‘इतकं दिलंत तुम्ही मला’ असं पाडगावकरांचं एक बोलगाणं आहे. आपल्यात जे काही थोडंफार चांगलं आहे, ते सगळं पुस्तकांचं देणं आहे, या जाणिवेनं ते मला पुस्तकांना उद्देशून गावंसं वाटतं…
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
नीतीन वैद्य
  • प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते ‘हरी नरके स्मृति वाचक पुरस्कार’ स्वीकारताना लेखक नीतीन वैद्य
  • Tue , 12 September 2023
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो नीतीन वैद्य Nitin Vaidya हरी नरके Hari Narake वाचन Reading

प्रसिद्ध लेखक, अभ्यासक आणि ग्रंथसंग्राहक हरी नरके यांचं नुकतंच (९ ऑगस्ट २०२३) निधन झालं. त्यांच्या स्मृतिनिमित्तानं पुण्यातल्या ‘राजहंस पुस्तक पेठे’च्या वतीने ‘हरी नरके स्मृति वाचक पुरस्कार’ सुरू करण्यात आला आहे. या पहिल्या पुरस्कारासाठी सोलापूरचे ग्रंथप्रेमी नीतीन वैद्य यांची निवड करण्यात आली. ९ सप्टेंबर २०२३ रोजी पुण्यात त्यांना प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. त्यानिमित्तानं त्यांनी केलेल्या भाषणाची ही मूळ आवृत्ती... 

.................................................................................................................................................................

हरिभाऊंची ओळख फेसबुकवरची. त्र्यं.वि. सरदेशमुख यांनी त्यांच्या ‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीमध्ये म.फुल्यांचं शब्दचित्र रेखाटताना त्यांच्या फुले चरित्राचा संदर्भ घेतला होता. त्याची टिपणं सरांच्या डायरीत होती. ती मी फेसबुकवर पोस्ट केली. त्या निमित्तानं ओळख झाली. पुढे ते अधूनमधून काहीबाही पाठवू लागले- काही माहिती, प्रसंग, आठवणी. त्यानिमित्तानं काही संवाद होत असे. ‘मतभेदांसह असुया’ हे त्यातलं सूत्र मला फार भावणारं होतं.

वर्षभरातील वाचननोंदी मी डिसेंबरमध्ये फेसबुकवर पोस्ट करायचो. हरिभाऊ कधी त्या आपल्या वॉलवर शेअर करत. खरं तर ‘वाचणं आणि समजून घेणं’ याच्या असोशीत ते माझे गुरू शोभावेत. त्यांच्या मानानं माझं वाचन तसं ‘हौशी’ सदरात मोडणारं, पण संजय जोशींनी या पुरस्काराच्या निमित्तानं या त्यांच्या-माझ्यातल्या धाग्याचा सन्मान केला आहे, याचा आनंद वाटतो.

‘पुण्यभूषण’ दिवाळी अंक पुरस्काराच्या बैठकीच्या निमित्तानं प्रत्यक्ष भेटही झाली. भेटी तीन-चारच, पण जिव्हाळ्याच्या झाल्या. ‘तुम्ही उजवे तरी मला फार आवडता’, असं ते मला तीन-चार वेळा तरी म्हणाले होते. त्यातल्या वाचन आणि पुस्तकं यांच्या अदृश्य धाग्यानं मनात कृतज्ञता दाटून येते.

‘पुस्तक पेठ’ हे पुस्तकांचं दालन, तेही पुण्यातल्या त्या दृष्टीनं तशा आडवळणाच्या भागात काढणं-चालवणं, यातलं आव्हान जोशींनी एकहाती पेललं. त्यात ज्यांचं बरोबर असणं त्यांना आश्वासक वाटलं, त्यात हरीभाऊ अग्रक्रमावर असावेत. पुस्तकांनी छतापर्यंत गच्च भरलेल्या भिंतीपुढचं त्यांचं छायाचित्र पाहिलं, तेव्हा १९९८मध्ये व्यंकटेश माडगूळकरांच्या घरी गेलो होतो, त्याची आठवण झाली. ते असेच छतापर्यंत गच्च पुस्तकांनी भरलेल्या भिंतीला चिकटून असलेल्या आरामखुर्चीत बसले होते.

.................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा

पाकिस्तान ते इस्लाम व्हाया पुस्तकं - १

पाकिस्तान आणि इस्लाम व्हाया पुस्तकं -२

पुस्तकं वाचून संपतात... काळ सरपटत राहतो...

‘पुस्तकनाद’ : एखादा ‘नाद’ किती सृजनशील असू शकतो, याचं उदाहरण म्हणून या पुस्तकाकडे पाहता येईल

.................................................................................................................................................................

संजय जोशींचीही बारा-पंधरा वर्षं जुनी आठवण आहे. वीस-बावीस वर्षांपूर्वी त्यांची ‘नचिकेताचे उपाख्यान’ ही कादंबरी त्या काळात ज्या पुस्तकांनी भारावलो होतो, त्यात होती. या मालेतलं शेवटचं ‘अच्युतचे उपाख्यान’ लिहून त्यांनी चौरंग पुरा करावा, असं अजूनही वाटतं. तेव्हा ओळख नव्हती अर्थात.

पुढे २००९मध्ये ठाण्याची ‘वि.रा. जोग वाचकस्पर्धा’ राज्यस्तरीय झाली, तेव्हा सोलापूरचं तिचं केंद्र आमच्या लायब्ररीतच होतं. माझं नाव लायब्ररीनंच परस्पर नोंदवलं आणि ऐन वेळी मला सांगितलं. १०० मार्कांचा लेखी पेपर. माझं वाचन पूर्ण हौशी, मराठीचं बोट शाळेबरोबरच सुटलेलं; तरी जमेल तसा पेपर सोडवला. ७५ गुण मिळाले. एकुणात दुसऱ्या नंबरसह सोलापुरातून अंतिम फेरीसाठी निवड झाली. राज्यातल्या ३५ केंद्रांतून ३५ स्पर्धक. तोंडी परीक्षा  घेतली पुष्पा भावे आणि संजय जोशी यांनी. मला ऐकायला जवळपास येत नसल्यानं दोघांनीही प्रश्न चिठ्ठीवर लिहून विचारले होते, हे आठवतं.

माझी परीक्षा जवळपास पाऊण तास चालली हेही. त्यात पहिला आलो. त्याचं बक्षीसही त्यांच्याच हस्ते मिळालं. ही ओळख नंतर फेसबुकवर काहीशी पुढे गेली. २०१२मध्ये त्यांनी वाढदिवसानिमित्त त्यांच्या नेहमीच्या ‘पुढील ५६ वर्षांत ५६०० उत्तमोत्तम पुस्तकं वाचून होवोत...’ अशा शुभेच्छा दिल्या. ‘शंभर वर्षांचं किमान वाचनक्षम आयुष्य आणि त्यातही दरवर्षी १०० पुस्तकं हे दोन्ही अशक्यप्राय योग जमून आलेच तरी एवढीच पुस्तकं वाचून होतील, निवड आणि त्वरा करायला हवी’, या त्यातल्या गर्भितार्थानं काहीसा भानावर आलो आणि वाचणं नोंदवून ठेवायला सुरुवात केली… तशी निव्वळ रंजनपर वाचनाची तोवर असलेली थोडी सूज उतरत गेली हळूहळू.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पुढील वर्षीच २०१३मध्येच शंभर पुस्तकांचं ‘लक्ष्य’ही गाठलं. संजय जोशींनीच २०१४मध्ये संपादित केलेली ‘अभंग वाचकनिशी’ ही डायरी घेतली. त्यात अभिजात शंभर पुस्तकांवरची संक्षेपात टिपणं होती. त्यात वर्षभर स्वतःशीच वाचनासंबंधी टिपणं लिहीत संवाद केला. घ्यायच्या-वाचायच्या पुस्तकांच्या नोंदी केल्या. हे तसं अलीकडचं, पण मला मुळात शाळकरी वयापासूनच वाचायला आवडायचं. पण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शब्दशः कोंड्याचा मांडा करत एका पायावर संसार ढकलत, पुढं नेणाऱ्या आजीला घरी वृत्तपत्र घेणं हीही चैन वाटे.

आम्ही ‘सोलापूर समाचार’ (त्यात दोन पानं गच्च भरून सिनेमाच्या मोठ्या मोठ्या जाहिराती असत) हट्टानं सुरू केला की, महिनाअखेरीस एखाद्या पहाटे सरकत ती दारापाशी जाऊन बसे आणि पेपरवाला आला की, त्याला ‘उद्यापासून नको’, असं सांगून टाकी. आम्ही झोपेतच असू. पेपर आजीनं बंद केला, हे कळायलाही चार-सहा दिवस जात. मग माझी रोजची सकाळ वेगवेगळे पेपर येणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाई. त्यांचा वाचून, चाळून कधी होतोय, याची वाट आशाळभूतपणे पाहत राही. तिथपासून आज जवळपास चार दशकांत ‘वाचणं आणि त्यातून समजून घेणं’ हीच जीविका किंवा जीवनशैली कधी झाली ते लक्षातच आलं नाही, जणू यापेक्षा वेगळं काही होणारच नव्हतं.

इंजिनीयर झालो, विद्यापीठात गुणवत्ता यादीत नाव आलं, त्यालाही तीन दशकं उलटून गेली, पण तेव्हा आजच्याइतकी स्पर्धा नव्हती… तरी काही खास परिश्रम घेऊन यातच करिअर करावं असं घडलं नाही. किंबहुना वाचण्याव्यतिरिक्त काहीच, कुठलीच गोष्ट खास प्रयत्नानं केल्याचं आठवत नाही. सगळ्या गोष्टी आपोआपच त्याच्या मागेपुढे, सहज रूटीन असतं तशा घडत गेल्या, त्या स्वीकारत गेलो. एखादी गोष्ट वाचून आपली आपण समजून घेण्यात, त्यातही पुस्तकातल्या ऐवजाची संगती लावत समाजातल्या, परिस्थितीतल्या, नात्यांमधल्या तिढ्यांचा उलगडा करण्या-होण्यातही आपल्याआपल्यापुरता सृजनानंद असतो. स्वतःपलीकडच्या जगाकडे पाहण्याचं भान रूंदावत जातं, हे कदाचित नव्या निर्मितीच्या रूपात अभिव्यक्तीच्या पृष्ठभागावर आणता येत नाही, तशी काही खास असोशीही नसते.

.................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा

वेदनेनं झपाटलेली माणसं आणि त्यांच्या बुलंद आशावादाची पुस्तकं!

नरकातल्या घाणीच्या गोष्टी

वेदनांचा प्रवास… आत आणि बाहेरही...

‘कुठाँव’ : इतके दिवस व्यवस्थेनं ‘या’ विषयावरचा सोयीनं धरून ठेवलेला मौनाचा पडदा टराटरा फाडणारी कादंबरी!

.................................................................................................................................................................

गेल्या दहा-अकरा वर्षांत नोंदलेली जवळपास अकराशे आणि आधीच्या वीस-पंचवीस वर्षांतली, अशी काही हजार पुस्तकं वाचताना असा आनंद निर्मितीच्या जवळपास पोचणारा असतो, हा अनुभव मी अनेकवार घेतला. वाटण्यानं वाढतो म्हणत हा आनंद वाटून घ्यावा असं वाटत होते, पण लिहिण्याचा तेवढा आत्मविश्वास तेव्हा नव्हता, आजही नाही. आमच्या समविचारी गोतावळ्यासह १९९५पासून पुढे १५ वर्षं ‘आशय’ हे वाङ्मयीन वार्षिक काढलं, सहा अधलेमधले विशेषांकही काढले. त्याला काही पुरस्कारही मिळाले. २०१२पासून दरवर्षी ग्रंथदिनी पुस्तकं आणि वाचनप्रक्रिया यावर सलग दहा विशेषांक काढले. पुस्तकं आणि वाचनानं दिलेल्या आनंदाची कृतज्ञता म्हणून विनामूल्य वितरित केले.

त्याआधी पाच वर्षं काही विशेष सुचत नव्हतं, तर वाचन, पुस्तकं, तत्संबंधी बातम्या यांचे बुकमार्क्स, फोल्डर्स केली, आधीच फाटक्या खिशाला तोशीस लावून. काही करून पुस्तकांनी दिलेल्या या अफाट आनंदाचा जाहीर उच्चार करावा, असं फार आतून वाटत होतं. अपेक्षा कसलीच नव्हती, पण आपल्या समधर्मीयांपर्यंत तो पोचावा असे वाटे. तरी त्यातही मी नैमित्तिक, संपादकीय लेखन सोडलं, तर फारसं काही लिहिलं नाही. पण २०१६मध्ये राम जगताप यांनी ‘अक्षरनामा’ हे दैनिक वेबपोर्टल सुरू केलं, त्याआधी काही दिवस संपर्क केला आणि तिथं पुस्तकांवर लिहावं, असं आग्रहपूर्वक सुचवलं. तोवर क्वचित काही निमित्तानं कुठे लिहिलेलंही कुणी तरी लक्षात ठेवलं, याने काही हुरूप आला आणि तेव्हा वाचत असलेल्या पुस्तकांवर दीर्घलेख लिहिला- ‘इस्लाम आणि पाकिस्तानविषयक पुस्तकं’. हा लेख अनपेक्षितपणे चांगला वाचला गेला, इतका की, मी दुसऱ्या दिवाळीत यांचा उत्तरार्ध लिहिला. या दोन्ही मिळून १० हजारांपेक्षा जास्त शब्दांत मी या विषयासंदर्भातल्या ४०हून अधिक पुस्तकांवर लिहिलं होतं.

तेव्हापासून आपली ‘फेसबुकवर’ची हक्काची भिंत आणि तेवढाच हक्काचा ‘अक्षरनामा’, ‘बाईट्स ऑफ इंडिया’सारखी वेबपोर्टल्स, मराठीतली बहुतेक दैनिकं, मासिकं, दिवाळी अंक असा फक्त पुस्तकांवरच्या लेखनाचा संसार वाढत गेला. दोनअडीचशे पुस्तकांवर लिहून झालं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सध्याही दोन सदरं चालू आहेत. त्यातलं एक फक्त समकालीन हिंदी पुस्तकांवरचं आहे. यात न सामावणारं डायऱ्यांमधूनही लिहित राहिलो. त्यातल्या मुद्रित माध्यमात न आलेल्या शंभर नोंदींचं पुस्तक ‘वाचन प्रसंग’ या नावानं येतंय. या दरम्यान त्र्यं.वि. सरदेशमुख या नावाचा सारस्वती शुभग्रह माझ्या कुंडलीत नांदून गेला, त्यानं हे वाचनवाटेवरचं माझं चालणं निव्वळ वेळखाऊ, रंजनात्मक वळणांवर रेंगाळणार नाही, याची काही न सांगता काळजी घेतली.

घरही या काळात आमच्या इतकंच किंबहुना काकणभर जास्तच पुस्तकांचं झालं. एका कोपऱ्यापासून सुरू झालेला हा प्रपंच घरभर पसरत गेला. कपाटं, खिडक्या, कपड्यांचे, साड्यांचे कप्पे अशी सगळीकडे त्यांनी हवीहवीशी घुसखोरी केली. आधी असलेला खिशाचा धाकही फारसा उरला नाही, कारण बरेच लेखक, फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमधले प्रत्यक्ष भेट न झालेले वाचकही पुस्तकं पाठवायला लागले. अनेक जण दिवाळी, नवे वर्ष, वाढदिवस अशा निमित्तानं ‘तुमच्या विशलिस्टमध्ये काय आहे सध्या?’ अशी आडमार्गानं पण आग्रही विचारणा करून ती पुस्तकं पाठवतात.

वाचनातून मिळालेलं सौहार्दाचं हे देणं अद्भुत आहे. या वर्षभरातच अशी ८०हून पुस्तकं घरात आलीत. आज या पुरस्कारातल्या पुस्तकांमुळे शंभरी पार होईल. विकत घेतलेली तेवढीच. त्यामुळे हा सन्मान मला व्यक्तिगत माझा नाही, तर एकंदर पुस्तकांचा, वाचनाचा सन्मान वाटतो, वाचणाऱ्या सगळ्यांचाच वाटतो.

हा पुरस्कार जाहीर झाला, तेव्हा दोन दिवस सतत अभिनंदनाचे फोन येत होते. त्यात माध्यमविश्वातले मान्यवर शेखर देशमुख होते, त्यांनी मोठी मेल केली. तसंही ऐकायला कमी येत असल्यानं फोनवर अगदीच जुजबी संवाद शक्य होतो.

.................................................................................................................................................................

हेही पाहावाचाअनुभवा

‘अस्तिसूत्र’मधील कथा वाचणे, अनुभवणे हा निखळ बौद्धिक आनंद आहे!

‘क्षुधाशांती भुवन’ : किरण गुरव हा समकालीन मराठी साहित्यातला अत्यंत मौलिक, टाळता येणार नाही, असा ‘थांबा’ आहे...

‘मेळघाट : शोध स्वराज्याचा’ या पुस्तकात मिलिंद बोकील ‘स्वशासन’ ही संकल्पना स्पष्ट करतानाच आपल्याकडच्या प्रशासकीय विटंबनेचा उल्लेख करतात, तेव्हा पटतंच ते!

निखिलेश चित्रेंचा असंख्य शक्यतांनी भरलेल्या वाटेवरचा पुढचा लेखनप्रवास आणखी कुठल्या चकव्यात नेईल, की काही वेगळ्या वाटेने होईल, याची उत्सुकता आहे…

.................................................................................................................................................................

त्यांनी लिहिलं होतं, त्यातला महत्त्वाचा भाग असा – ‘‘एरवी आपल्याकडे लेखक खंडीभर असतात, पण ते लेखन आस्वादण्याची क्षमता असलेले वाचक (प्रसंगी पुस्तक खरेदी तुडुंब होत असली तरीही) अभावानेच सापडतात. खरं पाहता, वाचक घडवण्याची प्रक्रिया आपल्याकडे समांतरपणे घडलेली नाही, असं माझं निरीक्षण आहे. ते कदाचित चुकीचंही असू शकेल. परंतु मला जाणवलेली वस्तुस्थिती ही अशी आहे. सामान्य वाचकाची झेप लोकप्रिय लेखकांपलीकडे जाताना दिसत नाही. बहुसंख्य मराठी वाचकांसाठी काळ पुढे सरकलेलाच नाही, असं वाटतं. आजही अनेक सर्वेक्षणं प्रसिद्ध होत असतात, त्यात हीच पसंती दिसते. त्यामुळे वर्तमानातले बहुसंख्य लेखक-कवी-कादंबरीकार उपेक्षितच राहतात.

“जशा आपल्याकडे लेखन कार्यशाळा असतात, तशा वाचक कार्यशाळा किती होतात, याची मला कल्पना नाही. आता तर लेखक-वाचक हा संवाद केवळ पुस्तक प्रकाशन किंवा चर्चा-संमेलनं यापुरता आणि बहुतेक वेळा समारंभीय प्रकारातलाच अधिक असतो. यात लेखक-वाचक असा त्याच्या साहित्यकृतीच्या अनुषंगाने संवाद अभावानेच होताना दिसतो.

अशा वेळी परिस्थितीच्या रेट्यातून उत्तम लेखक पुढे येतील, पण वाचकांचं काय करायचं, ते कसे ‘लर्नेड’ या वर्गवारीत येतील, हा मला वाटतं आजच्या घडीचा महत्त्वाचा मुद्दा ठरावा. तुमच्यासारखे असंख्य नीतिन वैद्य गावोगावी पुढे येतील, या माझ्या मनातल्या इच्छेला या पुरस्काराच्या निमित्तानं आवाजही मिळेल, ही आशा.’’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मला वाटतं, यावरचं एक उत्तर आपल्यापुरतं तरी अथक वैयक्तिक प्रयत्नांमधून संजय जोशींनी गेल्या काही वर्षांत सिद्ध केलेलं आहे. कवितासंग्रहांसह अनेक मौलिक पुस्तकं वाचकांच्या घरात आज गेलीत ती त्यांच्यामुळे. पुस्तकांच्या दुकानात ‘वाचन सल्लागार’ ही नवी संकल्पना त्यांनी रूढ केली आहे. तरी मला वाटते, वाचन ही स्वतंत्रपणे व्यक्तिगत स्तरावर विकसित होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. सर्व बाह्य उपक्रम ‘घोड्याला पाण्याच्या प्रवाहापर्यंत घेऊन जाणं’, तेही अर्थात मौलिक आहे फार, तरी इथवरच होऊ शकतात.

पुस्तकं घरी आली, तरी ती आत मुरवण्यातली गंमत ज्याची त्याला कळावी लागते. तिचा चस्का एकदा लागला की, आपल्यातल्या अंगभूत अभिरुची, आकलनक्षमतेनुसार वेगवेगळ्या दिशांनी वाचन आपापतःच विकसत अधिकाधिक माणूसपणाकडे नेतं. कुठल्या विशिष्ट उद्दिष्टानं केलेलं वाचन उपयोगी खरं, पण त्यातून तुमच्यात मुळात असलेल्या शक्यता विकासतात, पण त्यात फारसा बदल संभवत नाही. त्यामुळे पुस्तकांच्या जगात निरुद्देश हरवून जाण्यातल्या गंमतीचा जेवढ्या जास्त प्रमाणात संसर्ग होईल, तेवढा आजचा सर्वदिशांमधला उन्मादी कोलाहल शांतवत जाईल.

समाजमाध्यमांचा स्फोट ही बाब खरं तर अनेकार्थांनी सकारात्मक म्हणता येईल. मोठ्या वर्गाला त्यातून आपला आवाज मिळाला, बोलण्या-अभिव्यक्तीसाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं. पण आता इतक्यातच आपण सतत आवश्यक, अनावश्यकही जाहीर लिहिता-बोलताना स्वतःशी बोलायची क्षमता गमावत चाललोय का, असंही वाटून जातं. पुस्तकं मुरायला लागली आत की, याचीही गरज नव्यानं वाटू लागते, हा स्वानुभवही आजच्या निमित्तानं मांडण्याची संधी घेतो....

‘इतकं दिलंत तुम्ही मला’ या शीर्षकाचं मंगेश पाडगावकर यांचं एक बोलगाणं आहे. आपल्यात जे काही थोडंफार चांगलं आहे, ते सगळं पुस्तकांचं देणं आहे, या जाणिवेनं ते मला पुस्तकांना उद्देशून गावंसं वाटतं-

‘पुस्तकांनो,

इतकं दिलंत,

इतकं दिलंत तुम्ही मला!

खरं सांगतो,

माणूस केलंत तुम्ही मला…’

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Jayant Raleraskar

Tue , 12 September 2023

नितीन वैद्यांचे भाषण खूप काही ऐवज देणारे आहे. वाचनाचा प्रवास आणि वाचक म्हणुनचे हृदगत याचा हा अस्सल अनुभव. पुन्हा पुन्हा वाचताना आपल्याशी पडताळून पहावे वाटले...इतका अस्सल. नितीनचे मनापासून अभिनंदन.. - जयंत राळेरासकर, सीलापूर.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......