‘An atheist with Gandhi’ (१९५१) हे श्री गोरा यांचे इंग्रजीतील पुस्तक. गोरा म्हणजे गोप राजू रामचंद्र राव (जन्म - १९०२ आणि मृत्यू - जुलै १९७५). त्यांच्या आद्याक्षरावरून गोरा हे नाव त्यांना पडलेले आहे. गोरा हे कर्मठ नास्तिक आणि देशभक्त गांधीवादी कार्यकर्ते. त्यांचे कार्यक्षेत्र आंध्र प्रदेश. गांधी आणि गोरा यांच्या आस्तिक आणि नास्तिक चर्चेच्या आठवणींचे हे पुस्तक. गोरांची शैली अतिशय चित्रमय आहे. दोघांमधील चर्चा वाढतात, तसेच संबंधसुद्धा खूप जवळचे होत जातात. चर्चेतून मुद्दा पुढे जातो, तसे एकमेकांना समजावून घेणेही वाढते.
गोरांच्या मुलीचा आंतरजातीय विवाह आश्रमातच करायचा, असे गांधी प्रेमळ हक्काने सांगतात. तेव्हा “तुमच्या मंगलाष्टकात ईश्वर आम्हाला कसा चालणार?” या गोरांच्या प्रश्नावर गांधी मंगलाष्टकातून ‘ईश्वर’ गाळून ‘सत्य’ शब्द घालतात. तुमच्या नास्तिकतावादावरील पुस्तकाला प्रस्तावना मी लिहिणार, असे गांधी गोरांना सांगतात. चर्चेचा महिना ठरतो, त्यापूर्वीच गांधींचा खून होतो. दोघांमधील सबंधाचे विलक्षण प्रसंग या पुस्तकात आहेत. आज ६७ वर्षांनंतरही हे पुस्तक महत्त्वाचे आहे. अतिशय विलक्षण आठवणी आणि विचाराला चालना देणारे पुस्तक आहे.
या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘नास्तिकासोबत गांधी’ या नावाने कथाकार आणि सामाजिक कार्यकर्ते विजय तांबे यांनी केला आहे. हे पुस्तक नुकतंच मनोविकास प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाच्या संबंधाने ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांनी मांडलेली ही भूमिका संपादित स्वरूपात...
.................................................................................................................................................................
१.
‘An Atheist with Gandhi’ या नावाचे श्री. गोरा यांचे पुस्तक १९५१ साली प्रसिद्ध झाले होते. गोरा हे आंध्र प्रदेशातील एक कार्यकर्ते. ते काही काळ व्यवसायाने प्राध्यापक होते. त्या काळातला शब्द वापरायचा झाला, तर हरिजनांच्या, अस्पृश्यतेच्या प्रश्नांबद्दल गोरा प्रत्यक्ष कार्यरत होते. त्यांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे, ते स्वत: कडवे नास्तिक होते. त्याच काळात गांधीजी अस्पृश्यता विरोधी काम करत असल्याने, त्यांना गांधीजींचे आकर्षण होते. गांधीजींच्या अस्पृश्यतानिवारण भूमिकेबद्दल त्यांना कुतूहल होते. गांधीजींशी या प्रश्नावर विस्ताराने चर्चा करावी, आपण नास्तिक असूनही हे काम करतो आणि नास्तिकवादाला किती महत्त्व आहे, हे गांधीजींना पटवून द्यावे, असे त्यांना वाटत असे.
हे पुस्तक स्वत: गोरा आणि गांधीजी यांच्या चर्चेवर आधारलेले आहे. गांधीजींच्या निधनानंतर तीन वर्षांनी गोरांनी आपल्या आठवणींच्या आधारावर हे पुस्तक लिहिलं आहे. गांधीजी हयात असते, तर त्यांनी काय म्हटले असते, याचे कुतूहल जसे गोरांना होते, तसेच वाचकांनाही राहील. या पुस्तकामध्ये गांधीजी आणि गोरांमध्ये झालेली चर्चा, पत्रव्यवहाराचे संदर्भ हे एकत्र आल्याने एकाच वेळी वाचकाला गोरा आणि गांधीजी यांच्या भूमिकांची तुलना करून विचार करायला एक अवकाश आपोआप मिळेल.
त्या वेळचे गांधीवादी विचारवंत किशोरलाल मश्रूवाला यांची पुस्तकाला असलेली विचारप्रवर्तक प्रस्तावना हा पुस्तकाच्या रचनेमधील एक अजून महत्त्वाचा भाग आहे. एकाच वेळेला विचारप्रवर्तक प्रस्तावना, गांधी आणि गोरा यांच्यातील संवाद, पत्रव्यवहार या सगळ्याच्या आधारे दोघांच्या विचारातील दिसणारा संघर्ष आणि हळूहळू समन्वयाकडे सरकणे, या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय वाचकाला येण्याची सोय या पुस्तकाने केली असल्याने हे पुस्तक महत्त्वाचे आणि विचारगर्भ ठरते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
२.
गांधीजींच्या आसपास अनेक प्रकारचे लोक असत. त्यामध्ये निरनिराळ्या विषयांवर ज्यांचा सल्ला विचारता येईल, असे लोक असत. वेळोवेळी वेगवेगळ्या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींसोबत गांधीजी सल्लामसलत करत. उदाहरणार्थ, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसोबत हिंदूंचे धर्मशास्त्र, अस्पृश्यतेचा प्रश्न, वर्णव्यवस्था, अस्पृश्यतेविषयीच्या तरतुदी या प्रकारच्या प्रश्नांची चर्चा गांधीजी करत असत. दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे आसपास असणारे असंख्य राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते. ते आपापले प्रश्न घेऊन गांधीजींकडे येत आणि उत्तराची अपेक्षा ठेवत. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन आपापल्या कामाच्या ठिकाणी ते कार्यकर्ते परतत असत.
गांधीजींच्या संपर्कातील लोकांचा तिसरा प्रकार होता विचारविनिमय करणाऱ्या सामान्य माणसांचा आणि वाचकांचा. ही माणसे आपल्या व्यक्तिगत समस्या घेऊन गांधीजींकडे येत आणि त्यांच्या सल्ल्याने आपल्या जीवनात आवश्यक ते बदल करत असत. यामध्ये प्रत्यक्ष भेटून मार्गदर्शन घेणारे असत त्याचबरोबर अनेक जण वर्तमानपत्रांतून प्रश्न विचारत, पत्रे पाठवत. गांधीजी सर्वांना उत्तरे देत असत. त्यामुळे अनेक प्रश्नांवर गांधीजींचा स्वत:शीच विचार चालू असे व लेखनही चालू असे.
अशा विविध लोकांपैकी एक म्हणजे गोपराजू रामचंद्र राव. ‘गोरा’ हे त्यांचे टोपणनाव. त्यांना अस्पृश्यतेच्या प्रश्नावर काम करताना आलेले अनुभव, आलेल्या अडचणी, त्यांची नास्तिकतावादाची भूमिका आणि गांधी आपल्या आस्तिकतावादी किंवा आस्तिक्यभाव जपणाऱ्या भूमिकेतून राजकारण, समाजकारण आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे पाहत आहेत, या दोन भूमिकातील फरकांबद्दल गोरांना कुतूहल होते. आपल्या कुतूहलाचे शमन करण्यासाठी, आपली भूमिका पटवून देण्यासाठी त्यांना गांधीजींना भेटणे अत्यावश्यक वाटत होते. ते नास्तिक असल्याने गांधीजींची प्रथमदर्शनी भेट मिळणे अवघड होते. गांधीजींनी सुरुवातीला भेटायला नकार दिला होता. हळूहळू गांधीजींना त्यांच्या कामाची माहिती झाली आणि त्यातून गांधीजींनाही त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले. नंतर त्यांच्या भेटी झाल्या. या भेटीत झालेले संवाद गोरांनी आपल्या स्मृतींच्या आधारे नोंदवले आहेत.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
..................................................................................................................................................................
गोरा यांच्याशी संवाद करण्याच्या गांधीजींच्या भूमिकेमध्ये दोन गोष्टी दिसतात. गोरा करत असलेल्या कामाचा आणि त्या कामातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांबाबत त्यांच्याशी संवाद करणे. दुसरे म्हणजे गोरा ज्या नास्तिकवादी भूमिकेतून काम करत आहेत, त्या भूमिकेचा प्रतिवाद करणे. नास्तिकतावादाची भूमिका सखोलपणे गांधीजींसमोर मांडून त्यांना नास्तिक्याकडे वळवण्याची जिगर गोरांमध्ये दिसते. गांधीजी वळतील की नाही, माहीत नाही, मात्र असा संवाद करायला गांधीजी तयार झाले, यातच त्यांना निम्मे यश मिळाल्यासारखे वाटत होते. हळूहळू काळाच्या ओघात गांधीजी आपली भूमिका बदलतील, या आशेने ते संवाद करत राहिले. गांधींची हत्या झाल्याने यातला कुठलाही निर्णय लागला नाही.
हरिजनांच्या प्रश्नावर काम करताना गोरांची भूमिका अतिशय स्वच्छ आणि पारदर्शक होती. त्यांचे नातेवाईक, सनातनी ब्राह्मण यांच्याशी मतभेद झाले होते. त्यांची नाराजी पत्करावी लागली. त्या काळात महाविद्यालयातसुद्धा प्रचलित सामाजिक विचारांच्या पलीकडे जाणाऱ्या व्यक्तींना चांगली वागणूक मिळत नसे. गोरा प्राध्यापक होते. त्यांना कामाच्या ठिकाणी विरोध झाल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांच्यावर स्वजातीय, नातेवाईक आणि मित्रांनी बहिष्कार टाकला. गोरांनी स्वत:च्या निष्ठेचा भाग म्हणून आपल्या मुलीचा विवाह हरिजन तरुणाशी लावून दिला.
एकंदर नातेवाईक आणि मित्रांचा विरोध आणि बहिष्काराला गोरा एका प्रखर विचारनिष्ठेने सामोरे जात होते. त्या निष्ठेचा परिणाम म्हणून कालांतराने पूर्ण नाही, तरी काही अंशी बिघडलेले संबंध पूर्ववत झाले. हे करत असताना गोरांनी कोणतीही तडजोड केली नाही. हरिजन प्रश्नावरील त्यांची तळमळ, त्यांचा प्रामाणिकपणा कुठेही कमी झाला नाही.
अशा तऱ्हेने प्रामाणिक, तळमळीचा पण नास्तिक कार्यकर्ता अशी गोरांची प्रतिमा तयार झाली होती. गांधींच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यक्रमावर गोरांचा विश्वास होता आणि त्यांनी त्या दिशेने प्रत्यक्ष कार्य करायला सुरुवात केली होती. ते करत असलेल्या कामाला गांधीजींचा विरोध असण्याचा मुद्दा नव्हता.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
बापू, लोकांना गांधी ‘प्रोजेक्ट’ करायला आवडतो, पण ‘प्रोटेक्ट’ करायला आवडत नाही!
..................................................................................................................................................................
या पुस्तकात दोघांच्या चर्चेतून व्यक्त होणारा मुख्य मुद्दा ईश्वर या संकल्पनेशी जोडलेला आहे. गांधींच्या एकूणच कार्याचा आधार ईश्वर आहे किंवा त्यासाठी ‘आस्तिक्यभाव’ हा अधिक योग्य शब्द आहे. गांधी ईश्वर मानत असत का, याचे उत्तर ‘हो’ द्यावे लागेल, पण ते पुरेसे नाही. गांधींना कोणत्या प्रकारचा ईश्वर अभिप्रेत होता? याचे कारण प्रारंभी गांधी ‘ईश्वर सत्य आहे’, असं म्हणत होते, नंतर ‘सत्य ईश्वर आहे’, असं म्हणू लागले. ‘ईश्वर सत्य आहे’ असे म्हटल्यावर ईश्वर मान्य नाही, अशा अनेकांना म्हणजे नास्तिक असतील, ईश्वर न मानणारी दर्शने असतील, त्या सर्वांना ईश्वराचा अडथळा होत असेल, मग सत्य हा ईश्वर, ही भूमिका गांधींनी घेतलेली दिसते. पण सत्याला ते ईश्वर म्हणतात, ही गोष्ट शिल्लक राहते.
गांधींचा ईश्वर हा पारंपरिक पद्धतीचा ईश्वर नाही. तो कोणताही चमत्कार करत नाही, तो ईश्वर पूर्ण सत्याच्या रूपातला होता. मात्र गोरांना कोणत्याही रूपातला ईश्वर मुळातच मान्य नव्हता, इतके ते कट्टर नास्तिक होते की, ‘ईश्वर’ या शब्दालाही त्यांचा विरोध दिसतो. ते व्यक्तिश: नास्तिक असते, तर मुद्दा गौण होता, परंतु गोरा स्वत:ला नास्तिकतावादी म्हणवून घेत असत. नास्तिकतावाद ही आपल्यासाठी समग्र विचारप्रणाली आहे, अशी त्यांची धारणा होती. नास्तिकतावादामुळे आपल्याला समाजातले ताणतणाव कमी करण्यात यश येऊ शकते, अस्पृश्य आणि सवर्ण यांच्यातले संबंध, धर्माधर्मातले संबंध सुरळीत होऊ शकतात, कारण सर्व माणसांनी जर नास्तिकतावाद जोपासला, तर माणसांना लागलेली निरनिराळ्या धर्माची लेबल्स आपोआपच निष्क्रिय होतील किंवा निरुपद्रवी ठरतील, असे त्यांना वाटत होते.
एका अर्थाने आजच्या अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांची जी नास्तिक भूमिका असते, तीच गोरा यांची होती. गोरा असं मानतात की, हिंदू, मुस्लीम, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख ही सगळी माणसांना लागलेली लेबले आहेत. ही मुळात भेदभाव करणारी लेबले आहेत. मी हिंदू आहे किंवा मी मुस्लीम आहे, असे म्हणतो तेव्हा मी कोण नाही, हे त्यातून व्यक्त होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
व्याकरणदृष्ट्या पाहायचे झाले, तर हे खरेच आहे, पण एवढ्याने या लेबल्सचा विचार पूर्ण होत नाही. मानवी जीवनाच्या उत्क्रांत अवस्थेमधून धर्म नावाचे एक घटित निर्माण झाले. अनेक धर्म आणि निरनिराळे पंथ निर्माण झाले. माणसांच्या जीवनाची विभागणी पंथांच्या खणात आणि काही अंशी खणाखणीत झाली, हा गोरा यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप आहे. पण गोरांच्या बघण्यामध्ये एकच दृष्टीकोन अभिप्रेत आहे की, ही सर्व लेबल्स ईश्वर नावाच्या गोष्टीशी जोडलेली आहेत आणि माणसे ईश्वराची गुलाम झाली आहेत, या पद्धतीने गोरा विचार करतात.
धर्मांनी इतिहास काळात ऐतिहासिक भूमिका बजावलेली आहे, योगदान दिले आहे, माणसाला आधार दिला आहे, या दृष्टीने किंवा या पातळीवरून गोरा विचार करत नाहीत. त्यांची भूमिका ऐतिहासिक नाही. या अर्थाने गोरांच्या विचारपद्धतीत ऐतिहासिकतेचा अभाव आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीत धर्माविचारांचीही उत्क्रांती झाली, या क्रियात्मक धर्म विचारापासून आजच्या ग्रंथित धर्मविचारापर्यंत धर्मविचारांत उत्क्रांती झाली, या सत्यापासून गोरा लांब आहेत. ईश्वर नाही, ही भूमिकाही अशाच उत्क्रांत प्रक्रियेतून आली आहे, हे गोरा यांनी विचारात घेतलेले नाही.
याच्या उलट गांधीजी जीवनाची मूलभूत एकात्मता मान्य करतात. या एकात्मतेतील वैविध्य ते पाहतात. त्यामुळे धर्माच्या लेबलांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी गोरांच्यापेक्षा वेगळी आहे. त्या लेबल्सच्या मागे असणारा धर्मविचार, ईश्वरविचार याकडे गांधीजी अतिशय गांभीर्याने बघतात आणि त्यावरून त्यांची स्वीकारार्हता ठरवावी की ठरवू नये, याचा निर्णय ते करतात. गांधीजींचा ईश्वर कुठल्याही अर्थाने चमत्कार करणारा, स्वत:चे अस्तित्व त्या आधारे टिकवून ठेवणारा अशा प्रकारचा ईश्वर नाही. त्यांची ईश्वराची कल्पना निराकार पद्धतीची आहे. त्यांना कुठल्याही कर्मकांडाची गरज भासत नाही.
गोरांच्या समोर असलेली ईश्वराची संकल्पना आणि तिची समाजात असलेली राबवणूक आणि गांधीजींचा ईश्वर यांचा मेळ जमून येत नाही. तरीही गोरा गांधीजींशी संवाद करताना त्याच ईश्वर कल्पनेच्या आधारे बोलतात आणि खरे तर गांधीजी त्या कल्पनेपासून पुष्कळ पुढे गेलेले असतात. या अर्थाने गांधी-गोरा या संवादात विसंवाद दिसतो.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
..................................................................................................................................................................
१९३० सालापासून गोरांना गांधीजींशी त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल चर्चा करायची होती. नास्तिकतावाद त्यांचा आधार असल्याने त्यांना नकार मिळाला. गांधीजींच्या सहवासात कोणी उघड नास्तिक नव्हता. त्यामुळे गांधींचा भेटीला नकार होता, असे गोरा यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे, पण ते अपुरे आहे. गांधीजींच्या सहवासात लोहिया होते. ते नास्तिक होते. ते सिगरेट ओढत असत. लोहियांना आपल्यासमोर सिगरेट ओढायला गांधीजींनी परवानगी दिलेली होती. लोहिया कुठल्याही अर्थाने आस्तिक नव्हते. गांधी आणि लोहियांचे संबंध पुष्कळ चांगले राहिले.
दुसऱ्या बाजूला आस्तिक नसणारे, कडवटपणे नास्तिक नसणारे पण अज्ञेयवादी जवाहरलाल नेहरू गांधीजींच्या सहवासात होते. त्या दोघांचा संबंध पिता-पुत्र पातळीवर होता. गांधीजींच्या आस्तिक असण्याने किंवा नेहरूंच्या अज्ञेयवादी असण्याने त्यांच्या संबंधात कुठेही कडवटपणा आला नाही. मतभेद होते. नेहरूंच्या भूमिका मान्य नसूनही गांधी नेहरूंसोबत सहजपणे काम करू शकत होते. गोरांनी उघड नास्तिक असण्या-नसण्याचा जोडलेला संबंध चुकीचा आहे. गोरा नास्तिकतावादाचे ज्या पद्धतीने आग्रही व म्हटले तर प्रचारक होते, तसे नेहरू किंवा लोहिया प्रचारक नव्हते.
भारताच्या इतिहासात कडव्या निरीश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या एम. एन. रॉय यांचा पंथ होता. ते कडवे होते, पण त्यांच्या राजकीय, सामाजिक कार्यक्रमात नास्तिकतेचा प्रचार हा मुद्दा नव्हता. गांधींच्या सहवासात एखादा कडवट नास्तिक असता, तर कदाचित त्यांची दृष्टी बदलली असती, या गोरांच्या विधानाला वा त्यांच्या संवादातील गृहीत अपेक्षेला कसलाही आधार नाही.
या पुस्तकात गांधीजी आणि गोरा यांच्यातील नास्तिकतावाद आणि हरिजन प्रश्न अशी बरीच चर्चा आहे. ती मूलभूत स्वरूपाची चर्चा आहे. गांधीजी त्यांच्या विवेचनात, लेखनात, संभाषणात ‘ईश्वर’ शब्द वापरतात, हीच गोष्ट गोरांना मुळात आक्षेपार्ह वाटते. तुम्ही ईश्वर शब्द का वापरता याचा खुलासा ते विचारतात, तेव्हा गांधींनी दिलेले उत्तर विचार करण्यासारखे आहे. ईश्वर हा आकलनाच्या पलीकडला आहे, असं गांधींनी गोरांना दिलेले उत्तर आहे. अर्थात गोरांना ते मान्य नाही. या उत्तरावर गोरा असे म्हणतात की, जे आकलनाच्या पलीकडे आहे त्याचा विचार कशासाठी करायचा?
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
बापू, लोकांना गांधी ‘प्रोजेक्ट’ करायला आवडतो, पण ‘प्रोटेक्ट’ करायला आवडत नाही!
..................................................................................................................................................................
गोरांची भूमिका व्याकरणदृष्ट्या अर्थ काढून व्यावहारिक भूमिकेवर स्थिरावणारी आहे. मात्र ईश्वर आकलनाच्या पलीकडचा आहे, हे म्हणणाऱ्या गांधींच्या भूमिकेमध्ये काय काय गर्भित आहे, त्यातून ते काय सुचवितात ते गोरांपर्यंत पोचले की नाही याची शंका येते. गांधी ईश्वर मानवी आकलनाच्या पलीकडचा आहे, असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला सत्य हा ईश्वर आहे, असं म्हणतात. तेव्हा सत्य हेही मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे असा निष्कर्ष निघतो.
सत्य हा कायम शोधाचा विषय असतो. ते शोधत राहावं लागतं आणि सत्य सापडलेलं असं म्हणता म्हणता न सापडलेलं बरंच काही त्याच्या पलीकडे उभं असतं. आकलन झालं असं मानत असताना, आकलनाच्या पलीकडील बराचसा भाग नजरेसमोर येतो, या अर्थाने गांधीजी ईश्वर किंवा सत्य मानवी आकलनाच्या पलीकडचे आहे असं म्हणतात.
गोरांची विचार करायची पद्धत अतिशय तार्किक आहे. ती गांधींसारखी अंत:प्रेरणेवर (intuitions) आधारित नाही. सामाजिक कामामध्ये उद्दिष्ट आणि व्यावहारिक परिणाम हे गांधींचे निकष आहेत. समजा गांधींनी आपल्या चळवळीत येणारा प्रत्येक माणूस नास्तिकच असला पाहिजे अशी भूमिका घेतली असती, तर स्वातंत्र्य चळवळीची काय अवस्था झाली असती, याची आपण कल्पना करू शकतो. नास्तिक समाज निर्माण करणे, हे गांधीजींचे उद्दिष्ट नव्हते. खरे तर स्वातंत्र्य चळवळीतील कोणाचेच नव्हते. व्यवहारामध्ये माणसे आस्तिक की नास्तिक, हे पाहण्यापेक्षा माणसे कोणत्या उद्दिष्टाने एकत्र येतात, त्याचे कोणते व्यावहारिक परिणाम होतात आणि ज्या प्रकारचा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, त्या समाजाच्या दिशेने याची पावले पडतात की नाही, या निकषांना महत्त्व द्यावे लागते.
या अर्थाने गांधीजी व्यावहारिक विचार करतात, तर दुसऱ्या बाजूने हाच व्यावहारिक विचार असंख्य लोकांना समजावून घेणाऱ्या पातळीवर जातो, त्यांच्या क्षमता जोखण्याच्या पातळीवर जातो आणि त्यानुसार त्यांना आपल्या आंदोलनामध्ये आणि कार्यक्रमामध्ये सहभागी कसे करून घेता येईल, याचा आधार होतो.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
गांधीजी ईश्वराला अनाकलनीय म्हणतात, तेव्हा सत्याचा अथक शोध त्यांना अभिप्रेत आहे म्हणून सर्व सत्य सापडले, असे ते कधीच म्हणत नाहीत. जे काही राहते ते पुन्हा शोधावे लागते, या अर्थाने शोध हा कायमचा भाग आहे. ईश्वर हा कायम शोधाचा विषय आहे, अशी गांधींची धारणा आहे.
याचा दुसरा अर्थ असा आहे की, गांधीजी ईश्वराला समग्र, सम्यक (in itself) मानतात आणि त्याला पाहण्याचा माणसाचा प्रयत्न हा समग्र किंवा सम्यक असावा, पण व्यवहारात तो सम्यक असत नाही. यामुळे ईश्वर किंवा सत्याचा शोध घेणे म्हणजे एका पातळीवर आपण स्वत:ला आयुष्यात शोधत जाणे. ईश्वरी प्रेरणा ही मुळातच मांगल्यावर आधारित आहे, त्या मांगल्याच्या दिशेने आपल्या जीवनाला पुढे नेत जाणे या अर्थाने ईश्वर आणि सत्याचा शोध गांधींना एकच दिसतो.
गोरांना ईश्वर वगळता गांधींचे बहुतांश अस्पृश्यता निर्मूलनातील उपक्रम मान्य आहेत. या सामाजिक विचारांच्या आधारे समाजाची कोणत्या प्रकारे पुनर्रचना करायची याच्याबद्दल गोरा चर्चेमध्ये बोलत नाहीत, म्हणून गांधीजी या विषयावर बोलत नाहीत. गोरा आपल्या समविचारी मित्रांच्या सोबतीने अस्पृश्यता निवारणासाठी सहभोजन, हरिजन वस्तीत जाणे असे कार्य करत होते. त्या काळाच्या दृष्टीने हा खूपच पुढारलेला कार्यक्रम होता. मात्र गोरांचा दावा असा आहे की, हे ते करू शकले, कारण त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी नास्तिकतावाद स्वीकारलेला असल्यानेच हे शक्य झाले.
सगळी माणसे एकसारखी आहेत, अवघी मानवजात एकच आहे, असं म्हणायचं असेल. तर सगळ्यांना नास्तिकतावादी व्हावे लागेल. किंबहुना नास्तिकतावादच या प्रकारची भूमिका घेऊ शकतो. ही गोरांची नास्तिकतावादाची मूलभूत भूमिका असून त्यामुळेच हे कार्यक्रम ते करतात असा दावा त्यांनी पुस्तकात केला आहे. गोरा आणि त्या आधी गांधीजींसोबत ज्यांनी चर्चा केली ते डी. रामस्वामी हेसुद्धा त्यांच्या सर्व कार्याचे अधिष्ठान नास्तिकतेमध्ये शोधतात.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
..................................................................................................................................................................
नास्तिकतावादाला त्यांनी समग्र विचारप्रणालीचे स्वरूप दिल्याचे जाणवते. त्यांच्या म्हणण्यानुसार नास्तिकतावाद हा सर्वसमावेशक आहे. तो मानवजात एकच मानतो. धार्मिक लेबले त्याला मान्य नाहीत. लेबल्स ही विघटनकारी असतात. ईश्वरामुळे अवलंबित्व, मुक्त मन:शक्तीला अडथळा, भेदांमुळे मानवी म्हणून काही एक नसणे, पूर्वनियोजिततेमुळे मानवास मर्यादा पडणे, माणसे गुलाम होणे, स्वातंत्र्य गहाण टाकणे, नशिबाला दोष देणे, पिळणारे आणि पिळले जाणारे तसेच लुटणारे आणि लुटले जाणारे दोघेही एकाच नशिबी पद्धतीने विचार करतात.
अस्पृश्यतेचे समाजात खोलवर रुजणे हाही याचाच परिपाक आणि परिणाम आहे. नास्तिकतावाद नकारात्मक वाटला तरीही त्याच्या गर्भितार्थात तो सकारात्मक आहे (याची उदाहरणे गोरांनी पुस्तकात दिलेली आहेत.). आस्तिकतावाद्यांची दुष्कृत्ये त्यांच्या आस्तिकतावादी दृष्टीकोनामुळे आहेत. त्याला नास्तिकतावाद हेच उत्तर आहे.
अशा पद्धतीने गोरांनी पुस्तकात आपली भूमिका मांडली आहे. या उलट गांधींची दृष्टी सांगते की, नास्तिकतावाद हा एका अर्थी स्वत:ला दिलेला नकार आहे. सत्य हेच ईश्वर आणि लेबल ही मानवी विकासाच्या टप्प्यांची खूण आहे. ही गांधीजींची दृष्टी ऐतिहासिक असणारी आहे. हा दृष्टीकोन गोरांचा नाही. गोरा धर्माचा इतिहास, योगदान, धर्माची विधायक कामगिरी हे न पाहता धर्मामुळे निर्माण झालेले भेद, युद्धे, हिंसा या अंगांनी फक्त या लेबलांचा विचार करतात, हा त्यांच्या विचारप्रणालीचा मोठा दोष म्हणावा लागेल. कदाचित त्या काळी जोर धरणाऱ्या हिंदुत्ववादी व मुस्लीम लीग यांच्या कट्टर होत जाणाऱ्या राजकारणाची प्रतिक्रियाही गोरांच्या मनामध्ये असावी.
हिंदू-मुस्लिमांच्या दंगली, भय व अविश्वासाचे वातावरण यातून त्या काळात मुक्त असणे अवघडच होते. गांधीजी जीवनाची एकात्मता मानत असल्याने धर्म ही करकचून बांधलेली संकल्पना त्यांना योग्य वाटत नाही. ते धर्माचा अर्थ पारंपरिक पद्धतीने लावत नाहीत. परंपरेने धर्माविषयी जे म्हटले आहे, ते गांधीजी जसेच्या तसे स्वीकारत नाहीत. गांधीजींची ही पद्धती गोरांच्या विवेचनात कुठेच येत नाही.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
बापू, लोकांना गांधी ‘प्रोजेक्ट’ करायला आवडतो, पण ‘प्रोटेक्ट’ करायला आवडत नाही!
..................................................................................................................................................................
‘Spirit of religion’ आणि ‘text of religion’ हे गांधींच्या विचारप्रणालीमधील महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते गोरांच्या विचारात दिसत नाहीत. गांधी धर्माची प्रेरणा ईश्वराशी जोडतात. पुन्हा तो ईश्वर सत्याशी जोडतात. त्यामुळे सत्याच्या प्रेरणेच्या अनुषंगाने धर्माची निर्मिती आणि दुसऱ्या बाजूला त्या सत्याला साजेसे स्वत:चे जीवन जगण्यासाठी धर्मग्रंथांमध्ये काळानुरूप करण्याचे बदल, या पद्धतीने गांधी धर्माचा विकासक्रम सांगतात. तो पुढे नेण्याचे आवाहनही ते करतात. जे जे मानवी आहे ते अपुरे असण्याची शक्यता गांधी गृहीत धरतात.
माणसे ही वासना, विकारांनी, भावनांनी ग्रस्त असतात, हे मूलभूत सत्य गांधी विसरत नाहीत. गोरांच्या नास्तिकतावादाच्या समग्र प्रणालीमध्ये हे साधे सत्य ते विसरलेले आहेत. माणसे सरसकट नास्तिक होणे हे शक्य आहे का, याचा विचार गोरा करत नाहीत. माणसांनी कोणता दृष्टीकोन स्वीकारला, तर माणसे चांगला समाज निर्माण करतील, याचेही उत्तर ते पुन्हा नास्तिकतावादाच्या अंगाने देतात. एका विशिष्ट प्रसंगात सर्व माणसे समान वर्तन करतील असे नाही, या अर्थाने माणसांचा कुठलाही अंदाज करता येत नाही, ही गांधींची धारणा आहे. नास्तिक माणूसही सतत समाजोपयोगीच वागेल असे नाही.
स्वातंत्र्यलढ्यात गांधींनी उभ्या केलेल्या असंख्य माणसांनी सत्याग्रही म्हणून नोंदणी केली, ब्रिटिश सत्तेचा प्रतिकार केला, जुलमी राजसत्तेपुढे ही माणसे बेधडकपणे अहिंसक पद्धतीने उभी राहिली. ही सगळी माणसे नास्तिक नव्हती. यातले बरेचसे धार्मिक होते, दरिद्री होते, अशिक्षित होते आणि सुशिक्षितही होते.
याचा अर्थ स्वातंत्र्याची प्रेरणा फक्त नास्तिक्यातूनच येते का? भारतातल्या असंख्य लोकांना गांधींच्या कार्यक्रमाद्वारा आपण स्वतंत्र व्हावे, असे वाटत होते. हा कार्यक्रम खरं तर आस्तिक आणि नास्तिकतेच्या पलीकडला असणारा होता. परंतु गांधींची या कार्यक्रमामागची परिभाषा धार्मिक होती. त्या काळाशी या परिभाषेचा एक महत्त्वाचा संदर्भ असा आहे की, धार्मिक परिभाषेतून भारतातील अशिक्षित जनमानस लवकर जागृत होऊ शकते, हा गांधींचा अनुभव होता. ते भाषा, परिभाषा धर्माची वापरत पण त्यांच्या कार्यक्रमाचा आशय धर्माच्या पलीकडे जाणारा होता, हे गोरांनी कुठेही लक्षात घेतलेले नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
स्वातंत्र्याची प्रेरणा नास्तिक्यातून येते का, हा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा माणसांच्या चांगल्या वर्तनाचा आधार एकच एक असू शकत नाही. भोवतालच्या परिस्थितीचा माणूस कसा अर्थ लावतो, त्यावरही ते अवलंबून असते. समस्त मानवजातीकडे विविध लेबले लावूनसुद्धा ही एकाच ईश्वराची लेकरे आहेत, असेही पाहता येते. अनेक साधू-संत, संतपरंपरा आणि त्यातून निर्माण झालेले संत नसणारे, पण सत्पुरुष म्हणून प्रसिद्ध पावलेले अनेक महंत आपल्याला दाखवता येतात, ज्यांनी मानवजातीची एकता ईश्वराच्या लेकरांच्या रूपात पाहिली.
येशू ख्रिस्ताचे उदाहरण सगळ्यांना माहीत आहे. त्यातूनच एका अर्थाने ईश्वरनिष्ठ मानवतावादाचा जन्म होतो. ईश्वरनिष्ठ मानवतावादाच्या आधारे चांगले वर्तनही घडू शकते, याच्यात ईश्वर किती आणि मानवतावादाची प्रेरणा किती हा कदाचित वादाचा मुद्दा असू शकेल, पण त्या ठिकाणी मानवतावादी वर्तन घडण्याला ईश्वर पूरक ठरतो, हे नाकारता येत नाही. चांगल्या वर्तनाचा संबंध केवळ बुद्धी अथवा प्रज्ञेशी नाही, तो करुणेशी सुद्धा जोडलेला आहे, हे गांधीजींच्या सगळ्या कार्यक्रमातील मर्म आहे.
गांधी स्वत: करुणा जागी करणाऱ्या ख्रिस्त, महंमद, बुद्ध या परंपरेतील आहेत. ईश्वर न काढताही, लेबले राहूनही करुणेच्या आधारे माणसे चांगली वागू शकतात आणि लेबले तांत्रिक होत जातात. करुणेचे आवाहन हृदयापर्यंत पोचू शकते. प्रज्ञा किंवा बुद्धी माणसाला मार्ग दाखवते, पण करुणा माणसाला कार्यासाठी प्रवृत्त करते, हे लक्षात घेतले, तर करुणा जागे करण्यासाठी, कदाचित धार्मिक परिभाषेत जास्त लोकांना समजेल, यासाठी नास्तिकतावाद फारसा उपयोगाचा नाही हे गांधींचे एकंदर म्हणणे या पुस्तकातून आपल्या प्रत्ययाला येते.
गांधींचा ‘धार्मिक’ व ‘समाजसुधारक’ असा उल्लेख गोरांनी केला आहे. ते गांधींशी ईश्वराबद्दल चर्चा करताना गांधींचा ईश्वर इतरांसारखाच मानतात, ही गोरांची चूक आहे. ‘सत्य’ हा ‘ईश्वर’ असे म्हटले तरी ‘ईश्वर’ हा शब्दच गोरांना मान्य नाही. गांधी त्याच्या उलट, शब्दांशी भांडत नाहीत आणि आशयाला महत्त्व देतात. गोरांना ते समजावून घेऊ शकले, याचे कारण गांधी शब्दांशी भांडत नव्हते. त्यामुळे गोरांना सामावून घेणे, समजावून घेणे या दोन्ही प्रक्रिया गांधींना सहजसाध्य झाल्या. त्यांच्यासाठी शब्दांपेक्षा गोरा मांडत असलेला आशय, करत असलेले काम आणि त्यांचा अस्सलपणा हे गांधींना भावलेले आहे.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
..................................................................................................................................................................
गांधीजी धर्म, ईश्वर या संकल्पनांना प्रगल्भ आणि उन्नत रूप देत आले, हे लक्षात घ्यायला हवे. सर्व धर्मांच्या प्रार्थना असतील किंवा उपासनेच्या पद्धती असतील, द्वेष निर्मूलनाचे कार्य असेल, हे सतत करत असताना गांधीजी धर्माचा एका वेगळा आणि प्रगल्भ अर्थ मांडतात. याकडे गोरांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. सर्वसामान्य माणसाच्या लेखी असणारे ग्रह, पूर्वग्रह, समजुती, रूढी आणि ईश्वर कल्पना या गोरांच्या विचारप्रणालीचा आधार आहेत. गोरा आपला संपूर्ण नास्तिकवाद या आधारे मांडतात. त्याच आधारे ते संवाद करू पाहतात, तर गांधी प्रत्यक्षामध्ये दुसऱ्याच पातळीवर आहेत.
गांधींचा ईश्वर निराकार, जोतिबा फुल्यांच्या निर्मिकासारखा. तो स्वयंसिद्ध आहे. तो सर्वमंगल आहे. त्याच्या प्रकाशात स्वत:ला निरामय करून घेणे ही खरी श्रद्धा आहे. त्यासाठी धर्मग्रंथात आणि रूढींमध्ये बदल या गोष्टी गांधी आवश्यक मानतात. गांधीजींची धर्मकल्पना गूढ किंवा गुहाकेंद्री नसून, ती समाजाभिमुख आहे, म्हणूनच ती धार्मिक परिभाषेत त्यावेळेला नेमकी लोकांना आकर्षित करू शकली. गांधीजींची ईश्वरावरील श्रद्धा ही कोणत्याही सांप्रदायिकतेकडे नेणारी नाही.
गोरांनी त्यांच्या नास्तिकतावादाच्या विवेचनात ईश्वराचे पुढचे सगळे तर्कशास्त्र मांडताना सहजपणे, हे सगळे तत्त्वज्ञान सांप्रदायिकतेकडे जाते, त्यातून झगडे निर्माण होतात, हिंसा उत्पन्न होते अशाप्रकारची मांडणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात गांधींची ईश्वरावरील श्रद्धा कुठल्याही विशिष्ट संप्रदायाशी जोडलेली नव्हती. त्यांच्या सर्वधर्मीय प्रार्थना हे याचे उत्तम उदाहरण ठरावे.
गांधीजींच्या सार्वजनिक प्रार्थना पाहिल्या तरी एका बाजूला त्या सर्वधर्मीय आहेत आणि निवडलेल्या प्रार्थनांचा आशय पाहिला तर तो आज धर्मनिरपेक्ष वाटेल इतका तो त्या काळाच्या दृष्टीने पुढे असणारा आहे. सांप्रदायिकता निर्माण करतात ती माणसे. श्रद्धांचा वापर राजकारणी करतात हे गांधींनी म्हटलेले आहे. हे गोरांच्या विवेचनात कुठेच दृग्गोचर होत नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
अलीकडच्या इतिहासातील सावरकर आणि जिना ही दोन ठळक उदाहरणे आहेत, ज्यांनी धर्माशी देणे-घेणे न ठेवता धर्माचा वापर केला आणि मूळच्या धर्मप्रेरणांशी विद्रोह केला. गांधींच्या धर्मकल्पनेची व्याप्ती लक्षात घेता, त्यांचा आणि गोरांचा संवाद मतभेद राखूनही कसा सकारात्मक होतो, हे या पुस्तकावरून कळते. तुम्ही कोणत्याही विचारांचे असा, तुमच्या कामाच्या प्रेरणा किती अस्सल आहेत, तुमचे चारित्र्य व वर्तन कसे आहे यावर लोकांचे लक्ष असते. चांगल्या कार्याला मिळणारा प्रतिसाद हा त्यावर अवलंबून असतो. त्यासाठी तुम्ही आस्तिक आहात की नास्तिक या कसोट्या लोकांसाठी पुरेशा नसतात. जाती आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी गोरांनी सुचवलेल्या योजना थोड्याफार फरकाने गांधींनाही मान्य आहेत. गांधींच्या विकासातील टप्प्यांची जाणीवही गोरांना या पुस्तकाच्या अखेरीस पत्रव्यवहारातून होताना दिसते.
याचाच अर्थ गांधींच्या बरोबर केलेल्या संवादानंतर गोरांना गांधी उलगडत गेलेले आहेत. गोरांनी त्यासाठी गांधींच्या जातविषयक भूमिकेचा दाखला दिला आहे. या पुस्तकात असे काही प्रसंग आहेत, ज्यामुळे गांधींची सर्वसमावेशकता गोरांना जाणवत गेली, भूमिका भिन्न असूनही उभयतांना अंत:करणाच्या जवळिकतेची जाणीव झाली. ईश्वर वगळता गांधींचा मार्ग हा गोरांचा मार्ग झालेला आहे. केवळ शब्द आणि त्यांचे जुनाट अर्थ याच्याशी आपण बांधून राहिलो, तर उद्दिष्ट एक असूनही त्यात अनेक अडचणी येतात, शत्रुभाव निर्माण होतो आणि त्याने कार्याची हानी होते. त्यापेक्षा शब्दांशी न भांडता उद्दिष्टांच्या आणि व्यावहारिक परिणामांच्यासाठी अंत:करणाने जवळ येणे हे जास्त इष्ट आहे, असा संदेश गोरांच्या पुस्तकातून आपल्याला मिळतो.
३.
या पुस्तकाने आपल्यापुढे अनेक प्रश्न उभे केले आहेत. आजच्या काळामध्ये लोकांमध्ये ज्या वेळेला समाजसुधारणा, धर्मसुधारणा बोलायची पाळी येते, तेव्हा एक स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनात आपल्याविषयी असतो, तुम्ही कोण आहात? तुम्ही धार्मिक आहात का? असाल तर तुमचा धर्म कोणता? सामान्यत: पुरोगामी कार्यकर्ते स्वत:ला धार्मिक समजत नाहीत आणि धार्मिक भूमिका घेणाऱ्या लोकांसोबत संवाद करताना त्यांना अनेक अडचणी येतात. या अडचणी टाळायच्या असतील, तर आपल्याला आपल्या स्वत:च्या धर्माची ओळख द्यावी लागेल.
ही ओळख देताना आपल्याला जो धर्म जन्माने लाभलेला आहे, ती ओळख नाकारून काहीही साध्य होणार नाही. सामान्यत: पुरोगामी कार्यकर्त्यांवर धर्मविचारांच्या ऐतिहासिकतेपेक्षा नास्तिकतेचा व धर्मामुळे झालेल्या दंगली, अत्याचार यांचा पगडा असतो. या व अशा आकलनांमुळे अशा धर्माचा वारसदार म्हणवून घेणे त्यांना अवघड वाटत असावे. उलट ती ओळख अधिक प्रगल्भ आणि उन्नत करण्याकडे, आधुनिक जगाशी माझी धर्मकल्पना जोडण्याकडे जर आपण गेलो, तर गांधी ज्या पद्धतीने धर्माचा विचार करायचे, त्या पद्धतीने आपल्याही धर्माचा विचार करता येईल. त्या पद्धतीने आपला धर्म मानवता धर्माशी सुसंगत करण्याचा प्रवास सुरू केला, तर धार्मिकतेची ओळख लपवायचेसुद्धा कारण उरणार नाही.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
बापू, लोकांना गांधी ‘प्रोजेक्ट’ करायला आवडतो, पण ‘प्रोटेक्ट’ करायला आवडत नाही!
..................................................................................................................................................................
पुढच्या काळात आपल्याला कदाचित धार्मिक ओळख घेऊन जगावे लागेल. हे जगत असताना आपला धर्म उन्नत करण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. ही जबाबदारी घेऊन त्यासाठी इतरांशी संवाद करावा लागेल. तो संवाद स्वधर्मियांशी असेल तसाच इतर धर्मियांशीसुद्धा असेल. पुरोगामी माणसांनी विचारांच्या क्षेत्रातल्या सर्व शक्यता लक्षात घेऊनच आपल्या पुढच्या कार्याची आखणी करताना धार्मिकता आणि मश्रूवाला म्हणतात तशी अत्यावश्यक धार्मिकता या दोन गोष्टींची दखल आपल्याला घ्यावी लागेल हा या पुस्तकाचा एकंदर रोख आहे.
४.
या पुस्तकाचे लोभसवाणे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गोरा-गांधी यांच्या संवादातून उलगडणारे व फुलणारे त्यांचे नाते. शेवटी शेवटी गोरांना गांधींच्यातील जिव्हाळा, मतभिन्नतेचा आदर, नर्मविनोद करण्याची वृत्ती यांचा परिचय होताना दिसतो तर गांधींना गोरांच्या अंत:करणातील तळमळ, लढाऊपणा, कार्यनिष्ठा, सातत्य याचा प्रत्यय येऊ लागतो. यातून निर्माण होणारी जवळीक वाचकाला जाणवत राहते. गांधीजी जगते, तर त्यांनी पुस्तकाला काय प्रस्तावना लिहिली असती, हे सांगता येत नाही. चर्चेअंती कोण बदलले असते, हेही सांगता येत नाही. पण समान उद्दिष्टावर अंत:करणाने आतून जवळ आलेली माणसे एकत्र आल्यावर जो मैत्रबंध निर्माण होतो, त्याने उभयतांचे आयुष्य लख्ख उजळून निघते. उभयतांना संपन्नता प्राप्त होते नि कार्याची गती निश्चितच वाढते. अशा आगळ्या वेगळ्या मैत्रबंधाचा प्रत्यय हे पुस्तक देतेच, पण भ्याड आणि विकृत विचारसरणीने गांधींच्या केलेल्या हत्येने हा उमलू लागलेला मैत्रीबंध मध्येच तुटल्याची चुटपूटही लागून राहते.
धर्मविषयक मौलिक विचारांनी भरलेल्या या पुस्तकाचा विजय तांबे यांनी अतिशय प्रवाही असा अनुवाद केला आहे. जणू काही आपण मूळ पुस्तक वाचत आहोत, असे वाटावे इतका अनुवाद सरस झाला आहे. याबद्दल विजय तांबे यांचे मन:पूर्वक अभिनंदन.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment