जून, जुलै आणि ऑगस्ट हे पावसाचे महिने संपायला आले की, विविध सणांचे वेध लागू लागतात. प्रथम श्रावण येतो. श्रावण सुरू होताना बालकवींच्या कवितेची आठवण होते-
‘श्रावणमासी हर्ष मानसी,हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे’
श्रावण जसजसा पुढे सरकतो, तसतशी धरती माता वरुणराजाच्या जलवर्षावाने तृप्त झालेली असते. विविध प्रकारच्या हिरव्या छटा तिचे सौंदर्य अधिक खुलवत असतात. श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार, श्रावणी मंगळवार, श्रावणी शनिवार जन्माष्टमी, राखी (नारळी पौर्णिमा आणि पोळा या सणांमुळे वातावरण निर्मिती होऊन भाद्रपदाची चाहूल लागते.
नारळी पौर्णिमेला पावसाचा जोर ओसरतो. विद्येच्या देवतेच्या आगमनाची चाहूल लागते. गल्लोगल्ली मंडप सजू लागतात. सृजनशीलतेला आव्हान देणाऱ्या मंडपसजावटीची अहमहमिका सुरू होते. आपलीच कल्पना नवीन असे गृहीत धरून कमीत कमी लोकांना ती सांगत, त्यातून काहीतरी भव्यदिव्य निर्माण करण्याची स्वप्ने पाहिली जातात.
लोकमान्यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाला सव्वाशे वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्याच उत्साहात हा उत्सव अजूनही साजरा होतो. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र बांधण्याचे मोलाचे कार्य बजावतो, यात शंकाच नाही. दरवर्षी चौकाचौकात दिसणाऱ्या गणेश मंडळांच्या सजावटी पाहून आणि त्यात तरुणाईचा उत्साह पाहून आनंद होत असतो. कालमानाप्रमाणे उत्सव साजरा करताना त्यात बदल होणे स्वाभाविकच आहे. विशेषत: गेल्या चार-पाच दशकांमधील विज्ञानाची घोडदौड आश्चर्याने थक्क करणारी असल्यामुळे तिचे प्रतिबिंब ठिकठिकाणी दिसते. गणेशोत्सव त्याला अपवाद असण्याचे कारण नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
भारतीय मनातील श्रद्धा ही एक अजब चीज आहे. श्रीगणेशांवर असलेली श्रद्धा समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रकर्षाने दिसते. समाजात त्या निमित्ताने महिन्याहून अधिक काळ जो उत्साह सळसळत असतो, त्याचा विचार अर्थातच महत्त्वाचा आहे. मरगळ आलेल्या समाजाला नवसंजीवनी देण्याचे काम गणेशोत्सव करतो.
निसर्गातील विविध शक्तींची ओळख करून देणाऱ्या या सण आणि उत्सवांना सामान्यजनांचे प्रबोधन करण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व असते. निसर्गात परमेश्वर आहे की नाही, किंवा तो कोणत्या स्वरूपात आहे, यावर वाद होऊ शकतो. परंतु विश्वाची निर्मिती करणाऱ्या आणि विश्वाचा गाडा सुरळीत ठेवणाऱ्या विविध शक्ती आहेत, यावर दुमत होण्याचे काहीच कारण नसते.
युरोप अंतराळ संस्थेने नुकतीच प्रारंभ केलेली ‘युक्लीड’ मोहीम विश्वाचा पसारा कसा वाढतोय, याचा नेमका वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. सूर्यशक्तीमुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टीचक्र अव्याहतपणे सुरू आहे, हे सिद्ध करण्यासाठी वेगळ्या प्रयोगांची गरज नसते. पण लहान मुलांना प्रकाशसंश्लेषणाचे महत्त्व सांगितल्याशिवाय त्याच्या ते लक्षात येणार नसते. प्रत्येक व्यक्तीचे बौद्धिक आकलन एका विशिष्ट पद्धतीनेच होईल, असे मानणे योग्य नाही. शिक्षणाचा व्यापक अर्थ प्रत्येकाच्या बौद्धिक आकलनशक्तीला चालना देणे, असा अभिप्रेत असतो. पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. विविध निसर्गशक्तींचे आकलन होण्यासाठी किंवा करून देण्यासाठी म्हणूनच प्रतीके असणे गरजेचे असते.
प्रतीकात्मक असलेल्या सणांकडे आणि उत्सवांकडे या नजरेतून पाहिले, तर बरेचसे अनावश्यक वाद टाळता येतील. गणेशोत्सव हा तसाच प्रकार आहे. त्याकडे डोळसपणे पाहूनच लोकमान्यांनी तो सुरू केला होता.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!
आमच्यात आलेलं सामंजस्य, इतर वेळी कसं काय हरवतं? ते आम्हाला सांग बाप्पा!
.................................................................................................................................................................
गणेशोत्सवामध्ये श्रीगणेश मूर्ती ही प्रमुख आकर्षण असते. त्यामुळे मूर्ती कशी असावी, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. मूर्ती कशाचीही बनवली तरी त्यात जी श्रद्धा असते, तिचा विसर शेवटपर्यंत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या व्यक्तीला पडू नये, अशी सर्वसामान्य अपेक्षा असते. त्यामुळे विसर्जनानंतर त्या मूर्तीचे नेमके काय होते, याचाही विचार अतिशय महत्त्वाचा ठरतो. विसर्जनानंतर त्या मूर्ती भंगलेल्या स्वरूपात सभोवताली विखुरल्या जाणार असल्या, तर ते सुसंस्कृत मनास कितपत पटेल?
ज्या मूर्तीसमोर मनोभावे दहा दिवस पूजा केली, आरती करत राहिलो, विविध कलागुणांचे प्रदर्शन केले, विविध कलाकारांचे कौतुक केले, कीर्तने केली, ‘अथर्वशीर्षपठण’ केले, सत्यनारायण पूजा घडवून आणल्या, त्याच मूर्ती फक्त दहा दिवसांच्या अंतराने विदारक स्वरूपात पुढे आल्या, तर कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला मानसिक त्रास होईलच. संवेदनशील समाजात असे काही चुकूनसुद्धा घडू नये, हीच वाजवी अपेक्षा त्यात असते. त्यासाठी मूर्ती नेमकी कशाची असावी, हा विषय त्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
समाजात सार्वजनिक गणेशोत्सव जितक्या उत्साहात साजरा होतो, तितक्याच उत्सवात महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये घरगुती स्तरावरदेखील हा उत्सव तसाच साजरा होत असतो. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, उत्सव साजरा करणाऱ्यांची संख्या मोठी असणारच आहे. त्या मोठ्या संख्येमुळेही मूर्ती कशाची असावी, म्हणजे विसर्जनानंतर पर्यावरणावर विदारक परिणाम होणार नाही, हा विचार महत्त्वाचा ठरतो.
शाडू ही एक प्रकारची माती असते. पाणी आणि हवाविरहित माती ९८ टक्के असेंद्रिय म्हणजे खनिज (inorganic) असते. ही असेंद्रिय माती विविध खनिजांनी बनलेली असते. भौतिकदृष्ट्या आकारावर मातीचे तीन घटक सांगता येतील. वाळू (२ ते ०.०५ मिलिमीटर), सिल्ट (०.०५ ते ०.००२ मिमी) आणि क्ले किंवा चिकणमाती (०.००२ मिमीपेक्षा कमी) असे हे तीन घटक आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
बाळू आणि सिल्ट हे घटक प्राथमिक खनिजे म्हणून ओळखले जातात, तर चिकणमाती किंवा क्ले हे दुय्यम खनिज असते. अग्निजन्य खडकांची झीज होऊन माती बनते. ही माती नदीच्या प्रवाहाबरोबर सर्वदूर पसरते. जी प्रमुख खनिजे मातीत असतात, ती सर्व सिलिकेटस सिलिका या मूलद्रव्यापासून बनलेली असतात. पोटॅशियम, अॅल्युमिनियम, लोह, सोडियम आणि मॅग्नेशियम या प्रमुख धातूंची विविध सिलिकेट मातीत आढळतात. वाळूचा प्रमुख घटक क्वार्टझ म्हणजे सिलिकाच असतो. पृथ्वीच्या बाह्य कवचात ५९ टक्के सिलिका असते. ती सिलिकॉन डाय ऑक्साइड या स्वरूपात असते.
पृथ्वीच्या बाह्यकवचात सिलिकाचे प्रमाण अधिक का असावे? पृथ्वी हा शुक्र, गुरू आणि मंगळाप्रमाणे एक खडकाळ ग्रह आहे. सिलिका हा खडकाळ ग्रहांमधील सर्वात सामान्य घटक का आहे, याचे कारण म्हणजे मूळ तेजोमेघातील (ज्यापासून आपली सूर्यमाला बनली) हायड्रोजन नंतर सिलिकॉनचे प्रमाण सर्वात जास्त होते. कदाचित इतर ताऱ्यांभोवती असलेल्या इतर ग्रह प्रणालींमध्ये सिलिकापेक्षा जास्त अॅल्युमिनियम किंवा लोह असू शकेल. आपली पृथ्वी त्यामुळे सिलिका-प्रबळ झाली. म्हणूनच माती ही सिलिकॉनच्या संयुगांनी बनलेली आहे.
शाडूच्या मूर्ती बनवण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. माती हा वसुंधरेच्या सजीवतेचा गाभा आहे. जे काही पोषण मिळायचे त्याची सुरुवात जल आणि सौरशक्तीच्या मदतीने मातीतूनच होते, आणि त्याचा शेवटही मातीतच होतो. पदार्थाच्या अविनाशित्वाचे चक्र मातीतून सुरू होते आणि तिथेच संपते. अर्थात हे चक्र सुरू होते आणि संपते, हे म्हणणे वैज्ञानिक दृष्टीने योग्य नाही. कारण ते चक्र अव्याहत सुरू असते. आपण व्यक्तिसापेक्ष दृष्टीने पाहिले, तर ते सुरू होते आणि संपते, हे म्हणणे योग्य ठरते. त्यामुळे एका मोठ्या शक्तीची पूजा करण्यासाठी, या मातीची मूर्ती प्रतीकात्मक वापरासाठी अगदीच योग्य मार्ग ठरतो.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!
आमच्यात आलेलं सामंजस्य, इतर वेळी कसं काय हरवतं? ते आम्हाला सांग बाप्पा!
.................................................................................................................................................................
निर्गुण स्वरूपात तिची पूजा करण्यासाठी मूर्तीची गरज नसते, पण सर्वांनाच हा मार्ग मान्य असतो, असा आग्रह धरण्याचे कारण नाही. शाडूची किंवा मृण्मय मूर्ती हीच अधिक पर्यावरणपूरक आहे. शाडू ही एक प्रकारची माती असून गुजरातमध्ये मातीच्या खाणी आहेत. वर्तमानपत्रांच्या बातमीवरून दिसते की, साडेसहाशे टन शाडू मुंबईमध्ये आयात करण्यात आला असून लोकांनी या शाडूच्या मूर्ती बनवायला भरपूर प्रतिसाद दिला आहे. ही पर्यावरणाच्या दृष्टीने एक अतिशय चांगली बाब आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हे एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. त्यातील अडचणी समजावून घेऊन नजीकच्या भविष्यात आणखी मजल मारता येईल. २० रुपये किलोची शाडू माती ५० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. मागणी अधिक तर किंमत अधिक हे बाजारी सूत्र असतेच. किमतीवर नियंत्रण ठेवता येणेही शक्य आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणेचा सहभाग महत्त्वाचा ठरतो.
यातून आणखी एक गोष्ट अधोरेखित होते. आता आपण साडेसहाशे टन शाडू हेच उदाहरण घेऊ. खाणीमधून काढलेली साडेसहाशे टन शाडूची माती मुंबईमध्ये बाहेरून आली आहे. गणेशोत्सवानंतर या शाडूच्या मूर्तीचे विसर्जन होईल आणि साडेसहाशे टन माती मुंबईच्या विविध जलस्रोतांमध्ये मिसळली जाईल. जलस्रोत कितीही मोठा असला तरी साडेसहाशे टन हा आकडाही मोठा आहे. एवढ्या मातीचे नैसर्गिक जलस्रोतातून पुनर्चक्रांकन करणे सोपे नाही. परंतु कृत्रिम तलावांचा वापर केला, तर या साडेसहाशे टनांपैकी बरीचशी माती परत मिळवता येईल आणि पुढच्या वर्षी वापरता येईल. एवढा शाडू वापरला नाही, तर त्याऐवजी साडेसहाशे टन ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ वापरले जाईल आणि त्यामुळे होणारे जलस्रोतांचे नुकसान कितीतरी पट मोठे असेल!
घरातील एका मूर्तीचे गणित म्हणूनच गणेशोत्सवाच्या अनेक मूर्तीच्या गणितापेक्षा वेगळे नसते, फक्त आवाका लक्षात घेता आला पाहिजे. त्याप्रमाणे कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. ज्यांना शक्य आणि मान्य असेल त्यांनी धातूच्या मूर्ती बनवल्या तर त्याचाही पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल. धातूच्या मूर्तीचे विसर्जन घरातच पाण्याच्या टब किंवा बादलीत करून ती पुन्हा ठेवून दिली की, काम झाले!
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मातीची मूर्ती करून त्यात प्राणप्रतिष्ठा केली आणि उत्सवाचा कालावधी पूर्ण झाल्यावर तिचे विसर्जन करून ती मातीलाच मिळाली तर त्यातून पर्यावरणास नक्कीच धोका निर्माण होणार नाही. मूर्ती आकर्षक बनवणे, हा मानवी मनाचा स्थायीभाव असतो. शाडूची किंवा मातीची मूर्ती अधिक आकर्षक बनवण्यासाठी योग्य रंगसंगती वापरली, तर ते अधिक परिणामकारक होईल. हे रंग वापरताना ते पर्यावरणपूरक आहेत की नाही, याची खातरजमा करून घेण्याची आवश्यकता आहे.
वनस्पतीजन्य रंग हे पर्यावरणपूरक असतात. परंतु संश्लेषित रंगांमध्ये धातुमिश्रित तत्त्वे किंवा घातक रसायनांचा समावेश असेल, त्याचा अनिष्ट परिणाम पर्यावरणावर होतो. मूर्तीचे विसर्जन पाण्यात होत असल्याने या प्रदूषणाचा पहिला फटका जलसृष्टीला बसतो. अशा अनेक रंगीत मूर्तीचे विसर्जन नदीत किंवा समुद्रात होते, तेव्हा या प्रदूषित रसायनांचा आणि जड धातूंचा एकत्रित अनिष्ट परिणाम त्या ठिकाणच्या जलचरांना भोगावा लागतो.
सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळींचा मोठमोठ्या मूर्ती बनवण्याकडे कल असतो. गेल्या वर्षी त्या मंडळाने २० फूट उंच मूर्ती बनवली, आपण यावेळी २५ फूट उंच करू, या ईर्ष्येने मूर्तीची उंची वाढत चालली आहे. शाडूच्या मोठ्या मूर्ती भंगण्याची शक्यता अधिक असते, म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ म्हणजे कॅल्शियम सल्फेटपासून मूर्ती बनवण्यास सुरुवात झाली. या मूर्ती दणकट असतात आणि सहसा भंगत नाहीत. त्यात डिंक किंवा त्यासदृश चिकट गोष्टीही वापरल्या जाऊ शकतात.
मोठ्या मूर्ती रंगवण्यासाठी लागणाऱ्या रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असणारच असते. अधिक आकर्षक दिसण्यासाठी तैलरंगांचाही वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. या मोठ्या मूर्ती घडवण्यासाठी कलाकारांना त्यासोबत बराच वेळ राहावे लागते. पर्यावरणपूरक माती आणि रंग वापरले जात असतील, तर त्या कलाकारांच्या आरोग्यासाठी ते उपयुक्त ठरते. विषारी रसायनांचा समावेश त्यात असेल, तर कलाकारांना त्याचे अनिष्ट परिणाम कदाचित आयुष्यभरासाठीदेखील भोगावे लागतात.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!
आमच्यात आलेलं सामंजस्य, इतर वेळी कसं काय हरवतं? ते आम्हाला सांग बाप्पा!
.................................................................................................................................................................
‘पापी पेट का सवाल हैं’, म्हणून ते काम त्यांना टाळता येत नाही, ते दृश्य परिणाम लगेच होणार असतातच असे नाही. त्यामुळे कारखानदार तिकडे कानाडोळा करतात. अंतिम परिणाम मात्र या कलाकारांवर होतात. मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्यावर त्यांचे विघटन पाण्यात जलद होऊ शकते. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्यांचे विघटन लगेच होत नाही. मूर्ती मोठ्या असतील, तर पाण्यात टाकल्यावर त्यांचे तुकडे होतात, पण विघटन होत नाही. लाटांबरोबर हे तुकडे समुद्र किनाऱ्यावर परत फेकत राहतो. ते दृश्य अतिशय विदारक असते.
संवेदनशील व्यक्तीचे काळीज त्यामुळे हलते. आपण पूजा केली तीच ही मूर्ती होती, असे मनात आल्याशिवाय राहात नाही. हे असे होत आहे, याची जाणीव त्यांना विविध माध्यमातून करून देण्याची गरज आहे. नाहीतर दृष्टिआड सृष्टी असे होऊन ते लक्षात येत नाही.
छोट्या छोट्या मूर्ती करण्यासाठी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ वापरण्याची गरज नाही. त्यासाठी फक्त शाडूच्या मूर्ती करण्याची परवानगी द्यायला हवी. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ फक्त मोठ्या मूर्तीसाठी वापरावे. त्यांची कमाल उंची किती असावी, याची मर्यादा ठरवावी लागेल. साधारण बारा फूट ही उंचीची मर्यादा ठरवावी. अशा मूर्तीची वाहतूकही सुरळीत होऊ शकते. सर्वच मूर्तीसाठी वनस्पतीजन्य रंग सक्तीचे करायला हवेत. गणपतीविसर्जनासाठी प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तलाव आवश्यक बनले आहेत. विहिरींमध्ये किंवा नदीत किंवा समुद्रात गणपतीचे विसर्जन करू नये. कृत्रिम तलावातील पाणी मूर्तीचा भाग वेगळा केल्यानंतर जिथे शक्य असेल तिथे ‘एफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट’ म्हणजे सांडपाण्यासाठी प्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया करूनच ते नदीत किंवा नाल्यांमध्ये सोडावे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांवर म्हणजे नदी किंवा समुद्रात करणे टाळण्याचे मुख्य कारण म्हणजे या विघटन न होणाऱ्या, पण विखंडित होणाऱ्या मूर्तीमुळे नैसर्गिक जलस्रोतांच्या तळाशी गाळ घट्ट होत राहतो.
संश्लेषित रंग या मूर्तीच्या रंगरंगोटीसाठी वापरलेले असतील, तर ती घातक रसायने पाण्याचे प्रदूषण घडवतात. विशेषतः त्यातील जड धातू अन्नासाखळीत येऊन त्यांचा अनिष्ट परिणाम सजीवसृष्टीवर होतो. संश्लेषित रंग हे पारा, शिसे, क्रोमियम, तांबे, सोडियम क्लोराइड, टोल्युइन किंवा बेंझिन या रासायनिक संयुगांपासून बनवले जातात. हे मानवांसाठी हानिकारक असल्याचे विविध संशोधनांमधून सिद्ध झाले आहे. त्यांचा पर्यावरणावरही घातक परिणाम होऊ शकतो. प्रक्रिया न केलेले रंग थेट जलस्रोतांमध्ये प्रदूषण करतात. शिवाय, रंगीकरण प्रक्रियेदरम्यान, वापरलेले रंग मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडले जातात. आजूबाजूच्या जलप्रणालीमध्ये या विषारी रसायनांमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, जलचर नष्ट होतात आणि आसपासच्या शेतांचे प्रदूषण होऊ शकते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पाण्यात मिसळलेले संश्लेषित रंग त्याची पारदर्शकता कमी करतात, त्यामुळे पाण्यात पडणारा प्रकाश शोषला जातो. त्यामुळे पाण्यातील वनस्पतींच्या प्रकाशसंश्लेषणावर परिणाम होतो. त्याचा परिणाम होऊन पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. त्याचे अनिष्ट परिणाम जलचर वनस्पती आणि प्राणी या दोघांसाठीही घातक असतात. या प्रदूषणामुळे तसेच निर्माल्याचे विसर्जन मूर्तीबरोबर केले, तर त्यामुळेही जलचरसृष्टीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो.
या विविध कारणांसाठी गणेशोत्सवामध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि निर्माल्याचे जैविक विघटन घडवून आणण्यासाठी निर्माल्य कलश या दोन्हींची व्यवस्था करणे अतिशय गरजेचे आहे. त्या व्यवस्था आहेत, याची खात्री करूनच मंडळांना गणेशोत्सवासाठी परवानगी द्यावी. त्यामुळे जलप्रदूषण आपल्याला शतप्रतिशत शून्य करता येईल.
कृत्रिम तलावांमध्ये ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीचे विसर्जन झाल्यावर ठरावीक मुदतीनंतर (तीन ते चार दिवस) त्या तलावातून विसर्जित मूर्तीचे भाग गोळा करून त्यातील ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रियाकेंद्रे उभी करावीत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत मूर्तिकारांच्या मदतीने हे केंद्र चालवण्यासाठी काय धोरण राबवता येईल, हे पाहणे अतिशय गरजेचे आहे.
तांत्रिकदृष्ट्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या विखंडित मूर्ती २०० अंश सेल्सियसपर्यंत तापवल्या, तर त्यातील पाणी निघून जाते व कोरड्या मूर्तीमधून पुन्हा प्लास्टर ऑफ पॅरिसची भुकटी (पावडर) मिळू शकते. याचा पुनर्वापर भविष्यात मूर्ती बनवण्यासाठी करता येऊ शकतो. शाडूच्या मूर्तीसाठी वेगळा तलाव करण्याची गरज नसते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे भाग वेगळे केले की, उरलेला गाळ वाळवून त्यातील माती पुन्हा एकदा वापरता येते. तलावातील पाणी वेगळे करून सांडपाणी प्रक्रिया केंद्रात पाठवायचे आहे.
या संपूर्ण योजनेचे नियंत्रण महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाच्या अखत्यारीत राहील. त्यासाठी निधीची तरतूद करावी लागेल. प्रत्येक गावात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना मार्गदर्शक तत्त्वे घालून देऊन त्यासाठी राज्यसरकारतर्फे काही निधी उपलब्ध करून दिला जावा. मूर्तीच्या पुनर्वापरासाठी मूर्तिकारांना विश्वासात घेऊन EPR (extended producers responsibility) प्रणाली लागू करता येईल का, याचाही विचार होणे गरजेचे आहे.
.................................................................................................................................................................
हेहीपाहावाचाअनुभवा
सार्वजनिक गणेशोत्सव : नव-धार्मिकता, मनोरंजन बाजार आणि संस्कृतीचे अर्थ-राजकारण
कालौघात एखादा उत्सव मूळ हेतूपासून कसा दूर जातो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गणेशोत्सव!
आमच्यात आलेलं सामंजस्य, इतर वेळी कसं काय हरवतं? ते आम्हाला सांग बाप्पा!
.................................................................................................................................................................
निर्माल्याचे जैविक विघटन घडवून आणण्यासाठी प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने कलश उपलब्ध करून देऊन, गावातील कचरावेचक संघटनेतर्फे या निर्माल्याचे जैविक खत करावे. त्यासाठी जमा होणाऱ्या निर्माल्यातील प्लास्टिक, धागेदोरे, कलाबूत इत्यादी विघटन न होणाऱ्या गोष्टी वेगळ्या करून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे खत बनवण्याची व्यवस्था केली पाहिजे. निर्माल्य कलश तयार करताना तो मातीचा बनवावा किंवा मोठे प्लास्टिकचे ड्रम त्यासाठी वापरता येतील. बनवतानाच या कलशाचा किंवा ड्रमचा तळ सच्छिद्र करावा. त्यामध्ये एकतृतीयांश भाग सेंद्रिय खत आणि कोकोपीट मिसळून हा कलश बारीक केलेले निर्माल्य टाकण्यासाठी वापरला, तर खत बनण्याची प्रक्रिया जलद घडून येईल.
या कचरावेचक संघटनेच्या कामगारांना गणेशोत्सव मंडळांनी योग्य तो मोबदला देण्याची सोय करावी. खताचा वापर योग्य पद्धतीने होईल, अशी उपाययोजना करण्याची जबाबदारी गणेशोत्सव मंडळाने घ्यावी.
गणेशोत्सवात मूर्ती आणि निर्माल्य यांच्याबाबतीत योग्य काळजी घेऊन त्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या त्या सारांशाने अशा असतील-
- घरगुती वापरासाठी ज्या छोट्या मूर्ती (१ ते ३ फूट उंची) बनवायच्या आहेत, त्या फक्त शाडूच्याच बनवण्याची परवानगी असावी. समाजप्रबोधन करून घरगुती वापरासाठी धातूच्या मूर्तीचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करावा.
- मोठ्या मूर्ती (३ फुटांहून अधिक आणि १२ फूट कमाल उंची) प्लास्टर ऑफ पॅरिसच्या बनवता येतील. गणेशोत्सव मंडळांनाच अशा मूर्तीसाठी परवानगी देण्यात येईल. विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची सोय असणे, ही त्यासाठी पूर्वअट राहील. कृत्रिम तलावाच्या उपलब्धीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल. कृत्रिम तलावांची निर्मिती करतांना नैसर्गिक पाण्याच्या स्रोतांपासून हे तलाव सुरक्षित अंतरावर असतील ही खात्री करून घ्यावी. कृत्रिम तलाव २० फूट x २० फूट x ८ फूट यापेक्षा मोठे नसावेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
- मूर्ती रंगवण्यासाठी फक्त वनस्पतिजन्य रंगांचाच वापर करण्यात यावा. कृत्रिम तलावातून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या पुनर्वापरासाठी मूर्तिकारांच्या सहकार्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या यंत्रणा उभी करावी. गणेशोत्सवाला परवानगी देताना निर्माल्यकलश बसवणे सक्तीचे करावे, आणि त्यावर योग्य अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवून त्याचा नीट वापर सुनिश्चित करावा. निर्माल्य खताचा वापर योग्य प्रकारे करावा.
याशिवाय गणेशोत्सवात आणखी जे प्रदूषण होते, ते म्हणजे ध्वनिप्रदूषण आणि आरास व सजावटीसाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात, त्यांच्या वापरानंतर होणारे प्रदूषण. आजपर्यंतच्या अनुभवातून ध्वनिप्रदूषणावर मोठ्या शहरांमधून योग्य उपाययोजना होत असल्या, तरी मध्यम आणि लहान शहरांमध्ये किंवा तालुका किंवा गावपातळीवर या समस्येची तीव्रता अधिक असते. कायदा धाब्यावर बसवणारी मंडळी गणेशोत्सवात भूमिका बजावत असतील, तर समस्येचे समाधान तर सोडाच, समस्येविषयी बोलणेदेखील अवघड होऊन बसते. त्याविरुद्ध आवाज उठवलाच, तर त्याची शिक्षासुद्धा मिळू शकते!
यावर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम झाली पाहिजे आणि गावपातळीवर उत्सव समित्यांकडूनच हे प्रयत्न झाले पाहिजेत. सजावटीच्या सामानात, तसेच प्रसादासाठी ‘डिस्पोजेबल’ म्हणजे ‘वापरा आणि फेका’ अशा गोष्टींवर बंदी घालणे श्रेयस्कर राहील. विशेषतः थर्मोकोल, पातळ प्लास्टिकच्या पिशव्या, थर्मोकोल कप, डिश, प्लास्टिक डिश यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालावी. तशी पूर्वअट प्रत्येक मंडळाला परवानगीपूर्वी घालण्यात यावी. या अटींचे पालन कसोशीने करावे. यासाठी उत्सव समितींमार्फत प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
कोणाच्याही श्रद्धेला धक्का न लावता पर्यावरणाचे संतुलन बिघडवू न देता गणेशोत्सव साजरा करण्याची कालमानानुसार गरज आहे.
‘विज्ञानधारा’ मासिकाच्या सप्टेंबर २०२३च्या अंकातून साभार
.................................................................................................................................................................
शरद काळे
sharadkale@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment