अजूनकाही
न्यू यॉर्कमधल्या कॉर्नेल विद्यापीठातल्या एका विद्यार्थ्याने नुकताच एक ठराव मांडला- “वर्गात शिक्षकांनी एखादा दुःखद प्रसंग, लढाई/युद्ध, नैसर्गिक/मानवी आपत्ती (भूकंप, अतिवृष्टी वा तत्सम) आणि त्यांचे दुष्परिणाम शिकवण्यापूर्वी विद्यार्थ्यांना ‘आगाऊ सूचना’ (ट्रिगर वॉर्निंग) द्यावी, म्हणजे सदर चर्चेच्या वेळी विद्यार्थी गैरहजर राहू शकतील किंवा अभ्यासक्रमातील तो भाग परीक्षेच्या वेळी ‘ऑप्शन’ला टाकतील, ज्यायोगे त्यांच्या मनावर भयाचे आघात होणार नाहीत.”
आजकाल विद्यार्थ्यांना ‘ग्राहक’ मानण्याचे दिवस आलेले आहेत, त्यामुळे ‘विद्यार्थीकेंद्री’ संस्था अशा ठरावांना सर्रास मान्यता देतात. सुदैवाने कॉर्नेल विद्यापीठाने या ठरावाला केराची टोपली दाखवली आणि परिपत्रक काढून त्याचे स्पष्टीकरणही दिले. ते असे-
“Learning to engage with difficult and challenging ideas is a core part of a university education : essential to our student’s intellectual growth, and to their future ability to lead and thrive in a diverse society. As such, permitting our students to opt out of all such encounters, across any course or topic, would have a deleterious impact both on the education of the individual student and on the academic distinction of a Cornell degree.”
(“अशा भयसूचक भोंग्यांमुळे कदाचित शिक्षक असे अवघड विषय टाळण्याच्या मन:स्थितीत जातील. ही टाळाटाळ कदाचित सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या पथ्यावरही पडेल, पण अंतिमतः त्यांना जीवनभर ‘कम्फर्ट झोन’मध्ये ठेवेल. मात्र अशा क्लिष्ट, परीक्षा घेणाऱ्या प्रसंगांवर चर्चा करण्याची आणि वेळप्रसंगी त्यांना तोंड देण्याची क्षमता विद्यार्थी गमावून बसतील.
विद्यापीठीय शिक्षणाचा गाभाच मुळी अवघड, आव्हानात्मक विषयांना हात घालणं आणि त्यांची उत्तरं शोधणं हा असतो. त्या मार्गानेच विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास होतो. भविष्यात वैविध्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय (युनिक) प्रसंगांची व्यवस्थित हाताळणी करण्याचं कौशल्य त्यांना आत्मसात करता आलं पाहिजे. त्यामुळे आम्ही जर अशा भोंग्यांना घाबरून विद्यार्थ्यांना पळ काढायची मुभा दिली, तर कदाचित विद्यार्थ्यांच्या ज्ञानग्रहण आणि जिज्ञासू वृत्तीवर घाला घातला जाईल. त्याचबरोबर आमच्या विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता ढासळेल. म्हणून हे भय निर्माण करणारे ‘ट्रिगर’ विद्यार्थ्यांसाठी हितावह नसतील, उलट शिक्षणाचा मूळ हेतू दुरावेल.”)
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
व्हिएतनाम युद्धानंतर परतलेल्या सैनिकांच्या मनःस्थितीचे (PTSD - Post Traumatic Stress Disorder) वर्णन करण्यासाठी, ही ‘मानवशास्त्रीय ट्रिगर’ (Anthropological Trigger)ची संकल्पना निर्माण करण्यात आली! हळूहळू बऱ्याच मानसिक त्रासांना, विकृतींना संबोधण्यासाठी तिचा सर्रास वापर सुरू झाला, कारण आघातांमध्ये वैविध्य येत गेलं. (गर्भपात झालेल्या स्त्रीच्या मनःस्थितीचं वर्णनही आता ‘PTSD’ याच शब्दात केलं जातं.) गैरवापरामुळे ही संकल्पना आता छोट्या-मोठ्या अस्वस्थतेचं, गैरसोयींचं, अभावांचं ‘लेबल’ झालेली आहे.
उच्च शिक्षणातही (कदाचित जाणूनबुजून) अशा भयसूचक भोंग्यांची संख्या वाढत चालली आहे. आपली ‘आघातां’ची व्याख्या पसरट आणि सर्वसमावेशक बनत चालली आहे. युद्ध, सत्यघटना किंवा त्यांचं कथन/चित्रीकरण (आपल्याला बघवत नाही म्हणून सर्रास ‘डार्क शेड’ या नावाखाली) बाजूला सारलं जात आहे. म्हणून ‘काश्मीर फाईल्स’ सोसवत नाही, पण ते सत्य लोकांनी भोगलं आहे, हे आपण सोयीस्कररित्या विसरतो. समजा वंशवाद, नरसंहार, वस्त्यांचे अग्नी किंवा इतर कारणांनी झालेले विध्वंस, विनाश, नुकसान या समस्यांकडे विद्यार्थीही अभ्यासक्रमात डोळेझाक करायला लागले तर?
अनेक शैक्षणिक आणि मानसशास्त्रीय संशोधनांनी असं सप्रमाण दाखवून दिलं आहे की, भयसूचक भोंग्यांनी आपली उत्सुकता चाळवते, अस्वस्थता वाढते आणि या भोंग्यांच्या मागील अभिप्रेत हेतू साध्य होत नाहीत. ‘भयसूचक भोंगे’ ही आता सामाजिक फॅशन होत चालली आहे. ज्या गोष्टी अस्वस्थ करतील त्यांना बाजूला सारावं वा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं… जणू त्यांचं अस्तित्वच नाकारावं.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
आपल्या विद्यापीठांची दशा, दिशा, निराशा आणि हताशा…
‘टीच इन इंडिया’चा नारा ‘मेक इन इंडिया’सारखाच निवडणुकीतील प्रचारासाठीचा एक जुमला आहे
..................................................................................................................................................................
परिणामी ‘अस्वस्थता म्हणजे धोका’ अशी सोयीस्कर व्याख्या रूढ व्हायला लागली आहे. शाळा-महाविद्यालयांमध्ये ही ‘वर्ज्य’ करण्याची शिकवण कदाचित शक्य आहे, पण ‘जिंदगी हर कदम, एक नई जंग हैं’ या घनघोर सत्याकडे वास्तवात पाठ फिरवता येईल का? आणि मग टिकावूपणा, लवचीकत्व/स्थितिस्थापकत्व (resilience- ज्याचं प्रात्यक्षिक नुकतंच आपण करोनाला तोंड देऊन दिलं) हे यशासाठी आवश्यक असलेले घटक आमच्या शिक्षण व्यवस्थेत कोठून आणायचे? विद्यार्थ्यांना केवळ पळपुटेपणा शिकवायचा?
‘भयसूचक भोंगे’ वाजवून विद्यार्थ्यांना ढालीमागे दडवायचं ठरवलं, तर ती अवघड, परीक्षा पाहणाऱ्या परिस्थितीशी जुळवून घेणं, कसं शिकतील? आणि मुख्य म्हणजे भावनिक संतुलन कसं साधतील? वादळ नको, धुवांधार पाऊस नको, रस्त्यांत वाटा-वळणं, खाचखळगे नकोत, मग शिकायचं तरी काय आणि का?
विद्यार्थ्यांना ‘एक्सपोझर’नामक उपचारपद्धतीला सामोरं न्यायला हवं, कारण दिवसेंदिवस भावनिक अस्वास्थ्य म्हणजे जणू काही शारीरिक इजा असा मतप्रवाह रूढ होत चालला आहे. कुठल्याही ‘जोखीम’विरहित वातावरणात विद्यार्थ्यांना अलगद कसं ठेवता येईल? कदाचित आजच्या समाजातील वाढती ‘असहिष्णूता’ (intolerance) याचीच ही निष्पत्ती असेल का?
पण किती काळ आणि किती मार्गांनी सत्य विद्यार्थ्यांपासून दडवता येईल- तेही आजच्या तंत्रस्नेही वातावरणात? गंमत म्हणजे सत्य दडवलं तरी ते बदलता थोडंच येतं? मग त्याचा सामना करण्याचे वा त्याला ‘कोमट’ करण्याचे प्रयत्न तरी कशाला करायचे?
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मानवी जीवन बव्हंशी अन्यायकारक, पक्षपातीच असतं. त्याची तोंडओळख व्हायला नको? ते लपवून ठेवल्यानं काय साध्य होणार? त्यापेक्षा सत्य स्वीकारून, त्यापासून धडे घेऊन, काय करायचं/काय टाळायचं अशी नीरक्षीर विवेकबुद्धी शिकवायला हवी. विद्यार्थ्यांच्या हातात वल्ही द्यायचं काम शिक्षकांचं, पण नंतर प्रवाह तर त्यालाच पार करायचा असतो ना, का तिथंही बिनलाटांचं पाणी त्यांच्यासाठी ‘राखीव’ ठेवणार?
एकदा हे ‘अति’ सुरक्षित जग विद्यार्थ्यांना आवडू लागलं की, त्यांना ते सोडावंसं वाटणार नाही. कोणतीही जोखीम नसलेलं वातावरण कदाचित नवं काही शिकण्याला प्रतिबंध करणारं ठरू शकेल आणि म्हणून जाचकही!
या भोंग्यांपासून होणाऱ्या अल्पकालीन, दीर्घकालीन फायद्या-तोट्यांचा विचार व्हायलाच हवा- त्यांची निवड करण्यापूर्वी. कदाचित तात्पुरती मनःशांती मिळत असेलही, पण स्थितिस्थापकत्वाचं काय? सत्य स्वीकारायचं धाडस त्यांच्यात कसं आणणार? समस्या-निरसन कौशल्यांचं अंगीकरण हवं की नको?
अस्वस्थता टाळणं हे मानसशास्त्राला मान्य नाही. ‘आकलनविषयक वर्तन उपचार पद्धती’ (CBT Cognitive behavioural therapy) आपल्याला आव्हानांचा सामना करायला शिकवते, आपले प्रतिसाद बदलवण्यास शिकवते. परिस्थितीशी दोन हात केव्हा करायचे आणि केव्हा जुळवून घ्यायचं, हे माहीत असणं केव्हाही महत्त्वाचंच ठरतं. मानवी जीवनातला हा एक मूलभूत ‘धडा’ आहे.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
एनआयआरएफचा निष्कर्ष : महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचा दर्जा घसरतोय…
..................................................................................................................................................................
‘सीबीटी’ संवेदनशीलता कशी कमी करायची आणि स्थितिस्थापकत्व कसं आत्मसात करायचे, याचे धडे देते. अस्वस्थता आणि वेदना हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्यांना त्यांपासून सुरक्षित अंतरावर ठेवायचे प्रयत्न कितीही सद्हेतूने केले गेले, तरीही त्याचे दीर्घकालीन दुष्परिणामच होऊ शकतात.
एक वेळ अभ्यासक्रमात तुम्ही ‘भयसूचक भोंगे’ वाजवू शकता, पण प्रत्यक्ष जीवनात ते असतीलच असं नाही. तेव्हा अल्पकालीन वेदना दीर्घकालीन फायदे मिळवून देत असेल, तर ती सहन करायला शिकवण्यात गैर काय?
नुकतीच एका पुस्तक प्रकाशन समारंभात प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी एक सुंदर व्याख्या सांगितली- “University is a place, where Universalisation of mind should take place.”
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. नितीन ह. देशपांडे शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक आहेत! त्यांची आजवर चौदा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
deshpandenh@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment