अजूनकाही
कट वन
२००१च्या ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका मालिनीताई राजूरकर यांना पहिल्यांदा ऐकलं. त्या दिवशी त्यांचा साठावा वाढदिवस होता… आणि समोर दाद देत होते साक्षात पंडित भीमसेन जोशी.
कट टू
२२ जुलै २०२३. पुण्यात मेघना (पेठे) आणि मी मालिनीताईंचा टप्पा आठवत बसलो होतो. ताईंना कळवलं, त्यावर त्यांनी स्माईली पाठवली.
मालिनीताईंनी आपल्या गाण्यातून ग्वाल्हेर घराण्याची संगीत परंपरा अत्यंत सुरेलपणे पुढे नेली. ख्याल आणि टप्पा गायकीबद्दल त्यांना प्रामुख्यानं ओळखलं जात असलं, तरी ठुमरी आणि नाट्यसंगीतावरही त्यांच्या आवाजाची अमीट छाप आहे. ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा आणि हिराबाई बडोदेकर त्यांच्या आदर्श होत्या.
मालिनीताईंचं व्यक्तिमत्त्व शांत नंदादीपासारखं, तर गाण्यात वीजेचा लखलखाट. त्यांचं गाणं आणि वावर ‘फ्रील’शिवाय असायचा. स्वतःचं गाणं आणि त्याची साधना, या व्यतिरिक्त मालिनीताईंनी कटाक्षानं कलाक्षेत्रांतील इतर उचापतींपासून स्वतःला दूर ठेवलं होतं, म्हणूनच त्यांचं गाणं शेवटपर्यंत शंभर नंबरी सोनं राहिलं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मालिनीताईंचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी अजमेरमध्ये झाला. त्यांनी गणित विषयाचं शिक्षण घेतलं. त्यांना गाण्याचीही आवड होती. त्यानंतर अजमेरच्याच सावित्री माध्यमिक शाळा व महाविद्यालयात गणित विषयाचं अध्यापन केलं. पुढे त्यांना तीन वर्षांची कला विषयातील शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या अजमेरच्या संगीत विद्यालयात दाखल झाल्या.
तिथेच त्यांनी गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे पुढचे धडे गिरवले. त्यानंतर त्या वसंतरावांशी विवाहबद्ध झाल्या. तो त्यांच्या सांगितिक कारकिर्दीतला ‘टर्निंग पॅाईंट’ ठरला. लग्नानंतर सासरच्या प्रोत्साहक वातावरणात त्यांची सांगितिक कारकीर्द बहरात आली. वसंतरावांची त्यांना संसारात आणि मुख्यत्वे गाण्यात अजोड साथ मिळाली. त्यांचं २०१६मध्ये दुःखद निधन झालं. त्यानंतर मालिनीताई खचल्या. त्यांनी गाण्याचे जाहीर कार्यक्रमही कमी केले होते.
मालिनीताईंना पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवात सातत्यानं पाच दशकं गाण्याचा मान मिळाला. पहिल्या गाण्याच्या वेळी त्या गरोदर होत्या. तेथपासूनचा त्यांचा विविध टप्प्यांवरील जीवनप्रवास एकप्रकारे सवाईच्या साक्षीनेच झाला, असं म्हटलं तरी चालेल.
मालिनीताई स्वतःला ‘कलाकार’ मानायच्या नाहीत, त्यांना ‘उत्तम माणूस’ बनणं आवश्यक वाटायचं. तुम्ही माणूस म्हणून जितके पारदर्शक असाल, तितकेच तुमचे स्वरही पारदर्शक राहतील, अशी त्यांची धारणा होती. त्याच्याशी त्या इमान ठेवून होत्या. म्हणूनच व्यासपीठावर एक, घरी एक, शिष्य म्हणून एक आणि गुरू म्हणून एक, असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे कप्पे नव्हते. परिणामी शेवटपर्यंत त्यांचं गाणं त्यांच्यासारखंच सात्त्विक, सत्शील आणि घरंदाज राहिलं.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
बंदिशीच्या शब्दांना सजवण्यासाठी खयाल गायला जात नाही
“शास्त्रीय संगीत पाया, तर फिल्लम संगीत कळस काय रे?”
अपेक्षित आलं तर अपेक्षापूर्ती, नाहीतर सुखद धक्क्याचा अपेक्षाभंग!
..................................................................................................................................................................
सोबतच्या साथसंगत करणाऱ्या वादक कलावंतांना त्या ‘संगतकार’ म्हणायच्या आणि संगतकाराशिवाय कुठलाही गायक अपुरा आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. त्यामुळे त्यांचा योग्य तो मान, सन्मान ठेवलाच पाहिजे, असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्या माणूस म्हणून निरलस आणि निरपेक्ष होत्या. त्या संगीतक्षेत्रातीलच नव्हे, तर कलाक्षेत्रातील कुठल्याही महत्त्वाकांक्षेपासून कोसो दूर होत्या.
ख्यातनाम पत्रकार व लेखक अशोक जैन सरांमुळे मालिनीताई मला अधिक जवळच्या झाल्या. सर मालिनीताईंचे परम भक्त. ते त्यांच्या गाण्याबद्दल भरभरून बोलायचे, लिहायचे. त्यांच्या वाढदिवशी, मी मालिनीताईंच्या गाण्याची नवीन सीडी त्यांना भेट द्यायचे. पक्षाघातासारख्या गंभीर आजारपणातही त्यांनी पेणला जाऊन मालिनीताईंची मैफल ऐकली होती. हे फार थोर आणि ‘पॅशनेट’पणाचं प्रतीक होतं. त्यामागे होता मालिनीताईंचा जादुई आवाज.
काही वर्षांपूर्वी मला मालिनीताईंची मुलाखत एका दिवाळी अंकासाठी घ्यायची होती, त्यांचा नंबर मिळवून फोन केला. पंधरा मिनिटं आम्ही बोललो, पण मुलाखत द्यायला त्यांनी नकार दिला, मात्र आमचे नंबर एकमेकींकडे कायमचे ‘सेव्ह’ झाले.
मालिनीताईंचा हमीर, बिभास, मालकंस, यमन तितकाच श्रेष्ठ आहे. त्यात डावं-उजवं करताच येत नाही. आवाजाचा ‘थ्रो’ आणि त्यामागोमाग येणारा ‘इन्व्हॅाल्व्हड’ सूर गाणं मनात गातं ठेवतो. त्यांचं गाणं ‘प्ले-लिस्ट’ बंद केल्यावर बंद होत नाही, ते तुमच्यासोबतच चालत राहतं.
..................................................................................................................................................................
हेहीपाहावाचा -
“आकाश जसे दिसते तशी म्हणावी गाणी…”
‘चमत्कार’, ‘नमस्कार’ आणि ‘पुरस्कार’ या पलीकडे शास्त्रीय संगीत जाणार का?
सवाई गंधर्व महोत्सव : श्रवणीयतेकडून प्रेक्षणीयतेकडे?
..................................................................................................................................................................
नाट्यसंगीतातील मालिनीताई आक्रमक आहेत. राग केदारमधील मध्यम स्वराच्या ‘कंगनवा मोरा…’मध्ये अवखळ, तर मालकंसमधील ‘पीर न जानी’ या बंदिशीमध्ये आध्यात्मिक आहेत. त्यांच्या स्वराचे विभ्रम मानवी भावभावनांचा इतिहास मांडतात.
मालिनीताईंनी गायलेली सालग वराली रागातील एक ‘बधाई…’ नावाची बंदिश आहे. हा राग ‘वराली तोडी’ या नावानंही ओळखला जातो. त्यात दक्षिण संगीतातून हिंदुस्थानी संगीतात जाताना काही मोजके बदल केले आहेत. पूर्वार्धात राग तोडी आणि उत्तरार्धात राग अहिर भैरव रागाचं अपूर्व मिश्रण आहे, ते या रागाला माधुर्य प्रदान करतं. मालिनीताईंनी हा राग कमाल गायला आहे.
याशिवाय राग बिलासखानी तोडी, किरवानी, परमेश्वरी आणि शंकरा सारखे खर्जातला दमसास लागणारे राग, विशेषकरून महिला गायिकेसाठी चॅलेंज असणारे राग मालिनीताईंनी लीलया गायले आहेत. त्यांच्या आवाजातील माधुर्य आणि स्वरांतील खर्ज, त्यांचं गाणं अलौकिक करायचा, जोडीला त्यांचं रियाजातील सातत्य आणि स्वरांवरील अविचल निष्ठा...
पुण्याच्या ‘अलूरकर म्युझिक कंपनी’ने आणि पुढे ‘फाऊंटन म्युझिक’ यांनी ताईंचे अनेक अल्बम्स काढले आहेत. त्यातल्या एका अल्बममधील ‘बिरीज युवती मन रास’ ही मारू बिहाग रागातील रासलीलेचं वर्णन करणारी ‘फास्ट बिट’ची बंदिश गायली आहे. फास्ट बिटच्या गाण्यांत त्यांचे स्वर अधिक खुलायचे. टप्पा गायकीत त्यांचं हे वैशिष्ट्य उजळून निघायचं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
ताईंचं बालपण आणि शिक्षण राजस्थानमध्ये झालं; तर नंतरचं आयुष्य हैद्राबादला व्यतीत झालं, तरी त्या महाराष्ट्रातीलच वाटत. ताईंचा केदार आणि छायानट ऐकताना डोळ्यांत पाणी येतं. ते आनंद किंवा दुःखाचं नसतं, तर जीवन-मरणातील सार आकळण्याचं असतं. ते ऐकल्यावर मनातील साठलेल्या अतीव क्षुद्रपणाचा एकेक धागा त्या क्षणांपुरता तरी उसवला जातो… आपण वेगळ्याच प्रवासाला निघतो… तो प्रवास फक्त मालिनीताई आणि त्या जादुई आवाजात विरघळून गेलेल्या ‘आपला’ असतो.
शास्त्रीय संगीताच्या आजवरच्या मुशाफिरीत मला कधी न दुरावणारं, न हरवणारं किती तरी मोलाचं मिळालं. त्यात मालिनीताईंचं गाणं सर्वोच्च स्थानी आहे.
..................................................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment