये समतोल साधावा लागतो. यातलं कोणतंही एक अंग प्रमाणापेक्षा प्रबळ झालं की शास्त्रीय गाणं बिघडतं.

पण मग तराण्याबद्दल तुम्ही काय म्हणाल?

- तराण्यामध्ये शब्द नसतात, पण त्यात भाव येऊ शकतो. कारण तराण्याचं माध्यम स्वर आणि लय हे आहे. स्वर-लयांची विविधांगी रचना जेवढी होत जाते तेवढा तराणा रंगतो. आम्हा ग्वाल्हेरवाल्यांमध्ये 'ख्याल तराण्या' पेक्षा 'लयीचे 'तराणे' जास्त प्रचलित आहेत. मी स्वतः लयीच्या तराण्यात जास्त रमते. काही तराण्यांच्या कम्पोझिशन्स खूप छान आहेत. त्यामुळे त्या गाताना फार मजा येते.

आपण ख्यालाबद्दल, तराण्याबद्दल बोललो! आता थोडंसं तुमची खासियत असलेल्या टप्प्याबद्दल सांगा ना!

- जशी, ठुमरी भावदर्शक असते. तसा टप्पा हा मुळात लोकसंगीतातून आलेला प्रकार आहे. त्यातही दोन पद्धती आहेत. एक बनारसी अंगानं जाणारा आणि दुसरा मी म्हणते त्या प्रकारचा ग्वाल्हेर अंगाचा टप्पा! याची विशेषतः असते ती सादरीकरणात. म्हणजे चीजेतल्या शब्दांचे छोटेछोटे तुकडे घ्यायचे. सुरुवातीला ते बोल ठुमरी अंगानं म्हणायचे आणि नंतर हळूहळू टप्पा अंगानं त्याचा विस्तार करत समेवर यायचं! मी जेव्हा अशा प्रकारे टप्पा गायला सुरूवात केली तेव्हा त्यावर टीकाही झाली होती. मी बुजुर्गांना विचारले - ज्यांनी राजाभैय्यांकडून बरेच टप्पे ऐकले होते अशांना! त्यांनी मला सांगितले की, काही घाबरू नकोस! तू टप्पा हा असाच गायचा आहे तू तसाच गा! आज मी जेव्हा याचा विचार करते तेव्हा मनात येतं की, मूळचे लोकसंगीतातले हे टप्पे! जेव्हा ते बांधले गेले, तेव्हाच त्यात एक वेगळा, स्वतंत्र विचार आला. माझ्या गुरुजींनी शिकवलेले टप्पे मी मैफलीत गात गेले, लोकांना ते आवडत गेले आणि त्याचा आग्रह होत गेला, म्हणून मी गातच राहिले. मला त्यात काही वावगं वाटत नाही. उलट मी म्हणते की, जेवढी गात राहीन तेवढी टप्पा गायकीची नवनवीन अंगं मला स्वतःलाच कळत जातील. एक प्रकारच्या विकासाचीच ही प्रक्रिया आहे. अजूनही मी त्यात अपूर्णच आहे.

सवाई गंधर्व महोत्सवात गायल्यानंतर पुढचा संगीताचा प्रवास कसा काय झाला?

- त्या काळात सवाई गंधर्वला गायलेल्या कलाकारांबद्दल लोकांना खूप कौतुक असायचं. म्हणजे त्या कलाकाराला काहीतरी ‘दर्जा’ आहे असं मानलं जायचं. तिथून ऐकून गेलेली मंडळी मग त्या कलाकाराला ठिकठिकाणी बोलवायला सुरुवात करायची. ग्वाल्हेरला तानसेन समारोहात गायला मिळालं. मग लखनौ, बनारस, कलकत्ता, दिल्ली, मुंबई असं भारतभर भ्रमण सुरू झालं. काहीही असलं तरी आजही मुंबई-पुणे हीच ठिकाणं कलाकारांसाठी ‘मापदंड’ आहेत. या दोन्ही ठिकाणी ज्याचं नाव होतं, त्याचं भारतभर नाव होतं हे निश्चितच. एके काळी कोल्हापूरच्या देवल क्लबचंही खूप नाव होतं. तिथे गायलं की. सर्वत्र नाव व्हायचं. एकापाठोपाठ एक कार्यक्रम होत गेले. या मैफली चालू असतानाच माझा स्वतःशीच विचार चालू असायचा की, खरंच आपण बऱ्यापैकी गातोय का, लोक एवढं बोलवतायत, तर त्यांना आपण नक्की काहीतरी देतोय की नाही? लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, आपण त्या पुऱ्या करू शकू की नाही? यातूनच असं जाणवायचं की आपण आपलं गाणं विस्तारलं पाहिजे, गाणं प्रगल्भ झालं पाहिजे. ही सगळी एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे बघा! याला अंत नाही आणि म्हणून गाण्याला व रियाजाला मर्यादा नाही.

दर काही वर्षांनी तुम्ही गाणं सोडण्याच्या मनःस्थितीत असायचात, त्या मागे सांसारिक अडचणी कितपत होत्या?

- सुरुवातीच्या काळात सांसारिक अडचणी तर खूपच होत्या. मुली लहान होत्या, त्यांना सांभाळायला घरात कुणी नव्हत. चार-पाच वर्षं सासूबाई माझ्याकडे होत्या, पण पुढे त्या ग्वाल्हेरला गेल्या. त्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. मुख्य म्हणजे अनोळखी गाव, अनोळखी माणसं, नात्यागोत्याचं कुणीही तिथे नाही, त्यामुळे सगळंच फार तापदायक व्हायचं. अशा परिस्थितीतही राजूरकररांचा गाण्याचा लकडा चालूच असायचा. त्यामुळेही अनेकदा गाणं सोडावंसं वाटत होतं. पण याच काळात बाहेरगावाहून हैद्राबादला आलेल्या मंडळींचा एक छान ग्रुप तयार झाला. आमच्या शेजारच्या श्री. हरिभाऊ देशपांडे यांच्या परिवारानं तर माझ्या दोन मुलींना वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून, स्वतःच्या मुलींसारखंच वाढवलं. गाणं चालू ठेवण्यात या सगळ्या स्नेह्यांचे माझ्यावर खूपच उपकार आहेत. ते सर्व अनेकदा म्हणायचे, ‘आम्ही काय हो, फक्त संसार करतो. तुमच्याकडे एक मोठी कला आहे. तेव्हा तुम्ही ती वाढवा. घरची चिंता तुम्ही करू नका.’ असं प्रोत्साहन देणाऱ्या मंडळींचा माझ्या गाण्यात फार मोठा सहभाग आहे.

तुमच्या एकूण जगण्यावर गाण्याचा काय परिणाम झाला?

- माझ्या जगण्यावर गाण्याचा काय परिणाम झाला, हे मी शब्दांत सांगू शकणार नाही. मी असं मानते की, ईश्वरानं ‘गात राहणं’ ही माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. ही जबाबदारी निभावून न्यायची आहे, या उमेदीनंच मी आजपर्यंत गात आले आहे. कितीही संकटं आली, तरी त्यावर मात करून गायचं आहे. घरातून बाहेर पडलं की, तिकडचं सगळं विसरून फक्त गाण्याचाच विचार चालू ठेवायचा, हे स्वतःला पटवून देत देत इथपर्यत पोहोचले आहे.

.................................................................................................................................................................
‘स्वरभाषिते’ – रोहिणी गोविलकर

अक्षर प्रकाशन, मुंबई | पाने – २३१ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......